Wednesday 29 May 2019

सतीश करंदीकर

वास्तविक एकेकाळी म्हणजे १९८४ ते १९८९ पर्यंत मी आणि सतीश एकाच कंपनीत कामाला होतो - त्यावेळी कंपनीचे नाव B.S.E.S. Limited असे होते. पुढे मी १९८९साली कंपनी सोडली. सतीश मात्र अजूनही त्याचा कंपनीत कामाला आहे. सांगायचं मुद्दा असा, या ५ वर्षांत, एकाच कंपनीत असून आमची एकदाही भेट झाली नव्हती. सतीश तेंव्हा अंधेरीला E.D.P. Department मध्ये होता आणि मी सांताक्रूझला Accounts Dxepartment मध्ये होतो. मला अंधेरीला जायची वेळच कधी नाही. खरतर, सतीश या कंपनीत आहे, हेच मुळी मला २,३ वर्षांनंतर कळले पण भेटीचा योग्य नव्हता, हेच खरे. पुढे मी परदेशी नोकरीसाठी गेलो आणि भारतातले संबंध फारच विरळ व्हायला लागले. 
२००१ मध्ये मी प्रकृती कारणास्तव भारतात आलो आणि जवळपास २ वर्षे राहिलो होतो. सुरवातीला प्रकृतीचेच काही धड नव्हते म्हणून घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. काही महिन्यांनी मी घराबाहेर पडायला लागलो आणि एकदा मी ट्रेनने कुठेतरी जात असताना, सतीश मला त्याच डब्यात भेटला. त्याला आता ही भेट आठवत नसेल - कशाला आठवेल?  अशा भेटी सामान्य लोकंच लक्षात ठेवतात!! असो, तेंव्हा आमचा विषय हा मिलिंद देसाई (आमचा सामायिक मित्र) हाच होता. त्यावेळी मिलिंद  देखील एका त्रासातून जात होता. माझ्या आजाराविषयी मीच बोलायला फारसा उत्सुक नव्हतो त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. 
पुढे मी परत परदेशी गेलो आणि होते ते संबंध देखील गोठले!! त्यानंतर एकदा सुटीवर भारतात आलो होतो, बहुदा २००६ मध्ये आणि काही कामानिमित्ताने गिरगावात फिरत असताना, अचानक सतीश भेटला आणि काही जुजबी विषयावर बोलणे झाले आणि आम्ही दोघेही आपल्या रस्त्याला लागलो. आमची खरी ओळख झाली ती, आपला ग्रुप जुळायला लागला तेंव्हा. एकतर गिरगावात तसे जुने मित्र फारसे कुणी राहिले नव्हते आणि मी त्यासुमारास कायमचा भारतात परतलो होतो. त्यामुळे नित्यनेमाने भेटी व्हायला लागल्या. त्यातून सतीशला भारतीय संगीताची अमाप आवड, हा मुद्दा आम्हाला अधिक जवळ यायला कारणीभूत झाला. अगदी प्रांजळपणे मांडायचे झाल्यास, सतीशने जितके "गाणे" (भारतीय संगीत) ऐकले आहे, त्याच्या निम्म्याने देखील मी ऐकलेले नाही. आजही दरवर्षी डिसेम्बरमध्ये, पंढरीला वारी करावी त्याप्रमाणे हा पुण्याला सवाई गंधर्व महोत्सवाला हजेरी लावतो. मैफिलींना जाण्याबाबतची त्याची चिकाटी वाखाणण्यासारखीच आहे. मी देखील संगीताच्या मैफिलींना जातो पण माझे प्रमाण त्यामानाने अल्पसे आहे. बरेचवेळा सतीश मला फोन करतो आणि एखाद्या कार्यक्रमाची माहिती देतो, माझे तिकीट बुक करतो आणि माझे मैफिलींना जाणे होते. 
किंबहुना, काही  बाबतीत त्याचा उत्साह निव्वळ अफलातून आहे. एक उदाहरण देतो, २०१५ साली मी एका वृत्तपत्रात भारतीय शास्त्रीय संगीतावर साप्ताहिक कॉलम लिहायला लागलो (आणि ते वृत्तपत्र दीड वर्षांत बंद पडले!!). वास्तविक पाहता, माझे लेख म्हणजे काही मूलभूत मुद्द्यांना हात घालून, तांत्रिक दृष्ट्या अभ्यासपूर्ण नव्हते (तसे लिहायला मला आजही आवडेल पण ....) पण आपला एक शाळामित्र एखाद्या पेपरमध्ये लिहीत आहे, याचा त्याला खरा आनंद झाला होता. प्रत्येक आठवड्याला मला न चुकता फोन करायचा आणि कुठल्या रागावर लिहीत आहेस? अशी चौकशी करायचा. आजही मी आणखी एका वृत्तपत्रात साप्ताहिक कॉलम लिहीत आहे आणि आजही त्याचा चौकशीसाठी फोन येतो. त्यानिमित्ताने आमच्या संगीत या विषयावर भरपूर गप्पा होतात, मला काही नवीन सापडते आणि त्याचा मी लेखांत उपयोग करतो. तसे बघितले तर सतीशला शास्त्रात फारसे गम्य नाही पण त्याला सुरेल, कणसूर आणि बेसूर स्वरांची जाण आहे. बरेचवेळा मला लिहायला प्रवृत्त करतो - मी लिहीत असतो पण मी खूप आळशी आहे आणि ते जाणून सतीश मला टोचत असतो. आज माझ्या ब्लॉगवर ३०० पेक्षा अधिक लेख लिहून झाले आहेत म्हणजे जवळपास १,३०० छापील पाने, त्यातील जवळपास १५० लेख तरी संगीत या विषयावर आहेत. या सगळ्या व्यापात सतीशचा सहभाग बराच आहे. 
तसे बघितले तर आमच्यात मतभेदाचे विषय भरपूर आहेत. एकतर सतीश कट्टर आस्तिक आहे आणि मी तितकाच कट्टर नास्तिक आहे पण सतीश चुकूनही मला, त्याची भूमिका समजावत नाही कारण त्यालाही माहीत आहे, मी सहजपणे मत बदलणारा नाही. अर्थात हा विषय आमच्यात फारसा कधी येत नाही. दुसरा मतभेद म्हणजे सतीश कडवट म्हणावा असा हिंदुत्ववादी आहे आणि मला, मी हिंदू आहे, तितके पुरेसे आहे. अर्थात याचा परिणाम आमच्या राजकीय भूमिकेवर पडतो. खरतर मला राजकारणात फारसे स्वारस्य नाही, मला राजकीय मते आहेत पण त्याचा बडिवार माजवावा असे वाटत नाही. काही अपवाद प्रसंगी आमचे वाद झाले आहेत पण आम्ही समजूतदारपणे बाजूला सारले आहेत. 
सध्या आमचा "रागदर्शन" म्हणून संगीताचा गृप तयार झाला आहे आणि आमचे आतापर्यंत ४,५ कार्यक्रम जाहीररीत्या झाले आहेत. असा गृप जमवायचा, असे कार्यक्रम करायचे, ही सगळी धडपड सतीशचीच. त्यानेच सगळ्या कलाकारांना गोळा  केले, माझ्या मागे लागून कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी लिहून घेतले, किंबहुना अजूनपर्यंत तरी हाच परिपाठ चालू आहे. माझा मुळातला स्वभाव  बघता, असली धडपड करणे माझ्या स्वभावात बसत नाही. पण सतीश सगळी धडपड आनंदाने करीत असतो. माझ्याकडून लिहवून घेत असतो आणि मी देखील मैत्रीखातर त्याचे म्हणणे गुमानपणे ऐकतो कारण लिहिणे हा माझा श्वास आहे. सतीशची आणि माझी मैत्री अनेक मतभेदांसहित अशी तरून राहिली आहे. 

No comments:

Post a Comment