Friday 13 April 2018

कवितानुभूती - भाग १

आपण एक कविता संग्रह घेतो, पाने उलटून वाचायला घेतो. वाचतानाच कधीकधी त्या छापलेल्या ओळींमधून नवीनच अर्थ जाणवतो . एखादा अर्थ नव्याने जाणवला म्हणजे मग मनात उत्साह येतो आणि संपूर्ण कविता वाचून पूर्ण करतो , पुढील पाने उलटून पुढील कविता वाचायला घेतो. खरतर कविता वाचनाचा आपल्या मनावर नेमका पहिला असा काय परिणाम होतो? आपल्या व्यक्तिमत्वात काय फरक पडतो? आपल्या विचारांवर कसला गाढा परिणाम होतो? आणि सर्वात महत्वाचे, कविता वाचल्याने कसले सांस्कृतिक संचित आपल्या हाती येते? त्या दृष्टीने विचार करता, मुळात साहित्य वाचन, ही देखील एक प्रकारची चैन आहे, असे सहज म्हणता येईल. त्यातून कविता म्हणजे अल्पाक्षरी लेखन. मोजक्याच शब्दांच्या रचनेतून, आशयाची खोलवर व्याप्ती सिद्ध करणारी, साहित्यकृती!!
खरे म्हणजे "कविता" हा नेहमीच स्वानुभव असतो. अनुभव!! प्रत्यक्ष अनुभव आणि स्मृतीत जिवंत केलेला अनुभवाचा क्षण (याच क्षणाच्या अनुभूतीतून कविता लिहिली जाते) प्रत्यक्ष अनुभवाच्या क्षणी फक्त अनुभव असतो, स्वतः:ला विसरून त्या अनुभवाशी एकरूप होणे असते. अर्थात त्या क्षणी त्या अनुभवाची जाणीव होणे अशक्य!! जाणीव ही नंतर अस्तित्वात येते, ज्यावेळी तो क्षण स्मृतीत पुन्हा जिवंत होतो. जेंव्हा तो क्षण स्मृतीत जिवंत होतो, त्याक्षणी तो पकडला की अनुभूतीत स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना जागृत होतात. परंतु हे सगळे मानसिक पातळीवर घडत असताना, "प्रत्यक्ष" क्षण नाहीसा होतो आणि अनुभूती त्या क्षणाची जागा घेते!! स्मृतीत जिवंत झालेला भूतकाळ हाच खरा वर्तमानकाळ, असे म्हणता येईल आणि तिथेच कालाच्या वेगळ्या परिमाणाची जाणीव होत राहते.
एका बाजूला गतकालात जमा झालेल्या सार्थ स्मृती आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दबद्ध करणे!! कविता करताना, कवी वर्तमानाच्याच क्षणाबद्दल बोलत असतो पण त्या वर्तमानाची जाणीव निराळीच असते. वर्तमानातील जाणवणाऱ्या प्रत्येक क्षणाला या दोहोंपैकी एकाची ओढ असते आणि त्यात विरुद्ध टोकाचा ताण असतो. त्यांच्या अगदी रक्तात भिनलेल्या स्मृतींवर अंताची छाया असते आणि अनंताकडे अपरिहार्यपणे जाणारी जाणीव गतकालातील स्मृतींत न्हाऊन निघालेली असते. वर्तमानातील क्षणाची जाणीव, भाववृत्तीच्या या ताणांतूनच होत असते. स्मृतीच्या आणि अनंताच्या बदलत्या जाणिवेबरोबर, तसेच या दोहोंपासूनच्या वर्तमान क्षणाच्या अंतराबरोबर हे ताण बदलत असतात.
कवितेत हे सगळे कसे अवतरते? वर्तमानाचा असा प्रत्येक क्षण संज्ञाप्रवाह म्हणून नव्हे तर संवेदनाप्रवाह (Stream of Sensations) म्हणून जाणवतो. तोच क्षण कवीला अनुभूतीत स्पर्श-रूप-रस-गंधातून जाणवतो. तो क्षण म्हणजे त्या संवेदनाप्रवाहातील साऱ्या गती, दिशा, वजने आणि लय, यांच्या ताणांमुळे जागृत झालेला काल असतो. आणि त्या क्षणांवरील हे ताण आपण वर बघितलेल्या दोन टोकांच्या जाणिवेने त्यात आलेले असतात.
कवी हे व्यक्तिमत्व, स्वभावत:च अत्यंत आत्मनिष्ठ, आत्मकेंद्रित असते. परंतु, संकेत अर्थाने जाणवणारी काहीशी भाववशता, भुतकालात जमा झालेला क्षण जपत राहण्याची वृत्ती, बारीक सूक्ष्म अशा कशिद्यातून मोठे परिणाम घडवण्याचे कसब अशा प्रकारेच कवितेत भाववृत्ती विस्तृत होत जाते. अर्थात व्यक्तिमत्वानुसार अनुभव देखील एका विशिष्ट तऱ्हेने जाणवतात आणि तसे जर जाणवले तरच ते अनुभव काव्यरूप घेऊ शकतात. केवळ तत्त्वचिंतन किंवा कल्पनेच्या पातळीवरील अनुभव काव्यरूपासाठी उपयोगी नसतात. वास्तविक, प्रत्येक क्षणाला, अनुभवाला संवेदना-शरीर असावे लागते, जे त्यांना स्पर्श-रूप-रस-गंधांतून जाणवेल. भावनानुभव हे अशरीरी असले तरी त्यांची कवीला होणारी जाणीव भाव-रुपातूनच होत असते. म्हणूनच, कवींची संवेदनाविश्वाची जाणीव ही अतिशय निर्णायक आणि भरीव असते, असे काहीसे ढोबळ विधान करता येईल.
आता, कवितेत येणाऱ्या संवेदनानुभवातील उत्कटता हेच त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण मानावे लागेल. वास्तविक, अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव प्रतीत होणे अवघड असते. पण यात गोम अशी आहे, संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याखेरीज ते संवेदनाविश्व देखील जाणवत नाही!! तसे घडले नाही तर निर्माण होणारे काव्य सपक, सामान्य पातळीवर अवतरते. रचनेत नेहमीच एक विलक्षण ताण असावाच लागतो. ज्या सचेतन तोलाची (Dynamic Equilibrium) जाणीव कवितेच्या स्थायीभावात होते, त्यामुळे हे संवेदनाविश्व त्या उत्कटतेच्या पातळीवर जाते. अर्थात अभिव्यक्ती ही निरनिराळ्या भावनांच्या पातळीवर व्यक्त होत असते.
आयुष्यात अनेक अनुभव येत असतात. त्यातील काही संवेदनाद्वारे स्वतः:ला आलेले, काही कल्पनेने जाणलेले, काही वैचारिक स्वरूपाचे असतात तर काही यांतील काहींच्या किंवा सर्वांच्या एकत्रित मिश्रणाने असे संमिश्र असतात. परंतु यांपैकी काहींच्या किंवा सर्वांच्या एकत्रीकरणाने मिळालेल्या अनुभवांचा एकात्म आणि अर्काभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती निर्माण होते, तिच्यातूनच भावकविता निर्माण होते, असे म्हणता येईल. एखादा अनुभव आपण कुठल्या तऱ्हेने घेतला, यावरच त्याची गुणवत्ता अवलंबून असते. आणि त्यामुळेच या भाववृत्तीचे अनुभवाच्या क्षणाशी एक अभेद्य असे नाते असते. सर्व ताणांनिशी अनुभवाचा सुखं जर रसिकांच्या मनात जागृत झाला तरच त्या क्षणाच्या जाणिवेतून कवीला जाणवलेल्या भाववृत्तीचा अनुभव रसिकाला देऊ शकतो.
भाववृत्तीचा एक अंतर्गत असा लय असतो. ती भाववृत्ती ज्या क्षणाला जाणवते, त्या क्षणाच्या स्पंदनाचा तो लय असतो. जर का वाचलेल्या कवितेत, त्या लायची जाणीव झाली नाही तर कविता ही केवळ नाडक्याच्या जाणिवेपुरती सीमित राहते. कवितेची अशी यांत्रिक बंदिश, कवितेतून प्रतीत होणाऱ्या अनुभवविश्वाशी दूरस्थ नजरेने बांधलेली असते आणि अशी मांडणी नेहमीच भावकवितेला मारक ठरते. भावनाशयाच्या अशा स्थूल जाणिवेकडून सूक्ष्मतेकडे होत जाणारा प्रवास धुंडाळणे, हे एक महत्वाचे श्रेयस म्हणता येईल. संवेदनानुभवांची अलंकारिकतेकडून "प्रतिमा" या स्वरूपाकडे गेलेली जाणीव, तसेच कवितेतील घटक आणि शब्द आणि प्रतिमा यांची तर्कात्म बांधणी, ही भावकविता सिद्ध होण्याच्या मार्गातील ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काही लिहिणे तसे फार अवघड असते कारण, तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल व विशिष्ट स्वरूपाचा असतो. तो इतका "आत्मगत" असतो की तो अनुभव असा आहे, हे सांगाव्या लागणाऱ्या गद्यस्वरूपात पकडता येत नाही. तेंव्हा अशा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणाऱ्या भावनाशायाची अंतिम बंदिश निरखणे, इतकेच आपल्यासारख्या रसिकांच्या हाती असते.
आपल्या सर्व प्रेरणा आणि कृती यांच्यामध्ये एक अविभाज्य नाते असते. विचारांच्या पातळीवर हे नाते स्पष्टपणे कार्यकारणभावाचे आहे, असे सांगता येईल. परंतु, भावना, इच्छा, संवेदना, कल्पना आणि विचार या सर्वांनी सिद्ध होणाऱ्या प्रेरणाक्षेत्रामुळे घडलेल्या सखोल अशा भावानुभवांत कार्यकारणभाव इतक्या स्पष्टपणे दाखवणे केवळ अशक्य!! आणि म्हणूनच तर्कात्म सूत्र तेथे अगदी वरच्या अशा विचारांच्या पातळीपलीकडे जाऊ शकत नाही. तर्कात्म सूत्रावर बांधलेली अनुभवाची बंदिश ही नेहमीच निश्चिततेकडे जाते, कार्य आणि कारण यांचे संबंध प्रस्थापित करते. जाणिवेतील संमिश्रपणापेक्षा सोपेपणाकडे, सूचकतेपेक्षा आकुंचिततेकडे जाण्याची प्रवृत्ती असते. अर्थात भाववृत्ती विचाराच्या पातळीवर आणून बुद्धिगम्य करणे, हे भावकवितेचे कार्यच नाही. एखादा वैचारिक प्रबंध तसे करू शकेल पण भावकाव्य नाही. भाववृत्तीने भारलेल्या क्षणांचेच स्पंदन जाणवून देणे, त्या क्षणांमधील सारे ताण शब्दांकित करणे आणि तर्कात्म बंदिश भावकवितेच्या मूळ स्वरूपावर अन्याय करीत असते.

No comments:

Post a Comment