Saturday, 14 May 2016

ऐ मेरे प्यारे वतन

एक उदास संध्याकाळ. हवेतच हुरहूर पसरलेली असते. खोलीतील सगळे वातावरणच विषण्ण आणि कातर झालेले. मन कुरतडत असलेली संध्याकाळ!! सगळे पठाण आपल्या गतस्मृतीत रममाण झालेले आणि त्यामुळे बोलायचा विषय देखील त्यालाच धरुन. अंगापेराने धडधाकट असलेली व्यक्तिमत्वे पण आपल्या अफगाणिस्तान मधील गावाच्या आठवणीत गुंतलेली आणि म्हणून काहीशी हळवी झालेली. पैसा मिळवायचा, याच उद्देशाने घर सोडून दूर बंगालमधील एका खेडे वजा गावात रहात असतात. 
प्रसिद्ध कवी, ना. वा.टिळक यांनी एका कवितेत मातृभूमीवर फार सुरेख लिहिले आहे. 

"सृष्टी तुला वाहुनी धन्य!! माते,अशी रूपसंपन्न तू निस्तुला 
तू कामधेनु! खरी कल्पवल्ली! सदा लोभला लोक सारा तुला;
या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी 
सामर्थ्य नामी तुझ्या, आर्यभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी"

१९६१ साली आलेल्या "काबुलीवाला" चित्रपटातील "ऐ मेरे प्यारे वतन" हे गाणे, काळाच्या ओघात थोडे विस्मरणात गेलेले. सुप्रसिद्ध लेखक, कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या तितक्याच सुप्रसिद्ध कथेवरील हा चित्रपट. आजच्या काळातील भौतिकवादी व्यवस्थेत हा चित्रपट कदाचित "मागासलेला" वाटू शकतो पण मानवी नात्यांची जपणूक आणि नातेसंबंधातील तलम धाग्यांच्या विणीत, या चित्रपटाला आजही तोड नाही. खरतर या सिनेमाचे निर्माते बिमल रॉय आहेत आणि चित्रपट त्यांच्या पठडीतला असून देखील, त्यांनी, या चित्रपटासाठी हेमेन गुप्ता यांना पाचारण केले आणि हेमेन गुप्तांनी देखील या अजरामर कथेला योग्य न्याय दिला. 
बलराज सहानी यांनी आयुष्यात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत परंतु या चित्रपटातील "काबुलीवाला" केवळ अविस्मरणीय आहे. सगळी कथा, याच माणसाच्या भोवती फिरते आणि बलराज सहानींनी आपल्या underplay शैलीत, या भूमिकेला फारच वरच्या स्तरावर नेउन ठेवले आहे.
आता मी गाण्याकडे वळतो. गाण्याच्या सुरवातीला मेंडोलीन वाद्यावर अरेबिक धाटणीचे स्वर घेतले आहेत आणि चित्रपटात पठाण लोकांचा अंतर्भाव बघता, ते योग्यच आहे. हे गाणे जितके संगीतकार सलिल चौधरी यांचे आहे तितकेच गायक म्हणून मन्नाडे यांचे आहे. इथे थोडे तांत्रिक भागाविषयी दोन शब्द लिहितो. 

ऐ मेरे प्यारे वतन ऐ मेरे बिछडे चमन, तुझपे दिल कुर्बान 
तू ही मेरी आरझू , तू ही मेरी आबरू तू ही मेरी जान. 

गाणे अत्यंत हळव्या मन:स्थितीचे असल्याने, गायनाची बैठक देखील तरल आणि हळव्या सुरांनी मांडलेली आहे. "ऐ मेरे प्यारे वतन" हे शब्द गाताना, "ऐ" अक्षराला "शुद्ध सा" स्वराने तर पुढील "मेरे" या शब्दासाठी मन्नाडे यांनी "कोमल निषाद" स्वर जसा लावला आहे, त्याला तोड नाही. शब्दांतील सगळी आर्तता या स्वरांतून मांडली आहे आणि गाणे एकदम वरच्या स्तरावर जाते. हे गाणे आपण, कधीही सहज जाता-येताना ऐकावे, असे नसून, गाणे ऐकायचे असेल तर स्वस्थचित्त मनाने ऐकायला हवे, तरच या गाण्याची खुमारी कळेल. या एकाच सुराने सगळे गाणे भारून टाकले आहे. 
प्रेम धवन यांचे शब्द आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे साध्या शब्दातून अंतर्मुख करणारा आशय व्यक्त केला आहे. कवितेत, शब्दयोजना करताना, एक प्रकारची अपरिहार्यता येणे फार गरजेचे असते, कविता म्हणून सिद्ध होण्यासाठी. चित्रपटातील नायक, आपले घरदार सोडून परक्या प्रदेशात रहात असताना, होणाऱ्या मनाची व्याकुळता दर्शविणारे गाणे आहे. 
तेरे दामन से जो आये, उन हवाओ को सलाम 
चूम लू मैं उस जुबां को, जिस पे आया तेरा नाम 
सब से प्यारी सुबह तेरी,  सब से रंगी तेरी शाम. 

एखादा गायक जर का सुरांचे यथार्थ ज्ञान घेऊन आलेला असेल तर गाताना, शब्दांची आवश्यक जाणीव ठेऊन, आशय किती खोल वर्तवू शकतो, हे समजून घेण्यासाठी, पहिल्या अंतरा बारकाईने ऐकणे गरजेचे आहे. "तेरे दामन से जो आये, उन हवाओ को सलाम" ही ओळ गाताना, "दामन से जो आये" हे खास ऐकण्यासारखे आहे. मनाची कातर अवस्था दर्शविण्यासाठी, चालीतील "अरेबिक" ढंग कायम ठेऊन,"आये" हा शब्द कंपायमान सुरांत घेतला आहे. वास्तविक श्रुतींचे गणित, याचे विश्लेषण करू शकेल पण त्यात क्लिष्टता अधिक!! गाण्याची "संस्कृती" ध्यानात घेऊन, गायन कसे करावे, याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. 

मां का दिल बन के कभी सीने से लग जाता हैं तू 
और कभी नन्ही सी बेटी बन के याद आता हैं तू 
जितना याद आता हैं तू , उतना तडपाता हैं तू. 

गाण्यात फारसा वाद्यमेळ नाही. केवळ मेंडोलीनचे व्याकूळ करणारे स्वर आणि तालवाद्य, इतकीच वाद्ये आहेत परंतु मेंडोलीनचे स्वर इतके हळवे आणि कातर आहेत की इथे दुसरे कुठलेही वाद्य "उपरे" ठरले असते. चालीत थोडा फेरफार केला आहे म्हणजे लय तशीच ठेवली आहे पण स्वरांचा "ठेहराव" बदलेला आहे तसेच शब्दोच्चार अधिक संदिग्ध केले आहेत. चित्रपटात, पठाण आणि त्या कुटुंबातील छोटी मुलगी यांच्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवले आहेत आणि या गाण्याच्या दरम्यान, बलराज सहानीला आपल्या अफगाणिस्तान मधील लहान मुलीची आठवण येते आणि हीच आठवण "और कभी नन्ही सी बेटी" हे शब्द गाताना खोलवर होते. संगीतकार आणि गायक, दोघेही तितकेच तालेवार असतील तर हाताशी असलेल्या रचनेचे कसे सोने करतात, याचा सुंदर वस्तुपाठ आहे, 

छोड कर तेरी जमी को दूर आ पहुचे है हम 
फिर भी है यही  तमन्ना तेरे जारो की कसम 
हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम. 

गाण्याची शब्दकळा बघितली तर प्रत्येक कडव्यात, आशय तसाच ठेऊन, निरनिराळ्या भावनांच्या छटा वाचायला मिळतात. मातृभूमीचा वियोग, पुढे काहीसे प्रतीकात्मक चित्रण पण त्यातही आपल्या मुलीची आठवण आणि शेवटी "हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम" असे लिहून आयुष्याच्या इतिकर्तव्यतेची असोशी!! वास्तवात कितीजणांना असे भाग्य उपभोगायला मिळते? अत्यंत साध्या शब्दातून आपल्याला खोल अभिव्यक्ती समजून घेता येते आणि हेच गाणे अतिशय अर्थपूर्ण होत जाते. 
वास्तविक, सलिल चौधरी यांची ख्याती म्हणजे गाण्यात काहीना काहीतरी वेगळेपण करायचे, प्रसंगी पाश्चात्य सिंफनी संगीताचा आधार घेऊन, रचनेत वैविध्य आणायचे परंतु इथे सगळे गाणे केवळ मेंडोलीन वाद्यावर तोलले आहे. गाण्याची चाल(च) इथे अतिशय गहिरी असल्याने, वाद्यमेळ फारसा वापरलेला नाही आणि याचा परिणाम, गाण्यातील गायन आणि शब्द, या दोन्ही घटकाची अभिव्यक्ती आपल्या मनाला भावते. 
गाण्याची चाल तशी सगळ्या अंतऱ्याना सारखीच आहे पण तरीही प्रत्येक ओळीतील "खास" शब्द ध्यानात घेऊन, त्यावर नेमका जोर देऊन, नेमका आशय व्यक्त केला गेला आहे. पहिला अंतरा ऐकताना आपण, "आये" शब्दावरील कंपायमान हरकत ऐकली तर इथे शेवटचा अंतरा ऐकताना, "छोड कर तेरी जमी को" गाताना "जमी" शब्दावर अशीच अर्थपूर्ण हरकत घेतली आहे आणि रचनेतील उदासवाणा भाव अधिक खोल दर्शवला आहे. 
संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही बाबी विशेषत्वाने ध्यानात घ्याव्याच लागतील. त्यांच्या मनात वैश्विक संगीताची एक धारणा होती आणि त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, त्यांना जे सांगीत निर्णय घ्यावे लागत होते, त्याला बऱ्याच मर्यादा प्राप्त झाल्या होत्या. सुदैवाने सलिल चौधरींची गीतसर्जन शक्ती आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व मिळवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती.त्यांचे संगीत ऐकताना अनेक वेळा हिंदी चित्रपटसंगीतात जे संगीत अस्तित्वात होते, त्यापेक्षा टिकाऊ आणि सार्थ संगीतरचना करण्याची इच्छा होती आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे नव्हते.    
खरेतर गाण्याचे चित्रण यथामुलक आहे, त्यात काही खास "दिग्दर्शकीय" कौशल्य दिसत नाही परंतु कथेच्या अंगाने चित्रीकरण केल्याने, मुळातल्या सखोल आशयाला, अत्यंत साधेपणाचे अप्रतिम अस्तर लाभले आहे. गाणे ऐकताना आणि ऐकून झाल्यावर, आपल्या मनावर खरा  ठसा उमटतो, तो मन्नाडे यांच्या व्याकूळ करणाऱ्या सुरांचा आणि तसेच बलराज सहानींच्या भावगर्भार चेहऱ्याचा.    

Sunday, 8 May 2016

आये बहार बन के लुभाकर



संध्याकाळची रम्य प्रणयी वेळ, मोकळ्या मैदानावर एक राजहंसी, राजस जोडपे एकत्र आलेले. अव्यक्त शब्दातून भावना व्यक्त करीत गुंजारव करणारे. काहीसे अधिरे असल्याचे थरथरणाऱ्या अधरांतून जाणवत असताना, मुग्धतेची ग्वाही देणारे.  जशी संध्याकाळ उलटायला लागते, तशी प्रेयसीच्या मनाची घालमेल आणि निघण्याची धडपड.

"जें मत्त फुलांच्या कोषांतून पाझरले,
निळ्या लाघवी दंवांत उलगडले, 
जें मोरपिसांवर सांवरले, 
    ते - त्याहुनही - आज कुठेंसे 
    पुन्हा एकदां 
    तशाच एका लजवंतीच्या 
    डोळ्यांमध्ये - डोळ्यांपाशी --
    झनन-झांजरें मी पाहिलें…….   

सुप्रसिद्ध कवी, पु.शि. रेग्यांच्या या अप्रतिम ओळींतून रेखाटले गेलेले नवथर प्रेयसीची चित्र जणू काही, चित्रपटातील मधुबालाच्या भावनाच व्यक्त करते.  खरतर या कवितेत, "झनन-झांजरें", "ठिबक-ठाकडे" सारखे काहीसे अर्थशुन्य वापरून, अर्थपूर्ण अभिव्यक्ती सादर केली. 
 १९५६ साली आलेल्या "राजहठ" सिनेमातील हे गाणे, काहीसे अप्रसिद्ध पण तरीही अतिशय गोड चालीचे गाणे. मधुबाला, प्रदीप कुमार, सोहराब मोदी, मुराद इत्यादी अभिनेते या चित्रपटात आहेत. कथावस्तू अगदी सरधोपट, साधी आहे. दोन राजघराण्यातील वैर आणि त्यात होरपळले जाणारे प्रेम, याभोवती चित्रपट गुंफला आहे. अर्थात अभिनयाचा भाग हा बराचसा मधुबालाने उचलला आहे. सोहराब मोदी काही प्रसंगात उठून दिसतात पण प्रभाव तात्कालिक ठरतो. त्याकाळात बहुतेक चित्रपट हे त्यातील गाण्यांवर तगलेले आहेत आणि हा चित्रपट अजिबात अपवाद नाही. शंकर/जयकिशन या जोडीने,चित्रपटातील गाणी केली आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत मोलाची भर टाकणारी कामगिरी आहे.
संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांच्याकडे बघायचे झाल्यास, त्यांच्या कारकिर्दीचे काही ठराविक टप्पे आहेत. १] राजकपूर, २] राजेंद्र कुमार, ३] शम्मी कपूर आणि ४] इतर चित्रपट. या जोडीची खासियत अशी, त्यांनी वरील तिन्ही अभिनेत्यांच्या शैलीनुसार गाणी तयार केली परंतु इतरत्र त्यांनी जे चित्रपट केले, ती गाणी या सगळ्यांच्या चित्रपटापेक्षा वेगळ्या शैलीने केली आणि आपल्या सर्जनशीलतेचा असामान्य दाखला दिला. या दृष्टीने विचार करता, हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासात यांचे नाव निश्चितपणे फार वरच्या श्रेणीत बसवावे लागेल. अर्थात जशी कारकीर्द दीर्घ होते तिथे गाण्यांच्या दर्जात कमअस्सल फरक हा नेहमीच पडत राहतो आणि तसा फरक यांच्या बाबतीत स्पष्टपणे बाजूला काढता येतो. 

आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे. कविता म्हणून वाचायला गेल्यास, ओळींतील लय लगेच तोंडवळणी होते. चित्रपट गीतांसाठी अशा शब्दांची खरी आवश्यकता असते. हसरत जयपुरी शायर म्हणून फारसे वरच्या श्रेणीत कधी गणले नाहीत पण तरीही शब्दांचा दर्जा, एका विविक्षित दर्जाच्या खाली देखील कधी घसरू दिला नाही. सहज, सुलभ शब्दरचना, हेच बहुतांशी त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य कायम राहिले. गेयताबद्ध शब्दरचना करणे, हेच त्यांचे प्रमाणभूत काम, असे म्हणता येईल.  
गाण्याची सुरवात दीर्घ हुंकाराने होते पण त्या हुंकारातच चालीच्या रचनेची बीजे दडली आहेत. वास्तविक रफीच्या गळ्याची जातकुळी बघत, नैसर्गिक मर्दानी, दीर्घ पल्ल्याचा आवाज. तसे असून देखील हा हुंकार आलापीच्या अंगाने खालच्या पट्टीत घेतलेला आहे. बागेश्री रागाची किंचित छाया आहे पण तरी देखील चालीची सुरवात म्हणून स्वतंत्र आहे. दादरा तालाची योजना आहे पण अगदी खालच्या अंगाने वादन केले आहे. परिणाम असा, रफीचे गायन आणि हसरत जयपुरी यांचे शब्द, दोघांचा आस्वाद सहजशक्य होतो. 
आता तांत्रिक शब्द योजायचे झाल्यास, गाण्याची "स्थायी" म्हणजे ध्रुवपद ऐकताना, "आ" शब्द घेताना "गंधार + मध्यम" घेतले आहेत तर पुढे "ये" शब्द "धैवत" स्वरावर स्थिरावला आहे. बागेश्री रागाची छटा या सुरांतून अधिक स्पष्ट मिळते. 
आता लालित्याच्या अंगाने बघायला गेल्यास,  नुकतीच प्रेयसी भेटून परतत असताना, मनाला जाणवणाऱ्या विषादाची ही रचना आहे. असले प्रसंग हिंदी चित्रपटात असंख्य बघायला मिळतात पण तरीही रसिकांच्या ध्यानात राहतात, याचे प्रमुख कारण, पार्श्वभागी ऐकायला मिळणारी अप्रतिम गाणी. हाच प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन, संगीतकाराने तर्ज बांधली आहे. 

आये बहार बन के लुभाकर चले गये 
क्या राज था जो दिल में छुपाकर चले गये 

या स्थायी नंतरचे वाद्यमेळाचे संगीत, प्रामुख्याने व्हायोलीन वाद्यावर घेतलेले आहे आणि ती सुरावट जरा बारकाईने ऐकली तर काहीशी पाश्चात्य धाटणी आढळते!! संगीतकाराची प्रयोगशीलता अशीच सिद्ध होत असते. वेगळ्या अंगाने बांधलेली धून देखील, परत मूळ चालीशी नेमकेपणी जोडून घेणे, हे फार कौशल्याचे काम आहे. या ओळी गाताना रफीने देखील काही शब्द इतक्या अप्रतिमरीत्या   त्याबद्दल त्या गायनाला देखील वेगळी अशी दाद द्यावीशी वाटते. जिथे शब्दांवर योग्य "वजन" द्यायला हवे, तिथेच रफीने आपल्या गायनाची करामत दाखवली आहे. "छुपाकर" म्हणताना, आवाजात किंचित थरथर आणली आहे आणि त्यामुळे गाण्यात, शब्दांच्या पलीकडले भाव दिसायला लागतात. 

कहने को वो हसीन थी आंखे थी बेवफा 
दामन मेरी नजर से बचाकर चले गये 
आये बहार बन के लुभाकर चले गये 

हा पहिला अंतरा, दोन वेळा घेतला आहे. शब्दकळा गझलेच्या वजनात लिहिली गेली आहे आणि गायन देखील त्याच अंगाने केले गेले आहे. पहिली ओळ, स्थायी रचनेशी नाते सांगत गायली जाते परंतु परत तीच ओळ वरच्या पट्टीत गायली जात, गाताना बागेश्री मधील "ग म म(तीव्र)" (एक गंमत - राग बागेश्री मध्ये "तीव्र मध्यम" स्वराला जागा नाही, पण तरीही इथे बसवला आहे!!) अशा सुरांवरून गायन हिंडते. रफी गायक म्हणून किती श्रेष्ठ आहे, हेच या ओळीच्या गायनातून समजून घेता येते. खास अवलोकण्याचा भाग असा आहे, ही ओळ झाल्यावर, दुसरी ओळ परत मूळ चालीशी संलग्न होते. हा सगळा सांगीतिक प्रवास खरच फार विलोभनीय आहे. रागाच्या सावलीत राहून, चालीचे स्वतंत्र अस्तित्व कसे टिकवायचे, याचा हे गाणे म्हणजे आदीनमुना आहे. 

इतना मुझे बताओ मेरे दिल की धडकनो 
वो कौन थे जो ख्वाब दिखाकर चले गये  
आये बहार बन के लुभाकर चले गये 

हा दुसरा आणि शेवटचा अंतरा तांत्रिक अंगाने तसाच बांधला आहे. सुतराम फरक केलेला नाही. बहुदा असे असावे, आधीची स्वररचना रसिकांच्या मनावर गडद परिणाम घडवून आणण्यासाठी, तोच स्वरबंध स्वीकारला असावा. अन्यथा दुसरे कुठलेच कारण संय्युक्तिक असे दिसत नाही. गायक म्हणून रफीच्या गायनाचा दर्जा इथे सुरेख दिसून येतो. बरेच ठिकाणी, रफी गाताना काही "गिमिक्स" घेण्याच्या नादात वाहवत जातो पण इथे मात्र संपूर्णपणे संयमित आविष्कार आहे. लयबद्ध शब्दकळेचा अतिशय योग्य मान राखून, कुठेही अकारण गळा भिरकावलेला नाही. याचा परिणाम, आपल्याला रचनेचा एकसंधपणा ऐकायला मिळतो वरच्या सुरांत जाताना देखील, मर्यादित स्तरावर गायकी ठेवल्याने, शब्दांतील आशय नेमक्या सुरांतून व्यक्त केला गेला आहे. शब्दांतून भावनेचे जे औचित्य राखले गेले आहे, त्याला रफीने आपल्या संयमित गायनाने अधिक सुंदर केले आहे.   

संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांची रचनादृष्टी इतकी चित्रपट - अंगाची होती, की चित्रित दृश्यास आवश्यक आपल्या ध्वनिमुद्रित रचनांतही योग्य तसे बदल करण्यास, त्यांनी मागे-पुढे बघितले नाही. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंदावरील नियंत्रण. तसेच त्यांनी केलेल्या कामांतील विविधता अभ्यासण्यासारखी आहे. रागसंगीताबाबत दोन टोके दिसतात. काही रचना, सरळ सरळ रागाच्या पारंपारिक चौकटीमध्ये बांधल्या आहेत तर काही रचना रागाचा निव्वळ आधार घेऊन, त्या स्वरचौकटीत नव्याने स्वररचना केलेली आढळते. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातील दृश्यासाठी रचना करणे जेणेकरून, बांधलेले गाणे हा चित्रपटाचा अंगभूत भाग म्हणून  निर्देश करता येईल. या सगळ्यातून निष्कर्ष असा निघतो, चित्रपटाची हाताळणी, विषयाचे तारतम्य याला आपल्या रचनांसाठी पायाभूत कच्चा माल समजून, त्यानुसार संगीत रचना केल्या आणि तसे करताना, आपल्यातील सर्जनशीलतेची जाणीव अधिक प्रखर केली. त्यासाठी प्रसंगी पाश्चात्य परंपरेपासून त्यांनी केलेल्या उचलीमधून हिंदी चित्रपट संगीताचा आणखी एक विशेष उभारून वर आला आणि हा मुद्दा, त्यांनी तयार केलेल्या नृत्यगीतांच्या अवकाशात तपासून बघता येतो.  

Saturday, 30 April 2016

तुम मुझे भूल भी जाओ



चित्रपट गीतांत अनेक प्रसंग असतात आणि त्यानिमित्ताने, कवींना त्या प्रसंगांना शब्दातून, रसिकांच्या समोर मांडायचे असते. अशावेळेस, कवितेत एखादी राजकीय विचारसरणी किंवा सामाजिक भान असावे का? हा एक कालातीत प्रश्न आहे आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. एकतर चित्रपट हे माध्यम सामान्य माणसांपासून ते बुद्धीवादी समाजाला एकत्रित बाधून ठेवणारे माध्यम असल्याने, तिथे होणारा आविष्कार हा नेहमीचा तौलनिक दृष्टीने सादर होणे गरजेचे असते. एकांतिक विचाराने होणारी आविष्कृती काही ठराविक, मर्यादित स्तरावर यशस्वी ठरू शकते. विचाराबरोबर मनोरंजन, हा घटक देखील विचारात घ्यावाच लागतो अन्यथा सादरीकरणाचा डोलारा कधीही कोसळू शकतो. 
त्या दृष्टीने विचार करता, १९५९ साली आलेल्या "दीदी" चित्रपटातील "तुम मुझे भूल भी जाओ" हे गाणे विचारात घ्यावे लागेल. शायर साहिर हा मुळातला सक्षम कवी, त्याने आपले "कवित्व" चित्रपट गाण्यांसाठी वापरले, असा एक आरोप नेहमी केला जातो. एका दृष्टीने विचार करता, यात तथ्य नक्कीच आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गाण्यात "काव्य" आणले तर नेमके काय बिघडते? सरधोपट शब्दकळा असलेली असंख्य गाणी देखील, कवितेच्या अंगाने फारच थोड्या वेळा ऐकली जातात तेंव्हा "काव्य" असलेली गाणी दुर्लक्षित झाली तर त्यात काय नवल!! गीतात "भावकाव्य" असण्यात निदान मला तरी फार गैर वाटत नाही. 
जीवनात अनेक अनुभव आपल्याला येतात.त्यातील काही संवेदानाद्वारे आलेले, काही कल्पनेने जाणवलेले, काही वैचारिक स्वरूपाचे तर काही संमिश्र स्वरूपाचे असतात. परंतु यातील कोणत्याही एकाच्या किंवा सर्वांच्या अनुभवांचा एकात्म व अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती होते तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून जाणवते. याचअंगाने आपण, आजच्या या गाण्याचा विचार करू शकतो.  
ती माया ममता कृतज्ञता अन प्रीती 
बलिदान समर्पण श्रद्धा निष्ठा भक्ती 
चल विसर शब्द ते भरला बघ हा प्याला 
अर्थशुन्य शब्दांची ही दुनिया असे स्मशानशाळा….!! 

प्रसिद्ध कवी रॉय किणीकरांनी वरील ओळीत, साहीरच्याच विचारांची री ओढली आहे, असे मला वाटते. या गाण्यात साहीरच्या "डाव्या" विचारसरणीचा प्रभाव फार गडद असा जाणवतो. मी सुरवातीला, राजकीय किंवा सामाजिक भान याबद्दल चार शब्द लिहिले आहेत, ते याच संदर्भात आहेत. आता या गाण्यातील काव्याचाच विचार करायचा झाल्यास, 

"जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" 
ही ओळ म्हणजे साहीरच्या मनातील डाव्या विचारसरणीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे. आता प्रश्न असा येतो, चित्रपटातील पात्राच्या दृष्टीने असे विचार कितपत योग्य ठरतात? इथे मात्र वादाचा मुद्दा निश्चित निर्माण होतो. आणखी एक मजेशीर मुद्दा आहे. ही ओळ  - "जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" इथे थोडे गूढ आहे, म्हणजे प्रसिद्ध शायर फैझ-अहमद-फैझ यांच्या अतिशय गाजलेल्या - "मुझसे पहिली सी मुहोब्बत, मेरे महेबूब ना मांग" या रचनेत हीच ओळ "और भी दुख है जमाने में मुहोबत के सिवा" अशी वाचायला मिळते!!  प्रश्न असा, याचे श्रेय नेमके कुणाचे?   अर्थात आणखी एक मजेदार किस्सा, फैझच्या याच रचनेतील, "तेरी आंखो के सिवा दुनिया में रख्खा क्या है' ही ओळ, मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या "चिराग" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याशी साम्य दाखवते. 
गाण्याची चाल यमन रागावर आधारित आहे. चाल अतिशय सुश्राव्य आहे आणि सहज गुणगुणता येईल अशीच आहे. मुळात यमन राग अति गोड राग, त्यामुळे या चालीला सुंदर असा गोडवा प्राप्त झाला आहे. नायिकेच्या भासमान मनस्थितीतून निर्माण झालेली ही रचना आहे आणि तोच धागा पकडून, संगीतकार सुधा मल्होत्राने अतिशय मोजका वाद्यमेळ ठेऊन गाण्याला सुरवात केली आहे. 
तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 
अतिशय मोहक सुरावटीने ही गाणे सुरु होते. नायिकेची स्वप्नावस्था ध्यानात घेऊन, गाण्याची सुरावट बांधली आहे. खरतर सुधा मल्होत्रा, संगीतकार म्हणून फारशी ख्यातकीर्त नाही पण इथे तिने जी "तर्ज" बांधली आहे, केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल. हे गाणे म्हणून बघताना ही एक सुरेख कविता आहे, याचा विचार केलेला आढळतो. अर्थात, गाण्याची चाल बांधताना, ती "कविता पठण" होणार नाही, याची काळजी  घेतली आहे. गाण्यातील तालाची योजना देखील त्याच ढंगाने केलेली आहे. 
मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है 
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है 
मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया 
इन परेशान सवालात की कीमत क्या है 
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

या ओळी म्हणताना, सुधा मल्होत्राने शब्दांचे औचित्य कसे सांभाळले आहे, ते ऐकण्यासारखे आहे. "मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया, इन परेशान सवालात की कीमत क्या है" या ओळी म्हणताना, स्वर किंचित वरच्या पट्टीत घेतला आहे. या ओळीतून प्रकट होणारी मनाची बेचैनी किंवा तडफड, सुरांतून व्यक्त करण्यासाठी. सूर थोडे वरच्या पट्टीत घेतल्याने, शाब्दिक आशय नेमका आपल्या मनाला भिडतो. पुढील ओळीत " तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको" मनाला समजावण्याची धडपड असल्याने, ही आणि पुढील ओळ अतिशय संयत स्वरांत मांडली आहे - परिणाम केवळ सूर(च) नव्हे तर शब्द देखील आपल्या ध्यानात राहतात. 

जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है 
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनिया में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आंख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है 
या ओळी प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या आवाजात आहेत. एक गायक म्हणून मुकेश यांच्या आवाजाला खूप मर्यादा आहेत परंतु त्या मर्यादेत राहून देखील परिणामकारक गायन करण्याचे त्यांचे कौशल्य निश्चित वाखाणण्यासारखे आहे. मी लेखाच्या सुरवातीला, काव्यातील राजकीय विचारसरणी बाबत जे लिहिले होते, ते याच ओळींच्या संदर्भात आहे. इथे साहिर आपली विचारसरणी, चित्रपटातील पात्रावर लादत आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अर्थात, कविता म्हणून इतके स्वातंत्र्य कवीला निश्चितच मिळायला हवे. 

तुमको दुनिया के गम-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हुं यही मेरे लिये क्या कम है 
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

चाल तशी संपूर्ण गाण्यात फारशी कुठे बदलेली नाही किंवा लयीत फार वेडीवाकडी वळणे देखील नाहीत. गाणे ऐकताना मात्र सारखे मनात येत राहते, इथे गाण्यापेक्षा कविता अधिक तुल्यबळ आहे. गाण्याची चाल आणि सादरीकरण अतिशय सुश्राव्य आहे. गाण्याची चाल मनाची पकड सहज घेते आणि हा मुद्दा विशेष मांडायला हवा. गाण्याची चाल ऐकताना, सहज समजू शकली तरच ती लोकांच्या मनात घर करते आणि ते साध्य इथे साधले आहे. 
मुकेश यांच्या आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नव्हता आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरती मर्यादित होती. परंतु आवाजात एक प्रकारचा आश्वासक किंवा सांत्वन करण्याचा धर्म होता. थोडे तांत्रिक बोलायचे झाल्यास, काही स्वरमर्यादांत सुरेल गाणे त्यांना सहज सुलभ जात असे. परिणामत: मुकेश यांचा आवाज छोटे स्वर समूह द्रुत गतीने आणि सफाईने घेऊ शके. वरील गाण्यांतील दुसरा अंतरा, या वाक्यांना पूरक म्हणून दाखवता येईल. आपल्या पट्टीपेक्षा वरच्या सुरांत गायची वेळ आली, तेंव्हा त्यांचा आवाज डळमळीत व्हायचा आणि त्यांच्या आवाजाची प्रमुख मर्यादा. 
सुधा मल्होत्रा यांच्या आवाजाबाबत देखील वरील वर्णन लागू पडेल परंतु यांच्या आवाजात एक प्रकारची फिरत असल्याने, हलक्या  हरकती घेणे सहज जमून जाते आणि त्यामुळे गाण्याला किंचित गायकी अंग प्रदान करणे शक्य होत असे. 
असे असून देखील, ही गाणे आपल्या मनाचा ठाव घेते, कारण चालीमधील असामान्य गोडवा आणि सहज सुंदर गायन. ललित संगीतासाठी खरेतर याच मुलभुत बाबी ध्यानात घेणे जरुरीचे असते. 


https://www.youtube.com/watch?v=xs1h-inHU4U

Tuesday, 19 April 2016

जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात



मध्यरात्री घनघोर पावसांच्या धारांत भिजत असलेली आणि त्यामुळे अवघडून गेलेली तरुणी, एखादा सुरक्षित आडोसा शोधत उभी असते. आजूबाजूला विजेचा कडकडात चालू असतो आणि त्या नादात पावसाचा जोर वाढलेला असतो. त्यामुळे ती तरुणी "ओलेती" झालेली. अचानक एक तरुण तिथे येतो आणि त्या ओलेत्या सौंदर्यावर लोभावून जातो. तरुणीला, हा तरुण आपल्याला "हेरत" आहे याची जाणीव होते आणि काहीशी सलज्ज होते. 
१९६० साली आलेल्या "बरसात कि रात" या चित्रपटातील "जिंदगी भर नहीं भूलेगी" या प्रसिद्ध गाण्याची वरील प्रमाणे पार्श्वभूमी आहे. चित्रपट सरधोपट आहे आणि अभिनयाच्या क्षेत्रात "मधुबाला" वगळता, सगळाच आनंद आहे!! मला तर बरेचवेळा असेच वाटते, समोर भारत भूषण सारखा नाठाळ अभिनेता असल्याने, मधुबालाचा अभिनय अधिक खुलून येतो!! तिच्या सौंदर्याबद्दल तर कुठलेच दुमत नसावे. रोशन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, हाच या चित्रपटाचा प्राण आहे!! 

"पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुकें
वाटले स्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे 

भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला 
का फुलांच्या मार्दवे मानेवरी भारावला? 

सुप्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या या ओळी म्हणजे मोहक, सलज्ज तरुणीच्या संयत सौंदर्याचा आविष्कार आहे. या मतितार्थाशी संलग्न अशा ओळी, प्रसिद्ध शायर साहिर यांनी प्रस्तुत गाण्यात लिहिल्या आहेत. खरतर, या गाण्यातील ओळी अप्रतिम आहेत आणि अशा वेळी, या ओळी असामान्य आहेत की पडद्यावर दिसणारे मधुबालाचे सौंदर्य अलौकिक आहे, असा संभ्रम पडतो. सुंदर गाण्यात शब्द असे असावेत, जिथे स्वरलय संपते तिथेच अक्षर संपावे, जेणेकरून शाब्दिक "यतिभंग" होऊ नये. हे सगळे एकाच वेळी जुळून येणे फार अवघड असते. चित्रपट गीतांवर जेंव्हा सरसकट टीका केली जाते तेंव्हा हा मुद्दा फारसा ध्यानात घेतला जात नाही. 
संगीतकार रोशन यांच्या बहुतांशी रचना या अतिशय संयत, अनाक्रोशी आणि विशेष करून मुग्ध स्वरूपाच्या आहेत. गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, कुठलेही वाद्य अति तार सप्तकात शक्यतो जाणार नाही आणि त्यायोगे गायन देखील त्याच पातळीवर वावरेल, याची काळजी घेतलेली आढळते. बरेचवेळा रचनेत, लय वरच्या सुरांत जाण्याची शक्यता दिसत असताना, लय खंडित करून खालच्या स्वरांवर वळवून घेण्याकडे त्यांच्या बराचसा कल दिसतो. गाणे अधिककरून मंद्र सप्तकात कसे बांधले जाईल, हाच दृष्टीकोन बाळगलेला आढळतो. त्यामुळे रचनेत, फारच कमीवेळा "यतिभंग" झाला आहे किंवा शब्दांची अनावश्यक मोडतोड झाली आहे, असे ऐकायला मिळत नाही. शब्दांच्या आशयानुरूप लयीला "वळण" द्यायला त्यांनी कधीही मागेपुढे बघितले नाही, त्या दृष्टीने, त्यांची गाणी ही अधिक करून "गीतधर्मी" असतात.
सुरवातीच्या हुंकारातून, गाण्याची सुरवात होते. या हुंकारातच आपल्या यमन रागाची खूण पटते. मोहमद रफी, हा गायक म्हणून विचार करताना, सरळ सरळ दोन भाग दिसतात. १] या अशा गाण्यातून गायकीचे अतिशय संयमित रूप ऐकायला मिळते तर इतर अशी काही गाणी आहेत, तिथे आवाजात अकारण "नाटकी" भाव फार डोकावतो. गायन करताना, शब्दांची जाण ठेऊन गायन करणे, हा फार ढोबळ विचार झाला परंतु शब्दांतील आशय अधिक खोलवर दाखवण्याच्या नादात वाहवत जाण्याचा धोका फार असतो आणि दुर्दैवाने, मोहमद रफी काही गाण्यात तसे वाहवत गेले आहेत.
जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात  
एक अंजान हसीना से मुलाकात की रात 

या ओळीतील भाव जाणून घेतला तर लगेच ध्यानात येईल, "त्या" अनुपमेय रात्रीच्या सुगंधी आठवणींची मांडणी आहे. मघाशी मी संगीतकार रोशन यांच्या बाबतीतील वैशिष्ट्य सांगताना, शब्दातील "ऋजुता" चालीत मांडताना, मुग्धता अधिक खोलवर कशी दाखवता येईल, याचाच प्रत्यय येतो. खरतर त्या रात्री त्या तरुणीशी "मुलाकात" म्हणावी तर केवळ दृष्टीभेट इतपतच मर्यादित परंतु त्या नजरभेटीतून अवतरलेले भावनांचे "बोलके" भाव केवळ शब्दातून(च) नव्हे तर सुरांतून देखील विभ्रमासहित आपल्याला ऐकायला मिळतात. गाण्याचा "मुखडा" असावा तर असा!! गेयताबद्ध शब्दकळा आणि त्याला संलग्न अशी स्वररचना आणि त्याचे आविष्कृत स्वरूप गायनातून तितक्याच प्रत्ययकारी दिसणे. सगळेच मधुबालाच्या सौंदर्याप्रमाणे विलोभनीय!! 
इथे पहिला अंतरा येण्याआधीचा वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, "मुलाकात की रात"
या ल शेवटचा "त" या अक्षराचा सूर ध्यानात ठेऊन, सतारीच्या स्वरांची बांधणी केली आहे आणि त्यात पुढे सारंगी आणि जलतरंग या वाद्यांना जोडून घेतले आहे. मनाची घालमेल ही, जलतरंग वाद्यातून किती सुरेख उमटली आहे आणि हे भाव दाखवताना कुठेही लय कठीण किंवा वरच्या सुरांत गेली आहे, असे दिसत नाही. रोशन यांच्या रचनेतील "संयत" भाव दिसतो, तो असा. 

हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी 
दिल में तुफान उठाते हुये, जजबात की रात 

इथे देखील रोशन यांची शब्दांप्रती दिसणारी जाणीव दिसते. "हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी" ही ओळ दोनदा घेतली आहे आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर काही सेकंद, सतार आणि जलतरंग यांचा स्वरमेळ ऐकायला मिळतो. पडद्यावर मधुबालेचा सलज्ज चेहरा आणि पार्श्वभागी जलतरंग वाद्याचे सूर!! "दिल में तुफान" इथे रचना किंचित वरच्या सुरांत जाते ती केवळ "तुफान" या शब्दाचे सूचन करण्यासाठी परंतु पुढल्या क्षणी चाल परत मूळ स्वरलयीशी जुळवून घेते. रचना परत, पहिल्या ओळीशी - "जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात"  येते पण ही ओळ घेताना, मोहमद रफी "बरसात" हा शब्द कसा घेतो हे खास ऐकण्यासारखे आहे. आवाजात किंचित थरथर आहे पण कुठेही नाटकीपणा नाही. आता, पडद्यावरील भारत भूषणच्या चेहऱ्यावरील रेषा देखील हलत नाही, हा या गाण्याचा भीषण विपर्यास आहे, तो भाग वेगळा!!

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका 
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका 
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात 

या ओळी गाताना, लय जरा खालच्या पट्टीत गेली आहे आणि या ओळी वाचल्या की लगेच याचे उत्तर आपल्याला मिळेल. या गाण्यात, प्रत्येक कडव्याची पहिली ओळ संपल्यावर. रोशन यांनी जलतरंग वाद्याच्या सुरांनी अप्रतिम जोडकाम केले आहे जेणेकरून, ओळीचा अर्थ आपल्याला अधिक सुंदररीत्या लक्षात यावा. वाद्यमेळ अक्षरश: एखाद, दोन सेकंदाचा आहे पण अर्थपूर्ण आहे. हे शब्द देखील काय अप्रतिम आहेत. "लिपटना" च्या जोडीला "सिमटना" घेऊन, प्रणयाचा रंग भलताच सुरेख रंगवला आहे. मी सुरवातीला म्हटले आहे, "संयत" हा रोशन यांच्या संगीताचा स्थायीभाव आहे आणि तो इथे नेमका आढळतो. कडव्याची शेवटची ओळ पुन्हा वरच्या सुरांत सुरु होते पण पुढल्या क्षणी चाल खालच्या सुरांत येते. "शर्म से बलखा" हे शब्द कसे गायले गेलेत हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. 

सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने 
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने 
आग पानी मे लगाते हुये हालात की रात 

सगळे गाणे हे केवळ काही मिनिटांच्या दृष्टीक्षेपावर आधारित आहे, जिथे एकही शब्दाचा संवाद नाही, अशा अनोख्या भेटीवर हे गाणे बेतलेले आहे. त्यामुळे, चित्रपटाचा नायक कवी प्रकृतीचा असल्याने, मनात उमटणाऱ्या निरनिराळ्या प्रतिमांचे आवर्तन, साहीरच्या कवितेतून वाचायला मिळते. अचानक नजरेसमोर तरुण येतो आणि त्यामुळे मनाची झालेली घालमेल "सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने" या ओळीतून व्यक्त होते आणि त्या सलज्ज असहायतेतून झालेली दृष्टीभेट, नायकाच्या मनात कल्लोळ उठवते. 

मेरे नग्मो में बसती है वो तसवीर थी वो 
नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो 
आसमानो से उतर आई थी जो रात की रात 

चित्रपटातील नायक, कवी असल्याने, गाण्याचा शेवट देखील, "मेरे नग्मो में बसती है" याच शब्दांनी होणे उचित ठरते. साहीर कवी म्हणून काय दर्जाचा होता, हे बघण्यासारखे आहे. "नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो " इथे, "हसीन ख्वाब" च्या जोडीला "ताबीर" हाच शब्द यायला हवा. तिथे दुसरा कुठलाही शब्द उपरा ठरेल आणि अशी अपरिहार्यता जेंव्हा कवितेत येते, तिथे ती कविता "काव्य" म्हणून श्रेष्ठ ठरते. एक उदाहरण, पु.शि. रेग्यांच्या "त्रिधा राधा" कवितेत, "क्षेत्र साळीचे" असे शब्द येतात, तेंव्हा "क्षेत्र" हे "साळी"चेच असायला हवे, असे होते. तिथे दुसरा पर्याय नाही. 
सगळेच गाणे एका सुंदर लयीत बांधलेले आहे, कुठेही कुठलेच वाद्य "बेसूर" तर नाहीच पण, एखादा स्वर वाढवला तर, असला विचार देखील मनाला शिवत नाही. गाण्याची घट्ट बांधणी अशीच असावी लागते. या कडव्यानंतर गाणे परत ध्रुवपदावर येते आणि आपल्या मनात केवळ मधुबाला रहात नसून स्वर आणि शब्दांच्या आकृतीने निर्माण केलेला  नितांतरमणीय आविष्कार  आपल्या मनात उतरत जातो. कुठल्याही गाण्याची सांगता यापेक्षा वेगळी होणे उचित नाही. 

Saturday, 16 April 2016

सीने में सुलगते हैं अरमान

कुठल्याही गाण्यात प्राथमिक स्तरावर ३ घटक येतात आणि यातील एक जरी घटक सक्षम नसला तर सादर होणारा आविष्कार फसतो. अर्थात, यात शब्दकळा, संगीतरचना आणि गायन हेच ते मुलभूत घटक. असे फारच तुरळकपणे घडते, गाण्यात तीनही घटक तुल्यबळ आहेत आणि नेमके कुठल्या घटकाचा आस्वाद आपल्यावर असर करतो याबाबत आपली संभ्रमावस्था व्हावी. एक तर नक्की, सुगम संगीत हा अभिजात आविष्कार नव्हे. तो मान रागदारी संगीताकडे जातो. त्यामुळे, सुगम संगीत (यात चित्रपट संगीत येते) सादर होताना, एकतर शब्दांची मोडतोड होणे, किंवा संगीत रचना तकलादू होणे किंवा गायन फसणे, या गोष्टी बरेचवेळा घडतात. बहुतेक गाण्यांत, संगीत रचनेचा आणि गायनाचा प्रभाव हा अवश्यमेव होतो, विशेषत: वाद्यसंगीताचा प्रभाव लक्षणीय असतो. चित्रपट गीतांत हा विशेष अधिक दिसून येतो आणि याचे मुख्य कारण, पडद्यावर सादर होणारा प्रसंग. प्रसंगानुरूप संगीतरचना करणे, हे संगीतकाराचे प्राथमिक कर्तव्य ठरते. 
हिंदी चित्रपट गीतांचा विचार केल्यास, दर दहा, बारा वर्षांनी, गाण्यांच्या रचनेचा ढाचा बदलत गेला आहे आणि त्यामागे संगीतरचनेतील बदल हाच विशेष राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना, मला, "तराना" चित्रपटातील "सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे फार वेगळी रचना वाटते. 
१९५१ साली आलेला तराना चित्रपट तसा अगदी साधा, ढोबळ विषयावर आधारित आहे. परंतु चित्रपटात, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा अभिनय हे खास वैशिष्ट्य होते. अर्थात, आज विचार करायला बसलो तर, या दोघांपेक्षा या चित्रपटातील गाणी, हाच विशेष मनाला अधिक भावतो. त्या काळाचा थोडा त्रयस्थतेने विचार केला तर त्यावेळी चित्रपटात गाण्यांना प्राधान्य होते आणि असे कितीतरी चित्रपट सांगता येतील ज्यांनी चित्रपटातील केवळ असामान्य गाण्यांमुळे भरपूर धंदा केला आहे. अर्थात हा विषय वेगळा आहे. 
"सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे खऱ्याअर्थाने युगुलगीत म्हणता येईल. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांनी, लताबाई आणि तलत यांच्या गायकीचा नेमका विचार करून त्यांच्याकडून आपल्या संगीतरचनेचा अप्रतिम आविष्कार सादर केलेला आहे. अनिल बिस्वास यांचे अगदी थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास,  पाश्चिमात्य संगीतातील काही तत्वे जाणून घेऊन, त्याचा भारतीय तत्वांशी सांधा जोडला. विशेषत: "पियानो", "गिटार" इत्यादी वाद्यांचा रचनांत केलेला सढळ वापर. अर्थात, एकूणच त्यांचा आग्रह भारतीयत्वाचाच राहिला. गीताला रागाधार घ्यायचा परंतु पुढे रचना स्वतंत्र करायची, या पद्धतीचा त्यांनी प्रामुख्याने अवलंब केला, जे  संगीतकारांच्या पुढील पिढ्यांचे वैशिष्ट्य ठरले. तसेच नवीन आवाजांना पुढे आणणे - तलत आणि मुकेश हे आवाज अनिल बिस्वास यांनी लोकांच्या पुढे आणले तसेच लताबाईंना, नूरजहानच्या प्रभावातून मोकळे केले. हा विशेष चित्रपट संगीताच्या दृष्टीने दूरगामी ठरला. 

याचेच रडू आले की जमले मला न रडणेही 
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते! 

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो 
मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते! 

कवी सुरेश भटांच्या या ओळी, या गाण्यातील भावनेशी बऱ्याच प्रमाणात नाते सांगतात. चित्रपटातील गाण्याची शब्दकळा, प्रेम धवन यांची आहे.मी लेखाची सुरवात या वेळेस, थोडी तांत्रिक अंगाने केली यामागे मुख्य कारण, संगीतकार अनिल बिस्वास. या संगीतकाराची सगळी कारकीर्द जरा बारकाईने न्याहाळली तर एक वैशिष्ट्य लगेच जाणवते. गाण्यात गायकी अंग असून देखील, गाणे ही गीताच्या अंगाने फुलवले आहे आणि तसे करताना, शब्दांना फारसे कुठे दुखावलेले नाही. अर्थात अपवाद हे सर्वत्र असतातच. रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, लयीच्या अंगाने गाणे कसे फुलवावे, यासाठी प्रस्तुत गाणे हे अप्रतिम उदाहरण आहे. गाण्याची चाल यमन/यमन कल्याण रागावर आहे पण गाण्याच्या चालीवर रागाची केवळ सावली आहे. 
अनिल बिस्वास जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत आले, तेंव्हा चित्रपट संगीतावर मराठी रंगभूमी आणि पारशी रंगभूमी, या दोघांचा प्रभाव होता परंतु अनिल बिस्वास यांनी, गीताला खऱ्याअर्थाने "गीतधर्मी" बनविले. बंगाली लोकसंगीताबरोबर, स्वरलिपी आणि वाद्यमेळ या संकल्पना त्यानी ठामपणे रुजवल्या. प्रस्तुत गाण्यात याच सगळ्या बाबींचा आढळ सापडतो. 
या गाण्यात "चमत्कृती" अजिबात नाही किंवा अवघड हरकती तसेच ताना नाहीत पण चालीत जो काही अश्रुत गोडवा आहे, तो असामान्य आहे. गाण्याची चाल आणि वाद्यमेळ एकमेकांशी संपूर्णपणे तादात्म्य पावले आहेत. वाद्यमेळातील कुठलाही सूर इतका बांधीव,घट्ट आहे की  कुठे स्वरांची लांबी वाढवली तर सगळ्या आविष्काराचा डौल बिघडेल. हाच प्रकार गायनातून दिसून येतो. युगुलगान कसे गावे, याचा हे  आदिनमुना आहे. लताबाईंचा प्रत्येक स्वर हा तलतच्या पट्टीशी  जुळलेला आहे. गाण्यात कुठेही जरासा देखील सवंगपणा आही किंवा बेसुरेपण तर औषधाला देखील नाही. 
सर्वसाधारणपणे गाणे गाताना, गाण्यातील पहिल्या दोन ओळी नेहमी अचूक शब्दोच्चाराने गायल्या जातात परंतु गाण्यात परत त्या ओळी गाताना, कुठेतरी किंचित ढिसाळ वृत्ती अवतरते. कुठे एखाद्या अक्षराचे वजन घसरते किंवा शब्द तोडला जातो इत्यादी. या गाण्यात असले काहीही घडत नाही. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांचे हे लक्षणीय यश. गायकाकडून कशा प्रकारे गावून घ्यायचे जेणेकरून, रचना अधिकाधिक समृद्ध होत जाईल, याकडे अनिल बिस्वास यांनी कायम लक्ष दिले.  
सीने में सुलगते हैं अरमान 
आंखो में उदासी छायी है 
ये आज तेरी दुनिया से हमें 
तकदीर कहां ले आई हैं 
या ओळी ऐकताना आपल्याला सतत जाणवत राहते, शब्दांचे सूर आणि वाद्यमेळाचे एकमेकांशी संपूर्णपणे संवादी आहेत, लय तर सारखीच आहे पण स्वरांचे वजन देखील त्याचप्रमाणात तोलले गेले आहे. बरेचवेळा असे घडते, गाण्यात प्रयोग करायचे म्हणून गाण्याची चाल आणि वाद्यमेळ यांच्यात फरक केला जातो परंतु अंतिमत: दोन्ही सूर एकत्र आणून सम गाठली जाते. आणि बिस्वास यांच्या रचनेत असले प्रयोग आढळत नाहीत, असतो तो सगळा भर मेलडी आणी त्याला अनुषंगून राहणाऱ्या स्वररचनेवर. इथे व्हायोलीन वाद्याचे स्वर आहेत पण त्या स्वरांची जातकुळी शाब्दिक रचनेशी नेमकेपणाने सांधून घेतलेली आहे. परिणाम असा होतो, ओळीतील आशय अधिक खोल जाणवतो. 
मुळात तलत मेहमूद यांचा मृदू स्वर असल्याने, गाण्याची ठेवण देखील त्याच अंगाने केली आहे. गाण्यात आणखी एक बाब सांगण्यासारखी आहे. गायन सुरेल असणे, हे तर फार प्राथमिक झाले परंतु गाताना, एकमेकांच्या गळ्याची "जात" ओळखून गायन करणे, याला देखील अतिशय महत्व असते. लताबाईंचा तारता पल्ला जरी विस्तृत असला तरी इथे त्याच्यावर योग्य संयम घालून, तलतच्या गायकीशी अतिशय सुंदररीत्या जुळवून घेतला आहे. म्हणूनच मघाशी मी म्हटले, युगुलगायन कसे असावे, यासाठी हे गाणे सुंदर उदाहरण ठरते. 

कुछ आंख में आंसू बाकी हैं 
जो मेरे गम के साथी हैं 
अब दिल हैं ना दिल के अरमां हैं 
बस मैं हुं मेरी तनहाई है 
या ओळी ऐकण्याआधी, मधल्या स्वरिक वाक्यांशात व्हायोलीनचे स्वर किंचित वरच्या पट्टीत गेले आहेत आणि तोच स्वर लता बाईंनी उचलून घेतला आहे. स्वर उचलून घेताना, तो स्वर ताणला जाणार नाही याची काळजी घेतली असल्याने, "मूळ" स्वररचनेशी संवाद साधला जातो. गाण्यांमध्ये अशीच छोटी सौंदर्यस्थळे असतात, जेणेकरून रचना अर्थपूर्ण होत जाते. संगीतकाराचे "कुलशील" इथे समजून घेता येते. गाण्यात स्वरांचे "वर-खाली" होणे क्रमप्राप्तच असते परंतु स्वरांतील ही "अटळ" बाब "टाळून" गायन करणे, खरे कौशल्याचे असते आणि फार अवघड असते. 

ना तुझ से गिला कोई हमको 
ना कोई शिकायत दुनिया से 
दो चार कदम जब मंझील थी 
किस्मत ने ठोकर खाई है 
गाण्यात धृवपद धरून चार, चारओळींचे चार खंड आहेत आणि प्रत्येकी दोन खंड प्रत्येकाला गायला मिळाले आहेत. इथे शब्दांतील आशय जाणून घेऊन, त्याप्रमाणे गायकांना गायला दिले गेले आहेत. अर्थात, हे देखील फार प्राथमिक झाले कारण बहुतेक सुंदर गाण्यात हा विचार नेहमीच दिसतो. मग या गाण्यात आणखी काय वेगळे आहे? या गाण्यातील दु:खाची प्रत काही जगावेगळी नाही किंवा शब्दकळा देखील अत्युच्च दर्जाची नाही. खरतर चित्रपट गीतात त्याची फारशी गरज देखील नसते. रचनेच्या लयीत शब्द चपखल बसणे, ही स्वररचनेच्या दृष्टीने आणि गायनाच्या दृष्टीने देखील अत्यावश्यक असते आणि ती गरज, ही शब्दकळा व्यवस्थित पुरवते. 
कुछ ऐसी आग लगी मन में 
जीने भी ना दे मरने भी ना दे 
चूप हुं तो कलेजा जलता है 
बोलुं तो तेरी रूसवाई है. 
मी वरती जो प्रश्न विचारला आहे, याचे उत्तर गाण्याचे शेवटाला मिळते. गाण्याच्या शेवट करताना, गाण्याचे ध्रुवपद लताबाईंच्या आवाजात आहे. गाण्याच्या सुरवातीला याच ओळी आपल्याला तलत मेहमूदच्या आवाजात ऐकायला मिळतात. दोन्ही वेळेस, लय तीच आहे पण स्वररचनेत किंचित फरक आहे. अर्थात, स्वररचना बदलली तरी देखील आशयाच्या अभिवृद्धीत काहीही फरक पडला आणि, किंबहुना लताबाईंच्या आवाजात याच ओळी अधिक गहिऱ्या होतात आणि गाण्यातील दु:खाची प्रत एकदम वेगळी होते. हे असे करताना, परत एकदा, शब्दांची कुठेही ओढाताण नाही, हे लगेच जाणवते. "चूप हुं तो कलेजा जलता है, बोलुं तो तेरी रूसवाई है. " या ओळी ऐकताना आपल्याला केवळ गायकी(च) दिसते असे नसून त्यामागे असलेला संगीतकारचा विचार देखील जाणवतो. मला वाटते यामुळेच हे गाणे हिंदी चित्रपट गीताच्या नामावळीत आढळ स्थान प्राप्त करून राहिले आहे. 

वक्त ने किया, क्या हंसी सितम

दोन कलासक्त जीव. एका औपचारिक प्रसंगातून ओळख होते, हळूहळू गाठ भेटी होतात, मने अनुरक्त होतात आणि मानसिक गुंतवणूक होते. कलेच्या माध्यमातून जवळीक निर्माण होते. पुरुष आधीच लग्नबंधातअडकलेला असल्याने, एका मर्यादेच्या पलीकडे स्नेहबंध वाढू शकत नाहीत. एव्हाना, स्त्री तिच्या कलाविश्वात यशाची नवीन शिखरे गाठत राहते आणि पुरुष मात्र अपयशाचा धनी!! त्यातून निर्माण होते ती अटळ मानसिक तडफड आणि दुरावा. अशाच एका विरक्त संध्यासमयी, या दोघांची अचानक गाठभेट होते. पूर्वीच्या आठवणी मनात येतात पण आता आपण कधीही जवळ येऊ शकणार नाही, ही जळजळीत जाणीव आतून पोखरत असते. आज, स्त्री यशाच्या शिखरावर असते तर पुरुष अपयशाच्या भोवऱ्यात भिरभिरत असतो. "कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाट जळे उंबऱ्याशी दिवा रात रात धुक्याच्या दिशेला खिळे शुन्य दृष्टी किती उर ठेवू व्यथा गात गात" आरतीप्रभूंच्या या कवितेतील ओळी, वरील प्रसंग अधिक खोलवर सांगून जातो. "वक्त ने किया, क्या हंसी सितम' या गाण्याच्या संदर्भात तर या ओळी फारच चपखल बसतात. हिंदी चित्रपटातील एक अजरामर गाणे. सर्वसाधारणपणे हिंदी चित्रपटात, गाण्याचे चित्रण बरेचवेळा सरधोपट वृत्तीने केले जाते. चित्रपटात गाण्याचे अपरिमित असूनदेखील त्याचे चित्रीकरण "बाळबोध" करायचे, हा विरोधाभास असतो!! याला सणसणीत अपवाद म्हणजे "कागज के फुल' चा दिग्दर्शक गुरुदत्त. गुरुदत्तने कुठल्याही गाण्याचे चित्रीकरण कधीही मळलेल्या वाटेने केले नाही. कथा, सादरीकरण, अभिनय, Camera Work, काव्य, संगीत सगळ्याच दृष्टीकोनातून "कागज के फुल" हा चित्रपट अप्रतिम असून देखील, त्या काळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला!! हे कधीही न सुटणारे कोडे आहे. प्रस्तुत गाण्याचे चित्रीकरण तर खास अभ्यासाचा भाग ठरवा, इतके अप्रतिम आहे. संगीतकार सचिन देव बर्मन, यांच्या संगीताची खासियत सांगायची झाल्यास, चित्रपट बघून त्याप्रमाणे, आपल्या गाण्यांची रचना करण्याचे कौशल्य केवळ "बेमिसाल" असेच म्हणावे लागेल. प्रसंगी, काव्यानुरूप रचना बदलण्यासाठी त्यांनी कधीही मागे पुढे बघितले नाही. संपूर्ण गाणे, हे पार्श्वगीत आहे, सगळा आशय केवळ चेहऱ्यावर वाचता येईल, इतका अमूर्त अभिनय बघायला मिळतो. गाण्याची सुरवातच मुळी. संथ लयीतील पियानो आणि व्हायोलीन वाद्यांच्या सुरांतून होते. हा स्वरमेळ खास ऐकण्यासारखा आहे, व्हायलीनचे स्वर हे पार्श्वभागी वाजत असतात तर पियानोचे स्वर प्रमुख आहेत. पुढे त्यात, पुढे त्यात बासरीचे स्वर मिसळताना, पडद्यावर विस्तीर्ण अशा स्टुडियोचा अवकाश दिसतो आणि सुरवातीला एकमेकांच्या समीप असलेले दोघे, दूरस्थ होत जातात. या हालचालींना, ज्या प्रकारे वाद्यमेळाचे सूर साथ देतात, हा असामान्य स्वरिक अनुभव आहे आणि पुढे ऐकायला मिळणाऱ्या रचनेची "नांदी" आहे!! वाद्यमेळ इतक्या संथ आणि खालच्या सुरांत वाजत असतो की त्यातून व्यक्त होणारी अव्यक्त भावना अटळपणे आपल्या मनात झिरपते. संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन किती श्रेष्ठ आहेत, याचा हा आदीनमुना!! "वक्त ने किया क्या हंसी सितम तुम रहे ना तुम, हम रहे ना हम". गायिका गीता दत्त इथे अवतरते, तिचा आवाज देखील ठाय लयीत आणि मंद्र सुरांत लागलेला आहे. अति व्याकूळ स्वर आहेत आणि सुरवातीच्या वाद्यमेळाच्या सुरांची संगत धरून ठेवणारे आहेत. ऐकणाऱ्याच्या मनावर गडद परिणाम घडवून आणणारे आहेत. खरतर सगळे गाणे हे विरही भावनांचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करणारे आहे. गायिका गायला सुरवात करते तेंव्हा साथीला पार्श्वभागी बेस गिटार आणि पियानोचे स्वर आहेत पण त्या स्वरांचे अस्तित्व तसे नाममात्र आहेत. गीता दत्त, आपल्या गूढ, आर्त सुरांनी असते. किंचित बंगाली गोलाई असलेला स्वर पण प्रसंगी आवाजाला टोक देण्याची क्षमता असल्याने, गायन अतिशय भावनापूर्ण होते. पहिला अंतरा यायच्या आधी, व्हायोलीन वाद्यांचे स्वर कसे बांधले आहेत, ते मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. "ऑर्केस्ट्रा" पद्धतीचा सुरेख वापर केलेला आहे. वाद्यमेळाची रचना करताना, व्हायोलीन वादकांचे दोन भाग केले आहेत आणि त्यानुरूप रचना सजवली आहे. एक भाग मंद्र सप्तकात वाजत आहे तर दुसरा भाग तार सप्तकात वाजत आहे. तार सप्तकात जे व्हायोलीनचे सूर आहेत, त्यातून रिकाम्या,ओसाड स्टुडियोची प्रचीती येते तर खालच्या सुरांत वाजत असलेल्या सुरावटीने, पडद्यावरील अभिनेत्यांच्या तरल अभिव्यक्ती निर्देशित होतात. "बेकरार दिल इस तरह मिले जिस तरह कभी, हम जुदा ना थे तुम भी खो गये, हम भी खो गये एक राह पर चल के दो कदम". "इस तरह मिले" हे शब्द गाताना, "तरह" हा शब्द, आवाजात किंचित थरथर आणून गायला गेला आहे, परिणाम काव्यातील आशय खोल व्यक्त होणे. संगीतकाराला काव्याची नेमकी जाण असेल तर तो स्वररचनेतून किती प्रकारची अनुभूती रसिकांना देऊ शकतो, हे ऐकण्यासारखे(च) आहे. या गाण्याचा वाद्यमेळ ऐकताना, प्रत्येक शब्दानंतर व्हायोलीन वाद्याचे स्वर ऐकायलाच हवेत. व्याकुळता केवळ गायकीतून स्पष्ट न करता, वाद्यमेळातून देखील तितक्याच परिणामकारकरीत्या अधोरेखित केली जाते. हे फार, फार कठीण आहे. गाणे सजवणे म्हणजे काय, याचा हा रोकडा अनुभव आहे. "एक राह पर चल के दो कदम' ही ओळ जेंव्हा पडद्यावर येते, त्यावेळी, वरून प्रकाशाचा झगझगीत झोत येतो आणि त्या झोतात, पडद्यावरील अभिनेत्यांच्या "प्रतिकृती" सामावल्या जातात. हा प्रकार केवळ अप्रतिम आहे. दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त काय ताकदीचा होता, हे दर्शवून देणारे हे गाणे आहे. प्रकाशाच्या झोतात, व्यक्तीच्या प्रतिमा मिसळणे, ही कल्पनाच अनोखी आणि काव्यमय आहे. गमतीचा भाग पुढे आहे. ही ओळ संपते आणि आपल्याला लगेच गाण्याच्या सुरवातीची ओळ "वक्त ने किया, क्या हंसी सितम" हे ऐकायला मिळते. या दोन्ही ओळींतील विरोधाभास ज्या प्रकारे चित्रिकरणा मधून तसेच सांगीतिक वाक्यांशातून दर्शवला गेला आहे, असे भाग्य निदान हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत फारच तुरळक आढळते. सगळे गाणे म्हणजे छायाप्रकाशाचा मनोरम खेळ आहे. गायिका म्हणून गीता दत्तच्या आवाजाला मर्यादा आहेत. शक्यतो गुंतागुंतीच्या हरकती, तिच्या गळ्याला शोभत नाहीत परंतु मुळातले नैसर्गिक हळवेपण तसेच भावपूर्ण आवाज, यामुळे तिचे गायन अतिशय अर्थपूर्ण होते. आवाजात किंचित कंप आहे आणि तो कंप तिला, विविध प्रकारची गाणी गाण्यासाठी उपयोगी पडला.संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांची कामगिरी मात्र अतुलनीय अशीच म्हणायला हवी. हिंदी चित्रपट गाण्यांत जेंव्हा रागदारी संगीताचा प्रभाव होता (अर्थात काही संगीतकार याला अपवाद होते) तेंव्हा लोकसंगीताचा आधार घेऊन, चित्रपट गीतांना नवीन पेहराव दिला. "जायेंगे कहां, सुझता नहीं चल पडे मगर रास्ता नहीं क्या तलाश है, कुछ पता नहीं बुन रहे है दिन ख्वाब दम-ब-दम" इथे कैफी आझमी, कवी म्हणून फार वरची पातळी गाठतात. वरील ओळींमधील शेवटच्या दोन ओळी म्हणजे या गाण्याचा "अर्क" आहे. सगळी हताशता, मानसिक तडफड तसेच आतडे तुटण्याचा क्षण, सगळ्या भावना या दोन ओळींत सामावलेल्या आहेत. आत्ता या क्षणी आपण एकत्र आहोत, जवळ आहोत पण हे सगळे तात्पुरते आहे आणि एकदा हा क्षण विझला की परत आपण, आपल्या वाटांवर मार्गस्थ होणार आहोत. गाण्याच्या शेवटी आपल्याला पडद्यावर हेच दिसते. प्रश्न असा, हेच जर अटळ आहे, तर आपण आज एकत्र तरी का आलो? जी.ए. कुलकर्ण्यांच्या "प्रवासी" कथेत एक सुंदर वाक्य आहे. "इतरांचे प्रवास संपतात पण रस्ता मात्र अविरतपणे तसाच राहतो. आपला मात्र रस्ता संपला आहे पण प्रवास तसाच चालूच राहणार आहे!" इथे या दोन व्यक्तींचे असेच झाले आहे, जवळ येण्याचे सौख्य नाही पण आयुष्य मात्र निरसपणे चालूच रहाणार आहे. या चक्रव्यूहातून आता या दोघांपैकी कुणाचीही सुटका नाही आणि या अंतस्थ तडफडीचे जळजळीत वास्तव समजून घेणे, हेच या गाण्याचे खरे सौंदर्य.

सपना बन साजन आये



माझ्या तरुणपणी, मला अचानक, दुर्मिळ हिंदी गाणी जमविण्याचे "खूळ" मला लागले होते. "खूळ" अशा साठी म्हटले कारण नंतर काही वर्षांनी मला समजले की "दुर्मिळतेच्या" नावाखाली काही साधारण स्वरुपाची गाणी गोळा केली गेली. अर्थात, ही समज यायला काही वर्षे जावी लागली. अशाच काळात मला हे गाणे अवचित सापडले, वास्तविक जमालसेन हे नाव आता कितीजणांना ठाऊक असेल मला शंका आहे. त्यावेळी, १]शामसुंदर, २] विनोद,, ३] जगमोहन आणि असे अनेक संगीतकार माझी श्रवणयात्रा श्रवणीय करून गेले.  
"शोखिया"चित्रपटातील हे गाणे. सुरैय्या आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा, चित्रपट, चित्रपट म्हणून काही खास नव्हता, जवळपास सरधोपट म्हणावा, इतपतच हा चित्रपट होता परंतु या चित्रपटाला जी काही थोडीफार लोकप्रियता लाभली ती केवळ श्रवणीय गाण्यांमुळे. खरतर केदार शर्मांसारखा जाणता दिग्दर्शक असून, चित्रपट सर्वसाधारण प्रकृतीचा निघाला. या चित्रपटात इतकी सुंदर गाणी असून देखील हा चित्रपट काळाच्या ओघात विसरला जावा!! याच काळात, केवळ गाण्यांवर तरलेले असंख्य चित्रपट निघत होते आणि त्यांनी अमाप लोकप्रियता प्राप्त केली. असे देखील असू शकेल, अत्यंत ढोबळ कथानक, प्राथमिक दर्जाचा अभिनय आणि कथेची विस्कळीत मांडणी इत्यादी गोष्टींमुळे हा चित्रपट विस्मरणात गेला. 
"मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी;
गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या, शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी". 
कविवर्य बोरकरांनी, या ओळींतून जो आशय व्यक्त केला आहे त्याचीच प्रतिकृती जणू "सपना बन साजन आये" या गाण्यातून व्यक्त होते. जरा खोलवर विचार केला तर गाण्यातील शब्द देखील याच आशयाशी जुळणारे आहेत. केदार शर्मांचीच शब्दकळा आहे.
आता सरळ गाण्याकडे वळायचे झाल्यास, लता अगदी तरुण असतानाचे हे गाणे आहे. आवाजाची कोवळीक, लगेच गायनाचे वय दाखवून जाते."सोयी कलिया हस पडी, झुके लाजसे नैन, बिना की झनकार मे तरपन लागे रैन" अशा ओळीने हे गाणे सुरु होते. कुठेही ताल वाद्य नसून, पार्श्वभागी हलकेसे व्हायोलीन आणि बासरीचे तसेच गिटारचे मंद सूर!! परंतु त्याच सुरांनी रचनेची ओळख होते. इथे बघा, "झनकार" शब्द उच्चारताना, "झन" आणि "कार" असा विभागून गाताना, छोटासा आकार लावला आहे तसेच "लागे' म्हणताना, "ला" वर असाच बारीक आकार आहे पण तिथेच लताच्या आवाजाची कोवळीक ऐकायला मिळते आणि आकार लावताना, झऱ्याचे पाणी उतरणीवर यावे त्याप्रमाणे हळुवारपणे ती हरकत समेवर येते.वास्तविक इथे "सम" अशी नाही परंतु ज्या सुरांवर रचना सुरु होते, त्याच सुरांवर रचनेचे सूर परत येतात, ते हेच दर्शविण्यासाठी - "सोयी कलिया हस पडी" या शब्दांचा आशय व्यक्त करण्यासाठी!! 
लगेच "सपना बन साजन आये, हम देख देख मुसकाये, ये नैना भर आये, शरमाये" हि ओळ सुरु होते. इथे संगीतकाराने कमालीच्या हळुवारपणे पार्श्वभागी बासरीचे सूर वापरलेत. "मुसकाये" म्हणताना, वाटणारी मुग्ध लाज, पुढे "शरमाये" या शब्दाच्या वेळी अत्यंत आर्जवी होते आणि आर्जवीपण बासरीच्या मृदू स्वरांनी कशिदाकाम केल्याप्रमाणे शब्दांच्या बरोबरीने ऐकायला मिळते आणि ही रचना अधिक समृद्ध होत जाते. 
आपल्याकडे एक विचार नेहमी मांडला जातो, तीन मिनिटांच्या गाण्यात वैचारिक भाग फारसा अनुभवायला मिळत नाही पण अशी माणसे मनाचे कोपरे फार कोतेपणाने बंद करून टाकीत असतात. आता, वरील ओळीच्या संदर्भात, "शरमाये" या शब्दाबरोबर ऐकायला येणारी बासरीची धून कशी मन लुभावून जाते, हे अनुभवण्यासारखे आहे. काही सेकंदाचा "पीस" आहे परंतु त्याने गाणे एकदम वरच्या पातळीवर जाते. 
पहिल्या अंतऱ्यानंतर, व्हायोलीन एक गत सुरु होते आणि त्याच्या पाठीमागे अति मंजुळ आणि हलक्या आवाजात छोट्या झांजेचे आवाज येतात, हलक्या आवाजात म्हणजे फार बारकाईने ऐकले तरच ऐकायला येतात. व्हायोलीनची गात, तुकड्या तुकड्याने जिथे खंडित होते, तिथे झांजेचा आवाज येतो आणि तो सांगीतिक वाक्यांश उठावदार करतो. हे जे कौशल्य असते, तिथे संगीतकाराची बुद्धीमत्ता दिसते. रचना भरीव कशी करायची, ज्यामुळे मुळातली सुरवातीची चाल, पुढे विस्तारत असताना, अशा जोडकामाने भरजरी वस्त्र सोन्याच्या बारीक धाग्याने अधिक श्रीमंत व्हावे, असे ते संगीत काम असते आणि हे बहुतेक सगळ्याच गाण्यात असते पण आपण तिथे फारसे लक्ष देत नाही, हे दुदैव!! 
पुढील कडवे,"बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर , झुले खूब झुलाये, ये नैना भर आये, शरमाये!!" इथे लताची गायकी कशी समृद्ध होते बघा.  "बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर" ही ओळ आधीच्या पहिल्या ध्रुवपदाच्या चालीला सुसंगत आहे पण, नंतर, "झुले खूब झुलाये" म्हणताना, आवाजाला जो "हेलकावा" दिला आहे किंवा आपण "हिंदोळा" म्हणू, तो केवळ जीवघेणा आहे. शब्दांची मर्यादा दाखवून देणारा!! 
वास्तविक मधल्या अंतऱ्यात फारसे प्रयोग नाहीत, म्हणजे मुळातली चालच अति गोड असल्याने, त्या चालीला अनुलक्षून अंतरे बांधले आहेत. "नील गगन के सुंदर तारे चून लिये फुल समझ अति न्यारे, झोली मे भर लाये" इथे, "झोली मे भर लाये" हे शब्द म्हणताना, लाटणे आवाजात एक छोटासा "खटका" घेतला आहे पण तो कुठेही लयीत खटकत नाही, हे त्या आवाजाचे मार्दव!! वास्तविक, या कडव्याची सुरवात थोड्या वरच्या पट्टीत आहे परंतु शेवटची ओळ दुसऱ्यांदा म्हणताना, लय परत समेच्या सूरांकडे वळते, ती तिथे तो :खटका" घेऊन!! लताचे गाणे हे असे फुलत असते जे पहिल्या श्रवणात फारसे जाणवत नाही परंतु नंतर प्रत्येक घटक वेगवेगळा घेऊन ऐकायला लागलो की आपल्याला हातात केवळ शरणागती असते!! 
"मस्त पवन थी हम थे अकेले, झिलमील कर बरखा संग खेले; फुले नही समाये, ये नैना भर आये" हे गाताना, लताची शब्दामागील जाणीव अनुभवण्यासारखी आहे. "मस्त पवन थी" या शब्दांचा सांगीतिक आशय किती मृदू स्वरांतून ऐकायला मिळतो, खरेतर सगळे गाणेच हे अतिशय मुग्ध परंतु संयत प्रणयाचा आविष्कार आहे. नायिका, वयाने "नवोढा" आहे, पहिल्या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि त्यातून हे सूर उत्फुल्लपणे उमटले आहेत, इथे "उमटले" हा शब्दच योग्य आहे, कारण इथे भावनेत तोच आशय आविष्कृत झालेला आहे. मनापासूनची विशुद्ध प्रेमाची भावना, ज्याला थोडेशी अल्लड भावना, असे देखील म्हणता येईल, अशा भावनेचे शब्दचित्र आहे. त्यामुळे चाल बांधताना आणि गाताना कुठेही सूर, मुग्धता सोडून जाणार नाहीत, याचेच भान संगीतकाराने आणि गायिकेने नेमकेपणाने राखले आहे. 
खरतर हे गाणे ऐकताना मला असेच वाटत होते, हल्लीच्या जमान्यात असे शांत, संयत गाणे कितपत पचनी पडू शकेल परंतु जेंव्हा हे गाणे मी जवळपास ८ वर्षांनी ऐकले आणि मला त्यात अजुनही तशीच "ताजगी" आढळली. या गाण्यात कुठेही अति वक्र ताना नाहीत की प्रयोगाचा अवलंब केलेला आहे पण मुळात हाताशी इतकी गोड चाल असल्यावर, अशा गोष्टींची गरजच पडत नाही, हेच खरे. ते स्वरांचे आर्जव, त्यामागील बासरीच्या मंजुळ हरकती, हेच या गाण्याचे खरे वैभव आहे आणि हेच वैशिष्ट्य, मला हे गाणे वारंवार ऐकायला भाग पडते. 
एक मजेदार किस्सा. फार पूर्वी, एका मैफिलीत, पंडित जितेंद्र अभिषेकींनी राग यमन सादर केला. साथीला अर्थात, त्यांचे शिष्य होते. गाताना, पंडितजींनी काहीशा वेगळ्या धर्तीच्या ताना घेतल्या आणि त्याचबरोबर लयीचे वेगळे बंध दाखवले. मैफिल संपल्यावर, शिष्यांनी पंडितजींना, या नवीन सादरीकरणाबद्दल विचारले असता, अत्यंत शांतपणे, पंडितजींनी, या गाण्याचा उल्लेख करून, या गाण्यातील लताबाईंच्या तानांचा उपयोग केला. चित्रपट गीत किती असामान्य माध्यम आहे, यासाठी आणखी वेगळे उदाहरण कशाला?