Saturday, 31 December 2022

एक हसीं शाम को!!

कुठलाही संगीतकार कितीही प्रतिभावान असला तरी त्याची एक *स्वतंत्र* शैली असते. या शैलीतून कुणाही संगीतकाराची सुटका झालेली नाही. क्वचित एखादा संगीतकार, आपल्या रूढ शैलीतून *सुटका* करून घेण्याचा प्रयत्न करतो, फारच थोड्यावेळा ते शक्य होते परंतु पुन्हा तो आपल्या ठराविक शैलीत बंदिस्त होतो. आता *रूढ शैली* म्हणजे तरी काय? आणि फक्त संगीतकाराचीच रूढ शैली असते का? इतर क्षेत्रातील कलाकारांची देखील रूढ शैली नसते का? एकेका प्रश्नाकडे वळूया. संगीतकार जेंव्हा एखाद्या गाण्याची स्वररचना करतो तेंव्हा त्यात त्याचा *स्वभाव* अनाहूतपणे डोकावतो. हे केवळ जाणतेपणी घडत नसून, अजाणता देखील घडत असते. हा काही *दोष* नसतो तर त्या संगीतकाराची स्वतःची ओळख असते. परंतु कला निर्मितीत सातत्य राखण्याच्या प्रयत्नात, त्या संगीतकाराची ठराविक अशी शैली जन्माला येते आणि ती त्याची चाकोरी बनते. आता संगीतकाराचीच चाकोरी होते का? तर तसे नक्कीच नाही. कलेच्या कुठल्याही प्रांगणातील कलाकार घेतला तरी त्याच्याबाबत शैली ही चिकटलेली असते, मग तो लेखक असो, खेळाडू असो, चित्रकार असो किंवा अन्य क्षेत्रातील कलाकार असो. आजच्या लेखात मी अशी सुरवात केली कारण आजचे गाणे जर का थोड्या बारकाईने ऐकल्यास, एका प्रसिद्ध संगीतकाराने, दुसऱ्या प्रसिद्ध संगीतकाराच्या शैलीत बांधलेली स्वररचना!! अर्थात दुसऱ्या संगीतकाराच्या शैलीत गाणे तयार केले असले तरी देखील संगीतकाराचा *मूळ स्वभाव* गाण्यात कुठेतरी डोकावतोच. * एक हसीं शाम को, दिल मेरा खो गया* हेच ते गाणे आहे. आता गाण्याबद्दल सविस्तर विवरण नंतर करूया. प्रथम गाण्यातील कवितेची ओळख करून घेऊ. आजच्या गाण्यातील काव्य हे प्रसिद्ध उर्दू शायर राजा मेहंदी अली खान, यांनी लिहिलेले आहे. आता मुळातील उर्दू शायर म्हटल्यावर कवितेवर उर्दू भाषेचा प्रभाव पडणे साहजिक आहे. *मुद्दतो से आरजू थी* किंवा * शबनमी सी जिस की आँखे* या ओळीत या भाषेची ओळख होते. त्यातून मुळातले कवी म्हटल्यावर, शाब्दिक श्लेष नक्कीच अभिप्रेत असतात. *शबनमी* हा, मूळ *शबनम* शब्दाचा वेगळा अवतार!! मूळ शब्दाचे *विशेष नामात* परिवर्तन करून, सौंदर्याचे परिमाण अधिक विस्तृत केले. अर्थात हे चित्रपट गीत आहे आणि तिथे बरेचवेळा *तडजोड* ही करावीच लागते जसे पहिल्या कडव्यात *सुनी सुनी* हे शब्द पुनरुक्त केलेत.निखळ कविता म्हटली तर त्यात अशी पुनरावृत्ती खपत नाही परंतु चित्रपट गीताची शब्दरचना म्हटल्यावर, प्रत्येक गाण्याचे एक स्वतंत्र *मीटर* असते आणि त्यानुरूप शब्दरचना आकारास आणावी लागते. इथे तेच घडले आहे, २ वेळा *सुनी* शब्द लिहून आशयात कसलीच वृद्धी होत नाही. तसेच *मेरे दिल के कारवाँ को* असे काहीसे सरधोपट शब्द वाचायला मिळतात .असे असूनही, कविता म्हणून रचना सुंदर आहे, यात शंकाच नाही आणि याचे कारण रचनेत अनुस्यूत असलेली गेयता. वास्तविक रचनेतील शब्दसंख्या थोडी विषम स्वरूपाची आहे. हे विधान मी नेहमीच्या चित्रपट गीतांतील कवितेच्या आधाराने करत आहे. या गाण्याची स्वररचना सुप्रसिद्ध संगीतकार मदन मोहन यांनी बांधलेली आहे. चालीचा *तोंडवळा* ऐकल्यावर, शैली संगीतकार ओ.पी.नैयर यांच्याशी तंतोतंतपणे जुळणारी वाटते आणि तशी आहे देखील. नैयर यांच्या चालीत सर्वसाधारणपणे आढळणारे *खटके* किंवा *हरकती*, इथे ऐकायला मिळतात. गाण्याची चाल बरीचशी *जनसंमोहनी* या अनवट रागाशी जुळणारी आहे. *कोमल निषाद* व्यतिरिक्त सगळे स्वर शुद्ध लागणाऱ्या या रागात *मध्यम* स्वराला मात्र स्थान नाही. *ग प ध नि(को) धss प* ही स्वरांची संहती नेहमी ऐकायला मिळते. मुळातला *कर्नाटकी* संगीतातील राग, इतर अनेक रागांप्रमाणे उत्तर भारतीय संगीतात आणला गेला आणि स्थिरावला. आता या गाण्याच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गाण्याची सुरवात *गप पध सांसां गग* ही सुरावट *एक हसीं शाम को* या शब्दांची आहे तर *साग रेसानि सा रेग पमग* या स्वरांनी *दिल मेरा खो गया* ही ओळ सजलेली आहे. जनसंमोहनी रागाचे चलन ऐकल्यावर एकदम या चाळीशी असणारे साम्य नजरेस पडते. आता वर मी म्हटले तसे नैयर यांच्या शैलीशी जुळणारी स्वररचना आहे, या विधानाला पुरावा म्हणून गाण्यातील तालवाद्य, नैयर यांच्या गाण्यातून बरेचवेळा ऐकायला मिळणारे *चायनीज ब्लॉक* हे वाद्य इथे ऐकायला मिळते आणि माझ्या विधानाला पुष्टी मिळते. आता मुखड्यापासून जी शैली ऐकायला मिळते, त्यालाच अनुलक्षून गाण्याचा वाद्यमेळ रचणे, क्रमप्राप्तच ठरते. विशेषतः बासरी आणि व्हायोलिनची स्वररचना अगदी त्याच शैलीबर बांधलेली आहे. अंतरे बांधताना, धाटणी मुखड्याला सुसंगत अशीच ठेवली आहे. असे असले तरी गाण्यावर मदन मोहन यांची छाप दिसून येते आणि ती छाप गाण्यातील वेगवेगळ्या हरकतींमधून दिसून येते. मोहम्मद रफींनी या गीताचे गायन केले आहे. मुळातला मोकळा आवाज आणि त्याला सजून दिसणारी चाल मिळाल्यावर, रफींचे गायन अप्रतिम होणार, हे नक्की. अर्थात काही ठिकाणी आवाज काहीसा नाट्यात्म लावला आहे जसे, *मुद्दतो से आरजू थी, जिंदगी में कोई आये* ही ओळ गाताना काही ठिकाणी अनावश्यक *वजन* वापरले असे वाटते. अर्थात एक गायक म्हणून गाण्याच्या सुरवातीला जी *हमिंग* सुरावट आहे ती निव्वळ अप्रतिम. नुसत्या हमिंग मधून गाण्याची चुणूक दाखवायची, हे अजिबात सोपे नाही. गाण्याची चाल मुळात मध्य सप्तकात आहे, अधून मधून वरच्या सप्तकात जाते पण एकूणच गाणे काहीसे द्रुत लयीत असूनही आवाज अतिशय शांत, हलका असा लावलेला आहे. त्यामुळे प्रणय गीताला फार पोषक झाले आहे. चाल सोपी आहे म्हणूनच कदाचित लोकांच्या पसंतीस पडली असावी. एक हसीं शाम को, दिल मेरा खो गया पहले अपना हुआ करता था, अब किसी का हो गया मुद्दतो से आरजू थी, जिंदगी में कोई आये, सुनी सुनी जिंदगी में, कोई शमा झिलमिलाये, वो जो आये तो रोशन ज़माना हो गया मेरे दिल के कारवाँ को, ले चला है आज कोई, शबनमी सी जिस की आँखे,थोड़ी जाएगी,थोड़ी सोई, उनको देखा तो मौसम सुहाना हो गया. (2) एक हसीं शाम को दिल मेरा खो गया_Dulhan Ek Raat Ki1966_Nutan& Dharmendra _Rafi_Raja MA khan_M M_a tri - YouTube

३१ डिसेंबर

पूर्वी आपल्याकडे ३१ डिसेंबर हा वेगळा दिवस म्हणून साजरा करायची पद्धत फारशी रुळलेली नव्हती परंतु हळूहळू आपल्याकडे पद्धत स्वीकारली गेली. आता तर खूपच सहजपणे स्वीकारली गेली आहे. मी जेंव्हा १९९४ साली साऊथ आफ्रिकेत गेलो तेंव्हा ३१ डिसेंबर साजरा करायचा असतो, हे मनात पक्के झाले होते. सुरवातीचे वर्ष, मी पीटरमेरित्झबर्ग इथे असताना, बव्हंशी आम्ही भारतीय एकत्र जमत असू आणि तिथे मग आपल्याच पद्धतीने ही रात्र साजरी करत असू. साऊथ आफ्रिकेत ख्रिसमस म्हणून त्या समाजाची दिवाळी. वर्षभर जी काही पुंजी साठवली असेल, ती वर्षाअखेरीस वापरायची. तेंव्हाच भरपूर खरेदी करायची, पार्ट्या करायच्या वगैरे कार्यक्रम करायचे. आम्ही भारतातले, महिना आधी येणारी दिवाळी साजरी करीत असू आणि नंतर ख्रिसमस. अर्थात नोकरीत जो काही *बोनस* मिळायचा, तो ख्रिसमसच्या दिवसात. आता, भारतीय एकत्र येणार म्हणजे ड्रिंक्स तर अत्यावश्यक असायचे पण खाण्याचे जिन्नस देखील शक्यतो भारतीयच असायचे. एकत्र साऊथ आफ्रिकेत डिसेंबर महिना म्हणजे कडाक्याचा उन्हाळा!! त्यामुळे दिवसा फारसे काही कार्यक्रम नसायचे परंतु संध्याकाळ उजाडली की मग एखादी व्हिस्कीची बाटली आणि बव्हंशी बियरचे टिन असायचे. बियर असण्याचे महत्वाचे कारण वातावरणातील उष्णता. खाण्याचे पदार्थ शक्यतो भारतीय पद्धतीचे चिकन किंवा मटण किंवा कधी तरी मासे असायचे. वास्तविक आम्ही सगळे इतर दिवशी देखील एकत्र जमत होतोच, त्यामुळे गप्पांमध्ये तोचतोचपणा जास्त असायचा. परंतु या सगळ्या साजरेपणात, ३१ डिसेंबर आहे तेंव्हा आपण नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे, अशी जगभर रीत आहे, तेंव्हा ती रीत आपण देखील पाळली पाहिजे, असेच काहीसे असायचे. त्यातून आजूबाजूला गोरे तसेच काळे, त्यांच्या पद्धतीने ख्रिसमस साजरा करीत असायचे. मग आपण का मागे राहायचे? साऊथ आफ्रिकेत, साधारणपणे १५,१६ डिसेंबर पासून ते ७ जानेवारीपर्यंत, बहुतेक सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Annual Shut Down & maintenance साठी बंद असतात. मी आणि आमचे मित्र हे ऑफिसमधील, तेंव्हा आम्ही सगळे बरेच दिवस मोकळेच असायचो. पुढे मला गोऱ्या लोकांच्यात वावरायची संधी मिळाली आणि गोरा समाज ख्रिसमस कसा साजरा करतात, हे फार जवळून बघायला मिळाले. विशेषतः मी जेंव्हा Standerton इथे आलो तेंव्हा ही संधी प्राप्त झाली. ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे प्राबल्य होते त्यामुळे त्यांची संस्कृती अनुभवण्याची संधी मिळाली. मी इथे २ वर्षे होतो आणि दोन्ही वर्षी ख्रिसमस गोऱ्या कुटुंबात साजरा केला. माझा *जनरल मॅनेजर* गोरा होता - *डेव्हिस*. पूर्वी लष्करात होता, त्यामुळे शरीरयष्टी काटक, निळे डोळे आणि झपाझप चालायची सवय. वास्तविक त्याचे आणि माझे काम वेगळे होते पण तरीही अनेकवेळा एकत्रित काम करायची गरज पडायची आणि त्यातून माझी त्याच्याशी चांगली ओळख झाली. मी *एकटा* राहतो, याचे त्याला कौतुक वाटायचे. तसे गोरे लोकं बहुतेक करून अंतर राखून नाते निर्माण करतात. अति जवळीक, त्यांच्या स्वभावातच नसते. कामाच्या वेळेस, भरपूर काम करतील पण ऑफिसची वेळ संपली की तू कोण आणि मी कोण!! असा त्रयस्थ भाव ठेवतील. असे असूनही माझ्याशी त्याची जवळीक वाढली. पहिल्याच वर्षी त्याने मला ख्रिसमस निमित्त काय करणार आहेस? हा प्रश्न केला. मी काय करणार, घरीच बसून गाणी ऐकणार, पुस्तके वाचणार. त्यावेळी मला लिहायचा आजच्यासारखा *चसका* लागला नव्हता. तेंव्हा त्याने लगोलग, त्याच्या घरी यायचे निमंत्रण दिले. त्याच्या बायकोला - जेनीला मी ओळखत होतो. जेनी ४,५ वेळा ऑफिसमध्ये आलेली असताना, मी तिला भेटलो होतो. ,२ वेळा डेव्हिस *बृवरी* मध्ये कामाला गेला असताना, जेनी माझ्या समोर बसली आणि आमच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे आमंत्रण स्वीकारताना फारसे *ओशाळे* वाटायचे काहीच कारण नव्हते. दोघेच इथे राहात होते पण ख्रिसमस निमित्ताने त्याच्या २ मुली आणि जावई येणार होते. परिणामी घरात उत्सवी हवा होती. मी ३१ तारखेला संध्याकाळी त्याच्या घरी पोहोचलो तर घराची सजावट चालली होती. कुठे फुगे लाव, कुठे निरनिराळ्या झिरमिळ्या लावणे चालू होते. जरी मी डेव्हिस आणि जेनीला ओळखत असलो तरी त्याच्या मुलींना आणि जावयांना प्रथमच भेटत होतो. घरात पूर्णपणे सणाचे वातावरण होते. मी आलो तशी डेव्हीसने माझी सगळ्यांना ओळख करून दिली. हस्तांदोलन वगैरे उपचार पार पडले. घरातून *टर्कीचा* सुंदर वास येत होता तर टेबलावर एका जावयाने *Royal Salute* सारखी अत्यंत महागडी स्कॉच उघडली. दुसऱ्या जावयाने *सुगंधी सिगार* शिलगावली आणि वातावरणात ख्रिसमस सुरु झाला. बाटली उघडली तशी काचेचे चषक भरले. खरी स्कॉच ही On The Rocks अशीच घ्यायची असते. या पूर्वी मी कधीच इतकी महागडी स्कॉच घेतली नव्हती. माझी मजल फार तर *Johnnie Walker* किंवा *Glenfidditch* इथपर्यंत गेली होती. इथे तर ग्लासात (पेग मेजरने ड्रिंक्स घ्यायचे असते, हे प्रथम समजले!!) ड्रिंक्स घेतले आणि फक्त बर्फाचे ३,४ तुकडे त्यात टाकायचे आणि एकमेकांच्या ग्लासांना, किणकिण आवाजात *चियर्स* करून कार्यक्रमाला सुरुवात करायची. ही स्कॉच फारच *मवाळ* निघाली पण काहीशी उत्तेजित करणारी. अर्थात इतरेजन कसे घेतात, हे बघूनच मी घ्यायला सुरु केले. पहिला ग्लास संपला आणि सिस्टीमवर खास ख्रिसमस साठीची गाणी गाणी लागली आणि त्या ३ जोडप्यांनी पाय थिरकवायला सुरु केले. मग तिथे जोडप्यांची अदलाबदल देखील झाली पण त्यात उस्फुर्तपणा जास्त होता. एकत्रितपणे नृत्याचा आनंद घेणे, इतपतच उद्दिष्ट होते. जवळपास अर्धा, पाऊण तास नृत्य चालू होते. तोपर्यंत मला पाश्चात्य नृत्याबद्दल काहीही माहीत नव्हते. मला अर्थात आग्रह झाला पण आपलीच लाज आपल्या हाताने कशी काढायची!! त्यांना देखील नवल वाटले. जेनी आत गेली आणि तिने जेवण तयार असल्याचे सांगितले. तोपर्यंत मी *टर्की* हा प्रकार खाल्लेला नव्हता. तसा मी मागेमागेच रहात होतो म्हणा. टर्कीसोबत चिकनचे २ पदार्थ आणि मुख्य म्हणजे रशियन सॅलड आणि बटाट्याचे सॅलड(बटाटे पीठ होईपर्यंत शिजवायचे, त्यात उकडलेली आणि कुस्करलेली अंडी,मेयॉनीज आणि बारीक मिरची टाकायची. काय अफलातून चव लागते) आले. टर्की भलतीच चवदार निघाली. जेवण झाल्यावर पुन्हा Irish Coffee आली. जेवणानंतर *आपोष्णी* म्हणून घेतात. अप्रतिम ड्रिंक्स असते. रात्र पूर्णपणे जगवायची असे ठरले आणि पुन्हा संगीताचा माहौल तयार झाला आणि मला आग्रहाचे आमंत्रण आले. एव्हाना, ड्रिंक्सचा थोडा अंमल झालाच होता तेंव्हा बिनधास्तपणे जेनीबरोबर नृत्य करायला सुरु केले. सुरवातीला पायाची तंगडतोड झाली पण लवकरच निदान पाय कसे हलवायचे, इतपत नृत्य समजले. रात्री उशिरापर्यंत हा सगळं कार्यक्रम चालू होता. Standerton आकाराने गिरगाव ते दादर इतपत(च) टुमदार गाव आहे त्यामुळे रात्रीबेरात्री फिरणे धोकादायक नव्हते. मी घराची वाट पकडली. पुढे प्रिटोरिया इथे नोकरीसाठी आलो आणि पार्ट्यांचे प्रमाण बरेच वाढले कारण कंपनीतील बहुतांशी स्टाफ हा गोरा होता. इथेच मला *Wendi* भेटली. तिच्याशी आजही माझा संपर्क आहे. तिच्याकडे एका ख्रिसमसला गेलो असताना, *Barbeque* पार्टीची फार जवळून ओळख झाली. निखाऱ्यावर सॉसेजीस भाजून घ्यायचे आणू उभ्यानेच खायचे. सुरवातीला ही *कसरत* वाटली पण पुढे लगोलग सरावलो. एका हातात ड्रिंक्सचा ग्लास आणि दुसऱ्या हातात, सॉसेजीस!! तुम्ही काहीही करू शकत नाही. अर्थात तोंडाने गप्पा मारणे चालूच असायचे. अशावेळी गोरा माणूस मोकळा होतो, प्रसंगी अति वाह्यात देखील होतो. पार्टीमध्ये बायका आहेत तेंव्हा जपून विनोद करावेत, ही आपली संस्कृती पण तिथे अशा वेळी तोंड सुटलेले चालते!! गंमत म्हणजे अशा वेळी ऑफिसचा विषय चुकून निघत नाही. नुकताच बघितलेला सिनेमा (मग तो पॉर्न देखील असू शकतो) किंवा कुणाची टवाळी करणे, हे सगळे चालू असते. नृत्य तर तोंड रिकामे झाले की सुरु असते. संपूर्ण रात्र मजेत काढायची असते. दुसऱ्या दिवशी सुटी असल्याने, मग दुसऱ्या दिवशी लवकर उठायची गरज नसते. आदल्या रात्रीचा ड्रिंक्सचा अंमल अंगावर ओसंडत असतो पण तरीही पार्टी एन्जॉय केलेली असते.

Friday, 30 December 2022

अलविदा अलविदा

खरंतर आजचा दिवस माझ्या लेखाचा नक्कीच नाही परंतु तरीही काहीशा आगंतुकपणे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच शनिवार आणि रविवार हे सभासदांसाठी मोकळे ठेवलेले दिवस असल्याने, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कालच्या लेखावर काही सभासदांनी माझे कौतुक केले, त्यात सौ.इंद्रायणी आंबेकर यांनी *अलविदा* शब्दांचा संदर्भ देऊन, या वर्षाचा शेवट करावा, असे सुचवले होते. कालपर्यंत तरी मी नक्कीच तसा विचार केला नव्हता पण आज सकाळी ती प्रतिक्रिया मेंदूत फिरायला लागली आणि वाटले, त्याच गाण्याच्या उत्तरार्धावर काही ४ शब्द लिहिता आले तर बघूया. अर्थात आज मी कसलीच पूर्वतयारी केलेली नाही तर जे *उस्फुर्तपणे* सुचेल, त्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेंव्हा हे *रसग्रहण* असेलच असे नाही पण गाण्याच्याच संदर्भात सगळे असेल. *सलीम अनारकली* ही कथा, ज्या कथेला ऐतिहासिक आधार सापडत नाही तरीही आपल्या संस्कृतीत अजरामर झालेली कथा. एकप्रकारचे प्रणयी *मिथक* म्हणावे, इतकी अलोट लोकप्रियता लाभली आहे. अर्थात आपल्याकडे *हीर रांझा* जशी जोडगोळी अमाप लोकप्रिय झाली तशीच ही जोडी. त्याला *मुगल ए आझम* चित्रपटाने सोन्याचा वर्ख चढवला, हे खरेच आहे पण सांगीतिक दृष्टीने बघायला गेल्यास, नौशाद यांनी दिलेल्या गाण्यांपेक्षा सी.रामचंद्रांनी दिलेली गाणी निःसंशयरीत्या अधिक सुंदर आहेत आणि त्यातील हे *अलविदा* गीत तर कारुण्याचे एक प्रतीक बनून गेले आहे. विफल प्रेम हे आपल्या संस्कृतीला काही नवीन नाही. अगदी आपल्यासारख्या सामान्य आयुष्यात देखील आपल्या आजूबाजूला अशा घटना बघायला मिळतात. तरीही या कथेला अमरत्व प्राप्त झाले कारण त्याला मिळालेल्या संगीताची असामान्य जोड. या कथेचे अपेशी शेवट होणे, हे तत्कालीन सामाजिक स्थितीला धरूनच होते. थोडा विचार केला तर सम्राट अकबरचे काहीही चुकले नव्हते. दरबारातील एक साधी नर्तकी, आणि तिला *सून* म्हणून कायमचे घरात आणायचे आणि स्वीकारायचे!! आज देखील याला फारशी मान्यता मिळत नाही तर त्यावेळच्या *कडव्या* प्रकृतीला पसंत पडणे अशक्यच होते. तेंव्हा या कथेचा शेवट दुःखांत होणे, हे अटळ प्राक्तन होते. त्यातून आपल्याकडे दुःखाला मान्यता देणे, अशी मानसिक वृत्ती असल्याने, या कथेला लोकप्रियता लाभली. आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, काळ आपण पहिल्या भागात प्रणयी थाटाचा आविष्कार बघितला तर आता याचा अटळ दुःखी भाग बघायचा आहे. गाण्याची सुरवातच मुलाची विरही स्वरांनी केलेली आहे आणि तिथेच गाण्याच्या बांधणीची कल्पना येते. दीर्घ *आकार* घेऊन गाणे सुरु होते. अनारकलीला भिंतीत चिणून मारायची शिक्षा मिळते आणि त्या शिक्षेची तजवीज सुरु असतानाचे हे *मूक आक्रन्दन* आहे. आपला अनिवार्य शेवट जवळ आला आहे आणि आपल्या सगळ्या स्वप्नांचा पालापाचोळा बघणे, हेच नशिबी आलेले आहे, या हताश व्यथेतून उमटलेले सांगीतिक *रुदन* आहे. अर्थात या क्षणी आपण काहीही करू शकत नाही, ही जाणीव आतून पोखरत असताना, असाच विरही आलाप, त्या प्रसंगाची विखारी जाणीव अधिक गडद करतो. गाण्याचा सगळा वाद्यमेळ याच भावनेला अनुलक्षून बांधलेला आहे. या गाण्याचे खरे मानकरी पुन्हा संगीतकार सी.रामचंद्र आणि गायक लताबाई, हेच ठरतात. गाण्यातील तालाच्या मात्रा देखील *दबक्या* आवाजात ठेवलेल्या आहेत, जेणेकरून गाण्यातील *आर्तता* कुठेही *गढूळ* होऊ नये. *सुना रही हैं दास्ताँ* ही ओळ मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. व्याकुळतेचा एक क्षण गोठला जावा, तसा तो स्वर आहे. हरल्याची भावना आहे पण त्यातही स्वत्व राखले आहे.जिवंत मरण स्वीकारायची धमक आहे आणि लाचारी तर कुठेच नाही. *फ़िज़ा में भी खिल रही, ये कली अनार की* या ओळीत *कली अनार की* या शब्दात किती सुंदर श्लेष साधला आहे. *इसे मज़ार मत कहो, ये महल हैं प्यार का* मघाशी मी जे म्हटले, मरण स्वीकारताना देखील मनाचा पीळ तुटलेला नाही आणि हेच या ओळीतून दृग्गोचर होते. हे गाणे म्हणजे प्रणयाची आर्त विराणी आहे, एका शोकमग्न मनाचा आकांत आहे. संपूर्ण गाणे म्हणजे आक्रन्दन आहे, ज्या गोष्टीवर हक्क मिळायचा तिथे फक्त विफलताच भोगायला लागण्याची अतृप्त जाणीव आहे. खरंतर हा दुसरा भाग देखील तितकाच अलौकिक आहे आणि त्याच्यावर सखोल विचार करून लिहायला हवे. परंतु आयत्यावेळेस जे मनात आले, तेच शब्दबद्ध केले. अर्थात आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण सगळेच तो आनंदात साजरा करतो. तेंव्हा या गाण्याचा आस्वाद देखील आनंदात घेऊन सरणाऱ्या वर्षाला *अलविदा* करूया. यापेक्षा मी तरी वेगळे काय म्हणणार. दो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहॉं में खिलेंगे हसरतों के फूल, मौत के आसमान में ये जिंदगी चली गयी जो प्यार में तो क्या हुआ सुना रही हैं दास्ताँ, शमा मेरे मज़ार की फ़िज़ा में भी खिल रही, ये कली अनार की इसे मज़ार मत कहो, ये महल हैं प्यार का ऐ जिंदगी की शाम आ,तुझे गले लगाऊं मैं तुझी में डूब जाऊँ मैं जहाँ को भूल जाऊँ मैं बस एक नज़र मेरे सनम अलविदा........ (1) Yeh Zindagi Usi Ki Hai - Lata Mangeshkar, Anarkali Song - YouTube

Tuesday, 27 December 2022

परदेशी वास्तव्य - एक अनुभव

वास्तविक पहाता, मी एव्हाना साऊथ आफ्रिकेतील वास्तव्याबद्दल बरेच काही लिहिलेले आहे. अर्थात फार थोड्या अनुभवांना लेख स्वरूप मिळाले. काही अनुभव चुटकुल्याच्या स्वरूपाचे असल्याने, किती *वाढवून* लिहायचे? हा प्रश्न होता आणि त्यामुळे तात्कालिक अनुभव तसेच मनात राहिले. जे अनुभव निरंतर मनात रेंगाळत राहिले त्यांना लेखात परावर्तित केले. असे असून देखील आजही असेच वाटते, जितके लिहायला हवे होते, तितके लिहून झाले नाही. खरंतर परदेशी एकट्याने राहताना, प्रत्येक दिवस हा अनुभव असतो. संपूर्ण भिन्न संस्कृती,संपूर्ण वेगळ्या विचारांची माणसे आणि त्यांच्या सहवासात सतत राहायचे. हे कितीही नाकारले तरी अवघड तर असतेच. आपण कुणाशी काय बोलायचे? कसे बोलायचे? लोकं आपले बोलणे कसे स्वीकारतील? आपली भाषा त्यांना समजणे अशक्य तेंव्हा त्यांच्या बाजूने विचार करून वागायचे!! ही खरी तारेवरची कसरत असते. पहिल्यापासून आयुष्याला सुरवात करायची असते. पहिला प्रश्न असतो, जरी इंग्रजी भाषा असली तरी उच्चारात प्रचंड फरक पडतो आणि ते उच्चार जिभेवर बसवण्यात कित्येक दिवस, महिने निघून जातात. सुरवातीला माझी बोबडी वळलीच होती. मी इंग्रजीत बोललेले समोरच्या व्यक्तीच्या कळत नाही आणि समोरचा बोललेलं, अवाक्षर समजत नाही. सुरवातीला त्रेधातिरपीट व्हायची. आता ऑफिसमध्ये काम करायचे म्हटल्यावर इतरांशी जुळवून घेणे भागच असते. बरे असेही सांगता येत नाही, मला काही समजले नाही!! सगळेच अंधारात हात पाय मारण्यासारखे होते. अशाच वेळी शांत, स्थिर चित्त आवश्यक असते कारण भाषा समाजात नाही, हे परदेशात कबूल करणे,ही नामुष्कीच असते. विशेषतः गोऱ्या लोकांचे बोलणे (खरंतर पुटपुटणे) समजून घेणे, हे महा कर्मकठीण! इथेच तुमची पहिली कसोटी असते आणि मला ती वारंवार द्यायला लागली. जवळपास, ३,४ महिन्यांनी भाषेचा थोडाफार अंदाज यायला लागला आणि आत्मविश्वास वाढला. पुढची पायरी, ही कामाचे स्वरूप समजावून घेणे, भारतातील कामाची पद्धत आणि साऊथ आफ्रिकेतील कामाची पद्धत यात महदअंतर आहे. सकाळी ८ वाजता ऑफिस सुरु आणि संध्याकाळी ४.३० किंवा ५ पर्यंत संपणार. ऑफिसची वेळ झाली की तडक बाहेर पडायचे. भारतात, ऑफिसची वेळ ठराविक नाही म्हणजे ऑफिस सुरु वेळेवर होणार पण घरी जायची वेळ, कामाच्या स्वरूपावर अवलंबून. त्यामुळे कामाचा बोजा आपल्यालाच उचलायला लागतो. त्यातून आमच्यासारखे परदेशातून इथे नोकरीला आलेले म्हणजे इथल्या लोकल लोकांच्या मनात अढी बसलेली. त्यांच्यामते, आम्ही इथल्या लोकांच्या पोटावर पाय आणणारे. अर्थात,हे सत्कृतदृष्ट्या चुकीचे नसले तरी आता इथे नोकरी करायला आलो आहोत तेंव्हा हा विचार मनातून काढून टाकून, आपली उपयुक्तता सिद्ध करणे, हे पहिले आव्हान. त्यासाठी कामात मेहनत घेणे अत्यावश्यक. मी तेच केले आणि जवळपास २ महिन्यात कामाचा अंदाज पक्का केला. हे करताना, शनिवार, प्रसंगी रविवारी देखील कामाला यायला लागले. मी शनिवारी कामाला येतो, ही बाब लोकल लोकांच्या पचनी पडणे अशक्य. मग आडून टोमणे मारणे, चेष्टा (अगदी तोंडावर नसली तरी त्यांच्या ग्रुपमध्ये) करणे, इत्यादी प्रकार चालायचे. मला ते सगळे नजरेआड करणे भाग होते. जसजसा हळूहळू स्थिरावयाला लागलो तशी लोकल लोकं मित्रत्वाच्या नात्याने बोलायला लागले. इथे एक दरी कायम असते, त्यांच्या मनातील अढी काढणे जवळपास दुरापास्त असते तरी कंपनीच्या मॅनेजमेंटची मला साथ असल्याने, लोकल लोकं गुमान बसलेले असत. अशावेळी आपणच पुढाकार घेऊन, गप्पा मारणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे, आवश्यक असते. ऑफिस कामाबद्दल तर संवाद व्हायचाच परंतु दुपारच्या जेवणाच्या सुटीत काहीतरी विषय काढून मित्र संबंध प्रस्थापित करणे, हा उद्योग सुरु करायला लागला. तोपर्यंत माझ्यासारखे जे भारतातून आलेले होते, त्यांच्याशी जवळीक साधलेली असायची आणि आम्ही सगळे एकत्र वावरत असायचो. मी मॅनेजमेंटचा माणूस, हा समज तर कायम लोकल लोकांच्या मनात असायचा. ही तारेवरची कसरत करत, लोकल लोकांशी मित्रत्वाचे संबंध जुळवले,इतके की पुढे मी त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो. अर्थात ही लोकल माणसे म्हणजे मुलाचे भारतीय पण आताची त्यांची इथलीच ५ वी किंवा ६ वी पिढी! अशा लोकांची ओळख वाढवणे, त्यामानाने सोपे होते आणि मी तेच केले. कुठूनतरी भारतातच विषय काढायचा आणित्यांची मते जाणून घ्यायची किंवा त्यांच्या बोलण्यात काही कार्यक्रमांचे सूतोवाच व्हायचे आणि मग शनिवार/रविवारी त्यांच्यात जाऊन मिसळायचे. अनिल वाटतो तितका *अबोल* नाही याची खात्री पटवून द्यायची. घेणे, हा कार्यक्रम सामायिक आवडीचा आणि तिथे माझी नाळ जुळली. ड्रिंक्स साठी जमल्यावर मग जीभा मोकळ्या सुटायच्या आणि मग त्यांच्याशी जवळीक साधणे फार सोपे झाले. तोपर्यंत भाषिक उच्चारांची सवय झाली असल्याने, मग गप्पा, अगदी चव्हाट्यावरील गप्पा देखील खुलायला लागल्या. पुढे, पुढे तर लोकल भारतीय माझ्यासाठी घरून काही खायचे जिन्नस घेऊन यायला लागले आणि संध्याकाळी घरी जायची वेळ झाली की माझ्या ताब्यात तो डबा द्यायचे, बहुतांशी केक, मिल्क टार्ट सारखे तत्सम सुके पदार्थ असत आणि संध्याकाळी भूक लागली की ते खायला बरे वाटत असते. पुढे, शुक्रवार किंवा शनिवार रात्री त्यांच्या घरी जमल्यावर मग जेवणाचा बेत व्हायचा आणि जरी भारतीय चवीचे चिकन किंवा मटण नसले तरी त्याची वेगळी अशी चव होती आणि ती निश्चितच चविष्ट होती. मी भारतातला असून सहजपणे खात आहे, हे त्यांच्या घरातल्यांना खूप आवडायला लागले. पुढे मग त्यांच्यासोबत *नाईट क्लब* गाठला आणि बऱ्याच रात्री तिथे काढल्या!! जसे घरात मिसळायला लागलो तशी त्यांच्या घरातील कार्यक्रमांना माझी उपस्थिती अनिवार्य वाटावी, इतका आग्रह व्हायला लागला. काही लग्न समारंभांना जायला मिळाले तर साऊथ आफ्रिकेत मुलाला २१ वय पूर्ण झाले की फार मोठी पार्टी केली जाते. रात्रभर खाणे, पिणे आणि नृत्याचा दंगा चाललेला असतो. बहुतेक घरांच्या पुढे किंवा पाठीमागे प्रशस्त हिरवळ असते आणि त्या हिरवळीवर *पेंडॉल* टाकून, त्यात सगळी मौज, मजा चालते. इथेच मला पाश्चात्य संगीतावर *पाय* कसे टाकायचे, याचे प्राथमिक शिक्षण मिळाले आणि मुख्य म्हणजे इथला लोकल समाज कसा आहे,याचे फार जवळून दर्शन झाले. काहीवेळा तर घरातली भांडणे देखील माझ्यासमोर झाली. अर्थात मी मात्र प्रत्येक वेळी काहीसे *अंतर* ठेऊन वागत होतो. किती झाले तरी मी इथे *नोकरी* करायला आलो आहे, ही भावना कायम माझ्या मनात असायची. त्यामुळे लोकल भारतीयांना पुढे माझ्याशी कितीही जवळीक साधायचा प्रयत्न केला तरी मी मात्र अंतर ठेऊन असायचो. माझी तिथल्या ३ कुटुंबाशी खूपच जवळीक होती (हे पीटरमेरित्झबर्ग इथे होते). पुढे मी हे शहर सोडले तशी हळूहळू संपर्क कमी झाला पण कधी हा या शहरात येत असे तेंव्हा या कुटुंबाची भेट घेत असे. अशाच एका भेटीत, एका कुटुंबात घटस्फोट झाल्याचे समजले म्हणून त्या बाईला भेटायला गेलो. तिनेच आपल्या नवऱ्याला घराबाहेर काढले होते. तिच्याशी यावेळी मात्र खूप गप्पा मारल्या आणि तिने देखील हाताचे काहीही राखून न ठेवता माझ्याकडे मन मोकळे केले. ते करताना, पूर्वीच्या नवऱ्याने, वेगळे झाल्यावर आठवड्याभरात दुसऱ्या मुलीशी संबंध जोडल्याचे सांगितले. सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. माझी तिच्याशी जवळपास ४,५ वर्षांची ओळख होती, अगदी सुंदर नाते जुळले होते पण अशा प्रसंगी मीच अवघडल्या सारखा झालो. काय समजूत काढणार? आज या प्रसंगाला २० वर्षांहून अधिक वर्षे झाली तरीही आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. साऊथ आफ्रिकेची कौटुंबिक अवस्था ही अशीच आहे आणि हे मला पुढे फार ठळकपणे दिसून आले. नवरा/बायको हे नाते कितीही जवळचे असले तरी ते आपण भारतीय जसे जपतो, तसा प्रकार तिथे अजिबात नसतो. एक घाव, दोन तुकडे, असा प्रकार वारंवार बघायला मिळाला आणि लग्नसंस्थेला काहीही अर्थ उरलेला नसल्याचे, मत ठाम झाले. पुढे गोऱ्या समाजात मला ख्रिसमस एन्जॉय करण्याची संधी मिळाली. गोरा समाज, तुम्हाला नेहमी एका मर्यादेपर्यंत ठेवतो, त्याच्या घरात प्रवेश मिळवणे जवळपास अशक्य. Standerton इथल्या नोकरीत मला ती संधी मिळाली आणि गोऱ्या समाजाचे *अंतरंग* अनुभवायला मिळाले. अर्थात ख्रिसमस सणाबद्दल मी एका ब्लॉग मध्ये लिहिले असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. इथल्या गोऱ्या लोकांच्या संस्कृतीचा, इथे भारतीय तसेच काळ्या समाजावर फार दाट पडलेला आहे. मानवी संबंध हे पूर्णपणे Materialistic ठेवायचे, पैसे आहे तोपर्यंत संबंध, पैसे संपल्यावर, अंगावरील कपडे काढून टाकावेत आणि नागवे व्हावे, तसे नातेसंबंध संपवून टाकायचे. ना खेद, ना खंत. पुन्हा नव्या उत्साहाने आयुष्य सुरु करायचे, ही इथली नेहमीची पद्धत. सुरवातीला मला खूप आश्चर्य वाटायचे पण ही इथली संस्कृती आहे म्हटल्यावर, ना मी कुणाला समजावयाला गेलो ना कुणाशी बोलायला गेलो. कुणाशी बोलून कसलाच फरक पडणार नाही, याची खात्री असायची. परदेशी राहायला लागल्यावर माझ्यात खूप फरक पडला. ते साहजिकच आहे, साऊथ आफ्रिकेत उणीपुरी १६ वर्षे काढल्यावर फरक तर पडणारच. मुख्य म्हणजे मी बराच स्वावलंबी झालो. स्वतःच्या हाताने जेवण करायला शिकलो, शिकावेच लागले अन्यथा उपाशी जगण्याची वेळ येणार. जो अनिल मुंबईत असताना, साधे मिरच्या,कोथिंबीर आणत नसे, तोच अनिल तेंव्हा आठवड्याच्या आठवड्याचा घरातील भाज्यांचा हिशेब ठेवायला लागला आणि जेवण करायला लागला. पुढे पुढे तर मांसाहारी डिशेस देखील शिकला आणि मित्रांसाठी बनवायला लागला. भारतात असताना, केवळ मित्रांशीच संबंध राखणारा अनिल, पुढे अनोळखी व्यक्तींशी संबंध साधायला लागला. तितका आत्मविश्वास निश्चितपणे वाढला. मी तिथे एकटा रहात होतो तेंव्हा तब्येतीची काळजी घेणे, माझे मलाच बघायला लागायचे आणि ते देखील करायला शिकलो. दुसरा तरुणोपाय नव्हतो. एकूणच आयुष्यावर बराच परिणाम झाला. काही प्रत्यक्ष तर काही अनावधानाने लक्षात येतात. माझे तर आता ठाम मत आहे, व्यक्तित्व प्रगल्भ करायचे झाल्यास, माणसाने परदेशात निदानपक्षी ३,४ वर्षे सलग काढावीत. आपली आपल्यालाच वेगळी ओळख मिळते.

Sunday, 25 December 2022

तुमको देखा तो ख़याल आया

*कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती,* *जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती!!* सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या *जिप्सी* कवितेतील या ओळी आहेत. मंगेश पाडगावकर जसे निसर्ग कवी म्हणून मान्यताप्राप्त आहेत तसेच प्रणयी थाटाच्या रंगतदार कविताकार म्हणून तितकेच प्रसिद्ध आहेत. *जिप्सी* या कवितेने पाडगावकरांना धुक्यातून प्रकाशात आणले आणि पुढे किमान ४,५ दशके तरी, पाडगावकर प्रकाशात राहिले. आजच्या आपल्या गाण्याच्या संदर्भात - *तुमको देखा तो ख़याल आया*, तसे बघितले फारसा जवळून येणार संबंध दिसत नाही पण तरीही *पहाटते उरी आगळी प्रतीती* या शब्दांशी नाते जुळते. आजची कविता प्रख्यात शायर जावेद अख्तर यांची आहे. सुप्रसिद्ध शायर *जान निसार अख्तर* यांचे सुपुत्र. वडिलांच्या रक्तातील काही जीन्स मुलात उतरले आणि त्यामानाने खूप उशिराने जावेद अख्तर यांनी शायरी क्षेत्रात प्रवेश केला. परंतु लगोलग त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आजची शब्दरचना *गज़ल* म्हणावी का? चित्रपट माध्यमात निखळ गज़ल अपवादस्वरूप बघायला मिळते आणि त्याचे मुख्य कारण चित्रपटात नेहमी पडद्यावरील पात्राची भावना शब्दात व्यक्त करायची असल्याने, त्या *एकाच* भावनेला मध्यवर्ती ठेऊन, काव्य लिहायचे असते. परिणामी *गज़लेतील प्रत्येक अंतरा ही सार्वभौम कविता असते* ही अट पाळणे अवघड होऊन बसते. ध्रुवपदातील आशय, पुढील कडव्यांतून विस्तारित करणे,ही चित्रपट गीताची मागणी असल्याने, मी वर तसे लिहिले. त्यामुळे गझलच्या आकृतिबंधातील रचना, जिला *नज्म* म्हणतात, तशी आजची कविता आहे. पहिल्याच ओळीत प्रेयसीबद्दलची आतुर भावना व्यक्त झाल्यावर, पुढे याचा भावनेचे स्फटिकीकरण केलेले आहे. *आज फिर दिल ने एक तमन्ना की* *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळी हीच भावना दर्शवतात. एकूणच सगळी कविता वाचल्यास, गज़ल रचनेचे आणखी एक वैशिष्ट्य असते, कडव्याच्या दुसऱ्या ओळीत कुठेतरी तिरकस अभिव्यक्ती किंवा काहीसा धक्का देणारी कल्पना असते, जेणेकरून ऐकणारा चकित होतो. तसे इथे काही फारसे वाचायला मिळत नाही परंतु म्हणून ही कविता *सपक* किंवा *सरधोपट* नक्कीच म्हणता येणार नाही. *हम जिसे गुनगुना नहीं सकते* *वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया* या ओळींतून संपूर्ण वेगळा आशय मांडला आहे. दुसरे असे, एकूणच रचना बारकाईने वाचल्यावर सगळ्या ओळीत समान शब्दसंख्या नाही, पर्यायाने अक्षरे देखील नाहीत. छंदोबद्ध कविता रचनेत शब्दसंख्येचे तत्व नेहमीच पाळले जाते. असे असून देखील एक कविता म्हणून कविता वेगवेगळ्या भाववृत्ती स्पष्ट करते. जावेद अख्तर प्रामुख्याने उर्दू रचनाकार म्हणून ख्यातकीर्त असले तरी इथली कविता, अतिशय सोप्या शब्दात लिहिली आहे. उर्दू आणि हिंदी भाषिक शब्दांची सरमिसळ सुंदर रीतीने विणलेली आहे. मुळात *ज़िंदगी धुप, तुम घना साया* या सुरवातीच्या ओळीमधून मध्यवर्ती कल्पना सुस्पष्ट केली आहे. या गाण्याची स्वररचना ही कुलदीप सिंग या अप्रकाशित संगीतकाराने केली आहे. कुलदीप सिंग काय किंवा कनू रॉय काय, स्वतंत्र प्रज्ञेचे कलावंत असून देखील एकूणच उपेक्षेच्या खाईत वावरले गेले आणि त्यामुळे फार लवकर विस्मृतीत गेले. हे दोन्ही संगीतकार, जेंव्हा चित्रपट मिळाले, ते थोडे *आडवळणी* असल्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश वगैरे मिळवू शकले नाही आणि जिथे यश या शब्दाभोवती कारकीर्द उभी असते, तिथे हे कलावंत मागे पडले. *कामोद* या काहीशा अप्रचलित रागाधारित स्वररचना बांधलेली आहे. *दोन्ही मध्यम आणि बाकीचे सगळे शुद्ध स्वर* अशी या रागाची स्वरसंहती आहे. *कल्याण* थाटातील राग आहे. *ग म(तीव्र) प ग म(तीव्र) रे सा* किंवा *सा रे सा ध ध प* अशा स्वरांचे चलन ऐकायला मिळते.आता या पार्श्वभूमीवर या गाण्याची स्वररचना बघायचे झाल्यास, *तुमको देखा तो ख़याल आया* ही ओळ *रे नि धप प रे रेनि धनि* या सुरांत गुंफले आहे तर पुढील ओळ * ज़िंदगी धुप, तुम घना साया* ही *निसाग रेसा सा साग रेसानि* अशा सुरांत ऐकायला मिळते. *तीव्र मध्यम* स्वर आपल्याला पहिल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळीत ऐकायला मिळतो. आता संगीतकार स्वररचना करताना रागाचे सूर कशा पद्धतीने घेतो, हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते. गाण्याची चाल अगदी सोपी आणि सरळ आहे. बहुदा गायक जगजीत सिंग नजरेसमोर ठेऊन स्वररचना केली असावी, इतके साम्य दिसते. एकूणच वाद्यमेळ अतिशय थोडा आणि गझलच्या पठडीत बसणारा आहे. परिणामी श्रवणीयता वाढली आहे. वर लिहिल्याप्रमाणे गायन जगजीत सिंग यांनी केले आहे. हे गाणे जेंव्हा रेकॉर्ड केले त्यावेळेपर्यंत या गायकाची गायनशैली प्रस्थापित झाली होती, बरीचशी *स्टायलाईज्ड* झाली होती. खरंतर ही शैली त्यांनी शेवटपर्यत आपल्याबरोबर वागवली होती. एकूणच संथ, शांत आवाजात गायन करायचे, मध्य सप्तक आणि खर्जात गायनाची पट्टी ठेवायची. फार क्वचित तार सप्तकातील सूर गाठायचे. गाताना, शायरच्या शब्दांना शक्यतो गोंजारून घ्यायची वृत्ती होती आणि ती वृत्ती या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने *शब्दप्रधान* गायकी असे म्हणता येईल. गाताना शक्यतो दीर्घ ताना किंवा हरकती टाळण्याकडे कल अधिक होता. अर्थात उर्दू शब्दांवरील प्रभुत्व दिसून येते. अत्यंत मुलायम आवाज आणि तरीही सुरांशी कुठेही फारकत नाही, ताना अगदी हलक्या जातीच्या पण तरीही गळ्याचे नेमके "वजन" दर्शवून देणाऱ्या, अशा प्रकारे या गायकाच्या गायकीचे वर्णन करता येईल. बहुतेक गायकांना, गझल गायन म्हणजे स्वत:च्या गळ्याची "फिरत" आणि "ताकद" दाखवण्याचे साधन वाटते आणि या मोहाला बरेचसे प्रसिध्द गायक बळी पडलेले दिसतात. कधीतरी सरगम, मूर्च्छना आणि हरकती हे अलंकार मिरवायला ठीक आहे पण ते अलंकार आहेत, याचेच भान खूपवेळा विसरले जाते. वास्तविक, सरगम ही, पुढील तान कशी असेल, याची पूर्वकल्पना असते, निदान असावी आणि पुढील तान ही, त्या कवितेतील आशयाला अधिक विस्तारित करणारी हवी, याचेच भान विसरले जाते. कितीही झाले तरी आपण जी गायकी सादर करीत आहोत, ते उपशास्त्रीय संगीत आहे आणि रागदारी संगीत नव्हे, हाच विचार जगजीत सिंग यांच्या गायकीत नेहमी दिसून येतो. *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळीतील *झा* हे अक्षर कसे गायले आहे,त्यावरून गायकाचा भाषेबद्दलचा *अंदाज* जाणून घेता येतो. गाण्यात जोडाक्षरे फारच कमी आहेत परंतु जी आहेत, त्यांचा उच्चार देखील अतिशय मुलायम करण्याकडे कल अधिक. चाल सोपी आणि श्रवणीय, गायन तर त्यापेक्षा अधिक परिणामकारक, त्यामुळे हे गाणे आजही लोकांच्यात प्रसिद्ध आहे, यात नवल ते कुठले!! तुमको देखा तो ख़याल आया ज़िंदगी धुप, तुम घना साया आज फिर दिल ने एक तमन्ना की आज फिर दिल को हमने समझाया तुम चले जाओगे तो सोचेंगे हमने क्या खोया, हमने क्या पाया हम जिसे गुनगुना नहीं सकते वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया *कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती,* *जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती!!* सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या *जिप्सी* कवितेतील या ओळी आहेत. मंगेश पाडगावकर जसे निसर्ग कवी म्हणून मान्यताप्राप्त आहेत तसेच प्रणयी थाटाच्या रंगतदार कविताकार म्हणून तितकेच प्रसिद्ध आहेत. *जिप्सी* या कवितेने पाडगावकरांना धुक्यातून प्रकाशात आणले आणि पुढे किमान ४,५ दशके तरी, पाडगावकर प्रकाशात राहिले. आजच्या आपल्या गाण्याच्या संदर्भात - *तुमको देखा तो ख़याल आया*, तसे बघितले फारसा जवळून येणार संबंध दिसत नाही पण तरीही *पहाटते उरी आगळी प्रतीती* या शब्दांशी नाते जुळते. आजची कविता प्रख्यात शायर जावेद अख्तर यांची आहे. सुप्रसिद्ध शायर *जान निसार अख्तर* यांचे सुपुत्र. वडिलांच्या रक्तातील काही जीन्स मुलात उतरले आणि त्यामानाने खूप उशिराने जावेद अख्तर यांनी शायरी क्षेत्रात प्रवेश केला. परंतु लगोलग त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आजची शब्दरचना *गज़ल* म्हणावी का? चित्रपट माध्यमात निखळ गज़ल अपवादस्वरूप बघायला मिळते आणि त्याचे मुख्य कारण चित्रपटात नेहमी पडद्यावरील पात्राची भावना शब्दात व्यक्त करायची असल्याने, त्या *एकाच* भावनेला मध्यवर्ती ठेऊन, काव्य लिहायचे असते. परिणामी *गज़लेतील प्रत्येक अंतरा ही सार्वभौम कविता असते* ही अट पाळणे अवघड होऊन बसते. ध्रुवपदातील आशय, पुढील कडव्यांतून विस्तारित करणे,ही चित्रपट गीताची मागणी असल्याने, मी वर तसे लिहिले. त्यामुळे गझलच्या आकृतिबंधातील रचना, जिला *नज्म* म्हणतात, तशी आजची कविता आहे. पहिल्याच ओळीत प्रेयसीबद्दलची आतुर भावना व्यक्त झाल्यावर, पुढे याचा भावनेचे स्फटिकीकरण केलेले आहे. *आज फिर दिल ने एक तमन्ना की* *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळी हीच भावना दर्शवतात. एकूणच सगळी कविता वाचल्यास, गज़ल रचनेचे आणखी एक वैशिष्ट्य असते, कडव्याच्या दुसऱ्या ओळीत कुठेतरी तिरकस अभिव्यक्ती किंवा काहीसा धक्का देणारी कल्पना असते, जेणेकरून ऐकणारा चकित होतो. तसे इथे काही फारसे वाचायला मिळत नाही परंतु म्हणून ही कविता *सपक* किंवा *सरधोपट* नक्कीच म्हणता येणार नाही. *हम जिसे गुनगुना नहीं सकते* *वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया* या ओळींतून संपूर्ण वेगळा आशय मांडला आहे. दुसरे असे, एकूणच रचना बारकाईने वाचल्यावर सगळ्या ओळीत समान शब्दसंख्या नाही, पर्यायाने अक्षरे देखील नाहीत. छंदोबद्ध कविता रचनेत शब्दसंख्येचे तत्व नेहमीच पाळले जाते. असे असून देखील एक कविता म्हणून कविता वेगवेगळ्या भाववृत्ती स्पष्ट करते. जावेद अख्तर प्रामुख्याने उर्दू रचनाकार म्हणून ख्यातकीर्त असले तरी इथली कविता, अतिशय सोप्या शब्दात लिहिली आहे. उर्दू आणि हिंदी भाषिक शब्दांची सरमिसळ सुंदर रीतीने विणलेली आहे. मुळात *ज़िंदगी धुप, तुम घना साया* या सुरवातीच्या ओळीमधून मध्यवर्ती कल्पना सुस्पष्ट केली आहे. या गाण्याची स्वररचना ही कुलदीप सिंग या अप्रकाशित संगीतकाराने केली आहे. कुलदीप सिंग काय किंवा कनू रॉय काय, स्वतंत्र प्रज्ञेचे कलावंत असून देखील एकूणच उपेक्षेच्या खाईत वावरले गेले आणि त्यामुळे फार लवकर विस्मृतीत गेले. हे दोन्ही संगीतकार, जेंव्हा चित्रपट मिळाले, ते थोडे *आडवळणी* असल्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश वगैरे मिळवू शकले नाही आणि जिथे यश या शब्दाभोवती कारकीर्द उभी असते, तिथे हे कलावंत मागे पडले. *कामोद* या काहीशा अप्रचलित रागाधारित स्वररचना बांधलेली आहे. *दोन्ही मध्यम आणि बाकीचे सगळे शुद्ध स्वर* अशी या रागाची स्वरसंहती आहे. *कल्याण* थाटातील राग आहे. *ग म(तीव्र) प ग म(तीव्र) रे सा* किंवा *सा रे सा ध ध प* अशा स्वरांचे चलन ऐकायला मिळते.आता या पार्श्वभूमीवर या गाण्याची स्वररचना बघायचे झाल्यास, *तुमको देखा तो ख़याल आया* ही ओळ *रे नि धप प रे रेनि धनि* या सुरांत गुंफले आहे तर पुढील ओळ * ज़िंदगी धुप, तुम घना साया* ही *निसाग रेसा सा साग रेसानि* अशा सुरांत ऐकायला मिळते. *तीव्र मध्यम* स्वर आपल्याला पहिल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळीत ऐकायला मिळतो. आता संगीतकार स्वररचना करताना रागाचे सूर कशा पद्धतीने घेतो, हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते. गाण्याची चाल अगदी सोपी आणि सरळ आहे. बहुदा गायक जगजीत सिंग नजरेसमोर ठेऊन स्वररचना केली असावी, इतके साम्य दिसते. एकूणच वाद्यमेळ अतिशय थोडा आणि गझलच्या पठडीत बसणारा आहे. परिणामी श्रवणीयता वाढली आहे. वर लिहिल्याप्रमाणे गायन जगजीत सिंग यांनी केले आहे. हे गाणे जेंव्हा रेकॉर्ड केले त्यावेळेपर्यंत या गायकाची गायनशैली प्रस्थापित झाली होती, बरीचशी *स्टायलाईज्ड* झाली होती. खरंतर ही शैली त्यांनी शेवटपर्यत आपल्याबरोबर वागवली होती. एकूणच संथ, शांत आवाजात गायन करायचे, मध्य सप्तक आणि खर्जात गायनाची पट्टी ठेवायची. फार क्वचित तार सप्तकातील सूर गाठायचे. गाताना, शायरच्या शब्दांना शक्यतो गोंजारून घ्यायची वृत्ती होती आणि ती वृत्ती या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने *शब्दप्रधान* गायकी असे म्हणता येईल. गाताना शक्यतो दीर्घ ताना किंवा हरकती टाळण्याकडे कल अधिक होता. अर्थात उर्दू शब्दांवरील प्रभुत्व दिसून येते. अत्यंत मुलायम आवाज आणि तरीही सुरांशी कुठेही फारकत नाही, ताना अगदी हलक्या जातीच्या पण तरीही गळ्याचे नेमके "वजन" दर्शवून देणाऱ्या, अशा प्रकारे या गायकाच्या गायकीचे वर्णन करता येईल. बहुतेक गायकांना, गझल गायन म्हणजे स्वत:च्या गळ्याची "फिरत" आणि "ताकद" दाखवण्याचे साधन वाटते आणि या मोहाला बरेचसे प्रसिध्द गायक बळी पडलेले दिसतात. कधीतरी सरगम, मूर्च्छना आणि हरकती हे अलंकार मिरवायला ठीक आहे पण ते अलंकार आहेत, याचेच भान खूपवेळा विसरले जाते. वास्तविक, सरगम ही, पुढील तान कशी असेल, याची पूर्वकल्पना असते, निदान असावी आणि पुढील तान ही, त्या कवितेतील आशयाला अधिक विस्तारित करणारी हवी, याचेच भान विसरले जाते. कितीही झाले तरी आपण जी गायकी सादर करीत आहोत, ते उपशास्त्रीय संगीत आहे आणि रागदारी संगीत नव्हे, हाच विचार जगजीत सिंग यांच्या गायकीत नेहमी दिसून येतो. *आज फिर दिल को हमने समझाया* या ओळीतील *झा* हे अक्षर कसे गायले आहे,त्यावरून गायकाचा भाषेबद्दलचा *अंदाज* जाणून घेता येतो. गाण्यात जोडाक्षरे फारच कमी आहेत परंतु जी आहेत, त्यांचा उच्चार देखील अतिशय मुलायम करण्याकडे कल अधिक. चाल सोपी आणि श्रवणीय, गायन तर त्यापेक्षा अधिक परिणामकारक, त्यामुळे हे गाणे आजही लोकांच्यात प्रसिद्ध आहे, यात नवल ते कुठले!! तुमको देखा तो ख़याल आया ज़िंदगी धुप, तुम घना साया आज फिर दिल ने एक तमन्ना की आज फिर दिल को हमने समझाया तुम चले जाओगे तो सोचेंगे हमने क्या खोया, हमने क्या पाया हम जिसे गुनगुना नहीं सकते वक़्त ने ऐसा गीत क्यूँ गाया Tum Ko Dekha Toh Ye Khayal | Saath Saath -1982| Deepti Naval | Farooq sheikh | Jagjit Singh |Ghazals - YouTube

Friday, 23 December 2022

काहे तरसाये जियरा

फार पूर्वीच्याकाळी भारतात जेंव्हा नंद किंवा चालुक्यांचे तसेच मौर्यांचे राज्य होते, तेंव्हा पासून दरबारात *राजगायक*,*राजज्योतिषी* तसेच *नृत्यांगना* नोकरीवर ठेवायची पद्धत होती आणि ही पद्धत अगदी मागील २ शतकांपर्यंत अव्याहतपणे चालू होती. परिणामी, कलासंस्कृती निश्चितच बहरून आली. अशा राजदरबारी संस्कृतीचे चित्रण हिंदी चित्रपटात अधून मधून होत राहिले. अर्थात अशा चित्रपटांतून संगीताचे महत्व अधोरेखित केले गेले आणि रसिकांना बरीच सांगीतिक मेजवानी मिळाली. असाच एक चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे आर्थिक यश बेतासबात होते. मात्र त्यातील गाणी आजही निरंतर ऐकायला मिळतात. किंबहुना संगीतकार रोशन यांच्या कारकिर्दीतील काही असामान्य चित्रपट आहेत, त्यातील हा एक महत्वाचा चित्रपट गणला जातो. चित्रपट मौर्य कालीन संस्कृतीवर आधारित असल्याने चित्रपटीय भाषा ही शुद्ध हिंदी आहे तसेच एकूण वातावरण त्याला अनुसरून असेच आहे. आजच्या गीतातील कविता ही साहिर लुधियान्वी यांची आहे. महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातील वातावरण बघून साहिर यांनी सगळ्याच कवितांची भाषा फक्त हिंदी अशीच ठेवली आहे.अर्थात भाषिक महत्व अनुसरून त्यांनी निव्वळ अप्रतिम रचना केल्या आहेत. वास्तविक साहिर प्रामुख्याने उर्दू भाषिक रचना करणारे म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत तरीही एक आव्हान म्हणून स्वीकारले. अर्थात हे त्यांनी पुढे एका मुलाखतीत सांगितले होते. आता नृत्यगीत म्हटल्यावर कवितेचे बाह्यात्कारी रूप तरी बंदिश सदृश असावे, असा एक संकेत आहे. कवितेत *नीत* शब्द बऱ्याच वेळा उपयोगात आणला आहे. *नीत* म्हणजे *नीट* असा एक अर्थ मिळतो परंतु हाच शब्द पुनरावृत्त झालेला आढळतो आणि याचे निव्वळ एकच कारण संभवते, स्वरिक लयीची मागणी. हि अर्थात एक तडजोड म्हणायला हवी परिणामी इतर कवितांमध्ये साहिरचा एक स्पष्ट ठसा उमटलेला दिसतो, तसे इथे काहीही वाचायला मिळत नाही. अर्थात नृत्यगीत म्हटल्यावर शाब्दिक प्रतिभेला तसा फारसा वाव नसतो म्हणा. एकूणच असे म्हणता येईल, जरी कविता साहिरची असली तरी फार अपेक्षा बाळगणे ठीक नाही. याचा दुसरा भाग असा मांडता येईल कविता चित्रपट गीताची मागणी पूर्ण करते. मी याच चित्रपटातील *मन रे तू काहे ना धीर धरे* किंवा * संसार से भागे फिरते हो* यांच्याशी तुलना करून मत मांडले आहे. वर मी उल्लेख केल्याप्रमाणे, प्रस्तुत चित्रपटातील गाणी हा रोशन यांच्या कारकिर्दीतील फार सृजनात्मक कौशल्याचा भाग आहे. रागाधारित गाणी द्यायची वेळ आली तेंव्हा रोशन यांनी आपले सर्जनशील कौशल्य अप्रतिमरीत्या योजलेले आढळून येते. मुळातले *तंतकार* असल्याने शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास झालेला होता. प्रस्तुत गाणे *कलावती* रागावर आधारित आहे. बघितले तर कलावती राग हा उत्तर भारतीय संगीताने, कर्नाटकी संगीतातून घेतलेला आहे पण तसे करताना, त्याचे मूळ स्वरूप कायम ठेऊन, धाटणी बदलली आहे. आता गाण्याच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गाण्यात बहुतांशी रागाचे स्वरूप जवळपास तसेच ठेवले आहे. थोडे तांत्रिक बघायचे झाल्यास, सां सांसांसां नि(को) धप ध---- } का हेss तss रss साs एsss } गप पध ध सां जिs यs राss (इथे *सां* म्हणजे वरचा *सा* असे गृहीत धरले आहे) आता आपण कलावती रागाचे चलन बघितले तर या स्वरावलीशी बरेच साम्य आढळते. *रिषभ* आणि *मध्यम* वर्ज्य असलेल्या रागात *कोमल निषाद* स्वराचे प्राबल्य आढळते. * प ध नि(को) ध* किंवा *ग प ध सा नि(को)* अशा प्रकारचे चलन ऐकायला मिळते. आता हे स्वर वरील गाण्याच्या संदर्भात ताडून बघितल्यावर साम्यस्थळे सापडतात. तांत्रिक भागाच्या व्यतिरिक्त गाण्याकडे बघायचे झाल्यास गाण्यात *तीनताल* आणि *केहरवा* ताल योजलेला आहे. संगीतकार रोशन यांच्या स्वररचना या नेहमीच *गायकी* अंगाकडे वळणाऱ्या असतात. परिणामी गायक किंवा गायिका, त्या चाली गाण्यासाठी *सक्षम* असणे महत्वाचे. रचनेत अनेक *कंगोरे* असतात जे गाताना स्पष्टपणे दाखवणे आवश्यक असते आणि तीच रचनेची सौंदर्यस्थळे असतात. या गाण्याची सुरवातच *वरचा सा* या स्वराने होते आणि तिथे तो स्वर ठळकपणे *दिसायला* हवा. शक्यतो ललित संगीतात असे फारसे घडत नाही. गाण्यात अनेक *खटके* आहेत आणि एकूणच नृत्यगीत असल्याने, या खटक्यांनी गाणे अधिक श्रवणीय बनते. संगीतकार मूळचा तंतकार असल्याने, गाण्यात वाद्यांचा *सुजाण* उपयोग ऐकायला मिळतो. याचा अर्थ असा नव्हे, जे संगीतकार तंतकार नाहीत, त्यांच्या गाण्यात हा विशेष बघायला मिळत नाही. परंतु *वादक* असल्याचा फायदा, वाद्यमेळ रचना तयार करताना बराच होतो. रोशन यांच्या गाण्यात एकूणच स्वररचना आणि वाद्यमेळ हे शक्यतो *मध्य सप्तक* किंवा *कोमल सप्तक* या पट्टीत असतात. *पखवाज* आणि *सतारीच्या* बोलांनी गाण्याला सुरवात होते आणि सतारीच्या सुरांतूनच कलावती राग स्पष्ट होतो. अर्थात कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी अधिकाधिक *तार सप्तक* वापरल्याचे आढळते पण त्याची खरंच गरज होती का? असो, गाण्यात अर्थातच बव्हंशी भारतीय वाद्ये आहेत, जरी व्हायोलिन परदेशी वाद्य असले तरी ते आता भारतीय संगीतात कायमचे स्थिरावले आहे. गाण्यातील हरकती अतिशय सुरेख आहेत. उदाहरण बघायचे झाल्यास, वरील स्वरावलीतून घेता येईल. *काहे तरसाये जियरा* ही ओळ घेताना *का* शब्द लांबवला आहे आणि तो आलाप खरंच फार कठीण आहे. रचना द्रुत लयीत असल्याने, लयीच्या ओघात बरेचवेळा काही ताना लक्षात येत नाहीत. आशा भोसले आणि उषा मंगेशकर भगिनी द्वयीनीं एकत्रित गायलेली गणिताशी फार दुर्मिळ असावीत. तसे बघितले या गाण्यावर आशा भोसले यांच्या गायकीचा प्रभाव अधिक दिसतो. दोन्ही गायिंकांनीं एकत्रच गायनाला सुरवात केली आहे आणि जवळपास संपूर्ण गाणे दोघींनी एकत्रच गायले आहे. कुणीही *स्वतंत्रपणे* ओळ गायली आहे, असे घडत नाही. फक्त काही *जागा* स्वतंत्रपणे घेतल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, पहिल्या अंतऱ्याची ओळ *नीत नीत जागे ना, सोया सिंगार* ही ओळ पुनरावृत्त करताना *जागे ना* या शब्दांवर आशा भोसले यांच्या गायनाचे क्षणभर *अस्तित्व* ऐकायला मिळते पण ते इतके अल्प आहे की नीट कान देऊन ऐकायला हवे. पहिल्या प्रथम तर दोन्ही आवाज अगदी *एकजीव* झाल्यासारखे भासतात परंतु बारकाईने ऐकल्यावर त्यातील *वेगळेपण* ध्यानात येते आणि ते साहजिकच आहे. मजेचा भाग म्हणजे रचनेतील बारकावे देखील एकत्रित गाताना *सहभाव* ऐकायला मिळतो. असे ऐकल्यावर असेच मनात येते, या दोन्ही बहिणींनी आणखी एकत्रितपणे गायला हवे होते. काहे तरसाये,जियरा यौवन रुत सजन, जा के न आये नीत नीत जागे ना, सोया सिंगार झाँझर झन झनन, नीत ना बुलाये काहे तरसाये,जियरा नीत नीत आये ना, तन पे निखार पवन मन कमल, नीत न खिलाये काहे तरसाये,जियरा नीत नीत बरसे ना,रस की पुहार सपन जल गगन, नीत ना लुटाये काहे तरसाये,जियरा https://www.youtube.com/watch?v=5hZ2SVxgBho

Monday, 19 December 2022

बदली बदली दुनिया है मेरी

आपल्या संगीताच्या विश्वात असंख्य दंतकथा आहेत, अनेक परंपरा आहेत तसेच अनेक आख्यायिका देखील आहेत. यातील कशाचेच फारसे विश्लेषण होत नाही किंवा त्याबाबत फारशी विचक्षण दृष्टी दाखवली जात नाही. आपण या सगळ्या गोष्टीवर बिनदिक्कतपणे विश्वास ठेवतो किंवा फारसा विचार देखील करत नाही. *तानसेन* ही अशा काही व्यक्तींपैकी एक व्यक्ती. तानसेन या राजगायकाचा भारतीय संगीतावर प्रचंड पगडा आहे. खरंतर आजही *रागनिर्मिती* या विषयाबाबत फारशी माहिती हाती लागत नाही. जे *गुरुमुखी* आहे, तेच प्रमाण मानले जाते. परिणामी *पोपटपंची* देखील बोकाळली, हे सत्य आहे. तानसेन , शहेनशहा अकबर यांच्या दरबारी *राजगायक* म्हणून होते, असे सांगितले जाते. तद्नुषंगाने, त्यांनी काही रागांची निर्मिती केली, असे देखील सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूने, तानसेन यांच्या गायनाच्या आख्यायिका किंवा दंतकथा म्हणून, या भरपूर पसरलेल्या आहेत, जसे *मल्हार* गायल्याने पाऊस पडणे किंवा *दीप* रागाने दिवे पेटणे, इत्यादी. या किश्श्यांमागील खरेखोटेपणा फारसा तपासला जात नाही. किंबहुना अशी गोष्टींवर विश्वास ठेवणारे बरेच भेटतात. अशा *दंतकथा* झालेल्या तानसेन, या व्यक्तीवर *संगीतसम्राट तानसेन* हा चित्रपट निघाला. अर्थात नावानुसार चित्रपटात गाणी आणि संगीताचा प्रादुर्भाव असणे, क्रमप्राप्तच ठरते. आजचे आपले गाणे याच चित्रपटातील आहे. वास्तविक अशा संगीतमय वातावरणातील चित्रपटात जरी गीतातील शब्दांना महत्व असले तरी एकूणच बऱ्याच मर्यादा पडतात कारण जे काही आहे ते संगीताच्या अनुषंगानेच लिहायचे. आता या पार्श्वभूमीवर आपण गीतातील कविता बघूया. या गाण्यातील काव्य सुप्रसिद्ध शायर शैलेंद्र याचे आहे. शैलेंद्र यांच्या काव्याची नाळ हिनेहमीच भारतीय मातीशी जोडलेली असते. भारतीय संस्कृतीचा नेमका गाभा बरेच वेळा अत्यंत साध्या, सोप्या शब्दातून मांडलेला वाचायला मिळतो. आयुष्यात आपल्यावर जीव जडवणारी प्रेयसी मिळाल्यानंतरच्या भावभावनांचे प्रकटीकरण आहे. *बदली बदली दुनिया है मेरी, जादू है ये क्या तेरे नैनं का* याला ओळीतून हाच आशय मिळतो. पुढील दोन्ही कडव्यांतून याचीच प्रचिती येते. शैलेंद्र आपल्या रचनेत, उर्दू आणि हिंदी शब्दांचा अचूक वापर करून, कविता अधिक सुंदर करतात. पहिल्याच कडव्याच्या पहिल्या ओलित याचे प्रत्यंतर येते. *कहती थी सदा दिल की धड़कन* इथे, *सदा* हा उर्दू शब्द आहे आणि एकूणच ओळीच्या आणि कडव्याच्या घडणीत चपखल बसला आहे. चित्रपटाच्या कवितेमध्ये अत्यावश्यक असते टी *गेयता* आणिइथे वाचन करताना लगोलग जाणीव होते. शाब्दिक लयीतून ही गेयता स्पष्ट होते. शब्द वाचतानाच त्यातील अंगभूत लय जाणवते आणि हेच कवितेचे खरे बलस्थान म्हणावे लागेल. संगीतकाराला सक्षम चाल बांधायला प्रवृत्त करणारी शब्दरचना. संगीतकार आहेत एस.एन.त्रिपाठी. एकूणच भारतीय संगीताचे कट्टर पाठीराखे म्हणून त्यांचा लौकिक आहे. परिणामी त्यांना बव्हंशी संगीतप्रधान चित्रपट अधिक मिळाले. *झिझोटी* रागात चाल बांधली आहे. *निषाद* वर्जित *शाड्व/संपूर्ण* अशी स्वरस्थाने असलेला हा राग. शास्त्रकारांनी या रागाचा समय रात्रीचा द्वितीय प्रहार असा दिला आहे आणि चित्रपटातील गाण्याचा प्रसंग असाच जुळलेला आहे. चाल तशी साधी आहे पण तरीही काही ठिकाणी वक्र गतीच्या हरकती आहेत. स्वरिक वळणे फार सुंदर आहेत. मुखड्यातील *जादू है ये क्या तेरे नैनं का* या ओळीत *जादू है ये क्या* शब्दानंतरचे *वळण* फार देखणे आहे. अंतऱ्याची बांधणी सामान ठेवली आहे. अर्थात चालीच्या गोडव्यात, तसे *भासत* नाही!! खरतर हे गाणे गायन कलाकारांचे आहे, असे म्हणायला हवे. हिंदी चित्रपटात *नौशाद* यांनी स्वररचनेचा, त्याकाळी नवीन असलेला असा नवा आकृतिबंध सुरु केला आणि तो म्हणजे रागदारीत चाल करताना, शक्यतो रागाचे मूळ स्वरूप तसेच ठेवायचे. वास्तविक याची फारशी गरज नाही कारण आपण इथे रागदारी संगीताचे स्वरूप दाखवत नसून, काव्याच्या अनुषंगाने, पडद्यावरील प्रसंगांचे विस्तारीकरण दाखवायचे असते. त्यामुळे राग स्वरूप *शुद्ध* राखलेच पाहिजे हा आग्रह काहीसा अनाठायी म्हणायला हवा. बहुतांशी रचनाकार हे रागाच्या मूळ आकृतीची बाह्याकृती मदतीला घेतात आणि त्याची पुनर्रचना करून, त्यात स्वतःच्या प्रतिभेची झलक दाखवतात. परंतु *एस.एन.त्रिपाठी* किंवा *नौशाद* सारख्या रचनाकारांचे मत काहीसे वेगळे होते, हे नक्की. अर्थात हे चुकीचे आहे, हे दर्शविण्याचा जराही उद्देश नाही परंतु *सर्जनशीलता* बघण्याच्या दृष्टीने, त्याला मर्यादा पडतात. परिणामी हा संगीतकार काळाच्या ओघात फारच मागे पडला कारण चित्रपटात अनेकविध प्रसंग असतात आणि त्यानुसार गाण्यांची मागणी बदलत असते. इथे *लवचिकता* दाखवणे, महत्वाचे असते. मी फक्त भारतीय संगीत(च) वापरीत, असा आग्रह धरून चालत नाही. वाद्यमेळ रचताना याच दृष्टीचे प्रत्यंतर ऐकायला मिळते. अर्थात *तानसेन* सारख्या विषयावरील चित्रपट असल्याने, वाद्यमेळात भारतीय वाद्ये असणे, क्रमप्राप्तच ठरते. लताबाई आणि महेंद्र कपूर यांनी हे गाणे गायले आहे. लताबाईंच्या दृष्टीने अशी गाणी म्हणजे *हातखंडा* म्हणायला पाहिजे. महेंद्र कपूर मात्र या गाण्यात सुंदर, हळुवार गायला आहे. वास्तविक महेंद्र कपूरच्या आवाजाला फार मर्यादा आहेत. गायनावर मोहमद रफींचा प्रभाव जाणवतो पण तुलना केल्यास लवचिकता दुर्मिळ आहे.आवाजात बरेचवेळा *ताठरता* जाणवते, *खळ* लावलेल्या कापडाप्रमाणे बरेचवेळा त्यात ताठरपणा येतो.परिणामी भावना कमीच दिसतात. इथे मात्र त्याला *सूर* सापडलेलाआहे. वरती स्वररचनेबद्दल लिहिताना, काही सौंदर्यस्थळांचा उल्लेख केल्याप्रमाणे,गाताना त्यांनी गळ्यात लवचिकता आणलीय. त्यामुळे एकुणच गाण्यात *मृदुता* आली आहे. पहिला अंतरा थोडा वरच्या पट्टीत सुरु करताना, लताबाई नेहमीप्रमाणे आपल्या गळ्यातला *प्रसादगुण* प्रकर्षाने दाखवतात. *कहती थी सदा दिल की धड़कन* ही ओळ वरच्या पट्टीत घेऊन, हळूहळू पायऱ्या खाली उतरत *सच्ची है अगर ये तेरी लगन* इथे मुखड्याशी येऊन मिळते. हा भाग केवळ ऐकूनच अनुभूती घेण्यासारखा आहे. शब्द थिटे पडतात. त्यामुळे गाणे एकदम *श्रवणीय* झाले आहे. अर्थात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही आणि नेहमीप्रमाणे हे गाणे विस्मृतीत गेले. बदली बदली दुनिया है मेरी जादू है ये क्या तेरे नैनं का बनके कजरा मेरे अँखियो में रहा एक सुन्दर सपना बचपन का कहती थी सदा दिल की धड़कन तू बैठ बिछाके अपने नयन सच्ची है अगर ये तेरी लगन लौट आएगा साथी मेरे जीवन का इस रात को चाँद तले ये मिलन चुप देख रहा है नील गगन दोहरायेगा ये मध् मस्त पवन संगीत हमारी धड़कन का बदली बदली दुनिया है मेरी जादू है ये क्या तेरे नैनं का (2) BADLI BADLI DUNIYA HAI MERI - SANGEET SAMRAT TANSEN 1962 - YouTube