Friday 8 March 2019

संदीप पाटील

बहुदा १९७८/७९ चा टाईम्स शिल्डचा मोसम असावा. मी राहतो, त्याच्या पाठीमागेच सलग ५ मैदाने आहेत. १) ग्रॅण्ट मेडिकल, २) विल्सन, ३) हिंदू, ४) इस्लाम आणि ५) पारसी, अशी ५ जिमखान्यांची मैदाने आहेत. तिथे जवळपास २४X७ क्रिकेटचे सामने चालत असत. त्यातून टाईम्स शिल्ड तर अति लोकप्रिय स्पर्धा. भारतीय स्तरावरील खेळाडू देखील आवर्जून या स्पर्धेत भाग घेत असत. १) स्टेट बँकेतून हनुमंत सिंग, अजित वाडेकर, २) मफतलाल संघातून सोलकर, पॉली उम्रीगर, ३) टाटा संघातून दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील अशी नामावळी जवळून बघायला मिळायची पर्वणी असायची. अशा एका सकाळी, मी कॉलेजला जायला निघताना (तेंव्हा सकाळचे कॉलेज असायचे - १० पर्यंत संपायचे!!) पेपरमध्ये बातमी वाचली. पारसी जिमखान्याच्या मैदानावर टाटाची मॅच आहे. अस्मादिकांना, शेवटचा पिरियड बुडवायला तितकेच महत्वाचे कारण सापडले आणि मित्रांसमवेत मैदानावर पोहचलो. दुर्दैवाने दिलीप लवकर बाद झाला आणि निराशा पसरली. त्याच्यामागोमाग "संदीप पाटील" आला. वास्तविक आंतर कॉलेज स्पर्धेत मी संदीपचा खेळ बघितला होता आणि हा काय प्रतीचा बॅट्समन आहे, याची अंधुक जाणीव होती. तो दिवस संदीपचाच होता. दिवसभरात जवळपास ३५ षटकार आणि तितकेच चौकार हाणून (हाणून हाच शब्द योग्य) त्याने २४५ ची खेळी साकारली. मुळात षटकार बघणे, हाच अवर्णनीय आनंद सोहळा असतो आणि इथे तर ३५ षटकार!! मैदानावर फटक्यांची लगड लागली होती. प्रतिस्पर्धी संघ कुठला होता, हे आता आठवत नाही पण या खेळीने संदीप एकदम प्रकाशात आला. एका दिवसात वैय्यक्तिक २४५ धावा!! स्वप्नवत अशी ती खेळी होती. संपूर्ण खेळीत, एकही फटका "बेभरवशी" नव्हता तर मुद्दामून, ठरवून केलेली "कत्तल" होती. त्याच स्पर्धेत पुन्हा एकदा संदीपने द्विशतक काढले होते आणि अशीच जबरदस्त फटकेबाजीचा नजराणा पेश केला होता. त्यावर्षी संदीपची मुंबई संघात वर्णी लागणे क्रमप्राप्तच होते.
मला वाटते, गुजरातबरोबर रणजी सामना होता. लंचच्या सुमारास सुनील सोबत संदीप खेळायला आला (तोपर्यंत मुंबई संघाचे २ गडी बाद झाले होते). जेवणानंतर संदीपला लगोलग सूर सापडला. पुढील २ तासात, समोरून सुनील शांतपणे संदीपची फलंदाजी उपभोगत होता. त्या दोन तासात, संदीपने वैय्यक्तिक शतक लावले होते. एक षटकार तर वानखेडे मैदानाच्या बाहेर गेला होता. नुसता धुमाकूळ घातला होता. अशा प्रकारच्या खेळ्या, मी फक्त वेस्टइंडियन फलंदाजांकडून बघितलेल्या होत्या. इथे चक्क भारतात आणि मुंबईतून असा फलंदाज बाघायला मिळत होता.
दिलीप आणि संदीप एकाच वयाचे तरीही संदीपला भारतीय संघात प्रवेश घ्यायला १९८० साल उघडावे लागले आणि याचे प्रमुख कारण, सातत्याचा अभाव. संदीपची अंगकाठी ६ फूट उंच, शरीर कमावलेले वाटायचे. मनगटातील ताकद ती दाखवून द्यायचे. संदीपने संपूर्ण कारकिर्दीत कधीही सातत्य दाखवले नाही आणि याचा परिणाम त्याला वारंवार भोगायला लागला. एखादी जबरदस्त खेळी खेळाला की तो सुस्तावयाचा आणि दिलीप मात्र तोच "फॉर्म" पुढे चालू ठेवायचा. आणखी एक फरक म्हणजे दिलिपचे क्षेत्ररक्षण खूपच वरच्या दर्जाचे होते तर संदीपने हवेत झेप घेऊन झेल पकडला आहे,हे स्वप्नातदेखील आणणे अशक्य!! तसा संदीप "कामचलाऊ" मध्यमगती गोलंदाजी करायचा पण त्याला कधीही गंभीर स्वरूप आले नाही.
एक आठवणीतील सामना. एका रणजी मोसमात, मुंबई विरुद्ध दिल्ली सामना वानखेडे मैदानावर चालू होता. दिल्लीने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावातील महत्वाची आघाडी घेतली होती आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. अशा वेळी, बहुदा कप्तान अशोक मंकडने संदीपला सूचना देऊन मैदानात धाडले असावे (मला आजही असेच वाटते, अशोक मंकड सारखा "बुद्धीवादी" आणि "चलाख" कप्तान झाला नाही!!) जसा संदीप मैदानावर आला तशी सुनील वॉलसन गोलंदाजीला आला. सुनीलने, संदीपचा इरादा ओळखला होता आणि म्हणूनच त्याने, डीप स्क्वेयर लेग आणि डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवले होते. अपेक्षेप्रमाणे त्याने वेगात बाउन्सर टाकला आणि संदीपने असा काही हूक खेळाला आहे चेंडू थेट प्रेक्षकांत!! आणि तो देखील दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून!! कुणालाही हलायची संधी देखील मिळाली नाही. प्रेक्षक उसळले. पुढील चेंडू पुन्हा तसाच आणि संदीपने पुन्हा त्याच फटाक्याची पुनरावृत्ती केली!! तिसरा चेंडू थोडा कमी आखूड टप्प्याचा आला पण संदीपने पुन्हा हुक मारला पण या वेळेस मैदानाला समांतर असा, त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना हलायची सुतराम संधी न देता!! मोहिंदर अमरनाथ पासून सगळे हतबल. मला वाटते, ४० चेंडूत त्याने ७०, ७५ धावांची खेळी केली आणि सामन्याचे स्वरूपच पालटून टाकले. संदीपकडे सामन्याचे स्वरूप काही षटकात बदलून टाकायची अलौकिक देणगी होती.
त्याच्या भात्यात सगळे फटके होते तरीही, हुक, पूल सारखे फटके खेळण्यात संदीप माहीर होता. जेंव्हा सुनील अवकाशात तळपत होता, तेंव्हा त्याला झाकोळायची किमया फक्त संदीपकडे होती. त्याच्याकडे ती नैसर्गिक देणगी होती.
असाच एक अविस्मरणीय फटका मनात कोरलेला आहे. जयपूरला भारत/पाकिस्तान एकदिवशीय सामना होता. मला आता स्कोअर वगैरे आठवत नाही. संदीप फलंदाजीला आला आणि इम्रानने, मुदस्सर नझरकडे चेंडू दिला. मला वाटतं लगेचच्या षटकात, मुदस्सरने आखूड टप्प्याचा चेंडू मधल्या यष्टीवर टाकला. संदीप रंगात आला होता. त्याच मूडमध्ये, संदीपने डावा पाय पुढे टाकला आणि स्ट्रेट ड्राइव्ह हाणला. फटका इतक्या जोरात मारला होता, मुदस्सरने फटका पायाने अडवण्याचा विचार क्षणार्धात बदलला आणि पाय काढून घेतला!! जर अडवला असता तर तळपाय निखळला असता. मुदस्सरच नव्हे तर इम्रान देखील अवाक् झाला होता. वास्तविक असा चेंडू सर्वसाधारणपणे मागच्या पायावर जाऊन तटवला जातो किंवा फार तर मिडविकेटच्या दिशेने चौकार, षटकार मारला जातो. संदीपची खेळपट्टीवर अशी "दादागिरी" बेमुर्वतखोरपणे चालायची.
असा खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीवर बहरला नसता तरच नवल होते. १९८०/८१ चा दौरा संदीपने गाजवला. आज त्याचे नाव, ऍडलेडच्या असामान्य १७४ धावांच्या असामान्य खेळीसाठी घेतले जाते. ही खेळी अविस्मरणीय नक्कीच होती त्याआधीच्या सिडने कसोटीत, डोक्याला मार खाण्याआधीची ६५ धावांची खेळी अधिक सुंदर होती. अर्थात,डोक्याला इतका मार खाऊन परत खेळायला येऊन, शतकी खेळी करायची,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. लिली, पास्को सारख्या गोलंदाजांना तुडवायचे कसे, याचा संदीपने नमुना पेश केला होता. ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवल्यावर नेहमीप्रमाणे संदीपच्या खेळात शैथिल्य आले आणि न्यूझीलंडचा दौरा तसा यथातथाच गेला.
खेळात सातत्य नसल्याने, त्याच्या खेळावर नेहमी आणि वाजवी टीका केली जायची. जसा त्याने ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवला तसाच पुढे त्याने इंग्लंडचा दौरा गाजवला. खरंतर ओल्ड ट्रॅफोर्ड कसोटीआधी त्याला डच्चू मिळाला होता पण कर्णधार सुनील मुळे संदीपला या कसोटीत संधी मिळाली आणि त्याने विलिसच्या गोलंदाजीवर अभूतपूर्व असा हल्ला चढवला. आता हल्ली,एका षटकात ६चौकार मारणे जरी अलौकिक असले तरी त्याकाळी तर निव्वळ आश्चर्य आणि अविश्वसनीय घटना होती. या खेळीने परत एकदा संदीप भारतीय संघात स्थिरावला.
संदीपकडे एक अवगुण होता, एकतर त्याने आपल्याला मिळालेल्या देणगीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण हा कधीच संदीपचा प्रांत झाला नाही. अगदी लपवावे, अशी परिस्थिती नव्हती पण क्लोज-इन क्षेत्ररक्षक म्हणून तो कधीही भरवशाचा नव्हता. त्यातून त्याच्या तब्येतीच्या सतत कुरबुरी चालू असायच्या. त्याच्याच जोडीने खेळणारे, सुनील, दिलीप, रवी, कपिल यांच्या तब्येतीच्या तक्रारी कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या त्यातून, तंत्र हा कधीच संदीपच्या खेळाचा भाग नव्हता. नैसर्गिक गुणवत्ताच इतकी होती की त्याला तंत्राची जोड गरजेची नव्हती. अर्थात, जोपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये असता आणि तरुण असता, तोपर्यंत बरेचकाही चालून जाते. एकदा का वयाचा परिणाम शरीरावर व्हायला लागला कि रिफ्लेक्सिस कमी होतात आणि कामगिरी खालावयाला लागते. तसे बघितले तर फलंदाज म्हणून तो शेवटपर्यंत अभूतपूर्व होता. संदीप खेळत आहे, ही बातमी स्टेडियमवर गर्दी खेचायला पुरेशी होती. तुमच्याकडे नैसर्गिक प्रतिभा असली तरीही त्याला मेहनतीची अफाट जोड द्यायलाच लागते अन्यथा तुमची कारकीर्द अकाली संपते. सचिन तेंडुलकर याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून देता येईल. आज संदीपच्या कारकिर्दीकडे त्रयस्थपणे बघताना, आनंद तर होतोच पण हळहळ जास्त जाणवते.


No comments:

Post a Comment