Tuesday 14 May 2019

अरे कृष्णा अरे कान्हा

 महाराष्ट्रात संत साहित्याच्या जोडीने लोकसाहित्याची देखील फार मोठी परंपरा आहे. संतसाहित्याबाबत लेखनाचे जनकत्व शोधून देता येते परंतु लोकसाहित्याबाबत तसा नेमका ठावठिकाणा मिळणे तद्वत फार अवघड जाते. लोकसाहित्य आणि लोकसंगीत कुणी सुरु केले, याचा अथक शोध घेऊनही एका मर्यादेपलीकडे फारसे हाती लागत नाही. असे असून देखील लोकसंगीताचा गोडवा मात्र मनावर गारुड टाकते. 
प्रस्तुत रचना ही संत एकनाथांची आहे म्हणजे संतपरंपरा इथे येते जी भक्तिसंगीताशी थेट नाळ जोडते. या संतकवी पंथाचे अनुयायी होण्याआधी, , या बाबतीत थोडा इतिहासाचा मागोवा घेतला तर, अनेक भक्तिमार्गी असामान्य संगीतकार होते असा एक निर्वाळा मिळतो. आपली संगीतपरता देवासाठी राबवावी असा आदेश आपल्या पंथाकडून मिळाला असावा, असे वाटू शकते. याचाच परिणाम भक्तसंख्या वाढू लागली आणि भक्तीचा सामूहिक आविष्कार, ही अत्यंत महत्वाची अभिव्यक्ती ठरली. अर्थात, आपली शाब्दिक रचना आणि संगीत, हे प्रामुख्याने सामान्यजनांसाठी आहे, याची विशेष जाणीव आविष्कारात राबवली गेली. यातूनच लोकसंगीताशी साद्ध्यर्म्य राखणारी  भक्तिसंगीताची  शाखा असते हे घोळ गीत ( गुजरात ) किंवा वारकरी संगीत (महाराष्ट्र) यावरून ध्यानात येईल. महाराष्ट्रात "अभंग","विराणी","गौळण" इत्यादि असंख्य लोकसंगीताचे  आविष्कार दिसतात. यातूनच आपल्याला आजच्या रचनेची ओळख करून घ्यायची आहे. 
मूलतः गौळण म्हणजे त्यात कृष्ण, गवळणी इत्यादी व्यक्ती समाविष्ट होतात. परंतु त्याचबरोबर सामान्य जनांना शिकवणे, ही दृष्टी देखील दिसते. संत एकनाथांच्या या रचनेत याचा आढळ होतो. कवी म्हणून विचार करताना, या रचनेतील उदाहरणे ही आपल्या नेहमीच्या आयुष्यात सापडणारी आहेत आणि त्यातून लोकरंजन आणि शिक्षण, अशी दोन्ही साधे साध्य करण्याचा प्रयत्न जाणवतो. अर्थात संत एकनाथांच्या हाच प्रमुख उद्देश होता. 
एकतर अशा प्रकारचे लोकसंगीत हे नेहमीच मंचीय सादरीकरणातून समोर येते म्हणजेच एका बाजूने लोकानुनय ही प्राथमिक गरज बनते. सरळ, साध्या शब्दातून जागृती करणे, हाच प्रमुख हेतू स्पष्ट होतो. अर्थात त्यासाठी अनेक संस्कार करावे लागतात. अशीच बाब लोकसंगीताची देखील असते. इतर कुठल्याही संगीतकोटींप्रमाणे भक्तिसंगीत आणि लोकसंगीत यांना स्वतः:ची अशी एक खास परंपरा असते आणि त्या परंपरेला अनुसरूनच या आविष्काराचा आस्वाद घेणे क्रमप्राप्तच ठरते. या शब्दरचेनला स्वरसाज चढवला आहे आणि गायले आहे, शाहीर साबळे यांनी. 
शाहीर साबळे यांचे महाराष्ट्रातील लोकसंगीतातील अस्तित्व निश्चितच वाखाणण्यासारखेच आहे. लोकसंगीतात समोरील श्रोत्यांशी आवाहकरीतीने संवाद साधणे आवश्यक असते आणि इथे शाहीर साबळ्यांची नाळ प्रेक्षकांशी नेमकेपणाने जुळलेली आढळते. मी वर म्हटल्याप्रमाणे लोकसंगीताला मंचीय सादरीकरणातून पुढे आणून, या संगीताला बरीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 
लोकसंगीताचा एकूणच ढाचा बघता, लोकवाद्ये, त्यातही तालवाद्ये यांचा प्रामुख्याने समावेश होतो. जोरकस वाजणारी तालवाद्ये नेहमीच समोरच्या प्रेक्षकांना आपल्या आविष्कारात सामावून घेतात. त्यादृष्टीने, ढोल, डफ, संबळ, ढोलक, एकतारी अशी वाद्ये तो आशय अधिक बांधीव करतात. या रचनेची स्वररचना आणि गायन हे एकाच व्यक्तीने केले असल्याने, दोघांचे मूल्यमापन स्वतंत्र करणे आवश्यक ठरते.  
गायक म्हणून विचार  करताना,पहिला प्रभाव पडतो तो, आवाजाचा पल्ला, भरीवपणा मर्दानी जोमदारपणा आणि ताकदीची फेक. यामध्ये, लोकसंगीताच्या दृष्टीने मर्दानी जोमदारपणा आवाजात असणे जरुरीचे असते आणि त्याबाबतीत साबळ्यांचा आवाज, ही फार मोठी जमेची बाजू म्हणायला हवी. त्यामानाने खालच्या पट्टीत फारसे गायन आढळत नाही पण लोकसंगीताची गरज बघता, त्याची फारशी गरज भासली नाही. गायन प्रामुख्याने मध्य सप्तक आणि तार सप्तक इथेच प्रभावीपणे व्यक्त होतो. छोट्या ताना सफाईदारपणे घेतल्या जातात आणि तिथे जराही चाचपडलेपण दिसत नाही. स्वच्छ आणि निकोप आवाज असल्याने, समोरील रसिकांवर प्रभाव लगेच पडतो. 
सगळी रचना बहुतांशी द्रुत लयीत असल्याने, तालाचा म्हणून स्वतंत्र प्रभाव जाणवतो. मुळातच शब्दच असे थेट लयीत असल्याने उच्चारण स्वच्छ झाले आहे. लोकसंगीत फार ठाशीवपणे आपला सांगीत वाक्यांश रसिकांसमोर ठेवत असल्याने तालाच्या मात्रा आणि अंत्य शब्दांवर जोर देणे, हे रसिकांना भावते.  शाहीर साबळ्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वत: शब्दरचना करून काही गाणी तयार केली आहेत आणि ती देखील स्वतःच गायली आहेत. एकेकाळी पोवाडे पद्धतीची गाणी गाऊन, उभा महाराष्ट्र गाजवला होता. कुठलीही पातळी न सोडता, वर्षानुवर्षे ठराविक दर्जा सांभाळणे ही सहज जमणारी गोष्ट नक्कीच नाही आणि शाहिरांनी हे यश सहजपणे मिळवले. मराठी लोकसंगीतात फार मोठा वाटा उचलला, ही बाब नेहमीच स्पृहणीय ठरेल.  

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

आले संत घरी म्हणून काय बोलून शिणवावे 
ऊस गोड लागला म्हणून काय मुळांसहित खावे 
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे 
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे 
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळूनिया प्यावे 
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे 
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

परस्त्री झाली म्हणून काय बळेची ओढावी 
सूरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी 
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा 
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा 
घराचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा 
एका जनार्दनीं म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 


No comments:

Post a Comment