Tuesday, 15 January 2019

दुभाजक राजकारण


हल्लीच्या राजकारणात दोन पक्ष स्पष्टपणे दिसतात. १) मोदीभक्त, २) मोदीविरोधक. राजकारण म्हटले की विरोधक आणि समर्थक असे दोन विभाग सहजपणे पडतात परंतु गेल्या काही वर्षांत प्रस्तुत विभागणी अगदी ज्वलंत म्हणावी अशी उदयाला आली आहे. राजकारण इतके सरळ चालते का? कधीच नाही. आजचा विरोधक उद्या गळ्यात गळे घालणारा मित्र होऊ शकतो. राजकारणात, कुणीही कधीही कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही, हे सर्वसाधारण चित्र अनादी काळापासून अनंत काळ स्पष्टपणे दिसणार आहे. असे असून देखील एक बाजू घेऊन, खिंड लढवणारे समर्थक, प्रसंगी तुंबळ युद्ध लढण्याची आततायी भाषा करतात. मला इथे कुणाचीच बाजू घ्यायची नाही पण इथे ज्या हिरीरीने मते मांडली जातात, त्यावरून राजकारणाची दिशा नक्कीच ठरत नाही किंवा त्या रेषेवरून राजकारण चालत नाही. खरतर, इथे प्रत्येकजण आपला लिहिण्याचा "कंडू" सामावून घेत असतो. 
सध्याच्या गदारोळात, एक बाब स्वच्छ दिसते. भक्त आणि विरोधक, दोघेही टोकाची भूमिका घेत आहेत. मुळात, राजकारणात टोकाची भूमिका ही नेहमीच सोयीस्कररीत्या घेतली जाते आणि पुढे नामानिराळी राहते.या वस्तुस्थितीचे भान एकूणातच विरळा दिसते. टोकाची भूमिका घेणे कितपत योग्य आहे? विचारात समन्वय साधणे खरंच इतके अवघड आहे का? मुळात संतुलित भूमिका घ्यावी, असे इथे कुणालाच का वाटत नाही? एखादा माणूस हा सतत काळ्या रंगातच रंगवला पाहिजे का? ती व्यक्ती सतत चूकच करीत असते का? किंवा एखादी व्यक्ती नेहमीच बरोबर असते का? या प्रश्नांची तड लावण्याची गरजच कुणाला उरलेली नाही!! एक भूमिका घ्यायची आणि त्यावर अद्वातद्वा लिहीत/बोलत बसायचे!! राजकारणात सोयीस्कर भूमिका घ्यावीच लागते, त्याशिवाय तरुणोपाय नसतो पण इथे लिहिणारे राजकारणी आहेत का? तटस्थ विचार करणे अवघड झाले आहे का? 
कुठलीही व्यक्ती आणि तिचे विचार हे कधीही आणि सदासर्वकाळ अचूक असत नाहीत. परिस्थिती बदलते आणि त्यानुसार त्या विचारांची छाननी करणे जरुरीचे असते. असे असून देखील, व्यक्तीच श्रेष्ठ हा विचार खरोखरच भयानक रोग आहे. इथे केवळ मोदी, हीच व्यक्ती ध्यानात घेतली नसून गांधी, आंबेडकर, सावरकर, नेहरू इत्यादी सगळेच राजकीय नेते लक्षात घेतले आहेत.  गांधीवाद,आंबेडकरवाद किंवा सावरकरवाद, यातील कुठलीही विचारसरणी "अंतिम शब्द" नव्हे!! पण, आपण हे कधीही लक्षात घेत नाही किंवा मान्य करत नाही आणि त्या विचारधारेच्या अनुरोधाने हुज्जत घालत असतो. आपल्याला सतत कुठलातरी "देव" देव्हाऱ्यात बसवायचा असतो आणि त्याच्या नावाने शिमगा करायचा असतो - बाकी काही नाही. वरील कुठल्याही विचारधारेत मानवी प्रश्नांची कायमची तड लावण्याची क्षमता नाही, तशी ती कुठल्याच विचारधारेत नसते. मानवी प्रश्न प्रचंड जटील, गुंतागुंतीचे होते आणि भविष्यात अधिक अवघड होत जाणार आहेत. तेंव्हा एकच एक विचारधारा कवटाळून बसण्यात काय हशील आहे? हीच खरी वस्तुस्थिती आहे. प्रस्तुत नेत्यांनी लोकांवर गारुड घातले कारण ती त्या काळाची गरज होती पण काळ बदलत असतो, मानवी मूल्ये देखील बदलत असतात. हे जर पटवून घ्यायचेच नसेल तर मग तुमच्या विचारांत कडवटपणा येतो. जो इथे वारंवार दिसत आहे. या विचारधारा, हेच अंतिम सत्य एकदा मानले की लगेच तुम्ही मनात देव्हारा तयार करता आणि त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता. हे करायची काही गरज आहे का? गांधी, आंबेडकर, सावरकर, नेहरू हे सगळे आपल्यासारखेच माणूस आहेत, त्यांचेही काही विकार आहेत, काही महत्वाचे विचार आहेत. यात "काही" हा शब्द महत्वाचा. माणूस म्हटला की अपूर्णता आलीच पण आपण या माणसांच्यात काही न्यूनत्व आहे, हेच स्वीकारत नाही. देव इथेच तयार करतो. 
आज मोदी आहेत, उद्या कदाचित राहुल गांधी येतील किंवा आणि दुसरा कुणी येईल. यांच्या विचारसरणी निखळ आहेत, हे मानण्याची गरज आहे का? यांचे सगळेच सतत चुकत असते का? किंवा या व्यक्ती नेहमीच अचूक बोलत/वागत असतात का? आपण विचारात कुठेतरी समन्वय ठेवायला नको का? माझे बोलणे कदाचित अर्धवट असेल पण मूर्ख नक्कीच नाही. दुसरा भाग असा, आपल्यालाच सगळे कळले आहे, हा अभिनिवेश. यात आपण  आपलीच फसवणूक करीत आहोत. आपले म्हणणे मांडावे, यात काहीच चूक नाही पण मांडताना थोडीतरी तौलनिक वृत्ती ठेवावी. एकांतिक वृत्ती काही काळापुरती इतरांवर प्रभाव पाडीत असते पण कालांतराने त्यातील कमतरता लक्षात येते. परंतु एकच एक दृष्टिकोन हा कधीही योग्य नसतो. एका बाजूने, प्रत्येक विचाराला अनेक दिशा असतात, असे मान्य केले जाते पण प्रत्यक्षात वावरताना, या विचाराला तिलांजली दिली जाते, हा खरा विरोधाभास आहे. 
विरोध करावा पण प्रत्येक मुद्दा हा वेगळा असतो,  त्याला अनेक कंगोरे असू शकतात. इतपत तरी ध्यानात ठेवावे. अर्थात समर्थन करताना, आपण कशाचे समर्थन करीत आहोत, याची वाजवी जाणीव ठेवावी, हे देखील सतत बाजूला सारले जाते. याचे एकमेव कारण म्हणजे विचार करताना कोत्या वृत्तीने केला जातो. जर का विचार करताना, अशा अनेक शक्यता ध्यानात घेतल्या तर विचारांत एकांतिकपणा येण्याची शक्यता दुरावते. 
लवकरच भारतात निवडणुका आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मी लिहिले आहे. 

Friday, 11 January 2019

जन पळभर म्हणतील हाय, हाय

मराठी भाषा एका दृष्टीने भाग्यवान म्हणायला लागेल आणि त्यात कविता या माध्यमाचा फार मोठा वाटा आहे. अर्थातच तद्नुषंगाने बोलायचे झाल्यास, २० व्या शतकात अमाप लोकप्रिय झालेल्या "भावगीत" संगीतप्रकारात कवितेचे प्रतिबिंब पडणे सहजशक्य असेच झाले. सुदैवाने मराठी भावगीताला देखील सक्षम कवितांची नेहमीच साथ लाभली. किंबहुना असे म्हणता येईल, अनेक संगीतरचनाकारांनी अशा अनेक कविता शोधून काढल्या ज्यांना चाली लावणे, त्यांच्या पिंडाला भावले. उत्तम कविता अधिकाधिक लोकांसमोर आणण्यात, या संगीतकारांचा फार मोठा वाटा आहे, हे नि:शंकपणे कबूल करावेच लागेल. याचाच दुसरा भाग असा म्हणता येईल, निरनिराळ्या प्रकृतींच्या कवींनी आपल्या सृजनक्षम निर्मितीने मराठी भावगीत फार श्रीमंत केले. हाच मुद्दा आणखी पुढे मांडायचा झाल्यास, भावगीतांच्या कवितेत "भावकविता" अंतर्भूत करणे, हेच या कवींनी फार मोठ्या प्रमाणावर केले आणि तद्वतच रसिकांची अभिरुची वाढवण्याचे कार्य केले. 
खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. 
अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. थोडक्यात मांडायचे झाल्यास, भावकवितेतील केवळ शब्दच नव्हे तर अक्षर देखील असे असायला हवे जिथे प्रतिशब्द/प्रतिअक्षर याला कसलाच वाव मिळू नये आणि इथे मराठी भावगीताला भा.रा. तांब्यांची कविता सापडली. 
कालानुरूप विचार केला तर आज, तांब्यांच्या कवितेत काही गुण तर काही दोष सापडतात परंतु जर का "गेयता" हा दृष्टिकोन ठेवला तर तिथे मराठीत अशी प्रासादात्मक कविता विरळाच आढळते. बोरकर, पाडगावकर अशी काही सन्माननीय नावे घेता येतील. इंदोरच्या सरंजामी वातावरणाचा तसेच संस्कृत भाषेचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो. तरीदेखील कवितेच्या ओळींमधील लय आणि रचनाकौशल्य केवळ अप्रतिम असेच म्हणायला हवे. 
"जन पळभर म्हणतील हाय, हाय;
मी जाता राहील काय,काय?"
सुरवातीलाच एक विषण्ण करणारा प्रश्न टाकून कवितेच्या आशयाची कल्पना दिली आहे. खरतर हे एक चिरंतन सत्य आहे पण तरीही फारसे कुणीही स्वीकारत नाही, असा विरोधाभास देखील आहे. संगीतरचनेबाबत मांडायचे झाल्यास, वसंत प्रभूंची चाल आहे. मराठी भावगीत जितके म्हणून श्रीमंत आणि सर्जनशील करता येईल, त्या सगळ्या शक्यता वसंत प्रभूंच्या रचनांमधून अनुभवता येतात. थोडा बारकाईने विचार केला तर गाण्याची स्वररचना "मल्हार" रागावर आहे आणि यापासुन थोडेसे चकितच होतो. या रागाचे आणि या कवितेच्या भावस्थितीचे नाते अशा प्रकारे सत्कृदर्शनी तरी भावणारे नाही तरीही चाळीचे नोटेशन मांडले  असतात,आपल्याला मल्हार रागाचे सूर मिळतात. संगीतकार प्रतिभाशाली  असतो,तो असा. मला तरी असे वाटते, वसंत प्रभूंनी चाल लावली असणार आणि पुढे कधीतरी त्यांना मल्हार रागाशी साम्य जाणवले असणार. अन्यथा सत्कृतदर्शनी तरी गाण्याची चाल वेगळी वाटते. शब्दातील विखारी भावनेशी तद्रूप होऊन बांधलेली चाल, मुखड्यातच मनात शिरते. गाण्याचे शब्दच इतके प्रत्ययकारी आहेत की तिथे वाद्यमेळाच्या आधाराची फारशी गरज भासू नये आणि प्रभूंनी नेमके तेच केले आहे. म्हटले तर सरळसोट चाल आहे पण तरीही लताबाईंनी गाताना, अर्ध्या हरकतींनी गोडवा आणला आहे. वसंत प्रभूंनी चाल बांधताना, त्याचे कविता वाचन होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे. 
"मेघ वर्षतील, शेते पिकतील; गर्वाने या नद्या वाहतील" हा दुसरा अंतरा घेताना, चाल किंचित वरच्या पट्टीत घेतली आहे. अर्थात शब्दातील आशय ध्यानात घेता, मघाशी लिहिल्याप्रमाणे मल्हार रागाशी नाते  सांगणारे सूर सापडतात. लताबाईंची गायकी, हा खरे तर वेगळ्या निबंधाचा विषय ठरावा. शब्दांतील आर्जव, व्याकुळता, आणि हताश तसेच विखारी भाव, सुरांतून कसा मांडता येऊ  शकतो,यासाठी ही गायकी, हा एक मानदंड आहे. 
"अशा जगास्तव काय कुढावे, 
मोही कुणाच्या का गुंतावे" 
या ओळी मुद्दामून अभ्यास कराव्या, अशा दर्जाची गायकी आहे. सध्याचे आघाडीचे संगीतकार श्री. अशोक पत्की यांनी वसंत प्रभूंचा गौरव करताना "मेलडीचा बादशहा" असे केले आहे आणि वसंत प्रभूंची कुठलीही चाल ऐकताना याचे प्रत्यंतर आपल्याला येऊ शकते. खरतर मेलडी हा भारतीय संगीताचा प्राण आणि तिथेच वसंत प्रभूंची खासियत म्हटल्यावर गाण्याच्या चालीत गोडवा येणे क्रमप्राप्तच ठरते. काहीवेळा ललित संगीतात, शब्द हे चालींपेक्षा वरचढ असतात परंतु जेंव्हा शब्द आणि स्वर यांचा सुयोग्य मेळ होतो, तिथेच "जन पळभर म्हणतील हाय, हाय" अशा अद्वितीय गाण्याचा जन्म होतो. मराठी भावगीत अशाच गाण्यांनी फार श्रीमंत झाले आहे.  

Monday, 7 January 2019

भाई - व्यक्ती की वल्ली

बरेच दिवस गाजत असलेला चित्रपट - "भाई - व्यक्ती की वल्ली" काल बघितला. स्पष्ट सांगायचे तर जेंव्हा एखादी कलाकृती बघण्याआधी जेंव्हा लोकप्रिय होते तेंव्हा माझ्या मनात अकारण शंका येतात. अपेक्षापूर्तीचा अनुभव फारच कमी वेळा येतो. असे देखील अनुभवाला येते, आपणच अपेक्षा वाढवून ठेवतो आणि त्याच अपेक्षेने कलाकृती बघण्याचा हव्यास धरतो आणि मग अखेरीस निराशा पदरी पडते. म्हणूनच हा चित्रपट बघण्याआधी मी शक्यतो पाटी कोरी ठेऊनच बघायला बसलो. एकतर "पु.ल." या नावाचे प्रचंड वलय आजही मराठी मनाला व्यापून आहे. इथे एक कबूलच करायला हवे, माझ्या तारुण्यात मी पु.लं. चा प्रचंड चाहता होतो, आजही आहे पण आता प्रतवारी थोडी बदलली आहे. लेखक म्हणून सगळेच तेंव्हाही आवडले नव्हते आणि आता तर दरी थोडी रुंदावली. अर्थात त्यांच्या लेखनाचे ऋण आजही मान्य करण्यात कसलीच लाज वाटत नाही. परंतु या माणसाचे कार्यक्षेत्र, लेखनाच्या पलीकडे विस्तारले होते आणि तिथे अनेक ठिकाणी त्यांचे कार्य एकतर दुर्लक्षित झाले किंवा तितकेसे रसिकप्रिय झाले नाही. काही ठिकाणी त्यांच्या मर्यादा उघड्या पडल्या आणि गंमत म्हणजे खुद्द पु.लं. नी अतिशय प्रांजळपणे मान्य केल्या होत्या. असे असून देखील कित्येकवेळा नको तितके वाद घातले गेले. 
असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर मी चित्रपट बघितला. पु.लं. चे आयुष्य तसे पूर्णतः: परिचित, त्यांनी केलेल्या "कोट्या", लेखनशैली, अभिनयशैली, दातृत्व इत्यादी सगळे परिचित असताना आत चित्रपटात आणखी वेगळे काय बघायला मिळणार? हा एक प्रश्न होता आणि दुसरा म्हणजे इतक्या विविधांगी क्षेत्रात मनमुराद विहार केलेला, चित्रपटात कसा दाखवला जाणार आहे? ही उत्सुकता होती. 
एकूण चित्रपट ठीकठाक आहे पण बऱ्याच प्रसंगांची संगती लागत नाही. उदाहरणार्थ, आपल्या बायकोला दिवस गेले आणि दुर्दैवाने मूल होऊ शकले नाही!! हा निश्चितच वैय्यक्तिकरीत्या मोठा धक्का पण त्यानंतरचे प्रसंग या प्रसंगाशी कसलाही संबंध दाखवत नाहीत!! हे कसे घडले? चित्रपटाची लांबी ध्यानात घेता असे झाले असावे, पण पुढील प्रसंग तर्कदृष्ट्या तरी संगती दाखवणारे हवे होते. 
दुसरा प्रसंग, लग्न झाल्यावर कोकणांत एका वकिलाकडे पार्टी झाली. तिथून परत येताना पाऊस लागला आणि अंतू बर्व्याकडे पुन्हा ड्रिंक्स पार्टी!! पु.लं. च्या आयुष्यात आणि एकूणच लिखाणात ड्रिंक्स बद्दल अतिशय माफक आणि तुरळक उल्लेख असताना, या पार्ट्यांवर जवळपास २०,२५ मिनिटें खर्च करून नेमके काय साधले? हे प्रसंग सलग आहेत आणि एकूणच पु.लं.च्या व्यापक आयुष्याचा थोडक्यात ताळा मांडताना अशा प्रसंगांची खरंच काय गरज होती? या प्रसंगाने पु.लं.च्या आयुष्याला काही वेगळे वळण मिळाले का? तसे काहीच दर्शविलेले नाही. 
चित्रपटाचा शेवट करताना, संगीत मैफिल दाखवली आहे. पु.लं. च्या आयुष्यात सांगितलं फार महत्वाचे स्थान होते, यात वादच नाही. प्रस्तुत मैफिलीचे काहीसे वेगळे विवेचन सुनीताबाईंनी "आहे मनोहर तरी" मध्ये, एका शनिवारी  मैफिलीचे वर्णन करताना केले आहे आणि त्यालाच जोडून पुढील शनिवारी, वसंतरावांच्या मैफिलीचे वर्णन केले आहे. तसेच "गुण गाईन आवडीने" या पुस्तकांत "हिराबाईंवर" लेख आहे. त्यात कुमार गंधर्वांच्या मैफिलीचे पु.लं.नी वर्णन केले आहे. यात दोन्ही उल्लेखात, भीमसेन, कुमार, आणि वसंतराव एकत्र कधीही गायला बसल्याचा उल्लेख नाही. असे  समजू,चित्रपटीय स्वातंत्र्य घेतले पण तरीही मग तिघांची "गायकी" कुठेच खुलून येत नाही!! आणखी एक महत्वाचा भाग "सावरे ऐ जै यो" या कुमार गंधर्वांच्या रचनेला जोडून "कानडा राजा पंढरीचा" हे भजन घेण्याचे प्रयोजन काय? बरे मूळ गाण्यात कुमार गंधर्व नाहीतच. पहिली रचना ठुमरी अंगाने गेलेली तर दुसरी रचना भजनाच्या अंगाने गेलेली. एकाच दुसऱ्याशी ना काव्याच्या दृष्टीने संबंध आणि ना संगीताच्या दृष्टीने देखील. 
संगीतकार म्हणून पु.लं. ची कामगिरी लक्षणीयच आहे पण "नाच रे मोरा" या गाण्याचा उल्लेख वगळता, आणखी काहीच नाही आणि तो प्रसंग देखील अचानक अंगावर येतो. त्याआधी आणि त्यानंतर सुसंगती आढळत नाही. तसेच पु.लं. चे वक्तृत्व हा खास विशेष होता आणि त्यांच्या आठवणी तपासता, शाळेपासून त्यांच्या अंगात वक्तुत्वाची देणगी होती. असे असून चित्रपटात त्यासंबंधी काहीही बघायला मिळत नाही. 
चित्रपटातील प्रसंग कुठेही खुलून येत नाहीत, घडाभर करमणूक, इतकेच स्वरूप राहते. पु.लं. नी जरी आयुष्यभर करमणूक हेच साध्य मानले तरी पु.लं. च्या वैचारिक लेखनाचा कसलाच उल्लेख नाही तसेच १९५९ च्या दशकात पु.लं. ना स्कॉलरशिप मिळून ते आणि सुनीताबाई युरोपला गेले आणि जवळपास २ वर्षे तिथे पु.लं. नी  शिक्षण घेतले. याचा त्यांच्या आयष्यावर खूप परिणाम झाला आणि त्यांची कारकीर्द एकदम वेगळेच वळण घेऊन गेली. त्याबाबत चित्रपटात उल्लेख देखील नाही. कदाचित उत्तरार्धात आला असेल अशी शक्यता आहे. 
एखाद्या मान्यवर व्यक्तीचा चित्रपटाद्वारे धांडोळा घेताना, त्या व्यक्तीची चिकित्सा देखील व्हावी तसेच त्या व्यक्तीचे गुण/दोष याचे सुयोग्य परिणाम दाखवावेत जेणेकरून व्यक्तित्वाची वाढ कशी झालं, याचे नेमके दर्शन चित्रपटातून घडू शकते. इथे मात्र या पातळीवर हा चित्रपट नक्कीच कमी पडला. यात लेखक म्हणून कशी वाढ झाली, संगीतकार, चित्रपटकार म्हणून कारकीर्द कशी घडली आणि त्यात कुठे कमी पडले? या प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत कारण हे प्रश्नच धडपणे उभे केले नाहीत!! चित्रपटातील विनोद, शाब्दिक कोट्या, यात नवीन काहीच मिळाले नाही कारण हे विनोद, शाब्दिक कोट्या खुद्द पु,लंनीच लोकांपुढे काही वर्षांपूर्वी सादर केले आहेत. त्यामुळे पुनरुक्ती होते. 

अर्थात ज्यांनी पु.ल. बघितलेच नाहीत त्यांच्यासाठी चित्रपट ठीक आहे पण यात दुसरा प्रश्न उद्भवतो. जी नंतरची पिढी जन्माला आली, त्यांना पु.लं. चे विश्व नक्कीच परके वाटणार!! त्या प्रेक्षकांना कसे सांगायचे? 

Friday, 4 January 2019

ती प्रलयंकारी चौकडी

१९७९-८० सालाची ऑस्ट्रेलिया/वेस्टइंडीज मालिका. परत एकदा रणधुमाळी. १९७५ साली ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडीजची साले काढली होती. ना भूतो ना भविष्यती असा ५-१ दारुण पराभव केला होता. लिली, थॉमसन,वोकर आणि गिलमोर या चौकडीने वेस्टइंडीजला संपूर्णपणे नामोहरम केले होते. तेंव्हाही १९७९-८० साली खेळलेले बरेचसे खेळाडू त्या संघात होते, अनुभवाने कमी होते पण तरीही फ्रेड्रिक्स,लॉइड, रॉबर्ट्स सारखे अनुभवी खेळाडू संघात होते परंतु विशेषतः: लिली, थॉमसन समोर कुणाचीही डाळ शिजली नाही. बरेच फलंदाज जखमी देखील झाले होते. १९७९-८० सालच्या मालिकेत वेस्टइंडीजने क्रिकेट जगात आपल्या अजिँकत्वाची द्वाही फिरवायला सुरवात केली होती. खरतर १९७६ च्या इंग्लंड मालिकेपासून या संघाचा दरारा वाढायला लागला होता. 
नुकताच १९७९सालचा विश्वकरंडक वेस्टइंडीजने सहजगत्या जिंकला होता, रिचर्ड्स जगद्विख्यात झाला होता. तसेच रॉबर्ट्स, होल्डिंग यांनी दहशत पसरवायला सुरवात केली होती. अशा वेळेस, लॉइडने १९७५ सालच्या ऑस्ट्रेलियन संघापासून स्फूर्ती घेऊन, आपल्या संघात त्याच धर्तीवर चौकडी निर्माण केली आणि इतिहासाला सुरवात झाली. बरेचवेळा दंतकथा निर्माण झाल्या. जसे रॉबर्ट्स एकाच शैलीत दोन प्रकारचे वेगवेगळे बाउंसर्स टाकत असे!! (पुढे BBC वरील एका कार्यक्रमात रॉबर्ट्सने ते गूढ उकलले - खरतर गूढ असे काही नव्हतेच!!) एक नक्की होते - हे चारही गोलंदाज - रॉबर्ट्स, होल्डिंग, क्रॉफ्ट आणि गार्नर पूर्णतः: वेगळ्या शैलीचे गोलंदाज होते. प्रत्येकाची शैली वेगळी होती, फक्त साम्य एकच होते, प्रलयंकारी वेग. या चौकडीचा खरा नायक होता अँडी रॉबर्ट्स!! याच गोलंदाजाने खऱ्याअर्थी वेस्टइंडीजच्या चौकडीला आकार दिला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरतर जलदगती गोलंदाजीच्या कलेत नव्याने विचार आणला तो प्रथम लिलीने आणि नंतर रॉबर्टसने. लिलीची शैलीच वेगळी होती, मैदानावर प्रसंगी दोन हात करायला मागेपुढे बघत नसे. पण रॉबर्ट्स मैदानावर कधीही तोल सोडून वागला नाही. किंबहुना तो अतिशय शांतपणे फलंदाजाला निरखायचा, त्याच्या कलेचा अभ्यास करायचा आणि नेमके दुर्बळ दुवे शोधून तिथे आघात करायचा. सुरवातीला रॉबर्ट्सचा वेग प्रलयंकारी असाच होता. गोलंदाजी करताना, त्याची शैली अतिशय साधी होती पण अखेरच्या क्षणी खांद्यातून चेंडूला वेग द्यायचा, पाहिजे तसा स्विंग करायचा, बाउंस द्यायचा, अशा अनेक करामती करायचा आणि शेवटपर्यँत फलंदाजाला पत्ता लागू द्यायचा नाही. दोषच काढायचा झाल्यास, रॉबर्ट्सकडे तितका प्रभावी "यॉर्कर" नव्हता. इथे मी होल्डींग किंवा ऑस्ट्रेलियाच्या थॉमसन, यांच्याशी तुलना करीत आहे. परंतु बाउंसरच्या वैविध्यामुळे रॉबर्ट्स नेहमीच अगम्य राहिला - अगम्य म्हणजे चेंडू कशाप्रकारे टाकणार आहे, याचा जरादेखील थांगपत्ता लागू द्यायचा नाही. आणखी एक बाब म्हणजे चेंडू जुना झाला तरी रॉबर्ट्स तितकाच घातक गोलंदाज होता. चंदू जुना झाला की तो बरेचवेळा चेंडुवरील शिवण हाताच्या मनगटाच्या विरुद्ध दिशेला ठेवीत असे - चेंडू नवा असताना बोटांच्या पेरातून चेंडूची शिवण पकडून चेंडू टाकत असे. परिणाम असा व्हायचा, जुन्या चेंडुवरील "इनस्विंग" अखेरच्या क्षणी फलंदाजाला समजायचा!! हे त्याचे खरोखर विस्मयकारक तंत्र होते. याउलट होल्डिंग!! 
 ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौऱ्यात - १९७५ ची मालिका, होल्डिंग नवखा होता, निव्वळ वेगावर अवलंबून असायचा. अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर निव्वळ वेग काही प्रमाणात आणि काही काळ प्रभाव पाडू शकतो. त्यापलीकडे तुमच्याकडे वेगळी अस्त्रे नसतील तर तो गोलंदाज पुढे प्रभावहीन ठरतो. इथेच रॉबर्ट्सने त्याच्यातील गुणवत्ता हेरली आणि आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याबद्दल केवळ होल्डिंगच नव्हे तर गार्नर आणि क्रॉफ्ट यांनी जाहीररीत्या रॉबर्ट्सला श्रेय दिले आहे. होल्डींगची शरीरयष्टी वेगवान गोलंदाजाच्या अत्यावश्यक अशीच होती. सडपातळ बांधा, सणसणीत उंची आणि अफलातून चक्रावून टाकणारा वेग. सुरवातीला तर होल्डिंग ९० मैल वेगाने  सलग १०,१२ षटके टाकीत असे आणि ती षटके म्हणजे केवळ आग!! असेच वर्णन करता येईल. सर्वात मनोहारी काय असेल तर त्याच्या "रनअप". जंगलातील भक्ष्याच्या मागे धावणारा चित्ता आणि होल्डींगचा "रनअप" यांचे सौंदर्य एकाच मापाने मोजावे!! इतकी सुंदर धाव, निदान मी तरी आजतागायत एकाही गोलंदाजाबाबत बघितलेली नाही. रॉबर्ट्स प्रमाणे चेंडू टाकायची शैली साधीच होती पण फरक होता, चेंडूचा टप्पा आणि विषयच म्हणजे होल्डींगचा जीवघेणा इनस्विंग आणि यॉर्कर!! होल्डींगने यॉर्कर  टाकला आणि मैदानावर स्टॅम्प्स उधळले (९० च्या वेगाने पडलेल्या चेंडूवर वेगळे काय होणार म्हणा) यासारखे मनोहारी दृश्य नाही. फलंदाजाला आपली बॅट खाली आणायला उसंत मिळू द्यायची नाही. फलंदाज एकतर LBW व्हायचा किंवा त्रिफळाचित!! होल्डींगची एक डिलिव्हरी आजही आठवत आहे. बार्बाडोसला वेस्टइंडीज/इंग्लंड कसोटी सामना सुरु होता आणि इंग्लंडचा सलामीचा फलंदाज, बॉयकॉट आला होता. त्याला बघितले आणि होल्डिंग रोरावत आला!! पहिले ५ चेंडू, बॉयकॉटला समजलेच नाहीत आणि सुदैवाने चेंडू बॅटीची कड न घेता विकेटकीपरकडे गेले. बॉयकॉट हैराण, चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती शेवटचा चेंडू होल्डींगने यॉर्कर टाकला आणि तिन्ही स्टंप्स उधळले. मैदान सोडेपर्यंत बॉयकॉटला कळेना, आपले तंत्र कुठे चुकले!! आजही ती ओव्हर क्रिकेट इतिहासातील अजरामर ओव्हर मानली जाते. ज्या कुणाला बॉयकॉट आणि त्याचे जगप्रसिद्ध तंत्र माहीत असेल, त्यालाच यातील खुमारी कळू शकेल. 
या चौकडीतील त्यातल्या त्यात कमी वेगवान असलेला गोलंदाज म्हणजे गार्नर. ६फूट ८ इंच असली उंची लाभलेला हा गोलंदाज आडदांड असाच होता. आता इतकी उंची लाभली असल्याने त्याचा चेंडू येणार तो कमीतकमी १० ते १२ फुटांवरून!! चेंडू कशाप्रकारे उसळी घेणार आहे, किती उसळणार आहे, याचा अचूक अंदाज वर्तवणे अशक्य - परिणामी यॉर्कर चेंडू हे हुकमी अस्त्र. जरा १९८३ सालचा विश्वकप अंतिम सामना. आपल्या फलंदाजांनी रॉबर्ट्स, होल्डिंग आणि मार्शल समोर थोडीफार तग धरली होती पण गार्नर समोर नांगी टाकली होती. कुणाही फलंदाजाला गार्नर समजूच शकला नाही आणि अंतिमतः: गार्नर सलग ५ विकेट्स घेऊन गेला. खरतर त्याची महाकाय उंची बघूनच फलंदाजाच्या छातीत धडकी भरायची. सुनील एकदा म्हणाला होता, या चौघांच्यात गार्नरचा वेग थोडा कमी होता. आता सुनीलसारखा खेळाडू बोलला म्हणजे त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. अर्थात थोडे बारकाईने निरीक्षण केले तर होल्डींगचा यॉर्कर आणि गार्नरचा यॉर्कर यात फरक होता. होल्डींगचा यॉर्कर अतिशय प्रत्ययकारी होता, म्हणजे थोडक्यात बोलायचे झाल्यास, होल्डींगचा यॉर्कर हा हवेत स्विंग व्हायचा, कधी कधी तर ऑफ स्टम्पच्या बाहेर टप्पा असायचा आणि क्षणात आत वळायचा (९० च्या गतीने आलेला चेंडू अखेरच्या क्षणी वळणे, हे दु:स्वप्नच म्हणायचे) त्यामानाने गार्नरचा यॉर्कर सरळसोटपणे यष्ट्यांचा वेध घ्यायचा (वेग फक्त ८५!!) मुळात यॉर्कर म्हणजे पायाच्या बुंध्यात टाकलेला चेंडू, त्यामुळे पायांना हालचाल करायला वाव जवळपास नाहीच आणि तशा अवस्थेत ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर पडलेला चेंडू आत येतो म्हणजे फलंदाजांची त्रेधातिरपीट नक्कीच. होल्डिंग इथे अधिक धोकादायक होता. 
क्रॉफ्ट मात्र या तिघांपेक्षा वेगळ्या शैलीचा होता. क्रॉफ्टच्या हातांची हालचाल बघता, कधी कधी सध्याचा आपला बुमरा आठवतो. क्रॉफ्ट मात्र क्रीझच्या अंतराचा वापर करण्यात अतिशय कुशल होता. गोलंदाजी करण्यासाठी धाव घेत असताना, अखेरच्या क्षणी, क्रॉफ्ट क्रीझच्या एका टोकाला जायचा आणि तिथून चेंडूला वेगळीच दिशा द्यायचा. यामुळे, चेंडू इनस्विंग आहे की आऊटस्विंग आहे, हे समजणे अवघड व्हायचे. गंमत म्हणजे राउंड दी विकेट टाकताना देखील क्रॉफ्ट क्रीझच्या टोकाचाच वापर करायचा.  क्रॉफ्टला एखाद सेकंद विचार करायला वेळ मिळायचा. 
असे हे अफलातून चौघेजण!! एकापेक्षा एक वेगळे आणि तितकेच प्रत्ययकारी. लॉईडचे भाग्य म्हणायचे, त्याला एकाच काळात असे विलक्षण प्रतिभावान असे चार गोलंदाज मिळाले. १९७५ ते १९९०, सतत १५ वर्षे वेस्टइंडीजचा क्रिकेट मध्ये अभूतपूर्व असा दरारा होता, यात पुढे मार्शल, वॉल्श आणि अँब्रोज मिळाले पण तरीही या चौघांनी जी दहशत पसरवली होती, त्याला दुसरी तोड नव्हती. वास्तविक वेगवान गोलंदाजांची चौकडी, ही कल्पना ऑस्ट्रेलियाची - एकेकाळी लिली, थॉमसन, गिल्मोर, वॉकर यांनी जगावर राज्य गाजवले होते. हीच कल्पना लॉईडने आणि पुढे रिचर्ड्सने आपल्या संघासाठी वापरली. अर्थात प्रत्येक संघाचा दिग्विजयाचा असा काळ असतो. नंतर घसरण होणे क्रमप्राप्तच असते. पुढे वेस्टईंडीजचा संघ कल्पनेबाहेर घसरत गेला. 
आजही ती घसरण थांबायचे लक्षण नाही.

Wednesday, 2 January 2019

जिवलगा, राहिले दूर घर माझे

हुरहुरणारी संध्याकाळ असावी, आसमंतात काळोखी दिसायला लागावी पण तरीही किरणे आपले अस्तित्व क्षीणपणे दर्शवित असावीत. दिवसभराच्या क्लांत श्रमाने मनात विक्लान्त शांतीची आस असावी. हळूहळू आसपासचे वृक्ष आणि त्यांच्या फांद्या,  पसरणाऱ्या काळोखात विरायला लागावेत. मनात कुठेतरी मिलनाची आस असावी पण मिलन होईलच का? या प्रश्नाचा पिंगा घोंगावत असावा. काहीशी द्विधा मनस्थिती झालेली असावी आणि दूरवरून "जिवलगा!! राहिले दूर घर माझे" अशी आर्त, व्याकुळ करणारी पुकार कानी यावी. कानावर आलेल्या सुरांनी लगोलग मनातली हुरहूर अधिक खोल व्हावी. 
हे गाणेच असे आहे, ऐकताना मनाची घालमेल होते, अस्वस्थता वाढते आणि तरीही गाणे संपताना तृप्तीची भावना मनावर पसरते. "श्रीगौरी" सारख्या काहीशा अनवट रागावर आधारित चाल आहे. या गाण्याबाबत असे ऐकायला मिळाले आहे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांकडे त्यांच्या बाबांची - दीनानाथ मंगेशकरांची "हुं जो गयी" अशी मारवाडी भाषिक चीज होती आणि ती चीज, कवियत्री शांताबाई शेळक्यांना ऐकवली. अर्थात शांताबाईंना स्वररचना फार आवडली आणि त्या स्वररचनेवर एखादे भावगीत बसवावे, असा आग्रह धरला गेला. ललित संगीतात बरेचवेळा "आधी शब्द, मग चाल" अशी परंपरागत पद्धत अनुसरली जाते पण काहीवेळा उलट्या पद्धतीने देखील अजरामर गाणी निर्माण होतात आणि हे गाणे अशाच उलट्या पद्धतीने झाले आहे. वास्तविक दोन्ही पद्धतीत तत्वत: काहीही फरक नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिकांच्या दृष्टीने काहीही फरक पडत नाही. रसिकांच्या समोर जेंव्हा गाणे येते तेंव्हा कुठली पद्धत स्वीकारली आहे, याला तसा काहीही अर्थ नसतो. समोर आलेले गाणे, ही वस्तुस्थिती असते. त्यादृष्टीने शांताबाई या खरोखरच सव्यासाची कवियत्री म्हणायला हवे. कारकिर्दीत त्यांनी दोन्ही पद्धतींवर अभूतपूर्व असे प्रभुत्व प्राप्त केले होते. मुळात, त्यांना एक कवियत्री म्हणून शब्दांशी खेळणे, शब्दांचे नेमके वजन ओळखून आपल्या रचनेत अंतर्भाव करणे आणि मुख्य म्हणजे चालीचा "मीटर" कसा आहे, याचे अचूक भान होते, परिणामी त्यांच्या शब्दरचना अतिशय बांधेसूद अशा झाल्या. अर्थात, याला अपवाद म्हणू काही शब्दरचना दाखवता येतील पण मग असे अपवादस्वरूप सगळ्याचा कवी/कवियत्री सप्रमाण दाखवता येतील. 
"जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, 
पाऊल  थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे". 
या अस्ताईच्या ओळी बघूया. दार्शनिक स्वरूपातच असे दिसते, शब्दसंख्या सप्रमाण नाही पण शांताबाईंनी चाल आणि त्याची लय लक्षात घेतली. ललित संगीतातील शब्दरचना कशी बांधीव असणे आवश्यक असते, ते बघा. पहिल्याच ओळीत "रे" अक्षर आहे. वास्तविक या नुसत्या अक्षरातून कसलीच भावना दृग्गोचर होत नाही परंतु इथे "रे" अक्षराची सांगड ही आधीच्या "राहिले" आणि नंतरच्या "दूर" या शब्दांशी घातली आणि लगेच त्या अक्षराला वेगळी जाणीव लाभली. 
चाल अगदी तंतोतंतपणे चीजेवर बांधलेली आहे आणि हे ती मुळातली चीज ऐकली की लगेच ध्यानात येईल. आता इथे एक प्रश्न उद्भवतो. एखादे गाणे तंतोतंतपणे रागदारी चीजेवर बांधले तर त्यात संगीतकाराची सर्जनशीलता दिसते का? वास्तविक गाण्याचा मुखडा हा नेहमी सृजनत्वाचा नमुना म्हणून मानला जातो आणि बहुतेक रचनाकारांचे हेच म्हणणे असते, "गाण्याचा मुखडा बांधण्यात खरे कौशल्य असते, पुढे तर सगळे बांधकामच असते". अर्थात यात थोडा अतिरेक बाजूला ठेवला तरी बऱ्याच प्रमाणात तथ्य आहे, हे मान्यच करायला हवे. असे जर मान्य केले तर मग इथे संगीतकाराची सर्जनशीलता कुठल्या दर्जाची? हा प्रश्न विचारात घ्यावा लागतो पण थोडा वेगळा विचार केला तर पूर्वीपासून अशी पद्धत चालू आहे. मराठी रंगभूमीवर तर पूर्वीपासून, रागदारीतील चीज हाताशी घ्यायची आणि पद्याची चाल बांधायची!! याला डॉ. अशोक रानड्यांनी "Tune Selector" असे नाव दिले आहे. अर्थात रानड्यांनी संगीत रंगभूमीबाबत विधान केले आहे. तेंव्हा सर्जनशीलता अशा एकांगी विचाराने लक्षात घेणे चूक ठरू शकते आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. 
आता रागदारी चीजेवरच आधारित चाल आहे म्हटल्यावर "गायकी"ला आवाहन करणे अत्यावश्यक. आताशा भोसल्यांचा गळा अशा गाण्यांत खुलून येतो. इथे तर जवळपास ६,७ मिनिटांचे सलग गाणे आहे. पारंपरिक अस्थायी-अंतरा आणि  वाद्यमेळ, ही पद्धत इथे त्यागलेली आहे. त्यामुळे पहिल्या सुरांपासून अथकपणे गायन चालते - मध्येच सरगम आहे. काही टीकाकारांनी या सरगमवर टीका केली आहे परंतु गाण्याच्या रंजकतेत ही सरगम भर घालते, हे नक्की. हा विषय फार मोठ्या लेखाचा विषय असल्याने इथेच थांबतो. आशाबाईंनी अतिशय मनापासून हे गाणे गायले आहे, काही हरकती, काही ठिकाणच्या ताना अतिशय गुंतागुंतीच्या असल्या तरी आशाबाईंनी अतिशय स्वच्छ, नितळपणे घेतल्या आणि या गाण्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणून निर्देश करावाच लागेल. 
"किर्र्र बोलते घनवनराई 
सांज सभोती दाटून येई 
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे". 
ध्रुवपदातील संकल्पना, पुढील कडव्यात अधिक विस्ताराने आणि खोल मांडली आहे. दुसऱ्या ओळीत, "सभोती" असा शब्द घेतला आहे, वास्तविक प्रचलित शब्द "सभोवती" असा आहे पण एक अक्षर अधिक वाढले तर लयीचा गोंधळ उडू शकतो. ललित संगीतात, काव्यरचना करताना हे असे भान ठेवावेच लागते. दुसरा विशेष असा आहे - "किर्र्र" हा शब्द सरळ  अवघड आहे परंतु आशाबाईंचे कौतुक असे, त्यांनी हाच शब्द सुरांतून घेताना, "त्याच" वजनाने घेतला आहे. एखादा गद्य, रोखठोक शब्द त्याच अंगाने स्वरांतून घेणे, हे सहजशक्य नसते. गळ्यावर तुमचा तितकाच ताबा असणे आवश्यक असते. हा शब्द गाताना,  किंचित उंचावलेला स्वर पण "र" चे जोडाक्षर घेऊन, कवियत्रीने निर्देशिलेली भावना त्याच तोलामोलाने घेणे, हे फार अवघड असते. 
मुळात, ललित संगीतात इतकी मोठी स्वररचना अभावानेच ऐकायला मिळते. ललित संगीताचे रसिक देखील, गाणे ३,४ मिनिटांत आटोपले पाहिजे, याच विचाराचे असतात. या गाण्यात तंबोरा (पार्श्वभागी सतत वाजत आहे) आणि सुरवातीला स्वरमंडळ वगळल्यास, फक्त तबला (तालवाद्य म्हणून) साथीला आहे. परंतु गंमत सगळी गाण्याच्या चालीत, चालीच्या मांडणीत आणि गायनात आहे आणि तिथेच गाण्याचे अवघडलेपण देखील आहे. 
आता इतक्या अप्रतिम गाण्यात काहीच कमतरता नाही का? रचना संपूर्ण निर्दोष आहे का? तसे नक्कीच नाही. गाण्यात २,३ वेळा "जिवलगा" हा शब्द "जिव" "लगा" असा तोडलेला आहे. लय तशी आहे, असे एक कारण देता येईल पण शब्दानुरूप लयीला वळवून घेता येऊ शकते. आणखी एक, "वनवासी" शब्द घेताना "वन" आणि "वासी" मध्ये अकारण हरकत घेतली आहे. तशी हरकत आवश्यक आहे का? हा प्रश्न मनात येतो. हा प्रश्न येतो कारण ही शब्दप्रधान गायकी आहे अन्यथा ही स्वररचना निव्वळ अतुलनीय अशीच आहे. 

Saturday, 22 December 2018

तोच चंद्रमा नभात

मराठीतील काही अजरामर भावगीते बाजूला काढली तर त्यात " तोच चंद्रमा नभात " या गीताचा नक्की समावेश होईल. आज जवळपास ५० वर्षे उलटून गेली तरीही मराठी रसिक मनावर हे गाणे राज्य करीत आहे. चालीचा  गोडवा,इतपतच या गाण्याच्या लोकप्रियतेची  संभावना करणे योग्य नाही. त्यापलीकडे या गाण्यात असे काय दडले आहे, याचाच शोध आपण इथे घेणार आहोत. अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास, एखादे गाणे का लोकप्रिय होते याची परखड समीक्षा होणे जवळपास अशक्य. अशी अनेक गाणी सापडतात जी खऱ्याअर्थाने अप्रतिम असतात पण लोकप्रियता जराही मिळत नाही तर काही गाणी अत्यंत टुकार असतात पण तरीही लोकप्रियता मिळते - अर्थात इथे चांगली गाणी आणि वाईट गाणी याबाबत मतभेद संभवतात. 
कवियत्री शांताबाई शेळक्यांची कविता आहे, रचनेच्या अंगाने बघितल्यास, गझलेचे अंग आढळते परंतु गझल नाही. खरतर ही कविता म्हणजे अप्रतिम "भावकविता" असे म्हणता येईल. कुठल्याही कवितेतील कुठलाही शब्द हा इतका अचूक आणि नेमका असावा की त्यातील अक्षर/शब्द वगळले किंवा दुसऱ्या शब्दाने मांडायचा प्रयत्न केला तर त्या कवितेचा सगळा डोल, डौल, घाट आणि रचनाच विसविशीत होऊन जाईल. 
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी 
एकांती मज समीप तीच तुही कामिनी. 

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे 
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे 
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी 

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे? 
मीही तोच; तीच तुही; प्रीती आज ती कुठे? 
ती न आर्तता सुरांत, स्वप्न ते न लोचनी 

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा 
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतूनी 

"चैत्रयामिनी" (जरी शब्द संस्कृत भाषिक असला तरी) शब्दाला "कामिनी" हाच शब्द योग्य आहे आणि अशी अपरिहार्यता कवितेच्या घडणीत असणे जरुरीचे आहे. तसेच "नीरवता" शब्दाची सांगड "चांदणे" या शब्दाशी लावणे, हे सुंदर अननुभूत सौंदर्य आहे. थोडा विचार केला तर प्रस्तुत रचना ही संस्कृत साहित्यावर आधारित आहे परंतु संस्कृत भाषा ही आपली भाषा आहे तेंव्हा त्या भाषेतून "उचलेगिरी" केली तरी त्यात काहीही चूक नाही!! खुद्द शांताबाई शेळक्यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे, त्या या क्षेत्रात प्रस्थापित झाल्या परंतु असे देखील म्हणता येईल, या आणि अशा गाण्यांमुळे, त्यांचे नाव "गीतकार" म्हणून आकारास आले, जरी त्या खऱ्याअर्थी "कवियत्री" होत्या. आपल्याकडील काही खुळचट मानदंडामुळे काही कवींवर आपण नेहमीच अन्याय करीत आलो आहोत. 
या गाण्याची चाल आणि गायन हे सुधीर फडक्यांनी केले असून, या दोघांचे स्वतंत्र विचार करणे आवश्यक आहे, इतक्या तोलामोलाचा आविष्कार आहे. सुधीर फडक्यांची सुरवातीची गायकी न्याहाळली तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, गायनावर असणारा बालगंधर्वांचा दाट परिणाम!! पुढे हा परिणाम विलयाला गेला, हे फारच चांगले झाले. एक बाब ठामपणे सांगता येते, अगदी पहिल्यापासून, ललित संगीत म्हणजे काय? याविषयीची धारणा अगदी पक्की होती. आपल्याला अभिप्रेत संगीताशय कसा मांडायचा याविषयी, सुधीर फडके अगदी नि:शंक होते. काय सांगायचे आणि कसे सांगायचे, यात कधीही चाचपडलेपणाची भावना कधीही आढळली नाही. आणि बहुदा याच जाणिवेतून त्यांची गायकी हा ललित संगीतातील "मानदंड" म्हणून प्रस्थापित झाला. याचाच दुसरा भाग म्हणजे ध्वनिमुद्रण असो किंवा समोरच्याला साथसंगतीशिवाय  काहीतरी गुणगुणणे असो, गायनात तात्पुरतेपणा किंवा उरकून टाकणे, असे कधीही झाले नाही. गायनात एकप्रकारची शिस्त आली. आपल्या श्रोत्यांना आपण काय पोहोचवायचे आहे, याबाबत ठाम धारणा होती. गायनात एकामागोमाग एक व एका वेळेस एक स्वर घेणे म्हणजे संगीताविष्कारार्थ स्वरसंहती हे तत्व सांभाळणे होय. याची नेमकी प्रचिती गायनात कायम मिळत राहिली. आवाज फार बारीक अथवा जाड असा नव्हता पण लगाव काहीसा नाजूक होता (प्रसंगी या वैशिष्ट्याला छेद देणारी गायकी, विशेषतः: गीत रामायणातील गाणी सादर करताना) पट्टी जरी काहीशी उंच असली तरी तिथे मध्यममार्गच होता. आवाज सहजपणे हलका होत असे पण तरीही त्यात अस्थिरता नसायची. या गीताचे "गायन" म्हणून आस्वाद घेताना या बाबी प्रकर्षाने ध्यानात येतात. 
यमन रागात गाण्याची स्वररचना बांधली गेली आहे. काही राग हे काही संगीतकारांच्या खास आवडीचे असतात आणि त्याबाबत विचार करता, सुधीर फडक्यांचा राग यमन, हा खास आवडीचा राग होता, हे प्रकर्षाने लक्षात येते. फडक्यांच्या रचना "गीतधर्मी" आहेत, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालण्याच्या ब्रीदास ते जगतात पण शिवाय भारतीय वाद्यांचा स्वरधर्म ओळखून त्यांचा वापर करायचा. कवितेच्या चरणाचा पायाभूत अभ्यास करून, त्याच्या भोवतीच वाद्यमेळाची रचना करायची.या आग्रहामुळे काव्याचा अर्थच नव्हे तर आशय देखील ऐकणाऱ्याच्या मनात सावकाश दाटपणे उतरत जातो. चाल बांधताना, शक्यतो खालचे किंवा मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवायचा. आता असे देखील विधान करता येईल, आपला "गळा" काय प्रतीचे गायन करू शकतो, याची अत्यंत वाजवी जाणीव या संगीतकाराला असल्याने, स्वतः:साठी स्वररचना करताना, त्यांनी म्हटले तर एक "मर्यादा" आखून घेतल्याचे समजून घेता येते. गायनावर सुरवातीच्या काळात, "बालगंधर्व" शैलीचा प्रभाव होता परंतु नंतर तो प्रभाव विलयाला गेला आणि हे मराठी ललित संगीताच्या दृष्टीने उपकारकच ठरले. गाताना, कवीच्या शब्दांना प्राधान्य द्यावयाचे, या पंथाचा हा कलाकार असल्याने, गायन करताना, ऋजुता आणि साम्यभाव, ही खास प्रधान अंगे राहिली आणि या गाण्यातून याचेच दर्शन आपल्याला घडते. प्रस्तुत गाणे ऐकताना, आणखी काही विशेष ध्यानात येतात. 
प्रसंगी आवाजात काहीशी नाट्यमयता आणणे हा देखील एक विशेष म्हणता येईल. किंबहुना, त्यांच्या गायनाचे एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल परंतु नाट्यमयता किती असावी, या बाबत ठाम आडाखे होते. गायनातील नाट्यमयता त्यांनी कधीही शब्दांवर स्वर होऊ दिली नाही. किंबहुना, गायन आणि स्वररचना तयार करताना, सुधीर फडक्यांनी कवीचे शब्द हे नेहमीच प्रमाण मानले. शक्यतो "यतिभंग" होऊ द्यायचा नाही, अशीच बहुदा प्राज्ञा केली असावी, असा संशय घेण्याइतपत  त्यांनी कवितेतील शब्दांना महत्व दिले. 

"त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा,
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा" 

या ओळी उद्मेखून ऐकाव्या. शब्दांतील व्याकुळता आणि आर्जव, सुरांतून कसे व्यक्त करावे, याचा एक सुंदर मानदंड आपल्या गायनातून, सुधीर फडक्यांनी निर्माण केला. मला वाटते, आता पर्यंत आपण बऱ्याच मुद्द्यांचा परामर्श घेतला आणि प्रस्तुत गाण्याची लोकप्रियता जोखण्याची प्रयत्न केला. बहुदा याच कारणांमुळे हे गाणे आजही रसिकांच्या पसंतीस उतरले असणार. 

https://www.youtube.com/watch?v=gL280CYOGdI