Monday 10 June 2019

रामा रघुनंदना

आपल्याकडे एक सुंदर गैरसमज आहे, चित्रपटातील गाणे म्हटले की भरजरी वाद्यमेळ असायला हवा, ज्यायोगे गाणे रसिकांच्या मनात ठसायला मदत होते. खरतर मराठी चित्रपटांचे आर्थिक गणित बघता, पहिली बरीच वर्षे तरी गाण्यातही वाद्यमेळ हा मोजकाच असायचा. सगळा भर असायचा तो गाण्याच्या चालीवर. वाद्यमेळ गुंतागुंतीचा करायला म्हणजे तसेच तरबेज वादक हवेत. जितके अधिक वादक, तितके आर्थिक गणित जास्त. असाच सरळसोट विचार असायचा. त्यामुळे वाद्यमेळाच्या अनुषंगाने मराठी गाणी ही नेहमीच चालीच्या अंगानेच अधिक प्रयोगशील राहिली. त्यांना हिंदी चित्रपट संगीतासारखे भाग्य लाभले नाही परंतु असे असूनही. निव्वळ चालीच्या स्वररचनेचा मागोवा घेतला तर मराठी गाणी खूपच "श्रीमंत" होती, हे मान्यच करावे लागेल. चालींमधील विविधता आणि त्याच जोडीने स्वरलयीची नवनवीन स्थाने आणि गायकी अंग ठसठशीतपणे पुढे येणे, हीच खरी वैशिष्ट्ये राहिली. आजचे आपले गाणे "रामा रघुनंदना" हे  धर्तीवर आधारलेले आहे. जरा बारकाईने ऐकले तर, पूर्वी रेडियोवर "भावसरगम" नावाचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम असायचा आणि त्यावेळी त्या कार्यक्रमातील गाणी ऐकली असतील तर माझ्या वरील विधानाची प्रचिती यावी. 
कविता म्हणून वाचायला घेतल्यावर रामायणातील शबरीची गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन, शब्दरचना केली आहे, हे समजते. अर्थात आता पुराण काळातील प्रसंग केंद्रस्थानी घेतल्यावर, कवितेतील रूपके, प्रतिमा या पुराण काळातीलच असणार, हे अध्याहृत होतेच. मुळात, ग.दि.माडगूळकर हे परंपरावादी कवी असल्याने त्यांची ही कविता त्या अंगानेच समोर येते. सिनेमातील कविता ही फार गुंतागुंतीची असून चालत नाही, सोपी, सरळ आणि ठाशीव अशीच असावी, असा एक मतप्रवाह फार पूर्वीपासून आजतागायत चालूच आहे, परिणामी सिनेगीतांत "काव्य" असण्याची जरुरी नाही, हे मत देखील फार जोरानेच आदळले जाते. अर्थात चित्रपटांत गाणी लिहिताना, काही मर्यादा नेहमी येतातच जसे इथे दुसरे कडवे वाचायला घेतले तर "एकदाच ये जाता, जाता" या ओळीत "जाता" शब्द दोनदा लिहिल्याने नक्की काय वेगळा अर्थबोध होतो? असा प्रश्न येऊ शकतो.  आपण "गद्य" भाषेत बोलताना "जाता, जाता इथे एक फेरी मार" असे सहज बोलून जातो परंतु कवितेच्या संदर्भात विचार करताना, ही निव्वळ एक "तडजोड" वाटते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे ती ओळ स्वरिक लयीला सांभाळण्यासाठी केलेली शाब्दिक जोड वाटते. अन्यथा कविता अगदी सोपी आहे आणि संपूर्ण गाण्याच्या संदर्भात विचार करता गाण्यात जिथे "खटका" हवा तिथेच तो येतो. गाताना, कवितेतील शब्द कुठेही "अवजड" होऊ नयेत, ही एक प्राथमिक मागणी असते. या दृष्टीने माडगूळकरांची शब्दरचना ही मागणी सर्वार्थाने पूर्ण करते. 

रामा रघुनंदना 
आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना 

संगीतकार दत्ता डावजेकर आहेत. डावजेकरांच्या स्वररचना या नेहमीच "अर्थभोगी" असतात. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, कवितेतील आशय ध्यानात घेऊन, तो आशय स्वरांतून मांडताना अधिक विस्तारित कसा होईल, हा दृष्टिकोन त्यांच्या स्वररचनेतून नेहमी आढळतो. अर्थात काव्याची अर्थपूर्ण जाण जाणवते, हे ओघाने आलेच. चाल "बिलासखानी तोडी" रागावर आधारित आहे. तंबोऱ्याच्या रुणझुणातून आशाबाईंचा आलाप येतो, तो याच रागाची ओळख घेऊन. भजनी वळणाची चाल आहे आणि त्याला अनुसरूनच वाद्यमेळात प्रामुख्याने सतार आणि बासरी, याच दोन वाद्यांचा अंतर्भाव केलेला आहे. 

मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी 
दीन रानटी वेडी शबरी 
तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना 

डावजेकरांच्या संगीतरचनांबाबत काही निरीक्षणे नोंदवता येतील. संगीतरचनेत कधीही वाद्यांचा गदारोळ नसतो. संगीत आणि शब्द आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर सुंदर असा शांत भाव देखील. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण गाण्यातील गायन हा विशेष फार ठळकपणे समोर येतो, जसा या गाण्यातून येतो. काही अपवाद वगळता त्यांची भिस्त पारंपरिक भारतीय वाद्यांवर अधिक होती. त्यांना सुरावटीच्या नाविन्याची फार अप्रूप असल्याचे दिसत नाही पण कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते असते, हा विचार स्पष्टपणे त्यांच्या स्वररचनेंतून वारंवार आढळतो. 

पतितपावना श्रीरघुनाथा 
एकदाच ये जाता जाता 
पाहीन, पूजिन टेकीन माथा  
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल पुरेपणा जीवना 

खरतर आशाबाईंची गायकी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. गायन करताना, शब्दातील आशयाची अभिव्यक्ती जितक्या ठोसपणे आणि सुरेलता राखून करता येणे शक्य आहे, तितकी केली जाते. दीर्घ तान असो, जशी इथे गाण्याच्या सुरवातीला आहे किंवा अंत्य शब्द घेताना, एखादा खटका असो तसेच एखाद्या शब्दावर किंचित जोर देऊन उच्चारण असो, प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या गायकीचे वैशिष्ट्य ठेवायचे, हा दृष्टिकोन प्रबळ दिसतो. शब्दांचे उच्चारण हा तर आशाबाईंचा खास प्रांत. शब्द उच्चारताना त्यातील नेमका आशय रसिकांसमोर अशा प्रकारे ठेवतात की ऐकणारा चकित व्हावा. इथे या गाण्यातील पहिला अंतरा  संपताना, " तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना" ही ओळ संपवताना स्वरलय दुगणित जाते पण तशी  जाताना,"चिंतन" शब्दातील आशय स्वरांतून कसा मांडला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. शेवट करताना लय द्रुत लयीत जात असताना,शब्दांतील मार्दव कायम ठेवले आहे. ही करामत साधणे नक्कीच सोपे नाही. 



No comments:

Post a Comment