Saturday 16 April 2016

वक्त ने किया, क्या हंसी सितम

दोन कलासक्त जीव. एका औपचारिक प्रसंगातून ओळख होते, हळूहळू गाठ भेटी होतात, मने अनुरक्त होतात आणि मानसिक गुंतवणूक होते. कलेच्या माध्यमातून जवळीक निर्माण होते. पुरुष आधीच लग्नबंधातअडकलेला असल्याने, एका मर्यादेच्या पलीकडे स्नेहबंध वाढू शकत नाहीत. एव्हाना, स्त्री तिच्या कलाविश्वात यशाची नवीन शिखरे गाठत राहते आणि पुरुष मात्र अपयशाचा धनी!! त्यातून निर्माण होते ती अटळ मानसिक तडफड आणि दुरावा. अशाच एका विरक्त संध्यासमयी, या दोघांची अचानक गाठभेट होते. पूर्वीच्या आठवणी मनात येतात पण आता आपण कधीही जवळ येऊ शकणार नाही, ही जळजळीत जाणीव आतून पोखरत असते. आज, स्त्री यशाच्या शिखरावर असते तर पुरुष अपयशाच्या भोवऱ्यात भिरभिरत असतो. "कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाट जळे उंबऱ्याशी दिवा रात रात धुक्याच्या दिशेला खिळे शुन्य दृष्टी किती उर ठेवू व्यथा गात गात" आरतीप्रभूंच्या या कवितेतील ओळी, वरील प्रसंग अधिक खोलवर सांगून जातो. "वक्त ने किया, क्या हंसी सितम' या गाण्याच्या संदर्भात तर या ओळी फारच चपखल बसतात. हिंदी चित्रपटातील एक अजरामर गाणे. सर्वसाधारणपणे हिंदी चित्रपटात, गाण्याचे चित्रण बरेचवेळा सरधोपट वृत्तीने केले जाते. चित्रपटात गाण्याचे अपरिमित असूनदेखील त्याचे चित्रीकरण "बाळबोध" करायचे, हा विरोधाभास असतो!! याला सणसणीत अपवाद म्हणजे "कागज के फुल' चा दिग्दर्शक गुरुदत्त. गुरुदत्तने कुठल्याही गाण्याचे चित्रीकरण कधीही मळलेल्या वाटेने केले नाही. कथा, सादरीकरण, अभिनय, Camera Work, काव्य, संगीत सगळ्याच दृष्टीकोनातून "कागज के फुल" हा चित्रपट अप्रतिम असून देखील, त्या काळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला!! हे कधीही न सुटणारे कोडे आहे. प्रस्तुत गाण्याचे चित्रीकरण तर खास अभ्यासाचा भाग ठरवा, इतके अप्रतिम आहे. संगीतकार सचिन देव बर्मन, यांच्या संगीताची खासियत सांगायची झाल्यास, चित्रपट बघून त्याप्रमाणे, आपल्या गाण्यांची रचना करण्याचे कौशल्य केवळ "बेमिसाल" असेच म्हणावे लागेल. प्रसंगी, काव्यानुरूप रचना बदलण्यासाठी त्यांनी कधीही मागे पुढे बघितले नाही. संपूर्ण गाणे, हे पार्श्वगीत आहे, सगळा आशय केवळ चेहऱ्यावर वाचता येईल, इतका अमूर्त अभिनय बघायला मिळतो. गाण्याची सुरवातच मुळी. संथ लयीतील पियानो आणि व्हायोलीन वाद्यांच्या सुरांतून होते. हा स्वरमेळ खास ऐकण्यासारखा आहे, व्हायलीनचे स्वर हे पार्श्वभागी वाजत असतात तर पियानोचे स्वर प्रमुख आहेत. पुढे त्यात, पुढे त्यात बासरीचे स्वर मिसळताना, पडद्यावर विस्तीर्ण अशा स्टुडियोचा अवकाश दिसतो आणि सुरवातीला एकमेकांच्या समीप असलेले दोघे, दूरस्थ होत जातात. या हालचालींना, ज्या प्रकारे वाद्यमेळाचे सूर साथ देतात, हा असामान्य स्वरिक अनुभव आहे आणि पुढे ऐकायला मिळणाऱ्या रचनेची "नांदी" आहे!! वाद्यमेळ इतक्या संथ आणि खालच्या सुरांत वाजत असतो की त्यातून व्यक्त होणारी अव्यक्त भावना अटळपणे आपल्या मनात झिरपते. संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन किती श्रेष्ठ आहेत, याचा हा आदीनमुना!! "वक्त ने किया क्या हंसी सितम तुम रहे ना तुम, हम रहे ना हम". गायिका गीता दत्त इथे अवतरते, तिचा आवाज देखील ठाय लयीत आणि मंद्र सुरांत लागलेला आहे. अति व्याकूळ स्वर आहेत आणि सुरवातीच्या वाद्यमेळाच्या सुरांची संगत धरून ठेवणारे आहेत. ऐकणाऱ्याच्या मनावर गडद परिणाम घडवून आणणारे आहेत. खरतर सगळे गाणे हे विरही भावनांचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करणारे आहे. गायिका गायला सुरवात करते तेंव्हा साथीला पार्श्वभागी बेस गिटार आणि पियानोचे स्वर आहेत पण त्या स्वरांचे अस्तित्व तसे नाममात्र आहेत. गीता दत्त, आपल्या गूढ, आर्त सुरांनी असते. किंचित बंगाली गोलाई असलेला स्वर पण प्रसंगी आवाजाला टोक देण्याची क्षमता असल्याने, गायन अतिशय भावनापूर्ण होते. पहिला अंतरा यायच्या आधी, व्हायोलीन वाद्यांचे स्वर कसे बांधले आहेत, ते मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. "ऑर्केस्ट्रा" पद्धतीचा सुरेख वापर केलेला आहे. वाद्यमेळाची रचना करताना, व्हायोलीन वादकांचे दोन भाग केले आहेत आणि त्यानुरूप रचना सजवली आहे. एक भाग मंद्र सप्तकात वाजत आहे तर दुसरा भाग तार सप्तकात वाजत आहे. तार सप्तकात जे व्हायोलीनचे सूर आहेत, त्यातून रिकाम्या,ओसाड स्टुडियोची प्रचीती येते तर खालच्या सुरांत वाजत असलेल्या सुरावटीने, पडद्यावरील अभिनेत्यांच्या तरल अभिव्यक्ती निर्देशित होतात. "बेकरार दिल इस तरह मिले जिस तरह कभी, हम जुदा ना थे तुम भी खो गये, हम भी खो गये एक राह पर चल के दो कदम". "इस तरह मिले" हे शब्द गाताना, "तरह" हा शब्द, आवाजात किंचित थरथर आणून गायला गेला आहे, परिणाम काव्यातील आशय खोल व्यक्त होणे. संगीतकाराला काव्याची नेमकी जाण असेल तर तो स्वररचनेतून किती प्रकारची अनुभूती रसिकांना देऊ शकतो, हे ऐकण्यासारखे(च) आहे. या गाण्याचा वाद्यमेळ ऐकताना, प्रत्येक शब्दानंतर व्हायोलीन वाद्याचे स्वर ऐकायलाच हवेत. व्याकुळता केवळ गायकीतून स्पष्ट न करता, वाद्यमेळातून देखील तितक्याच परिणामकारकरीत्या अधोरेखित केली जाते. हे फार, फार कठीण आहे. गाणे सजवणे म्हणजे काय, याचा हा रोकडा अनुभव आहे. "एक राह पर चल के दो कदम' ही ओळ जेंव्हा पडद्यावर येते, त्यावेळी, वरून प्रकाशाचा झगझगीत झोत येतो आणि त्या झोतात, पडद्यावरील अभिनेत्यांच्या "प्रतिकृती" सामावल्या जातात. हा प्रकार केवळ अप्रतिम आहे. दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त काय ताकदीचा होता, हे दर्शवून देणारे हे गाणे आहे. प्रकाशाच्या झोतात, व्यक्तीच्या प्रतिमा मिसळणे, ही कल्पनाच अनोखी आणि काव्यमय आहे. गमतीचा भाग पुढे आहे. ही ओळ संपते आणि आपल्याला लगेच गाण्याच्या सुरवातीची ओळ "वक्त ने किया, क्या हंसी सितम" हे ऐकायला मिळते. या दोन्ही ओळींतील विरोधाभास ज्या प्रकारे चित्रिकरणा मधून तसेच सांगीतिक वाक्यांशातून दर्शवला गेला आहे, असे भाग्य निदान हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत फारच तुरळक आढळते. सगळे गाणे म्हणजे छायाप्रकाशाचा मनोरम खेळ आहे. गायिका म्हणून गीता दत्तच्या आवाजाला मर्यादा आहेत. शक्यतो गुंतागुंतीच्या हरकती, तिच्या गळ्याला शोभत नाहीत परंतु मुळातले नैसर्गिक हळवेपण तसेच भावपूर्ण आवाज, यामुळे तिचे गायन अतिशय अर्थपूर्ण होते. आवाजात किंचित कंप आहे आणि तो कंप तिला, विविध प्रकारची गाणी गाण्यासाठी उपयोगी पडला.संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांची कामगिरी मात्र अतुलनीय अशीच म्हणायला हवी. हिंदी चित्रपट गाण्यांत जेंव्हा रागदारी संगीताचा प्रभाव होता (अर्थात काही संगीतकार याला अपवाद होते) तेंव्हा लोकसंगीताचा आधार घेऊन, चित्रपट गीतांना नवीन पेहराव दिला. "जायेंगे कहां, सुझता नहीं चल पडे मगर रास्ता नहीं क्या तलाश है, कुछ पता नहीं बुन रहे है दिन ख्वाब दम-ब-दम" इथे कैफी आझमी, कवी म्हणून फार वरची पातळी गाठतात. वरील ओळींमधील शेवटच्या दोन ओळी म्हणजे या गाण्याचा "अर्क" आहे. सगळी हताशता, मानसिक तडफड तसेच आतडे तुटण्याचा क्षण, सगळ्या भावना या दोन ओळींत सामावलेल्या आहेत. आत्ता या क्षणी आपण एकत्र आहोत, जवळ आहोत पण हे सगळे तात्पुरते आहे आणि एकदा हा क्षण विझला की परत आपण, आपल्या वाटांवर मार्गस्थ होणार आहोत. गाण्याच्या शेवटी आपल्याला पडद्यावर हेच दिसते. प्रश्न असा, हेच जर अटळ आहे, तर आपण आज एकत्र तरी का आलो? जी.ए. कुलकर्ण्यांच्या "प्रवासी" कथेत एक सुंदर वाक्य आहे. "इतरांचे प्रवास संपतात पण रस्ता मात्र अविरतपणे तसाच राहतो. आपला मात्र रस्ता संपला आहे पण प्रवास तसाच चालूच राहणार आहे!" इथे या दोन व्यक्तींचे असेच झाले आहे, जवळ येण्याचे सौख्य नाही पण आयुष्य मात्र निरसपणे चालूच रहाणार आहे. या चक्रव्यूहातून आता या दोघांपैकी कुणाचीही सुटका नाही आणि या अंतस्थ तडफडीचे जळजळीत वास्तव समजून घेणे, हेच या गाण्याचे खरे सौंदर्य.

No comments:

Post a Comment