Monday, 20 May 2019

श्रीनिवास खळे

मराठीतील नावाजलेल्या मोजक्याच संगीतकारांमध्ये श्रीनिवास खळ्यांचे नाव आवर्जूनपणे घ्यावे  लागते. निव्वळ लोकप्रियता म्हणून बघायला गेल्यास, खळेकाका कधीही प्रचंड लोकप्रिय नव्हते, त्यांची काही गाणी खूप गाजली, आजही रसिक मनावर गारुड घालून आहेत पण खळेकाका कधीही प्रसिद्धी, लोकप्रियता असल्या गोष्टींवर अवलंबून राहिले नाहीत. हातात कविता आली की त्याला चाल लावायला घ्यायची हा नेम त्यांनी आयुष्यभर पाळला. त्यादृष्टीने "आधी शब्द मग चाल" या पंथाचे आग्रही संगीतकार होते आणि या आग्रहापायी त्यांनी आयुष्यात अनेक संधी नाकारल्या देखील होत्या. त्यांचे नेहमीचे म्हणणे असे - चाल ही कवितेला लावायची असते आणि त्यामुळे हातात शब्दरचना येणे अत्यावश्यक. आयुष्यात त्यांनी अशी काही तत्वे पाळली होती आणि त्यापायी खळेकाकांना आर्थिक आपदांना तोंड द्यावे लागले होते. परंतु खळेकाका निष्ठावंत आणि तत्वांना कायम धरून बसणारे होते, त्यातील एक आग्रह म्हणजे गाण्यातील "जागा" त्यांना जशा हव्या आहेत तशाच, गायकांकडून काढून घ्यायच्या. तिथे त्यांनी अपवाद वगळता तडजोड स्वीकारली नव्हती. 
थोडा विचार केला तर ४,५ चित्रपट, २,३ नाटके आणि २००, २५० भावगीते इतपतच सांगीतिक संसार असे म्हणायला लागेल. अर्थात ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचे उदाहरण ठरत नाही. खळेकाका यांचा उल्लेख करताना "बुद्धीवादी संगीतकार" असा बरेचवेळा केला जातो. आता "बुद्धीवादी" शब्द वापरणे  सोपे असले तरी या संज्ञेचा अर्थ लावणे तितके सोपे नक्कीच नाही. काही  उदाहरणे बघू. " या चिमण्यांनो परत फिरा" , "अगा करुणाकरा", "सहज सख्या एकटाच येई सांजवेळी" ही आणि  काही गाणी ऐकली तर "पुरिया धनाश्री" किंवा "तोडी" रागाच्या सावलीतील स्वररचना आहेत. खळेकाका यशस्वीपणे त्या रागांची छाया निर्माण करतात, विस्तार न करता देखील गायिकेला अनपेक्षित तरीही शोभाकर अशा सुरावटी देतात, वाद्यांना आपले अस्तित्व जाणवून देता यावे इतपतच लयीची गती ठेवतात आणि हे सर्व करताना मर्यादित तारतेची स्वरपट्टी ठेवतात (मध्येच एखादा अंतरा तार सप्तकात जातो पण मुखड्याकडे वळताना, चालीचा ताण कमी केला जातो) बरे या गाण्यांत तालाचे चलन, विशेषतः: "या चिमण्यांनो परत फिरा" या गाण्यात तालाचे चलन असे ठेवले आहे की ठाय लयीत असून तिकडे लक्ष द्यावेच लागते. तसेच शब्दांच्या मध्ये आणि अंताला खळेकाकांनी काही चमकदार हरकती दिल्या आहेत. या शिवाय काही ठिकाणी शब्द एका निश्चित स्वरावर न संपवता, फक्त निर्देश केला आहे. खळेकाकांच्या स्वररचना बुध्दिवादी असतात त्या इथे.
आणखी एक खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, हातात आलेली कविता, विशिष्ट दर्जा राखून असेल तरच त्यांनी संगीतबद्ध करायला घेतल्या. मंगेश पाडगावकरांच्या कविता त्यांनी अधिकाधिक स्वरबद्ध केल्या, हा निव्वळ योगायोग नव्हे. कवितेतील आशयाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आणि तो जो दडलेला आशय असतो, त्याला स्वरांतून खोलवर असे मूर्त स्वरूप देण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे एकूण वाटचाल ही अमूर्ताकडून मूर्त स्वरुपाकडे अशीच झाली. 
खळेकाकांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, साधे, मधुर तसे पाहता परिचयाचे बारकाव्यांनी भरलेले आणि स्वरविस्तार शक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. "कमोदिनी काय जाणे" किंवा "शुक्रतारा मंद वारा" तसेच "पहिलीच भेट झाली" ही गाणी वानगीदाखल अभ्यासायला हवीत. कुणालाही या गीताचे मुखडे सहज लक्षात येतील आणि गुणगुणावेसे वाटतील. किंबहुना एक मुद्दा इथे ठामपणे मांडावासा वाटतो. कुठल्याही स्वररचनेची मूलभूत ओळख ही नेहमीच मुखडा कसा बांधला आहे, या कौशल्यावर असतो. खळेकाकांच्या गाण्यातील मुखडे या दृष्टीने ऐकण्यासारखे आहेत. मुखडे ऐकताना, आपण सहज गाऊ शकतो असा आभास निर्माण करतात परंतु बरेचवेळा त्यापुढील अंतरे वेगळ्याच स्वरांवर येतात आणि बारकाईने ऐकणारा काही वेळा नि:स्तब्ध होतो. अंतरा संपताना तो कशाप्रकारे मुखड्याशी जोडला गेला आहे, हे वैशिष्ट्य खळेकाकांच्या बहुतेक गाण्यात आढळून येते. 
तालाच्या बाबतीत त्यांनी नेहमीच ताल हे पारंपरिक पद्धतीने वापरले आहेत. याचा परिणाम असा झाला, त्यांची चाल कधीही शब्दांवर कुरघोडी करीत नाही. इथे शब्द वावरतो तो भाषिक आणि सांगीत ध्वनीचा समूह म्हणून. त्यामुळे खळेकाकांना अतिशय चांगल्या अर्थाने "कारागीर" असेही म्हणता येईल. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हे गाणे वानगीदाखल बघूया. गीताला आधार किंवा पाया हा "गौडसारंग" रागाचा आहे. गाण्याचा मुखडा फक्त ५ स्वरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून आपल्या समोर येतो. चालीची सामान बांधणी पुढे केली आहे पण तशी करताना, थोडे तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास, पुढील अंतरा मध्यम स्वराला षड्ज मानून पुढे येतो. याचा परिणाम असा होतो, गीताच्या भावनेचा उत्कर्ष आणि तिचे स्फटिकीभवन अप्रतिम होते. आपण सुरावटीची पुनरावृत्ती ऐकत नसून एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची प्रतीती येते. 
त्यांच्या सर्जनशीलतेला संगीत आणि काव्य यांच्या दरम्यानची देवाण-घेवाण हीच अधिक मानवत असे. आपल्या सांगीत भांडवलात फार लोकांनी भागीदारी मागावी, हे पटत नसे. या शिवाय आपल्या सांगीत विधानात थोडातरी बौद्धिक अंश असावा, यावर त्यांची निष्ठा होती. ललित संगीतात असे काही करण्यासाठी भाराभार संधी मिळत नसतात आणि याचेच प्रतिबिंब त्याच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीवर  पडले,असे म्हणता येते. 

Tuesday, 14 May 2019

एकनाथ सोलकर

१९७१ ची इंग्लंडमधील भारत/इंग्लंड मधील ओव्हल मैदानावरील सामना. चंद्रशेखरचा "जादुई" हात करामत दाखवत होता आणि इंग्लंडचे  जवळपास हतबल झाले होते. खेळपट्टीवर इंग्लंडचा विकेटकीपर अॅलन नॉट आला होता - इंग्लंडचे शेवटचे आशास्थान, विशेषतः अॅलन नॉटची unorthodox फलंदाजी नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी असायची, सामना एकहाती फिरवण्याची किमया साधून जाणारी अलौकिक कला अॅलन नॉटकडे होती. चंद्रशेखरने आपली गोलंदाजी सुरु केली, एक चेंडू अचानक उसळला आणि गरकन फिरला (हे तर चंद्रशेखरचे खास वैशिष्ट्य - चेंडूचा वेग आणि अचानक फिरणारी फिरकी)!! अॅलन नॉट किंचित भांबावला आणि त्याच्या ग्लोव्हजला चेंडूचा किंचित स्पर्श झाला आणि चेंडू लेग साईडला थोडासा उडाला आणि मैदानावर आश्चर्य घडले. जो झेल केवळ स्वप्नावस्थेत देखील अशक्य वाटत होता, तो झेल फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील सोलकरने जमिनीसमांतर शरीर झोकून झेल पकडला!! प्रेक्षक तर अवाक झालेच परंतु भारतीय संघातील इतर खेळाडू आणि खुद्द अॅलन नॉटचे डोळे विस्फारले. निव्वळ अचाट क्षेत्ररक्षणाचा अलौकिक आविष्कार होता. मुळात हा झेल नव्हताच परंतु एकनाथने त्याचे झेलात रूपांतर केले. नसलेले झेल पकडणे, त्याचे रूपांतर करणे, यामुळे आजही एकनाथ सोलकर हा फॉरवर्ड शॉर्ट लेगचा "बादशहा" समजला जातो. एखाद्या फलंदाजांची किंवा गोलंदाजांची दहशत वाटणे, क्रिकेटमध्ये नेहमीच आढळते परंतु फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर उभा आहे, ही वास्तवता फलंदाजाच्या काळजात धडकी भरवणारी होती. 
सडपातळ बांधा, शेलाटी उंची, अत्यंत लवचिक शरीर आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊनच एकनाथ सोलकर जन्माला आला होता. मंदगती तसेच मध्यमगती गोलंदाजी, कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची मानसिक तयारी आणि खरे सांगायचे तर "फॉरवर्ड शॉर्ट लेग" ही क्षेत्ररक्षणाची जागा त्यानेच जगद्विख्यात केली. अगदी नेमके सांगायचे झाल्यास, क्रिकेट पुस्तकाच्या दृष्टीने सोलकर फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या जागेपेक्षा थोडा १,२ इंच पुढेच उभा राहायचा!! जे प्रत्यक्ष क्रिकेट खेळले आहेत, त्यांना या विधानातील दाहकता समजून घेता येईल. सर्वसाधारणपणे, कुठलाही फलंदाज हा लेगकडे फटाके खेळण्यात वाकबगार असतो आणि तिथेच ही जागा अधिक धोकादायक असते पण सोलकरने याची कधीच पर्वा केली नाही आणि बेडरपणे तिथे उभा राहून, निव्वळ अशक्यप्राय वाटणारे झेल घेऊन, संघाला नेहमीच प्रचंड मोठे योगदान दिले. 
एकनाथच्या शरीरात हाडे आहेत का? असला कौतुकमिश्रित प्रश्न आम्ही मित्र एकमेकांना  विचारत असू. वास्तविक त्याची मध्यमगती गोलंदाजी ही कामचलाऊ अशीच होती पण तरीही त्याने इंग्लंडच्या बॉयकॉटला गोंधळात टाकले. बहुदा इंग्लंडमधील हवामान एकनाथच्या मदतीला येत असणार परंतु सोलकर अप्रतिम मंदगती गोलंदाजी टाकायचा. त्यावेळी भारतीय संघात जगप्रसिद्ध त्रिकुट असल्याने त्याला फार वेळा संधी मिळाली नाही परंतु टाइम्स शिल्ड किंवा रणजी सामन्यातून सोलकर आपल्या मंदगती गोलंदाजीचा दर्जा दाखवून द्यायचा. त्यावेळी टाइम्स शिल्ड मध्ये मफतलाल आणि स्टेट बँक हे संघ अतिशय नावाजलेले संघ होते. मफतलाल मधून सोलकर तर स्टेट बँकेतून वाडेकर खेळायचे आणि त्यांचे द्वंद्व बघणे, आमच्या सारख्या तरुण मुलांना पर्वणी असायची. त्यावेळी, मॅच सुरु होण्याआधी मैदानावर थोडा वेळ नेट प्रॅक्टिस चालायची आणि मी अगदी जवळून ती प्रॅक्टिस बघत असे. एकदा, मफतलाल आणि स्टेट बँक असा सामना सुरु होता. सकाळची नेट प्रॅक्टिस सुरु होती. एकनाथने स्पिन गोलंदाजी सुरु केली. मी नेटच्या पाठीच उभा होतो. फलंदाज कोण होता, ते आता आठवत नाही पण सोलकरने एक चेंडू  टाकताना,मनगट शर्टाच्या मागे लपवून उलटे फिरवले (कसे केले हे आजही मला अगम्यच आहे) आणि चेंडू  डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या दृष्टीने ऑफ स्पिन केला होता, मनगटाची हालचाल तशीच होती पण अखेरच्या क्षणी, त्याने फ्लिपर टाकला ( तो फ्लिपर होता हे नंतर कळले) आणि फलंदाज गोंधळला!! तो कधी बाद झाला, ते त्यालाच कळले नाही. दिसले ते फक्त एकीच्या (त्याला सगळेजण "एकी" या नावानेच हाक मारायचे) चेहऱ्यावरील निर्मळ हास्य. पुढे सामना सुरु झाल्यावर वाडेकर फलंदाजीसाठी आला आणि त्याला एकीने तसाच चेंडू टाकला आणि वाडेकर फसला. स्लिपमध्ये झेल दिला आणि बाद झाला. वास्तविक स्पिन गोलंदाजी खेळण्यात वाडेकर दादा माणूस होता पण सोलकरने त्याला चुटकीसरशी उडवला!! सामना एकहाती मफतलाल संघाला जिंकवून दिला. 
एकी मुंबई संघाचा खऱ्याअर्थी आधारस्तंभ होता. हा खेळाडू कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असायचा. कसोटी सामन्यात एकदा तर सलामीला उतरलेला होता. आत्मविश्वास अंगात ठासून भरलेला होता म्हणूनच हेल्मेट नसलेल्या काळात देखील फॉरवर्ड शॉर्ट लेग सारख्या जागेवर बिनधास्त वावरायचा. चंद्रशेखरच्या अकल्पित गोलंदाजीवर झेल पकडणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. म्हणूनच आजही सोलकर, वाडेकर आणि वेंकट हे स्लिप आणि फॉरवर्ड शॉर्ट लेग मधील असामान्य क्षेत्ररक्षक मानले जातात. (यात विकेटकीपर म्हणून किरमाणीचे नाव घ्यायलाच लागेल) त्यावेळी मुंबई संघात, Caught Solkar Bowled Shivalkar हे वाक्य मुंबईत चलनी  नाण्यासारखे प्रसिद्ध होते. 
एकनाथ सोलकर हा मी पाहिलेला पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याला अथ पासून इथी पर्यंत बघितलेला आहे. त्याकाळी मी, एका क्लबमधून खेळत असे. आठवड्यातील ५ दिवस मी कॉलेज करीत होतो आणि शनिवार/रविवार मी आणि इतरजण, आमच्या घराच्या पाठीमागील ५ मैदानांवर (ग्रॅण्ट, विल्सन, हिंदू, इस्लाम आणि पारसी असे लोकप्रिय जिमखाने आजही आहेत) प्रॅक्टिस करीत असू. बरेचवेळा हिंदू जिमखान्याच्या खेळपट्टीलगत खेळत असू. विशेषतः रविवारी सकाळी सोलकर हिंदू जिमखान्यावर यायचा आणि आमचा खेळ बघत असे. क्वचित कधी एखाद, दुसरा शब्द बोलत असे. वास्तविक आम्ही खेळत असू, तेंव्हा सोलकर निवृत्त झालेला होता पण तरीही इतका मोठा खेळाडू, आमचा खेळ बघत आहे, याचेच अप्रूप आम्हा सगळ्यांना वाटत असे. मी शाळेत  असताना,त्यावेळी क्रिकेट खेळाडूंच्या फोटोंची चिकट वही केली होती.  सोलकरच्या अलौकिक झेलांच्या फोटोंनी ती वही भरलेली होती. त्यावेळी देखील मला फार नवल वाटायचे, हा माणूस असे अशक्यप्राय झेल कसे काय पकडू शकतो? सुनील गावस्करने एकेठिकाणी स्पष्ट लिहिले आहे,  बेदी,प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट यांनी मिळवलेल्या बळींमध्ये सोलकरचा वाटा तितकाच महत्वाचा आहे. नसलेले झेल  पकडून, सोलकरने प्रतिस्पर्धी संघाच्या मनात निव्वळ दहशत बसवली होती. एका क्षेत्ररक्षकाने अशी जरब बसवणारे खेळाडू तसे फार विरळाच असतात, पुढे जॉन्टी ऱ्होड्सने ती परंपरा पुढे चालवली होती. 
सोलकर तसा धडाकेबाज फलंदाज होता परंतु वाडेकर प्रमाणे बहुदा त्याला देखील शतक झळकवायचे म्हणजे दडपण यायचे. नव्वदीपर्यंत हे फलंदाज दादागिरी करायचे पण शतक जवळ आले की "फोबिया"!! मला वाटते, १९७५ च्या मुंबईतील सामन्यात सोलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव शतक झळकावले होते. तो सामना मला आजही आठवत आहे (लॉइडने भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा केला होता) शतक येईपर्यंत सोलकर दिमाखात खेळत होता पण नव्वदीत पोहोचल्यावर स्वारी गडबडायला लागली. अक्षरश: कुंथत त्याने शतक पूर्ण केले. असे असले तरी सोलकर हा सोलकर होता. आजही कुणी अप्रतिम झेल पकडला तर सोलकरची आठवण येते. 
एक प्रसंग आठवत आहे. भारतात वेस्टइंडीज विरुद्ध सामना चालू होता. सोलकर त्यावेळी राखीव खेळाडू म्हणून संघात होता. क्षेत्ररक्षण करताना. काही कारणपरत्वे सोलकर मैदानावर अवतरला आणि त्याला त्याच्या नेहमीच्या जागी - फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे केले. परंतु त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या लॉइडने त्याला हरकत घेतली (अशी हरकत घेता येते, याचाच पत्ता नव्हता, आता नियम बदलला आहे) आणि सोलकरला स्क्वेयर लेगला उभे केले. गमतीचा भाग म्हणजे तिथे देखील सोलकरने जमिनीसमांतर झेप टाकून लॉइडचाच झेल पकडला - लॉइड थक्क. पुढे लॉइडने प्रांजळपणे कबूल केले, सोलकर इथे देखील तितकाच असामान्य क्षेत्ररक्षक असेल याची कल्पना केली नव्हती आणि सोलकरचे मनापासून कौतुक केले. केव्हढा हा मोठा सन्मान म्हणायला हवा. सोलकरने अशी दहशत पसरवली होती . 
आजही फॉरवर्ड शॉर्ट लेग या जागेवरील अनभिषिक्त सम्राट म्हणून एकनाथ सोलकर ओळखला जातो. 
image.png

image.png

अरे कृष्णा अरे कान्हा

 महाराष्ट्रात संत साहित्याच्या जोडीने लोकसाहित्याची देखील फार मोठी परंपरा आहे. संतसाहित्याबाबत लेखनाचे जनकत्व शोधून देता येते परंतु लोकसाहित्याबाबत तसा नेमका ठावठिकाणा मिळणे तद्वत फार अवघड जाते. लोकसाहित्य आणि लोकसंगीत कुणी सुरु केले, याचा अथक शोध घेऊनही एका मर्यादेपलीकडे फारसे हाती लागत नाही. असे असून देखील लोकसंगीताचा गोडवा मात्र मनावर गारुड टाकते. 
प्रस्तुत रचना ही संत एकनाथांची आहे म्हणजे संतपरंपरा इथे येते जी भक्तिसंगीताशी थेट नाळ जोडते. या संतकवी पंथाचे अनुयायी होण्याआधी, , या बाबतीत थोडा इतिहासाचा मागोवा घेतला तर, अनेक भक्तिमार्गी असामान्य संगीतकार होते असा एक निर्वाळा मिळतो. आपली संगीतपरता देवासाठी राबवावी असा आदेश आपल्या पंथाकडून मिळाला असावा, असे वाटू शकते. याचाच परिणाम भक्तसंख्या वाढू लागली आणि भक्तीचा सामूहिक आविष्कार, ही अत्यंत महत्वाची अभिव्यक्ती ठरली. अर्थात, आपली शाब्दिक रचना आणि संगीत, हे प्रामुख्याने सामान्यजनांसाठी आहे, याची विशेष जाणीव आविष्कारात राबवली गेली. यातूनच लोकसंगीताशी साद्ध्यर्म्य राखणारी  भक्तिसंगीताची  शाखा असते हे घोळ गीत ( गुजरात ) किंवा वारकरी संगीत (महाराष्ट्र) यावरून ध्यानात येईल. महाराष्ट्रात "अभंग","विराणी","गौळण" इत्यादि असंख्य लोकसंगीताचे  आविष्कार दिसतात. यातूनच आपल्याला आजच्या रचनेची ओळख करून घ्यायची आहे. 
मूलतः गौळण म्हणजे त्यात कृष्ण, गवळणी इत्यादी व्यक्ती समाविष्ट होतात. परंतु त्याचबरोबर सामान्य जनांना शिकवणे, ही दृष्टी देखील दिसते. संत एकनाथांच्या या रचनेत याचा आढळ होतो. कवी म्हणून विचार करताना, या रचनेतील उदाहरणे ही आपल्या नेहमीच्या आयुष्यात सापडणारी आहेत आणि त्यातून लोकरंजन आणि शिक्षण, अशी दोन्ही साधे साध्य करण्याचा प्रयत्न जाणवतो. अर्थात संत एकनाथांच्या हाच प्रमुख उद्देश होता. 
एकतर अशा प्रकारचे लोकसंगीत हे नेहमीच मंचीय सादरीकरणातून समोर येते म्हणजेच एका बाजूने लोकानुनय ही प्राथमिक गरज बनते. सरळ, साध्या शब्दातून जागृती करणे, हाच प्रमुख हेतू स्पष्ट होतो. अर्थात त्यासाठी अनेक संस्कार करावे लागतात. अशीच बाब लोकसंगीताची देखील असते. इतर कुठल्याही संगीतकोटींप्रमाणे भक्तिसंगीत आणि लोकसंगीत यांना स्वतः:ची अशी एक खास परंपरा असते आणि त्या परंपरेला अनुसरूनच या आविष्काराचा आस्वाद घेणे क्रमप्राप्तच ठरते. या शब्दरचेनला स्वरसाज चढवला आहे आणि गायले आहे, शाहीर साबळे यांनी. 
शाहीर साबळे यांचे महाराष्ट्रातील लोकसंगीतातील अस्तित्व निश्चितच वाखाणण्यासारखेच आहे. लोकसंगीतात समोरील श्रोत्यांशी आवाहकरीतीने संवाद साधणे आवश्यक असते आणि इथे शाहीर साबळ्यांची नाळ प्रेक्षकांशी नेमकेपणाने जुळलेली आढळते. मी वर म्हटल्याप्रमाणे लोकसंगीताला मंचीय सादरीकरणातून पुढे आणून, या संगीताला बरीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 
लोकसंगीताचा एकूणच ढाचा बघता, लोकवाद्ये, त्यातही तालवाद्ये यांचा प्रामुख्याने समावेश होतो. जोरकस वाजणारी तालवाद्ये नेहमीच समोरच्या प्रेक्षकांना आपल्या आविष्कारात सामावून घेतात. त्यादृष्टीने, ढोल, डफ, संबळ, ढोलक, एकतारी अशी वाद्ये तो आशय अधिक बांधीव करतात. या रचनेची स्वररचना आणि गायन हे एकाच व्यक्तीने केले असल्याने, दोघांचे मूल्यमापन स्वतंत्र करणे आवश्यक ठरते.  
गायक म्हणून विचार  करताना,पहिला प्रभाव पडतो तो, आवाजाचा पल्ला, भरीवपणा मर्दानी जोमदारपणा आणि ताकदीची फेक. यामध्ये, लोकसंगीताच्या दृष्टीने मर्दानी जोमदारपणा आवाजात असणे जरुरीचे असते आणि त्याबाबतीत साबळ्यांचा आवाज, ही फार मोठी जमेची बाजू म्हणायला हवी. त्यामानाने खालच्या पट्टीत फारसे गायन आढळत नाही पण लोकसंगीताची गरज बघता, त्याची फारशी गरज भासली नाही. गायन प्रामुख्याने मध्य सप्तक आणि तार सप्तक इथेच प्रभावीपणे व्यक्त होतो. छोट्या ताना सफाईदारपणे घेतल्या जातात आणि तिथे जराही चाचपडलेपण दिसत नाही. स्वच्छ आणि निकोप आवाज असल्याने, समोरील रसिकांवर प्रभाव लगेच पडतो. 
सगळी रचना बहुतांशी द्रुत लयीत असल्याने, तालाचा म्हणून स्वतंत्र प्रभाव जाणवतो. मुळातच शब्दच असे थेट लयीत असल्याने उच्चारण स्वच्छ झाले आहे. लोकसंगीत फार ठाशीवपणे आपला सांगीत वाक्यांश रसिकांसमोर ठेवत असल्याने तालाच्या मात्रा आणि अंत्य शब्दांवर जोर देणे, हे रसिकांना भावते.  शाहीर साबळ्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वत: शब्दरचना करून काही गाणी तयार केली आहेत आणि ती देखील स्वतःच गायली आहेत. एकेकाळी पोवाडे पद्धतीची गाणी गाऊन, उभा महाराष्ट्र गाजवला होता. कुठलीही पातळी न सोडता, वर्षानुवर्षे ठराविक दर्जा सांभाळणे ही सहज जमणारी गोष्ट नक्कीच नाही आणि शाहिरांनी हे यश सहजपणे मिळवले. मराठी लोकसंगीतात फार मोठा वाटा उचलला, ही बाब नेहमीच स्पृहणीय ठरेल.  

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

आले संत घरी म्हणून काय बोलून शिणवावे 
ऊस गोड लागला म्हणून काय मुळांसहित खावे 
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे 
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे 
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळूनिया प्यावे 
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे 
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

परस्त्री झाली म्हणून काय बळेची ओढावी 
सूरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी 
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा 
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा 
घराचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा 
एका जनार्दनीं म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा 
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 


Monday, 6 May 2019

यश हे अमृत झाले

मराठी ललित संगीतात वसंत प्रभू यांचे नाव अतिशय प्रसिद्ध आहे. सोप्या, सुमधुर चालींनी त्यांनी अनेक वर्षे रसिक मनावर अधिराज्य गाजवले. मराठीतील अनेक प्रथितयश कवींच्या कविता त्यांनी स्वरबद्ध करून, विशेषतः: भा.रा. तांब्यांच्या कवितांना चाली लावून, कवितेचा नवा अन्वयार्थ रसिकांसमोर ठेवला. याच गाण्याच्या निमित्ताने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक, तलत मेहमूद मराठीत अवतरला. अमराठी गायकांबद्दल बरेचवेळा शब्दोच्चारावरून तक्रार केली जाते पण इथे या गायकाने तशी जागाच ठेवली नाही. " पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातील गाणे असून कविता पी. सावळाराम यांची आहे. लोकप्रियतेच्या दृष्टीने बघितल्यास, हे गाणे तसे विस्मरणात गेले आहे किंवा स्वररचना म्हणून खास काही प्रयोग केलेत असे आढळत नाही तरीही संगीतकार वसंत प्रभूंची स्वतः:ची अशी खास "शैली" होती आणि त्या शैलीचे प्रकटीकरण सुरेख होते. स्वररचनांनीत ऐकली तर काही हिंदी गाण्यांशी साद्ध्यर्म्य आढळते. विशेषतः तिसरा अंतरा - वैभव मिरवीत मंदिरी येता, हा अंतरा हिंदीतील "प्यार पर बस तो नहीं मेरा" या गाण्याशी काही प्रमाणात साम्य दर्शवतो. अर्थात मुखड्यापासून सुरु झालेली चाल जरी पूर्वसूरींशी मिळती जुळती असली तरी स्वतःची नाममुद्रा निर्माण करते, हे नक्की. 

यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले 

कविता म्हणून बघायला गेल्यास, शब्दरचनेत फार काही असामान्य आढळत नाही, कुठलीच प्रतिमा मनात ठसत नाही. बरेचसे संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात पण जसे ग.दि.माडगूळकरांच्या शब्दरचनेत ज्या वैभवाने संस्कृत कल्पना झळकतात, तसे इथे काहीही घडत नाही. अर्थात इथे एक बाब नेहमीच लक्षात ठेवायला लागते, ललित संगीत हे सर्वसमावेशी संगीत असते, समाजातील एकाच घटकाला समोर ठेऊन, निर्मिती करणे अवघड असते आणि जनसंगीत असल्याने, इथल्या कविता करताना, जनांचा विचार हा नेहमीच महत्वाचा असतो आणि त्यादृष्टीने कविता गेयताबद्ध आहे. पी. सावळाराम हे कधीही फार मोठ्या प्रतिभेचे कवी नव्हते पण ललित संगीताची जी मूलभूत गरज असते, तशी चटपटीत रचना करण्यात वाकबगार होते. त्याचा परिणाम, त्यांनी मिळालेली अफाट लोकप्रियता. वसंत प्रभूंसोबत त्यांची जोडी, एकेकाळी महाराष्ट्रावर गारुड घालून गेली, हे मानलेच पाहिजे. 
दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर 
मागेपुढती राजपथावर लक्ष दीप लागले 

संगीतकार वसंत प्रभू यांनी आयुष्यभर सतत मेलडीचा वापर यथास्थितपणे केला असे दृष्टीस पडते तसेच स्वररचना बांधताना, शक्यतो भारतीय वाद्यांचाच वापर केला आहे. या रचनेत देखील व्हायोलिन (जरी मुळात हे वाद्य पाश्चात्य असले तरी भारतीय संगीतात पूर्णपणे मिसळून गेले आहे) बासरी अशीच वाद्ये तर तालवाद्य म्हणून ढोलक आणि तबल्याचा वापर केला आहे. त्यादृष्टीने त्यांची भारतीय वाद्यांवर भिस्त अधिक होती, असे विधान करता येईल. शेवटच्या तालविरहित अंतऱ्यात मात्र पियानोचे सूर ऐकायला मिळतात. स्वररचना बांधताना, एकेठिकाणी जरा छोटासा दोष आढळला आहे. 

स्तुतिसुमनांचे उधळीत झेले, जनगौरव तो जयजय बोले 
कीर्तध्वजावर लावून डोळे, भाग्य पुढे चालले 

पहिल्या अंतऱ्यातील पहिलीच ओळ - दिग्विजयाच्या मनोरथावर, ही गाताना "दिग्विजयाच्या" ऐवजी "दिगविजयाच्या" अशी गायली गेली आहे. ही केवळ लयीच्या अनुरोधाने केलेली चूक आहे पण बारकाईने ऐकल्यास खटकते. वास्तविक वसंत प्रभू हे कवितेला प्राधान्य देऊन, स्वररचना करणारे संगीतकार होते. स्वररचना कधी शब्दांवर आरूढ झाल्याचे फारसे कधी आढळले नाही. परिणामी शंकाचे औचित्य पाळण्यात ते नेहमीच यशस्वी झाले. संगीतकाराचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, पारंपरिक रचनाबंध स्वीकारून देखील, कुठेही स्वररचना बटबटीत होत नाही तसेच शेवटचा अंतरा जरी दु:खी, व्याकुळ स्वरांचा असला तरी कुठेही नाटकी होत नाही. सुरवात द्रुत लयीत आहे पण शब्दोच्चार व्यवस्थित ऐकायला येतील याची काळजी घेतली आहे. सुरावट आणि सुरावटींचे खास स्रोत म्हणजे विशिष्ट वाद्ये यांच्याकडे संगीतकाराचा खास झुकाव असल्याचे दिसते तरीही लयबंधाचा सर्जक उपयोग त्यांनी वारंवार केल्याचे दिसते. संगीतकाराच्या बहुतांशी स्वररचना ऐकल्या तर एकूणच ओढा हा  खंत, दु:ख यांकडे अधिक आहे, असे जाणवते. बहुतेक कारकीर्द ही खाजगी मराठी गीतांनीच गाजली आहे. अशा वेळेस वाटते, या संगीतकाराला अधिक चित्रपट मिळायला हवे होते  जेमतेम ४६ वर्षे, इतकेच आयुष्य लाभले अर्थात याचा परिणाम साकल्याने संगीत विचार करणे फार कठीण होते. अधिक आयुष्य लाभले असते तर!! अर्थात अशा जर-तर शक्यतांना काहीच अर्थ नसतो. 

वैभव मिरवीत मंदिरी येता, दिसेल डोळी ती मंगलता 
सुख अंधारी मन व्याकुळता, दु:ख सुखे हासले 

यश हे अमृत झाले 
सुख स्वर्गीचे आले 
परि दु:ख सुखे हासले 

गायक म्हणून या रचनेत तलत मेहमूद यांचा विचार करायचा झाल्यास, भावपूर्ण, सुरेल गायन हे लगेच ध्यानात येते. स्वररचना दोन भागात विभागली असल्याने, दोन्ही भागांचा स्वतंत्र विचार करणे आवश्यक. आवाजात किंचितसे कांपरेपण तरीही त्यांनी द्रुत लयीतील रोमँटिक गाणी चांगली म्हटली आहेत. इथे देखील गाण्याचा पूर्वार्ध द्रुत लयीत आहे आणि गाण्यातील आनंदी भाव त्यांनी आपल्या गायनातून सुंदररीतीने व्यक्त केला आहे. अर्थात एक मजेचे निरीक्षण - स्वररचना जेंव्हा तालविरहित आणि व्याकुळतेकडे  जाते,तिथे या गायकाची गायकी खरी खुलून येते. मुळात तालविरहित गायन करणे, ही सोपी बाब नव्हे आणि इथे तर काही क्षणातच रचना विरही स्वरांत जाते त्यामुळे गेल्यावर तितका ताबा असणे गरजेचे आणि इथे तलत मेहमूद आपल्या गळ्याची जातकुळी समर्थपणे दाखवतात. त्यांच्या गायनाची शैली ही नेहमीच संथ गती, नाजूक प्रक्षेपण अशासाठीच होती आणि हे जर मान्य केले तर माझे वरील विधान अधिक स्पष्ट होईल. 
रचना अखेरीस व्याकुळ, संथ तरीही दाट परिणाम घडवते, याचाच परिणाम अखेरीस काहीशी खिन्नता ऐकणाऱ्याच्या मनात राहते आणि चाल मनात रुंजी घालते. ललित संगीताची  यापेक्षा अधिक खोल फलश्रुती दुसरी कुठलीही नाही. 


Thursday, 2 May 2019

डेनिस लिली - निव्वळ आक्रमक्रता आणि मेहनत!!

१९७१/७२ चा ऑस्ट्रेलियन सीझन. एव्हाना लिली जगातील आक्रमक गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला होता परंतु याच काळात, त्याला पाठीचा गंभीर म्हणावा असा त्रास सुरु झालाआणि त्याला बाहेर राहावे लागले. ३,४ महिने व्यवस्थित ट्रेनिंग घेतले आणि फिटनेस साठी तयार झाला. त्याच्यासाठी मेनबर्नला खास नेट लावले होते आणि त्याला फक्त एकच षटक टाकायची परवानगी दिली होती. लिलीला देखील याची कल्पना होती आणि म्हणून त्याने प्रत्येक चेंडू अक्षरश: जीव तोडून टाकला होता (हा प्रसंग लिलीने आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे) तरीही अखेर लिली अपेक्षापूर्ती करू शकला नाही. सगळा चेहरा काळवंडला होता, आपली करियर संपली की काय? या संभ्रमात होता पण इथेच खऱ्या खेळाडूचा कस लागतो. निर्णय मान्य केला आणि तो पुन्हा आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये व्यायाम करायला गेला. 
लिली हा सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज आजही मान्यताप्राप्त आहे आणि त्यामागे त्याची विजिगिषु वृत्तीचा भाग फार महत्वाचा आहे. क्रिकेट मध्ये मेहनत तर सगळेच करत असतात, अपरंपार कष्ट घेतात परंतु अखेर तुम्ही मानसिकदृष्ट्या किती कणखर आहात, याला फार महत्व असते. १९६९/७० साली प्रकाशात आलेला लिली, तेंव्हा निव्वळ प्रचंड वेगाने आपली दहशत पसरवत होता. लक्षात घ्या, १९७१ मध्ये इंग्लंडने साऊथ आफ्रिकेची मालिका रद्द केली (बेसिल डी"ऑलिव्हेरा प्रकरण) आणि मग ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेष विश्व अशी ऑस्ट्रेलियातच मालिका घ्यायचे ठरवले होते. याच मालिकेत, पर्थच्या खेळपट्टीवर पहिल्या इनिंगमध्ये लिलीने ८/२९ अशी जबरदस्त गोलंदाजी करून शेष विश्व संघाला नामशेष करून टाकले आणि जगभर आपल्या नावाची द्वाही फिरवली. खुद्द सोबर्सने त्याच्या गोलंदाजांची वाखाणणी केली होती आणि आता लिलीससमोर आपल्या कारकिर्दीचे महाद्वार उघडले होते आणि याच सुमारास पाठीचा त्रास उद्भला आणि लिलीला संघात स्थान मिळाले नाही. 
आयुष्यात लिलीला पुढे देखील तब्येतीचा त्रास सहन करावा लागला आणि त्या काळापुरते त्याचे क्रिकेट बंद ठेवावे लागले होते पण त्याची जिद्द इतकी कामाखार होती, सगळ्या व्याधींवर त्याने मात केली. आधुनिक औषधयोजना, ट्रेनिंग वगैरे सोबतीला होतेच पण मुळात मानसिकदृष्ट्या लिली विजिगिषु वृत्तीचाच होता. जेंव्हा पहिल्यांदा पाठीचा त्रास सहन करावा लागला तेंव्हा त्याने मनोमन कबूल  केले,यापुढे केवळ वेग, हे आपले हत्यार असणार नाही आणि त्याने आपल्या भात्यात कितीतरी नवनवीन अस्त्रे आणली आणि क्रिकेट जगतात, आपले नाव चिरस्मरणीय केले.आधुनिक क्रिकेटमध्ये शारीरिक दुखण्यातून बाहेर येणे मुळातच अवघड असते पण इथे तर लिली नुसताच सावरला नाही तर आपल्या नावाची दहशत पुढील १३,१४ वर्षे कायम राखली. हे अति अवघड काम. वेगवान गोलंदाजाला दुखापती होणे हे नित्याचेच असते कारण शारीरिक श्रमाची प्रचंड मागणी परंतु वेगवान गोलंदाजी करताना, बुद्धीचा योग्य वापर करून आपली कारकीर्द कशी जगन्मान्य करता येते, याचा लिलीने एक आदिनमुना लोकांसमोर ठेवला. 
आता आणखी थोडे विश्लेषण करायचे झाल्यास, सर्वात प्रथम त्याची चेंडू टाकायची शैली अभ्यासनीय होती. सहज, सोपी धाव होती. सरळ रेषेत धावत यायचा आणि शक्यतो क्रीझच्या जवळून चेंडू टाकायचा. याचा एक फायदा असा झाला, लिली चेंडू इनस्वीन्ग टाकत आणि की आउटस्विंग टाकत आहे, याचा प्रथमदर्शनी पत्ता लागायचा नाही. लिलीकडे दोन्ही स्विंग अप्रतिम होते आणि त्यातून त्याने अचूकतेवर मिळवलेले प्रभुत्व. चेंडू ऑफ स्टम्पच्या जरासा बाहेर किंवा ऑफ स्टंपवर टाकायचा. सर्वसाधारपणे वेगवान गोलंदाजी खेळताना, फलंदाज किंचित ऑफ स्टंपकडे shuffle होतो पण अशावेळेस चेंडूच्या दिशेत झालेला किंचित बदल, फलंदाजाला बावचळून टाकतो आणि तिथेच " caught Marsh bowled Lillee" ही क्रिकेटमधील अजरामर म्हण ख्यातकीर्त झाली. लिलीला त्यांचा विकेटकीपर मार्शची, तितकीच तुल्यबळ साथ मिळाली. अर्थात त्यावेळी स्लिपमध्ये चॅपल बंधू, रेडपाथ, स्टॅकपॉल सारखे असामान्य क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी देखील आपला वाटा उचलला होता. 
लिलीच्या बाबतीत, कारकिर्दीच्या सुरवातीलाच आयन चॅपल सारखा दुर्दम्य कर्णधार मिळाला. आयनचा आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास होता. एक प्रसंग आठवत आहे. ऑस्ट्रेलियातील मालिका, इंग्लंडबरोबरचा सामना. ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. लिलीकडे चेंडू सोपवला होता. त्यासाठी आयन चॅपेलने ४ स्लिप, ३ गली, विकेटकीपर, १ लेग गली आणि १ फॉरवर्ड शॉर्ट लेग अशी क्षेत्ररचना ठेवली!! म्हणजे बघा, साऱ्या मैदानावर बाहेर कुणीही क्षेत्ररक्षकच नाही. गोलंदाजाला हे केव्हढे प्रचंड आव्हान होते. चेंडू ओव्हरपीच टाकायचाच नाही तसेच चेंडूची दिशा फक्त ऑफ स्टंप किंवा किंचित बाहेर अशीच ठेवायची. षटक संपले की अख्खी टीम दुसरीकडे क्षेत्ररक्षणासाठी जायची. अशी क्षेत्ररचना ना यापूर्वी आणि त्या नंतर कुणीही वापरली नाही. धाडसच झाले नाही. YouTube वर याचा व्हिडियो आहे.  
लिली प्रचंड आक्रमक गोलंदाज होता, धाडस अंगावर ओढवून घेणे त्याला मनापासून आवडायचे. कुण्या फलंदाजाने त्याला फोर किंवा सिक्सर मारली की तो मनापासून चवताळायचा, नजरेतून भयानक खुन्नस द्यायचा आणि फलंदाजाने आपल्या बॉलिंगवर आघात केला म्हणून त्याच आवेशात पुढील चेंडू टाकायचा. त्याने वेगवान गोलंदाजीची नवी परिभाषा तयार केली. सुदैवाने त्याला  त्यावेळेस,थॉमसन, गिलमोर आणि वोकर या ३ तितक्याच समर्थ वेगवान गोलंदाजांची साथ मिळाली. या चौकडीने जगात धुमाकूळ घातला होता. पुढे लॉइडने वेस्टइंडीजची जगप्रसिद्ध चौकडी तयार केली ( रॉबर्ट्स,होल्डिंग, गार्नर आणि क्रॉफ्ट) त्यामागे या चौकडीची पार्श्वभूमी होती. विशेषतः: इंग्लंडविरुद्ध तर ही चौकडी कायम दहशतवादीच ठरली. १९७५ ची ऑस्ट्रेलिया/ वेस्टइंडीज ही मालिका सुरु होण्याआधी, त्याची "विश्वविजेते" म्हणून भरपूर जाहिरात झाली होती. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पर्थवरील सामना वेस्टइंडीजने डावाच्या फरकाने जिकून वचपा घेतला पण पुढील  सलग ४ सामने ऑस्ट्रेलियाने सहजपणे जिंकले आणि वेस्टइंडीज संघाची पूर्ण वाताहात केली आणि त्या कत्तलीमागे फार मोठा हात लिली/थॉमसन या जोडगोळीचा होता. काही प्रमाणात लॉइड आणि शेवटच्या २ सामन्यात विव रिचर्ड्सचा अपवाद  वगळता,सगळी फलंदाजी नामशेष झाली होती. लिली खरा खुलायचा,जेंव्हा त्याला आव्हान मिळायचे तेंव्हा आणि त्यासारख्या पारंपरिक शत्रूसमोर - इंग्लंडसमोर.  त्यावेळेस त्याच्या गोलंदाजीतील खरा विखार बाहेर यायचा. प्रसंगी मैदानावर दोन हात करायची त्याची तयारी असायची - आठवा मियांदाद आणि लिलीचा प्रसंग. परंतु समजा एखाद्या खेळाडूने त्याची गोलंदाजी फोडून काढली तर लगोलग दाद देण्याची खिलाडूवृत्ती देखील तशीच दिसायची. जे काही शत्रुत्व असेल ते मैदानावर पण एकदा का मैदान सोडले की हाच लिली त्या खेळाडूंबरोबर बियर प्यायला सहज बसत असे. 
त्यामुळे लिलीबरोबर त्यांचे संबंध कायम सौहार्दाचे राहिले आणि याचाच परिणाम म्हणून तामिळनाडूत साकारलेली MRF Pace Foundation ही संस्था. भारताला, श्रीनाथ पासून आजच्या बुमराह पर्यंत अव्याहतपणे मिळणारे वेगवान गोलंदाज. 
लिलीला आयुष्यात अनेक वेळा दुखापतींना सामोरे जायला लागले पण तरीही त्याने हार मानली नाही. सुरवातीला वेगावर नियंत्रण  ठेवले,पुढे, पुढे तर स्विंग कलेत असामान्य प्रभुत्व संपादन केले. याचा परिणाम असा झाला, लिली गोलंदाजी करीत आहे, हे बघितल्यावर समोरील फलंदाज देखील आपले संपूर्ण लक्ष्य स्थिरचित्ताने त्याच्या गोलंदाजीकडेच ठेवायचा. आजही क्रिकेटमधील असामान्य वेगवान गोलंदाजांची यादी लिलीच्या नावाशिवाय अपूर्णच राहते. लिलीच्या जवळपास १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्या जवळपास जाणारा एकच गोलंदाज निपजला - अँडी रॉबर्ट्स. आज जगातील सगळे तत्कालीन फलंदाज एकमुखाने  म्हणतात,या दोघांना तुलना नाही आणि पहिल्या नंबरवर हेच दोन गलंदाज विराजमान होऊ शकतात. इथे केवळ भयानक वेग हे कारण  नसून,बुद्धीवादी गोलंदाजी  हे आहे.  लिलीची गोलंदाजी कुणीच फोडून काढली नाही असे अजिबात म्हणता येणार नाही परंतु लिलीच्या गोलंदाजीवर कायम वर्चस्व गाजवले, असे कधीही घडले नाही एकाच शैलीत धावत येऊन slower one चेंडू  टाकणे,या कलेवर प्रभुत्व मिळवले जे आज मर्यादित षटकांच्या सामन्याचा प्रमुख अस्त्र ठरत आहे. 
१९७४/७५ च्या ऍशेस मालिकेत तर इंग्लंडच्या फॅलँडांनी लिली/थॉमसन जोडीची प्रचंड दहशत घेतली होती. त्यावेळी एक घोषवाक्यच ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध होते - "Ashes to ashes, dust to dust, if Thomson don't get ya, Lillee must!!" मेलबर्नवरील जवळपास ८०,००० ते १,००,००० प्रेक्षक एकाच वेळी, एकाच सुरांत "लिली, लिली" असे ओरडायचे, त्या आरोळ्यांनीच बहुदा बरेचवेळा लिलीला विकेट्स मिळाल्या असाव्यात पण इतके प्रेम लाभणे, ही भाग्याची गोष्ट नाही का!! १९८४ साली, त्याला पुन्हा दुखापतींना सामोरे जायला लागले आणि त्याचवेळेस ग्रेग चॅपल देखील निवृत्ती स्वीकारायच्या मनस्थितीत होता. सिडनेच्या सामन्यानंतर ग्रेग चॅपल, रॉड मार्श आणि लिलीने एकत्रित निवृत्तीची घोषणा केली. 
लिलीच्या निवृत्तीने खऱ्या अर्थी जागतिक क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीची एक महान पर्व संपुष्टात आले.