Wednesday 30 January 2019

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी

ललित संगीतातील शब्दकळेबाबत एक आरोप नेहमी केला जातो, या रचनेत "कविता" नसते तर नीटसपणे, आखीव-रेखीव आणि मुख्य म्हणजे स्वराकाराला प्राधान्य देऊन कविता "रचावी" लागते. आता ललित संगीताचा आकृतिबंध नीटसपणे न्याहाळला तर या आविष्कारात सुरांना महत्व मिळणे, अनाहूतपणे का होईना पण मान्यच करावे लागते. अर्थात या आविष्कारातून शब्द हा घटक वगळला तर हाताशी जे येते त्याला फक्त "धून" असेच म्हणता येईल तेंव्हा शब्द हा तर अत्यावश्यक घटक असतो. प्रश्न असा पडतो, असे असताना, या आविष्कारात शब्दरचना करणाऱ्याला नेहमीच खालची पायरी का दाखवली जाते? शब्दरचना साधी, सुभग आणि प्रासादात्मक असावी ,ही मूळ मागणी असते आणि खरोखरच तशी साधी, सरळ शब्दरचना करणे साधे, सोपे आहे का? कविता ही नेहमीच उस्फुर्त असावी, असे मांडले जाते पण प्रत्येकवेळेस अशी उस्फूर्तता कवीच्या मनात येऊ शकते का? तशी नसेल तर लगेच त्या रचनेला "कृत्रिम" असे लेबल लावणे कितपत योग्य आहे? मुळात उस्फूर्तता अशी ठामपणे सिद्ध करता येते का? 
"सहज सख्या एकटाच येई सांजवेळी" हे आजचे गीत ऐकताना वरील प्रश्न आपल्याला पडू शकतात. कवी सूर्यकांत खांडेकर, हे नाव कितीजणांना माहीत असेल, शंकाच आहे. मुळातले प्राध्यापक पण कविता करणे हा छंद म्हणूनच त्यांनी जोपासला आणि त्यातूनच हे अजरामर गाणे निर्माण झाले. मी मघाशी म्हटले तसे या गीताचा, कविता म्हणून विचार करायला गेल्यास, पहिल्या अंतऱ्यातील पहिलीच ओळ, "हिरवळीत गीत गात, सांजरंगी न्हात न्हात" वाचताना शेवटाला "न्हात" या शब्दाची द्विरुक्ती झाली आहे. आता द्विरुक्ती झाल्याने आशयात काहीही फरक पडत नाही. समजा "न्हात" शब्द एकदाच लिहिला असता आणि दुसरा शब्द म्हणून वेगळा दोनच अक्षरी शब्द लिहिला असता तरीही "न्हात" शब्दातून जे व्यक्त झाले, ते द्विरुक्तीने अधिक खोल व्यक्त झाले का? तर नक्कीच नाही. गीत लिहिताना अशी तडजोड करावी लागते पण व्दिरुक्ती झाली म्हणून कवितेचा आशय आणि घाट, यावर परिणाम झाला का?  तसे तर काहीही झाले नाही. मग या शब्दरचनेचा कविता म्हणून आस्वाद घेणे सहज शक्य आहे. माझे हेच म्हणणे आहे, केवळ गीत झाले म्हणून कविता खालावली, असे होत नसते. 
कविता वाचताना आपण सहज समजून घेऊ शकतो, एका नवथर तरुणीच्या मनातील विभ्रम आणि भावना, यांवर कविता लिहिलेली आहे. आता ही कविता लिहिली तो काळ डोळ्यासमोर आणला तर मग आशयाची प्रचिती घेणे सोपे जाईल. प्रिंयकाराला भेटण्याचे निमंत्रण देत असतानाच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. कविता म्हणून फार श्रेष्ठ वगैरे नक्कीच नाही पण शब्दरचनेचा, स्वररचनेच्या दृष्टीने आस्वाद घ्यायचे ठरवले तर मग सूर्यकांत खांडेकरांची करामत ओळखता येते. ललित संगीतात, काही बाबी अवश्यमेव पाळायलाच लागतात, योग्य जागी शब्द संपणे, तसेच अचूक जागी खटका घेता येणे इत्यादी. शब्दरचनेतूनच स्वरलयीचा अनुभव घेता येणे, ही ललित संगीताची फार मोठी गरज असते आणि इथेच बहुतेक रसिक अक्षम्य दुर्लक्ष करतात. 

"सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरुखाली 

संगीतकार श्रीनिवास खळे यांची स्वररचना आहे. कवितेतील संयत प्रणयाचा भाव ओळखून त्यांनी या कवितेला चाल अर्पिली आहे. प्रणयाचा मुग्ध भाव आणि सायंकालीन वेळ याची सुयोग्य सांगड रचनेतून घातलेली दिसते. हे तर खळ्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल आणि याचे मुख्य कारण म्हणजे "आधी शब्द, मग चाल" या पंथाचे इमानदार पाईक. आणखी एक विधान नक्की करता येईल. खळे काका हे अतिशय चांगल्या अर्थाने कारागीर होते. "कारागीर" या शब्दाने दचकण्याचे काहीही कारण नाही. ललित संगीताचा आकृतिबंध तपासला तर हेच ध्यानात येईल एका बाजूने उस्फूर्तता असते पण दुसऱ्या बाजूने त्या उस्फुर्ततेला बांध घालून, आविष्काराला निश्चित अर्थ प्राप्त करून द्यायचा असतो. खळे काकांचे काम इथे अतिशय वेधक झाले आहे. काही अपवादात्मक चाली वगळता त्यांच्या चाली या बहुतांशी मंद्र किंवा मध्य सप्तकात वावरत असतात आणि काहीशा संथ असतात. परिणामी गाण्याची चाल ऐकताना सोबतच कवितेचा आस्वाद घेणे शक्य होते. 

हिरवळीत गीत गात, सांजरंगी न्हात न्हात 
स्वप्नांना रंगवूया, लेवूनीया लाली 

बासरी आणि मेंडोलिनच्या सुरांनी सुरु झालेला मुखड्याचा वाद्यमेळ हाच सगळ्या रचनेभर वापरला आहे. अर्थात तालवाद्य म्हणून तबला. मघाशी मी खळ्यांना कारागीर म्हटले ते इथे दाखवता येईल. मुखड्याची चाल आणि अंतऱ्याची उठावण, दोन्ही जागा संपूर्ण वेगळ्या आहेत. पहिला अंतरा किंचित वरच्या सप्तकात घेतला आहे आणि चाल तिथेच किंचित क्षण रेंगाळत ठेवली आहे पण "स्वप्नांना रंगवूया" गाताना परत मुखड्याच्या स्वरांशी जुळवून घेतले आहे. हे जे जुळवून घेणे घेणे असते, तिथेच सर्जनशीलता दिसून येते. 

अधरी जे अडत असे, सांगीन तुज गुज असे 
प्रीत ही प्रीतिविण, अजूनही अबोली 

इथे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. कडव्यांच्या पहिल्या ओळीची शब्दसंख्या आणि दुसऱ्या ओळीची शब्दसंख्या विषम आहे. खरेतर संगीतरचना करायला हा अवघड भाग म्हणता येईल परंतु इथेच खळे काका वेगळे ठरतात. शब्दांना न्याय देण्यासाठी त्यांनी चालीला "वळवून" घेतले. दुसरा अंतरा जरी मंद्र सप्तकात सुरु होत असला तरी मुखड्याशी काहीसा फटकून बांधला आहे. शब्द देखील असेच आहेत - "अधरी जे अडत असे" हे काहीसे अंतर्मुख आणि हितगुज बोलल्यासारखे शब्द आहेत आणि त्यादृष्टीने या ओळीची ऐकावी. 

तृणपुष्पे मोहक ती, उमलतील एकांती 
चांदण्यात उमलवूया, प्रीत भावभोळी"

शेवटचा अंतरा देखील आधीच्या स्वररचनेपासून वेगळा बांधला आहे. अर्थात वेगळेपण जपताना, शाब्दिक औचित्याकडे कधीही दुर्लक्ष होत नसते. शेवटची ओळ - "चांदण्यात उमलवूया, प्रीत भावभोळी" या ओळीत दर्शवल्याप्रमाणेच "प्रीत भावभोळी" अशीच शब्दकळा आहे. एका बाजूने सोपी चाल आहे पण गायला घेतल्यावर त्याच चालीची अवघडता लक्षात येते. खळे काकांबाबत आणखी विधान करायचे झाल्यास, त्यांच्या सर्जनशीलतेला संगीत आणि काव्य, यांची देवाणघेवाण अधिक भावणारी आहे. त्याशिवाय, आपल्या सांगीत रचनेत निदान थोडीतरी "बौद्धिकता" असणे  इष्ट, यावर त्यांची निष्ठा होती. अर्थात चित्रपट सृष्टीत काय किंवा खाजगी रचना करण्यासाठी अशा कलाकारांना भाराभार संधी मिळत नसतात. 


No comments:

Post a Comment