Thursday 20 June 2019

श्रावणात घननीळा

आपल्याकडे एखादी कलाकृती अपरिमित लोकप्रिय झाली म्हणजे लगेच त्यात काहीतरी दूषणे काढायची फार अश्लाघ्य अशी सवय आहे. आता कलाकृतीत दूषणेच काढायची झाल्यास, त्याला  फार काही त्रास घ्यावा लागत नाही. त्यातून ललित संगीतासारखे माध्यम असेल तर फार प्रयास पडत नाहीत. जणू  काही लोकप्रिय होणे, हा एक गुन्हा असल्यासारखी अपप्रवृत्ती आपल्याकडे फार बोकाळली आहे. वास्तविक याची काहीही गरज नसते. मुळात, कलाकृती ही नेहमीच कलाकृतीच्याच नजरेतून अनुभवावी, असा एक निकष असताना,  कलाकृती बाह्य निकष योजून, त्या कलाकृतीला डाग लावायचे काम इमानेइतबारे केले जाते.  अशा वेळी, "श्रावणात घननीळा बरसला" सारखी टवटवीत संगीतरचना कानी पडते आणि मनावरील मळभ दूर होते. प्रस्तुत गीत बाहेर येऊन आज जवळपास ५० वर्षे तरी झाली असावीत परंतु या गाण्याच्या लोकप्रियतेत खंड पडलेला नाही. किंबहुना, या गाण्यातील सौंदर्यस्थळे शोधण्याचा प्रयास निरंतर चालू आहे. प्रयास चालू आहे असे मी म्हटले कारण चाल ठामपणे कुठल्याही रागावर आधारित आहे असे आढळत नाही तसेच प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो - इतका वेगळ्या सुरांवर सुरु होतो की मुखड्यावर चाल कशी येणार आहे, याचा सुरवातीला अदमासच लागत नाही. असे असून देखील हे गाणे आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहे. कविता, स्वररचना आणि गायन, या तिन्ही पातळीवर हे गाणे जवळपास "निर्दोष" म्हणावे इतपत सुरेख झाले आहे. 
निसर्ग आणि प्रणय भावना, ही मंगेश पाडगावकरांच्या बहुतेक कवितेत आढळणारी वैशिष्ट्ये आहेत आणि असे असून देखील कवितेत "एकसाची"पणा दिसत नाही!! पावसाळ्यातील निसर्ग हा कवींना नेहमीच साद घालीत असतो आणि कवी देखील आपल्या अलौकिक नजरेतून पावसाला न्याहाळत असतात. या गाण्याचा मुखडाच किती वेधक आहे. पाऊस सुरु होत असताना, बाहेर अचानकपणे झाडांना पालवी फुटल्याचे ध्यानात येते आणि तीच झाडे आता फार वेगळी दिसायला लागतात. वास्तविक प्रत्येक पावसाळ्यात सहजपणे दिसणारे हे दृश्य आहे परंतु पाडगावकरांनी "हिरवा मोर पिसारा" म्हणून त्या ओळींची नव्यानेच ओळख करून दिली. 
पुढील कडव्यांतून हेच दृश्यभान अधिक विस्ताराने आणि खोलवर मांडलेले आहे. "स्वप्नांचे पक्षी","थेंबबावरी नक्षी" सारखे शब्द किंवा "पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले" सारख्या ओळींतून मांडलेला रंगोत्सव आणि उबदारपणा तसेच शेवटच्या कडव्यात "शब्दावाचून भाषा" म्हणत असताना "अंतर्यामी सूर" गवसणे, हे सगळेच कवितेची श्रीमंती वाढवणारे आहे. 
संगीतकार म्हणून श्रीनिवास खळे यांची कामगिरी निव्वळ अपूर्व आहे. गाणे तयार करताना, सर्वात आधी, हाती आलेली शब्दसंहिता ही एका विशिष्ट पातळीवरच असावी, तरच त्या कवितेला चाल लावायची असा काहीसा आग्रह खळेकाकांनी आयुष्यभर धरला होता. अशा फार थोड्या रचना आहेत, जिथे कविता म्हणून आपली फार निराशा होते अन्यथा सक्षम कविता असणे, हे खळेकाकांच्या गाण्यात अनुस्युतच असते. 
या गाण्यातील अंतरे फार वेगळ्याच पद्धतीने बांधले आहेत. सर्वसाधारणपणे, मुखडा हाताशी धरून, पुढील अंतऱ्यांची बांधणी केली जाते जेणेकरून, अंतरा संपत असताना, परत अस्थाई  गाठणे दुर्घट होऊ नये. इथे  मात्र,प्रत्येक अंतरा वेगळा आहे आणि तो इतका वेगळा आहे की अंतरा सुरु झाल्यावर पुढे चाल कशी "वळणे" घेत पुन्हा मुखड्याशी येते, हे अवलोकणे हे फार बुद्धीगामी काम आहे. खळेकाका इथे चाल फार अवघड करतात आणि गमतीचा भाग असा आहे, गायला अवघड असून देखील हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले आहे. असे भाग्य फार थोड्या गाण्यांना मिळते. थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास, "जागून ज्याची वाट पाहिली" ही ओळ ज्या "सा" स्वरांवर सुरु होते तो स्वर आणि मुखड्याचा "सा" स्वर हे भिन्न आहेत. तसेच शेवटचा अंतरा घेताना, "पानोपानी शुभशकुनाच्या" इथे तर "मध्यम" स्वरालाच "षड्ज"  केले आहे. परिणामी स्वरिक वाक्यांश फार वेगवेगळे हाताशी येतात आणि चाल अतिशय गुंतागुंतीची होऊन बसते. 
लताबाईंचे गायन हा तर आणखी वेगळा असा अपूर्व सोहळा आहे. "रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी" ही ओळ गाताना, "रंगांच्या" इथे एक छोटा आलाप घेतला आहे. एकतर हा अंतरा मुखड्याच्या स्वरांशी फटकून आहे तरीही लगोलग "सूर" पकडलेला आहे आणि तसा तो सूर घेताना, "आलाप" आलेला आहे. हे सगळे फार गुंतागुंतीचे आहे पण तरीही अतिशय गोड आहे. चालीतील लपलेला गोडवा लताबाईंनी आपल्या गळ्यातून अपूर्वपणे साकारलेला आहे. खरंतर या गाण्याविषयी लिहायचे झाल्यास, एखादा दीर्घ निबंध देखील अपुरा पडेल, अशी रचना आहे. व्यामिश्र आहे पण तरीही अप्रतिम गोड आहे. म्हणूनच आजही लोकप्रिय आहे. 

श्रावणात घननीळा बरसला, रिमझिम रेशीम धारा 
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोर पिसारा  

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी 
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा 

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी 
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी 
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा 

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले 
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले 
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा 

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा 
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा 
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा 


No comments:

Post a Comment