Monday 7 January 2019

भाई - व्यक्ती की वल्ली

बरेच दिवस गाजत असलेला चित्रपट - "भाई - व्यक्ती की वल्ली" काल बघितला. स्पष्ट सांगायचे तर जेंव्हा एखादी कलाकृती बघण्याआधी जेंव्हा लोकप्रिय होते तेंव्हा माझ्या मनात अकारण शंका येतात. अपेक्षापूर्तीचा अनुभव फारच कमी वेळा येतो. असे देखील अनुभवाला येते, आपणच अपेक्षा वाढवून ठेवतो आणि त्याच अपेक्षेने कलाकृती बघण्याचा हव्यास धरतो आणि मग अखेरीस निराशा पदरी पडते. म्हणूनच हा चित्रपट बघण्याआधी मी शक्यतो पाटी कोरी ठेऊनच बघायला बसलो. एकतर "पु.ल." या नावाचे प्रचंड वलय आजही मराठी मनाला व्यापून आहे. इथे एक कबूलच करायला हवे, माझ्या तारुण्यात मी पु.लं. चा प्रचंड चाहता होतो, आजही आहे पण आता प्रतवारी थोडी बदलली आहे. लेखक म्हणून सगळेच तेंव्हाही आवडले नव्हते आणि आता तर दरी थोडी रुंदावली. अर्थात त्यांच्या लेखनाचे ऋण आजही मान्य करण्यात कसलीच लाज वाटत नाही. परंतु या माणसाचे कार्यक्षेत्र, लेखनाच्या पलीकडे विस्तारले होते आणि तिथे अनेक ठिकाणी त्यांचे कार्य एकतर दुर्लक्षित झाले किंवा तितकेसे रसिकप्रिय झाले नाही. काही ठिकाणी त्यांच्या मर्यादा उघड्या पडल्या आणि गंमत म्हणजे खुद्द पु.लं. नी अतिशय प्रांजळपणे मान्य केल्या होत्या. असे असून देखील कित्येकवेळा नको तितके वाद घातले गेले. 
असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर मी चित्रपट बघितला. पु.लं. चे आयुष्य तसे पूर्णतः: परिचित, त्यांनी केलेल्या "कोट्या", लेखनशैली, अभिनयशैली, दातृत्व इत्यादी सगळे परिचित असताना आत चित्रपटात आणखी वेगळे काय बघायला मिळणार? हा एक प्रश्न होता आणि दुसरा म्हणजे इतक्या विविधांगी क्षेत्रात मनमुराद विहार केलेला, चित्रपटात कसा दाखवला जाणार आहे? ही उत्सुकता होती. 
एकूण चित्रपट ठीकठाक आहे पण बऱ्याच प्रसंगांची संगती लागत नाही. उदाहरणार्थ, आपल्या बायकोला दिवस गेले आणि दुर्दैवाने मूल होऊ शकले नाही!! हा निश्चितच वैय्यक्तिकरीत्या मोठा धक्का पण त्यानंतरचे प्रसंग या प्रसंगाशी कसलाही संबंध दाखवत नाहीत!! हे कसे घडले? चित्रपटाची लांबी ध्यानात घेता असे झाले असावे, पण पुढील प्रसंग तर्कदृष्ट्या तरी संगती दाखवणारे हवे होते. 
दुसरा प्रसंग, लग्न झाल्यावर कोकणांत एका वकिलाकडे पार्टी झाली. तिथून परत येताना पाऊस लागला आणि अंतू बर्व्याकडे पुन्हा ड्रिंक्स पार्टी!! पु.लं. च्या आयुष्यात आणि एकूणच लिखाणात ड्रिंक्स बद्दल अतिशय माफक आणि तुरळक उल्लेख असताना, या पार्ट्यांवर जवळपास २०,२५ मिनिटें खर्च करून नेमके काय साधले? हे प्रसंग सलग आहेत आणि एकूणच पु.लं.च्या व्यापक आयुष्याचा थोडक्यात ताळा मांडताना अशा प्रसंगांची खरंच काय गरज होती? या प्रसंगाने पु.लं.च्या आयुष्याला काही वेगळे वळण मिळाले का? तसे काहीच दर्शविलेले नाही. 
चित्रपटाचा शेवट करताना, संगीत मैफिल दाखवली आहे. पु.लं. च्या आयुष्यात सांगितलं फार महत्वाचे स्थान होते, यात वादच नाही. प्रस्तुत मैफिलीचे काहीसे वेगळे विवेचन सुनीताबाईंनी "आहे मनोहर तरी" मध्ये, एका शनिवारी  मैफिलीचे वर्णन करताना केले आहे आणि त्यालाच जोडून पुढील शनिवारी, वसंतरावांच्या मैफिलीचे वर्णन केले आहे. तसेच "गुण गाईन आवडीने" या पुस्तकांत "हिराबाईंवर" लेख आहे. त्यात कुमार गंधर्वांच्या मैफिलीचे पु.लं.नी वर्णन केले आहे. यात दोन्ही उल्लेखात, भीमसेन, कुमार, आणि वसंतराव एकत्र कधीही गायला बसल्याचा उल्लेख नाही. असे  समजू,चित्रपटीय स्वातंत्र्य घेतले पण तरीही मग तिघांची "गायकी" कुठेच खुलून येत नाही!! आणखी एक महत्वाचा भाग "सावरे ऐ जै यो" या कुमार गंधर्वांच्या रचनेला जोडून "कानडा राजा पंढरीचा" हे भजन घेण्याचे प्रयोजन काय? बरे मूळ गाण्यात कुमार गंधर्व नाहीतच. पहिली रचना ठुमरी अंगाने गेलेली तर दुसरी रचना भजनाच्या अंगाने गेलेली. एकाच दुसऱ्याशी ना काव्याच्या दृष्टीने संबंध आणि ना संगीताच्या दृष्टीने देखील. 
संगीतकार म्हणून पु.लं. ची कामगिरी लक्षणीयच आहे पण "नाच रे मोरा" या गाण्याचा उल्लेख वगळता, आणखी काहीच नाही आणि तो प्रसंग देखील अचानक अंगावर येतो. त्याआधी आणि त्यानंतर सुसंगती आढळत नाही. तसेच पु.लं. चे वक्तृत्व हा खास विशेष होता आणि त्यांच्या आठवणी तपासता, शाळेपासून त्यांच्या अंगात वक्तुत्वाची देणगी होती. असे असून चित्रपटात त्यासंबंधी काहीही बघायला मिळत नाही. 
चित्रपटातील प्रसंग कुठेही खुलून येत नाहीत, घडाभर करमणूक, इतकेच स्वरूप राहते. पु.लं. नी जरी आयुष्यभर करमणूक हेच साध्य मानले तरी पु.लं. च्या वैचारिक लेखनाचा कसलाच उल्लेख नाही तसेच १९५९ च्या दशकात पु.लं. ना स्कॉलरशिप मिळून ते आणि सुनीताबाई युरोपला गेले आणि जवळपास २ वर्षे तिथे पु.लं. नी  शिक्षण घेतले. याचा त्यांच्या आयष्यावर खूप परिणाम झाला आणि त्यांची कारकीर्द एकदम वेगळेच वळण घेऊन गेली. त्याबाबत चित्रपटात उल्लेख देखील नाही. कदाचित उत्तरार्धात आला असेल अशी शक्यता आहे. 
एखाद्या मान्यवर व्यक्तीचा चित्रपटाद्वारे धांडोळा घेताना, त्या व्यक्तीची चिकित्सा देखील व्हावी तसेच त्या व्यक्तीचे गुण/दोष याचे सुयोग्य परिणाम दाखवावेत जेणेकरून व्यक्तित्वाची वाढ कशी झालं, याचे नेमके दर्शन चित्रपटातून घडू शकते. इथे मात्र या पातळीवर हा चित्रपट नक्कीच कमी पडला. यात लेखक म्हणून कशी वाढ झाली, संगीतकार, चित्रपटकार म्हणून कारकीर्द कशी घडली आणि त्यात कुठे कमी पडले? या प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत कारण हे प्रश्नच धडपणे उभे केले नाहीत!! चित्रपटातील विनोद, शाब्दिक कोट्या, यात नवीन काहीच मिळाले नाही कारण हे विनोद, शाब्दिक कोट्या खुद्द पु,लंनीच लोकांपुढे काही वर्षांपूर्वी सादर केले आहेत. त्यामुळे पुनरुक्ती होते. 

अर्थात ज्यांनी पु.ल. बघितलेच नाहीत त्यांच्यासाठी चित्रपट ठीक आहे पण यात दुसरा प्रश्न उद्भवतो. जी नंतरची पिढी जन्माला आली, त्यांना पु.लं. चे विश्व नक्कीच परके वाटणार!! त्या प्रेक्षकांना कसे सांगायचे? 

No comments:

Post a Comment