Sunday 13 October 2019

कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल सैगल यांची कारकीर्द जेंव्हा बहरात होती, त्यावेळचा किस्सा. रवींद्रनाथ टागोर शक्यतो बंगाली भाषिक नसणाऱ्यांना रवींद्र संगीत गायला परवानगी देत नसत, अपवाद सैगल!! याचे मुख्य कारण, त्यांचे भावपूर्ण गायन, गीताला आणि संगीताला न्याय देऊ शकते, असा रवींद्रनाथांचा अभिप्राय होता. मी सुरवातीलाच हे उदाहरण दिले कारण या उदाहरणाने, सैगल यांचे महत्व नेमकेपणी अधोरेखित करता येते. आज सैगल जाऊन, जवळपास ७५ वर्षे झाली म्हणजे आजची पिढी ही कमीतकमी सातवी पिढी आहे. त्यानंतर चित्रपट संगीताने असंख्य वळणे घेतली, स्वररचना बदलल्या, गायन शैली बदलल्या, वाद्यमेळाने तर अभूतपूर्व बदल केले. असे असूनही, निव्वळ गायन या दृष्टीने आजही सैगल यांची आठवण येत असते, यावरून त्यांचे महत्व ध्यानात यावे. वास्तविक सैगल यांनी पद्धतशीरपणे शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली नव्हती पण त्यांनी रागदारी संगीताचा अत्यंत डोळस अभ्यास केला होता आणि त्यांच्या गायनातून याचा पुरावा मिळतो. त्यांच्या बाबत एक आठवण अशी सांगण्यात येते, उस्ताद इम्तियाझ अहमद (खांसाहेब अब्दुल करीम खान यांचे शिष्य) यांनी एके सकाळी मुरादाबाद स्टेशनपाशी एक युवक गाताना ऐकला. आदल्या दिवशीच "झिंझोटी" रागातील मान्यता पावलेली ठुमरी - पियाबीन नाही आवत चैन, केवळ बिनचूक नव्हे तर अतिशय तन्मयतेने गाताना ऐकले. त्यांनी या युवकाबद्दल चौकशी केली आणि या युवकाने रीतसर तालीम घेतलेली नाही ऐकून चकित झाले. आता असे वाटते, अशिक्षित प्रभुत्व आणि अनावर आवेग हीच सैगल यांच्या गायनाची महत्वाची खूण असावी. दुसरी घटना मुद्दामून उल्लेख करण्यासारखी आहे. "प्रयाग संगीत समिती"ने आयोजित केलेली सुप्रसिद्ध आणि दर्जेदार "ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स" चालू असताना, एका युवकाने तिथल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केले!! त्या युवकाचे नाव - कुंदनलाल सैगल. पुढे सैगल यांनी देशभर आपले नाव गाजवले आणि तीन वर्षांनंतर याच महोत्सवात सैगल, श्रोत्यांत बसले असताना आणि उस्ताद फैयाज खान, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित नारायणराव व्यास सारखे कलाकार हजर असताना, आयोजकांना सैगल यांचे गायन ठेवावे लागले!! याचे उल्लेख मी अशासाठी केले, रागदारी संगीताची तालीम न घेता, सैगल आपली छाप उमटवत असत. १९३१ मध्ये त्यांनी ३ उर्दू चित्रपटात भूमिका करून, आपली कारकिर्दीची त्यांनी पूर्वतयारी केली असे म्हणता येईल. गमतीचा भाग म्हणजे या चित्रपटात एकही गाणे नव्हते!! पुढे "न्यू थिएटर्स" मध्ये भरती झाले आणि १० वर्षे तिथे टिकले. इथेच त्यांना रायचंद बोराल, पंकज मलिक, के.सी.डे सारखे रचनाकार लाभले. गायक-अभिनेता म्हणून १९३३ आलेल्या "पूरण भक्त" या चित्रपटाने पदार्पण झाले. १९४१ साली सैगल मुंबईत आले आणि रणजित तसेच कारदार स्टुडिओसाठी काम करताना त्यांनी बोलपटात कामे केली. त्यामुळे त्यांची कीर्ती आणि प्रसिद्धी वाढत राहिली आणि याच सुमारास त्यांना "स्क्लेरोसिही" हा न बरा होणारा रोग देखील जडला. वास्तविक पाहता, त्यांच्या गाण्यांची संख्या विपुल अशी नव्हती परंतु गुणवत्तेने बाजी मारली. त्यांचे नाव निव्वळ चित्रपटसंगीता पुरते नव्हते, हा विशेष नोंदला पाहिजे. "परवाना" हा १९४८ साली आलेला शेवटचा चित्रपट जो मरणोत्तर पडद्यावर लागला आणि त्यावेळी त्यांचे वय होते फक्त ४२!! खरे पाहता, इतक्या छोट्या कारकिर्दीविषयी फार सखोल मूल्यमापन करणे अवघड असते (मास्टर दीनानाथ यांच्या विषयी असेच म्हणता येईल) तरीही हिंदी चित्रपट संगीतावर त्यांचा प्रभाव अतिशय दाट असा होता, हे निर्विवादपणे मान्यच करावे लागेल. यमन रागावर आधारित, संगीतकार रायचंद बोराल रचित "राधे रानी दे डारो ना बांसुरी मेरी" हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. "चंडिदास", "देवदास" "प्रेसिडेंट" हे चित्रपट गाजले आणि सैगल यांचे नाव भारतभर पसरले. रागाधारित असे खात्रीने वर्णन करता येईल अशी त्यांची गीते मनात गुंजन करायला लागली. उदाहरणार्थ "दुखके अब दिन बीतत नाही" (राग देस), "बालम आये बसो मेरे मन में" (राग सिंधुरा), "" पियाबीन नाही आवत चैन" (राग झिंझोटी) ही गीते आपली गुणवत्ता राखून आहेत. तसेच "इक बंगला बने न्यारा" सारखे काहीसे नाट्यपूर्ण गीतही मनाची पकड घेऊन गाणाऱ्याचे आवाहन एकपदरी नाही, हे सिद्ध करून राहिले. "बाबूल मोरा" सारखी भैरवी तर "कल्ट सॉंग" बनून राहिले. "जिंदगी" चित्रपटातील "मैं क्या जानू क्या जादू हैं" (राग यमन) सारखे गीत आपण परिणामकारण उत्साहपूर्णतेनेही गाऊ शकतो, हे सिद्ध केले. हे गीत द्रुतगती आणि सफाईदार तानांनी भरलेले आहे. सूक्ष्मध्वनीग्राहकाशी नीट जुळवून घेणारा व गाणारा हा पहिला गायक, असे त्यांचे सार्थ वर्णन करण्यात येते. बंगालच्या "बाउल" संगीत परंपरेशी जवळून संबंध आला म्हणून असेल पण गायनात पंजाबी ढंग जाणवत नाही. आता मूल्यमापनाचा प्रयत्न : वर म्हटल्याप्रमाणे सैगल, मास्टर दीनानाथ इत्यादींच्या गायनकलेचे मूल्यमापन करताना एक चाचपडल्याची भावना उत्पन्न होते आणि याचे महत्वाचे कारण यांची तेजस्वी कारकीर्द आणि एकूण आयुष्यमान अतिशय अल्प होते. आज उपलब्ध असलेल्या संगीतातही अधिक विकासाचा संभव स्पष्ट जाणवतो!! त्यामुळे आहे त्याच्या अनुरोधानेच मूल्यमापन शक्य आहे. १) बोलक्या चित्रपटांच्या युगातील पहिला प्रमुख गायक-नायक, असे सैगल याचे स्थान असल्याने, ते नंतरच्या गायक-नायकांसाठी आदिनमुना ठरले. आपली स्वतःची, वेगळी व गुणवंत शैली आहे, असे सिद्ध करेपर्यंत, मुकेश तसेच किशोर कुमार इत्यादी गायकांना "सैगलसारखे गा" अशी शिफारस करण्यात येत होती. "जो नौकरी दिला दे"( करोडपती) किंवा "दिलरुबा कहां तक" (करोडपती - पहाडी संन्याल सह) या गीतांत आवाजात आणि गायनात एक उसळी घेणारा उत्साह आणि द्रुत गायनगती आढळते. गायनाचा पल्ला आणि आवाजाचा लगाव दोहोंतही खुला बाज आहे. २) एक वेधक विशेष असा आढळतो, सुप्रतिष्ठित झालेल्या संगीतप्रकारांपैकी ठुमरी, भजन आणि गझल यांत सैगल रमले होते, असे ठाम विधान करता येते. या प्रकारच्या सादरीकरणात सैगल विलक्षण कार्यक्षमतेने गातात असे दिसते. या गायन प्रकारांत, भिस्त असते ती, शब्दांच्या उच्चारण्यावर तसेच सुरावटीची बढत करण्यावर. "नुक्ताचीन" (यहुदी की लडकी), "दिलसे 'तेरी निगाह (कारवाँ इ हयात),"दिल से" (सूरदास) या ठुमरी सदृश रचनांचे गायन आपल्या आवाहकतेने गुंग करते. ३) सैगल यांच्या गायनात सर्वात सार्वत्रिक म्हणण्यासारखा गुण आहे - एक प्रकारची आविष्कारक्षम अंतर्मुखता. "दुख के दिन" ( देवदास), "किसने ये सब" ( धरतीमाता ), "बाबुल मोरा" (स्ट्रीट सिंगर) ही उदाहरणे ख्यातनाम आहेत. यामधील अंतर्मुखता कशामुळे प्रतीत होते? संथ गती, कमी तारतांचा वापर करणारी सुरावट, काहीसे आळसावलेले गायन व लगाव. या साऱ्यांमुळे स्वरांची सावली मागे रेंगाळते. ४) सैगल यांनी शास्त्रोक्त संगीताची यथायोग्य तालीम घेतली नव्हती, हे तर सर्वज्ञात आहे. अशी तालीम घेतलेल्यांची एक खुबी असते ती, त्यांच्या तत्कालस्फूर्ततेत. तत्कालस्फुर्तता म्हणजे सुरावट किंवा लयबंध यांत ऐनवेळी बदल करून पूर्वी रचून ठेवलेल्या संगीतापासून दूर जाण्याची क्षमता. हा गुण असल्यास, सादरकर्त्याला कलाकार म्हणावे अन्यथा कारागीर. सैगल काही गाण्यांत या क्षमतेचे अस्तित्व दाखवून देतात. "जगत में प्रेम ही" (करोडपती), "औसर बिता जाय" (पूरण भगत) या रचना ऐकाव्यात. ५) सैगल यांची काही गीते अगदी साधी पण मधुर आहेत. कुठलीही सांगीत महत्वाकांक्षा न ठेवता सांगीत परिणाम साधतात. "एक बंगला बने न्यारा" ( प्रेसिडेंट), "सो जा राजकुमारी" (जिंदगी) या रचना ही काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. ६) भजन हा संगीतप्रकार देखील फार आवाहकतेने गात असत - "भजू मैं" किंवा "राधे रानी" (दोन्ही पूरण भगत ). या रचना सुरेल, साध्य, अनलंकृत पण परीणामकारक आहेत. ७) अखेर काहीशा वादविषय होणाऱ्या रचनांचा वर्ग विचारार्थ समोर येतो. "जीवन बीन मधुर" (स्ट्रीट सिंगर), "जीवन आशा है" (जिंदगी), "सप्त सूर" ( तानसेन) ही या प्रकारची प्रमुख उदाहरणे ठरतात. या गीतांच्या गायनात नेहमीची उस्फूर्तता नाही. ती निव्वळ कर्तव्यभावनेने गायलेली वाटतात. या सगळ्या विवेचनावरून एक नेमका निष्कर्ष काढता येतो - हिंदी चित्रपट गीतांत सैगल यांनी कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे आणि ही सिद्धी निश्चितच असामान्य आहे.

No comments:

Post a Comment