Saturday 8 October 2022

बडे अच्छे लगते है

केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगात असे नेहमीच चाललेले असते, मोठ्या वृक्षाच्या बाजूने इतर झाडांची वाढ खुंटत जाते. त्यांच्यात स्वतःचे स्वत्व नक्कीच असते परंतु वृक्षाची सावली आणि जोमदारपणा इतका प्रचंड असतो की इतर झाडांची वाढ जणू काही शोषली जाते. परिणामी वाढ खुरटली जाणे, हेच प्राक्तन नशिबात येते. वृक्षाच्या समोर, स्वतःचे अस्तित्व ठामपणे रोवून तरारून येणे अगदीच अशक्य नसते परंतु असे क्वचित घडते. आजचे आपले गाणे ऐकताना, आपल्याला असे नक्कीच वाटेल, क्षमता असूनही हा गायक मागे पडलाआणि आजचे गाणे हेच त्या गायकाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून उरले. आपले आजचे गाणे, *बडे अच्छे लगते है* या गाण्याच्या संदर्भात वरील विवेचन अतिशय चपखल बसते. *बालिका बधू* या नावाने मूळ चित्रपट बंगाली भाषेत निघाला होता, त्याचाच पुनरावतार हिंदीमध्ये तयार झाला. चित्रपटाची पार्श्वभूमी, स्वातंत्र्यपूर्वकालीन बंगाल मधील सरंजामी संस्कृतीची आहे. त्यावेळची समाजव्यवस्था, त्यालाच अनुषंगून असलेली कुटुंबव्यवस्था आणि संस्कार, या सगळ्याचा दाट प्रभाव या चित्रपटावर आहे. परिणामी, चित्रपटातील प्रणय देखील त्या काळाला सुसंगत असा मुग्ध, संयत असाच आहे. कवी आनंद बक्षी यांनी हे गीत लिहिले आहे. चित्रपट गीतात *चटपटीतपणा* असावा, असा संकेत एकूणच चित्रपटसंगीतात सुरुवातीपासून चालत आलेला आहे. अर्थात चटपटीतपणा आणण्याच्या नादात कधी कधी ढिसाळ रचना होणे क्रमप्राप्तच ठरते आणि याचे मुख्य कारण म्हणजे सातत्याने गाणी लिहावी लागणे. फोफशी कविता लिहिली जाण्याचे प्राक्तन अगदी प्रतिभावंत कवींच्या नशिबी देखील आलेले आहे. चित्रपटांची मागणी ही कायमस्वरूपी असते आणि त्याला अंत नसतो. अशा वेळी मग उतरली जाणारी रचना, प्रत्येकवेळी तितकीच सशक्त, आशयपूर्ण असेल हे मानवी शक्तीच्या बाहेरील काम आहे आणि टीका करताना, हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यातून आनंद बक्षी यांनी कधीही असा *दावा* केला नव्हता, *मी प्रतिभावंत कवी आहे*. त्यांचे म्हणणे एकच, मी मागणीनुसार गीताचा पुरवठा करतो, त्यातून चित्रपटातील प्रसंगात अटळपणे येणारा तोचतोचपणा मनाला शिणवून टाकणारा असतो. असे असून देखील काहीवेळा आनंद बक्षी यांनी काही अप्रतिम गीतांची रचना केलेली आढळते. प्रस्तुत गाणे अल्पाक्षरी शैलीत लिहिलेले आहे. आपली बायको उद्या माहेरी जायला निघाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आदल्या निवांत सायंकाळी, आपल्या गावाच्या नदीच्या किनारी दोघेच बसलेले आहेत आणि त्यांच्यात *मूक* संवाद चाललेला आहे. नवऱ्याची तशीच मूक भावना, या गाण्यातून मांडली आहे. पहिल्याच ओळीत *धरती*,*रैना* सुंदर वाटतेच आहे परंतु त्यापेक्षा मला तू अधिक सुंदर वाटत आहेस आणि हे अत्यंत सूचकपणे *और तुम* या शब्दांनी अधोरेखित केले आहे, अल्पाक्षरी शैली ही अशी आपल्या समोर येते. गाण्यात पुढे मग याच भावनेचा विस्तार तितक्याच तरलपणे मांडलेला आहे. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी बांधलेली *तर्ज*, हेच गाण्याचे खरे आकर्षण आहे. संगीतकार अगदी समृद्धपणे आपल्या समोर येतो. थोडा तांत्रिक विचार केल्यास, *बिहाग* रागावर चाल आधारलेली आहे परंतु स्वररचनेवर *बंगाली बाऊल* लोकसंगीताचा दाट प्रभाव आहे. *ओ माझी रे, जइयो पिया के देस* या ओळीतून माझे म्हणणे अधिक स्पष्ट होईल. आता थोडे तांत्रिक विवेचन. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी सादर केला जाणारा राग. आरोहात *रिषभ* आणि *धैवत* वर्ज्य तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात. अर्थात *दोन्ही मध्यम* आणि बाकीचे सगळे स्वर *शुद्ध* लागतात. आता या पार्श्वभूमीवर गाण्याची संगती कशी लागते, हे बघूया. पहिल्याच ओळीची स्वरांची मांडणी ही * रे ग रे सा नि ध नि सा ग* अशी ऐकायला मिळते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे *सा* स्वराने सुरवात केली जाते पण इथे *रिषभ* स्वराने सुरवात झालेली आढळते. मुखड्याच्या दुसऱ्या भागात *ये धरती, ये नदिया* इथे *ग ग प म रे रे सा नि* हे सूर ऐकायला मिळतात. इथला *मध्यम* शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळतो. *ये रैना और तुम* ही ओळ *सा सा ग रे नि नि सा ग रे सा* अशा *अविकृत* स्वरांच्या संगतीने ऐकायला मिळते आणि *मुखडा* पूर्ण होतो. आता यात *तीव्र मध्यम* स्वर कुठे आहे? त्यासाठी आपल्याला *झुठे लगते हैं ये सारे* या अलीकडे यावे लागेल. इथे *बिहाग* रागाचा वैशिष्ट्यपूर्ण *तीव्र मध्यम* स्वराचा *अदमास* घेता येतो. गाण्याची प्रकृती लक्षात घेता, वाद्यमेळ देखील अतिशय संयमित वापरला आहे. तशी एकूण रचना देखील फारच छोटी आहे पण प्रत्येक क्षण हा स्वरावकाशाने भरलेला आहे त्यामुळे गाण्यातील *सलगता* एकसंध झालेली आहे. वास्तविक राहुल देव बर्मन यांची कुठलीही स्वररचना ऐकायला घेतली तर तिथे *तालाचे* वेगवेगळे प्रयोग ऐकायला मिळतात आणि हे गाणे देखील अपवाद नाही. जरा बारकाईने ऐकल्यास, परिचित ६ मात्रांचा *दादरा* ताल आहे पण त्याचे सादरीकरण इतक्या वेगळ्या अंगाने केले आहे की पटकन ध्यानात येत नाही आणि हीच या संगीतकाराची खासियत म्हणावी लागेल. आता वर उल्लेखलेल्या आवाजाबद्दल. गायक अमितकुमार याने या गीताचे गायन केले आहे. संगीतकार जर का व्यासंगी असेल तर गायकाकडून कशाप्रकारे परिणाम घडवून आणू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून या गीताकडे बघता येईल. अमितकुमार म्हणजे सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांचा पुत्र. अर्थात जगरहाटीप्रमाणे अमितकुमारकडून कायम *अवाजवी* अपेक्षा ठेवल्या गेल्या आणि हा गुणी गायक मागे पडला. हा आपल्या समाजाचा दोष आहे. किशोरकुमार अद्वितीय गायक होते पण म्हणून त्यांच्या मुलाकडून तशीच अपेक्षा बाळगणे, हे काही सुजाण लक्षण नव्हते. असे असून देखील या गीतात अमितकुमार अतिशय संयमित गायला आहे आणि संगीतरचनेला यथोचित न्याय दिला आहे. गाण्यात कसल्याही *हरकती* घ्यायला फारशी *जागा* नाही आणि तशी गाण्याची मूलभूत प्रकृती देखील नाही. अमितकुमार यांनी हेच ध्यानात ठेऊन, गायन केले आहे. कुठेही आपल्या वडिलांच्या गायनाची छाप पडू दिली नाही. खरंच हे दुर्दैव म्हणायला लागेल, पार्श्वगायनाच्या आक्रोशी स्पर्धेत, हा गायक मागे पडला. बडे अच्छे लगते है, ये धरती, ये रैना और तुम, ओ माझी रे, जइयो पिया के देस हम तुम कितने पास हैं, कितने दूर हैं चाँद सितारे सच पूछो तो मन को झुठे लगते हैं ये सारे मगर सच्चे लगते हैं, ये धरती, ये रैना और तुम, तुम इन सबको छोडके कैसे कल सुबह जाओगी मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी बडे अच्छे लगते है, ये धरती, ये रैना और तुम, Bade Acche Lagte Hai - Balika Badhu (1976) - Amit Kumar - YouTube

No comments:

Post a Comment