Monday 6 May 2019

यश हे अमृत झाले

मराठी ललित संगीतात वसंत प्रभू यांचे नाव अतिशय प्रसिद्ध आहे. सोप्या, सुमधुर चालींनी त्यांनी अनेक वर्षे रसिक मनावर अधिराज्य गाजवले. मराठीतील अनेक प्रथितयश कवींच्या कविता त्यांनी स्वरबद्ध करून, विशेषतः: भा.रा. तांब्यांच्या कवितांना चाली लावून, कवितेचा नवा अन्वयार्थ रसिकांसमोर ठेवला. याच गाण्याच्या निमित्ताने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक, तलत मेहमूद मराठीत अवतरला. अमराठी गायकांबद्दल बरेचवेळा शब्दोच्चारावरून तक्रार केली जाते पण इथे या गायकाने तशी जागाच ठेवली नाही. " पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातील गाणे असून कविता पी. सावळाराम यांची आहे. लोकप्रियतेच्या दृष्टीने बघितल्यास, हे गाणे तसे विस्मरणात गेले आहे किंवा स्वररचना म्हणून खास काही प्रयोग केलेत असे आढळत नाही तरीही संगीतकार वसंत प्रभूंची स्वतः:ची अशी खास "शैली" होती आणि त्या शैलीचे प्रकटीकरण सुरेख होते. स्वररचनांनीत ऐकली तर काही हिंदी गाण्यांशी साद्ध्यर्म्य आढळते. विशेषतः तिसरा अंतरा - वैभव मिरवीत मंदिरी येता, हा अंतरा हिंदीतील "प्यार पर बस तो नहीं मेरा" या गाण्याशी काही प्रमाणात साम्य दर्शवतो. अर्थात मुखड्यापासून सुरु झालेली चाल जरी पूर्वसूरींशी मिळती जुळती असली तरी स्वतःची नाममुद्रा निर्माण करते, हे नक्की. 

यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले 

कविता म्हणून बघायला गेल्यास, शब्दरचनेत फार काही असामान्य आढळत नाही, कुठलीच प्रतिमा मनात ठसत नाही. बरेचसे संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात पण जसे ग.दि.माडगूळकरांच्या शब्दरचनेत ज्या वैभवाने संस्कृत कल्पना झळकतात, तसे इथे काहीही घडत नाही. अर्थात इथे एक बाब नेहमीच लक्षात ठेवायला लागते, ललित संगीत हे सर्वसमावेशी संगीत असते, समाजातील एकाच घटकाला समोर ठेऊन, निर्मिती करणे अवघड असते आणि जनसंगीत असल्याने, इथल्या कविता करताना, जनांचा विचार हा नेहमीच महत्वाचा असतो आणि त्यादृष्टीने कविता गेयताबद्ध आहे. पी. सावळाराम हे कधीही फार मोठ्या प्रतिभेचे कवी नव्हते पण ललित संगीताची जी मूलभूत गरज असते, तशी चटपटीत रचना करण्यात वाकबगार होते. त्याचा परिणाम, त्यांनी मिळालेली अफाट लोकप्रियता. वसंत प्रभूंसोबत त्यांची जोडी, एकेकाळी महाराष्ट्रावर गारुड घालून गेली, हे मानलेच पाहिजे. 
दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर 
मागेपुढती राजपथावर लक्ष दीप लागले 

संगीतकार वसंत प्रभू यांनी आयुष्यभर सतत मेलडीचा वापर यथास्थितपणे केला असे दृष्टीस पडते तसेच स्वररचना बांधताना, शक्यतो भारतीय वाद्यांचाच वापर केला आहे. या रचनेत देखील व्हायोलिन (जरी मुळात हे वाद्य पाश्चात्य असले तरी भारतीय संगीतात पूर्णपणे मिसळून गेले आहे) बासरी अशीच वाद्ये तर तालवाद्य म्हणून ढोलक आणि तबल्याचा वापर केला आहे. त्यादृष्टीने त्यांची भारतीय वाद्यांवर भिस्त अधिक होती, असे विधान करता येईल. शेवटच्या तालविरहित अंतऱ्यात मात्र पियानोचे सूर ऐकायला मिळतात. स्वररचना बांधताना, एकेठिकाणी जरा छोटासा दोष आढळला आहे. 

स्तुतिसुमनांचे उधळीत झेले, जनगौरव तो जयजय बोले 
कीर्तध्वजावर लावून डोळे, भाग्य पुढे चालले 

पहिल्या अंतऱ्यातील पहिलीच ओळ - दिग्विजयाच्या मनोरथावर, ही गाताना "दिग्विजयाच्या" ऐवजी "दिगविजयाच्या" अशी गायली गेली आहे. ही केवळ लयीच्या अनुरोधाने केलेली चूक आहे पण बारकाईने ऐकल्यास खटकते. वास्तविक वसंत प्रभू हे कवितेला प्राधान्य देऊन, स्वररचना करणारे संगीतकार होते. स्वररचना कधी शब्दांवर आरूढ झाल्याचे फारसे कधी आढळले नाही. परिणामी शंकाचे औचित्य पाळण्यात ते नेहमीच यशस्वी झाले. संगीतकाराचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, पारंपरिक रचनाबंध स्वीकारून देखील, कुठेही स्वररचना बटबटीत होत नाही तसेच शेवटचा अंतरा जरी दु:खी, व्याकुळ स्वरांचा असला तरी कुठेही नाटकी होत नाही. सुरवात द्रुत लयीत आहे पण शब्दोच्चार व्यवस्थित ऐकायला येतील याची काळजी घेतली आहे. सुरावट आणि सुरावटींचे खास स्रोत म्हणजे विशिष्ट वाद्ये यांच्याकडे संगीतकाराचा खास झुकाव असल्याचे दिसते तरीही लयबंधाचा सर्जक उपयोग त्यांनी वारंवार केल्याचे दिसते. संगीतकाराच्या बहुतांशी स्वररचना ऐकल्या तर एकूणच ओढा हा  खंत, दु:ख यांकडे अधिक आहे, असे जाणवते. बहुतेक कारकीर्द ही खाजगी मराठी गीतांनीच गाजली आहे. अशा वेळेस वाटते, या संगीतकाराला अधिक चित्रपट मिळायला हवे होते  जेमतेम ४६ वर्षे, इतकेच आयुष्य लाभले अर्थात याचा परिणाम साकल्याने संगीत विचार करणे फार कठीण होते. अधिक आयुष्य लाभले असते तर!! अर्थात अशा जर-तर शक्यतांना काहीच अर्थ नसतो. 

वैभव मिरवीत मंदिरी येता, दिसेल डोळी ती मंगलता 
सुख अंधारी मन व्याकुळता, दु:ख सुखे हासले 

यश हे अमृत झाले 
सुख स्वर्गीचे आले 
परि दु:ख सुखे हासले 

गायक म्हणून या रचनेत तलत मेहमूद यांचा विचार करायचा झाल्यास, भावपूर्ण, सुरेल गायन हे लगेच ध्यानात येते. स्वररचना दोन भागात विभागली असल्याने, दोन्ही भागांचा स्वतंत्र विचार करणे आवश्यक. आवाजात किंचितसे कांपरेपण तरीही त्यांनी द्रुत लयीतील रोमँटिक गाणी चांगली म्हटली आहेत. इथे देखील गाण्याचा पूर्वार्ध द्रुत लयीत आहे आणि गाण्यातील आनंदी भाव त्यांनी आपल्या गायनातून सुंदररीतीने व्यक्त केला आहे. अर्थात एक मजेचे निरीक्षण - स्वररचना जेंव्हा तालविरहित आणि व्याकुळतेकडे  जाते,तिथे या गायकाची गायकी खरी खुलून येते. मुळात तालविरहित गायन करणे, ही सोपी बाब नव्हे आणि इथे तर काही क्षणातच रचना विरही स्वरांत जाते त्यामुळे गेल्यावर तितका ताबा असणे गरजेचे आणि इथे तलत मेहमूद आपल्या गळ्याची जातकुळी समर्थपणे दाखवतात. त्यांच्या गायनाची शैली ही नेहमीच संथ गती, नाजूक प्रक्षेपण अशासाठीच होती आणि हे जर मान्य केले तर माझे वरील विधान अधिक स्पष्ट होईल. 
रचना अखेरीस व्याकुळ, संथ तरीही दाट परिणाम घडवते, याचाच परिणाम अखेरीस काहीशी खिन्नता ऐकणाऱ्याच्या मनात राहते आणि चाल मनात रुंजी घालते. ललित संगीताची  यापेक्षा अधिक खोल फलश्रुती दुसरी कुठलीही नाही. 


No comments:

Post a Comment