Thursday 3 October 2019

अनाम वीरा जिथे जाहला

मराठी ललित संगीतात, प्रसिद्ध कवीच्या कवितासंग्रहातील वेचक कवितेला स्वरबद्ध करणे पूर्वीपासून चालू आहे. खरतर कविता आकळायला अशा स्वरबद्ध रचना बऱ्याच अंशी कारणीभूत ठरतात. एरव्ही मुद्दामून कवितासंग्रह विकत घेणे आणि आवडीच्या कवितांचे रसग्रहण करणे, हे सर्वसामान्यपणे घडत नाही. रसग्रहण तर दूर राहिले, साधी आस्वादक वृत्ती देखील दाखवली जात नाही. अशा वेळेस, प्रसिद्ध कवी "कुसुमाग्रज" यांची कविता स्वरबद्ध केली जाते आणि विशेष म्हणजे लोकप्रिय देखील होते. आजचे गाणे ही मुळातली कुसूमाग्रजांच्या "विशाखा" या लोकप्रिय कवितासंग्रहात कविता आहे. कुसुमाग्रज हे कधीही भावसंगीताच्या वाटेला फारसे गेल्याचे आढळत  नाही. तसा त्यांचा हुकमी पिंड नव्हता असे म्हणता येईल. कुसुमाग्रजांना एकूणच क्रांतिवीर, युद्ध या विषयाबाबत खास रस होता असे म्हणायला जागा आहे. "विशाखा" कवितासंग्रहात,  या माझ्या विधानाला पूरक अशा कविता आढळतील. पुढे अर्थात दृष्टी बदलली, दृष्टी अधिक खोल, अंतर्मुख झाली, आयुष्याच्या निरनिराळ्या अंगांचा वेध घ्यायला लागली पण अशी प्रगती प्रत्येक सृजनशील कलाकाराची होतच असते. कलात्मक वाढीचा प्रवास असाच होत  असतो. जवळपास अशाच आशयाच्या ओळी, कुसुमाग्रजांच्या अतिशय लोकप्रिय कवितेतील एका अंतऱ्यात आढळतात. 
"मध्यरात्री नभघुमटाखाली 
शांती शिरीं तम चवऱ्या ढाळी 
त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी 
एकांती डोळे भरती" 
वरील ओळीतून देखील अशाच आशयाची प्रचिती येते. असे तर बरेचवेळा होते, युद्धभूमीवर बलिदान दिल्यावर विस्मृतीत जाणे. समाजमन हे नेहमीच विसरभोळे असते आणि त्यामुळे अशा बलिदानाची सार्थ आठवण फारशी, लोकांच्या मनात रहात नसते आणि याचीच खंत कुसुमाग्रजांनी या कवितेत मांडली आहे. कविता वाचताना थोडे व्याकुळ व्हायला होते. खरतर अशा बलिदानाची अशा प्रकारे इतिश्री होणे, हे कमकुवत समाजाचे लक्षण मानायला हवे आणि याचीच विदारक जाणीव या कवितेतून होते. सगळी कविता ही निराशेच्या भावनेतून लिहिली गेली आहे. 
कवितेचा असा उघडा आशय लक्षात घेता स्वरभाव देखील त्याप्रकारेच व्यक्त होणार!! संगीतकार वसंत प्रभूंची स्वररचना आहे. मराठी भावसंगीतात, जी.एन.जोशींनी प्रथितयश कवींच्या निवडक कवितांना स्वरबद्ध करायला सुरवात केली आणि भावसंगीत विशेष बहराला आले. याच वाटेवर संगीतकार वसंत प्रभूंनी आपल्या कारकिर्दीत अशा अनेक लोकप्रिय कवींच्या कवितांना स्वरबद्ध केले आणि भावसंगीत श्रीमंत केले. वसंत प्रभूंच्या चाली नेहमीच साध्या आहेत. परंतु त्यात एक अवीट,अश्रुत असा गोडवा आहे. मुखडा ऐकतानाच चाल मनात शिरते. इथे देखील हाच अनुभव येतो. 
अशा स्वररचनेत वाद्यसंगीताला फारसा वाव नसतोच म्हणा. व्हायोलिन, बासरी आणि तालासाठी संथ तबला आहे. अर्थात अशा वेळी कविता पठण होण्याचा धोका असतो परंतु इथेच संगीतकार अवतरतो. रचनेत मुखडा धरून ५ अंतरे आहेत आणि रचना तर फक्त ३ मिनिटांतच संपवायची. त्यामुळे वाद्यमेळ सजवणे, या प्रक्रियेला फारसा वाव नाही. प्रत्येक ओळ गाताना, शेवट करताना शेवटचे अक्षर हे एकतर "आ"कार तरी आहे किंवा "अ"कार आहे. चालीचे वळण ध्यानात घेतले तर लय किंचित लांबलेली आहे आणि त्यामुळे ओळीचा शेवट "आकारांत" किंवा "अकारान्त" अशा छोट्या आलापीने केला आहे. बरेचवेळा इथे "गायकी" दाखवायचा मोह होऊ शकतो परंतु अशा स्वरिक कसरतींची अजिबात गरज नाही. संगीतकार म्हणून वसंत प्रभूंचे हे वैशिष्ट्य लक्षात येते. परंतु एक "निरागस" अशीच स्वररचना आहे. 
गायिका लताबाईंनी, गाताना कवितेतील आशयाला संपूर्ण न्याय दिला आहे. कुठंही स्वरविस्ताराला वाव दिलेला नाही. अत्यंत बांधेसूदपणे गायन केले आहे. संयत गायन हे देखील वैशिष्ट्य म्हणता येईल. अतिशय हळुवार स्वरांनी शब्दांना गोंजारले आहे. मध्य लयीतच रचना चालते. अर्थात चालीची जातकुळी ओळखून गायकी सादर करणे, हे कधीही कमअस्सल नसते. प्रत्येकवेळेस दाणेदार तान, मुर्घ्नी स्वर घेऊन स्वरचना सजविण्याची काहीही गरज नसते. स्वररचना "अळुमाळू" आहे. 
अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास,गाणे संपले तरी आपल्या मनात कवितेच्याच ओळी रुंजी घालत असतात. हे जितके कवी म्हणून कुसुमाग्रजांचे श्रेय असले तरी संगीतकार म्हणून वसंत प्रभू आणि गायिका म्हणून लताबाई यांचे श्रेय देखील तितकेच महत्वाचे आहे. म्हणूनच आजही या गाण्याची लोकप्रियता  कमी झालेली नाही. 

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त 
स्तंभ इथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी 
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी 

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव!

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान!
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान!

काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला म्रुत्युंजय वीरा!


No comments:

Post a Comment