Monday 9 April 2018

रागमाला - हमदर्द

"मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या,
    दुमडून कडांना दुखवत नाही देठ .....
मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत,
    अन प्रेमासाठी मिटून ठेवते ओठ ..... "
सुप्रसिद्ध कवियत्री अरुणा ढेऱ्यांच्या या असामान्य भावव्यक्ती दर्शविणाऱ्या ओळी. खरतर या ओळी वाचताना, रॉय किणीकरांच्या "रुबाया" रचनांची फार आठवण येते. रचनांचा घाट तसाच आहे, अभिव्यक्तीत साद्ध्यर्म्य आहे पण तरीही आशयांत वेगळेपण आहे. अर्थात हे तर समृद्ध कलाकाराच्या बाबतीत नेहमीच घडत असते. हाती असलेल्या घाटांतून स्वतः:च्या अस्तित्वाची घाटदार ओळख करून देणे, सहजशक्य असते आणि अरुणा ढेऱ्यांनी अतिशय सहजतेने सिद्ध करून दाखवले आहे. अबोध, मुग्ध प्रणयाची ओढ पण तरीही स्वत्व जागे ठेऊन ओलसर हळव्या आठवणींचा पट मांडला आहे. प्रतिमांचे अचूक उपयोजन आणि भावार्थाची सुयोग्य जाणीव, या भावकवितेतून आपल्याला घेता येते. भावकवितेचे हे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
याच ओळीसारख्या आधारे आता आपण, हिंदी चित्रपट संगीतातील पहिली सांगीतिक कृती - ज्याला रागमाला म्हणता येईल अशा रचनेचा आस्वाद घेणार आहोत. १९५४ साली "हमदर्द" नावाचा चित्रपट आला होता. संगीत, प्रथितयश संगीतकार  बिस्वास यांचे होते. अनिलदांच्या संगीताविषयी लिहायचे झाल्यास, शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, काव्याची सखोल जाणीव आणि आपण चित्रपट गीत बनवत  आहोत, याची प्रचिती संगीत रचना ऐकताना तत्परतेने द्यायची हातोटी, अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. तत्कालीन चित्रपट संगीताच्या आधारे आणखी काही ठळक विधाने करायची झाल्यास, "वाद्यवृंद रचना" आणि "संगीत लेखन" या दोन्ही बाबी अभारतीय असून देखील त्यांनी स्वररचना करण्याच्या कामी मदत घ्यायला मागेपुढे बघितले नाही. वास्तविक पहाता, एरव्ही त्यांचा आग्रह भारतीयत्वाचा होता परंतु वाद्यांचे स्वनरंग आणि समूहगायन, यांचे त्यांना अजिबात वावडे नव्हते. थोडक्यात असे म्हणता येईल, भारतीय संगीतपरंपरेचा त्यांच्यापुढे असलेला नकाशा बराच व्यापक होता आणि त्यांच्या संगीतात, त्याच्या जाणिवेचा अचूक प्रतिबिंब पडले आहे.
भारतीय संगीतात "ओम" या ध्वनीला अपरंपार महत्व आहे आणि तंबोऱ्याच्या झणत्कारात जेंव्हा मन्ना डे यांच्या गळ्यातून, हा ध्वनी निघतो, तिथेच गाण्याची पार्श्वभूमी तयार होते. किंचित स्वर आहे आणि त्यात लताबाई आपला स्वर मिसळतात. कालाच्या पार्श्वभूमीवर बघितल्यास, दोन्ही ध्वनी क्षणमात्रच ऐकायला मिळतात आणि त्यातूनच पुढील स्वररचनेचे सूचना मिळते. कुशाग्र संगीतकार इथे समजून घेता येतो, ज्याला स्वराच्या प्रत्येक कणाचे महत्व माहीत असते. मुळात आपण जरी रागमाला स्वरबद्ध करीत असलो तरी चित्रपटासाठीची रचना आहे, याचे नेमके भान दिसते. रचनेत पुढे अनेक हरकती, ताना इत्यादी अलंकारांचा उपयोग आहे पण त्यातून हाताशी असलेल्या शब्दरचनेचा भाव दृग्गोचर करणे आणि सांगीतिक आशय विस्तारित करणे, या बाबी विशेषत्वाने ऐकायला मिळतात. "ओम" ध्वनीनंतर सुरेल "आकार" लावलेला आहे. आपले भारतीय रागसंगीत हे "आकारबद्ध" आहे आणि "आकार" याला अतिशय महत्व आहे. याचा "आकारा"तुन "हुंकारयुक्त ध्वनी मिसळला आहे. म्हणजे बघा, अजून "अस्ताई" सुरु व्हायची आहे पण त्याआधीच रागसंगीताची ढोबळ अशी वैशिष्ट्ये,  स्वरांकृत मांडणीतुन केली आहे.

रितू आई रितू जाये सखी रे, मन के मीत ना आये.
जेठ महिना जिया घबराये, पल पल सूरज आग लगाये,
दुजे बिरहा अगन लगाये, करू मैं कौन उपाय.
रितू आई रितू जाये सखी रे.....

साधा त्रिताल वापरला आहे पण तालाच्या मात्रा म्हणून त्याचे "वजन" दाखवलेले नसून, स्वरलयीला पूरक असे वादन आहे. एकूणच शब्दरचना बघितली तर सहज समजून घेता येईल, काव्यात "ब्रज" भाषेचा उपयोग केलेला आहे. आपल्या रागसंगीतातील बंदिशीचा,भाषेच्या अंगाने अभ्यास केला तर आपल्याला हेच आढळते, बहुतेक बंदिशी या "ब्रज" भाषेतून लिहिल्या गेल्या आहेत . इथे "रितू", "बिरहा", "अगन"  किंवा पुढील अंतऱ्यातील "हमार" किंवा :ननदिया" सारखे शब्द हे उत्तर प्रदेशातील लोकसंगीतातून घेतले आहेत जेणे करून, स्वररचना बंदिश थाटाची होईल पण अनिलदांनी कुठेही स्वररचनेवर बंदिशींची छाप उठवलेली नाही - गाण्यातील गीततत्व कायम राखले आहे. "जेठ महिना जिया घबराये" ही ओळ दुसऱ्या वेळेस घेताना, आकारयुक्त हरकत घेतली आहे पण तिचा अवकाश तपासला तर हरकत ही रागसंगीतातून उचलली नसून, भावाच्या अंगाने तुटक अशी घेतली आहे. हाच फरक रागसंगीत आणि ललित संगीत यांच्या सादरीकरणात अंतर्भूत असतो. 

बरखा रितू बैरी हमार, जैसे सास ननदिया
पी दरसन को जियरा तरसे, अखीयन से नित सावन बरसे,
रोवत है कजरा नैनन का, बिंदिया मोरे झुकाय.
बरखा रितू बैरी हमार.....

"अस्ताई" मधील उन्हाची तलखी अनुभवल्यावर अंतरा "मल्हार" रागावर येणे क्रमप्राप्तच ठरते. पहिला अंतरा हा सरळ, सरळ "गौड मल्हार" रागावर बांधलेला आहे. संगीतकाराचे वैशिष्ट्य असे, एका रागातून दुसऱ्या रागात प्रवेश करताना कुठेही "रागबदल" ठसला जात नाही तर त्याच लयीच्या अंगाने स्वररचना बदलली जाते आणि एका क्षणी आपल्याला जाणवते, गाण्याची चाल बदलली आहे!! मघाशी मी ब्रज भाषेचे उदाहरण दिले ते याअंतऱ्यात अधिक ठळकपणे दिसते, जसे "रोवन" , "कजरा", "बिंदिया" इत्यादी. ब्रज भाषेचे "खटकायुक्त" उच्चारण बहुदा रागसंगीताला भावणारे असावे, असा एक अंदाज बांधता येतो. स्वररचनेच्या अंगाने बघायला गेल्यास, पहिली ओळ घेतल्यानंतर "पी दरसन को जियरा तरसे" ही ओळ दुसऱ्या वेळी घेताना, लगेच लताबाई "रोवत है कजरा नैनन का" ज्या प्रकारे घेतात, ते अनुभवण्यासारखे आहे. सर्वसाधारणपणे पहिली ओळ संपल्यावर, दुसऱ्या ओळीकडे चाल वळते पण इथे पहिली ओळ खंडित करून दुसरी घेतली आहे आणि तशी घेताना लय कशी वळवून घेतली आहे, खास ऐकण्यासारखे आहे. ऐकायला सहज वाटणारी ही "जागा" प्रत्यक्ष गाताना अवघड होते. 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधी बासरीच्या स्वरांनी आपल्या "जोगिया" भेटतो. मुळातला अतिशय करून राग आणि इथे ऋतू बदल दर्शविताना, पावसानानंतरची "पतझड" व्यक्त व्हायला जोगियाचेच स्वर हवेत. त्यातून जी अव्यक्त, अबोध अशी व्याकुळता ऐकायला मिळते, ते स्वरसौंदर्य केवळ अप्रतिम असेच म्हणायला हवे. बासरीच्या अत्यंत हलक्या, व्याकुळ स्वरांनी दुसऱ्या अंतऱ्याची पार्श्वभूमी तयार होते.  

पी बिन सुना जी, पतझड जैसा जीवन मेरा,
मन बिन तन जियूं जल बिन नदिया, ज्यो मैं सुनी बिना सांवरिया,
औरो की तो रैन अंधेरी, पर हैं मेरा दिन भी अंधेरा
पी बिन सुना जी.....

इथे "पतझड" शब्द कसा स्वरांकित केला आहे बघा, निसर्गातील हिरवाई आता संपली असून सगळी झाडे उघडी पडत आहेत, वातावरण सगळे शुष्क, निरुत्साही झाले आहे आणि याच भावनेचा नेमका परिपोष "पतझड" याच शब्दातून व्यक्त होतो आणि तोच भाव अधिक खोलवर लताबाईंनी आपल्या गळ्यातून दर्शविलेला आहे. कुठेही स्वरांची चमत्कृती नाही, स्वरांचे आडंबर नाही, आहे ती वातावरणात भरलेली विषण्णता!! केवळ सुरांच्या साहाय्याने होणारी अव्यक्त भावना!! 
अंतरा संपताना थोडी सरगम आहे, दोन कलाकारांनी सरगम घेताना कशी "गायकी" दाखवायची आणि गायकी दाखवताना, लयीचे बंधन कसे पाळायचे याचा सुरेख आदिनमुना पेश केला आहे. इथे देखील "निषाद" स्वरावर लताबाईंनी केलेली "उठावण" खास ऐकण्यासारखी आहे. 

आपले भारतीय संगीत हे जरी बव्हंशी भक्ती, दु:ख इत्यादी भावनांवर आधारलेले असले तरी आपल्याकडे सुखांतिका ही कल्पना देखील तितकीच महत्वाची मानली गेली आहे. त्यादृष्टीने या रागमालेची समाप्ती "बहार" रागावर होणे संययुक्तिक ठरते. 

आयी मधुर रितू बसंत बहार की, फुल फुल पर भ्रमर गुंजत,
सखी आये नहीं भ्रमर हमार री, आयी मधुर रितू बसंत बहार की.
कब लग नैनन द्वार सजाऊ, दीप जलाउ दीप बुझाऊ
कब लग करुं सिंगार रे
आयी मधुर रितू बसंत बहार की......

या शेवटच्या अंतऱ्यात देखील स्वच्छंदी वातावरण असले तरी "गायकी" ओतप्रोत भरलेली आहे. शेवट करताना, ज्याप्रकारे या दोन्ही गायकांनी तानांचे दर्शन घडवले आहे, ते केवळ अपूर्व आहे दोघांच्यातील समन्वय तसेच सुरांचे सच्चेपण हे अनुभवण्यासारखे आहे. खरतर ही स्वररचना म्हणजे अनिलदा, मन्ना डे  आणि लताबाई यांच्या एकत्रित कुशाग्र सांगीतिक संकल्पनांचा आविष्कार आहे, हेच खरे!! 



No comments:

Post a Comment