Sunday 24 January 2021

खुदा-ए-बरतर तेरी जमी पर

कलाकृतीचा अनुभव हा कलाकृती आणि रसिक यांच्यामधील *संवाद* असतो. या अर्थाने रसास्वादात एकाच वेळी सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह मूलभूत घटक असणे अपरिहार्य असते. ज्या सुवर्णरेषेवर ही दोन्ही भेटतात, ती ओळखणे जरूर असते. कलाकृतीला बीजगणितातील प्रमेय मानणारे जसे तिच्यावर अन्याय करतात तसेच तिच्या अनुभवातील "स्व" या घटकावर अवास्तव भर देणारेही. त्यामुळे कलाकृती आणि रसिक, यांचे एकास एक असे नाते असते. रसग्रहणावर याचा काय परिणाम होतो, हे बघणे मनोरंजक ठरते. एकदा का कलाकृती निर्माण झाली की तिची निर्मात्याशी असलेली *नाळ* तुटते. याच दृष्टीने कलाकृती ही निव्वळ कलाकृती, याच नजरेतून आस्वाद घेणे योग्य ठरते. रसास्वादाचा गाभा हा कलाकृतीच्या सौंदर्यरूपाचा आस्वाद घेणे होय, हेच सर्वात महत्वाचे असते आणि आजच्या गाण्यातून आपण हेच विधान अधोरेखित करून आस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. *खुदा-ए-बरतर तेरी जमी पर* ही कविता साहिर यांच्या प्रतिभेतून उमटलेली कविता. मुळात साहिर यांनी ही कविता चित्रपटासाठी लिहिलेली नव्हती. तो त्यांचा *स्वान्तसुखाय* आविष्कार होता परंतु संगीतकार रोशन यांच्या नजरेस ही कविता आली आणि त्यांनी *ताजमहाल* चित्रपटासाठी संगीतबद्ध करण्याचे ठरवले. आता जी कविता स्वतःच्या आनंदासाठी (आनंद हा वेदनेतून देखील निर्माण होऊ शकतो जसे या कवितेबाबत झाले आहे) लिहिली गेली, त्या कवितेचे *मीटर* अर्थातच गीत स्वरूपात असणे कठीण असते (असेच घडते, हे मात्र बरोबर नाही) ही कविता वाचताना या विधानाचा प्रत्यय घेता येतो. ही कविता म्हणजे अत्यंत व्याकुळ मनस्थितीचे आक्रन्दन आहे. *जमीं के खातिर ये जंग क्यूँ हैं?* सारखा संत्रस्त करणारा सवाल असो किंवा *ये कत्ल-ए-खून का रिवाज क्यूँ है* असा हैराण करणारा प्रश्न असो, कवितावाचनात आपल्या मनात असंख्य प्रश्नाचे मोहोळ उठवते. कविता बरीचशी *डाव्या* विचारांशी नाते सांगणारी आहे परंतु तरी देखील *काव्य* म्हणून वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. शायर म्हणून *साहिर* काय दर्जाचे कवी होते, हे या कवितेच्या वाचनातून समजून घेता येईल. कवितेत मुक्त हस्ताने उर्दू शब्दांची पखरण आहे त्यामुळे काही वेळा वाचनात *विकल्प* येऊ शकतो. खरंतर या कवितेवर स्वतंत्र *निबंध* लिहिता येऊ शकतो, इतक्या योग्यतेची कविता आहे. अशा सक्षम कवितेला संगीतकार रोशन यांनी स्वरबद्ध केले आहे. *तोडी* रागाच्या स्वरांचा आधार घेतला आहे. एक गंमत, परंपरेच्या दृष्टिकोनातून बघितल्यास, तोडी राग पहाटेचा आणि अर्थात तद्नुषंगाने पहाटेच्या मंगलमय वातावरणात फुलणारा परंतु इथे कवितेचा आशय तर अतिशय व्याकुळ, अटळ सत्याकडे दर्शवणारा!! असे असून देखील कुठेही विसंवादी वाटत नाही. हीच तर भारतीय कलासंगीताची खासियत आहे. सूर तुम्ही कसे *वळवून* घेता, इथे संगीतकाराची बुद्धिमत्ता प्रगट होते. सलग कविता वाचन केले तरी त्यात *गेयता* सापडते आणि त्याच गेयतेच्या अनुषंगाने संगीतकार रोशन यांनी आपली स्वररचना बांधली आहे. असे करताना अर्थातच त्यांनी *कविता पठण* न होता, *गीतधर्म* पाळला जाईल, इकडे कटाक्ष ठेवला आहे. गाण्यात फारसा वाद्यमेळ नाही, गरजच नाही म्हणा. एकदा कवितेतील आशय नेमकेपणाने ध्यानात आला की स्वररचना सुचते, असे बऱ्याच रचनाकारांच्या बाबतीत सांगितले जाते. अंतरे समान बांधणीचे आहेत तसेच अंतऱ्यामध्ये फार मोठा वाद्यमेळ नाही. अर्थात वेगळा परिणाम असा होता, ऐकणारा रसिक, कलाकृतीशी कायम जोडलेला राहतो. मध्य लयीत बहुतेक सगळे गाणे आहे. याचा दुसरा परिणाम असा होतो, कविता आणि त्यातील आशय, गाणे ऐकतानाच ध्यानात येतो. कवितेत बरेच उर्दू शब्द आहेत आणि त्याची वाजवी जाण ठेऊन, स्वररचना विणलेली आहे. खरतर सगळे गाणे काहीसे विषण्ण करणारे आहे, अस्वस्थ करते पण त्याचबरोबर एका सुंदर कलाकृतीचा आनंद देणारे आहे. मी पहिल्या परिच्छेदात लिहिताना, आस्वाद घेताना कलाकृतीचे *विच्छेदन* करू नये तसेच सतत मी,मी चा पाढा वाचला जाऊ नये आणि इथे तेच पथ्य पाळणे आवश्यक आहे. संगीतकार म्हणून थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही ठाम विधाने करता येतात. रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही.कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. २] सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. हे गीत जितके साहिर आणि रोशन यांचे आहे, तितकेच लताबाईंचे आहे, हे सहज म्हणता येईल. गीतातील उर्दू शब्द गळ्यावर कसे चढले पाहिजेत, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या गीताचे गायन होय. *खुदा-ए-बरतर तेरी जमी पर* या पहिल्याच ओळीतील *खुदा* शब्दातील *खु* शब्द कसा उच्चारला आहे तसेच त्या शब्दानंतर किंचित विराम आहे, किंचित म्हणजे फक्त निमिषभर!! परंतु त्या उच्चाराने आणि पुढील स्तब्धतेमुळे, गाण्यातील आशय किती अप्रतिम प्रकारे अधोरेखित होतो. पुढे *हर एक फतहो जफर के दामन पे* ही ओळ अशीच देखणी गायली आहे. *फतहो* शब्दाचे वजन लक्षात घ्यायला हवे. फ,त आणि हो, यातील पहिली दोन अक्षरे उच्चारताना पहिल्यास ओठांचा वापर तर दुसऱ्या अक्षरासाठी जीभ किंचित टाळ्याला लावावी लागते आणि तिसरे अक्षर लयीत येण्यासाठी *ह ओ* ही अक्षरे एकाचवेळी ओष्ठचंबूतून बाहेर यायला हवीत आणि हे सगळे उर्दू भाषेचे *सौष्ठव* सांभाळून!! आणि हे सगळे क्षणार्धात गळ्यातूनबाहेर काढणे अजिबात सोपे नाही. इथे नुसती *तालीम* उपयोगाची नसून, गायनाची दुर्मिळ अशी *नजर* असावी लागते. ललित संगीतात शब्दोच्चारांना निरतिशय महत्व असते आणि ते सौंदर्य या आणि अशा गीतांतून कळते. आणखी असेच एक सुंदर उदाहरण देण्याचा मोह झाला आहे. दुसरा अंतरा संपत असताना *सरों में किब्रो गरुर क्यूँ हैं, दिलो पे शिशे के जंग क्यूँ हैं* या ओळीतील *सरों में किब्रो गरुर क्यूँ हैं* हा भाग नीट ऐकण्यासारखा आहे. *किब्रो* नंतर लगेच *गरुर* शब्द आहे. एखाद्या अवघड जोडाक्षरानंतर लगेच सपाट अक्षर उच्चाराणे अतिशय कठीण असते परंतु लताबाईंनी ही किमया सहजतेने करून दाखवली आहे. वास्तविक बघता *सहजतेने* असे काही नसते म्हणा, त्यामागे प्रचंड परिश्रम असतात. तसेच पुढील ओळीतील *शिशे* हा शब्द वाटतो तितका सोपा नाही कारण जर का शाब्दिक वजन घसरले तर सगळ्याच कलाकृतीचा तोल ढासळतो. मला आजही नवल वाटते, *ताजमहाल* चित्रपटातील इतर गाण्यांना अमाप लोकप्रियता मिळाली (अर्थात ती योग्यच आहे) परंतु हे गाणे कसे काय बाजूला सारले गेले? या गाण्याच्या निमित्ताने या कलाकृतीशी मला *संवाद* साधता आला, याचेच मनाशी थोडे अप्रूप आहे. खुदा-ए-बरतर तेरी जमी पर जमीं के खातिर ये जंग क्यूँ हैं हर एक फतहो जफर के दामन पे खून-ए-इन्सान का रंग क्यूँ हैं जमीं भी तेरी, है हम भी तेरे ये मिलकियत का सवाल क्या है ये कत्ल-ए-खून का रिवाज क्यूँ है ये रस्म-ए-जंगो जदाल क्या है जिन्हें तलब है जहान भर की उन्ही का दिल इतना तंग क्यूँ है गरीब माओ शरीफ बेहनों को अमनो इज्जत की जिंदगी दे जिन्हें अता की है तुने ताकत इन्हे हिदायत की रोशनी दे सरों में किब्रो गरुर क्यूँ हैं दिलो पे शिशे के जंग क्यूँ हैं खाजा के रस्ते पे जानेवालो को बाख के आने की राह देना दिलो के गुलशन उजड ना जाये मुहब्बतो को पनाह देना जहां में जश्न-ए-वफा के बदले ये जश्न-ए-तिरो तफंग क्यूँ हैं KHUDA e BARTAR, TERI ZAMEEN PAR...TAJ MAHAL...1963...LATA...ROSHAN...SAHIR - YouTube

No comments:

Post a Comment