Tuesday 9 October 2018

पिटरमेरित्झबर्ग भाग २

१९९४ साली मी साऊथ आफ्रिकेत आलो ते याच शहरात. खरं सांगायचे झाल्यास, नोकरी पक्की होईपर्यंत मी या शहराचे नाव देखील ऐकले नव्हते परंतु आता तिथे राहायला जायचे म्हटल्यावर थोडी जुजबी माहिती काढायला सुरवात केली. त्यावेळी आजच्यासारखे गुगलचे प्रस्थ वाढले नव्हते माझा बॉस हरून यालाच या शहराची माहिती विचारली!! तेंव्हा डर्बन पासून साधारण ९० कि.मी. अंतरावर डोंगराळ भागात हे शहर वसले आहे, इतपतच समजले. त्यावेळी हे देखील समजले, तिथे थंडी बरीच असते (मुंबईच्या मानाने बरीच असेल म्हणजे पुण्याइतकी हा तेंव्हाचा समज!!) म्हणून लग्नातला सूट अंगावर चढवला - तेंव्हा ध्यानात आले या सुटचे आयुष्य संपायला आले!! मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हिसा आला आणि मी तिसऱ्या आठवड्यात या देशात जायला तयार झालो. तयारी तरी काय करायची? कपडे, काही पुस्तके, काही सीडीज आणि भारतीय मिठाई!! कंपनी राहायला घर देणार असल्याने राहण्याचा काहीच प्रश्न नव्हता. हातात एयर इंडियाचे तिकीट पडले आणि बॅग उचलली. एयर इंडियातून प्रथमच प्रवास होणार होता. त्याआधी नायजेरियाला जाताना इथियोपियन एयर लाईन्सने प्रवास केला होता आणि तो अनुभव काही फार चांगला नव्हता. जाताना विमानात मराठी बोलणारी एयर हॉस्टेस असल्याने आणि मी सवयीप्रमाणे पटकन मराठी बोलल्याने, तिने मला सुंदर जेवण दिले (माझे तिकीट इकॉनॉमी क्लासचे पण जेवण मात्र बिझिनेस क्लासचे मिळाले) प्रवास जवळपास ८ तासाचा आणि अर्थात विमानाची वेळ मध्यरात्र उलटून गेल्यावरची!! 
पहाटे डर्बन विमानतळावर उतरलो. विमानतळावरून देशाची कल्पना करता येते. विमानतळ अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि शांत होता. लागोस विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे वेगळेपण मनात ठसले. सगळे काही शिस्तीत चालू होते,कुठेही धक्काबुक्की नाही, वचावचा बोलणे नाही,की रांगा तोडण्याचे प्रकार नाही. देशाची संस्कृती दर्शवणारी वागणूक - अर्थात काही वर्षांनी पार दुसरे टोक गाठले गेले. बाहेर हरून वाट बघतच होता. लगेच पार्किंग लॉट मधून गाडी काढली. हरूनची मर्सिडीझ ५०० होती. त्या गाडीचे प्रथम दर्शनच अतिशय सुरेख होते. गाडी जशी विमानतळ सोडून हमरस्त्यावर आली तशी रस्ता म्हणजे काय असतो, याची प्रचिती आली आणि तो अनुभव पुढील १७ वर्षी कायम येत राहिला. आपल्याला मुंबई-पुणे फ्री वे चे कौतुक (अर्थात तसे ते वाजवीत आहे म्हणा) परंतु तशा दर्जाचे रस्ते साऊथ आफ्रिकेत साऱ्या देशभर पसरलेले आहेत. मे महिना म्हणजे थंडीचा कडाका गाडीत बसल्याने तसे फारसे जाणवले नव्हते, त्यातून गाडी तर १५० वेगाने धावत होती - आयुष्यात प्रथमच इतक्या भरधाव वेगाचा अनुभव घेत होतो. या प्रवासाचा पहिला परिणाम म्हणजे आजूबाजूची गर्द झाडी. फ्री वे असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय घनदाट अशी झाडी - मुंबईकराला हे तर अप्रुपच!! 
हरूनने सरळ घराकडे गाडी घेतली. मला "शेयरिंग" घर मिळाले होते. घरात विनय (मंगलोर) आणि जयराज (केरळ) असे रहात होते. घर प्रशस्त होते, प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम होती. प्रवासात हरूनने, कंपनीच्या विस्तार कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली. ऑइल रिफायनरी, (दुसरी रिफायनरी बांधायचे काम सुरु झाले होते) मार्जरीन फॅक्टरी तसेच साबणाची फॅक्टरी सुरु झालेली होती. माझे ऑफिस फॅक्टरी प्रिमायसिसमध्येच होते. एक गंमत सांगायची राहिलीच. जसे घर जवळ आले आणि गाडीतून खाली उतरलो आणि खऱ्या अर्थी थंडीचा कडाका जाणवला!! आदल्या दिवशी किंचित पाऊस शिंपडला असल्याने वातावरण ढगाळ आणि काहीसे अंधेरी होते परिणाम हवेत थंडी!! विनय आणि जयराज वेळेनुसार कामाला गेले होते. घरात मी एकटाच होतो घरात आलो आणि बॅगा उघडून कपडे, पुस्तके वगैरे लावण्यात वेळ गेला. दुपारी सरळ झोप घेतली. संध्याकाळी विनय आणि जयराज परतले अर्थात पहिल्या भेटीत जुजबी ओळख झाली आणि ते साहजिकच होते. 
हळूहळू हे दोघे आणि इतर भारतीयांच्या ओळखी झाल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो. सकाळी ८०० वाजता ऑफिस सुरु ते संध्याकाळी ४.३० पर्यंत. ऑफिसमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यक्ती होत्या - माझ्या बरोबर काम करणारी नसीमा नावाची मुलगी (खरतर बाई म्हणायला हवे) होती. सुरवातीचे ओळख करून घेण्याचे सोपस्कार पार पडले आणि कामाचा आढावा आणि स्वरूप समजून घ्यायला सुरवात केली. अजय (मुंबईकर - चेम्बुरस्थित पण आता कॅनडाला गेला) माझा बॉस, मुंबईकर असल्याने मराठी बोलण्याची सोय झाली. त्याची बायको, चित्रा मार्जरीनं लॅबोरेटरीमध्ये कामाला होती आणि ती तर अस्खलित मराठी बोलायची.  अजय कुटुंबासह राहातासल्याने स्वतंत्र रहात होता - त्याचे घर म्हणजे माझे घर असावे इतका आमचा घरोबा झाला होता. परदेशात एक नक्की असते, केवळ भारतीय या मुद्द्यावर सहज सगळे एकत्र येतात. साऊथ आफ्रिकेत त्यावेळी भारतातून फारसे या देशात नोकरीसाठी येत नसत कारण या देशात प्रवेश करायला सरकारनेच घातलेली बंदी. मंडेला सत्तेवर यायच्या सुमारास बंदी उठली तरीही २००० सालापर्यंत एकूणच इथे नोकरीला येण्याचे प्रमाण फारच तुरळक होते. 
हळूहळू ऑफिसमध्ये रुळायला लागलो. जरी ऑफिसमध्ये गोरे कमी असले तरी कामानिमित्त भेटणारे बरेचजण गोरे असायचे.. त्यावेळी तरी नक्कीच पण त्यांचे इंग्रजी समजून घेणे फार अवघड गेले आता समजतच नाही म्हटल्यावर प्रत्युत्तर तरी कसे द्यायचे? माझी सुरवातीला बरीच तारांबळ उडाली होती आणि तिथे अजय मदतीला यायचा. अर्थात मनाशी खूणगाठ बांधली, हे असे चालायचे नाही, इथे राहायचे असेल तर इथली इंग्रजी समजून घ्यायलाच हवी. त्यावेळी मी सिगारेट ओढीत असे आणि एक क्लुप्ती शोधली होती, कुणी गोरा भेटायला आला की लगेच सिगारेट शिलगावयाची आणि तोंडात ठेवायची आणि काही बोलणे समजले नाही की लगेच Pardon Me असे बोलायचे पण माझा उच्चार देशी!! गोऱ्यांना समजून घेणे अवघड!! एकूण भलतेच मजेशीर प्रसंग ओढवायचे. 
दिवसेंगणिक थंडीचा कडाका वाढत होता. पिटरमेरित्झबर्ग शहर हे डोंगरात वसलेले शहर त्यामुळे थंड वारे सतत वाहत असतात, त्यातून या देशात जून, जुलै महिने म्हणजे थंडीचा खरा दणका!! मी इथे आलो त्यावेळी गरम कपड्यांचा फारसा विचार केला नव्हता पण इथे आल्यावर मला जॅकेट घेण्याशिवाय तरुणोपाय नाही, हे समजले आणि एके शनिवारी मी आणि विनय मार्केटमध्ये गेलो आणि जॅकेट घेतले पुढे बरीच वर्षे मी हे जॅकेट वापरीत होतो. मी या देशात उणीपुरी १७ वर्षे राहिलो पण आजही माझ्या मनात या शहराबद्दल काहीसे ममत्व आहे. अतिशय रेखीव, आटोपशीर शहर. डर्बन तर सुरेखच आहे पण तरी तिथे शहरी भाव नजरेआड करता येत नाही. पिटरमेरित्झबर्ग हे तसे टुमदार गाव आहे - आजही तसेच आहे, इथे तशा फारशा प्रचंड इंडस्ट्रीज नाहीत एकूणच पूर्वीच्या पुण्यासारखे गाव आहे. थंडीच्या दिवसात गारठवुन टाकणारी थंडी असली तरी डिसेंबर, जानेवारीतील उन्हाळा तसा डोक्यात जात नाही आणि याचे कारण दर दोन, तीन दिवसांनी पडणारा पाऊस!! पाऊस जरी शिंपडला तरी वातावरणात जाणवण्याइतपत बदल घडतो.रस्ते अतिशय मोकळे, प्रशस्त आणि एकूणच डोंगराळ प्रदेश असल्याने सारखे वर-खाली बांधलेले. त्याचा परिणाम असा होतो, एखादे वळण घेतले की लगेच सृष्टीतील बदल बघायला मिळतो. आलो तेंव्हा थंडी होती पण तरीही ठराविक पानगळ वगळता, झाडांनी आपला हिरवा रंग सोडलेला नव्हता. लहानखोर गाव असल्याने एकमेकांबद्दल ऋजू भाव बराच होता - यात आता कालानुरूप फरक पडत गेला म्हणा!! 
हळूहळू इंग्रजी भाषा समजायला लागली आणि इथे स्थिरावयाला लागलो, विशेषतः: बँकेतील अधिकाऱ्यांशी विश्वासाने बोलणे सुरु झाले तसेच कंपनीच्या ऑडिटर्सबरोबर मीटिंग्ज झडायला लागल्या. संध्याकाळी ४.३० ला ऑफिस बंद पण सुरवातीला मी आणि विनय, अजयसह उशिरापर्यंत बसत असू. रात्री उशीर झाला की अजयच्या घरी जेवण. मी कशाला नाही म्हणतोय!! विशेषतः: शुक्रवार संध्याकाळी अजयकडे छोटीशी पार्टीच असायची. थंड हवेत स्कॉच पिणे हा आनंद सोहळा असतो. इथेच मी On The Rocks घ्यायला सुरवात केली. बाहेर जबरा थंडी असल्याने, हातातल्या स्कॉचची चव पण देखणी असायची. एक गंमत - हे शहर संध्याकाळ ६.०० नंतर जवळपास ओसाड असते -आजही यात फरक नाही!! दिवसा गजबजून गेलेले शहर नंतर इतके शांत असायचे की मला सुरवातीला फार नवल वाटायचे आणि मनात मुंबईची तुलना व्हायची. मुंबई तर संध्याकाळनंतर उमलायला लागते. पिटरमेरित्झबर्ग  शहरात, शुक्रवार रात्र किंवा शनिवार रात्र, नाईट क्लब आणि आजूबाजूचा परिसर थोडाफार गजबजलेला तसेच इथला रेड लाईट एरिया देखील थोडासा गजबजलेला अन्यथा रस्ते आणि घरे, सगळीच शांत असतात. १९९४ मध्ये आम्ही मित्र बरेचवेळा अजयच्या घरी पार्टी झाल्यावर शांतपणे चालत घरी येत असू. त्यावेळी या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका गंभीर प्रश्न झाला नव्हता. रात्री त्या शांत वातावरणात माझ्या मनात अनेक मराठी कवितांची उजळणी चालत असे. विनयला तर नेहमी आश्चर्य वाटायचे - पार्टीत खिदळणारा अनिल रस्त्यात असा गपगुमान का असतो? आता त्याला काय सांगणार!! 
या शहरात त्यावेळी तरी बरेच मुसलमान रहात होते आणि त्यांच्याशी ओळखी होणे क्रमप्राप्तच होते. इथे एक गंमत बघाया मिळाली. भारतीय वंशाची वस्ती तर भरपूर आहे पण ती दोन विभागात विभागलेली. १) हिंदू, २) तामिळ. त्यांची देवळे वेगळी, सण, सोपस्कार वेगळे इतकेच कशाला स्वयंपाक करायच्या पद्धती वेगळ्या. इथे गुजराती वस्ती तितकीच लक्षणीय आहे. आता या लोकांची पाचवी, सहावी पिढी इथे रहात आहे (काहींच्या तर ७,८ पिढ्या आहेत) त्यामुळे नावापुरते भारतीय. त्यातून इथल्या लाकोणची पहिली नावे बहुतांशी इंग्रजी-विशेषतः: मुलीची नावे तर सर्रास इंग्रजी असतात अंडी इथे सगळेजण पहिल्या नावानेच ओळखतात. अर्थात ही पद्धत सगळ्या देशात आहे. कंपनीचा मालक जरी असला तरी त्याला पहिल्या नावानेच हाक मारायची किंवा संबोधायचे. त्यामुळे विशेषतः: फोनवरून बोलताना पत्ता लागायचा नाही, बोलणारी मुलगी गोरी आहे, हिंदू आहे की तामिळ आहे. अर्थात त्यांच्या उच्चार पद्धतीत सूक्ष्म फरक आहे पण तो समजून घेण्यासाठी काही काळ घालवणे गरजेचे आहे. गुजराती समाज मात्र विलक्षण आहे, पाचवी पिढी आहे पण आजही अस्खलित गुजराती बोलतात, घरात तसेच पारंपरिक रीतिरिवाज चालू असतात, पिण्यात सज्जड असतात, क्लबमध्ये देवळात जावे तितक्या सहजतेने जातात. बहुतेक समाज हा बिझिनेस मध्येच आहे आणि तिथे मात्र गोऱ्या लोकांचे उच्चार तसेच गळ्यावर  बसवून घेतलेले. बिझिनेस वेगळा आणि घर वेगळे!! 
त्यावेळी तरी लोकांच्यात सचोटी, दिल्या शब्दाला तारण राहायचे तसेच त्यामानाने साधे जीवन होते. कदाचित म्हणून हे शहर माझ्या मनात आजही घर करून आहे. इथेच मला खऱ्या अर्थाने या देशाची संस्कृती कळली, काही बाबतीतला भंपकपणा देखील समजला. एका बाजूने पाश्चात्य संस्कार पचवलेला समाज तर दुसऱ्या बाजूने, भारतातील जुनाट रूढी प्राणपणाने कवटाळून बसलेला समाज!! दोन टोकांवरील आयुष्य पण तितक्याच सहजतेने वागवत आहे. इथेच Good Friday  आणि पाठोपाठचा Easter Monday, इथला भारतीय समाज किती पारंपरिक आहे, हे दर्शन घडवतो. Good Friday रोजी सगळेजण अतिशय निष्ठेने निर्जळी उपास करतात, संध्याकाळी आपल्याला देवळांत जातात, इथे धगधगीत लाकडांवर अनवाणी पायाने चालतात, संध्याकाळच्या मिरवणुकीत (ही मिरवणूक शहरभर चालते) ऊर्ध्व लागल्याप्रमाणे काहीजण नाकात, पापणीवर, कानांच्या पाळीत, छातीवर, पाठीवर टोकदार आकड्याच्या साहाय्याने फळे लटकवतात आणि मंदिरात आल्यावर काढून टाकतात. अशा प्रकारे फळे काढणे, हा मोठा सोहळा असतो. मला तेंव्हा देखील आश्चर्य वाटले होते आणि तिथल्या काही वयस्कर माणसांना, भारतातील शहरी भागात असले काही चालत नाही, वगैरे बोललो तर त्यांना रागच आला! आता अतीव श्रद्धा म्हटल्यावर तिथे वाद संभवतच नाही म्हणा!! असो. गंमतीचा भाग म्हणजे एकदा का देवळातला सोहळा आटोपला की लगोलग ड्रिंक्स घ्यायला कसलीच आडकाठी नसते!! 
इथे लग्न रिवाज वगैरे आपल्याप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने पार पडतात, देवळात भटजी येतो, मंत्र सोपस्कार पार पाडतो आणि विधिवत लग्न होते. इथे मात्र मग ड्रिंक्स असते. साऊथ आफ्रिकन माणसे पाण्याप्रमाणे बियर पितात!! शनिवार दुपारी देखील कुणाकडे गेलो तरी चहाच्या आधी बियर किंवा थंडी असेल तर ब्रँडी, स्कॉच घेणार का, अशी विचारणा होते. सगळा देश सज्जड पिणारा. अर्थात हवामानाच असे असते, ड्रिंक्स घ्यायला देखील मजा वाटावी. इथे त्यावेळी मॉल संस्कृती फोफावली नव्हती. सेंट्रल भागात ३,४ शॉपिंग सेंटर्स होती- आजही आहेत, इथे उघड्यावर बसून जेवणे, ड्रिंक्स घेणे हा आनंद सोहळा असतो. इथेच मी तऱ्हेतऱ्हेचे पाव बघितले आणि कशाबरोबर कुठला पाव खायचा याचे शास्त्र शिकून घेतले. किंबहुना ड्रिंक्स कसे घ्यावे, याचे देखील शास्त्र शिकून घेतले. गोरा माणूस ड्रिंक्स घेतेवेळी किती वाभ्रट होतो, याचा अनुभव घेतला खरतर ड्रिंक्स पार्टी रंगवावी तर गोऱ्याच माणसाने. त्यावेळी तो अंगावरील सगळी बिरुदे बाजूला ठेवतो आणि ज्याला नॉन-व्हेज जोक्स म्हणतात, त्याची, फटाक्याची माळ लावावी त्याप्रमाणे फटाके फोडत असतो मग बाजूला बायको असो वा गर्लफ्रेंड असो!!  
या शहराने मला खूपच लळा लावला पण मी ज्या कंपनीत नोकरी करीत होतो, त्या कंपनीचे आर्थिक दिवाळे वाजायला लागले होते. बाहेर कुठेतरी प्रयत्न करणे आवश्यकच होते, सुदैवाने मला डर्बन इथे नोकरी मिळाली.  वास्तविक मी वर्क परमिटवर होतो त्यामुळे जर का दुसरी नोकरी हवी असेल तर आधीच्या कंपनीकडून N.O.C. अत्यावश्यक असते, सुदैवाने हरूनला याची माहिती होती. खरतर तोच मला म्हणाला होता, अनिल जर तुला दुसरीकडे कुठे मिळत असेल तर निघून जा. मला डर्बनला नोकरी मिळाली आणि त्याने लगोलग N.O.C  लेटर सही करून दिले. माझा पुढील मार्ग वैध झाला, इथेच मला पुढे Permanent Residency मिळाली आणि पुढील आयुष्यच बदलून गेले.  

No comments:

Post a Comment