Friday 27 September 2019

चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती

मराठी भावगीत संगीतात भक्तिसंगीताला बरेच मोठे स्थान आहे. पारंपरिक स्वररचनांपासून ते आधुनिक स्वररचनांनी भक्तिसंगीत वैपुल्याने फुललेले आहे. आपल्याकडे नेहमीच एक विधान वारंवार केले जाते - भारतीय संगीत भक्तिपर आहे. अर्थातच हे विधान काहीसे एकांगी आहे. याचे कारण नं. १) भक्तिपर संगीताची स्वतंत्र अशी कोटी आहे, नं. २) प्रयुक्त होत असलेल्या एकंदर संगीतापैकी बरेचसे संगीत भक्तिपर आहे, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. या बाबत असे म्हणता येईल, विशिष्ट संगीताविष्कार सादर करीत असताना संगीतकाराची मनोवस्था भक्तिपर आहे/होती म्हणून संगीत भक्तिपर ठरत नाही. सादरीकरणातील सांगीत आशय आणि साचे बहुसंख्य आणि गुणबहुल संगीतरचनांच्या संचांशी निगडित होतात. भक्तिसंगीत या कोटीस हाच न्याय लागू होतो. त्यामुळे सुमारे दोन हजार वर्षे लोकांत भक्तिमार्ग आणि भक्तिसंगीताची ओढ का अबाधित राहिली, हे समजून घेणे अशक्य नाही. संतकवी सुमारे इ.स. ८०० पासून देवळादेवळांतून फिरू लागले परंपरेत असे  ,भक्तिसंगीत हे कर्नाटकात भरभराटीस आले, पुढे तो मार्ग महाराष्ट्रात फैलावला. याच इतिहासातून पुढे संतकवी जन्माला आले. मराठीपुरते मांडायचे झाल्यास, ज्ञानेश्वरांपासून जो भागवत आणि वारकरी संप्रदाय सुरु झाला तो आजतागायत सुरूच आहे. आजच्या गाण्याचे शब्दकार संत नामदेव हे याच परंपरेतील एक ठळक नाव. 
कवी म्हणून विचार केल्यास, नामदेवांच्या रचनांवर ज्ञानेश्वरांचा प्रभाव जाणवतो परंतु ज्ञानेश्वरांच्या रचनांतून जी भाषिक श्रीमंती आढळते, तितकी नामदेवांच्या अभंगांतून आढळत नाही. गेयता हा गुण आहे परंतु उपमा, प्रतिमा याबाबत काव्य थोडे उणे पडते. अगदी याच शब्दरचनेतील उदाहरण घ्यायचे झाल्यास, "जीवनावेगळे मत्स्य तळमळती"! पाण्याला जीवनाची उपमा द्यायची कल्पना सुरेखच परंतु हीच उपमा, नंतर काही शतकांनी जन्माला आलेल्या तुकारामांच्या अभंगात लखलखून येते. संतसाहित्य हे प्रामुख्याने विठ्ठल भक्तीशी निगडित आहे आणि विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्याचा उद्देश प्रच्छन्नपणे दिसतो. संतांनी त्यासाठी अनेक मार्ग अवलंबले आणि त्याप्रतिच आपल्या रचना निर्माण केल्या. "चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती" ही पहिली ओळच तसे दर्शवून देते. किंबहुना, प्रत्येक अंतऱ्याची दुसरी किंवा अंत्य ओळ ही पुनरुक्तीच आहे अपवाद शेवटचा अंतरा. काव्य लिहिण्यामागचा उद्देश अतिशय ढोबळ पण स्पष्ट आहे.  विठ्ठलाची आळवणी करताना, आई-मूल किंवा वासरू-गाय या उपमा अनंत काळापासून चालत आलेल्या आहेत, आजही ही नाती काव्यात उपयोगात आणल्या जातात परंतु आशय वृद्धी करताना, त्यातील नेमकेपणा आणि सौंदर्य किंवा व्याकुळता यात सपकपणा जाणवला की ते शब्द शिळे होतात. 
संगीतकार कमलाकर भागवत यांची कारकीर्द प्रामुख्याने "अरेंजर " म्हणून गाजली परंतु अशा रचनांमधून त्यांनी संगीतकार म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले. सुधीर फडके, यशवंत देव सारख्या संगीतकारांच्या रचना सजविण्याचे काम त्यांनी प्रभाकर जोगांसमवेत बरेच वर्षे केले या गाण्याची चाल तशी सहज, सोपी आणि गुणगुणता येईल अशीच आहे. हाताशी सुमन कल्याणपूर सारखा सुरेल गळा असल्याने, चालीत काही अवघड हरकती घेतल्या आहेत. रचनेचा दुसरा अंतरा हा मुखड्यापासून वेगळा बांधला आहे तसेच चौथा / शेवटचा अंतरा वरच्या सुरांत घेतलेला आहे. खरंतर मुखडा अगदी साधा आहे पण अतिशय गोड आहे. लगेच चालीचे वळण ध्यानात येते. थोडक्यात मूल्यमापन (या गाण्याच्या आधारे) करायचे झाल्यास, संगीत रचनाकार म्हटला की त्याचा सर्वात पायाभूत गुण असतो तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे होय. तसेच चाल बांधताना, त्यात शक्यतो अवघडलेपण नसण्याकडे कल दिसतो जेणेकरून सामान्य रसिक श्रोता देखील आकर्षिला जाईल. याचा परिणाम असा होतो, स्वरांकित चलने मनात रेंगाळत राहतात. वाद्यवृंद फारच मर्यादित असतो जसे इथे बासरीचा वापर संपूर्ण रचनेत केलेला आहे. तसेच मुखडा आणि अंतरे गायले जात असताना पार्श्वभागी मंद नादाच्या घंटेचा उपयोग श्रवणीय आहे. 
गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतात उल्लेखनीय अशी कामगिरी निश्चितच केलेली आहे. खरतर हे नाव चित्रपटबाह्य गीतांसाठीच अधिक लोकप्रिय झाले. गीताची चाल अचूक ओळखून त्यांनी इथे गायन केले आहे. चालीची जातकुळी सोपी आहे, भक्तिसंगीत आहे तेंव्हा शब्दोच्चार त्याच धर्तीवर केले आहेत. "वियोगे शब्द गाताना त्यातील व्याकुळता सुरेख दर्शवली आहे. तसेच शेवटचा अंतरा जेंव्हा वरच्या सुरांत जातो तिथे स्वर निमुळता करत, एक सुंदर टोक गाठले आहे. ही शैली लताबाईंच्या गायकीच्या जवळपास जाणारी. चालीत आर्तता आहे पण हताशता नाही, विसविशीतपणा नाही. गायन संथपणे परंतु आश्वासक पद्धतीने पुढे चालत असते. ही कामगिरी अजिबात सोपी नाही. 
सौंदर्य हे नेहमीच लखलखीत, डोळे दिपवणारे असायलाच हवे हा हट्ट एकांतिक आहे. निरांजनाच्या शांत ज्योतीप्रमाणे निरंतर तेवत राहण्यात देखील तितकेच अप्रतिम सौंदर्य असते आणि हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणता येईल. 

चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती
झालें मजप्रती तैसें आता 

चुकलिया माय बाळकें रडती 
झालें मजप्रती तैसें आता 
वत्स न देखता गाई हुंबरती 
झालें मजप्रती तैसें आता 

जीवनावेगळे मत्स्य तळमळती 
झालें मजप्रती तैसें आता 

नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्ती 
करीतसे खंती फार तुझी  



No comments:

Post a Comment