Sunday, 11 November 2018

कवियत्री शांताबाई शेळके

कवियत्री शांताबाई शेळके यांचा स्वतंत्रपणे विचार करायला बसल्यावर सहजपणे मनात त्यांच्या विविध ढंगाच्या शब्दरचना, छंदोबद्ध कवितेपासून पुढे मुक्तछंदापर्यंत झालेला प्रवास, चित्रपटासाठी लिहिलेली गाणी तसेच मराठी खासगी भावगीते असा फार मोठा व्यापक असा पट नजरेसमोर येतो. शांताबाईंची सुरवात अर्थातच त्या काळाला अनुसरून अशा छंदोबद्ध कवितांनी झाली. शांताबाईंचे कलात्मक व्यक्तिमत्व हे बहुपेडी होते म्हणजे केवळ कवियत्री नसून, व्यक्तिचित्रे, ललित आणि अनुवाद लेखन प्रकारचे गद्य लेखन देखील त्यांनी आयुष्यभर केले - प्रसंगी अर्थार्जनासाठी विद्यार्थ्यांसाठी गाइडे लिहिली पण त्याचा उल्लेख कुठेही फारसा होत नाही कारण खुद्द शांताबाईंचेच म्हणणे असे होते, गाइडे लिहिणे, हा निरुपाय होता आणि त्यात सर्जनशीलता कुठेही नव्हती. कलावंत म्हणून तशा लेखनाला कसलाही दर्जा नव्हता. याचेच वेगळा अर्थ असा लावता येतो, सृजनक्षम लेखन आणि व्यावसायिक लेखन, यांच्याबद्दल त्यांच्या काही ठाम कल्पना होत्या आणि त्या कल्पना त्यांनी शेवटपर्यंत आपल्या मनाशी बाळगल्या. अर्थात इथे मी शांताबाईंच्या कविता, इतकाच भाग अभ्यासाला घेणार आहे आणि जर का जरा बारकाईने बघितले तर शांताबाईंना "कवियत्री" हे विशेषनाम नेहमीच आवडते होते जरी त्यांनी गद्य लेखन केलेले असले तरी  प्रामुख्याने त्याचन्ह उल्लेख हा "कवियत्री" असाच होतो.  आता आपण इथे त्यासारख्या "कविता" या अंगाने विचार करणार आहोत. मी "कविता" असे म्हटले कारण शांताबाई - गीतकार म्हणून बहुतेकांना अधिक ज्ञात आहेत. गीतकार म्हणून त्यांचा मी वेगळा विचार करणार आहे. 
सुरवातीलाच मी त्यांची "कविता" हीच कविता विचारात घेत आहे. 

"शेवटची ओळ लिहिली 
आणि तो दूर झाला 
आपल्या कवितेपासून 
बराचसा थकलेला 
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा 
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतिणीसारखा 
जरा प्रसन्न, जरा शांत 
नाही खंत, नाही भ्रांत.... 

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी 
आधाराचे बोट सुटलेल्या 
अजाण पोरासारखी 
भांबावलेली, भयभीत, 
अनुभवणारी, एका उत्कट नात्याची 
परिणती विपरीत 

ती आहे आता पडलेली 
कागदाच्या उजाड माळावर 
आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधत 
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!! 

मुक्तछंदातली रचना आहे आणि सुरवातीच्या ओळी वाचताना याचा आशयाशी संबंधित परंतु संपूर्ण वेगळ्या घाटाची आणि पुढे आशय वेगळा व्यक्त करणारी आरतीप्रभुंची "मी माझ्या कवितेकडे पाहतो, एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे" या कवितेची आठवण येऊ शकते. मुक्तछंदात उत्तम भावकविता कशी मांडता येते, याचे ही कविता म्हणजे सुंदर उदाहरण आहे. आता "भावकविता" कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. 
शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. 
आता वरील कविता या विवेचनाच्या संदर्भात कुठे बसते? हा प्रश्न इथे उद्भवतो. आपण जरी सगळे कविता लिहीत नसलो तरी कधीना कधीतरी कवितेचा आस्वाद घेतच असतो. सर्वसाधारणपणे कविता वाचताना आपल्याला भावतात त्या प्रतिमा आणि प्रतिमांमधून व्यक्त होणारा आशय, जो कवितेला "जिवंतपणा" प्राप्त करून देतो. कवितेचे बीज मनात पडणे - या घटनेपासून कविता कागदावर उतरवणे,  या प्रक्रियेपर्यंतचा प्रवास हा कधीही नेमकेपणे मांडता येत नाही. 

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी 
आधाराचे बोट सुटलेल्या 
अजाण पोरासारखी 

इथेच कवितेचा खरा प्रवास दिसतो. एकदा का कागदावर लिहिली गेली की त्या कवितेची नाळ कर्त्यापासून तुटते आणि स्वतंत्र अस्तित्व धारण करते. फार पूर्वी तुकारामांनी - "म्या काय बोलिले, बोलाविले ते विश्वंभरा" असे जे म्हटले आहे, यातील जाणीव आणि शांताबाईंनी मांडलेली जाणीव यात तत्वदृष्ट्या काहीही फरक नाही तरीही  घाट आणि मांडणी यात फरक पडला जातो. आता या कवितेत कुठलाच शब्द गूढ, दुर्बोध नाही, सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत पण तरीही वाचताना, आपण अंतर्मुख होतो आणि कवित्वाशी तादात्म्य पावतो. हे जे तादात्म्य पावणे आहे, इथेच खरी भावकविता जन्माला येते. आता बघा, एक कल्पना मनात आली आणि तिला काव्यरूप दिले आणि नंतर परत वाचताना तीच कविता आपल्यापासून दूर गेल्याची भावना होते आणि थोडे त्रयस्थ स्वरूप प्राप्त होते. वेगळया शब्दात, अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीत स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.भावकविता म्हणून वरील कविता आपल्याला एक वेगळाच साक्षात्कार दाखवते आणि आपल्या जाणिवा अधिक अंतर्मुख करते. 
आता आपण शांताबाईंची "गीतकार" म्हणून प्रसिद्ध पावलेली एक कविता घेऊया. खरतर "गीतकार" म्हणून वेगळी श्रेणी निर्माण करणे, हाच एक अत्यंत चुकीचा मानदंड आहे. खोलात जाऊन विचार केल्यास, "कवी" आणि "गीतकार" यात काय फरक आहे? काहीही नाही तरीही आपल्याकडे "गीतकार" म्हणून वेगळी पायरी निर्माण केली आहे. 

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी 
एकांती मज समीप तीच तुही कामिनी. 

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे 
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे 
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी 

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे? 
मीही तोच; तीच तुही; प्रीती आज ती कुठे? 
ती न आर्तता सुरांत, स्वप्न ते न लोचनी 

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा 
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा 
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतूनी 

एखादी कविता स्वरांच्या साहाय्याने ऐकायला मिळाली की खरतर सुरांचा परिणाम हा नेहमीच दाट होतो आणि कवितेचा स्वतंत्र अससी अभ्यास करणे अशक्य होते. अशावेळी ते गाणे, कवितेच्या स्वरूपात कागदावर मांडून वाचन करणे योग्य वाटते. सूर नेहमीच आपल्यावर गारुड घालतात परंतु जर का संगीतकाराला स्वतंत्र, गेयताबद्ध, आशयपूर्ण कविता मिळाली तर चाल बांधायला हुरूप मिळतो आणि असे मत अनेक रचनाकारांनी नोंदवून ठेवले आहे. आत या पार्श्वभूमीवर वरील कविता वाचताना, सर्वात प्रथम कवितेत दडलेले गझल वृत्ताचे वजन जाणवते. मी "जाणवते" हा शब्द मुद्दामून वापरला आहे कारण गझल वृत्त आणि ही कविता, या भिन्न रचना आहेत. भावाकवितेत एक बाब निश्चित असावीच लागते आणि ती म्हणजे शब्दांची अपरिहार्यता!! कवितेतील प्रत्येक शब्दच नव्हे तर उद्गारवाचक चिन्हे, टिम्ब इत्यादी चिन्हांना देखील तितकेच महत्वाचे स्थान असते आणि त्यातूनच कवितेचा आशय विस्तारत असतो. 
प्रस्तुत कवितेत पहिल्याच कडव्यात रात्र आणि जाईचा कुंज हे संदर्भ घेऊन, ध्रुवपदातील जाणीव अधिक खोलपणे अधोरेखित केली आहे. नीरव शांततेतील रात्र आणि जवळच असलेला जाईचा कुंज, यातून विरहाची भावना मांडली गेली आहे. खरतर ही संस्कृत काव्यातील प्रतिमा परंतु तोच संदर्भ शांताबाईंनी या कवितेत 
नेमकेपणाने आणला. आपल्याकडे आजही कवितेत संस्कृत संस्कृतीचा दाखला वाचायला मिळतो आणि त्यात तत्वत्त: काहीही चुकीचे नाही.  दुसरा अंतरा वाचताना, "धुंदी", "प्रीती" या शब्दातून व्याकुळता दाखवली गेली आहे. आता अशी व्याकुळता अधिक परीणामकारक होण्यासाठी मग सांगीतिक संकल्पनांचा आधार घेणे क्रमप्राप्तच ठरते आणि मग शेवट करताना "आर्तता सुरांत" असे शब्द येणे, हे अपरिहार्य होते. ही जी अपरिहार्यता आहे, इथे भावकविता सिद्ध होते. तिथे मग दुसरा कुठलाच शब्द साजून दिसणार नाही. असे फार कमी वेळा घडते पण घडते आणि तसे घडायलाच हवे कारण त्यामुळेच कवितेची बांधणी अधिक सशक्त, घोटीव आणि बांधीव होते. 
खरतर शांताबाईंच्या अशा अनेक कविता आहेत ज्या कविता या पातळीवर स्वतंत्रपणे आस्वादाव्या लागतील. जिवंत कविता आपल्यासमोर अशी आव्हाने फेकत असते आणि अशाच कवितेतून नादाची, आशयाची घाटाची अनंत चित्रे उभी राहतात आणि प्रत्येकवेळी ती कविता एक नवनिर्मितीचा आनंद मिळवून देते. आता थोडे मूल्यमापन. मराठी कवितेतील दीर्घ अशी परंपरा आहे आणि या परंपरेत शांताबाई कुठे बसतात? हा प्रश्न आवर्जूनपणे समोर येतो. आता तुलनात्मक बोलायचे झाल्यास, शांताबाईंच्या कवितेत आरतीप्रभूंच्या कवितेत आढळणारी व्याकुळता दीर्घ काळ आढळत नाही, ग्रेसच्या कवितेतील व्यामिश्रता आणि बौद्धिकता सापडत नाही तर नामदेव ढसाळांप्रमाणे चिघळणारी सामाजिक दु:खे वाचायला मिळत नाहीत त्याचप्रमाणे बोरकर, पाडगावकरांच्या कवितेत जसा रोमँटिक स्वानंद बघायला मिळतो तितके खोलवर चित्रण आढळत नाही. परंतु असे सगळे नाकारून देखील पुन्हा कवी म्हणून शांताबाई स्वतंत्रपणे आपली नाममुद्रा ठसठशीतपणे दर्शवतात. त्यांच्या कवितेतील आवाज एखाद्या रुणझुणत्या पैंजणाप्रमाणे झुळकतात आणि त्या नादमयतेत आपल्याला घेऊन जातात. हे काहीसे भा.रा.तांब्यांच्या  कवितेसारखे झाले.  शांताबाईंची कविता राजस आहे, निर्मितीक्षम खुणा दाखवणारी आहे. इथले दु:ख चिरंतनाच्या वाटेवरील दिशा दाखवणारे आहे पण दु:खाच्या खाईत उतरून तळ दाखवणारे नाही. अशा काही मर्यादा दाखवता येतील पण तरीही मराठी कवितेत आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. 

Sunday, 4 November 2018

कविता - आस्वादकता आणि दुर्बोधता

लिखाण माध्यमातील सर्वात सशक्त आणि तरीही अल्पाक्षरत्व असे स्वरूप फक्त "कविता" लेखन, याच माध्यमाला मिळते आणि हे कुणालाही पटू शकेल. याचाच पुढील विचार म्हणजे कविता आणि तिचा आस्वाद. आपल्या काव्याला रसिकाने दाद द्यावी ही कवीची अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूने, दाद देण्यासारखे त्या कवितेत काहीतरी असावे, ही रसिकाची अपेक्षा. वास्तविक हा देवघेवीचा खेळ दोन्ही बाजूने रंजकतेने खेळाला आजू शकतो आणि काही वेळा खेळला देखील जातो. याबाबत आणखी वेगळे म्हणायचे झाल्यास, आपल्या कवितेतील कुठल्या गोष्टीला रसिकाने महत्व द्यावे याबद्दल कवीच्या काही पूर्वकल्पना असतात. आणि रसिकांबाबत लिहायचे झाल्यास, आपल्याला वाचत असलेल्या कवितेतून काय मिळवायचे आहे, या बाबत असलेली धारणा. परंतु याबाबतची निरपेक्ष वृत्ती ही सदासर्व काळ परस्परांशी जवळीक करणारी असावी ही ही अपेक्षा मात्र प्रत्येकवेळेस पूर्ततेच्या पातळीवर पोहोचू शकत नाही. त्यादृष्टीने पूर्तता ही एक तार्किक शक्यता असते, हे म्हणावेच लागते. ज्याला वस्तुस्थितीची दाखल घ्यायची आहे त्याला अपेक्षा ही मूलभूत अडचण म्हणून टाळता येणार नाही. फार तर "अपेक्षांतर" कमी-जास्त प्रमाणात ठरवता येते. अर्थात असे अपेक्षांतर पूर्णपणे टाळता येणे किंवा पूर्ण करणे, ही सर्वस्वी अशक्य कोटीतील बाब आहे. करावी आणि रसिक यांच्यातील संवादाचे साधन म्हणजे "भाषा". सृजनशील कलाकृतीतील भाषा ही रोजच्या व्यवहारातील भाषेपेक्षा सर्वस्वी भिन्न असते परंतु रोजच्या व्यवहारात अस्फुटपणे जाणवणारी भाषेची सुप्त शक्ती एखादा समर्थ कवी सर्वंकषपणे वापरू शकतो, त्यामुळे मुलत:गतिरूप असलेली भाषा कवीच्या अभिव्यक्तीत अधिक प्रभावी आणि अधिक संमिश्र बनण्याची मोठी शक्यता असते. एखाद्या शब्दाचा एका विशेषतः कवितेतील अर्थ हा १) त्या शब्दाचा रूढ अर्थ, २) कवीच्या विशेषतः हेतूमुळे प्राप्त झालेला अर्थ, ३) कवितेच्या घाटाने संस्कारित झालेला अर्थ , ४) शब्दांचा कल्पित ध्वनीरूपाने जाणवणारा अर्थ, ५) कागदावरील दृश्य स्वरूपाने जाणवणारा अर्थ, ६) कवितेतील इतर शब्दांच्या साहचर्याने जाणवणारा अर्थ, ७) विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीतून उद्भवणारा अर्थ, ८) रसिकांच्या विशिष्ट हेतूंमुळे प्रतीत होणारा अर्थ (इथे बरेचवेळा गफलत होऊ शकते आणि तशी होते देखील)  आणि ९) शब्दांच्या आशयात, भविष्यात होणार संभाव्य बदल. इतक्या आणि अशा आणखी अनेक विविध ताणांनी कवितेचा अर्थ प्रभावित होऊ शकतो. एक नक्की, भाषेचा अंतिम अर्थ कुणालाही, कधी निश्चित करता आलेला नाही तेंव्हा संपूर्ण निरपेक्ष वृत्तीची असंभाव्यता आणि भाषेच्या साधनाने संपूर्णपणे निश्चयात्मक असा अर्ह सूचित होण्याची अशक्यता, या दोन्ही गोष्टी जमला धरूनच आपल्याला कवी आणि रसिक यांच्या संवादातील इतर अडचणी समजून घ्याव्या लागतील. 
दुर्बोधतेच्या संदर्भात पुढे जायचे झाल्यास, ज्या वेळी विचार, भावना आणि संवेदना एकात्म जाणिवेमध्ये अंतर्भूत असतात त्यावेळी त्याचे संपूर्ण अस्तित्व नाहीसे झालेले असते. अमुक एक अर्थ दुय्यम मानल्यामुळेकिंवा टाळल्यामुळे आजकालचे आधुनिक काव्य फार दुर्बोध आहे असे म्हणण्याचा एक मतप्रवाह दिसतो. त्याशिवाय कवितेचा रसिक, मग तो जुना असो किंवा नवीन असो, काव्याकडून तार्किक संगतीची आणि वस्तुदर्शक अर्थाची अपेक्षा करतो, म्हणून कविता दुर्बोध वाटते, असे समाजानेच काहीसे एकांगी विवेचन ठरेल. उदाहरणच द्यायचे झाल्यास, बालकवींची "औदुंबर" ही कविता दुर्बोध वाटू शकते. संपूर्ण जाणिवेचे एकात्मीकरण साधण्याच्या प्रयत्नातून निर्मिलेली संमिश्रता किंवा आनुषंगिक दुर्बोधता सर्वसाधारण रसिकाला जाणवत नाही. याबाबत वेगळे मांडायचे झाल्यास, उत्कट संवेदना, उत्कट भावना अथवा विचार याचन्हे अस्तित्व स्वतंत्रपणे जाणवू शकेल अशा घटकांना परस्परानुजीवी करणाऱ्या कविता रसिकांना सर्वसाधारणपणे दुर्बोध वाटत नाहीत. या सर्व घटकांचे सामिलीकरां झाले आणि त्यामुळे अभिव्यक्तीचे वेगवेगळे घाट निर्माण होऊ लागले की मग हळूहळू निर्मिलेली कविता काही प्रमाणात दुर्बोध व्हायला लागते. 
आता मराठी कवितेच्या संदर्भातील दुर्बोधतेचा प्रश्न हा गेल्या शतकात प्रामुख्याने चर्चेला आणि त्या अनुषंगाने बोलायचे नवनवीन वादांना निमंत्रण देणारा ठरला. नवकाव्यपूर्व दुर्बोधता, नवकाव्यातील दुर्बोधता आणि नवकाव्योत्तर दुर्बोधता, असे ढोबळपणे ३ कालखंड पाडता येतील. यात, पहिली अवस्था ही केशवसुतांच्या संदर्भात विचारात घ्यायला हवी. "झपुर्झा" किंवा कवी बींची "चाफा" या संदर्भाने सूचित होऊ शकेल तर दुसरी अवस्था मर्ढेकरांच्या "पिपात मेले उंदीर" ही उदाहरणादाखल घेता येईल आमी तिसरी अवस्था, अरुण कोलटकरांच्या "घोडा" कवितेतून मिळू शकते. काव्यात्म दुर्बोधतेच्या या तीन अवस्थांना एकत्र बांधणारे सूत्र, जाणिवेचे अधिकाधिक एकात्मीकरण हेच असेल. यात एक गंमत आहे, केशवसुतांच्या किंवा कवी बी, यांच्या कविता या कविताच नव्हेत, अशी काही टीका वाचण्यात आलेली नाही. याचाच वेगळा अर्थ, रसिकांच्या पूर्वनिश्चित काव्यकल्पनेतील महत्वाच्या घटकांचे अस्तित्व त्या रसिकांना या कवितेत जाणवत होते. या कवींच्या भावानुभवाबद्दल आणि त्याच्या काव्यात्मका बद्दल कुठेही,, कसलाच संशय व्यक्त केला गेला नाही. परंतु त्या भावानुभवातून जे विचार प्रगट होत होते, त्याबाबत ठाम निश्चितता निर्माण करणे अवघड होत होते. मर्ढेकरांच्या बाबत म्हणायचे झाल्यास, त्यांचे  भावानुभव आणि त्यात अंतर्भूत असलेले विचार आणि त्याचे एकूणच सादरीकरण हे काव्यात्म मानायचे का? हाच  प्रश्न मराठीत नव्याने उद्भवला होता. अरुण कोलटकरांचा "घोडा" प्रसिद्ध झाला आणि आजच्या "निरवयवी" कवितेची सुरवात झाली!! यात मुख्य् मेख अशी होती, प्रतिमांचे भावनासापेक्ष किंवा विचारसापेक्ष विश्लेषण करणे अवघड झाले होते आणि म्हणूनच सगळे शब्द कळूनही सगळी कविता दुर्बोध वाटायला लागली. एकात्मीकरणाच्या या वाटचालीत दुर्बोधतेची तिसरी अवस्था अटळ होती, असे देखील विधान आपण करू शकतो. 
कवी आणि रसिक यांच्यामध्ये काव्यात्म दुर्बोधता, ही एकमेव अडचण होती.परंतु इथे मराठीतील टीकाकार काहीसे कमी पडले का? हा प्रश्न इथे उद्भवू शकतो. विशेषतः: ज्या कालखंडात काव्याच्या विकासाचा आणि रसिकांच्या अभिरुचीचा वेग, यात तफावत पडायला लागली, असे म्हणता येते. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे काव्याच्या विकासात व्यक्तिगत प्रतिभेला केंद्रीय स्थान मिळणे तर अभिरुचीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, सामाजिक संस्कृतीला महत्वाचे स्थान असते आणि खरी तफावत इथे पडते. काव्य हे नेहमीच संस्कृतीचे प्रारूप घेऊन अवतारात असते आणि जर का संस्कृती काळाचे बदल स्वीकारण्यात कमतरता दाखवत असेल तर मग दुर्बोधता निर्माण होणे शक्य होय आणि इथेच टीकाकार अवतरतात. कवितेचं विकास हा अभिरुचीच्या विकासापेक्षा अधिक गतिशील आणि अधिक अतर्क्य राहिला पाहिजे आणि त्यामुळेच पडणारे अंतर अपरिहार्य असले तरी संवाद अशक्य व्हावा, असे  न घडण्याची जबाबदारी टीकाकारांची!! टीकाकाराने असलेली दुर्बोधता सुबोध करण्यामागे न पडता दुर्बोधतेचे नेमके स्वरूप काय आहे? हे समजावून सांगितले  तरी पुष्कळ काही कमावले, असे म्हणायला वाव आहे. मघाशी मी " घोडा" या कवितेचा उल्लेख केला त्या संदर्भात लिहायचे झाल्यास, भाषेची विघटनात्मक मूलप्रकृती संपूर्णपणे मिटवून संबंध कविता म्हणजेच एक शब्द बनविणे, ही त्या कवितेमागील प्रमुख प्रेरणा दिसते. अशा कवितेतून, कवितेची पिंजण करून त्यातून एखादे जीवनदर्शक सूत्र वगैरे काढण्यात फारसे हशील नाही. मुळात कविता ही भोगायची असते, हे कवी विं.दा.करंदीकरांचे प्रसिद्ध विधान इथे चपखलपणे लागू पडते  तेंव्हा या आणि अशा कवितेसाठी भिडण्यासाठी प्रथम मराठी टीकेला बदलावे लागेल, पारंपरिक विचारांचे साचे मोडून नवीन साचे करणे अधिक योग्य!! त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल, काव्यात दुर्बोधता कमी आणि टीकाकार जास्त. 
कविता आस्वाद प्रक्रियेत वरील मुद्दे फार महत्वाचे आहेत. बरेचवेळा आपण कविता वाचीत असतो आणि त्याचा मनाशी अर्थ लावीत उपभोगीत असतो  कविता सर्वसाधारणपणे अशीच आत्मसात केली जाते आणि रक्तात मुरवली जाते. आस्वादन प्रक्रियेचा मागोवा घेताना आपण सरधोपटपणे एक शब्द, त्या पुढील शब्द असा नातेसंबंध जोडत जातो परंतु काहीवेळा कवितेत असा संबंध निर्माण न होता, निरनिराळ्या प्रतिमा, प्रतीकांच्या साहाय्याने बांधणी करीत शेवटी आशयाची अभिवृद्धी साधली जाते. अशा वेळेस बहुतेकवेळा आपण आपली सहनशीलता मध्येच सोडतो आणि निष्कारण कवितेला दुर्बोधतेचे लेबल लावतो आणि कवितेच्या अभिसरणाचे सगळेच मार्ग खुंटवून टाकतो. एकापरीने आपण त्या कलाकृतीवर अन्याय करीत असतो. कविता ही ठराविक पायऱ्यापायरीनेच समजून घेणे हा जो पारंपरिक संस्कार झालेला आहे, तो अशा कवितेच्या आस्वादक प्रक्रियेला फार घातक आहे. कविता सहज समजली पाहिजे, गाण्याची चाल सोपी असायला हवी, कथाविष्कार डोक्याला त्रास देणारा नसावा, इत्यादी मागण्या नेहमीच निर्मितीच्या प्रगतीला मारक असतात. म्हणूनच मी वर म्हटले त्याप्रमाणे समाज आणि सांस्कृतिक बदल कधीही सहज प्रक्रियेने घडत नसतात. त्यातून कलाविष्कार बदल हा नेहमीच शेवटच्या पायरीवर येत असतो. यातूनच साचलेपण साचत जाते आणि एकूणच गढूळ वातावरण निर्माण होते. मुळात कवितेत रस घेणारे रसिक हे तसे संख्येने कमीच असतात त्यातून स्वागतशील प्रवृत्तीचे रसिक नेहमीच तुरळकच असतात. जसे कलेत प्रयोगशील जरुरीचे असते त्याच चालीवर बोलायचे झाल्यास, आस्वाद आणि आस्वाद प्रक्रिया ही नेहमीच परिवर्तनशील असणे फार जरुरीचे आहे. अर्थात या प्रक्रिया नेहमीच हळूहळू घडत असतात आणि त्या तशाच घडायला हव्यात अन्यथा कुठलेही बदल सर्वार्थाने स्वीकारणे अशक्य होऊन बसते आणि प्रगती थांबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कुठलाही आस्वाद हा आधी आपल्या मनाशी नंतर रक्तात मुरावा लागतो त्याशिवाय कलाकृतीचे समग्र आकलन अशक्य. 

Tuesday, 30 October 2018

यशवंत देव

१९८० मधील दिवस असतील, नवीन मते नव्याने फुटण्याचे दिवस होते, तरुण होतो आणि त्यामुळे "माझे मत" याविषयी काहीशी घमेंड, आत्मविश्वास वगैरे गुण चिकटले होते. काही काळ तबला शिकण्यात घालवला होता, त्यामुळे संगीताविषयी समज (अजूनही खरेतर अपसमज जास्त) नको तितकी वाढीव होती. आपल्याला संगीतातील बरेचकाही कळते, समजले आहे अशी आत्मप्रौढी देखील भरपूर होती ( हे सगळे आज लिहिताना आठवत आहे) आणि त्याच धुंदीत असताना, मी एकदा सहज म्हणून "ललित संगीत" या विषयावर काहीसे गंभीर असे लिहिले होते. "शब्दप्रधान गायकी" नावाचे पुस्तक उपलब्ध आहे, हे माझ्या गावी देखील नव्हते. त्यावेळी मी नेहमीच काहीही लिहून ठेवले की माझ्या फाईलमध्ये ठेऊन देत असे, फारतर आई, वडिलांना वाचायला द्यायचे, इतपतच शिरस्ता होता. खरतर मित्रांमध्ये माझे संगीतवेड हा प्रचंड चेष्टेचाच विषय असल्याने, मित्रांना वाचायला देण्याचा प्रश्नच नव्हता. 
अशा वेळी, लायब्ररीतून मी "शब्दप्रधान गायकी" हे पुस्तक आणले आणि सलग वाचून काढले. वाचताना हेच जाणवले, मी लिहिलेल्या निबंधात आणि या पुस्तकांतील विचारात काही ठिकाणी साम्य आढळले. अर्थात, देवांची समज अधिक खोलवर आणि विस्तारपूर्वक होती. पण, लगेच मी तो निबंध (निबंध म्हणायचा  का? जवळपास २० फुलस्केप पाने लिहिलेले होते) आईला वाचून दाखवला, आणि आईने पुढे नानांना वाचायला दिला. आपल्या मुलाने काहीतरी लिहिले आहे, याचाच तो खरा आनंद होता. नानांनी शांतपणे वाचला आणि मला म्हणाले "अनिल, हे सगळे तू यशवंत देवांना का दाखवत नाहीस?" मी मनातून थक्क!! डायरेक्ट संगीतकार यशवंत देव!! पण नाना म्हणाले, मी त्यांना ओळखतो आणि त्यांच्याशी बोलून, तुझी भेट घडवतो. 
त्याप्रमाणे, त्यांनी माझी आणि यशवंत देवांची भेट आकाशवाणीच्या त्यांच्या कार्यालयात घडवून आणली. तो पर्यंत एखाद्या संगीतकाराला भेटायचे, असे कधीही मनात आले नव्हते (पुढे मात्र भरपूर भेटी झाल्या आणि अनेक संगीतकारांना स्वतः:हुन भेटलो). नानांनी माझे लेखन देवांना दिले. हा माणूस इतका साधा होता, मृदू भाषी होता, त्यामुळे लगेच माझा धीर चेपला आणि मी काहीसा मोकळा झालो. वास्तविक मी लिहिलेले काही "मूलभूत" वगैरे नव्हते. काही वर्षे सतत गाणी ऐकून मनात जे काही साठले होते, त्याचेच शब्दरूप होते. त्यासाठी खास अभ्यास, व्यासंग वगैरे काहीही केला नव्हता. त्यांनी माल वाटते, दोन वेळा तरी तो लेख वाचला असावा आणि परत माझ्याकडे कागद दिले. 
मी काहीतरी गंभीरपणे ललित संगीतावर विचार करत आहे, याचेच त्यांना अप्रूप वाटले आणि माझा धीर वाढावा म्हणून लेखनातील त्रुटी सांगितल्या आणि मुद्दे कशाप्रकारे मांडायला हवे होते, याबाबत चार शब्द सांगितले. मजेची बाब म्हणजे खरतर त्यांच्यासमोर मी कोण होतो? कुणीही नाही. गाणी ऐकणारे तर त्यांच्या आजूबाजूला सतत वावरत असणार तेंव्हा मी ललित संगीत आवडीने ऐकतो, याचे त्यांना कौतुक असण्याचे काहीही कारण नव्हते तरीही त्यांना माझ्याबद्दल ममत्व वाटले. त्यांना मी काही दुर्मिळ मराठी आणि हिंदी गाण्यांविषयी विचारले होते आणि त्यांनी आकाशवाणीवर अशी दुर्मिळ मराठी गाणी ऐकायला मिळतात आणि तो कार्यक्रम कुठला वगैरे माहिती दिली. अनिल हवेत!! 
यशवंत देवांसारख्या सव्यासाची, विचारी संगीतकाराशी तासभर गपा मारायला मिळाल्या, हाच आनंद मला तेंव्हा भरपूर होता. तरुण वयात असले काही घडले की त्याचा (भाबडा) आनंद नेहमीच आनंददायी असतो म्हणा. माल तेंव्हाही आणि आजही स्पष्टपणे आठवत आहे ते त्यांचे निर्व्याज, सोपे, खालच्या आवाजातले बोलणे. समोरची व्यक्ती काहीशी अवखळ आहे तरीही त्याला समजून घेऊन  त्याच्याशी, त्याला समजेल अशाच भाषेत बोलायचे, ही हातोटी आजही माझ्या ध्यानात राहिली आहे. आता इतका मोठा संगीतकार, परत आपल्याला भेटलास तरी चालेल, असे म्हणतो म्हटल्यावर अनिल ढगात जाणारच. मला पण संगीतातला असा जाणकार माणूस परिचित व्हावा, असे वाटतच होते. पुढे मी त्यांचे काही कार्यक्रम ऐकले आणि कार्यक्रम संपल्यावर त्यांची भेट घेऊ लागलो. 
अशीच एक भेट आठवत आहे - मला वाटते, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा (ठाकूरद्वार शाखा) वार्षिक कार्यक्रम असावा आणि त्यांनी देवांचा कार्यक्रम ठेवला होता. एव्हाना काही मित्रांच्यात माझे संगीताचे वेड माहिती झाले होते आणि त्यातील एकानेच मला सूचना केली - अनिल, यशवंत देवांना तू काहीतरी प्रश्न विचार!! मी तिथेच एक कागद घेतला आणि जसे आठवतील तसे प्रश्न लिहून काढले आणि त्या मित्राकरवी देवांकडे पोहोचवले. देवांचा मोठेपणा असा की त्यांनी त्या कार्यक्रमात माझ्या प्रश्नांची दखल घेतली आणि कार्यक्रम संपल्यावर भेटायला ये, असे सुचवले. वास्तविक कागदावर माझ्या नावाचा उल्लेख नव्हता त्यामुळे मीच हे प्रश्न लिहिले आहेत, याची देवांना कल्पना असण्याचे काहीही कारण नव्हते. कार्यक्रम संपला आणि स्टेजच्या पाठीमागे जाऊन मी त्यांना भेटलो. त्यांनी लगेच मला ओळखले आणि याचेच मला नवल वाटले. वास्तविक मी भेटून ३,४ वर्षे झाली होती पण या माणसाने तरीही माझी  ओळख ठेवली होती. अर्थात तेंव्हा माझी ओळख म्हणजे "मुकुंद गोविलकर" यांचा मुलगा अशीच होती. त्यांना एका गोष्टीचा आनंद झाला होता - मी सजगपणे ललित संगीत ऐकतो आणि त्याविषयी काही गंभीरपणे आणि ठामपणे मते मांडतो. तिथेदेखील त्यांनी माझ्या प्रश्नावलीतील काही चुका अतिशय ऋजू स्वरांत मला सांगितल्या आणि कुठल्या प्रकारे विचार व्हायला हवा, याबाबत पुन्हा एकदा चार शब्द सांगितले. माग मात्र मी त्यांना घरी जाऊन स्वतंत्रपणे गप्पा मारायचे ठरवले आणि लगोलग शिवाजी पार्क इथले त्यांचे घर गाठले. 
यावेळेस मात्र माझ्यापरीने मी तयारी करून गेलो होतो आणि त्यांच्याशी ठराविक प्रश्नांवरच बोलायचे असेच ठरवले होते. तसे छोटेखानी घर पण त्यांनी अतिशय सहजपणे मला घरात घेतले. घरात करुणा देव होत्या आणि त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांनी लगेच संगीताचा विषय काढला आणि मला बरे वाटले. आणखी बरे वाटले कारण अनिल बिस्वास या संगीतकाराबद्दल त्यांना वाटणारे ममत्व. त्याचवेळी त्यांनी अनिलदांच्या संगीताची वैशिष्ट्ये सांगितली - विशेषतः: "सीने में सुलगते है अरमान" या माझ्या अति आवडीच्या गाण्यावरील त्यांचे भाष्य म्हणजे ललित संगीतावर किती अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार करता येऊ शकतो, याचा मला अप्रतिम वस्तुपाठ दिला. शब्द, चाल, वाद्यमेळ आणि गायन, या तिन्ही घटकांचा या स्वररचनेत कसा समर्पक उपयोग केला आहे, याचे वस्तुनिष्ठ विवेचन केले. गाण्याचा अशा प्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो याची वेगळीच नजर मला मिळाली. पुढे मला एकदा अशोक रानड्यांनी, संगीतकार  मदन मोहन बाबत अशाच प्रकारे समजावून सांगितले होते. इतकी वर्षे मी अनिल बिस्वास यांची गाणी अथकपणे ऐकत होतो पण आता मला तीच गाणी वेगळ्या स्तरावरून कशी ऐकायची, याची नजर मिळाली आणि हे सगळे सांगताना कुठेही कसलाही अभिनिवेश नव्हता, आत्मर्प्रौढी नव्हती. पेळूतून सूत निघावे तसे सहजपणे त्यांचे बोलणे चालू होते. 
वास्तविक मी कोण?  माझी लायकी काय? असले काहीही त्यांच्या मनात देखील आले नसावे. यशवंत देवांचा तसा स्वभावच नव्हता. पुढे मी परदेशी गेलो आणि इथला संपर्कच तुटला. जेंव्हा परत भारतात परतलो, तेंव्हा इथे घडी बसवण्यात बराच वेळा गेला आणि जवळपास पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्याइतका उत्साह फारसा राहिला नव्हता. यशवंत देवांची भेट घेण्याचे राहून गेले. अर्थात त्यांना भेटलो असतो तर पूर्वीची ओळख कितपत आठवली असती, याबाबत शंकाच आहे. परंतु आता देव नाहीत म्हणजे त्या शंकेचे निरसन देखील अप्राप्य!! खरतर त्यांच्या गप्पा सविस्तर मांडून आठवणी जागवणे सहजशक्य आहे पण मग मनात प्रश्न येतो, लिहिताना भावविवशता येईल का?  या प्रश्नालाच मी गप्प बसतो. 

Tuesday, 9 October 2018

पिटरमेरित्झबर्ग भाग २

१९९४ साली मी साऊथ आफ्रिकेत आलो ते याच शहरात. खरं सांगायचे झाल्यास, नोकरी पक्की होईपर्यंत मी या शहराचे नाव देखील ऐकले नव्हते परंतु आता तिथे राहायला जायचे म्हटल्यावर थोडी जुजबी माहिती काढायला सुरवात केली. त्यावेळी आजच्यासारखे गुगलचे प्रस्थ वाढले नव्हते माझा बॉस हरून यालाच या शहराची माहिती विचारली!! तेंव्हा डर्बन पासून साधारण ९० कि.मी. अंतरावर डोंगराळ भागात हे शहर वसले आहे, इतपतच समजले. त्यावेळी हे देखील समजले, तिथे थंडी बरीच असते (मुंबईच्या मानाने बरीच असेल म्हणजे पुण्याइतकी हा तेंव्हाचा समज!!) म्हणून लग्नातला सूट अंगावर चढवला - तेंव्हा ध्यानात आले या सुटचे आयुष्य संपायला आले!! मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हिसा आला आणि मी तिसऱ्या आठवड्यात या देशात जायला तयार झालो. तयारी तरी काय करायची? कपडे, काही पुस्तके, काही सीडीज आणि भारतीय मिठाई!! कंपनी राहायला घर देणार असल्याने राहण्याचा काहीच प्रश्न नव्हता. हातात एयर इंडियाचे तिकीट पडले आणि बॅग उचलली. एयर इंडियातून प्रथमच प्रवास होणार होता. त्याआधी नायजेरियाला जाताना इथियोपियन एयर लाईन्सने प्रवास केला होता आणि तो अनुभव काही फार चांगला नव्हता. जाताना विमानात मराठी बोलणारी एयर हॉस्टेस असल्याने आणि मी सवयीप्रमाणे पटकन मराठी बोलल्याने, तिने मला सुंदर जेवण दिले (माझे तिकीट इकॉनॉमी क्लासचे पण जेवण मात्र बिझिनेस क्लासचे मिळाले) प्रवास जवळपास ८ तासाचा आणि अर्थात विमानाची वेळ मध्यरात्र उलटून गेल्यावरची!! 
पहाटे डर्बन विमानतळावर उतरलो. विमानतळावरून देशाची कल्पना करता येते. विमानतळ अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि शांत होता. लागोस विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे वेगळेपण मनात ठसले. सगळे काही शिस्तीत चालू होते,कुठेही धक्काबुक्की नाही, वचावचा बोलणे नाही,की रांगा तोडण्याचे प्रकार नाही. देशाची संस्कृती दर्शवणारी वागणूक - अर्थात काही वर्षांनी पार दुसरे टोक गाठले गेले. बाहेर हरून वाट बघतच होता. लगेच पार्किंग लॉट मधून गाडी काढली. हरूनची मर्सिडीझ ५०० होती. त्या गाडीचे प्रथम दर्शनच अतिशय सुरेख होते. गाडी जशी विमानतळ सोडून हमरस्त्यावर आली तशी रस्ता म्हणजे काय असतो, याची प्रचिती आली आणि तो अनुभव पुढील १७ वर्षी कायम येत राहिला. आपल्याला मुंबई-पुणे फ्री वे चे कौतुक (अर्थात तसे ते वाजवीत आहे म्हणा) परंतु तशा दर्जाचे रस्ते साऊथ आफ्रिकेत साऱ्या देशभर पसरलेले आहेत. मे महिना म्हणजे थंडीचा कडाका गाडीत बसल्याने तसे फारसे जाणवले नव्हते, त्यातून गाडी तर १५० वेगाने धावत होती - आयुष्यात प्रथमच इतक्या भरधाव वेगाचा अनुभव घेत होतो. या प्रवासाचा पहिला परिणाम म्हणजे आजूबाजूची गर्द झाडी. फ्री वे असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय घनदाट अशी झाडी - मुंबईकराला हे तर अप्रुपच!! 
हरूनने सरळ घराकडे गाडी घेतली. मला "शेयरिंग" घर मिळाले होते. घरात विनय (मंगलोर) आणि जयराज (केरळ) असे रहात होते. घर प्रशस्त होते, प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम होती. प्रवासात हरूनने, कंपनीच्या विस्तार कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली. ऑइल रिफायनरी, (दुसरी रिफायनरी बांधायचे काम सुरु झाले होते) मार्जरीन फॅक्टरी तसेच साबणाची फॅक्टरी सुरु झालेली होती. माझे ऑफिस फॅक्टरी प्रिमायसिसमध्येच होते. एक गंमत सांगायची राहिलीच. जसे घर जवळ आले आणि गाडीतून खाली उतरलो आणि खऱ्या अर्थी थंडीचा कडाका जाणवला!! आदल्या दिवशी किंचित पाऊस शिंपडला असल्याने वातावरण ढगाळ आणि काहीसे अंधेरी होते परिणाम हवेत थंडी!! विनय आणि जयराज वेळेनुसार कामाला गेले होते. घरात मी एकटाच होतो घरात आलो आणि बॅगा उघडून कपडे, पुस्तके वगैरे लावण्यात वेळ गेला. दुपारी सरळ झोप घेतली. संध्याकाळी विनय आणि जयराज परतले अर्थात पहिल्या भेटीत जुजबी ओळख झाली आणि ते साहजिकच होते. 
हळूहळू हे दोघे आणि इतर भारतीयांच्या ओळखी झाल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो. सकाळी ८०० वाजता ऑफिस सुरु ते संध्याकाळी ४.३० पर्यंत. ऑफिसमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यक्ती होत्या - माझ्या बरोबर काम करणारी नसीमा नावाची मुलगी (खरतर बाई म्हणायला हवे) होती. सुरवातीचे ओळख करून घेण्याचे सोपस्कार पार पडले आणि कामाचा आढावा आणि स्वरूप समजून घ्यायला सुरवात केली. अजय (मुंबईकर - चेम्बुरस्थित पण आता कॅनडाला गेला) माझा बॉस, मुंबईकर असल्याने मराठी बोलण्याची सोय झाली. त्याची बायको, चित्रा मार्जरीनं लॅबोरेटरीमध्ये कामाला होती आणि ती तर अस्खलित मराठी बोलायची.  अजय कुटुंबासह राहातासल्याने स्वतंत्र रहात होता - त्याचे घर म्हणजे माझे घर असावे इतका आमचा घरोबा झाला होता. परदेशात एक नक्की असते, केवळ भारतीय या मुद्द्यावर सहज सगळे एकत्र येतात. साऊथ आफ्रिकेत त्यावेळी भारतातून फारसे या देशात नोकरीसाठी येत नसत कारण या देशात प्रवेश करायला सरकारनेच घातलेली बंदी. मंडेला सत्तेवर यायच्या सुमारास बंदी उठली तरीही २००० सालापर्यंत एकूणच इथे नोकरीला येण्याचे प्रमाण फारच तुरळक होते. 
हळूहळू ऑफिसमध्ये रुळायला लागलो. जरी ऑफिसमध्ये गोरे कमी असले तरी कामानिमित्त भेटणारे बरेचजण गोरे असायचे.. त्यावेळी तरी नक्कीच पण त्यांचे इंग्रजी समजून घेणे फार अवघड गेले आता समजतच नाही म्हटल्यावर प्रत्युत्तर तरी कसे द्यायचे? माझी सुरवातीला बरीच तारांबळ उडाली होती आणि तिथे अजय मदतीला यायचा. अर्थात मनाशी खूणगाठ बांधली, हे असे चालायचे नाही, इथे राहायचे असेल तर इथली इंग्रजी समजून घ्यायलाच हवी. त्यावेळी मी सिगारेट ओढीत असे आणि एक क्लुप्ती शोधली होती, कुणी गोरा भेटायला आला की लगेच सिगारेट शिलगावयाची आणि तोंडात ठेवायची आणि काही बोलणे समजले नाही की लगेच Pardon Me असे बोलायचे पण माझा उच्चार देशी!! गोऱ्यांना समजून घेणे अवघड!! एकूण भलतेच मजेशीर प्रसंग ओढवायचे. 
दिवसेंगणिक थंडीचा कडाका वाढत होता. पिटरमेरित्झबर्ग शहर हे डोंगरात वसलेले शहर त्यामुळे थंड वारे सतत वाहत असतात, त्यातून या देशात जून, जुलै महिने म्हणजे थंडीचा खरा दणका!! मी इथे आलो त्यावेळी गरम कपड्यांचा फारसा विचार केला नव्हता पण इथे आल्यावर मला जॅकेट घेण्याशिवाय तरुणोपाय नाही, हे समजले आणि एके शनिवारी मी आणि विनय मार्केटमध्ये गेलो आणि जॅकेट घेतले पुढे बरीच वर्षे मी हे जॅकेट वापरीत होतो. मी या देशात उणीपुरी १७ वर्षे राहिलो पण आजही माझ्या मनात या शहराबद्दल काहीसे ममत्व आहे. अतिशय रेखीव, आटोपशीर शहर. डर्बन तर सुरेखच आहे पण तरी तिथे शहरी भाव नजरेआड करता येत नाही. पिटरमेरित्झबर्ग हे तसे टुमदार गाव आहे - आजही तसेच आहे, इथे तशा फारशा प्रचंड इंडस्ट्रीज नाहीत एकूणच पूर्वीच्या पुण्यासारखे गाव आहे. थंडीच्या दिवसात गारठवुन टाकणारी थंडी असली तरी डिसेंबर, जानेवारीतील उन्हाळा तसा डोक्यात जात नाही आणि याचे कारण दर दोन, तीन दिवसांनी पडणारा पाऊस!! पाऊस जरी शिंपडला तरी वातावरणात जाणवण्याइतपत बदल घडतो.रस्ते अतिशय मोकळे, प्रशस्त आणि एकूणच डोंगराळ प्रदेश असल्याने सारखे वर-खाली बांधलेले. त्याचा परिणाम असा होतो, एखादे वळण घेतले की लगेच सृष्टीतील बदल बघायला मिळतो. आलो तेंव्हा थंडी होती पण तरीही ठराविक पानगळ वगळता, झाडांनी आपला हिरवा रंग सोडलेला नव्हता. लहानखोर गाव असल्याने एकमेकांबद्दल ऋजू भाव बराच होता - यात आता कालानुरूप फरक पडत गेला म्हणा!! 
हळूहळू इंग्रजी भाषा समजायला लागली आणि इथे स्थिरावयाला लागलो, विशेषतः: बँकेतील अधिकाऱ्यांशी विश्वासाने बोलणे सुरु झाले तसेच कंपनीच्या ऑडिटर्सबरोबर मीटिंग्ज झडायला लागल्या. संध्याकाळी ४.३० ला ऑफिस बंद पण सुरवातीला मी आणि विनय, अजयसह उशिरापर्यंत बसत असू. रात्री उशीर झाला की अजयच्या घरी जेवण. मी कशाला नाही म्हणतोय!! विशेषतः: शुक्रवार संध्याकाळी अजयकडे छोटीशी पार्टीच असायची. थंड हवेत स्कॉच पिणे हा आनंद सोहळा असतो. इथेच मी On The Rocks घ्यायला सुरवात केली. बाहेर जबरा थंडी असल्याने, हातातल्या स्कॉचची चव पण देखणी असायची. एक गंमत - हे शहर संध्याकाळ ६.०० नंतर जवळपास ओसाड असते -आजही यात फरक नाही!! दिवसा गजबजून गेलेले शहर नंतर इतके शांत असायचे की मला सुरवातीला फार नवल वाटायचे आणि मनात मुंबईची तुलना व्हायची. मुंबई तर संध्याकाळनंतर उमलायला लागते. पिटरमेरित्झबर्ग  शहरात, शुक्रवार रात्र किंवा शनिवार रात्र, नाईट क्लब आणि आजूबाजूचा परिसर थोडाफार गजबजलेला तसेच इथला रेड लाईट एरिया देखील थोडासा गजबजलेला अन्यथा रस्ते आणि घरे, सगळीच शांत असतात. १९९४ मध्ये आम्ही मित्र बरेचवेळा अजयच्या घरी पार्टी झाल्यावर शांतपणे चालत घरी येत असू. त्यावेळी या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका गंभीर प्रश्न झाला नव्हता. रात्री त्या शांत वातावरणात माझ्या मनात अनेक मराठी कवितांची उजळणी चालत असे. विनयला तर नेहमी आश्चर्य वाटायचे - पार्टीत खिदळणारा अनिल रस्त्यात असा गपगुमान का असतो? आता त्याला काय सांगणार!! 
या शहरात त्यावेळी तरी बरेच मुसलमान रहात होते आणि त्यांच्याशी ओळखी होणे क्रमप्राप्तच होते. इथे एक गंमत बघाया मिळाली. भारतीय वंशाची वस्ती तर भरपूर आहे पण ती दोन विभागात विभागलेली. १) हिंदू, २) तामिळ. त्यांची देवळे वेगळी, सण, सोपस्कार वेगळे इतकेच कशाला स्वयंपाक करायच्या पद्धती वेगळ्या. इथे गुजराती वस्ती तितकीच लक्षणीय आहे. आता या लोकांची पाचवी, सहावी पिढी इथे रहात आहे (काहींच्या तर ७,८ पिढ्या आहेत) त्यामुळे नावापुरते भारतीय. त्यातून इथल्या लाकोणची पहिली नावे बहुतांशी इंग्रजी-विशेषतः: मुलीची नावे तर सर्रास इंग्रजी असतात अंडी इथे सगळेजण पहिल्या नावानेच ओळखतात. अर्थात ही पद्धत सगळ्या देशात आहे. कंपनीचा मालक जरी असला तरी त्याला पहिल्या नावानेच हाक मारायची किंवा संबोधायचे. त्यामुळे विशेषतः: फोनवरून बोलताना पत्ता लागायचा नाही, बोलणारी मुलगी गोरी आहे, हिंदू आहे की तामिळ आहे. अर्थात त्यांच्या उच्चार पद्धतीत सूक्ष्म फरक आहे पण तो समजून घेण्यासाठी काही काळ घालवणे गरजेचे आहे. गुजराती समाज मात्र विलक्षण आहे, पाचवी पिढी आहे पण आजही अस्खलित गुजराती बोलतात, घरात तसेच पारंपरिक रीतिरिवाज चालू असतात, पिण्यात सज्जड असतात, क्लबमध्ये देवळात जावे तितक्या सहजतेने जातात. बहुतेक समाज हा बिझिनेस मध्येच आहे आणि तिथे मात्र गोऱ्या लोकांचे उच्चार तसेच गळ्यावर  बसवून घेतलेले. बिझिनेस वेगळा आणि घर वेगळे!! 
त्यावेळी तरी लोकांच्यात सचोटी, दिल्या शब्दाला तारण राहायचे तसेच त्यामानाने साधे जीवन होते. कदाचित म्हणून हे शहर माझ्या मनात आजही घर करून आहे. इथेच मला खऱ्या अर्थाने या देशाची संस्कृती कळली, काही बाबतीतला भंपकपणा देखील समजला. एका बाजूने पाश्चात्य संस्कार पचवलेला समाज तर दुसऱ्या बाजूने, भारतातील जुनाट रूढी प्राणपणाने कवटाळून बसलेला समाज!! दोन टोकांवरील आयुष्य पण तितक्याच सहजतेने वागवत आहे. इथेच Good Friday  आणि पाठोपाठचा Easter Monday, इथला भारतीय समाज किती पारंपरिक आहे, हे दर्शन घडवतो. Good Friday रोजी सगळेजण अतिशय निष्ठेने निर्जळी उपास करतात, संध्याकाळी आपल्याला देवळांत जातात, इथे धगधगीत लाकडांवर अनवाणी पायाने चालतात, संध्याकाळच्या मिरवणुकीत (ही मिरवणूक शहरभर चालते) ऊर्ध्व लागल्याप्रमाणे काहीजण नाकात, पापणीवर, कानांच्या पाळीत, छातीवर, पाठीवर टोकदार आकड्याच्या साहाय्याने फळे लटकवतात आणि मंदिरात आल्यावर काढून टाकतात. अशा प्रकारे फळे काढणे, हा मोठा सोहळा असतो. मला तेंव्हा देखील आश्चर्य वाटले होते आणि तिथल्या काही वयस्कर माणसांना, भारतातील शहरी भागात असले काही चालत नाही, वगैरे बोललो तर त्यांना रागच आला! आता अतीव श्रद्धा म्हटल्यावर तिथे वाद संभवतच नाही म्हणा!! असो. गंमतीचा भाग म्हणजे एकदा का देवळातला सोहळा आटोपला की लगोलग ड्रिंक्स घ्यायला कसलीच आडकाठी नसते!! 
इथे लग्न रिवाज वगैरे आपल्याप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने पार पडतात, देवळात भटजी येतो, मंत्र सोपस्कार पार पाडतो आणि विधिवत लग्न होते. इथे मात्र मग ड्रिंक्स असते. साऊथ आफ्रिकन माणसे पाण्याप्रमाणे बियर पितात!! शनिवार दुपारी देखील कुणाकडे गेलो तरी चहाच्या आधी बियर किंवा थंडी असेल तर ब्रँडी, स्कॉच घेणार का, अशी विचारणा होते. सगळा देश सज्जड पिणारा. अर्थात हवामानाच असे असते, ड्रिंक्स घ्यायला देखील मजा वाटावी. इथे त्यावेळी मॉल संस्कृती फोफावली नव्हती. सेंट्रल भागात ३,४ शॉपिंग सेंटर्स होती- आजही आहेत, इथे उघड्यावर बसून जेवणे, ड्रिंक्स घेणे हा आनंद सोहळा असतो. इथेच मी तऱ्हेतऱ्हेचे पाव बघितले आणि कशाबरोबर कुठला पाव खायचा याचे शास्त्र शिकून घेतले. किंबहुना ड्रिंक्स कसे घ्यावे, याचे देखील शास्त्र शिकून घेतले. गोरा माणूस ड्रिंक्स घेतेवेळी किती वाभ्रट होतो, याचा अनुभव घेतला खरतर ड्रिंक्स पार्टी रंगवावी तर गोऱ्याच माणसाने. त्यावेळी तो अंगावरील सगळी बिरुदे बाजूला ठेवतो आणि ज्याला नॉन-व्हेज जोक्स म्हणतात, त्याची, फटाक्याची माळ लावावी त्याप्रमाणे फटाके फोडत असतो मग बाजूला बायको असो वा गर्लफ्रेंड असो!!  
या शहराने मला खूपच लळा लावला पण मी ज्या कंपनीत नोकरी करीत होतो, त्या कंपनीचे आर्थिक दिवाळे वाजायला लागले होते. बाहेर कुठेतरी प्रयत्न करणे आवश्यकच होते, सुदैवाने मला डर्बन इथे नोकरी मिळाली.  वास्तविक मी वर्क परमिटवर होतो त्यामुळे जर का दुसरी नोकरी हवी असेल तर आधीच्या कंपनीकडून N.O.C. अत्यावश्यक असते, सुदैवाने हरूनला याची माहिती होती. खरतर तोच मला म्हणाला होता, अनिल जर तुला दुसरीकडे कुठे मिळत असेल तर निघून जा. मला डर्बनला नोकरी मिळाली आणि त्याने लगोलग N.O.C  लेटर सही करून दिले. माझा पुढील मार्ग वैध झाला, इथेच मला पुढे Permanent Residency मिळाली आणि पुढील आयुष्यच बदलून गेले.