Sunday 11 November 2018

कवियत्री शांताबाई शेळके

कवियत्री शांताबाई शेळके यांचा स्वतंत्रपणे विचार करायला बसल्यावर सहजपणे मनात त्यांच्या विविध ढंगाच्या शब्दरचना, छंदोबद्ध कवितेपासून पुढे मुक्तछंदापर्यंत झालेला प्रवास, चित्रपटासाठी लिहिलेली गाणी तसेच मराठी खासगी भावगीते असा फार मोठा व्यापक असा पट नजरेसमोर येतो. शांताबाईंची सुरवात अर्थातच त्या काळाला अनुसरून अशा छंदोबद्ध कवितांनी झाली. शांताबाईंचे कलात्मक व्यक्तिमत्व हे बहुपेडी होते म्हणजे केवळ कवियत्री नसून, व्यक्तिचित्रे, ललित आणि अनुवाद लेखन प्रकारचे गद्य लेखन देखील त्यांनी आयुष्यभर केले - प्रसंगी अर्थार्जनासाठी विद्यार्थ्यांसाठी गाइडे लिहिली पण त्याचा उल्लेख कुठेही फारसा होत नाही कारण खुद्द शांताबाईंचेच म्हणणे असे होते, गाइडे लिहिणे, हा निरुपाय होता आणि त्यात सर्जनशीलता कुठेही नव्हती. कलावंत म्हणून तशा लेखनाला कसलाही दर्जा नव्हता. याचेच वेगळा अर्थ असा लावता येतो, सृजनक्षम लेखन आणि व्यावसायिक लेखन, यांच्याबद्दल त्यांच्या काही ठाम कल्पना होत्या आणि त्या कल्पना त्यांनी शेवटपर्यंत आपल्या मनाशी बाळगल्या. अर्थात इथे मी शांताबाईंच्या कविता, इतकाच भाग अभ्यासाला घेणार आहे आणि जर का जरा बारकाईने बघितले तर शांताबाईंना "कवियत्री" हे विशेषनाम नेहमीच आवडते होते जरी त्यांनी गद्य लेखन केलेले असले तरी  प्रामुख्याने त्याचन्ह उल्लेख हा "कवियत्री" असाच होतो.  आता आपण इथे त्यासारख्या "कविता" या अंगाने विचार करणार आहोत. मी "कविता" असे म्हटले कारण शांताबाई - गीतकार म्हणून बहुतेकांना अधिक ज्ञात आहेत. गीतकार म्हणून त्यांचा मी वेगळा विचार करणार आहे. 
सुरवातीलाच मी त्यांची "कविता" हीच कविता विचारात घेत आहे. 

"शेवटची ओळ लिहिली 
आणि तो दूर झाला 
आपल्या कवितेपासून 
बराचसा थकलेला 
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा 
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतिणीसारखा 
जरा प्रसन्न, जरा शांत 
नाही खंत, नाही भ्रांत.... 

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी 
आधाराचे बोट सुटलेल्या 
अजाण पोरासारखी 
भांबावलेली, भयभीत, 
अनुभवणारी, एका उत्कट नात्याची 
परिणती विपरीत 

ती आहे आता पडलेली 
कागदाच्या उजाड माळावर 
आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधत 
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!! 

मुक्तछंदातली रचना आहे आणि सुरवातीच्या ओळी वाचताना याचा आशयाशी संबंधित परंतु संपूर्ण वेगळ्या घाटाची आणि पुढे आशय वेगळा व्यक्त करणारी आरतीप्रभुंची "मी माझ्या कवितेकडे पाहतो, एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे" या कवितेची आठवण येऊ शकते. मुक्तछंदात उत्तम भावकविता कशी मांडता येते, याचे ही कविता म्हणजे सुंदर उदाहरण आहे. आता "भावकविता" कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. 
शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. 
आता वरील कविता या विवेचनाच्या संदर्भात कुठे बसते? हा प्रश्न इथे उद्भवतो. आपण जरी सगळे कविता लिहीत नसलो तरी कधीना कधीतरी कवितेचा आस्वाद घेतच असतो. सर्वसाधारणपणे कविता वाचताना आपल्याला भावतात त्या प्रतिमा आणि प्रतिमांमधून व्यक्त होणारा आशय, जो कवितेला "जिवंतपणा" प्राप्त करून देतो. कवितेचे बीज मनात पडणे - या घटनेपासून कविता कागदावर उतरवणे,  या प्रक्रियेपर्यंतचा प्रवास हा कधीही नेमकेपणे मांडता येत नाही. 

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी 
आधाराचे बोट सुटलेल्या 
अजाण पोरासारखी 

इथेच कवितेचा खरा प्रवास दिसतो. एकदा का कागदावर लिहिली गेली की त्या कवितेची नाळ कर्त्यापासून तुटते आणि स्वतंत्र अस्तित्व धारण करते. फार पूर्वी तुकारामांनी - "म्या काय बोलिले, बोलाविले ते विश्वंभरा" असे जे म्हटले आहे, यातील जाणीव आणि शांताबाईंनी मांडलेली जाणीव यात तत्वदृष्ट्या काहीही फरक नाही तरीही  घाट आणि मांडणी यात फरक पडला जातो. आता या कवितेत कुठलाच शब्द गूढ, दुर्बोध नाही, सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत पण तरीही वाचताना, आपण अंतर्मुख होतो आणि कवित्वाशी तादात्म्य पावतो. हे जे तादात्म्य पावणे आहे, इथेच खरी भावकविता जन्माला येते. आता बघा, एक कल्पना मनात आली आणि तिला काव्यरूप दिले आणि नंतर परत वाचताना तीच कविता आपल्यापासून दूर गेल्याची भावना होते आणि थोडे त्रयस्थ स्वरूप प्राप्त होते. वेगळया शब्दात, अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीत स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.भावकविता म्हणून वरील कविता आपल्याला एक वेगळाच साक्षात्कार दाखवते आणि आपल्या जाणिवा अधिक अंतर्मुख करते. 
आता आपण शांताबाईंची "गीतकार" म्हणून प्रसिद्ध पावलेली एक कविता घेऊया. खरतर "गीतकार" म्हणून वेगळी श्रेणी निर्माण करणे, हाच एक अत्यंत चुकीचा मानदंड आहे. खोलात जाऊन विचार केल्यास, "कवी" आणि "गीतकार" यात काय फरक आहे? काहीही नाही तरीही आपल्याकडे "गीतकार" म्हणून वेगळी पायरी निर्माण केली आहे. 

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी 
एकांती मज समीप तीच तुही कामिनी. 

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे 
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे 
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी 

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे? 
मीही तोच; तीच तुही; प्रीती आज ती कुठे? 
ती न आर्तता सुरांत, स्वप्न ते न लोचनी 

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा 
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा 
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतूनी 

एखादी कविता स्वरांच्या साहाय्याने ऐकायला मिळाली की खरतर सुरांचा परिणाम हा नेहमीच दाट होतो आणि कवितेचा स्वतंत्र अससी अभ्यास करणे अशक्य होते. अशावेळी ते गाणे, कवितेच्या स्वरूपात कागदावर मांडून वाचन करणे योग्य वाटते. सूर नेहमीच आपल्यावर गारुड घालतात परंतु जर का संगीतकाराला स्वतंत्र, गेयताबद्ध, आशयपूर्ण कविता मिळाली तर चाल बांधायला हुरूप मिळतो आणि असे मत अनेक रचनाकारांनी नोंदवून ठेवले आहे. आत या पार्श्वभूमीवर वरील कविता वाचताना, सर्वात प्रथम कवितेत दडलेले गझल वृत्ताचे वजन जाणवते. मी "जाणवते" हा शब्द मुद्दामून वापरला आहे कारण गझल वृत्त आणि ही कविता, या भिन्न रचना आहेत. भावाकवितेत एक बाब निश्चित असावीच लागते आणि ती म्हणजे शब्दांची अपरिहार्यता!! कवितेतील प्रत्येक शब्दच नव्हे तर उद्गारवाचक चिन्हे, टिम्ब इत्यादी चिन्हांना देखील तितकेच महत्वाचे स्थान असते आणि त्यातूनच कवितेचा आशय विस्तारत असतो. 
प्रस्तुत कवितेत पहिल्याच कडव्यात रात्र आणि जाईचा कुंज हे संदर्भ घेऊन, ध्रुवपदातील जाणीव अधिक खोलपणे अधोरेखित केली आहे. नीरव शांततेतील रात्र आणि जवळच असलेला जाईचा कुंज, यातून विरहाची भावना मांडली गेली आहे. खरतर ही संस्कृत काव्यातील प्रतिमा परंतु तोच संदर्भ शांताबाईंनी या कवितेत 
नेमकेपणाने आणला. आपल्याकडे आजही कवितेत संस्कृत संस्कृतीचा दाखला वाचायला मिळतो आणि त्यात तत्वत्त: काहीही चुकीचे नाही.  दुसरा अंतरा वाचताना, "धुंदी", "प्रीती" या शब्दातून व्याकुळता दाखवली गेली आहे. आता अशी व्याकुळता अधिक परीणामकारक होण्यासाठी मग सांगीतिक संकल्पनांचा आधार घेणे क्रमप्राप्तच ठरते आणि मग शेवट करताना "आर्तता सुरांत" असे शब्द येणे, हे अपरिहार्य होते. ही जी अपरिहार्यता आहे, इथे भावकविता सिद्ध होते. तिथे मग दुसरा कुठलाच शब्द साजून दिसणार नाही. असे फार कमी वेळा घडते पण घडते आणि तसे घडायलाच हवे कारण त्यामुळेच कवितेची बांधणी अधिक सशक्त, घोटीव आणि बांधीव होते. 
खरतर शांताबाईंच्या अशा अनेक कविता आहेत ज्या कविता या पातळीवर स्वतंत्रपणे आस्वादाव्या लागतील. जिवंत कविता आपल्यासमोर अशी आव्हाने फेकत असते आणि अशाच कवितेतून नादाची, आशयाची घाटाची अनंत चित्रे उभी राहतात आणि प्रत्येकवेळी ती कविता एक नवनिर्मितीचा आनंद मिळवून देते. आता थोडे मूल्यमापन. मराठी कवितेतील दीर्घ अशी परंपरा आहे आणि या परंपरेत शांताबाई कुठे बसतात? हा प्रश्न आवर्जूनपणे समोर येतो. आता तुलनात्मक बोलायचे झाल्यास, शांताबाईंच्या कवितेत आरतीप्रभूंच्या कवितेत आढळणारी व्याकुळता दीर्घ काळ आढळत नाही, ग्रेसच्या कवितेतील व्यामिश्रता आणि बौद्धिकता सापडत नाही तर नामदेव ढसाळांप्रमाणे चिघळणारी सामाजिक दु:खे वाचायला मिळत नाहीत त्याचप्रमाणे बोरकर, पाडगावकरांच्या कवितेत जसा रोमँटिक स्वानंद बघायला मिळतो तितके खोलवर चित्रण आढळत नाही. परंतु असे सगळे नाकारून देखील पुन्हा कवी म्हणून शांताबाई स्वतंत्रपणे आपली नाममुद्रा ठसठशीतपणे दर्शवतात. त्यांच्या कवितेतील आवाज एखाद्या रुणझुणत्या पैंजणाप्रमाणे झुळकतात आणि त्या नादमयतेत आपल्याला घेऊन जातात. हे काहीसे भा.रा.तांब्यांच्या  कवितेसारखे झाले.  शांताबाईंची कविता राजस आहे, निर्मितीक्षम खुणा दाखवणारी आहे. इथले दु:ख चिरंतनाच्या वाटेवरील दिशा दाखवणारे आहे पण दु:खाच्या खाईत उतरून तळ दाखवणारे नाही. अशा काही मर्यादा दाखवता येतील पण तरीही मराठी कवितेत आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. 

No comments:

Post a Comment