Friday 18 January 2019

तुझी नि माझी जुळली प्रीती

आपल्याकडे विशेषतः कला क्षेत्रात एखादा कलाकार एका विशिष्ट शैलीत प्राविण्य दाखवणारा निघाला की लगेच त्या कलाकाराला त्या शैलीत बंदिस्त करून टाकायचे!! जणू काही त्या शैलीव्यतिरिक्त त्याचे सादरीकरण अशक्यच आहे, अशी परिस्थिती निर्माण करायची. या गुंत्यात काहीवेळा किंवा बरेचवेळा तो कलाकार देखील अडकतो किंवा त्याला ते लेबल आवडायला लागते. खरेतर हा चक्रव्यूह असतो पण आपण त्या चक्रव्यूहात अडकलो आहोत, हेच एकतर समाजात नाही किंवा जेंव्हा लक्षात येते तेंव्हा, दोन बाबी तयार होतात, एकतर त्याला तो चक्रव्यूह आवडायला लागतो कारण लोकप्रियतेचे अनावर आकर्षण किंवा तीच त्याची मर्यादा होऊन बसते. लोकप्रियतेचे गारुड, ही खरोखर विलक्षण चीज आहे आणि भल्याभल्यांना हा मोह चुकवता येत नाही. 
या गाण्याचे संगीतकार वसंत पवार हे असेच लेबलमध्ये अडकलेले पण अतिशय विलक्षण प्रतिभा (हा शब्द मुद्दामून वापरत आहे) लाभलेला कलावंत!! काही लावणी स्वररचना लोकप्रिय झाल्या आणि "लावणीसम्राट" हीच त्यांची ओळख आजतागायत आहे. लावणीवर त्यांचे प्रभुत्व होते आणि ते प्रभुत्व बहुतेकांनी एकमुखाने मान्य केले आहे पण तरी "लावणीसम्राट" हीच ओळख रसिकांच्यात रहावी, हे दुर्दैव. महाराष्ट्रातील लोकसंगीताचा गाढा अभ्यास, तसेच भारतीय शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, तसेच सतार वादनात अफाट प्राविण्य, इत्यादी अनेक गुण त्यांच्या अंगात होते.  
मराठी ललित संगीताबाबत एक विधान ठामपणे करता येते आणि ते म्हणजे गाण्याची स्वररचना करताना, गाण्याच्या चालीवर अधिक भर द्यायचा. यामागे एक कारण म्हणजे आर्थिक चणचण!! याचा परिणाम असा झाला, गाण्याच्या मुखड्यावर अधिक भर देण्यात आला. अर्थात गाण्याचा मुखडा जर का गोड असेल तर ते गाणे रसिकांच्या पसंतीला उतरते आणि हा सर्वमान्य विचार आहे. प्रस्तुत गाण्यात देखील वाद्यमेळ म्हणून बघायला गेलो तर व्हायोलिन, बासरी वगळता, तालवाद्य इतपतच वाद्यमेळ सजलेला आहे. मुखड्याआधीचा वाद्यमेळ तर निव्वळ नावापुरताच आहे. प्रस्तुत दोन्ही सुरवाद्ये एकत्र वाजतात टी काही सेकंदच आणि पंडित वसंतराव देशपांड्यांचा काहीसा ढाला आवाज कानावर पडतो.हे गाणे जेंव्हा वसंतरावांनी गायले तेंव्हा त्यांची गायकी शैली तशी प्रस्थापित झाली नसावी परंतु तरीही सूर घेताना, त्याच्यावर झडप टाकायची वृत्ती काही लपत नाही. संगीतकार म्हणून वसंत पवारांनी या शैलीला थोडी मुरड घालायला लावून, वसंतरावांना गायला लावले असावे ( थोडे वेगळे उदाहरण म्हणून पुढे याच वसंतरावांनी "बगळ्यांची माळफुले" कसे गायले आहे ते जिज्ञासूंनी नजरेसमोर आणावे म्हणजे वरील मुद्दा ध्यानात यावा!!)   
ललित संगीत जेंव्हा कुठल्याही शास्त्रोक्त संगीत गायकाकडून सादर केले जाते तेंव्हा काही गोष्टी नेहमीच खटकतात. १) शब्दोच्चार, २) रागदारी संगीतातील सांगीतिक अलंकार वापरण्याचा सोस. वास्तविक ललित संगीतात शब्दोच्चारांना किती महत्व  वेगळ्याने सांगण्याची गरज नाही परंतु नेहमीच होते काय, रागदारी गायक/गायिका गातात तेंव्हा त्यांच्या गळ्यावर तंबोऱ्याच्या रुमझुमणाऱ्या सुरांवर साधना करायची सवय झाली असते, परिणामी गळा "जड" होतो आणि हे जडत्व, शब्दोच्चाराला मारक ठरते. त्यातून रागदारी संगीत हे स्वरप्रधान संगीत असल्याने आणि तशीच " तालीम" झाली असल्याकारणाने, गायनात अनाहूतपणे रागदारी संगीताचे अलंकार उमटतात. थोडक्यात, बरेचवेळा गायन दोषास्पद होते. इथे मला कुणालाही दोष द्यायचा नाही पण हा प्रत्येक संगीत आविष्काराचा परिणाम असतो. असे असून देखील, प्रस्तुत गाणे प्रणयगीत असूनही, वसंतरावांनी आपल्या गायनात, आपली शैली फारशी "आड" येऊ दिली नाही. हे निश्चितपणे गायक म्हणून वसंतरावांचे आणि संगीतकार म्हणनू वसंत पवारांचे श्रेय म्हणायला लागेल. 

आज दिसे का चंद्र गुलाबी 
हवेस येतो गंध शराबी 
अष्टमीच्या या अर्ध्या रात्री 
तुझी नि माझी जुळली प्रीती 

कवी ग.दि.माडगूळकरांची शब्दरचना आहे. माडगूळकरांच्या बाबत असे ठामपणे म्हणता  येईल, त्यांची कविता ही नेहमीच मराठी संस्कृतीशी आणि पारंपरिक घाटाशी नाते सांगणारी आहे. कधी कधी संस्कृत साहित्यातून कल्पना उचलल्याचे कळते पण तो काही दोष म्हणता येणार नाही. मराठीतील अनेक कवींनी संस्कृत साहित्याच्या आधाराने कविता केल्या आहेत. प्रासादिकता,गेयता आणि गाण्याच्या चालीचे वजन ध्यानात घेउन, शब्दांचा सुयोग्य उपयोग करणे आणि नेमका "खटका" लक्षात ठेऊन तिथेच अचूक "अक्षर" ठेवणे इत्यादी अनेक विशेष माडगूळकरांच्या कवितेबाबत सांगता येतील. वरील ओळीत  बघा,"अष्टमीच्या" आणि "रात्री" या जोडाक्षरांवर किंचित "खटका" घेतला आहे परंतु तसे घेताना त्यांनी कवितेचा "तोल" कसा सांभाळला आहे, हे बघण्यासारखे आहे. 

अर्धे मिटले, अर्धे उघडे 
ह्या नयनांतून स्वप्न उलगडे 
तळहातावर भाग्य उतरले 
हात तुझा रे माझ्या हाती 

आशा भोसल्यांनी मराठी गाणी गाताना नेहमीच कौतुकास्पद विविधता दाखवली आहे. खरंतर त्यांनी ललित गायनात जितकी सर्जनशीलता दाखवली आहे तितकी बहुदा कुठल्याही गायक/गायिकेने दाखवलेली नाही. कवितेची प्रकृती नेमकी जाणून त्यात आपली गायन शैली उतरवणे, हा तर आशा भोसल्यांचा हातखंडा खेळ म्हणता येईल. विविध गीतप्रकार सादर करताना, आवाजावरील नियंत्रण आणि ध्वनीवैशिष्ट्ये याचा अचूक वापर, यामुळे, ऐकणाऱ्याला एक संमृद्ध गायन ऐकल्याचा आनंद प्रतीत होतो, आता त्यांच्या आवाजाचे मूल्यमापन कसे करता येईल? एक तर मान्यच करायला हवे, काही गीतप्रकारांच्या सीमा विस्तारल्या. कंठसंगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलींत भर टाकून, सांगीत शक्यतांची नवी परिमाणे सादर केली. जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला आहे. 

स्वप्नी तुझ्या मी येता राणी  
दुनिया झाली स्वप्न देखणी 
बघ दोघांचे घरकुल अपुले  
निशिगंधाची बाग सोबती 

अर्धी मिटली, अर्धी उघडी 
खिडकी मजसी दिसे तेवढी 
अनुरागाच्या मंजुळ ताना 
कर्णफुलासम कानी येती 

या स्वप्नातच जीव भरावा 
कैफ असा हा नित्य उरावा 
अशीच व्हावी संगमरवरी 
अर्धोन्मीलित अपुली नाती 

एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. एकूणच बहुतेक स्वररचना या "गीतधर्मी" या शब्दाला जागतात. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. अर्थात या व्यतिरिक्त देखील या संगीतकाराची आणखी वैशिष्ट्ये सांगता येतील. याचा परिणाम असा झाला, प्रस्तुत गाणे  हे मराठी चित्रपट गीतांच्या यादीत अढळपद पटकावून बसले. 


No comments:

Post a Comment