Thursday 7 March 2019

हे बंध रेशमाचे

मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची विलक्षण अशी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. जवळपास ९० ते १०० वर्षांपासून मराठी रंगभूमी संगीत नाटकांनी गाजत आलेली आहे आणि आजही तुरळक का होईना, मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे प्रयोग चालत असतात. अर्थात, सुरवातीच्या काळात, संगीत रंगभूमीवरील संगीत हे प्रामुख्याने शास्त्रोक्त रागांच्या चीजेवर आधारित बांधलेले असायचे आणि त्यालाच अनुरूप अशी काव्यरचना होत असे. याला पहिला छेद मिळाला, १९४० च्या दशकातील "आंधळ्यांची शाळा" या नाटकाने आणि पुढे १९६० च्या सुमारास आलेल्या "संगीत मत्स्यगंधा" या नाटकाने नवीन पायवाट रुजवली. पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीला संपूर्ण नवीन असे स्वरूप प्रदान केले. नवीन प्रकारच्या काव्यरचना - ज्याला रूढार्थाने कविता म्हणता येईल अशा रचनांना त्यांनी नव्या धाटणीच्या चालीने रंगभूमीवर सादर केले आणि एक नवे मन्वंतर घडवले. आपले आजचे गाणे " हे बंध रेशमाचे" गाणे, याच धाटणीवर पण तरीही मराठी भावगीतांच्या अंगाने बांधलेले आहे. सक्षम कविता, समृद्ध स्वररचना आणि आणि आशय अधिक खोलवर मांडणारी गायकी, असे वर्णन करता येईल. किंबहुना आपल्याला या गाण्याच्या निमित्ताने असे विधान करता येईल, पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीवर गायकी अंगाचाच पण भावगीतांचा नवीन आविष्कार सादर केला.  
नाट्यगीताच्या पारंपरिक ढंगाने, सुरवात केली आहे. मुखड्याच्या आधीच आलाप भैरवी रागिणीवर आधारित आहे पण, मुखड्याच्या शेवटच्या ओळीतील "रेशमाचे" शब्दातील "मा" अक्षरावरून पुढे सिंध भैरवी ऐकायला मिळते!! अर्थात आपण आशयाच्या दृष्टीने ऐकायला गेल्यास, एक गंभीर आणि सदृढ रचना ऐकायला मिळाल्याचा आनंद मिळतो. 
अभिषेकी बुवांनी मराठीतील काही उत्तम कवींच्या कवितांना रंगभूमीवर सादर केले. इथे, प्रस्तुत शब्दरचना ही शांताबाई शेळक्यांची आहे. शांताबाई शेळके, या मुळातल्या अतिशय गेयताप्रधान रचनाकार. शब्दार्थात शक्यतो कुठेही गूढार्थ अजिबात न आणता, सखोल आशयाची प्रचिती देण्यात अगदी हातखंडा म्हणावा, इतके प्रभुत्व मिळालेल्या कवियत्री. कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्द आणि ओळींतून अमुर्तपणे दिसू शकणारा लय, ही महत्वाची बाजू दिसते. खरतर शांताबाईंच्या कविता या, कविता या पातळीवर स्वतंत्रपणे आस्वादता येतील, इतक्या ताकदीच्या आहेत. त्यांच्या कवितेतुन नादाची, घाटाची आणि आशयाची अनंत चित्रे उभी राहतात आणि प्रत्येकवेळी त्यांची कविता नवनिर्मितीचा आनंद मिळवून देते. इथे पहिल्याच ओळीत प्रेमाची माहिती मांडताना, निरपेक्ष वृत्ती आढळते आणि तीच वृत्ती संपूर्ण कवितेभर कायम राखलेली दिसते परंतु तशी मांडणी  करताना,अंतर्मनातील वादळे दर्शविताना, काहीसे गूढ वर्णन केले आहे. ही तर सक्षम भावकवितेचीच लक्षणे म्हणायला हवीत. अर्थाचे अनेक पदर सुटतात तरीही नव्याने अर्थ गवसतात!! 

पथ जात धर्म किंवा नातेही ज्या न ठावे 
ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे 
हृदयात जागणाऱ्या अति गूढ संभ्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे 

वर म्हटल्याप्रमाणे अभिषेकीबुवांनी मराठी संगीत रंगभूमीवर अनेक प्रयोग केले. स्वररचनांची नवीन धाटणी निर्माण केली तसेच अनेक अनवट रागांचा वापर करून शास्त्रोक्त संगीतावरील प्रभुत्व सिद्ध केले. अगदी पाश्चात्य संगीताचा वापर देखील केला. मुळात, नाटकाची प्रकृती ध्यानात ठेऊन, त्यातील गीतांना चाली बांधल्या. नाट्यगीतांचा पारंपरिक ढाचा बदलून, स्वररचना "गीतधर्मी" केली. आता प्रस्तुत गाण्याची चाल ही भैरवीच आहे आणि या रागात असंख्य रचना तयार होऊन देखील, त्यांनी या गाण्याची चाल बांधताना स्वतंत्र वैशिष्ट्य राखले. 

विसरून जाय जेंव्हा माणूस माणसाला 
जाळीत ये जगाला, विक्राळ एक ज्वाला 
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे 

नाट्यगीतांत बरेचवेळा एक दोष कायम आढळतो आणि तो म्हणजे शब्दांची मोडतोड करणे आणि याचे महत्वाचे कारण नाट्यगीत म्हणजे रागदारी चीजेचा लघुत्तम आविष्कार, अशी चुकीची असलेली समजूत. त्यामुळे रागदारी संगीतात जसे शब्दांना खुंटीवर टांगले  जाते,त्याचाच प्रभाव नाट्यगीत गायनात फार पडला. परिणामी, शब्दांचा कवितेच्या अंगाने आस्वाद घेणे जवळपास दुर्लक्षिले गेले. अभिषेकीबुवांनी याला संपूर्णपणे फाटा दिला. अर्थात, कुणीही उठावे आणि अभिषेकीबुवांची गाणी गावे, इतका फोफशेपणा कधीच आढळत नाही. स्वरविस्ताराच्या विपुल जागा सापडतात परंतु गायकी अंगाने गायचे म्हणजे संपूर्ण सप्तक आवाक्यात घ्यायचे किंवा अति जलद ताना, चक्रिकार ताना, मुर्घ्नी स्वर लावणे इत्यादी शास्त्रीय अलंकार न  वापरता,देखील गायन प्रभावीपणे करता येते, याचा आदिनमुना पेश केला. 

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा 
धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा 
बळ हे दुर्बळांना देती पराक्रमाचे 
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे

गायक म्हणून मूल्यमापन करायचे  झाल्यास, ठाशीव शब्दोच्चार तसेच गाताना, अर्ध्या ताना तसेच भावगीतांच्या अंगाने केलेले गायन. प्रस्तुत गाणे तर फक्त ४ मिनिटांचे आहे - याचाच अर्थ भावगीताचा रंगमंचीय आविष्कार. गळ्याचा तारता पल्ला फार विस्तृत नाही तसेच शक्यतो ठाय लयीत आणि मंद्र आणि मध्य सप्तकात आवाज लावणे. अगदीच गरज पडली तर तयार सप्तकाला स्पर्श करायचा. हे गाणे  ऐकताना,स्वरविस्ताराच्या शक्यता जाणवतात आणि तरीही भावार्थाला अधिक महत्व दिल्याने, फक्त चालीतूनच गायकी आविष्कृत केली आहे. गायन अतिशय संयमित पद्धतीने केले आहे. परिणामी शब्दांचा मनावर गाढा परिणाम होतो.  या सगळ्याचाच दुसरा परिणाम म्हणजे भैरवी असून देखील पारंपरिक ठसा मनावर न उमटता, एखादी विदग्ध, संयत दु:खाची भावना जागृत होऊन,  मन भारून जावे, हेच खरेतर या गाण्याचे खरे वैशिट्य मानावे लागेल. 



No comments:

Post a Comment