Wednesday 2 January 2019

जिवलगा, राहिले दूर घर माझे

हुरहुरणारी संध्याकाळ असावी, आसमंतात काळोखी दिसायला लागावी पण तरीही किरणे आपले अस्तित्व क्षीणपणे दर्शवित असावीत. दिवसभराच्या क्लांत श्रमाने मनात विक्लान्त शांतीची आस असावी. हळूहळू आसपासचे वृक्ष आणि त्यांच्या फांद्या,  पसरणाऱ्या काळोखात विरायला लागावेत. मनात कुठेतरी मिलनाची आस असावी पण मिलन होईलच का? या प्रश्नाचा पिंगा घोंगावत असावा. काहीशी द्विधा मनस्थिती झालेली असावी आणि दूरवरून "जिवलगा!! राहिले दूर घर माझे" अशी आर्त, व्याकुळ करणारी पुकार कानी यावी. कानावर आलेल्या सुरांनी लगोलग मनातली हुरहूर अधिक खोल व्हावी. 
हे गाणेच असे आहे, ऐकताना मनाची घालमेल होते, अस्वस्थता वाढते आणि तरीही गाणे संपताना तृप्तीची भावना मनावर पसरते. "श्रीगौरी" सारख्या काहीशा अनवट रागावर आधारित चाल आहे. या गाण्याबाबत असे ऐकायला मिळाले आहे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांकडे त्यांच्या बाबांची - दीनानाथ मंगेशकरांची "हुं जो गयी" अशी मारवाडी भाषिक चीज होती आणि ती चीज, कवियत्री शांताबाई शेळक्यांना ऐकवली. अर्थात शांताबाईंना स्वररचना फार आवडली आणि त्या स्वररचनेवर एखादे भावगीत बसवावे, असा आग्रह धरला गेला. ललित संगीतात बरेचवेळा "आधी शब्द, मग चाल" अशी परंपरागत पद्धत अनुसरली जाते पण काहीवेळा उलट्या पद्धतीने देखील अजरामर गाणी निर्माण होतात आणि हे गाणे अशाच उलट्या पद्धतीने झाले आहे. वास्तविक दोन्ही पद्धतीत तत्वत: काहीही फरक नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिकांच्या दृष्टीने काहीही फरक पडत नाही. रसिकांच्या समोर जेंव्हा गाणे येते तेंव्हा कुठली पद्धत स्वीकारली आहे, याला तसा काहीही अर्थ नसतो. समोर आलेले गाणे, ही वस्तुस्थिती असते. त्यादृष्टीने शांताबाई या खरोखरच सव्यासाची कवियत्री म्हणायला हवे. कारकिर्दीत त्यांनी दोन्ही पद्धतींवर अभूतपूर्व असे प्रभुत्व प्राप्त केले होते. मुळात, त्यांना एक कवियत्री म्हणून शब्दांशी खेळणे, शब्दांचे नेमके वजन ओळखून आपल्या रचनेत अंतर्भाव करणे आणि मुख्य म्हणजे चालीचा "मीटर" कसा आहे, याचे अचूक भान होते, परिणामी त्यांच्या शब्दरचना अतिशय बांधेसूद अशा झाल्या. अर्थात, याला अपवाद म्हणू काही शब्दरचना दाखवता येतील पण मग असे अपवादस्वरूप सगळ्याचा कवी/कवियत्री सप्रमाण दाखवता येतील. 
"जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, 
पाऊल  थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे". 
या अस्ताईच्या ओळी बघूया. दार्शनिक स्वरूपातच असे दिसते, शब्दसंख्या सप्रमाण नाही पण शांताबाईंनी चाल आणि त्याची लय लक्षात घेतली. ललित संगीतातील शब्दरचना कशी बांधीव असणे आवश्यक असते, ते बघा. पहिल्याच ओळीत "रे" अक्षर आहे. वास्तविक या नुसत्या अक्षरातून कसलीच भावना दृग्गोचर होत नाही परंतु इथे "रे" अक्षराची सांगड ही आधीच्या "राहिले" आणि नंतरच्या "दूर" या शब्दांशी घातली आणि लगेच त्या अक्षराला वेगळी जाणीव लाभली. 
चाल अगदी तंतोतंतपणे चीजेवर बांधलेली आहे आणि हे ती मुळातली चीज ऐकली की लगेच ध्यानात येईल. आता इथे एक प्रश्न उद्भवतो. एखादे गाणे तंतोतंतपणे रागदारी चीजेवर बांधले तर त्यात संगीतकाराची सर्जनशीलता दिसते का? वास्तविक गाण्याचा मुखडा हा नेहमी सृजनत्वाचा नमुना म्हणून मानला जातो आणि बहुतेक रचनाकारांचे हेच म्हणणे असते, "गाण्याचा मुखडा बांधण्यात खरे कौशल्य असते, पुढे तर सगळे बांधकामच असते". अर्थात यात थोडा अतिरेक बाजूला ठेवला तरी बऱ्याच प्रमाणात तथ्य आहे, हे मान्यच करायला हवे. असे जर मान्य केले तर मग इथे संगीतकाराची सर्जनशीलता कुठल्या दर्जाची? हा प्रश्न विचारात घ्यावा लागतो पण थोडा वेगळा विचार केला तर पूर्वीपासून अशी पद्धत चालू आहे. मराठी रंगभूमीवर तर पूर्वीपासून, रागदारीतील चीज हाताशी घ्यायची आणि पद्याची चाल बांधायची!! याला डॉ. अशोक रानड्यांनी "Tune Selector" असे नाव दिले आहे. अर्थात रानड्यांनी संगीत रंगभूमीबाबत विधान केले आहे. तेंव्हा सर्जनशीलता अशा एकांगी विचाराने लक्षात घेणे चूक ठरू शकते आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. 
आता रागदारी चीजेवरच आधारित चाल आहे म्हटल्यावर "गायकी"ला आवाहन करणे अत्यावश्यक. आताशा भोसल्यांचा गळा अशा गाण्यांत खुलून येतो. इथे तर जवळपास ६,७ मिनिटांचे सलग गाणे आहे. पारंपरिक अस्थायी-अंतरा आणि  वाद्यमेळ, ही पद्धत इथे त्यागलेली आहे. त्यामुळे पहिल्या सुरांपासून अथकपणे गायन चालते - मध्येच सरगम आहे. काही टीकाकारांनी या सरगमवर टीका केली आहे परंतु गाण्याच्या रंजकतेत ही सरगम भर घालते, हे नक्की. हा विषय फार मोठ्या लेखाचा विषय असल्याने इथेच थांबतो. आशाबाईंनी अतिशय मनापासून हे गाणे गायले आहे, काही हरकती, काही ठिकाणच्या ताना अतिशय गुंतागुंतीच्या असल्या तरी आशाबाईंनी अतिशय स्वच्छ, नितळपणे घेतल्या आणि या गाण्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणून निर्देश करावाच लागेल. 
"किर्र्र बोलते घनवनराई 
सांज सभोती दाटून येई 
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे". 
ध्रुवपदातील संकल्पना, पुढील कडव्यात अधिक विस्ताराने आणि खोल मांडली आहे. दुसऱ्या ओळीत, "सभोती" असा शब्द घेतला आहे, वास्तविक प्रचलित शब्द "सभोवती" असा आहे पण एक अक्षर अधिक वाढले तर लयीचा गोंधळ उडू शकतो. ललित संगीतात, काव्यरचना करताना हे असे भान ठेवावेच लागते. दुसरा विशेष असा आहे - "किर्र्र" हा शब्द सरळ  अवघड आहे परंतु आशाबाईंचे कौतुक असे, त्यांनी हाच शब्द सुरांतून घेताना, "त्याच" वजनाने घेतला आहे. एखादा गद्य, रोखठोक शब्द त्याच अंगाने स्वरांतून घेणे, हे सहजशक्य नसते. गळ्यावर तुमचा तितकाच ताबा असणे आवश्यक असते. हा शब्द गाताना,  किंचित उंचावलेला स्वर पण "र" चे जोडाक्षर घेऊन, कवियत्रीने निर्देशिलेली भावना त्याच तोलामोलाने घेणे, हे फार अवघड असते. 
मुळात, ललित संगीतात इतकी मोठी स्वररचना अभावानेच ऐकायला मिळते. ललित संगीताचे रसिक देखील, गाणे ३,४ मिनिटांत आटोपले पाहिजे, याच विचाराचे असतात. या गाण्यात तंबोरा (पार्श्वभागी सतत वाजत आहे) आणि सुरवातीला स्वरमंडळ वगळल्यास, फक्त तबला (तालवाद्य म्हणून) साथीला आहे. परंतु गंमत सगळी गाण्याच्या चालीत, चालीच्या मांडणीत आणि गायनात आहे आणि तिथेच गाण्याचे अवघडलेपण देखील आहे. 
आता इतक्या अप्रतिम गाण्यात काहीच कमतरता नाही का? रचना संपूर्ण निर्दोष आहे का? तसे नक्कीच नाही. गाण्यात २,३ वेळा "जिवलगा" हा शब्द "जिव" "लगा" असा तोडलेला आहे. लय तशी आहे, असे एक कारण देता येईल पण शब्दानुरूप लयीला वळवून घेता येऊ शकते. आणखी एक, "वनवासी" शब्द घेताना "वन" आणि "वासी" मध्ये अकारण हरकत घेतली आहे. तशी हरकत आवश्यक आहे का? हा प्रश्न मनात येतो. हा प्रश्न येतो कारण ही शब्दप्रधान गायकी आहे अन्यथा ही स्वररचना निव्वळ अतुलनीय अशीच आहे. 

No comments:

Post a Comment