Wednesday 29 May 2019

प्राची गुर्जर

२०१४ साल असणार, चिकित्सक ग्रुपची जुळवाजुळव चालत होती. मला अनेक नावे परिचित तर अनेक नावे अपरिचित असा धूसर खेळ चालू होता. जी नावे परिचित होती, त्यांना माझ्याकडून फोन जात होते, ओळख नव्याने होत होती. त्यातच विनयने, चौपाटीवर भेटायचं घाट घातला आणि तिथे बरेचजण (बहुतेकजण ओळखीचेच होते पण नव्याने) भेटले. अर्थात हा अंगभूत गुणच आहे पण मी टवाळी करायला सुरवात केली. सुदैवाने सगळ्यांनी एन्जॉय केली आणि तिथेच पहिल्या पिकनिकचा बेत नक्की केला गेला. तत्पूर्वी, ग्रुपवर कुणाचाही वाढदिवस आला की फोन करणे, व्हाट्सअपवर अभिनंदन करणे (इतरवेळेस गुडूप असणारे अभिनंदन करायला जातीने हजर असतात!!) इत्यादी बाबी सुरु झाल्या. अशाचवेळी प्राचीचा वाढदिवस आला आणि व्हाटसअपवर अभिनंदन करायचे क्रियाकर्म उरकून घेतले!! दुपारी मनात आले, चला फोन तर करूया आणि मी फोन केला. अर्थात, फोन उचलला नाही (आलेला फोन न उचलणे ही  प्राचीची खासियत आहे!!) आणि मी देखील परत काही फोन केला नाही. एकतर ही बाई (मुलगी!!) कशी दिसते, कशी वागते, काहीच कल्पना नाही. तेंव्हा परत फोन करण्याचा कशाला अगोचरपणा करायचा, हाच विचार केला होता. परंतु संध्याकाळच्या वेळेस प्राचीने फोन केला!! ( हे थोडे नवलच म्हणायचे) मी ऑफिसमध्ये होतो पण तरी फोन उचलला. " अनिल, फोन केला होतास?" हेच पहिले वाक्य. पहिल्या भेटीतच एकेरी उल्लेख आणि स्पष्ट बोलणे, अस्मादिकांना बरे वाटले. "वाढदिवस आहे ना तुझा, म्हणून फोन केला होता." नंतर थोडे जुजबी बोलणे झाले आणि परंत कधीही फोन कर, अशी प्राचीची पृच्छा. " अरे अनिल आपण फ्रेंड आहोत तेंव्हा कधीही फोन कर" असे मोकळ्या थाटाचे बोलणे झाले आणि फोन बंद झाला. 
प्राचीशी ओळख झाली ती अशी. नंतर व्हाट्सअपवर आमचा खरा खट्याळपणा सुरु झाला. मला कुणी विरोध केला की मला मनापासून आवडते आणि इथे तर प्राची, माझ्या प्रत्येक वाल्याला विरोध करीत होती. इथे एक स्पष्ट केले पाहिजे, विरोधी सूर लावायला प्राचीने सुरवात केली - मी केलीच असती असे नाही. आता ती आपणहून वाकड्यात शिरत आहे म्हटल्यावर अनिल फॉर्मात. आम्ही रोजच्यारोज भांडत असायचो, आजही त्यात फारसा फरक नाही. पण आम्ही हा विरोधी सूर भरपूर एन्जॉय केला. पुढे ठरल्याप्रमाणे मळवलीला पिकनिक झाली आणि तिथे "औंधची महाराणी" प्रथम भेटली. अर्थात तोपर्यंत फोनवर आमच्या बऱ्याच गप्पा झाल्यामुळे प्रत्यक्ष भेटताना फालतू असा संकोच, उपचार वगैरे काहीच झाले नाही. फोनवर काहीवेळा मी अति गंभीर (हे प्राचीचे प्रांजळ मत पण मला तसे वाटत नाही) बोलणे झाल्यामुळे तिच्या मनात माझी एक प्रतिमा झाली होती (बरे झाले ती प्रतिमा लवकरच भंग पावली). रात्री जेवणे झाल्यावर गाण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रम सुरु झाला ( एक विसरलो - ग्रुपवर मी त्यावेळी रोजच्यारोज  एखाद्या गाण्याची लिंक टाकत असे, गाण्याबद्दल चार शब्द लिहीत असे, त्यावरून प्राचीनेच माझे "पंडितजी" असे नव्याने बारसे केले!!) अर्थात अस्मादिक खुश. त्यावेळेस, प्राचीने प्रथमच "गळा" काढला, आजही ते गाणे आठवत आहे. "रहते थे कभी उनके दिल में" हे लताबाईंचे लयीला अवघड असलेले गाणे संपूर्णपणे गायले. आता मात्र थक्क व्हायची पाळी अनिलची!! ही बया इतकी  चांगली गात असेल हे मी स्वप्नात देखील कल्पिले नव्हते. अर्थात तेंव्हा मी आणि विजयने (तो नेहमीच करतो) भरपूर धुडगूस घातला होता आणि प्राचीच्या मनातली माझी प्रतिमा भंगली (तिने पुढे अनेकवेळा स्पष्टपणे बोलून दाखवले आहे) पण ते बरेच झाले. अशा तऱ्हेने पिकनिक संपली पण माझी प्राचीशी झालेली ओळख आणखी घट्ट झाली. खरेतर या पिकनिकने माझी अनेकांशी चांगली ओळख झाली. 
नंतर मी पुढे एका वृत्तपत्रात लिहायला लागलो आणि माझा मित्रपरिवार थोडा पसरायला लागला. वृत्तपत्रातील लेख मी आवर्जूनपणे काही मित्र/मैत्रिणींना पाठवायला लागलो. अर्थात लिहिणारा अनिल आणि प्रत्यक्षातला अनिल, यातील फरक मी जाणीवपूर्वक वेगळा ठेवत होतो, आजही तसेच करतो. पुढे एकदोनदा पुण्याला गेलो असताना तिच्या घरी गेलो. सुदैवाने  तिच्या नवऱ्याचे नाव देखील "अनिल!!" आता इतका मसाला माझ्या हाती आल्यावर मी काय प्राचीला असा सहज सोडणार!! शक्यच नाही. कधी कधी माझ्या मनात यायचे, मी जरा अति चेष्टा करतो की काय? म्हणून काही वेळा फोनवर प्राचीला विचारत असे. बहुदा प्राचीने माझे "पाणी" ओळखले असावे कारण नंतर तिने माझ्यावर बाजी उलटवली!! बाजी उलटवणे, मला बोलण्यात लटकवणे या कलेत प्राची एकदम "वाकबगार", इतकी की समोरच्याला "गार" करून टाकणार. काहीवेळेस आम्ही फोनवर चक्क तासभर गप्पा मारलेल्या आहेत. 
आता या महाराणीचे काही दोष - हिचे कितीही मनापासून कौतुक केले तरी हिला पटत नाही. वास्तविक प्राचीचे समाजकार्य निव्वळ अफाट आहे आणि त्या कार्याची दखल काही पारितोषिके मिळवून घेतली गेली आहे  अथकपणे अंधांसाठी तिचे काम चाललेले असते आणि मुख्य म्हणजे निस्पृहपणे चालते आणि याचा मला हेवा वाटतो. काहीवेळेस कौतुक केले तरी कौशल्याने विषय बाजूला सारला जातो. दुसरा मुद्दा, आपल्याला आलेला फोन उचलायचा असतो,हे प्राची शिकलीच नाही!! मी तर काहीवेळा बोलतो "प्राची तू फोन उचललास, आज सत्यनारायणाची पूजा घालायला लागणार!!" माझा नास्तिक स्वभाव ओळखून त्यातील टोमणा स्वीकारण्याइतका स्वागतशील स्वभाव आहे. पण, पहिल्या फटक्यात फोन उचलला, असे सहसा घडत नाही. तिसरा मुद्दा, मी अनेक ठिकाणी लेख लिहीत असतोआणि माझी मैत्रीण म्हणून मी (निर्लज्जपणे !!) लेखाची लिंक तिला पाठवीत असतो पण अनिल आपला मित्र आहे, हे नेमके ती विसरते आणि प्रतिक्रिया देत नाही. अनिल पण कोडगाच आहे, इतका अनुभव असून देखील लेखाची लिंक पाठवित असतो. बहुदा एखादा कागदाचा कपटा चिमटीत धरून कचरा पेटीत  टाकावा,तितक्या सहजपणे प्राची त्या लिन्ककडे दुर्लक्ष करते. 
आता असे  वाटते,इतके सगळे घडूनही माझी मैत्री कशी? स्पष्ट सांगायचे  झाल्यास,आम्ही अतिशय तुरळक प्रसंग सोडले तर एकमेकांशी सहज, साध्या भाषेत कधीच बोलत नाही. "नमस्कार" बोलताना देखील त्यात तिरकस भाव असणे अगत्याचे आहे. बहुदा विरोधाभासावरच आमची मैत्री टिकली असावी आणि मला त्याचेच खरे आकर्षण आहे. 

No comments:

Post a Comment