Tuesday, 4 June 2019

केतकीच्या बनी तिथे

मराठी भावगीत क्षेत्रात काही वर्षांपूर्वी थोडी मरगळ आली होती. स्वररचनांचे काहीसे एकसाची बंध होत होते तसेच वाद्यमेळ आणि एकूणच "ठेवण" यात काहीशी शिथिलता आली होती. अशाच वेळी संगीतकार अशोक पत्की यांनी "केतकीच्या बनी तिथे" ही रचना सादर केली आणि भावगीतांच्या मर्यादित विश्वात थोडे कुतूहल जागे झाले. "एकदाच यावे सखया" ही रेकॉर्ड प्रसिद्धीस आली आणि या संगीतकाराचे नाव प्रसिद्ध झाले. पारंपरिक वाद्यमेळाला छेद देत त्यांनी भावगीत संगीताच्या मर्यादित क्षेत्रात आपली बैठक मांडली. तसे थोडे तांत्रिक दृष्टीने बघायला गेल्यास, या गाण्याची चाल बागेश्री रागावर आधारित आहे परंतु रागाचे पारंपरिक स्वरूप बाजूला सारून कवितेतील आशयात जो प्रणयी भाव दिसतो, तोच मध्यवर्ती ठेऊन चाल बांधली आहे. ललित संगीताची हीच तर खरी खासियत असते, एका बाजूने पारंपरिक धाटणी ठेवायची पण दुसऱ्या बाजूने आधुनिक वाद्यमेळाच्या साहाय्याने स्वररचनेत नावीन्य आणायचे. गाण्याचा ताल बघितला तर समेची मात्रा "मोर" या शब्दावर आहे. ढोबळपणे रचना ऐकली तर सम लक्षात येणार नाही आणि याचे कारण तालाचे आधुनिक स्वरूप. ताल तबला वाद्यानेच  समेची मात्र घेताना आणखी side rhythm वाद्यांचा ध्वनी मिसळल्याने, केरवा ताल सहज सापडत नाही. 

केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर 
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर 

कवी अशोकजी परांजपे आहेत. मुळातले लोकसंगीताला वाहून घेतलेले परंतु संधी मिळताच संगीतकार अशोक पत्कींबरोबर काही भावगीते केली. तशा काहीशा ढोबळ प्रतिमा परंतु शब्दरचना करताना, चालीचा "मीटर" समजून घेऊन त्या अंदाजानेच अक्षर आणि शब्द लिहिणे, हे नेहमीच कौशल्याचे काम असते आणि इथे गाणे ऐकताना, कुठेही फारशी शब्दांची "मोडतोड" आढळत नाही. अर्थात कविता म्हणून वाचताना काही शब्द खटकतात. शेवटचा अंतरा वाचताना, "भावगीत बोलले" असे आहेत. सर्वसाधारणपणे भावगीत "गायले" जाते, "बोलले" जाते नाही परंतु बहुदा आधीची ओळ "डोलले" या शब्दाने संपवली असल्याने, त्या शब्दाला "जोड" देण्यासाठी ही तडजोड केली असावी.  विशेषतः ध्रुवपद वाचताना, पहिली ओळ "मोर" तर दुसरी ओळ "धीर" या शब्दांनी संपवली आहे. असे  असताना,समजा "बोलले" शब्दाऐवजी "गायले" हे शब्द खटकले नसते आणि पुन्हा होण्याचा "मीटर" व्यवस्थित सांभाळला गेला असता.  
पांपणीत साचले, अंतरात रंगले 
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले 
ओठांवरी भिजला ग आसावला सूर

संगीतकार म्हणून अशोक पत्कींची ही रचना, एक ठळक ओळख म्हणून मान्यता पावली आहे. वाद्यमेळाची आधुनिक बांधणी करून त्यांनी मराठी भावगीतात निश्चितच नावीन्य आणले. एका बाजूने आधुनिकता आणायची परंतु तरीही परंपरेकडे लक्ष ठेवायचे, असा थोडा दृष्टिकोन दिसतो. सर्वसाधारणपणे संगीतकार म्हटला की सगळ्यात आधी गाण्याचा मुखडा आकर्षक करणे आणि एकूणच चालीचा ढाचा गुणगुणता आली पाहिजे, इथे लक्ष ठेवतो. सुरवात जरी बागेश्री रागाच्या सुरावटीने होत असली तरी हळूहळू राग बाजूला सारला जातो आणि चालीचे स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित होते. संगीतकाराची सर्जनशीलता तपासताना बरेचवेळा हा मुद्दा ग्राह्य धरणे महत्वाचे ठरते. वास्तविक बागेश्री राग साधारणपणे विरही भावनेकडे जास्त झुकतो परंतु तरीही अशा रागातून एखादी अशी "फ्रेझ" मिळते तिथे रागाची भिन्न प्रकृती दिसते. या गाण्याबाबत बहुदा असेच झाले असावे. यात एक मुद्दा असा येतो, या दूर सरकण्यातून गुणवत्तापूर्ण म्हणण्यासारखे या संगीतकाराने काय साधले? याचे मूल्यमापन आवश्यक आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास, गाण्यातील कवितेचा आशय आणि सादरीकरण यात एकात्मता निश्चित आढळते ललित संगीतात तुम्ही चाल कुठून घेता यापेक्षा चाल बांधताना तिचे अनलंकृत सौंदर्य किती वेगळेपणाने समोर आणता याला अधिक महत्व असते. 

भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले 
धुक्यातून कुणी आज भावगीत बोलले 
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले 
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले 
झाडावरी दिसला ग भारला चकोर 

गायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या मधुर गायनाने या चालीचे सौंदर्य निश्चितच वाढवले आहे. लताबाई हिंदीत चित्रपटांत गर्क झाल्या आणि सुमन कल्याणपूर यांना मराठी भावगीताचे क्षेत्र उपलब्ध झाले, असे म्हणता येईल. इथे मी लताबाईंचा उल्लेख अशासाठीच केला कारण आवाजाची जात, पोत आणि एकूणच गायकी, या संदर्भात या दोघीच्या गायकीत बरेच ठिकाणी साद्ध्यर्म्य आढळते. या गाण्यात देखील संपूर्ण गायन जरा बारकाईने ऐकले तर माझ्या या विधानाची प्रचिती येऊ शकते. स्वच्छ आणि निकोप आवाज, कुठेही अडखळणे नाही तसेच गाताना अंत्यअक्षरावर अर्ध तान घेऊन, स्वर किंचित लांबवायचा  तसेच शब्दातील भावार्थ ध्यानात घेऊन विशिष्ट शब्दांवर थोडे "वजन" देऊन, तोच शब्दार्थ अधिक खोल भावव्याप्तीने दर्शवायचा इत्यादी खास वैशिष्ट्ये सांगता येतील. 



Sunday, 2 June 2019

विजय वैद्य

प्रचंड, अस्ताव्यस्त पठारावरून उन्हाच्या रखरखाटात काहिली सहन करत चालत असताना, लांबून कुठूनतरी पाण्याचा आवाज यावा आणि अचानक आपण अति विशाल प्रपातासमोर उभे राहावे त्याप्रमाणे मला विजय नेहमी भासतो. हा पोरगा कधी स्वस्थ बसला आहे, असे होतंच नाही. सतत काहींना काहीतरी बडबड चाललेली असते, कधी एखादा किस्सा (काहीवेळा फालतू विनोद देखील असतो पण नेहमीच दर्जेदार विनोद कुठून आणायचे?) कधी एखादा प्रसंग किंवा शाळेतील गमतीजमती सांगत असतो पण सतत बोलत असतो!! 
लहानखोर शरीरयष्टी, गोरा चेहरा यामुळे प्रथमक्षणी विजय साधा, भोळा वाटतो पण तोंड उघडले की खरा विजय दिसायला लागतो. मैफिल रंगवावी तर विजयनेच आणि याची प्रत्यय इथल्या सगळ्या मित्रांना नेहमी आलेला आहे. एखादाच किस्सा सांगेल पण त्यात थोडी स्वतःची भर टाकणार, चेहऱ्यावरचे भाव तसे ठेवणार (हा नाटकी विजय!!) पण छोटासाच किस्सा रंगवून सांगणार आणि उपस्थितांची मनापासूनची दाद मिळवणार. इतकी वर्षे त्याने हेच केले असावे बहुदा - यात कधी वेळ मिळाला की घरातला पारंपरिक बिझिनेस बघणार!! 
विजय गिरगावात, अगदी नेमके सांगायचे झाल्यास, वामन हरी पेठेच्या बाजूच्या इमारतीत राहत होता तेंव्हा पासूनची माझी ओळख. मला वाटत, आम्ही कधीतरी एकाच तुकडीत देखील होतो. मी काय किंवा विजय काय, नेहमीच back bencher!! चिकित्सक शाळेने आमहाला पहिल्या बेंचवर बसायची संधीच दिली नाही आणि आम्ही कधी गंभीरपणे घेतली देखील नाही. कधीतरी अभ्यास करायचा असतो, याची आठवण व्हायची आमचा शाळेच्या पुस्तकांना हात लागायचा. गणित (विषयाइतकेच "गणित") सायन्स हे विषय आम्ही कायम हुशार विद्यार्थ्यांना पुढे येण्यासाठी त्यांच्या पुढे ठेवत असू. किंबहुना वर्गात मागे बसून टिंगल टवाळ्या करणे यासाठीच शाळेत यायचे असते, यावर आमची ठाम समजूत!! त्यातून पिरियड्स "बंक" करणे, हा आमचा "जन्मसिद्ध" हक्क!! वास्तविक चिकित्सक शाळा ही मुलांची/मुलींची  कारकीर्द घडवणारी शाळा म्हणून अखिल मुंबईत प्रसिद्ध पण ही प्रसिद्धी आमच्या गावी देखील नव्हती.
विजय तसा श्रीमंत म्हणावा अशा कुटुंबात जन्माला आला आणि अर्थात पुढे त्याने ती श्रीमंती अधिक वाढवली. माझे घर त्याच्या घराच्या जवळच असल्याने, मी त्याच्या घरी बरेचवेळा जात असे. शाळेत सुद्धा एकत्र जात असू. शाळेत जाताना पण यांच्या टिवल्या बावल्या चालायच्या. त्यातून शाळेच्या वाटेवर एखादा देखणा चेहरा दिसला की साहेब एकदम फॉर्मात यायचे. शिटी वाजवणे ही त्याला जन्मजात देणगी मिळालेली आहे. मला त्याचा एक गुण फार आवडतो, कितीही चेष्टा केली तरी त्या चेष्टेचे स्वरूप तात्कालिक असायचे, आजही तसेच असते आणि चेष्टा करताना समोरचा कधीही दुखावला जाणार नाही, याची तो योग्य ती काळजी घेतो. 
पुढे मात्र संबंध कमी झाले कारण तो सिद्धार्थ कॉलेजला गेला आणि मी हिंदुजा मध्ये. मला वाटते, चित्रा त्याला सिद्धार्थ कॉलेजमध्येच भेटली असणार. त्यानंतर काही वर्षांनी आमचा एक सामायिक मित्र, अरुण अगरवाल सोबत विजय भेटायचा. अरुण, मी आणि काही मित्र त्याकाळी क्रिकेट खेळत असू आणि हा अरुणबरोबर प्रेक्षक म्हणून यायचा. अरुणकडून पुढे कळले, विजय लग्न करून पार्ल्याला स्थिरावला. विजय हनुमान रोड वर राहतो - या एकाच गोष्टीने त्याची रसिक दृष्टी सिद्ध व्हावी आणि जे पार्ल्यातील हनुमान रोड ओळखत असतील त्यांनाच यातली खोच कळेल. अर्थात लग्न झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या संसारात रमतो. किंबहुना, या मधल्या काळात, विजयचा मोठा भाऊ, प्रकाश माझ्या चांगला ओळखीचा झाला - अजूनही आहे. 
मध्ये बरीच वर्षे आमचा कसलाच संपर्क राहिला नव्हता कारण मी परदेशी राहात होतो. नंतर गृपची पहिली पिकनिक निघाली आणि विजय पुन्हा संपर्कात आला. पिकनिकला जाण्यासाठी आम्ही सगळे गायवाडीच्या नाक्यावर जमत होतो आणि एकदम ही स्वारी उगवली आणि माझ्या पाठीमागून मिठी घातली - मधली सगळी वर्षे गळून गेली!! साथीला आला तरी विजय जवळपास तसाच दिसतो. जवळपास अशासाठी कारण वय केस कमी झाले, काही ठिकाणी रुपेरी झाले अन्यथा बाह्यात्कारी दर्शनात विजयमध्ये कसलाही फरक पडलेला नव्हता. त्या रात्री तोच विजय, त्याच ढंगात आपल्यासमोर पेश झाला. वय वाढल्याच्या तशा कसल्याच खुणा दिसत नव्हत्या किंबहुना त्याच षोडशा उत्साहात नाचत होता, हे विशेष. अगदी बसमध्ये देखील तोच बडबड्या स्वभाव दिसत होता, तशाच शिट्या वाजवत होता. सुदैवाने त्याची बायको जरी मला अजून प्रत्यक्ष भेटली नसली तरी आम्ही फेसबुकवर नेहमी संपर्कात असतो. विजय चित्रे रंगवत नाही, हे चित्राचे भाग्यच म्हणायला हवे!! 
एक नक्की, विजय सतत हसतमुख असतो म्हणजे त्याला कसलेच प्रश्न नसतील असे नव्हे पण तसल्या प्रश्नांना कानामागे टाकून मित्रांना सामोरे जाण्याचे कौशल्य निव्वळ वादातीत आहे आणि अशी देणगी फारच विरळ आढळते आणि अशा विरळ देणगीदारात माझा हा मित्र येतो, हे माझे भाग्य म्हणायला हवे. 

सुनील जोशी

मी जेंव्हा इथल्या मित्रांवर लेखमाला लिहायचे ठरवले तेंव्हा अग्रभागी नाव सुनीलचेच होते. एकतर आमची अर्ध्या चड्डीत असल्यापासूनची ओळख असल्याने, कुठल्या आठवणी निवडायच्या हाच प्रश्न होता आणि दुसरा भाग म्हणजे मलाच असे वाटले, पहिल्याच लेखात सगळी एनर्जी संपली तर पुढील लेखांत उसनेपण उघड होणार त्यापेक्षा इतरांवर लिहायला सुरवात करावी, कसे वाटत आहे हे बघावे आणि सुनीलवर लिहायला घ्यावे. सुनील आणि माझा प्रवास अगदी समांतर रेषेत सुरु झाला, तसे बघितले तर वयाने मी त्याच्यापेक्षा आठवडाभर मोठा आहे!! एकाच शाळेत असल्याने रोजच्या रोज भेटणे व्हायचे, घरोब्याचे संबंध असल्याने एकमेकांच्या घरी वारंवार जाणे असायचे. सुनील "मेहेंदळे बिल्डिंग" मध्ये राहायचा - त्या बिल्डिंगला मोठी गच्ची होती (आता टॉवर झाला आहे) आणि त्या गच्चीत मी कितीतरी वेळा झोपायला गेल्याचे स्पष्टपणे आठवत आहे अर्थात सुनील देखील माझ्या घरी झोपायला आल्याचे आठवत आहे. सुनीलचा "मेहेंदळे बिल्डिंग" - "कुलूपवाडी (बोरिवली पूर्व)" आणि आता बोरिवली स्टेशन जवळील आलिशान फ्लॅट हा सगळा प्रवास मी व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. आज सुनील अतिशय हुशार म्हणून गणला जातो आणि तसा तो आहेच, पण केवळ हुशार म्हणणे अर्धवट आहे. अथक प्रयत्न, असामान्य जिद्द आणि never say die वृत्ती याचा परिपाक म्हणजे सुनीलचे academic यश आहे आणि या प्रवासाचा मी एक डोळस मित्र आहे. सतत अभ्यास करणे, आणि त्यासाठी अथक मेहनत घेणे, हे त्याच्या यशाचे खरे गमक आहे. मला त्याच्या सतत अभ्यास करण्याचे वृत्तीचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. 
सुनीलने जेंव्हा चार्टर्ड अकाउंटन्सी करायचे ठरवले तेंव्हा माझ्या मावशीच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आर्टिकल्स करायला सुरवात केली. तिथे माझा तसा संबंध नसताना देखील, ६ जणांचा गृप झाला जो आजतागायत एकत्र आहे. आज या गृपला ४० वर्षे होऊन गेली, तसे आम्ही काही सतत एकमेकांना भेटत नाही, फोन देखील सटीसामासी होत नाही तरीही एकमेकांना धरून आहोत. 
अर्थात इतका दीर्घ संबंध असल्यावर आठवणींना अजिबात तोटा नाही तरी काही ठराविक टप्पे इथे लिहिणार आहे. सुनीलचा एक दोष म्हणजे तो घडाघडा बोलत नाही, त्याच्या हसण्याला अजिबात आवाज नाही किंवा चेष्टा करायची झाली एका मर्यादित स्तरावर करणार. सतत वरिष्ठ स्तरावर काम करीत असल्याने त्याच्याकडे अनेक किस्से आहेत. लग्न व्हायच्या आधी आमचा गृप सातत्याने भेटत असे आणि तेंव्हा सुनीलकडून अनेक अफलातून किस्से ऐकायला मिळायचे पण सांगायची पद्धत अल्पाक्षरी आणि अत्यंत थंड वृत्तीने सांगायची जणू काही त्यात त्याचा काही सहभाग नाही!! 
सुनील जरी थोडा अबोल असला तरी माझा अनुभव असा आहे जिथे गरज आहे तिथे सुनील हमखास उभा राहणार. २००१ मध्ये मी बराच आजारी पडलो होतो, हॉस्पिटलमध्ये काही महिने काढावे लागले होते. जेंव्हा माझ्यावर ट्रीटमेंट सुरु व्हायची होती तेंव्हा अचानक सुनील, एका रविवारी सकाळी बोरिवलीवरून गिरगावात फक्त मला भेटायला आला होता आणि आम्ही दोघे आमच्या टेरेसमध्ये झोपाळ्यावर बसून तास भर बोलत होतो. गमतीचा आणि महत्वाचा भाग म्हणजे त्या संभाषणात माझ्या आजारपणाचा साधा उल्लेख देखील नव्हता. इतर अनेक विषय काढून त्याने मला गुंगवले होते आणि हे मला, तो त्याच्या घरी परतल्यावर ध्यानात आले. वास्तविक मी फार विमनस्क परिस्थितीत होतो आणि सुनीलने माझी मनस्थिती ओळखली होती. पुढे मला ऑपरेशन करायची गरज पडली. ऑपरेशन करायच्या आदल्या संध्याकाळी सुनील मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता. वास्तविक हॉस्पिटल कितीही सुसज्ज असले तरी ती काही मनमोकळ्या गप्पा मारायची जागा नसते. त्यातून माझ्यावरील शस्त्रक्रिया जवळपास ८ तास चालणार होती. हे लक्षात  ठेऊन,सुनील माझ्या जवळ बसला होता, काहीच बोलत नव्हता पण धीर देत होता. मला वाटतं, त्याला देखील धक्का बसलेला असणार. आम्ही या भेटीचा उल्लेख कधीही केला नाही, त्याची गरजच पडली नाही. आज हा लेख लिहिताना या आठवणी वर आल्या, इतकेच. सुनील काहीसा अबोल आहे पण तरीही वेगळा आहे, तो असा. 
आमची लग्ने जवळपास एकाच वेळी झाली. कल्पनाला मी आता चांगला ओळखतो अर्थात मला देखील कल्पना आहे, तिने माझे "पाणी" जोखले असणार. मी परदेशी असताना सुनीलला पूर्वी बरीच पत्रे लिहिली (त्याने ती वाचली, हा त्याच्या सहनशीलतेचा नमुना) पण त्याने कधीही एक ओळ लिहिल्याचे आठवत नाही. इथे मला सगळे "पंडितजी" म्हणतात - खरे तर हा मला टोमणा आहे पण सुनील खरा "पंडित" आहे. हे मी पूर्ण विचारांती लिहीत आहे. आज सुनील आयुष्यात चांगला स्थिरस्थावर झालेला आहे. त्याचा मुलगा - निखिल तर बाप से बेटा सवाई आहे. निखिल जेंव्हा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पहिल्या फटक्यात पास झाला तेंव्हा सुनीलचा मला फोन आला. आवाजात मुलाचा अभिमान डोकावत होता आणि का डोकावु नये. ही परीक्षा म्हणजे  China Wall आहे. 
 असो,आणखी किती लिहायचे - म्हणजे लिहायचे झाल्यास दीर्घ निबंध होईल आणि त्याला आत्मचरित्राचा वास येईल आणि मी तसे कधीच करणार नाही. त्यापेक्षा अबोलपणे मिळणारी साथ मला अधिक महत्वाची आणि उबदार वाटते. 

Saturday, 1 June 2019

संजीव तांबे

संजीवची आणि माझी भेट होण्याआधी, त्याचे वडील माझ्या घरी आले होते. त्याचे वडील राम तांबे आणि माझी आई, एकाच कॉलेजमध्ये - सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यांची ओळख ही इतकी जुनी. त्यातून राम तांब्याचे भाऊ आमच्या घराला लागून असलेल्या हेमराज वाडीत राहायचे. कधीतरी भावाकडे तेंव्हा आले असणार आणि मग आलोच आहोत इथे तर मग आमच्याकडे जाऊया, या उद्देशाने आले. तसे पाहिले तर संजीव आणि मी, शाळेत पहिलीपासून एकत्र होतो. शाळेत आमची तशी बऱ्यापैकी ओळख होती. तेंव्हा संजीव झावबा वाडीत राहायचा पण लवकरच नाना चौकातील शास्त्री हॉल इथे सगळे कुटुंब गेले. अर्थात संपर्क तसा कमी झाला. पुढे माझा धाकटा भाऊ राजू आणि संजीवचा धाकटा भाऊ सुनील यांची बरेच वर्षे घनिष्ट मैत्री झाली होती आणि सुनील मात्र आमच्या घरी वारंवार येत असे. संजीव तेंव्हा अरुण चितळे आणि बावडेकर यांच्या सोबत बराच काळ एकत्रित होता. तसा संजीव, हेमराजवाडीत त्याच्या चुलत भावाकडे - मंदारकडे यायचा. तेंव्हा आम्ही सगळेच एकत्र खेळत असू आणि आमच्यात संजीव खेळायला यायचा.
शाळेतील एक अंधूक आठवण. शाळेच्या शेवटच्या मजल्यावरील गच्चीत, नार्वेकर बाईंनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेच्या रिहर्सल आठवत आहेत. एकांकिका बहुदा ऐतिहासिक असावी कारण त्यात गीता महाराणी आणि संजीव राजसेवक भूमिकेत होते. 
अशीच एका एकांकिकेची धुसर आठवण आली. पाडगांवकर बाईंनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेत रविंद्र गायतोंडे आणि डायमा (हा पुढे कुठे गेला?) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.गमतीचा भाग म्हणजे, दोघांच्या भूमिका त्यांच्या पिंडाच्या पूर्ण विरूद्ध होत्या!! 
काळाच्या भरधाव वेगात देखील काही क्षण स्मृतीत राहिले ज्यांना अक्षय चिरंजीवित्व लाभले अन्यथा जिथे दिवसांची फोलपटे होतात तिथे क्षणांचा काय पाड लागणार?
पुढे मला वाटतं , राम तांबे नगर पालिकेच्या निवडणुकीला आमच्या भागातून उभे राहिले होते. तेंव्हा माझा खऱ्याअर्थी तांबे कुटुंबाच्या समाजवादी विचारसरणीशी थोडाफार परिचय झाला. खरतर सगळे तांबे कुटुंबीय हे समाजवादी पक्षाशी बांधलेले आहेत. त्याचे इतर चुलत भाऊ म्हणजे विजय, राजीव इत्यादी याच विचारसरशी बांधील आहेत. त्यावेळेस, मी थोड्या प्रमाणात शिवसेनेशी जवळीक राखून होतो कारण आमचा शेजारी विलास अवचट. पुढे मात्र राजकारणाबाबत माझा बराच भ्रमनिरास झाला आणि मी राजकारण या विषयाला कायमची तिलांजली दिली. संजीव शास्त्री हॉल इथे राहायला गेल्यावर मात्र संबंध विरळ झाले. त्यानंतर एक घनिष्ट आठवण अशी आठवते, संजीवचे लग्न झाले तेंव्हा सुनीलच्या आग्रहाने आम्ही सगळे त्याच्या लग्नाला गेल्याचे आठवत आहे. पण लग्नातली भेट ही काही  स्मरणात राहणारी नव्हे. पुढे आमचा संबंध जवळपास तुटल्यासारखाच झाला. 
एकतर हे कुटुंब कट्टर समाजवादी आणि मी राजकारणापासून चार हात दूर. अर्थात जरी राजकीय मते न पटणारी असली तरी मित्र म्हणून संजीव नक्कीच जीवाभावाचा आहे. त्याला कवितेची सुंदर जाण आहे. संगीताचा शौक आहे. सर्वात मुख्य म्हणजे समंजस आहे. एक, दोन प्रसंग आहेत जेंव्हा त्याची चेष्टा करण्याच्या भरात मी मैत्रीची पातळी ओलांडली!! फार जास्त नाही पण जीभ घसरायला नको होती. बहुदा संजीवच्या देखील लक्षात आले असावे. मला तर लगेच लक्षात आले. अशाचवेळी संजीवने पूर्ण दुर्लक्ष केले. किंबहुना पुढे अनेकवेळा फोनवर बोलताना किंचीत देखील उल्लेख केला नाही. मला याचे फार अप्रूप वाटते. नात्याची वीण उसवत असताना पुन्हा घट्ट बसविणे, हीच मैत्रीची एक कसोटी असू शकते. 
अनेक मतभेदांच्या पलिकडे गेलेली ही मैत्री, याचेच मला खरे कौतूक वाटते.

Friday, 31 May 2019

नीला लाड

नीलाची आणि माझी ओळख म्हटले तर शाळेपासून आहे. माझा धाकटा भाऊ, राजू शाळेच्या नाटकांतून नेहमी कामे करीत असे आणि त्या गृपमध्ये नीला होती. नीलाचे नाटकातील काम मात्र आता आठवत नाही (तिला तरी आठवत असेल काय?) त्यानिमित्ताने नीला घरी यायला लागली. खरतर नीला आमच्यापेक्षा माझ्या आई-वडिलांशीच जास्त गप्पा मारायची. मी त्यावेळी "बाळू" होतो. मुलींशी बोलायचे!! बापरे!! या पार्श्वभूमीवर मी घरी आलेल्या नीलाबरोबर जेव्हड्यास तेव्हडे बोलत असे किंबहुना घरात ज्या गप्पा चालत, त्यात माझा सहभाग नाममात्र असे. त्यावेळी तिच्या भावाशी - सतीशबरोबर माझे मैत्री जमली होती (आजही आहे ). त्यातून शाळेपासून नीलाचा थोडा वचक असायचा. N.C.C.मधून दिल्ली च्या २६ जानेवारीच्या परेडसाठी झालेली निवड आणि त्यामुळे तिचा शाळेत तसा  दबदबा होता - हे इथले सगळे मान्य करतील.आमच्या घरी मात्र नीला फार वेगळी आणि मोकळी असायची ( हे मी आज लिहीत आहे, हे ध्यानात घ्यावे!!) त्यानिमित्ताने आम्ही दोन्ही कुटुंबे त्यावेळी जवळ आलो होतो. नीलाच्या आईबरोबर मात्र मी खूप बोलत असे. तिच्या आंबेवाडीतील घरी मी असंख्यवेळा गेलो असेन. 
पुढे नीला विल्सन कॉलेजमध्ये गेली आणि एकदा सतीशने बातमी आणली - आज विल्सन जिमखान्यावर नीलाची क्रिकेट मॅच आहे!! नीला क्रिकेट देखील खेळते, ही मला "बातमीच" होती. लक्षात घ्या, त्यावेळी Ladies Cricket आजच्यासारखे प्रकाशात आलेले नव्हते. सामन्याचा तपशील आता आठवत नाही. त्यामुळे एकूणच माझ्या मनातील प्रतिमा एकदम वेगळीच झाली. N.C.C. मधील पराक्रम, नाटकात कामे आणि आता क्रिकेट!! ही बया आयुष्यात काय, काय करते याचाच अचंबा होत होता. याच सुमारास तिचे, आताच्या भाषेत लिहायचे झाल्यास  अनिलबरोबर "डेटिंग" सुरु झाले होते ("अनिल" नावाची माणसे किती सहिष्णू, सर्वसमावेशक आणि शांत प्रवृत्तीची असतात, हे इथे काही जणांना नक्कीच मान्य व्हावे!!)  आणि मला वाटतं ग्रॅज्युएट होण्याआधीच नीला बोहल्यावर चढली!! तिच्या लग्नाला गेल्याचे आठवत आहे. पुढे नीला वाशीला राहायला गेली आणि माझ्या भेटी तुरळक झाल्या. कधीतरी गिरगावात येणार तेंव्हा तिच्या घरी पहिल्यांदा जाणे, क्रमप्राप्तच होते. 
नंतर मी देखील परदेशी गेलो आणि जरी ओळख असली तरी भेटी संपल्यातच जमा होत्या. सुटीत जेंव्हा मी घरी यायचो तेंव्हा कशीतरी चर्चगेट स्टेशनसमोरील तिच्या ऑफिसमध्ये भेटायला जात असे. तेंव्हा नीला आजच्यासारखी "वजनदार" झालेली नव्हती. सहज भेट मिळत असे!! मला वाटते, २००३/४ पर्यंत ती या ऑफिसमध्ये होती. अर्थात मी चुकत असेन कारण मी तिला भेटणार ते मी सुटीवर येणार तेंव्हा. पुढे समजले, नोकरीनिमित्ताने ती सिंगापूरला गेली. पुढील वाटचालीतील ही एक महत्वाची पाऊलखुण होती, हे आता समजते. आता ती देखील परदेशी म्हटल्यावर भेट तर दूरच राहिली, निदानपक्षी फोनवरचे बोलणे देखील दुरापास्त झाले. पुढे सतीशबरोबर बोलताना कळले, नीला आता दिल्लीला फार वरच्या पोस्टवर आलेली आहे. तेंव्हा मात्र एकाबाजूने अभिमान तर दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थी दबदबा जाणवला. आपली एक  मैत्रीण,सरकारी खात्यात  पदावर कार्यरत आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब होती/आहे. त्यातून दिल्ली तो  बहोत दूर है, हे मनावर बिंबलेले!! पुढे शाळेचा गृप झाला आणि तिचा फोन नंबर मिळाला. अर्थात एकमेकांच्या कुटुंबांची चौकशी झाली. तिचे नेहमी म्हणणे असायचे ( आता मुंबईत बदली झाली म्हणून "असायचे" हा  शब्द) मी दिल्लीला यावे. इथे मला मुंबई बाहेर पडणे जमत नव्हते तिथे दिल्ली काय जमणार!! 
नीलाचे एका बाबतीत कौतुक करावेसे वाटते, इतक्या वरच्या पदावर काम करीत असताना देखील नीलाचे पाय जमिनीवरच राहिले. मी तर तिला कितीवेळा अडनिड्या वेळी फोन करीत असतो तरी ती फोन उचलते आणि "अनिल, मी मीटिंगमध्ये आहे, काही काम आहे का? नसल्यास नंतर फोन करते" इतपत बोलते आणि खरतर आश्चर्य वाटू नये पण वाटते, पण त्याच दिवशी संध्याकाळी माझा फोन खणखणतो!! मोबाईलवर "नीला लाड" हे नाव झळकते!! बोलायला ती अजूनही तशीच आहे, माझी चेष्टा स्वीकारण्याइतपत समंजस आहे आणि जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा माझे पाय खेचण्याची तयारी देखील दाखवते. इथे आता गृपवर माझे "पंडितजी" हे नाव मला बहुदा कायमचे चिकटलेले आहे. खरतर माझे बारसे झाले तेंव्हा माझ्या आई-वडिलांनी माझे नाव "अनिल" ठेवले आहे , हे आता नव्याने सांगायची वेळ आली आहे. असो, मला तसे कुणी गंभीरपणे स्वीकारतच नाही त्याला कोण काय करणार आणि अशी पाळी आणण्यामध्ये नीलाची भूमिका मध्यवर्ती आहे!! एका बाजूने नीलाचा अभिमान वाटतो आणि तरीही फोनवर बोलताना,  " काय ग नीले" असे बोलण्याचा आनंद घेता येतो. आणखी एक विशेष सांगायचं  राहिला,फोनवर बोलताना नीला आपला मानमरातब सहजपणे बाजूला ठेवते आणि मोठ्या आवाजात हसते. हे जरा नवलच आहे म्हणा पण म्हणूनच ती "नीला लाड" आहे. फक्त गृपतर्फे एकच इच्छा, दिल्लीला होती तेंव्हा गृपमधील कार्यक्रमांना हजर राहणे अशक्य होते पण आता "माहेरी" आली आहेस तर कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला "दर्शन" द्यावे!!

Thursday, 30 May 2019

अलका देसाई

आपला गृप स्थिरस्थावर होण्याच्या काळात, सुरवातीला बरीचशी नावे अनोळखी होती. बरे, फोटो बघून ओळखणे फारच दुरापास्त होते. मी ज्यांना प्रत्यक्ष ओळखत होतो, त्यांचे चेहरे देखील बरेच बदललेले होते तिथे अनोळखी चेहऱ्यांबद्दल काय बोलायचे. अशा वेळेस, मी संजीव तांबेला फोन केला होता आणि त्याच्याकडून काही ओळखी निघतात का? अशी पृच्छा केली. त्यावेळी माझ्या कानावर अलकाचे नाव आले आणि सर्वात गमतीचा भाग म्हणजे इयत्ता पहिलीपासून, संजीव, मी, अलका, नेत्रा अशी काही नावे चिकित्सक शाळेत एकत्र होतो. अनिल थक्क!! इतकी जुनी ओळख असून चेहरा अजिबात परिचित वाटत नव्हता, किंबहुना कसलीच ओळखीची खूण डोळ्यासमोर येत नव्हती. नेत्रामध्ये केसाचा भाग सोडला तर फारसा फरक पडला नव्हता आणि नेत्रा तेंव्हा शाळेतील  खेळांमध्ये नेहमीच सहभागी असायची म्हणून ओळख होती. अर्थात पुढे पिकनिकमध्ये प्रत्यक्ष भेट झाली पण त्याआधी फोनवर बोलाचाली सुरु झाल्या होत्या. 
एक इथे मान्यच करायला हवे, सुरवातीला मी अलकाशी थोडा जपूनच बोलत होतो आणि ती देखील जशास तसे बोलत असायची. बरेचवेळा तिची खिल्ली उडवावी,असे मनात यायचे पण "प्रथमाग्रासे मक्षिकापात:" नको म्हणून तोंड आवरायचो. असे बरेच दिवस चालू होते आणि आमची संवादाची गाडी जेमतेम उपचारापुरतीच चालायची. एकदा मी प्राचीशी फोनवर बोलताना अलकाचा विषय काढला आणि तिच्याशी बोलताना, औपचारिकपणा फार आड येतो असे बोललो. हे ऐकल्यावर "जाऊबाई" लगेच तिची बाजू घेऊन, बोलायला लागल्या!! अलका फार मजेशीर बोलते, हसरी आहे वगैरे मुक्ताफळे बोलताना उधळली. आता एक पुणेकर दुसऱ्या पुणेकराची बाजू घेणारच - हा सांस्कृतिक प्रभाव आहे म्हणा!! खरतर पिकनिकमध्ये देखील मी अलकाशी फार बोलल्याचे आठवत नाही त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुढे असाच कधीतरी फोन केल्यावर मी थोडा खवचटपणा केला आणि पलीकडून सणसणीत उत्तर आले!! अनिलचा श्वास हलका झाला. मनात आले, पक्की "पुणेकरीण" दिसत आहे. एकीचा अनुभव घेतच होतो आणि तिच्या जोडीला दुसरी खमकी पुणेकरीण आली. 
एक मात्र नक्की, आजही अलका माझ्याबरोबर पहिली पासून चिकित्सकमध्ये होती, हे चित्र काही पुरेसे स्पष्ट झालेले नाही. मला नेहमी जशास तसे, ही प्रवृत्ती भावते आणि मी ते सुख उपभोगतो. उगीच मी बरा, तू बरा, असले शिळोप्याच्या शिळे बोलणे फारसे पचनी पडत नाही. दोन ठोश्याना निदान एक तरी ठोसा द्यावा, ही माझी वृत्ती. हळूहळू "मूळा-मुठेचे" पाणी जाणवायला लागले. अर्थात गेली जवळपास ३०, ३५ वर्षे पुण्याला राहिल्यावर वाण नाही तरी गुण लागणारच म्हणा. त्यातून कुणी खमक्या पुणेकर भेटला की मला मनापासून आनंद होतो. इथे तर दोन दोन पुणेकर!! पुणेकरांचे तिरकस बोलणे अलकाच्या बोलण्यात नेहमी येते कदाचित मी देखील तसाच बोलतो म्हणून अलका बोलत असेल. तशी ती खळखळून हसणाऱ्यातली नाही. फोनवर हसली तर कान  देऊन ऐकायला लागते!! 
मला तिचा काही बाबतीत फार हेवा वाटतो. अलकाला कधीही फोन करा, एकतर तिच्या घरी कुणीतरी जेवायला आलेले असते किंवा ती तरी कुणाकडे जेवायला जात असते!! सतत दुसऱ्याला जेवायला घालण्यात तिला विलक्षण आनंद मिळतो अर्थात अस्मादिकांचा यात अजून नंबर लागलेला नाही कारण जेंव्हा केंव्हा मी पुण्याला जातो तेंव्हा ही कुठेतरी जेवणाच्या कार्यक्रमात गुंतलेली असते किंवा घरात पाहुणे आलेले असतात. गेले वर्षभर माझ्या पुण्याच्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्या आहेत पण प्रत्येक फेरीत, फोन केल्यावर बाईसाहेबांच्या घरी कुणी आलेले नाही, असे झालेच नाही!! एकदा मी तिला फोनवर बोललो देखील, "पुणेकरआगत स्वागत करताना हात राखून ठेवतात का?" माझा स्वभाव बघता तिने सावध व्हायला पाहिजे पण गफलतीने बाईसाहेब बोलून गेल्या - मी कधी रे हात राखून वागते? मला हेच उत्तर अपेक्षित होते आणि  "मग,एका खमक्या मुंबईकराला अजूनही आमंत्रण मिळत नाही, याचा नेमका कसा अर्थ घ्यायचा?" इथे बाईसाहेब थोड्या वरमल्या. खरे तर हा मला आश्चर्याचा धक्काच होता. अस्सल पुणेकर आणि इतक्या लगेच गप्प!! मग लक्षात आले, अलका पुणेकर असली तरी जन्मस्थान मुंबई!! मातीचा म्हणून काही गुण असतोच की. वास्तविक ती स्वतःला पुणेकरच म्हणवून घेते - म्हणवून घेणारच, सासर पुण्याचे म्हटल्यावर कुठेतरी लळा लागणारच!! एक नक्की, पुणेकर आणि मुंबईकर अशी तुलना करणे आणि एकमेकांना टोमणे मारणे, हा आमच्या संभाषणातील निखळ आनंद आहे. इतक्या लोकांचे स्वागत करणारी अलका, तिच्या घरी मात्र मी एकदाच गेलो होतो पण जेवायला नाही!! 
आज साठीला आलेली असताना देखील अलकाची फिरायला जाण्याची इच्छा मात्र जबरदस्त आहे. सारखे कुठेतरी फिरायला जात असते. तशा आमच्या साध्या विषयांवर देखील गप्पा होतात पण हे उद्मेखूनपणे सांगावे लागते कारण गप्पांची अखेर कुठल्यातरी टोमण्यानेच होते. चैनच पडत नाही. आमचा तसा एकमेकांना दर आठवड्याला फोन होतो मुख्य म्हणजे पुणेकर असून ती मला फोन करते!! बाब थोडी अविश्वसनीय आहे पण विश्वास ठेवावा अशी आहे - जन्मस्थान मुंबई असल्याचा हा पुरावा म्हणायचा का? वरती मी उल्लेख केला तसे तिला पण मी शाळेतला अनिल असा आठवत नाही ( हे मात्र फार छान !!) आणखी एक बाब, मी लिहिलेल्या बहुतेक लेखांवर ती प्रतिक्रिया देत असते!! हा मैत्रीचा खरा गैरफायदा आहे पण ती उत्तर पाठवते. इतर पुणेकरांनी काहीतरी शिकण्यासारखे आहे अर्थात मुंबईकरांना देखील हेच वाक्य लागू होते म्हणा. अलका गात नाही (हे भाग्य म्हणायचे का?) पण तिला बरीच गाणी पाठ आहेत आणि ती जेंव्हा मला उत्तर पाठवते त्यावरून ध्यानात येते. 
 असो, आजही समजा माझा फोन झाला नाही तर "का फोन केला नाहीस?' असा फोन देखील तिचा येतो. कधी माझी तब्येत बिघडली असेल तर तिच्या बोलण्यात काळजी उमटते. 
मैत्रीच्या नात्यात या पेक्षा अधिक काही अपेक्षा ठेवू नये.  

Wednesday, 29 May 2019

सतीश करंदीकर

वास्तविक एकेकाळी म्हणजे १९८४ ते १९८९ पर्यंत मी आणि सतीश एकाच कंपनीत कामाला होतो - त्यावेळी कंपनीचे नाव B.S.E.S. Limited असे होते. पुढे मी १९८९साली कंपनी सोडली. सतीश मात्र अजूनही त्याचा कंपनीत कामाला आहे. सांगायचं मुद्दा असा, या ५ वर्षांत, एकाच कंपनीत असून आमची एकदाही भेट झाली नव्हती. सतीश तेंव्हा अंधेरीला E.D.P. Department मध्ये होता आणि मी सांताक्रूझला Accounts Dxepartment मध्ये होतो. मला अंधेरीला जायची वेळच कधी नाही. खरतर, सतीश या कंपनीत आहे, हेच मुळी मला २,३ वर्षांनंतर कळले पण भेटीचा योग्य नव्हता, हेच खरे. पुढे मी परदेशी नोकरीसाठी गेलो आणि भारतातले संबंध फारच विरळ व्हायला लागले. 
२००१ मध्ये मी प्रकृती कारणास्तव भारतात आलो आणि जवळपास २ वर्षे राहिलो होतो. सुरवातीला प्रकृतीचेच काही धड नव्हते म्हणून घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. काही महिन्यांनी मी घराबाहेर पडायला लागलो आणि एकदा मी ट्रेनने कुठेतरी जात असताना, सतीश मला त्याच डब्यात भेटला. त्याला आता ही भेट आठवत नसेल - कशाला आठवेल?  अशा भेटी सामान्य लोकंच लक्षात ठेवतात!! असो, तेंव्हा आमचा विषय हा मिलिंद देसाई (आमचा सामायिक मित्र) हाच होता. त्यावेळी मिलिंद  देखील एका त्रासातून जात होता. माझ्या आजाराविषयी मीच बोलायला फारसा उत्सुक नव्हतो त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. 
पुढे मी परत परदेशी गेलो आणि होते ते संबंध देखील गोठले!! त्यानंतर एकदा सुटीवर भारतात आलो होतो, बहुदा २००६ मध्ये आणि काही कामानिमित्ताने गिरगावात फिरत असताना, अचानक सतीश भेटला आणि काही जुजबी विषयावर बोलणे झाले आणि आम्ही दोघेही आपल्या रस्त्याला लागलो. आमची खरी ओळख झाली ती, आपला ग्रुप जुळायला लागला तेंव्हा. एकतर गिरगावात तसे जुने मित्र फारसे कुणी राहिले नव्हते आणि मी त्यासुमारास कायमचा भारतात परतलो होतो. त्यामुळे नित्यनेमाने भेटी व्हायला लागल्या. त्यातून सतीशला भारतीय संगीताची अमाप आवड, हा मुद्दा आम्हाला अधिक जवळ यायला कारणीभूत झाला. अगदी प्रांजळपणे मांडायचे झाल्यास, सतीशने जितके "गाणे" (भारतीय संगीत) ऐकले आहे, त्याच्या निम्म्याने देखील मी ऐकलेले नाही. आजही दरवर्षी डिसेम्बरमध्ये, पंढरीला वारी करावी त्याप्रमाणे हा पुण्याला सवाई गंधर्व महोत्सवाला हजेरी लावतो. मैफिलींना जाण्याबाबतची त्याची चिकाटी वाखाणण्यासारखीच आहे. मी देखील संगीताच्या मैफिलींना जातो पण माझे प्रमाण त्यामानाने अल्पसे आहे. बरेचवेळा सतीश मला फोन करतो आणि एखाद्या कार्यक्रमाची माहिती देतो, माझे तिकीट बुक करतो आणि माझे मैफिलींना जाणे होते. 
किंबहुना, काही  बाबतीत त्याचा उत्साह निव्वळ अफलातून आहे. एक उदाहरण देतो, २०१५ साली मी एका वृत्तपत्रात भारतीय शास्त्रीय संगीतावर साप्ताहिक कॉलम लिहायला लागलो (आणि ते वृत्तपत्र दीड वर्षांत बंद पडले!!). वास्तविक पाहता, माझे लेख म्हणजे काही मूलभूत मुद्द्यांना हात घालून, तांत्रिक दृष्ट्या अभ्यासपूर्ण नव्हते (तसे लिहायला मला आजही आवडेल पण ....) पण आपला एक शाळामित्र एखाद्या पेपरमध्ये लिहीत आहे, याचा त्याला खरा आनंद झाला होता. प्रत्येक आठवड्याला मला न चुकता फोन करायचा आणि कुठल्या रागावर लिहीत आहेस? अशी चौकशी करायचा. आजही मी आणखी एका वृत्तपत्रात साप्ताहिक कॉलम लिहीत आहे आणि आजही त्याचा चौकशीसाठी फोन येतो. त्यानिमित्ताने आमच्या संगीत या विषयावर भरपूर गप्पा होतात, मला काही नवीन सापडते आणि त्याचा मी लेखांत उपयोग करतो. तसे बघितले तर सतीशला शास्त्रात फारसे गम्य नाही पण त्याला सुरेल, कणसूर आणि बेसूर स्वरांची जाण आहे. बरेचवेळा मला लिहायला प्रवृत्त करतो - मी लिहीत असतो पण मी खूप आळशी आहे आणि ते जाणून सतीश मला टोचत असतो. आज माझ्या ब्लॉगवर ३०० पेक्षा अधिक लेख लिहून झाले आहेत म्हणजे जवळपास १,३०० छापील पाने, त्यातील जवळपास १५० लेख तरी संगीत या विषयावर आहेत. या सगळ्या व्यापात सतीशचा सहभाग बराच आहे. 
तसे बघितले तर आमच्यात मतभेदाचे विषय भरपूर आहेत. एकतर सतीश कट्टर आस्तिक आहे आणि मी तितकाच कट्टर नास्तिक आहे पण सतीश चुकूनही मला, त्याची भूमिका समजावत नाही कारण त्यालाही माहीत आहे, मी सहजपणे मत बदलणारा नाही. अर्थात हा विषय आमच्यात फारसा कधी येत नाही. दुसरा मतभेद म्हणजे सतीश कडवट म्हणावा असा हिंदुत्ववादी आहे आणि मला, मी हिंदू आहे, तितके पुरेसे आहे. अर्थात याचा परिणाम आमच्या राजकीय भूमिकेवर पडतो. खरतर मला राजकारणात फारसे स्वारस्य नाही, मला राजकीय मते आहेत पण त्याचा बडिवार माजवावा असे वाटत नाही. काही अपवाद प्रसंगी आमचे वाद झाले आहेत पण आम्ही समजूतदारपणे बाजूला सारले आहेत. 
सध्या आमचा "रागदर्शन" म्हणून संगीताचा गृप तयार झाला आहे आणि आमचे आतापर्यंत ४,५ कार्यक्रम जाहीररीत्या झाले आहेत. असा गृप जमवायचा, असे कार्यक्रम करायचे, ही सगळी धडपड सतीशचीच. त्यानेच सगळ्या कलाकारांना गोळा  केले, माझ्या मागे लागून कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी लिहून घेतले, किंबहुना अजूनपर्यंत तरी हाच परिपाठ चालू आहे. माझा मुळातला स्वभाव  बघता, असली धडपड करणे माझ्या स्वभावात बसत नाही. पण सतीश सगळी धडपड आनंदाने करीत असतो. माझ्याकडून लिहवून घेत असतो आणि मी देखील मैत्रीखातर त्याचे म्हणणे गुमानपणे ऐकतो कारण लिहिणे हा माझा श्वास आहे. सतीशची आणि माझी मैत्री अनेक मतभेदांसहित अशी तरून राहिली आहे.