Saturday 16 April 2016

सीने में सुलगते हैं अरमान

कुठल्याही गाण्यात प्राथमिक स्तरावर ३ घटक येतात आणि यातील एक जरी घटक सक्षम नसला तर सादर होणारा आविष्कार फसतो. अर्थात, यात शब्दकळा, संगीतरचना आणि गायन हेच ते मुलभूत घटक. असे फारच तुरळकपणे घडते, गाण्यात तीनही घटक तुल्यबळ आहेत आणि नेमके कुठल्या घटकाचा आस्वाद आपल्यावर असर करतो याबाबत आपली संभ्रमावस्था व्हावी. एक तर नक्की, सुगम संगीत हा अभिजात आविष्कार नव्हे. तो मान रागदारी संगीताकडे जातो. त्यामुळे, सुगम संगीत (यात चित्रपट संगीत येते) सादर होताना, एकतर शब्दांची मोडतोड होणे, किंवा संगीत रचना तकलादू होणे किंवा गायन फसणे, या गोष्टी बरेचवेळा घडतात. बहुतेक गाण्यांत, संगीत रचनेचा आणि गायनाचा प्रभाव हा अवश्यमेव होतो, विशेषत: वाद्यसंगीताचा प्रभाव लक्षणीय असतो. चित्रपट गीतांत हा विशेष अधिक दिसून येतो आणि याचे मुख्य कारण, पडद्यावर सादर होणारा प्रसंग. प्रसंगानुरूप संगीतरचना करणे, हे संगीतकाराचे प्राथमिक कर्तव्य ठरते. 
हिंदी चित्रपट गीतांचा विचार केल्यास, दर दहा, बारा वर्षांनी, गाण्यांच्या रचनेचा ढाचा बदलत गेला आहे आणि त्यामागे संगीतरचनेतील बदल हाच विशेष राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना, मला, "तराना" चित्रपटातील "सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे फार वेगळी रचना वाटते. 
१९५१ साली आलेला तराना चित्रपट तसा अगदी साधा, ढोबळ विषयावर आधारित आहे. परंतु चित्रपटात, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा अभिनय हे खास वैशिष्ट्य होते. अर्थात, आज विचार करायला बसलो तर, या दोघांपेक्षा या चित्रपटातील गाणी, हाच विशेष मनाला अधिक भावतो. त्या काळाचा थोडा त्रयस्थतेने विचार केला तर त्यावेळी चित्रपटात गाण्यांना प्राधान्य होते आणि असे कितीतरी चित्रपट सांगता येतील ज्यांनी चित्रपटातील केवळ असामान्य गाण्यांमुळे भरपूर धंदा केला आहे. अर्थात हा विषय वेगळा आहे. 
"सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे खऱ्याअर्थाने युगुलगीत म्हणता येईल. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांनी, लताबाई आणि तलत यांच्या गायकीचा नेमका विचार करून त्यांच्याकडून आपल्या संगीतरचनेचा अप्रतिम आविष्कार सादर केलेला आहे. अनिल बिस्वास यांचे अगदी थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास,  पाश्चिमात्य संगीतातील काही तत्वे जाणून घेऊन, त्याचा भारतीय तत्वांशी सांधा जोडला. विशेषत: "पियानो", "गिटार" इत्यादी वाद्यांचा रचनांत केलेला सढळ वापर. अर्थात, एकूणच त्यांचा आग्रह भारतीयत्वाचाच राहिला. गीताला रागाधार घ्यायचा परंतु पुढे रचना स्वतंत्र करायची, या पद्धतीचा त्यांनी प्रामुख्याने अवलंब केला, जे  संगीतकारांच्या पुढील पिढ्यांचे वैशिष्ट्य ठरले. तसेच नवीन आवाजांना पुढे आणणे - तलत आणि मुकेश हे आवाज अनिल बिस्वास यांनी लोकांच्या पुढे आणले तसेच लताबाईंना, नूरजहानच्या प्रभावातून मोकळे केले. हा विशेष चित्रपट संगीताच्या दृष्टीने दूरगामी ठरला. 

याचेच रडू आले की जमले मला न रडणेही 
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते! 

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो 
मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते! 

कवी सुरेश भटांच्या या ओळी, या गाण्यातील भावनेशी बऱ्याच प्रमाणात नाते सांगतात. चित्रपटातील गाण्याची शब्दकळा, प्रेम धवन यांची आहे.मी लेखाची सुरवात या वेळेस, थोडी तांत्रिक अंगाने केली यामागे मुख्य कारण, संगीतकार अनिल बिस्वास. या संगीतकाराची सगळी कारकीर्द जरा बारकाईने न्याहाळली तर एक वैशिष्ट्य लगेच जाणवते. गाण्यात गायकी अंग असून देखील, गाणे ही गीताच्या अंगाने फुलवले आहे आणि तसे करताना, शब्दांना फारसे कुठे दुखावलेले नाही. अर्थात अपवाद हे सर्वत्र असतातच. रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, लयीच्या अंगाने गाणे कसे फुलवावे, यासाठी प्रस्तुत गाणे हे अप्रतिम उदाहरण आहे. गाण्याची चाल यमन/यमन कल्याण रागावर आहे पण गाण्याच्या चालीवर रागाची केवळ सावली आहे. 
अनिल बिस्वास जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत आले, तेंव्हा चित्रपट संगीतावर मराठी रंगभूमी आणि पारशी रंगभूमी, या दोघांचा प्रभाव होता परंतु अनिल बिस्वास यांनी, गीताला खऱ्याअर्थाने "गीतधर्मी" बनविले. बंगाली लोकसंगीताबरोबर, स्वरलिपी आणि वाद्यमेळ या संकल्पना त्यानी ठामपणे रुजवल्या. प्रस्तुत गाण्यात याच सगळ्या बाबींचा आढळ सापडतो. 
या गाण्यात "चमत्कृती" अजिबात नाही किंवा अवघड हरकती तसेच ताना नाहीत पण चालीत जो काही अश्रुत गोडवा आहे, तो असामान्य आहे. गाण्याची चाल आणि वाद्यमेळ एकमेकांशी संपूर्णपणे तादात्म्य पावले आहेत. वाद्यमेळातील कुठलाही सूर इतका बांधीव,घट्ट आहे की  कुठे स्वरांची लांबी वाढवली तर सगळ्या आविष्काराचा डौल बिघडेल. हाच प्रकार गायनातून दिसून येतो. युगुलगान कसे गावे, याचा हे  आदिनमुना आहे. लताबाईंचा प्रत्येक स्वर हा तलतच्या पट्टीशी  जुळलेला आहे. गाण्यात कुठेही जरासा देखील सवंगपणा आही किंवा बेसुरेपण तर औषधाला देखील नाही. 
सर्वसाधारणपणे गाणे गाताना, गाण्यातील पहिल्या दोन ओळी नेहमी अचूक शब्दोच्चाराने गायल्या जातात परंतु गाण्यात परत त्या ओळी गाताना, कुठेतरी किंचित ढिसाळ वृत्ती अवतरते. कुठे एखाद्या अक्षराचे वजन घसरते किंवा शब्द तोडला जातो इत्यादी. या गाण्यात असले काहीही घडत नाही. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांचे हे लक्षणीय यश. गायकाकडून कशा प्रकारे गावून घ्यायचे जेणेकरून, रचना अधिकाधिक समृद्ध होत जाईल, याकडे अनिल बिस्वास यांनी कायम लक्ष दिले.  
सीने में सुलगते हैं अरमान 
आंखो में उदासी छायी है 
ये आज तेरी दुनिया से हमें 
तकदीर कहां ले आई हैं 
या ओळी ऐकताना आपल्याला सतत जाणवत राहते, शब्दांचे सूर आणि वाद्यमेळाचे एकमेकांशी संपूर्णपणे संवादी आहेत, लय तर सारखीच आहे पण स्वरांचे वजन देखील त्याचप्रमाणात तोलले गेले आहे. बरेचवेळा असे घडते, गाण्यात प्रयोग करायचे म्हणून गाण्याची चाल आणि वाद्यमेळ यांच्यात फरक केला जातो परंतु अंतिमत: दोन्ही सूर एकत्र आणून सम गाठली जाते. आणि बिस्वास यांच्या रचनेत असले प्रयोग आढळत नाहीत, असतो तो सगळा भर मेलडी आणी त्याला अनुषंगून राहणाऱ्या स्वररचनेवर. इथे व्हायोलीन वाद्याचे स्वर आहेत पण त्या स्वरांची जातकुळी शाब्दिक रचनेशी नेमकेपणाने सांधून घेतलेली आहे. परिणाम असा होतो, ओळीतील आशय अधिक खोल जाणवतो. 
मुळात तलत मेहमूद यांचा मृदू स्वर असल्याने, गाण्याची ठेवण देखील त्याच अंगाने केली आहे. गाण्यात आणखी एक बाब सांगण्यासारखी आहे. गायन सुरेल असणे, हे तर फार प्राथमिक झाले परंतु गाताना, एकमेकांच्या गळ्याची "जात" ओळखून गायन करणे, याला देखील अतिशय महत्व असते. लताबाईंचा तारता पल्ला जरी विस्तृत असला तरी इथे त्याच्यावर योग्य संयम घालून, तलतच्या गायकीशी अतिशय सुंदररीत्या जुळवून घेतला आहे. म्हणूनच मघाशी मी म्हटले, युगुलगायन कसे असावे, यासाठी हे गाणे सुंदर उदाहरण ठरते. 

कुछ आंख में आंसू बाकी हैं 
जो मेरे गम के साथी हैं 
अब दिल हैं ना दिल के अरमां हैं 
बस मैं हुं मेरी तनहाई है 
या ओळी ऐकण्याआधी, मधल्या स्वरिक वाक्यांशात व्हायोलीनचे स्वर किंचित वरच्या पट्टीत गेले आहेत आणि तोच स्वर लता बाईंनी उचलून घेतला आहे. स्वर उचलून घेताना, तो स्वर ताणला जाणार नाही याची काळजी घेतली असल्याने, "मूळ" स्वररचनेशी संवाद साधला जातो. गाण्यांमध्ये अशीच छोटी सौंदर्यस्थळे असतात, जेणेकरून रचना अर्थपूर्ण होत जाते. संगीतकाराचे "कुलशील" इथे समजून घेता येते. गाण्यात स्वरांचे "वर-खाली" होणे क्रमप्राप्तच असते परंतु स्वरांतील ही "अटळ" बाब "टाळून" गायन करणे, खरे कौशल्याचे असते आणि फार अवघड असते. 

ना तुझ से गिला कोई हमको 
ना कोई शिकायत दुनिया से 
दो चार कदम जब मंझील थी 
किस्मत ने ठोकर खाई है 
गाण्यात धृवपद धरून चार, चारओळींचे चार खंड आहेत आणि प्रत्येकी दोन खंड प्रत्येकाला गायला मिळाले आहेत. इथे शब्दांतील आशय जाणून घेऊन, त्याप्रमाणे गायकांना गायला दिले गेले आहेत. अर्थात, हे देखील फार प्राथमिक झाले कारण बहुतेक सुंदर गाण्यात हा विचार नेहमीच दिसतो. मग या गाण्यात आणखी काय वेगळे आहे? या गाण्यातील दु:खाची प्रत काही जगावेगळी नाही किंवा शब्दकळा देखील अत्युच्च दर्जाची नाही. खरतर चित्रपट गीतात त्याची फारशी गरज देखील नसते. रचनेच्या लयीत शब्द चपखल बसणे, ही स्वररचनेच्या दृष्टीने आणि गायनाच्या दृष्टीने देखील अत्यावश्यक असते आणि ती गरज, ही शब्दकळा व्यवस्थित पुरवते. 
कुछ ऐसी आग लगी मन में 
जीने भी ना दे मरने भी ना दे 
चूप हुं तो कलेजा जलता है 
बोलुं तो तेरी रूसवाई है. 
मी वरती जो प्रश्न विचारला आहे, याचे उत्तर गाण्याचे शेवटाला मिळते. गाण्याच्या शेवट करताना, गाण्याचे ध्रुवपद लताबाईंच्या आवाजात आहे. गाण्याच्या सुरवातीला याच ओळी आपल्याला तलत मेहमूदच्या आवाजात ऐकायला मिळतात. दोन्ही वेळेस, लय तीच आहे पण स्वररचनेत किंचित फरक आहे. अर्थात, स्वररचना बदलली तरी देखील आशयाच्या अभिवृद्धीत काहीही फरक पडला आणि, किंबहुना लताबाईंच्या आवाजात याच ओळी अधिक गहिऱ्या होतात आणि गाण्यातील दु:खाची प्रत एकदम वेगळी होते. हे असे करताना, परत एकदा, शब्दांची कुठेही ओढाताण नाही, हे लगेच जाणवते. "चूप हुं तो कलेजा जलता है, बोलुं तो तेरी रूसवाई है. " या ओळी ऐकताना आपल्याला केवळ गायकी(च) दिसते असे नसून त्यामागे असलेला संगीतकारचा विचार देखील जाणवतो. मला वाटते यामुळेच हे गाणे हिंदी चित्रपट गीताच्या नामावळीत आढळ स्थान प्राप्त करून राहिले आहे. 

No comments:

Post a Comment