Sunday 20 November 2022

सनशाईन हॉटेल

इराणी हॉटेल ही मुंबई शहराच्या सांस्कृतिक विस्ताराचा अविभाज्य भाग आहेत. विशेषतः; दक्षिण मुंबईत तर या हॉटेल्सचे प्रस्थ बरेच आहे. नक्की कधी ही हॉटेल्स कधी सुरु झाली? या प्रश्नाचे उत्तर कधीतरी मिळेल परंतु त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान मात्र आजही अबाधित आहे. विशेषतः तरुण वर्गात तर या हॉटेल्सची लोकप्रियता अखंडित आहे. दक्षिण मुंबईत जवळपास प्रत्येक विभागात, एखादे तरी इराणी हॉटेल आहे. अर्थात कालानुरूप काही ठिकाणाची इराणी हॉटेल बंद झाली आहेत परंतु समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून राहिली आहेत, यात काहीही संशय नाही. मी जिथे राहतो- ठाकूरद्वार इथे तर आसपास बरीच इराणी हॉटेल्स आहेत, व्हॉईसरॉय ऑफ इंडिया, कयानी, बास्तानी(आता काही वर्षांपासून बंद पडले आहे आणि बहुदा कायमचे बंद पडले असावे) आणि ठाकूरद्वार चौकातील सनशाईन हॉटेल!! जवळपास ३,४ किलोमीटर परिसरात अशी ३,४ इराणी हॉटेल्स आहेत. कयानी हॉटेलला तर प्रचंड ग्लॅमर आहे, ऐतिहासिक वारसा आहे. त्यामानाने, इतर हॉटेल्सना इतके ग्लॅमर नाही. सनशाईन हॉटेल तर माझ्या जन्माच्या आधी पासूनचे हॉटेल तिथे आहे. एकतर ठाकूरद्वार चौकाच्या एका टोकाला, सिग्नलला लागून आहे. परिणामी लोकांच्या सहज येण्याजाण्याच्या मार्गावर आहे. अक्षरश: लाखोंनी माणसे इथून ये जा करीत असतात आणि त्या सगळ्यांच्या नजरेत हे हॉटेल भरते. इराणी हॉटेल्सची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती वर्षानुवर्षे जपलेली आहेत. इथे निव्वळ चहा (पानी कमी चहा तर इथेच मिळतो) घेऊन, तुम्ही या हॉटेलमध्ये निवांतपणे तासंतास बसू शकता. असे तुम्ही जगातील यच्चयावत कुठल्याही हॉटेलमध्ये बसू शकत नाही. मी अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून या हॉटेलमध्ये येत आहे. एकतर त्यावेळी खिशात नेहमीप्रमाणे पैशाची चणचण असायची. आम्ही ठराविक मित्र दिवसाच्या कुठल्याही प्रहरी इथे चहा प्यायला येत असू. चहाचे पैसे भरण्याइतकी ऐपत असायची. त्यावेळी बियर बार या हॉटेलमध्ये नव्हता, तो नंतर आला. नंतर आम्हा मित्रांना नोकऱ्या लागल्या आणि आमची मजल आम्लेट किंवा खिमा मागण्याइतकी वाढली. तरीही "ब्रून/बन मस्का आणि चहा" या डिशेश (यांना डिश म्हणावी इतका देखील परकेपणा आजही वाटत नाही) मागवणे, ही चैनीची परमावधी होती. इथेच चहा मागवायचे, त्याच्याबरोबर असंख्य गप्पा मारायच्या, वाद घालायचे, काहीवेळा भविष्याचे प्लॅन्स करायचे, इत्यादी उद्योग चालू असायचे. आमचे हे भावविश्व होते. गल्ल्यावरील पारशाने कधीही - अरे कितना टाइम बैठे हो , सारखे दरडावून विचारले नाही. चहाबरोबर सिगारेट घ्यायची म्हणजे इथल्या मैफिलीची सांगता व्हायची. कित्येक तास या हॉटेलमध्ये घालवले आहेत. बरेचसे वाद, चहा संपला की विसरले जायचे. अगदी नुकत्याच बघितलेल्या तरुणीच्या सौंदर्याचे "माप" इथेच घेतले जायचे. इथे कुठल्याही विषयाचे बंधन नसायचे. अगदी शिवराळ भाषेची मुक्त तोंडाने देवाणघेवाण चालायची. वास्तविक हे हॉटेल ट्रॅफिक सिग्नलला लागून आहे, त्यामुळे आमच्या गप्पात रस्त्यावरील गाड्यांच्या आवाज मिसळला जायचा - त्याचा कधीही त्रास म्हणून जाणवला नाही. किंबहुना त्या हॉर्न्सची जाणीवच झाली नाही, इतके आम्ही आमच्या विश्वात रममाण होत असू. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना, एखादी तरी चक्कर इथे व्हायचीच. हे हॉटेल कधीही रिकामे असे बघितलेच नाही. एखादा कोपरा पकडायचा, पानी कम चहा मागवायचा आणि त्याबरोबर तोंडात सिगारेट शिलगावयाची आणि कुठल्याही विचारांची धुंदी चढवून घ्यायची, हा परिपाठ कित्येक वर्षे अखंडपणे चालू होता. आमची तर गल्ल्यावरील मालकाशी चांगली मैत्री झालेली होती. त्यानेही आम्हाला हॉटेलचे दरवाजे कायमचे उघडे ठेवलेले असायचे. एकतर इराणी हॉटेल्स पहाटे ५ वाजता उघडतात आणि रात्री उशिरा, अगदी १२ पर्यंत उघडी असतात. तरुण वयात याचा बराच फायदा व्हायचा. पहाटे इराणी हॉटेलचा चहा पिणे, यातील "स्वर्गसुख" हे फक्त मुंबईकर माणसांनाच कळू शकेल. त्या चहात कसलीही वैशिष्ट्ये नसायची म्हणजे वेलची, लवंग वगैरे काही नाही. त्या छोट्याशा कपात, गरम दूध, चहाच्या पावडरीची उकळलेली पूड आणि साखर, इतकेच!! तरीही त्याची चव जिभेवर रेंगाळायची. अर्थात सोबत बन किंवा ब्रून मस्का!! तो सोबत हवाच, त्याशिवाय मैफिल रंगणे निव्वळ अशक्य!! असा पाव फक्त इराणी हॉटेल्स मध्येच मिळणार. त्या पावाला लावलेला मस्का - त्याला बटर किंवा लोणी, अस्सल मुंबईकर कधीही म्हणणार नाही देखील फक्त तिथेच मिळणार. पुढे ऐपत वाढल्यावर आम्लेट, त्यातही साधे आम्लेट, मसाला आम्लेट असे प्रकार आहेतच. आम्लेट आले की त्याच्यावर मीठ आणि मिरपूड फवारून (ती फवारूनच टाकायची, चमचा वगैरे लाड नाहीत) घ्यायची आणि आपल्या अंदाजाने टाकल्यावर सोबतच्या मऊशार पावाच्या तुकड्यासह आम्लेटचा तुकडा घ्यायचा!! तो तोंडात गेला की मग चहाचा एक घोट घशाखाली न्यायचा. खरंतर कुणी म्हणेल यात काय वैशिष्ट्य आहे? त्रयस्थ नजरेतून काहीही वैशिष्ट्य नाही पण त्या हॉटेलच्या स्थानाचे जे वैशिष्ट्य आहे, ते कुठेच नाही. बहुतेक इराणी हॉटेल्समधील बसायला असणारी टेबल्स,खुर्च्या या एकरंगी असायच्या. काळ्या रंगाच्या खुर्च्या आणि पांढऱ्या रंगांची टेबल्स. पुढे या हॉटेलमध्ये एक मोठा कप्पा केला आणि तिथे बियर बार आला!! एव्हाना खिशात पैसे खुळखुळायला लागले होते, अंगात तरुणाईची मस्ती होती - मग काय बियर पिणे क्रमप्राप्तच होते. आज बियर पिण्यात फारसे काही थ्रिल वाटत नाही पण तेंव्हा घरच्यांना चुकवून बियर पिण्यातली लज्जत केवळ अवर्णनीय होती. बियर सोबत चखणा (हा मुंबईचा परवलीचा शब्द - याच्याशिवाय ड्रिंक्स संभवत नाही) म्हणून खारेदाणे, वेफर्स, खारी मुगडाळ असेच काहीतरी मागवायचे आणि धुनी पेटवायची!! ही धुनी मग रात्री उशिरापर्यंत पेटलेली असायची. आता त्यावेळच्या गप्पा आठवत नाहीत कारण आता आयुष्याचे मार्ग बरेच बदलले. त्यावेळची स्वप्ने विरून गेली, त्यावेळच्या मुलींवरून मारलेल्या गप्पांचे फड असेच हवेत विरून गेले. आज हे सगळे आठवले कारण आता हे सनशाईन हॉटेल बंद होत आहे!! ती इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे चक्क कोर्टाकडून निर्देशित झाल्याने हॉटेल बंद करण्यावाचून तरुणोपाय राहिला नाही. काळ आम्ही मित्र तिथे गेलो, काही काळ घालवला. अर्थात जुन्या आठवणी निघाल्या. काही मित्र तर ठाकूरद्वार सोडून उपनगरात कायमचे राहायला गेलेत पण हे हॉटेल बंद पडणार म्हणून शेवटचे असे "बसायला" आले होते. आता असे सांगण्यात आले आहे, ही इमारत पुन्हा नव्याने बांधणार आहे आणि पुन्हा हे हॉटेल सुरु होणार आहे. आज आम्ही सगळे साठीपार आहोत. तेंव्हा हे हॉटेल पुन्हा जेंव्हा नव्याने सुरु होईल तेंव्हा आम्ही असू का? असलो तरी आज जशी धुंदी अनुभवता आली, तशी अनुभवण्याच्या अवस्थेत असू का? त्यावेळी मुंबई कशी असेल? मुंबई, विशेषतः ठाकूरद्वार/गिरगाव फार प्रचंड वेगाने बदलत चालले आहे, जुन्या चाळी पाआडून टॉवर्स होत आहेत. नवी संस्कृती स्थिरावत आहे. अशा नव्या संस्कृतीत "पानी कमी चाय" ला पुन्हा संजीवनी मिळेल का? बरेच प्रश्न डोक्यात घोंघावत आहेत, ज्याची आज उत्तरे सापडणे अशक्य.

No comments:

Post a Comment