Sunday 2 October 2022

सावळाच रंग तुझा

आपल्या कानावर काही गाणी अशी पडतात की त्याचा मनावर अतिशय गाढा परिणाम होतो. ते गाणे कशाप्रकारचे आहे, म्हणजे चित्रपटातील आहे की खाजगी आहे, हा प्रश्नच उद्भवत नाही आणि मनात कायम रुंजी घालत असते. गाणे मनात सतत रुंजी घालणे, ही गाण्याच्या गोडव्याची एक कसोटी नक्कीच म्हणता येईल कारण ही कामगिरी सहज जातायेता जमणारी नसते. अशी गाणी ऐकताना फार गोड आणि आपणही गाऊ शकतो, अशी भुलावणी देणारी असतात परंतु प्रत्यक्षात गायला घेतल्यावर चालीतील खाचखळगे दिसायला लागतात. अशी अद्भुत भुलावणी निर्माण करण्याचे श्रेय हे कायम संगीतकार आणि त्यापेक्षा अधिक गायकाचे असते. पुन्हा एक बाब अधोरेखित करावीशी वाटते, अशी गाणी जरी सरळ, सोपी वाटली तरी प्रत्यक्षात गायकाच्या गळ्याची *परीक्षा* घेणारी असतात. इथेच संगीतकाराच्या व्यामिश्र बौद्धिकाची कसोटी असते. भुलभुलैय्या इथेच असतो आणि चकवा इथेच अनुभवायला मिळतो. आपले आजचे गाणे, *सावळाच रंग तुझा* हे मराठीतील अतिशय लोकप्रिय गाणे तर आहेच परंतु त्यापलीकडे ललित संगीताची व्याप्ती रुंदावणारे गाणे आहे. सत्कृतदर्शनी सोपी वाटणारी स्वररचना अचानक, त्यातील हरकती तसेच ताना, या अलंकारांनी अवघड होऊन बसते. अर्थात या सगळ्या विषयीचा, आपण पुढे आढावा घेणारच आहोत. मराठी भाषेतील सिद्धहस्त कवी, ग.दि.माडगूळकरांची शब्दरचना आहे. प्रासादिक तसेच गेयतापूर्ण कविता करणाऱ्या काही मोजक्याच कवींपैकी माडगूळकर एक प्रथितयश कवी आहेत. माडगूकरांची बव्हंशी कविता वाचायला घेतल्यास वरील दोन वैशिष्ट्ये तर बघायला मिळतातच परंतु त्यापलीकडे, *मराठी संस्कृतीचा अर्क* म्हणून या कवितांकडे निर्देश करता येईल. अस्सल मराठी मातीचा सुगंध घेऊन येणाऱ्या कविता असतात. त्यातील प्रतिमा, प्रतीके, उपमा, सगळ्या मराठी संस्कृतीशी जोडलेल्या असतात. परिणाम मराठी समाजाशी त्यांची *नाळ* अचूक जोडली गेली. आणखी एक वैशिष्ट्य सांगण्यासारखे म्हणजे *चित्रदर्शी शैली*!! माडगूळकरांच्या बहुतेक रचना या मराठी चित्रपटाशी निगडित असल्याने, पडद्यावरील प्रसंगांशी त्याच्या कविता इतक्या मिसळून जातात की, त्या चित्रपटाच्या अविभाज्य भाग होतात. अर्थात, चित्रपटासाठी लिहायचे म्हटल्यावर कधीना कधीतरी, हातून *सपक* शब्द लिहिले जातात कारण सातत्य राखण्याच्या नादात कुठेतरी *तडजोड* ही होतच असते परंतु जिथे *कविता* म्हणून आपल्या समोर येते, तिथे मात्र दर्जा दिसून येतो. आता आजची शब्दरचना बघायला गेल्यास, ध्रुवपदातच कवितेची *मध्यवर्ती* कल्पना समोर येते आणि त्या कल्पनेचा विस्तार पुढील ओळींतून केलेला आढळतो. *रंग सावळा पण पावसाळी नभाप्रमाणे* हे समोर आल्यावर, पावसाळी हवेशी साद्ध्यर्म्य जोडणारी *वीज* येणे अपरिहार्य होते. वीज म्हटल्यावर टी *झगझगीत* तसेच *क्षणार्धात* चमकून जारी असते आणि तिथे मग *नाचरी वीज* या शब्दांनी त्याला पूर्तत्व येते. चित्रदर्शी शैलीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल तसेच भावनांचे अप्रतिम प्रकटीकरण म्हणता येईल. आता पुढील कडव्यांच्या मग, *चंदनाचे बन* येते आणि त्याच्या जोडीला *बनातील विखारी सर्प* येतात. मानवी भावनांची अतिशय थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. तिथे मग *गोकुळचा कृष्ण* आणि त्याची *पावरी* अवतरते. या सगळ्या कल्पनांकडे जरा बारकाईने बघितल्यास, या प्रतिकांमधून मानवी भावनांची *गुंफण* केलेली दिसेल. ही सगळी प्रतीके, आपल्या मराठी संस्कृतीची अविभाज्य अंगे आहेत. परिणामी, मराठी मन लगेच आकृष्ट होते. ललित संगीतातील काव्यात, *लालित्य* कसे खेळावयाचे, याचे ही कविता, सुंदर उदाहरण म्हणता येईल. मी जेंव्हा रेडिओवर प्रथमच गाणे ऐकले तेंव्हा माझी भावना अशी झाली, त्यावेळी *भावसरगम* नावाचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता आणि त्याच्या अंतर्गत हे गाणे रेडिओवर सादर झाले. अर्थात त्यावेळी गाण्याची माहिती वगैरे सांगितली असणार पण तिकडे माझे दुर्लक्ष झाले होते. पुढे काही वर्षांनी मी प्रख्यात कवी सुधीर मोघ्यांनी सादर केलेला *मंतरलेली चैत्रवेल* हा कार्यक्रम ऐकायला गेलो असताना समजले की हे गाणे *उमज पडेल तर* या चित्रपटातील गाणे आहे!! तोपर्यंत डोक्यात चित्रपटातील गाण्यांविषय ठराविक ठाम कल्पना झाल्या होत्या, त्यात चित्रपटातील गाण्याची स्वररचना, वाद्यमेळाची स्वतंत्र रचना आणि एकूणच गायकीबद्दल एक साचा मनात तयार झाला होता आणि प्रस्तुत गाणे तर एकदम वेगळ्या धर्तीचे निघाले. गाण्याची स्वररचना सत्कृतदर्शनी तरी *मराठी नाट्यगीताच्या* अंगाने गेलेली आहे. गाण्याच्या सुरवातीचा आलाप, पुढील रचनेत उपयोगात आणलेला वाद्यमेळ देखील तसाच निर्देश करतो. वाद्यमेळ तर बव्हंशी *ऑर्गन* या वाद्याने सजवला आहे आणि तिथेच आपली फसगत होते. गाण्याचे गायन देखील त्याच धर्तीवर गेलेले असल्याने, समाज काहीसा दृढ होतो आणि सगळी करामत, संगीतकार सुधीर फडक्यांची. सुधीर फडक्यांच्या सुरवातीच्या काळातील रचनांवर बालगंधर्वांच्या गायकीचा असर दिसतो, तो असा. अर्थात आपण ३ मिनिटांचे गाणे तयार करत आहोत, तेंव्हा ती *गायकी* जरी अनुकरणीय असली तरी ललित संगीतात कितपत आणायची, याचे अचूक भान दिसते. गाण्याची चाल *शिवरंजनी* रागावर आधारित आहे. *औडव/औडव* जातीचा राग असून *कोमल गन्धार* वगळता (मध्यम आणि निषाद स्वर वर्ज्य) सगळे स्वर *शुद्ध* लागतात. पंचकल्याणी स्वरांचा समूह भावसंगीतात फार ख्यातकीर्त आहे, अगदी हिंदी चित्रपटसंगीतात देखील विशेष प्राबल्य दिसते. अर्थात प्रत्यक्ष गाण्यात मात्र रागाची सावली दिसते. *सावळाच / रंग /तुझा* *पपधसासा/रेग(को)/रेसा* *पावसाळी / नभापरी* *रेग(को)सा....ध/धसारेग(को)रे* *आणि/ नजरेत /तुझ्या* *सारे /ग(को)पपम(तीव्र)/धप* *वीज/ खेळते /नाचरी* *पध /पग(को)रेग(को)रेसा/सारेग(को)रेसा* आता जरा बारकाईने स्वरावली वाचल्यास *तीव्र मध्यम* स्वराचा उपयोग केलेला दिसतो जो शिवरंजनी रागात नाही परंतु हे ललित संगीत आहे, याचे भान ठेवल्यास, सगळे प्रश्न सुटतात. अर्थात प्रत्येक ओळीच्या नंतर जो आलाप आहे, त्यात देखील *तीव्र मध्यम* लावलेला दिसून येतो. मी एकूणच स्वरावली इथे मांडतो, याचे कारण इतकेच, ललित संगीत कितीही वेगळे असले तरी अखेर *रागदारी संगीताच्या* सावलीतच त्याचा *उगम* होतो, हे दर्शविण्यासाठी. गायिका म्हणून माणिक वर्मा, यांचे नाव अनेक संदर्भात घेता येते. आपण असे देखील म्हणू शकतो, *कलासंगीताची* शास्त्रोक्त तालीम घेतलेली कलावती असून देखील *गझल*,*ठुमरी* सारख्या उपशास्त्रीय संगीतातील गती आणि शेवटी *ललित संगीतातील* प्राविण्य मिळवणारी, माणिक वर्मा ही *एकमेव* कलावती, जे अगदी लताबाई किंवा आशाबाई, यांना देखील जमू शकले नाही. *किराणा* घराण्याचे पायाभूत शिक्षण घेतले आणि रागसंगीतात आपली गायकी सिद्ध केली. ठुमरी गायन करताना, *पंजाबी* अंगाने सादर करून आपल्या कर्तृत्वाची प्रचिती दिली आणि आता या प्रकारचे गीत गाऊन, ललित संगीतात आपली छाप उमटवली. हे निव्वळ थक्क करणारे आहे. ललित संगीत जेंव्हा कलासंगीतातील गायक गायला घेतात तेंव्हा ,त्यांच्या गायकीत अनाहूतपणे, रागदारी संगीताचा जबरदस्त प्रभाव दिसतो. अगदी कितीही मोठा कलाकार असला तरी, गायनावरील हा प्रभाव त्यांना पुसून टाकणे अशक्य झाले आहे. माणिकबाईंनी,आपण कुठल्या प्रकारचे *गाणे* गात आहोत, याचे नेमके भान राखलेले दिसते आणि त्यानुरूप गायकीचा ढंग ठेवलेला दिसतो. ललित संगीतात घेतले जाणारे सांगीतिक अलंकार हे, शब्दांना पूरक असावे लागतात, जेणेकरून कवीच्या शब्दांना योग्य असा न्याय मिळू शकतो तसेच संगीतकाराने जो चालीचा आराखडा दिलेला आहे, त्यातील स्वरिक सौंदर्य जाणून घेऊन, गायनाचे स्वरूप ठेवायचे असते. आता इथे मुखड्यातील प्रत्येक ओळीच्या शेवटी आलाप आहेत पण ते स्पष्टपणे रागसंगीताची ओळख देणारे नसून, त्या ओळीतील आशयाची अभिव्यक्ती वाढविणारे आहेत. ललित संगीत गाताना याचेच भान ठेवणे अत्यावश्यक असते. तसेच अंतऱ्यामधील *चंदनाच्या बनापरी* गाताना किंचित *खटका* घेतला आहे. आता हा खटका इतपतच *वजनदार* हवा, जेणेकरून त्या शब्दांचे औचित्य तर राखले जाईल परंतु त्याचबरोबर त्यातील स्वरिक सौंदर्य अधिक मुखरीत होईल. ही तारेवरची कसरत असते पण तशी करणे, आवश्यक असते. शेवटच्या अंतऱ्यातील *आणि नजरेत तुझ्या* गाताना, किंचित *गायकी* आहे पण ती *गायकी* आहे, हे दर्शवले नाही. चालीच्या ओघात ती हरकत घेतली आहे. त्यामुळे ऐकताना कुठेही विक्षेप निर्माण होत नाही. अद्वितीय गीते ही अशीच तुरळक निर्माण होतात. सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकोळतो आणि नजरेचा चंद्र पाहू केंव्हा उगवतो सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदिवान Savalach Ranga Tuzha- Manik Varma, Bhavgeet - YouTube

No comments:

Post a Comment