Tuesday 10 September 2019

राधा ही बावरी

मराठी भावगीताला आधुनिक पेहराव देण्यात, ज्या संगीतकारांचे महत्वाचे योगदान आहे, त्यात संगीतकार अशोक पत्की यांचे नाव घ्यावेच लागेल. आज सत्तरी उलटून गेली तरी चालींच्या बाबतीत काहीतरी नवनवीन शोधून काढण्यात त्यांना बराच रस आहे आणि त्यामुळेच बहुदा आजही त्यांची गाणी शिळी, जुनाट अशी वाटत नाहीत. आजचे आपले  गाणे, "राधा ही बावरी" हे याच पठडीतील गाणे आहे. या गाण्याची एक गंमत आहे, या गाण्याचे कवी आणि संगीतकार अशोक पत्की आहेत. निदानपक्षी मराठीत तरी संगीतकार यशवंत देव वगळता अशी भूमिका एकाच व्यक्तीने साकारल्याची उदाहरणे मिळत नाहीत. अर्थात जे संगीतकार यशवंत देवांनी उघडपणे म्हटले आहे, त्याच चालीत संगीतकार अशोक पत्कींबाबत म्हणता येईल. हे दोघेही "कवी" नव्हेत. प्रसंगोत्पात घडलेला गोड अपघात, असे म्हणता येईल. 
याचा परिणाम असा झाला ( या गाण्याबाबत) शब्दकळा ही स्वरलयीला सुलभ अशीच झाली. ही कविता, सुरांना बाजूला सारून वाचायला घेतली तर त्यातील शाब्दिक लय सहजपणे जाणवतो. ललित संगीतात शब्दकळा ही नेहमीच उच्चारायला सुलभ असावी, असा एक निकष आहे. अकारण जोड शब्द नसणे, शाब्दिक लय जाणवून घेताना नेमके "खटके" असावेत, मुखड्याची पहिली ओळ वाचताना, "रंगात रंग" - "तो श्यामरंग" - "पाहण्यात" - "नजर भिरभिरते" अशी खंडित करून ओळ वाचता येते जेणेकरून गाण्याची चाल  बांधताना,तेच "आघात" कायम ठेवणे शक्य होते. वरील ओळ ही ४,५ अक्षरांत विभागून घेतली असल्याने चालीला आणि गायनाला कुठेही फारसा त्रास होत  नाही - फक्त शेवट करताना ८ अक्षरे आहेत पण ओळीचा शेवट करताना एखादी छोटी हरकत घेऊन स्वरिक लयीला कुठेही बाधा न आणता, सुंदर स्वरवाक्य पूर्ण करता येते. इथे "भिरभिरते" गाताना, लय लांबवली आहे पण तशी करताना सौंदर्यवृद्धीच दिसते. अर्थात हे संगीतकाराचे कौशल्य. कविता जरा बारकाईने वाचली तर ध्रुवपदाच्या शेवटच्या २ ओळी या, पुढील दोन्ही अंतऱ्याचा समाप्त करताना तशाच ठेवल्या आहेत. आधुनिक ललित संगीतात, हा एक नवीन प्रघात पडला आहे, चाल बांधताना, त्यातील शब्दांची पुनरावृत्ती करायची, जेणेकरून गाण्याची चाल आणि लय (शब्दांकडे पूर्वीपासून लक्ष कमीच असते म्हणा!!) ही ऐकणाऱ्याच्या मनात ठामपणे वावरते. या ठिकाणी तीच पद्धत वापरली आहे. 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !
या दोन ओळी दोन्ही अंतरे संपवताना योजल्या आहेत. परिणामी चाल मनात रुंजी घालते. अर्थात याचा उलटा परिणाम देखील काही वेळा होतो, जर का गाण्याची चाल टुकार असेल तरीही गाण्यात वारंवार तीच सुरावट ऐकवून, भुक्कड चाल देखील रसिकांच्या मनात उतरवली जाते. संगीतकार अशोक पत्की यांची बरीचशी सांगीतिक कारकीर्द ही "जिंगल्स" तयार करण्यात गेली. याचा एक चांगला परिणाम झाला, त्यांच्या चाली चटपटीत झाल्या, त्यातील गोडवा अधिक वेधक झाला तसेच स्वरवाक्यांश छोटे असल्याने रसिकांना ऐकायला फार प्रयास पडत नाहीत. या गाण्यात थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास, भारतीय तालाच्या वर्तुळात्मकतेऐवजी अखंड कालविभाजनाने लयावतार घडवलेला आढळतो. या पद्धतीच्या विभाजनास अनंततत्व असू शकते. त्यांचे लयबंध आधुनिक वाटतात, त्यामागे हे एक कारण असू शकते. त्यांच्या लयकारीत ६ किंवा ८ मात्रांनी कालावधी विभाजन करण्याच्या आकलनास सुलभ सार्वत्रिक आकृतीबंधांचाच पाठपुरावा असतो. या गाण्यात तालाची पाश्चात्य ड्रम वापरला असल्याने गीतात परिचित भारतीय ताल आढळत नाही परंतु जरा बारकाईने ऐकल्यास मात्रांचे विभाजन सम प्रमाणात केल्याने आकलनास कुठेही बाधा येत नाही. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, सुरावटींबाबत रागचौकटीशी खेळण्याचे वावडे नाही. या गाण्यात यमन रागासारख्या परिचित रागाचे सूर सापडतात पण रागदर्शन नाही. संगीतकार म्हणून आणखी काही विवेचन करायचे झाल्यास, जिंगल्स सारखे माध्यम हाताळून देखील जिंगल्स करताना, आकर्षक संगीत पण भंग पावलेले आणि गीततत्वापर्यंत पोहोचू न शकलेले, अशी स्वररचना करण्याचा मोह होऊ शकतो पण संगीतकार म्हणून अशोक पत्कींनी त्यापासून अशा प्रकारचे ललित संगीत वेगळे ठेवण्यात नि:संशय यश मिळवले आहे. 
गायक स्वप्नील बांदोडकरांना या गाण्याने खरी ओळख मिळवून दिली. अतिशय स्वच्छ, मोकळा आवाज तसेच जास्तीत जास्त दीड सप्तक एकाचवेळी अवकाशात घेऊ शकेल इतपत लाभलेला गळा. याचा परिणाम गायनात उस्फुर्तपणा आणणे सहजशक्य होते. हेच गाणे मी खाजगी कार्यक्रमात गाताना ऐकलेले आहे. त्यावेळी गायन करताना, चालीतील स्वरविस्ताराच्या जागा हुडकून, आयत्यावेळी नाविन्याचा अनुभव देण्याची ताकद गळ्यात असल्याचे समजून घेता येते. गायन ऐकताना, शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतल्याचे जाणवते. परिणामी, गाण्यातील हरकती, छोट्या ताना घेताना त्यातील सहजपणा दिसून येतो. स्वर लावताना, तो दाबून लावण्याकडे आधुनिक गायकांचा ओढा असतो परंतु स्वप्नील बांदोडकर असल्या क्लुप्त्या करताना दिसत नाहीत. गायक म्हणून हा विशेष नोंदवायलाच हवा. 

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्यात नजर भिरभिरते 
ऐकून तान विसरून भान, ही वाट कुणाची बघते 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना 
चिंबचिंब देहावरून श्रावणधारा झरताना 
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई 
हा उनाड वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती 
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती 
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई 
हा चंद्र चांदणे ढगा आडूनी प्रेम तयांचे पाही 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होई - 
राधा ही बावरी हरीची, राधा बावरी !


No comments:

Post a Comment