Monday 14 October 2019

समईच्या शुभ्र कळ्या

"घुसमटे खोल कळ किटेल्या शून्यांत,
फुटायचा आहे कोंभ आसूंच्या थेंबात. 
प्रसिद्ध कवी आरतीप्रभू यांच्या "जोगवा" कवितासंग्रहातील एका कवितेच्या या ओळी आहेत. आरतीप्रभूंना बरेचवेळा "भावगीतकार" असे लेबल लावले जाते. कशासाठी? केवळ त्यांच्या काही कविता संगीतबद्ध झाल्या म्हणून!! कलाकाराबाबत हा कुठला निकष जन्माला आला? आरतीप्रभू हे जातिवंत कवी(च) होते आणि त्यांना अशा लेबलांची काहीही गरज नव्हती. आज या ओळींनी मी लेखाची सुरवात केली कारण आजचे गाणे - समईच्या शुभ्र कळ्या, ही सर्वप्रथम अप्रतिम भावकविता आहे. हा कवी एकच भावना किती वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो याची एक छोटीशी झलक म्हणून उद्धृत केल्या आहेत. ललित संगीतात भावकविता आणली तर कलाकृतीचा दर्जा किती उंचावला जातो, याचे हे गाणे एक समृद्ध उदाहरण आहे. ललित संगीतात "काव्य" आले म्हणून काही टीकाकार नेहमी तिरकस टीका करतात कारण गाण्यात कविता आली म्हणजे सुरांवरील लक्ष उडण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसऱ्या बाजूने गाण्यातील शब्दकळा सपक असली की लगेच फडतूस कविता म्हणून हेच टीकाकार आपली लेखणी चालवतात. आता "सपक" आणि "उत्कृष्ट" याबाबत सावळा गोंधळ चालूच असतो. 
प्रस्तुत गाणे ही एक कविता म्हणून वाचायला गेल्यास, काही निरीक्षणे मांडावीशी वाटतात. नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. आरतीप्रभूंची कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, त्याने आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो.
संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी ही कविता निवडली, इथेच त्यांची उच्च अभिरुची ध्यानात येते. "समईच्या शुभ्र कळ्या" हे  शब्दच इतके काव्यमय आहेत की कुणाही सुजाण कलाकाराला मोह व्हावा. फार मागे, याच संगीतकाराने या गाण्याच्या संदर्भात सांगताना, हेच शब्द मनाला भिडले आणि त्यांना चाल बांधावीशी वाटली, असे सांगितले होते. चाल म्हणून स्वतंत्र विचार करताना, कवितेतील आशय अधिक खोल व्यक्त व्हावा, अशीच दृष्टी ठेवल्याचे लक्षात येते. "रागेश्री" रागावर आधारित तर्ज आहे. मंगेशकरांच्या रचनांत, बहुतांशी रचनांत वाद्यमेळ अत्यंत त्रोटक असतो. जी थोडीफार वाद्ये असतात, ती मात्र आपले अस्तित्व स्पष्टपणे दाखवून देतात जसे या रचनेत बासरी. मुळात अवघड लय, त्यातून बासरी देखील तशीच अवघड लय पेलतात. या गाण्यात वाद्यमेळ हा फक्त बासरी आणि ताल वाद्य म्हणून तबला इतकाच आहे. याचाच वेगळा अर्थ गायनाला अपरिमित महत्व. हृदयनाथ मंगेशकरांच्या चाली या "गायकी" अंगाच्या असतात, याचे नेमके उत्तर या रचनेत आढळते. दुसऱ्या शब्दात मांडायचे झाल्यास मंगेशकरांच्या चाली या अतिशय "आवेगी" असतात, स्थिर चित्ताने ऐकणे घडत नाही, प्रसंगी अस्वस्थ करतात. कलाकृतीने अस्वस्थ करणे, हा कलाकृतीच्या दर्जाबाबत आवश्यक मुद्दा असू शकतो. खरतर मूळ कविता ७ कडव्यांची आहे पण ललित संगीताच्या आकृतिबंधात सगळी कविता सामावणे निव्वळ अशक्य. तेंव्हा कवितेतील कुठली कडवी  घ्यावी,याचा अंतिम निर्णय संगीतकाराचा.  अर्थात,हृदयनाथ मंगेशकरांनी जी कडवी संगीतबद्ध करायला घेतली आहेत, त्यातून त्यांची विचक्षण दृष्टी स्पष्टपणे दिसून येते. 
आशाबाईंचे गायन हे नेहमीच "अर्थपूर्ण" असते. गाताना, कुठलीही हरकत, छोटी तान ही स्वच्छपणे ऐकायला येते. ऐकताना तिथे कसलाही अटकाव नसतो. या रचनेतील पहिलीच ओळ - समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून नव्हते; मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. स्वर हळूहळू वरच्या सुरांत जातात पण तो स्वरांचा प्रवास, किती नजाकतीने आणि स्वच्छपणे केलेला आहे. समईची ज्योत ही नेहमीच शांत, अल्प प्रकाशी असते. तोच भाव गायनात ठेवलेला आहे पण ही शांतता व्याकुळ करणारी आहे. व्याकुळता देखील आनंददायी असू शकते, याचे नेमके भान ठेवले आहे. "हासशील हास मला,  मला हासूही सोसवेना; अश्रू झाला आहे खोल.चंद्र होणार का दुणा." या ओळी मुद्दामून ऐकाव्यात. मुळात, शब्दच इतके अर्थवाही आहेत की ऐकताना तिथेच आपण अडकतो. शब्दातून व्यक्त होणारी हताशता, स्वरांच्या साहाय्याने कशी मांडायची, याचे हे सुंदर उदाहरण आहे. 

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून नव्हते;
केसांतच फुललेली, जाई पायाशी पडते. 

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे;
मागे मागे राहिलेले, माझे माहेर बापुडे. 

साचणाऱ्या आसवांना, पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे, विसराळू मुलखाची. 

थोडी फुलें माळू नये, डोळां पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला, शिवू शिवू ऊन ग ये. 

हासशील हास मला,  मला हासूही सोसवेना; 
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा. 


No comments:

Post a Comment