Sunday 29 September 2019

भावसंगीतातील व्यक्तिपूजा

नुकतीच लताबाईंच्या वयाला नव्वद वर्षे पूर्ण झाली. एकूणच त्यांचे भावसंगीतातील योगदान बघता, कौतुक सोहळा होणे अपेक्षितच होते आणि ते साहजिकच आहे. भावसंगीताच्या क्षेत्रात त्यांच्या सारखा स्वच्छ, सुरेल आवाज विरळाच ऐकायला मिळतो आणि कारकिर्दीच्या निदानपक्षी पहिली २५ वर्षे तरी त्यांनी आपल्या गळ्याची मोहिनी रसिक मनावर पसरवली होती, हे मान्यच करायला हवे. लताबाई आल्या आणि पार्श्वगायनाची क्षितिजे रुंदावली, त्याला आयाम मिळाले, भावसंगीतात अनेक प्रयोग केले. इतकी विस्तीर्ण कामगिरी इतकी वर्षे सातत्याने करणे, असे उदाहरण अभावानेच बघायला मिळते. परंतु आपल्या भारतीय समाजाला एक अश्लाघ्य खोड आहे, एखादा कलाकार लोकप्रिय झाला की त्याला लगेच देव्हाऱ्यात बसवायचे, त्या कलाकाराची पूजा आरंभायची. मुळात या पूजा करण्याच्या सवयीत आपण एक बाब वारंवार विसरतो, कलाकार हा मनुष्य योनीतूनच जन्माला आलेला असतो आणि एकदा का "मनुष्यत्व" मान्य केले की त्यामागोमाग येणाऱ्या "मर्यादा" स्वीकाराव्याच लागतात पण तसे आपल्याकडे अजिबात घडत नाही. लताबाईंचे गायन म्हणजे त्याला कसल्याच मर्यादा नाहीत, सगळा संगीतावकाश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला, त्या "मां सरस्वती" आहेत, "हा ईश्वरी आवाज आहे" अशा अनाठायी बिरुदावल्या लावल्या जातात. जणू काही या बिरुदावल्या लावल्या नाहीत तर लताबाईंची श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही. हे बौद्धिक पांगळेपण आहे, भयानक व्यक्तिपूजा आहे. 
आता एका विचार करू, लताबाई गातात म्हणजे नक्की काय प्रक्रिया असते? चित्रपटातील प्रसंग एक व्यक्ती ठरावीत असते, त्याबर कवी आपली कविता लिहितात आणि त्या कवितेला संगीतकार चाल लावतो (कधी उलटा प्रकार असतो) आणि मग शेवटच्या टप्प्याला लताबाई अवतरतात. याचाच वेगळा अर्थ, जेंव्हा लताबाई गायला येतात तेंव्हा त्यांच्या हातात आविष्काराचा नकाशा तयार असतो, प्रश्न असतो त्या नकाशातून मार्गक्रमणा करायचा!! म्हणजे यात सर्जनशीलता ही अनेक व्यक्तींमध्ये विभागलेली असते. अर्थात याला दुसरे उदाहरण मांडता येईल. अभिनेता जेंव्हा प्रसंग रंगवतो तेंव्हा, तो प्रसंग लेखकाने निर्मिलेला असतो, पुढे दिग्दर्शक त्या प्रसंगाची मांडणी करतो, वेशभूषाकार अभिनेत्याला प्रसंगानुरूप कपडे आणि पुढे मेकप करतो. अभिनेत्याकडे जेंव्हा प्रसंग येतो तेंव्हा आपल्याला नक्की काय करायचे आहे, याचा नकाशा हातात असतो. मग ती अभिनेत्याची सर्जनशीलता कितपत वरच्या दर्जाची ठरवायची? नकाशात मार्गक्रमणा करणे कधीच सोपे नसते आणि तिथे खरी कसोटी असते. मुळात, रसिकांसमोर येते ती लताबाईंची गायकी आणि तीच जर चाळणी भोकाभोकांची असेल तर मग सगळा आविष्कार फसतो. लताबाईंना याची निश्चित जाणीव असते. अर्थात याचे उत्तर तसे सोपे नाही, हे मान्य आणि इतक्या ढोबळपणे शोधणे अशक्य. परंतु हा देखील विचार आहे, हे मान्य व्हावे. लताबाईंच्या बाबतीत तर "असा आवाज पुढे कधीही होणारच नाही" असे वारंवार म्हटले जाते. लताबाई मनुष्यकोटीतील जीव आहे, भविष्यात कशा प्रकारचा आवाज उदयाला येईल, याची इतकी ठाम भविष्यवाणी जरा आततायी वाटते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लताबाईंची गायकी म्हणजेच खरी गायकी, असा भ्रम बाळगणे. खुद्द लताबाई, आदर्श गायकी म्हणून "बडे गुलाम अली खान" किंवा "मेहदी हसन" यांच्या गायकीचा अतिशय आदराने उल्लेख करतात आणि काहीवेळा तर यांच्यासारखे आपण गाऊ शकत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. इतके ढळढळीत असूनही , त्यांचीच गायकी सर्वश्रेष्ठ ही निव्वळ व्यक्तिपूजा झाली, असे म्हणावेसे वाटते. 
दुसरे असे, लताबाई यांच्या तार सप्तकातील गायकीची वाखाणणी करतात आणि ती सर्वार्थाने योग्यच आहे. परंतु तार सप्तकात गायन करणे म्हणजेच उच्च दर्जाचे गायन नव्हे. आता एक उदाहरण देतो. उस्ताद अमीर खान साहेब किंवा पंडित भीमसेन जोशी यांच्या ताकदीचा मंद्र सप्तकातील स्वर लताबाईंच्या गळ्यातून अनुभवता येतो का? इथे मी फक्त "स्वर" हाच मुद्दा घेतलेला आहे. रागदारी संगीत आणि भावसंगीत, हे दोन्ही स्वतंत्र आविष्कार आहेत, याची योग्य जाणीव मला आहे. तेंव्हा त्या ताकदीचा "खर्ज" स्वर ऐकायला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि याचे प्रमुख कारण पुरुष गळा आणि स्त्री गळा, यांची जडणघडण ही वेगळीच असते. लताबाईंचा तार सप्तकातील विलक्षण स्वर वरील दोन्ही गायकांच्या गळ्यातून ऐकायला मिळत नाही, हे देखील तितकेच खरे. कलाकाराचे सर्वार्थाने मूल्यमापन करताना हा मुद्दा महत्वाचा नाही का?
 आपल्याकडे व्यक्तिपूजा कशी भयानक प्रकारे पसरली आहे, याची आणखी काही उदाहरणे बघू. मोहम्मद रफी हे नाव हिंदी चित्रपट संगीतातील फार लोकमान्य नाव आहे. रफी कारकिर्दीच्या शिखरावर असताना, बरेचवेळा अति नाटकी पद्धतीने गायचे. उदाहरणार्थ, "बाबुल की दुआयें लेती जा" सारखे गाणे!! वास्तविक मुलीच्या पाठवणीचा प्रसंग परंतु गायन इतके बटबटीत, ढोबळ झाले की भावनांचा आकांत मांडलेला आहे. विरोधाभासाचे एक उदाहरण बघू. "मन रे तू काहे ना धीर धरे" हे यमन रोगावरील अतिशय सुंदर असे गाणे. असे संयत चालीचे गाणे अभावानेच ऐकायला मिळते आणि या गीताचे गायन याच रफींनी किती अप्रतिम केले आहे. याचा अर्थ संयतपणे गायन करणे अशक्य नव्हते परंतु कारकिर्दीच्या शिखरावर असताना, त्यांनी कारण नसताना (याहू सारखे गायन हा वेगळा विषय आहे) आपले गायन नाट्यात्म केले आणि आविष्कार डागाळला परंतु मोहम्मद रफींचा विषय निघाला की त्यांच्यातील या कमतरतेचा उल्लेख फारसा केला जात नाही, केली जाते ती पूजा! 
रागदारी संगीतातील प्रख्यात कलाकारांना भावसंगीताचा मोह होतो आणि ती आवड, त्यांनी जमेल तेंव्हा पुरवून घेतली आहे. आता, रागसंगीताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सततच्या रियाझने, कलाकाराचा गळा "जड" होतो आणि या विशेषाची भावसंगीत गायनासाठी अजिबात जरुरी नसते. याचा परिणाम असा होतो, शास्त्रोक्त संगीत गायकांनी सादर केलेल्या रचना डागाळलेल्या आहेत परंतु असे स्पष्टपणे मांडायचे धाडस कुणीही करत नाही. आता मी ज्या कलाकारांची उदाहरणे घेणार आहे, ते कलाकार हयात नाहीत. पंडित वसंतराव देशपांडे - वसंतरावांनी भावसंगीतात बरीच मुशाफिरी केली, अनेक रचना अतिशय लोकप्रिय झाल्या. परंतु भावसंगीत गाताना, त्यांच्या गायकीचा जो मूळ स्वभाव आहे, स्वरांवर आरूढ होऊन गायन करायचे, तो स्वभाव जागोजागी ऐकायला मिळतो. "बगळ्यांची माळफुले" चाल म्हणून अप्रतिम आहे परंतु गायन म्हणून बघायला गेल्यास, कवी वा.रा. कांतांच्या कवितेतील नाजूक भाव कुठेच गायनात उमटत नाही. आपण वसंतरावांच्या दणकट स्वराविष्कारावर भाळतो. याच गायकाचे दुसरे अतिशय प्रसिद्ध उदाहरण बघूया. "ही कुणी छेडिली तार" हे केदार रागातील श्रवणीय गाणे. खुद्द संगीतकार पु.ल.देशपांड्यांची आवडती रचना परंतु इथे गायन करताना, वसंतरावांनी अकारण "ढाला" आवाज लावला आहे जो त्यांच्या स्वभावाच्या पठडीत बसत नाही आणि त्या स्वररचनेला आवश्यक देखील नाही. परिणामी गाण्याचा एकूण परिणाम घसरतो. 
हाच प्रकार पंडित कुमार गंधर्वांच्या बाबतीत घडलेला आहे. कवी अनिलांची "आज अचानक गाठ पडे" या भावकवितेचे गायन.  गायन करताना एकदम उसळी मारून स्वर घ्यायचा, ही कुमार गंधर्वांची सवय पण ही सवय भावसंगीताला शोभणारी नाही. कवितेतील "अचानक गाठ पडणे" स्वरांतून दृग्गोचर होत नाही. ऐकायला मिळते, ती रागदारी बंदिश. हाच प्रकार आणखी वेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळतो. "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी" ही स्वररचना गाताना तर चक्क चुकीचे शब्दोच्चार केलेले आढळतात आणि वाईट भाग म्हणजे त्या शब्दोच्चारांची भलावण केली जाते किंवा उल्लेखच टाळला जातो!! याच गाण्याच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी माझे एका सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शकासह बोलणे झाले आणि मी हा मुद्दा काढला. अर्थातच त्या व्यक्तीला माझे बोलणे रुचले नाही आणि त्यांनी "हे कुमार गंधर्वांचे perception आहे" असे सांगून समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मग मी देखील त्यांना दुसरे उदाहरण दिले. हिंदी चित्रपटात अनेकवेळा चाली उचलल्या जातात, कधी ठरवून तर कधी अनाहूतपणे (अनाहूतपणे ठरवणे तसे अवघड आहे तरी....) आता, हे देखील त्या संगीतकारांचे perception का म्हणू नये? Perception हे व्यक्तिगणिक बदलत असते आणि असे स्वातंत्र्य घेणे म्हणजे स्वैराचाराला निमंत्रण देणे नव्हे का? पण कुमार गंधर्व म्हणजे भारतीय संगीतातील दैदिप्यमान नाव, जणू ध्रुव तारा तेंव्हा त्यांचे सगळेच चांगले असते. पण ही भोळसट वृत्ती झाली. कलाकारांचा "देव" असा होतो. इथे मला या कलाकारांचा उपमर्द करण्याचा अजिबात हेतू नाही. या दोन्ही कलाकारांचे भारतीय संगीताला लाभलेले योगदान नि:संशय श्रेष्ठ आहे पण त्यांची आविष्कार क्षेत्रे निराळी आहेत, इतकेच माझे म्हणणे आहे. आणि आविष्कार क्षेत्रे वेगळी आहेत हेच त्यांच्या कलेचे मूल्यमापन करताना दृष्टीस आणायला हवे. लगेच कुठल्याही कलाकाराला "एकमेवाद्वितीयं" म्हणण्याची अजिबात जरुरी नसते. 
आपला भारतीय समाज एकूणच कधीही प्रगल्भ झालाच नाही की काय? असा प्रश्न वारंवार पडतो कारण आपल्याकडे ज्या प्रकारे व्यक्तीचे भलामण करतात, नको तितकी आरती ओवाळली जाते,स्तुतीचा गुलाल उधळला जातो त्यात त्यांच्या कलाकृतीचे योग्य मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसते. सगळा समाज "महाआरतीमध्ये" तन-मन-धन गुंतलेला असतो. विवेकबुद्धी गमावून बसतो, तारतम्य वृत्तीच हरवून बसतो. कलाकार देखील "माणूस" असतो, हे लक्षातच घेत नाही आणि उदोउदो केला जातो. 

No comments:

Post a Comment