Sunday 24 January 2021

कुछ और जमाना केहता है

कुठल्याही कलाकृतीचा रसास्वाद घेणे म्हणजे त्या कलाकृतीशी समरस होणे होय. समरसतेचा अनुभव हा क्वचित अस्वास्थ करीत असला तरी सुखकारकच असतो. एखाद्या कलाकृतीचे रसग्रहण करीत असताना आपोआपच चित्तवृत्ती एकाग्र होणे, आत्मविस्मृती होणे, त्या अनुभवाने स्वतःची जाणीव समृद्ध झाल्याची प्रतीती येणे, तो अनुभव पुनःपुनः घ्यावासा वाटणे आणि दरवेळच्या पुनर्भेटीत नावीन्य आढळणे, या सगळ्याच प्रक्रिया सुखकारकच असतात. कारण कलाकृतीचा आस्वाद निव्वळ डोक्याने, बुद्धीने घेता येत नाही (जरी हे घटक आवश्यक असले तरी....) तो संपूर्ण व्यक्तिमत्वाने घ्यावा लागतो. प्रथम संवेदनांनी, मनाने, हृदयाने घ्यावा लागतो. बुद्धी मग त्याचा पाठपुरावा करील. या विवेचनाशी निगडित असे आजचे आपले गाणे आहे. रसास्वाद घ्यायला भाग पाडणारे आणि त्याचबरोबर बुद्धीचा वापर करायला लागून आपल्या आस्वादाच्या कक्षा विस्तारित करणारे - *कुछ और जमाना केहता है* !! सुप्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शायरी आहे. शैलेंद्र यांना *लोककवी* असे बिरुद लावले आहे परंतु खरंच अशा बिरुदावल्या लावणे गरजेचे असते का? त्यामुळे *एकांगी प्रतिमा* होत नाही का? प्रस्तुत कविता ही *गझल* वृत्तात लिहिली आहे. गाणे म्हणून ऐकताना हे प्रतीत होत नाही - ही कमाल संगीतकार अनिल बिस्वास यांची!! गझल वृत्ताचे एक खास वैशिष्ट्य असते आणि ते म्हणजे प्रत्येक *शेर* ही एक सार्वभौम कविता असते आणि या दृष्टीने वाचल्यास, त्या वैशिष्ट्याची पूर्तता होते. शैलेंद्र यांच्याबाबतीत आणखी एक मुद्दा उपस्थित केला जातो. या कवीने अधिकतर हिंदी भाषिक कविता केल्या. या मुद्द्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य जाणवते पण हा मुद्दा टीका विषय कसा होऊ शकतो? आणि या मुद्द्याला धरायचे झाल्यास, प्रस्तुत कविता त्याला विशेष छेद देताना दिसेल. शायरीमध्ये भरपूर उर्दू भाषिक शब्द आहेत आणि ते चपखल बसले आहेत. *दुनिया ने हमें बेरहमीसें ठुकरा जो दिया* ही ओळ किंवा *इन्साफ, मुहोब्बत सच्चाई वो रहम-ओ-करम के दिखलावे* ही ओळ तर *द्वैभाषिक रचना कशी करायचे याचे सुरेख उदाहरण ठरू शकते. स्वररचना संगीतकार अनिल बिस्वास यांची आहे. *गौड सारंग* रागावर आधारित चाल आहे. अनिलदा यांच्या काही रचना वगळता, बहुतेक रचना या कुठल्या ना कुठल्या तरी रागावर आधारित असतात परंतु त्याला लोकसंगीताची बेमालूम जोड दिलेली असल्याने गीतातून रागस्वरूप चटकन ध्यानात येत नाही. या गीताच्या बाबतीत, स्वररचना बांधताना त्यात बंगाली लोकसंगीत अतिशय कुशलतेने विणलेले आहे. परिणामी गाण्यावरील रागाचा ठसा अंधुक होतो आणि मुख्य म्हणजे *गीत* म्हणून आपल्या समोर येते. ही तर या संगीतकाराची खासियत होती असे म्हणता येईल. मुखडा सुरु होण्याआधी गायिकेचा हलकासा *हुंकार* आणि त्यालाच जोडून स्वरमंडळ वाद्याचे सूर ऐकायला मिळतात आणि हेच सुर रागाची ठेवण घेऊन येतात. जरा बारकाईने ऐकले तर हा हुंकार आणि लगेच अवतरणारे स्वरमंडळ - अगदी क्षणिक अस्तित्व दर्शवतात परंतु त्यातून रागाचे सूचन मिळते. एखाद्या चालीचे अतिशय थोडक्यात *स्फटिकीकरण* कसे करता येते, यासाठीचे हे गीत सुंदर उदाहरण आहे. चाल अतिशय सहज आणि गोड आहे. गायिका मीना कपूर यांच्या गळ्याची ठेवण लक्षात घेऊन, स्वररचना केली आहे. गाण्यात ३ अंतरे आहेत परंतु तिन्ही अंतरे वेगवेगळ्या स्वरान्तराने बांधले आहेत. मुखडा कुठे संपतो आणि अंतरा कुठे सुरु होतो, याचे अवलोकन करणे, हा बौद्धिक भाग आहे. गंमत अशी की हे बौद्धिक कुठेही जडजंबाल होत नसून चालीतील स्वरिक परिवर्तनातून दृग्गोचर होते. अनिलदा यांच्या रचनेचे हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. याचाच प्रभाव बहुदा पुढील पिढीतील रोशन, सी.रामचंद्र (हळुवार गीतांपुरते), मदन मोहन यांच्या सुरवातीच्या रचनांवर पडलेला दिसतो. अर्थात अनिलदा यांचा तितका अधिकार नक्कीच होता. दुसरे वैशिष्ट्य अतिशय महत्वाचे म्हणता येईल. *सैगल* काळात कारकीर्द सुरु झाली परंतु सैगल शैली पूर्णपणे झुगारून त्यांनी आपली वाट निर्माण केली. त्या काळातील संगीतकारांवर सैगल यांच्या गायनशैलीचा प्रचंड प्रभाव पडलेला लक्षात घेता, अनिलदा यांचे हे वैशिष्ट्य नजरेत भरण्यासारखे आहे. थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, अनिलदांनी चित्रपट संगीतास काय नवीन दिले? वास्तविक भारतीय संगीताचा कडवा पाठीराखा अशीओळख असताना देखील, पाश्चिमात्य संगीतातील काही विषेश - १) वाद्यवृंद रचना, २) संगीत लेखन त्यांनी नव्याने राबवले. पाश्चात्य संगीताचा ल्होळावर अभ्यास करून त्यातील कुठले गुण आपल्या संगीतात अनंत येतील, हे मनाशी ताडून, त्याचा अंतर्भाव केला. तसेच गीतात *सुश्राव्यता* कशी आणायची आणि राखायची, हे त्यांनी गीतातील वेगवेगळ्या लयीतून दाखवून दिले. मघाशी मी, याच गीतातही प्रत्येक अंतऱ्याची बांधणी *स्वतंत्र* केल्याचे विधान केले होते, त्याचा या विधानाशी संदर्भ आहे. चित्रपट गीतात अधिकाधिक *मेलडी* अंग कसे ठेवावे, याचा आदर्श किंवा मानदंड त्यांनी निर्माण केला आणि पुढील संगीतकारांची पायवाट मोकळी करून दिली. अनिलदांच्या स्वररचनेवर त्यांच्या शैलीची एक अमीट छाप असते. आता थोडक्यात प्रस्तुत गाण्याबद्दल. पहिला अंतरा ज्या सुरांवर सुरु होतो, तो मुखड्याच्या सुरांपासून अंतर राखून सुरु होतो. परंतु *नादान हम समझे बैठे थे, निभाती है यहां दिल दे दिल की* ही दुसरी ओळ ऐकताना, मुखड्याकडे प्रवास कसा सुरु झाला हे, कुठेही फारशी स्वरिक गुंतागुंत न करता ऐकायला मिळते. इथे *गुंतागुंत* हा शब्द फार महत्वाचा कारण इथे लय कशीही अवघड पद्धतीने आणता आली असती. पण तो अनिलदांचा *पिंड* नाही. वेगळे बांधले हे बंगल्या दृष्टीने बघायला गेल्यास, *गझल* वृत्तात प्रत्येक २ ओळींचे कडवे ही सार्वभौम कविता असते आणि त्याचा मुखड्याच्या ओळीशी, संबंध नसतो तेंव्हा या वृत्ताच्या वृत्तीशी समर्पक असे वेगळे अंतरे बांधणे, समर्पक नव्हे का? गायिका मीना कपूर, हीच वरती मी उल्लेख वेगळ्या संदर्भात केलाच आहे पण आता गायिका म्हणून स्वतंत्र विचार करूया. स्वररचनेचा *कुलधर्म* लक्षात घेता, त्यालाच अनुसरून गायकी ठेवली आहे. गायिकेचा गेला फार मोठ्या विस्ताराचा नाही, किंचित अनुनासिक आहे. आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नाही तसेच त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरती आहे. परंतु आवाजात एक प्रकारची आश्वासकता दिसते. अर्थात गेल्याचे हे गुणधर्म ओळखूनच संगीतकार अनिलदांनी गाण्यात हलक्या अंगाच्या हरकती दिल्या आहेत. चाल बंगाली लोकसंगीतावर आधारित असल्याने स्वरांत काहीशी *बंगाली गोलाई* ऐकायला मिळते. उर्दू शब्दोच्चार व्यवस्थित केले आहेत. तांत्रिक तपशील नोंदायचा झाल्यास, असे म्हणता येईल, काही विशिष्ट स्वर मर्यादांत सुरेल गायन करणे त्यांना सुलभ जाते. परिणामतः छोटे स्वरसमूह सफाईने घेणे शक्य झाले आहे. विशेषतः अंतरे संपवताना, अगदी छोट्या हरकती घेतल्या आहेत आणि हेच यांच्या गायनाचे द्योतक म्हणता येईल. अनिलदांची गीते लगेच मनाची पकड घेत नाहीत. परिणामी चाल मनात रुजायला त्यांना अवकाश द्यावा लागतो. परंतु एकदा का चालीचे मर्म ध्यानात आले की स्वररचनेची श्रीमंती कानात भरते आणि मग अनिलदा इतक्या वरच्या श्रेणीचे संगीतकार होते, याचा अदमास घेता येतो. या विधानाला पूरक असेच हे गीत आहे. कुछ और जमाना केहता है, कुछ और है जिद मेरे दिल की मैं बात जमाने की मानू, या बात सुनू अपने दिल की दुनिया ने हमें बेरहमीसें ठुकरा जो दिया, अच्छा ही किया नादान हम समझे बैठे थे, निभाती है यहां दिल दे दिल की इन्साफ, मुहोब्बत सच्चाई वो रहम-ओ-करम के दिखलावे सच केहते जुबां शरमाती हैं, पूछो ना जलन मेरे दिल की गो बस्ती है इन्सानो की इन्सान मगर ढुंढे ना मिला पत्थर के बुतों से क्या किजे, फ़रियाद भला टुटे दिल की kuchh aur zamaana kehta hai - YouTube

No comments:

Post a Comment