Saturday, 9 March 2019

हतोडयांच्या नगरीतील जादुगार...ऑल्विन कालिचरण

क्रिकेटच्या इतिहासात आजही १९७० च्या दशकातील लॉइडचा संघ सर्वोत्तम मानला जातो. कदाचित एकच कमतरता असावी, संघात दर्जेदार मंदगती गोलंदाज नव्हता पण थोडा विचार केला तर या संघाला अपवादस्वरूप सामने वगळता, मंदगती गोलंदाजांची गरजच पडली नाही. या संघातील प्रत्येक खेळाडू समोरच्याच्या छातीत धडकी भरवणाराच  होता आणि एकहाती सामना जिंकून देण्याची अलौकिक कुवत बाळगून होता. खेळपट्टी गोलंदाज धार्जिणी आहे, हवा ओलसर ,थंड आहे, खेळपट्टी "पाटा" आहे,  वगैरे काहीही बाबी या संघातील खेळाडूंवर परिणाम करीत नसायच्या. फलंदाजाने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला ठेचून काढायचे तर गोलंदाजाने समोरील फलंदाजाला त्राही भगवान करून सोडायचे, इतकेच!! जवळपास, १५ वर्षे या संघाने, क्रिकेट खेळात आपली दहशत बसवली, साम्राज्य उभारले.
अशा अद्वितीय संघात ऑल्विन कालिचरण नामक असामान्य फलंदाजाने, केवळ दहशतवादी फलंदाजीने नव्हे तर कलात्मक फलंदाजीने स्थान मिळवले होते.
बुटकेलासा पोरसवदा चणीचा मुलगा, काळसर वर्ण आणि बघता क्षणी शरीरात किती स्फोटक ताकद भरलेली आहे, याचा सुतराम अंदाज लागू न देणारा. खरेतर लॉईडच्या या संघातील सगळेच खेळाडू धिप्पाड, उंच असे होते, अपवाद कालिचरणचा. परंतु एकदा का बॅट हातात घेतली की हा खेळाडू चमत्कार दाखवायचा. कालिचरणकडे ग्रीनिज, रिचर्ड्स, लॉइड सारखी अमानुष ताकद नव्हती पण फलंदाजीचे तंत्र होते. अर्थात वरील तिन्ही फलंदाजांकडे तंत्र हे होतेच, परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नसायची.
मी कालिचरणला प्रथम बघितला तो १९७४ साली भारतात आलेल्या लॉईडच्या संघात. ती मालिका खऱ्या अर्थाने गाजवली, प्रथम ग्रीनिज, नंतर रिचर्ड्स आणि सर्वाधिकपणे लॉइडने. पुढे याच संघाचे ऑस्ट्रेलियात पानिपत झाले. त्यानंतर मात्र हा संघ सावरला आणि पुढील काही वर्षे खऱ्याअर्थाने जगज्जेता ठरला. कालिचरणचा वाटा तितकाच मोलाचा होता.
मुळात डावखोरे फलंदाज नैसर्गिकरीत्या देखणी फलंदाजी करतात. पायांची लयबद्ध हालचाल, बॅटीचा तोल आणि स्विंग तसेच चेंडू हव्या त्या ठिकाणी मारण्याची अलौकिक देणगी बहुतेक सगळ्याच डावखोऱ्या फलंदाजांना असते. यु-ट्युबवर एक व्हिडीओ आहे, कालिचरण विरुद्ध लिली!! त्यावेळी लिली म्हणजे आग्यावेताळ होता पण कालिचरण देखील तरुणच होता. कालिचरण काय चीज आहे, हे त्या व्हिडिओतून स्पष्टपणे कळते. लिलीची गोलंदाजी अशा प्रकारे कुणी फोडून काढली असेल असे वाटत नाही. त्यातील एक फटका - लिलीने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आहे, चेंडू कालिचरणच्या छातीच्यावर उसळला आहे आणि त्याने क्षणार्धात पाय मागे घेऊन, पॉईंटच्या दिशेने फटकावून चौकार वसूल केला आहे. हा फटका त्याने कसा काय एक्झिक्युट केला, आजही नवल वाटते. ताशी ९० च्या गतीने उसळलेला चेंडू , तो देखील ऑफ स्टम्पच्या रोखाने टाकलेला, लिलीचा इन स्विंग पण कालिचरणला आऊट स्विंग, सर्वसाधारणपणे एकतर बॅटीने नुसता तटवला जातो किंवा सोडून दिला जातो. इथे कालिचरणचे असामान्य रिफ्लेक्सिस दिसतात. बॅटीच्या मधोमध चेंडू घेऊन, पॉईंटपार सीमापार ठोकणे (हाच शब्द योग्य) हे सहज जमण्यासारखे नाही. याच षटकात लिलीचे पुढील २ चेंडू त्याने ज्या बेदरकारपणे हुक फटाक्यांच्या साहाय्याने षटकार मारले, त्याने खुद्द लिली हतबल झाल्याचे चेहऱ्यावरून समजते.

१९७७ मध्ये कालिचरण भारतात, वेस्टइंडीज संघ घेऊन आला होता (पॅकरमुळे सगळा संघच नवोदित होता - मार्शल इथेच प्रथम बघितला). पहिला सामना वानखेडेवर. सुनीलने अप्रतिम द्विशतक ठोकलेले पण पुढे कालिचरणने १८७ धावांची खेळी करून अप्रतिम प्रत्युत्तर दिलेले. ही सगळी खेळी बघताना, आपल्याला समृद्ध कालिचरण बघायला मिळतो. सगळ्या प्रकारचे फटके लीलया मारलेले दिसतात. अर्थात डावखुऱ्या फलंदाजांचा कव्हर ड्राइव्ह बघणे, हा नयनरम्य सोहळा असतो आणि इथे तर या फलंदाजाने महोत्सव घडवला होता! अशीच असामान्य शतकी खेळी त्याने याच मालिकेतील मद्रास इथल्या खेळपट्टीवर साकारली होती. त्यावेळची खेळपट्टी संपूर्णपणे गोलंदाज धर्जिणी होती. आपला धीरज परसाना देखील दाहक वाटत होता. कालिचरण सुरवातीला चाचपडत होता - असे सगळ्याच फलंदाजाच्या बाबतीत घडत असते. धीरज परसानाचा एक चेंडू गुड लेंग्थवर अचानक उसळला. चेंडू किंचित आऊट स्विंग झाला होता आणि कालिचरण निव्वळ नशिबाने वाचला!! क्षणभर कालिचरण सारख्या फलंदाजाला आपला अंदाज कुठे चुकला, याचाच अंदाज आला नाही -  डोळ्यांतून स्पष्टपणे दिसले पण बहुदा त्याक्षणी त्याने ठरवले असावे, अटॅक हाच सर्वोत्तम डिफेन्स आहे आणि त्याने तलवारबाजी सुरु केली!! खेळाचा संपूर्ण माहोल बदलला आणि भारतीय संघच एक पाय मागे टाकून खेळायला लागला. शतक कधी पूर्ण झाले ते समजलेच नाही. याला म्हणतात दर्जा, खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत  असताना,आपले वर्चस्व गाजवायचे, हे सहज जमण्यासारखे नसते. एका असामान्य शतकी खेळीचा नजराणा त्याने मद्रास सामन्यात पेश केला होता. एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे , भारतातर्फे कपिल देव तरुण होता, अंगात जोम होता आणि त्याच त्वेषात गोलंदाजी करीत होता. पुढे भारताने हा सामना जिंकला कारण कालिचरणचा संघ  फार दुय्यम दर्जाचा होता आणि मुख्य म्हणजे कपिलच्या शतकी खेळीने सामना भारताकडे झुकला.

पुढे पॅकर सामने बंद झाले आणि वेस्टइंडीज संघ पुन्हा एकत्र झाला. १९७९/८० ची जगद्विख्यात ऑस्ट्रेलिया/वेस्टइंडीज मालिका वेस्टइंडीजने जिंकून क्रिकेट जगातील आपले स्वामित्व निर्विवादपणे सिद्ध केले. ऍडलेडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, दुसऱ्या इनिंगमध्ये लिली, पास्को आणि डिमॅक तसेच मॅलेट सारखा विख्यात मंदगती गोलंदाज, यांच्या समोर शतक केले. एकतर असला जहाल वेगवान गोलंदाजांचा ताफा आणि ऍडलेडवर चौथ्या दिवशीची  खेळपट्टी!! रिचर्ड्ससह कालिचरण, ग्रीनिज आणि रोवे यांची भरात असलेली फलंदाजी बघणे म्हणजे क्रिकेटचा अत्युच्च आनंद उपभोगणे. या शतकी खेळीचा विस्ताराने व्हिडीओ उपलब्ध आहे. पायाची हालचाल, शेवटच्या क्षणी मनगटाच्या साहाय्याने चेंडूला दिशा देण्यात कौशल्य तसेच जर का चेंडू थोडा पुढे पडला तर लगोलग ड्राइव्ह करून चौकार मिळवणे. क्रिकेटमधील फलंदाजीचे सगळे अलंकार या खेळीत बघायला मिळतात आणि  कालिचरणचा असामान्य दर्जा.
असे म्हणतात, रोहन कन्हाय हा कालिचरणचा आदर्श होता. मी काही कन्हायची फलंदाजी प्रत्यक्ष बघू शकलो नाही पण सुनील गावस्करने एका लेखात तशी तुलना केली आहे. तसे असेलही पण कालिचरण हा एक असामान्य कलाकार होता यात वादच नाही. प्रसंगी गोलंदाजी फोडून काढण्याचे कौशल्य होते पण त्याचबरोबर "लेट कट" सारखे नाजूक फटके सहजपणे खेळू शकत होता. नजाकत, हीच त्याच्या फलंदाजीची खरी ओळख होती आणि म्हणूनच त्या दशकातील अद्वितीय संघात कालिचरण सहजपणे बसू शकला.

Friday, 8 March 2019

संदीप पाटील

बहुदा १९७८/७९ चा टाईम्स शिल्डचा मोसम असावा. मी राहतो, त्याच्या पाठीमागेच सलग ५ मैदाने आहेत. १) ग्रॅण्ट मेडिकल, २) विल्सन, ३) हिंदू, ४) इस्लाम आणि ५) पारसी, अशी ५ जिमखान्यांची मैदाने आहेत. तिथे जवळपास २४X७ क्रिकेटचे सामने चालत असत. त्यातून टाईम्स शिल्ड तर अति लोकप्रिय स्पर्धा. भारतीय स्तरावरील खेळाडू देखील आवर्जून या स्पर्धेत भाग घेत असत. १) स्टेट बँकेतून हनुमंत सिंग, अजित वाडेकर, २) मफतलाल संघातून सोलकर, पॉली उम्रीगर, ३) टाटा संघातून दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील अशी नामावळी जवळून बघायला मिळायची पर्वणी असायची. अशा एका सकाळी, मी कॉलेजला जायला निघताना (तेंव्हा सकाळचे कॉलेज असायचे - १० पर्यंत संपायचे!!) पेपरमध्ये बातमी वाचली. पारसी जिमखान्याच्या मैदानावर टाटाची मॅच आहे. अस्मादिकांना, शेवटचा पिरियड बुडवायला तितकेच महत्वाचे कारण सापडले आणि मित्रांसमवेत मैदानावर पोहचलो. दुर्दैवाने दिलीप लवकर बाद झाला आणि निराशा पसरली. त्याच्यामागोमाग "संदीप पाटील" आला. वास्तविक आंतर कॉलेज स्पर्धेत मी संदीपचा खेळ बघितला होता आणि हा काय प्रतीचा बॅट्समन आहे, याची अंधुक जाणीव होती. तो दिवस संदीपचाच होता. दिवसभरात जवळपास ३५ षटकार आणि तितकेच चौकार हाणून (हाणून हाच शब्द योग्य) त्याने २४५ ची खेळी साकारली. मुळात षटकार बघणे, हाच अवर्णनीय आनंद सोहळा असतो आणि इथे तर ३५ षटकार!! मैदानावर फटक्यांची लगड लागली होती. प्रतिस्पर्धी संघ कुठला होता, हे आता आठवत नाही पण या खेळीने संदीप एकदम प्रकाशात आला. एका दिवसात वैय्यक्तिक २४५ धावा!! स्वप्नवत अशी ती खेळी होती. संपूर्ण खेळीत, एकही फटका "बेभरवशी" नव्हता तर मुद्दामून, ठरवून केलेली "कत्तल" होती. त्याच स्पर्धेत पुन्हा एकदा संदीपने द्विशतक काढले होते आणि अशीच जबरदस्त फटकेबाजीचा नजराणा पेश केला होता. त्यावर्षी संदीपची मुंबई संघात वर्णी लागणे क्रमप्राप्तच होते.
मला वाटते, गुजरातबरोबर रणजी सामना होता. लंचच्या सुमारास सुनील सोबत संदीप खेळायला आला (तोपर्यंत मुंबई संघाचे २ गडी बाद झाले होते). जेवणानंतर संदीपला लगोलग सूर सापडला. पुढील २ तासात, समोरून सुनील शांतपणे संदीपची फलंदाजी उपभोगत होता. त्या दोन तासात, संदीपने वैय्यक्तिक शतक लावले होते. एक षटकार तर वानखेडे मैदानाच्या बाहेर गेला होता. नुसता धुमाकूळ घातला होता. अशा प्रकारच्या खेळ्या, मी फक्त वेस्टइंडियन फलंदाजांकडून बघितलेल्या होत्या. इथे चक्क भारतात आणि मुंबईतून असा फलंदाज बाघायला मिळत होता.
दिलीप आणि संदीप एकाच वयाचे तरीही संदीपला भारतीय संघात प्रवेश घ्यायला १९८० साल उघडावे लागले आणि याचे प्रमुख कारण, सातत्याचा अभाव. संदीपची अंगकाठी ६ फूट उंच, शरीर कमावलेले वाटायचे. मनगटातील ताकद ती दाखवून द्यायचे. संदीपने संपूर्ण कारकिर्दीत कधीही सातत्य दाखवले नाही आणि याचा परिणाम त्याला वारंवार भोगायला लागला. एखादी जबरदस्त खेळी खेळाला की तो सुस्तावयाचा आणि दिलीप मात्र तोच "फॉर्म" पुढे चालू ठेवायचा. आणखी एक फरक म्हणजे दिलिपचे क्षेत्ररक्षण खूपच वरच्या दर्जाचे होते तर संदीपने हवेत झेप घेऊन झेल पकडला आहे,हे स्वप्नातदेखील आणणे अशक्य!! तसा संदीप "कामचलाऊ" मध्यमगती गोलंदाजी करायचा पण त्याला कधीही गंभीर स्वरूप आले नाही.
एक आठवणीतील सामना. एका रणजी मोसमात, मुंबई विरुद्ध दिल्ली सामना वानखेडे मैदानावर चालू होता. दिल्लीने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावातील महत्वाची आघाडी घेतली होती आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. अशा वेळी, बहुदा कप्तान अशोक मंकडने संदीपला सूचना देऊन मैदानात धाडले असावे (मला आजही असेच वाटते, अशोक मंकड सारखा "बुद्धीवादी" आणि "चलाख" कप्तान झाला नाही!!) जसा संदीप मैदानावर आला तशी सुनील वॉलसन गोलंदाजीला आला. सुनीलने, संदीपचा इरादा ओळखला होता आणि म्हणूनच त्याने, डीप स्क्वेयर लेग आणि डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवले होते. अपेक्षेप्रमाणे त्याने वेगात बाउन्सर टाकला आणि संदीपने असा काही हूक खेळाला आहे चेंडू थेट प्रेक्षकांत!! आणि तो देखील दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून!! कुणालाही हलायची संधी देखील मिळाली नाही. प्रेक्षक उसळले. पुढील चेंडू पुन्हा तसाच आणि संदीपने पुन्हा त्याच फटाक्याची पुनरावृत्ती केली!! तिसरा चेंडू थोडा कमी आखूड टप्प्याचा आला पण संदीपने पुन्हा हुक मारला पण या वेळेस मैदानाला समांतर असा, त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना हलायची सुतराम संधी न देता!! मोहिंदर अमरनाथ पासून सगळे हतबल. मला वाटते, ४० चेंडूत त्याने ७०, ७५ धावांची खेळी केली आणि सामन्याचे स्वरूपच पालटून टाकले. संदीपकडे सामन्याचे स्वरूप काही षटकात बदलून टाकायची अलौकिक देणगी होती.
त्याच्या भात्यात सगळे फटके होते तरीही, हुक, पूल सारखे फटके खेळण्यात संदीप माहीर होता. जेंव्हा सुनील अवकाशात तळपत होता, तेंव्हा त्याला झाकोळायची किमया फक्त संदीपकडे होती. त्याच्याकडे ती नैसर्गिक देणगी होती.
असाच एक अविस्मरणीय फटका मनात कोरलेला आहे. जयपूरला भारत/पाकिस्तान एकदिवशीय सामना होता. मला आता स्कोअर वगैरे आठवत नाही. संदीप फलंदाजीला आला आणि इम्रानने, मुदस्सर नझरकडे चेंडू दिला. मला वाटतं लगेचच्या षटकात, मुदस्सरने आखूड टप्प्याचा चेंडू मधल्या यष्टीवर टाकला. संदीप रंगात आला होता. त्याच मूडमध्ये, संदीपने डावा पाय पुढे टाकला आणि स्ट्रेट ड्राइव्ह हाणला. फटका इतक्या जोरात मारला होता, मुदस्सरने फटका पायाने अडवण्याचा विचार क्षणार्धात बदलला आणि पाय काढून घेतला!! जर अडवला असता तर तळपाय निखळला असता. मुदस्सरच नव्हे तर इम्रान देखील अवाक् झाला होता. वास्तविक असा चेंडू सर्वसाधारणपणे मागच्या पायावर जाऊन तटवला जातो किंवा फार तर मिडविकेटच्या दिशेने चौकार, षटकार मारला जातो. संदीपची खेळपट्टीवर अशी "दादागिरी" बेमुर्वतखोरपणे चालायची.
असा खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीवर बहरला नसता तरच नवल होते. १९८०/८१ चा दौरा संदीपने गाजवला. आज त्याचे नाव, ऍडलेडच्या असामान्य १७४ धावांच्या असामान्य खेळीसाठी घेतले जाते. ही खेळी अविस्मरणीय नक्कीच होती त्याआधीच्या सिडने कसोटीत, डोक्याला मार खाण्याआधीची ६५ धावांची खेळी अधिक सुंदर होती. अर्थात,डोक्याला इतका मार खाऊन परत खेळायला येऊन, शतकी खेळी करायची,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. लिली, पास्को सारख्या गोलंदाजांना तुडवायचे कसे, याचा संदीपने नमुना पेश केला होता. ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवल्यावर नेहमीप्रमाणे संदीपच्या खेळात शैथिल्य आले आणि न्यूझीलंडचा दौरा तसा यथातथाच गेला.
खेळात सातत्य नसल्याने, त्याच्या खेळावर नेहमी आणि वाजवी टीका केली जायची. जसा त्याने ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवला तसाच पुढे त्याने इंग्लंडचा दौरा गाजवला. खरंतर ओल्ड ट्रॅफोर्ड कसोटीआधी त्याला डच्चू मिळाला होता पण कर्णधार सुनील मुळे संदीपला या कसोटीत संधी मिळाली आणि त्याने विलिसच्या गोलंदाजीवर अभूतपूर्व असा हल्ला चढवला. आता हल्ली,एका षटकात ६चौकार मारणे जरी अलौकिक असले तरी त्याकाळी तर निव्वळ आश्चर्य आणि अविश्वसनीय घटना होती. या खेळीने परत एकदा संदीप भारतीय संघात स्थिरावला.
संदीपकडे एक अवगुण होता, एकतर त्याने आपल्याला मिळालेल्या देणगीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण हा कधीच संदीपचा प्रांत झाला नाही. अगदी लपवावे, अशी परिस्थिती नव्हती पण क्लोज-इन क्षेत्ररक्षक म्हणून तो कधीही भरवशाचा नव्हता. त्यातून त्याच्या तब्येतीच्या सतत कुरबुरी चालू असायच्या. त्याच्याच जोडीने खेळणारे, सुनील, दिलीप, रवी, कपिल यांच्या तब्येतीच्या तक्रारी कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या त्यातून, तंत्र हा कधीच संदीपच्या खेळाचा भाग नव्हता. नैसर्गिक गुणवत्ताच इतकी होती की त्याला तंत्राची जोड गरजेची नव्हती. अर्थात, जोपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये असता आणि तरुण असता, तोपर्यंत बरेचकाही चालून जाते. एकदा का वयाचा परिणाम शरीरावर व्हायला लागला कि रिफ्लेक्सिस कमी होतात आणि कामगिरी खालावयाला लागते. तसे बघितले तर फलंदाज म्हणून तो शेवटपर्यंत अभूतपूर्व होता. संदीप खेळत आहे, ही बातमी स्टेडियमवर गर्दी खेचायला पुरेशी होती. तुमच्याकडे नैसर्गिक प्रतिभा असली तरीही त्याला मेहनतीची अफाट जोड द्यायलाच लागते अन्यथा तुमची कारकीर्द अकाली संपते. सचिन तेंडुलकर याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून देता येईल. आज संदीपच्या कारकिर्दीकडे त्रयस्थपणे बघताना, आनंद तर होतोच पण हळहळ जास्त जाणवते.


Thursday, 7 March 2019

हे बंध रेशमाचे

मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची विलक्षण अशी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. जवळपास ९० ते १०० वर्षांपासून मराठी रंगभूमी संगीत नाटकांनी गाजत आलेली आहे आणि आजही तुरळक का होईना, मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे प्रयोग चालत असतात. अर्थात, सुरवातीच्या काळात, संगीत रंगभूमीवरील संगीत हे प्रामुख्याने शास्त्रोक्त रागांच्या चीजेवर आधारित बांधलेले असायचे आणि त्यालाच अनुरूप अशी काव्यरचना होत असे. याला पहिला छेद मिळाला, १९४० च्या दशकातील "आंधळ्यांची शाळा" या नाटकाने आणि पुढे १९६० च्या सुमारास आलेल्या "संगीत मत्स्यगंधा" या नाटकाने नवीन पायवाट रुजवली. पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीला संपूर्ण नवीन असे स्वरूप प्रदान केले. नवीन प्रकारच्या काव्यरचना - ज्याला रूढार्थाने कविता म्हणता येईल अशा रचनांना त्यांनी नव्या धाटणीच्या चालीने रंगभूमीवर सादर केले आणि एक नवे मन्वंतर घडवले. आपले आजचे गाणे " हे बंध रेशमाचे" गाणे, याच धाटणीवर पण तरीही मराठी भावगीतांच्या अंगाने बांधलेले आहे. सक्षम कविता, समृद्ध स्वररचना आणि आणि आशय अधिक खोलवर मांडणारी गायकी, असे वर्णन करता येईल. किंबहुना आपल्याला या गाण्याच्या निमित्ताने असे विधान करता येईल, पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीवर गायकी अंगाचाच पण भावगीतांचा नवीन आविष्कार सादर केला.  
नाट्यगीताच्या पारंपरिक ढंगाने, सुरवात केली आहे. मुखड्याच्या आधीच आलाप भैरवी रागिणीवर आधारित आहे पण, मुखड्याच्या शेवटच्या ओळीतील "रेशमाचे" शब्दातील "मा" अक्षरावरून पुढे सिंध भैरवी ऐकायला मिळते!! अर्थात आपण आशयाच्या दृष्टीने ऐकायला गेल्यास, एक गंभीर आणि सदृढ रचना ऐकायला मिळाल्याचा आनंद मिळतो. 
अभिषेकी बुवांनी मराठीतील काही उत्तम कवींच्या कवितांना रंगभूमीवर सादर केले. इथे, प्रस्तुत शब्दरचना ही शांताबाई शेळक्यांची आहे. शांताबाई शेळके, या मुळातल्या अतिशय गेयताप्रधान रचनाकार. शब्दार्थात शक्यतो कुठेही गूढार्थ अजिबात न आणता, सखोल आशयाची प्रचिती देण्यात अगदी हातखंडा म्हणावा, इतके प्रभुत्व मिळालेल्या कवियत्री. कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्द आणि ओळींतून अमुर्तपणे दिसू शकणारा लय, ही महत्वाची बाजू दिसते. खरतर शांताबाईंच्या कविता या, कविता या पातळीवर स्वतंत्रपणे आस्वादता येतील, इतक्या ताकदीच्या आहेत. त्यांच्या कवितेतुन नादाची, घाटाची आणि आशयाची अनंत चित्रे उभी राहतात आणि प्रत्येकवेळी त्यांची कविता नवनिर्मितीचा आनंद मिळवून देते. इथे पहिल्याच ओळीत प्रेमाची माहिती मांडताना, निरपेक्ष वृत्ती आढळते आणि तीच वृत्ती संपूर्ण कवितेभर कायम राखलेली दिसते परंतु तशी मांडणी  करताना,अंतर्मनातील वादळे दर्शविताना, काहीसे गूढ वर्णन केले आहे. ही तर सक्षम भावकवितेचीच लक्षणे म्हणायला हवीत. अर्थाचे अनेक पदर सुटतात तरीही नव्याने अर्थ गवसतात!! 

पथ जात धर्म किंवा नातेही ज्या न ठावे 
ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे 
हृदयात जागणाऱ्या अति गूढ संभ्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे 

वर म्हटल्याप्रमाणे अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीवर अनेक प्रयोग केले. स्वररचनांची नवीन धाटणी निर्माण केली तसेच अनेक अनवट रागांचा वापर करून शास्त्रोक्त संगीतावरील प्रभुत्व सिद्ध केले. अगदी पाश्चात्य संगीताचा वापर देखील केला. मुळात, नाटकाची प्रकृती ध्यानात ठेऊन, त्यातील गीतांना चाली बांधल्या. नाट्यगीतांचा पारंपरिक ढाचा बदलून, स्वररचना "गीतधर्मी" केली. आता प्रस्तुत गाण्याची चाल ही भैरवीच आहे आणि या रागात असंख्य रचना तयार होऊन देखील, त्यांनी या गाण्याची चाल बांधताना स्वतंत्र वैशिष्ट्य राखले. 

विसरून जाय जेंव्हा माणूस माणसाला 
जाळीत ये जगाला, विक्राळ एक ज्वाला 
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे 

नाट्यगीतांत बरेचवेळा एक दोष कायम आढळतो आणि तो म्हणजे शब्दांची मोडतोड करणे आणि याचे महत्वाचे कारण नाट्यगीत म्हणजे रागदारी चीजेचा लघुत्तम आविष्कार, अशी चुकीची असलेली समजूत. त्यामुळे रागदारी संगीतात जसे शब्दांना खुंटीवर टांगले  जाते,त्याचाच प्रभाव नाट्यगीत गायनात फार पडला. परिणामी, शब्दांचा कवितेच्या अंगाने आस्वाद घेणे जवळपास दुर्लक्षिले गेले. अभिषेकीबुवांनी याला संपूर्णपणे फाटा दिला. अर्थात, कुणीही उठावे आणि अभिषेकीबुवांची गाणी गावे, इतका फोफशेपणा कधीच आढळत नाही. स्वरविस्ताराच्या विपुल जागा सापडतात परंतु गायकी अंगाने गायचे म्हणजे संपूर्ण सप्तक आवाक्यात घ्यायचे किंवा अति जलद ताना, चक्रिकार ताना, मुर्घ्नी स्वर लावणे इत्यादी शास्त्रीय अलंकार न  वापरता,देखील गायन प्रभावीपणे करता येते, याचा आदिनमुना पेश केला. 

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा 
धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा 
बळ हे दुर्बळांना देती पराक्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे

गायक म्हणून मूल्यमापन करायचे  झाल्यास, ठाशीव शब्दोच्चार तसेच गाताना, अर्ध्या ताना तसेच भावगीतांच्या अंगाने केलेले गायन. प्रस्तुत गाणे तर फक्त ४ मिनिटांचे आहे - याचाच अर्थ भावगीताचा रंगमंचीय आविष्कार. गळ्याचा तारता पल्ला फार विस्तृत नाही तसेच शक्यतो ठाय लयीत आणि मंद्र आणि मध्य सप्तकात आवाज लावणे. अगदीच गरज पडली तर तयार सप्तकाला स्पर्श करायचा. हे गाणे  ऐकताना,स्वरविस्ताराच्या शक्यता जाणवतात आणि तरीही भावार्थाला अधिक महत्व दिल्याने, फक्त चालीतूनच गायकी आविष्कृत केली आहे. गायन अतिशय संयमित पद्धतीने केले आहे. परिणामी शब्दांचा मनावर गाढा परिणाम होतो.  या सगळ्याचाच दुसरा परिणाम म्हणजे भैरवी असून देखील पारंपरिक ठसा मनावर न उमटता, एखादी विदग्ध, संयत दु:खाची भावना जागृत होऊन,  मन भारून जावे, हेच खरेतर या गाण्याचे खरे वैशिट्य मानावे लागेल. 



Friday, 1 March 2019

इथेच आणि या बांधावर

काही गाणी का लोकप्रिय होतात आणि काही गाणी विस्मृतीत का जातात, या बाबत तसे ठाम ठोकताळे नाहीत. बरेचवेळा "लोकप्रियता" हा घासून गुळगुळीत आलेला शब्द वापरला जातो पण तरीही ते काही समाधानकारक उत्तर नव्हे. एक तर नक्की, "आता मी सर्वोत्तम चाल बांधतो" असे सांगून कुणीही संगीतकार अप्रतिम चाल बांधू शकत नाही. चाल शब्दांतून उमटते किंवा सुरांशी खेळात असताना अचानक निर्माण होते. त्याचा सुयोग्य पद्धतीने धांडोळा घेणे अशक्य!! बरेचवेळा असे देखील निदान केले जाते, लोकप्रिय झालेली चाल तितकीशी चांगली नसते किंवा सुंदर चाली तितक्याशा प्रसिद्ध होत नाहीत.  याबाबत अनेक शक्यता निघू शकतात. 
आजचे प्रस्तुत गाणे वरील सगळ्या शक्यतांना छेद देणारे आहे. गाणे आजही लोकप्रिय आहे आणि गाण्याच्या सगळ्या अंगाने बघितल्यास, गाणे हे "गाण्याच्या" पातळीवर उतरते. थोडक्यात, गाण्यातील १) शब्द, २) चाल आणि ३) गायन, या तिन्ही मूलभूत घटकांवर गाणे लखलखीतपणे समोर येते. आता या तिन्ही घटकांच्या आधारे या गाण्याबद्दल विचार करायला घेऊया. शब्दरचना कवी सुधांशु यांची आहे. "हणमंत नरहर जोशी" हे मूळचे नाव परंतु कविता लेखनासाठी त्यांनी "सुधांशु" हे नाव स्वीकारले. वास्तविक आयुष्यभर श्री दत्ताची  पूजा,पौराहित्य केले आणि आजही महाराष्ट्रात श्री दत्ताचे कवी म्हणूनच ख्यातकीर्त आहेत. कवी सुधांशु जरी दत्त भक्त होते तरीही त्यांनी "इथेच आणि या बांधावर" सारखी प्रणयरम्य शब्दरचना केली. याचाच वेगळा अर्थ, निर्मितीला कसलेही "लेबल" लावण्यात काहीही अर्थ नसतो. ही कविता लिहिली, तो काळ काहीसा स्वप्नाळू, धुंद असा काळ होता आणि त्यानुरुपच कवी सुधांशु यांनी ही कविता लिहिली आहे. कविता फार अर्थपूर्ण, गूढ वगैरे अजिबात नाही आणि ललित संगीताच्या आकृतिबंधाची तशी फार मागणी देखील नसते. कवितेत आलेली गेयता सहजस्फूर्त आणि काहीशी बाळबोध आहे. 

इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ,
ख्या रे किती रंगला खेळ 

संगीतकार विठ्ठल शिंदे आहेत. विठ्ठल शिंदे वस्तूत: लोकगीतांचे संगीतकार म्हणून अधिक लोकप्रिय तरीही आपल्या पिंडाला बाजूला सारून त्यांनी अशी सुरेख स्वररचना सादर केली आहे. बासरीच्या हलक्या सुरांतून यमन सारख्या लोकप्रिय रागाचे सूचन करीत सुरवातीचा वाद्यमेळ बांधला आहे. जशी शब्दरचना तशीच स्वररचना आहे. संयत प्रणयाविष्कार आणि संध्याकाळची निवांत, शांत वेळ ध्यानात घेऊनच चाल बांधली आहे. चालीत कुठेही अवघड हरकत नाही की अवजड ताना नाहीत. तशा अलंकारांची गरजच नाही. अर्थात त्यावेळची सांगीत संस्कृती लक्षात घेता, भरमसाट वाद्यमेळ वगैरे चैनी मराठी ललित संगीताला परवडणाऱ्या नव्हत्या. त्यावेळची बहुतांश गाणी ऐकली तर एक ध्यानात येईल, गाणे  बांधताना,गाण्याची चाल बांधणे, याकडे संगीतकार आपले लक्ष वेधून घेत असत. चाल सुबोध असणे, ही गरज होती. यमन रागाच्या लडिवाळ सुरांवर हिंदोळे घेत, गाण्याची सुरवात होते आणि रसिकांचे लक्ष तिथेच वेधले जाते. मुखड्याची चाल काहीशी गतिमान ठेवली आहे आणि दुसरी ओळ, पहिल्याच्या दुपटीने घेतली आहे. अर्थात असे  करताना,कवितेतील आशय कुठेही दुर्लक्षिलेला नाही. 
  
शांत धरित्री शांत सरोवर 
पवन झुळझुळे शीतल सुंदर  
अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ 

पहिला अंतरा शब्दार्थाने बघितला तर मी वरती जे साधे, सुबोध शब्द वापरले, त्याचीच प्रचिती देणारा आहे. गाण्यातील तिन्ही अंतरे एकाच चालीत बांधले आहेत. तसेच "उठावण" घेताना सुद्धा कुठेही "जोर" लावलेला नाही. "शांत धरित्री, शांत सरोवर" या शब्दांतून मांडलेली शांतता, संपूर्ण चालीतून दृग्गोचर होते. 

रातराणीचा गंध दरवळे 
धुंद काहीसे आतून उसळे 
चंद्र हासला, लवली खाली नक्षत्रांची वेल 

गायिका म्हणून माणिक वर्मांचे विश्लेषण करायचे झाल्यास, या गायिकेने उत्तर भारतीय संगीताचा ढंग सफाईने मराठी ललित संगीतात आणला. त्यांच्या अनेक कृष्णगीतांत याचे प्रत्यंतर येते. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय. गायनात नखरा आहे पण अगदी लखनवी घराण्याचा नाही. बनारसी ठुमरीच्या ढंगाजवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा त्यांचा खास आविष्कार म्हणावा लागेल. मुखडा किंवा अंतरा, खालच्या अंगाचा असला तरी (जसा इथे आहे) पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार. इथे पहिल्या अंतऱ्यातील " पवन झुळझुळे शीतल सुंदर " नंतर " अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ" ही ओळ घेताना, वरील विधानाचे प्रत्यंतर येते. तसेच " अवचित जमला मेळ " किंवा " नक्षत्रांची वेल " याची द्विरुक्ती करताना छोटासा आलाप घेतलेला आहे, तो बनारसी ढंगाची आठवण करून देतो. 

पहाटच्या त्या दवांत भिजुनी 
विरली हळूहळू सुंदर रजनी 
स्वप्नांसुमांवर अजुनी तरंगे, ती सोन्याची वेळ 

आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास संदिग्ध आणि घरंदाज गोडवा!! माणिक वर्मांच्या गालातच तशी नैसर्गिक देणगी असल्याप्रमाणे, गळ्यातून गोडवा बाहेर पडतो. या गायिकेचे कुठलेही गाणे ऐकायला घेतले तरी कुठेही छचोरपणा, नटवेपणा नसतो. घरगुतीपणाचा सोज्वळ गंध कायम आवाजात राहिला आणि त्यामुळेच बहुदा माणिक वर्मांना भावगीत गायिका म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली. गायन करताना कुठेही अकारण नाट्यमयता आणण्याचा प्रयास नसतो. किंबहुना सर्वसमावेशकता हाच गुण प्रामुख्याने ऐकायला मिळतो. त्यामुळे गायकीचा "असर" दिसला नाही तरी वृत्तीचा परिणाम दिसतो. याच गुणांचा आढळ या गाण्यातून सर्वत्र पसरलेला दिसतो. म्हणूनच बहुदा आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे जितकी अर्धशतकापूर्वी होती. 


Sunday, 17 February 2019

अजून त्या झुडुपांच्या मागे

मागील शतकात, आपल्या आयुष्यात दूरदर्शनचा प्रवेश होण्यापूर्वी रेडियोचे, मनोरंजन म्हणून स्थान बरेच वर्षे अबाधित होते - आजही बरेचजण सतत रेडिओ ऐकत असतात पण एकूण प्रमाण कमीच झाले आहे. माझा तेंव्हा देखील ऐकण्याचा भर म्हणजे मराठी गाणी. अशावेळी कधीतरी अचानक, "भावसरगम" कार्यक्रम ऐकला आणि तो कार्यक्रम ऐकायची सवयच लागली. "भावसरगम" कार्यक्रमाने मराठी ललित संगीतात प्रचंड भर टाकली. एक संपूर्ण पिढी घडवली, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा, इतका प्रभाव रसिकांवर पडला होता. कितीतरी नवे संगीतकार, नव्या दमाचे कवी, गायक/गायिका यांना अतिशय विपुल प्रमाणात संधी मिळाली. याच पंक्तीत मानाचे स्थान मिळवणारे संगीतकार - दशरथ पुजारी!! संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन आपण नंतर करू पण त्याआधी गाण्याकडे वळूया. 
गाण्याची चाल स्पष्टपणे यमन कल्याण रागावर आधारित आहे. गाण्याच्या सुरवातीलाच सतारीच्या सुरांमधून या रागाचे सूचना मिळते. अर्थात, ललित संगीताच्या शिरस्त्याप्रमाणे चाल, रंगापासून काहीशी दूर जाते पण ते तर ललित संगीताचे प्रधान वैशिष्ट्य आहे. सतारीचे सूर किंचित्काळ ऐकायला मिळतात आणि लगोलग, गायक म्हणून खुद्द दशरथ पुजारी अवतरतात. गाण्याची चाल सुबोध आहे पण कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्दरचना देखील तशीच  साधी,सरळ आहे. संयत प्रणयाचाच काळ होता आणि त्यानुरुपच गाण्यातील प्रणयाची जी काही धिटाई असायची ती , निसर्गाच्या प्रतिमांतूनच आपल्या समोर यायची. पहिल्याच ओळीत, "सदाफुली" सारख्या सध्या फुलाचे प्रतीक घेतले असल्याने, पुढे त्याच प्रतिकाला धरूनच शब्दरचना येणार, याचा अंदाज घेता येतो. कवितेतील फुले म्हणून जी निवडली आहेत, ती बघितली तर वरील विधानाचा अर्थ समजून घेता येईल. "सदाफुली","शेवंती", "मोगरा" ही फुले तशी सामान्य जनांच्या जिव्हाळ्याची फुले आहेत आणि सहजपणे कुठेही दृष्टोत्पत्तीस पडतात, परिणामी सगळीच रचना ही सुबोध झाली आहे. कुठेही फार प्रयोग केलेले आढळत नाहीत म्हणजे नवीन वाद्ये, लयीचे वेगळे बंध किंवा लयच अति अवघड बांधणे इत्यादी. गाण्यात चालीच्या कुलशीलाला योग्य अशीच शब्दकळा आहे. चाल सहजपणे गुणगुणता येण्यासारखी असल्याने रसिकांच्या मनात बसली.  इथे एक बाब स्पष्ट करावीशी  वाटते,साधी चाल बांधणे हे कधीच साधे, सहजशक्य नसते. त्यासाठी संगीताचा व्यासंग तितकाच भरीव असावाच लागतो. 

अजून त्या झुडुपांच्या मागे 
सदाफुली दोघांना हसते 
अजून आपुल्या आठवणींनी 
शेवंती लजवंती होते 

गाण्यात साधा आणि ललित संगीतात प्रसिद्ध असलेला केरवा ताल वापरलेला आहे. आता यानिमित्ताने संगीतकार दशरथ पुजारीचे मूल्यमापन करायचे झाल्यास, खंत अव्यक्तपणे व्यक्त करणे, अंतर्मुखता आणि हळवी असहायता तसेच मुग्ध व संयत अभिव्यक्तता सिद्ध करणे होय. संगीतकाराचा कां बहुदा पारंपरिक वा रूढ संगीताचे वळण पसंत करतात असे म्हणता येईल - पण त्यातूनच गुणगुणण्यासारख्या चाली निर्माण करतात, ही बाब खास प्रशंसनीय म्हणावीच लागेल. एक बाब स्पष्टपणे जाणवते ,आपल्या श्रोत्यांचे लक्ष  वेधण्यासाठी या संगीतकाराने फारसे काही उलटे-पालटे  केले नाही. 

तसे पहाया तुला मला  ग 
अजून दवबिंदू थरथरतो 
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव 
अजून ताठर चंपक झुरतो 

हाच अंतरा ऐकायला घेतल्यास, वरील विधान आपल्याला पटू शकेल. अस्ताईची चाल तशी कायम ठेवली आहे आणि संथपणे, चालीतील मूळ गोडवा कायम ठेऊन, तशीच चालू ठेवली आहे आणि मुळातल्या गोडव्यावर सगळी भिस्त ठेवली आहे. म्हटले तर यात काहीच नावीन्य नाही परंतु त्याचबरोबर चालीत गोडवा निर्माण करणे, हे सृजनाचे लक्षण मानावेच लागेल. त्याचजोडीने आपण कवितेकडे लक्ष वेधले असल्यास, शब्दकळा देखील अतिशय साधी, मुग्ध प्रणयालाच साजेशी आहे. कवी वसंत बापटांची कविता आहे. "दवबिंदू थरथरतो" किंवा "ताठर चंपक झुरतो" यातून आशयाची भावव्यक्तीच समोर येते. सुरवातीलाच मी एक विधान केले  होते,निसर्गातील फुलांचा प्रतिमात्मक वापर करताना, उदाहरण म्हणून नेहमीच्याच वापरातील फुलांचा वापर केला आहे. त्यामुळे असेल पण संगीतकाराने चाल निर्मिती करताना, हाच दृष्टिकोन समोर ठेवला असावा. 

अजून गुंगीमध्ये मोगरा 
त्या तसल्या केसांच्या वासे 
अजून त्या पात्यांत लव्हाळी 
होतच असते अपुले हांसे 

गायक म्हणून दशरथ पुजारी यांचे विश्लेषण करताना, काहीसा सपाट विनावक्र असा गळा म्हणता येईल. गाण्यावर शास्त्रोक्त संगीताचे संस्कार झाल्याचे जाणवत नाही (खरे तर हा मुद्दा विवादास्पद म्हणायला हवा!!) त्यामुळे गाताना एखादीच छोटीशी हरकत घेऊन, मूळ चालीतील काहीसे "वेगळे अंग" दाखवले जाते. कवितेची प्रकृती ध्यानात घेता आणि चालीचे शील लक्षात घेता, गायनात अवघड हरकती घेण्याची काहीच गरज भासत नाही. तांत्रिक बाजूने लिहायचे झाल्यास, आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नाही आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरतीच मर्यादित आहे. परंतु आवाजात काहीशी आश्वासकता किंवा सांत्वन करण्याचा धर्म आहे. "अजून गुंगीमध्ये मोगरा" ही ओळ गायल्यावर लगोलग छोटासा आलाप घेतला आहे आणि हा आलापच त्यांच्या गायकीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानता येईल. 

अजुनी फिक्कट चंद्राखाली 
माझी आशा तरळत आहे 
गीतांमधले गरळ झोकुनी 
अजून वारा बरळत आहे 

संगीतकार म्हणून आणखी काही विधाने करायची  झाल्यास, त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. भारतीय व्यापक संगीत परंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित श्रोता असतो. ललित संगीत पारंपरिक की नवीन, याची फारशी चर्चा न करता त्यांची सांगीतिक गरज भागू शकते आणि असा वर्ग आपल्या समाजात फार मोठ्या प्रमाणावर असतो. तेंव्हा या गाण्याचे खरे यश अशा संगीत रचनेत दडलेले आहे, हे मान्यच करायला लागते.