Monday, 20 July 2015

पैस दाखवणारा मालकंस



रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण परिसर इतका अप्रतिम आणि मन गुंगावणारा असतो की क्षणभर, आपण समाधिस्त व्हावे, अशीच जाणीव मनाला चाटून जाते. नजरेच्या आवाक्यात न सामावणारा असा तो परिसर आणि त्या परिसराने मनावर पसरवलेली विलक्षण धुंदी, हे सगळे मालकंस राग ऐकताना अनुभवता येते. खरतर हा राग इतक्या प्रचंड आवाक्याचा आहे की यात काहीवेळा "वर्जित" स्वर घेऊन देखील, "संपूर्ण मालकंस" असा आगळावेगळा राग ऐकायला मिळतो.
"पंचम" आणि "रिषभ" स्वरांना इथे आरोही/अवरोही सप्तकात स्थान नाही. परंतु "षडज" आणि "मध्यम" स्वरांचा प्रभाव इतका आहे, की बाकीचे स्वर मवाळ वाटतात. अर्थात, वरती मी म्हटल्याप्रमाणे, काही कलाकार "वर्जित" स्वरांना किंचित स्थान देतात. इथे मला मारवा रागाची आठवण आली. मारवा रागात देखील, "षडज" स्वराचे अस्तित्व जवळपास नसल्यातच जमा असते किंवा नाममात्र असते आणि त्याचा वापर जितका कमी होईल, तितका मारवा राग अधिक खुलतो. "संपूर्ण मालकंस" माश्ये, "रिषभ" आणि "पंचम" या वर्जित स्वरांचा वावर अशाच प्रकारे होत असतो. असो,
सा" आणि "म" या वादी/संवादी स्वरांनी हा राग भारलेला आहे. शास्त्रकारांच्या मतांनुसार, रात्रीचा दुसरा प्रहर, या रागासाठी योग्य आहे. 

मुळातला भीमसेन जोशी यांचा धीरगंभीर, खर्जातला आवाज, प्रत्येक स्वराला फुलवून मांडायची सवय आणि स्वरविस्तारला भरपूर वाव, यामुळे ही रचना कशी अप्रतिम रंगली आहें. अगदी सुरवातीपासून, मंद्र सप्तकात, या गायकाचा आवाज भलताच विलक्षण लागलेला आहे. गमक, मिंड, बोलताना, क्वचित एखादी मूर्च्छना या आगळ्या अलंकाराने विभूषित, अशी ही समृद्ध रचना, मालकंस राग, त्याचे चलन, वजन, त्यातील स्वरांचे अलौकिक सौंदर्य, या सगळ्याचे यथोचित दर्शन घडवते. जवळपास ४३ मिनिटांची रचना असल्याने, रागविस्तार कसा करावा, रागाची बढत कशी करायची आणि हळूहळू द्रुत लयीत कसे शिरायचे, या सगळ्या बाबी इथे दृग्गोचर होतात. 


मघाशी मी, ज्या "संपूर्ण मालकंस" या रागाचा उल्लेख केला, तो राग आता आपण, इथे किशोरी आमोणकर यांच्या आवाजात ऐकुया. किशोरीताईंचा स्वच्छ, नितळ आणि सगळ्या सप्तकात सहज विहार करणारा आवाज, त्यामुळे ही रचना भलतीच खुमारेदार झाली आहे. तसे ऐकायला गेलो तर, दोन्ही रागांचा तोंडावळा जवळपास सारखा आहे, म्हणजे रागाची बढत, स्वरविस्ताराच्या जागा यात फारसा फरक दिसत नाही पण, समेवर येण्याच्यावेळी फरक स्पष्ट होतो आणि त्याच जागेवरून उमटणाऱ्या ताना, बदलत जातात, बदल तसा सूक्ष्म आहे, पण आहे.रागदारी संगीत बुद्धीगामी मानले जाते, ते असे. स्वरांच्या थोड्याशा फरकाने रागाचा चेहराच बदलून जातो. वास्तविक, हे दोन्ही राग, म्हणजे जुळी भावंडे, असे म्हणता येईल परंतु तरी देखील, चेहऱ्याच्या ठेवणीत अतिशय सूक्ष्म फरक असतो आणि तोच फरक, दोन चेहऱ्याची खूण ठरते. इथे असेच घडते. समेवर उतरताना, वर्जित स्वराचा उपयोग केला जातो पण तो इतका अस्पष्ट आहे की बारकाईने ऐकला तरच ध्यानात येतो पण ध्यानात घ्यावाच लागतो कारण त्याच्याच अनुषंगाने पुढील स्वरविस्तार होत आहे. 


"निजल्या तान्ह्यावरी माउली" हे प्रसिद्ध भावगीत याच रागावर आधारित आहे. वसंत प्रभू, आता काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला संगीतकार पण एकेकाळी आपल्या सहज, साध्या आणि गुणगुणता येतील अशा अवीट गोडीच्या चालींचा जनक. भा. रा. तांब्यांची कविता म्हणजे काव्यात गेयता कशी असावी, याचे उत्तम उदाहरण. कविता वाचत असताना, शब्दात दडलेली अनुस्यूत अशी लय, सहज उलगडत जाते आणि त्या योगे कवितेत दडलेला आशय. तसे बघितले तर तांब्यांनी, कवितेत तसे फार काही प्रयोग केले नाहीत. विषय समयोचित, संस्कृत साहित्याच्या आधाराने वाढत गेलेली आहे. त्यामुळे त्यांची कबिता वाचताना, एक प्रकारचा "राजस" अनुभव येतो. प्रस्तुत गाण्यात हाच अनुभव येतो. 
या गाण्यात, या रागातील सूरांचा आढळ बऱ्याच प्रमाणात ऐकायला मिळतो. अगदी पहिलीच ओळ ऐकली तरी. "निजल्या तान्ह्यावरी माउली" हीच ओळ मालकंस रागाची ओळख पटवते. गाण्याची चाल तशी फारशी आडवळणी नाही परंतु लताबाईंनी घेतलेले "खटके","मुरक्या" मात्र गाण्याला विलक्षण सौंदर्य प्राप्त करून देतात. 


या रागात तशा गझला कमी ऐकायला मिळतात. "लोग कहेते है अजनबी तुम हो" ही गायक हरिहरनने गायलेली अप्रतिम रचना आहे. बऱ्याचशा गझल गायनात, पहिला शेर गायच्या आधी बरीच आलापी असते आणि त्यातून पुढील चालीचे सूचन असते. एकदा रचनेत शायरी अवतरली की मग, काव्याच्या अनुषंगाने गायन करायचे, असा एकूण पायंडा दिसतो. इथेही याच अंगाने गझल गायली गेली आहे. हरिहरनचे वैशिष्ट्य असे, गाण्याचे सुरवातीचे शिक्षण कर्नाटकी संगीताने झाले पण पुढे उत्तर भारतीय संगीत देखील तितक्याच अधिकाराने आत्मसात करून, त्यात प्राविण्य मिळवले. गमतीचा भाग म्हणजे इथे ही गझल गाताना. कुठेही कर्नाटकी संगीताचा लवलेश देखील आढळत नाही. कर्नाटकी गायकी शिकलेल्या बहुतेक गायकांना असा फरक करून गाणे जमत नाही. 
इथे पहिल्याच आलापित मालकंस रागाची ओळख पटते आणि पुढील सगळी रचना, बहुतांशी याच अंगाने विस्तारित होत जाते. 


"अखियन संग अखिया लागी" हे मोहम्मद रफीच्या आवाजातील गाणे असेच या रागातील उत्तम रचना म्हणून निर्देशित करता येईल. तालाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, गाण्यात सरळ, सरळ दोन ताल दिसतात आणि त्यात तसे फारसे प्रयोग दिसत नाहीत. नेहमीचा त्रिताल आणि केरवा ताल ऐकायला मिळतो. गाण्याच्या सुरवातीला. "मन तरपत हरी दर्शन" या प्रसिद्ध गाण्याची झाक दिसते परंतु नंतर मात्र गाणे वेगळे होते. एकाच रागातील ही दोन्ही गाणी असल्याचा हा परिणाम. 
गाणे जसे द्रुत लयीत जाते, तशी गाण्यात सरगमचा सुंदर उपयोग केला आहे. हे गाणे त्या दृष्टीने रागाचे लक्षण गीत म्हणून म्हणता येईल. 


"तू छुपी ही कहा" हे गाणे तसे मालकंस रागावर आहे पण बऱ्याचवेळा रागाची बंधने सोडून चाल सुटी होते, पण एक गाणे म्हणून मला फार आवडते. या गाण्याची गंमत म्हणजे इथे केरवा ताल वापरला आहे पण, तरीही ऐकताना पारंपारिक ताल ऐकायला मिळत नाही आणि ही किमया सी. रामचंद्र यांची. चित्रपटातील गाणे कशाप्रकारे सजवता येते, यासाठी हे गाणे अभ्यासावे, इतक्या तोलामोलाचे आहे. गंमत म्हणजे जरी गाणे रागाची बंधने सोडून जात असले तरी प्रांत समेवर येताना, मालकंस ऐकायला मिळतो. सुगम संगीतात, रागाचे नियम तोडून रचना केली तरी अखेर त्या रागाशी नाते जुळवून घ्यावेच लागते. गाण्यातील वाद्यांचा अनोखा वापर, हे या गाण्याचे आणखी वैशिष्ट्य सांगता येईल. खरतर गाण्याची सुरवातीची चाल आणि पुढे विस्तारित झालेली चाल, यात बरेच अंतर आहे पण, ज्या हिशेबात चाल आणि लय बदलत जाते, ते सगळेच अनुभवण्यासारखे आहे. 

इथे मी आणखी काही गाण्याच्या लिंक्स देत आहे. 

१] मन तरपत हरी दर्शन को आज 

२] मुझे ना बुला 

३] उगवला चंद्र पुनवेचा 

कविता - मी माझ्या कवितेकडे……….

तसे बघायला गेल्यास, प्रत्येक कवी हा आत्मकेंद्रित, स्वभावात: आत्ममग्न असतो अन्यथा त्याशिवाय कवितेची प्रक्रिया पुरी होणे अवघड आहे. भावकवितेच्या संदर्भात विचार करता, हे फारच निकटतेने अनुभवायला मिळते. याच दृष्टीने आपण, भावकवितेचे स्वरूप बघण्याचा प्रयत्न करुया. 
जीवनात अनेक अनुभव येत असतात, त्यांतील काही संवेदनाद्वारे स्वत:ला आलेले, काही कल्पनेने जाणलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. परंतु यांपैकी एकाच्या किंवा सर्वांच्या मधून मिळालेल्या अनुभवांचा एकात्म आणि अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती निर्माण होते, तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून आपणांस जाणवते आणि हे स्पंदन वर उल्लेखिलेल्या साऱ्या अनुभवात्मक घटकांच्या विशिष्ट गती, दिशा, वजने आणि लय, यांमुळे निर्माण होणारे जे अंतर्गत ताण असतात, त्यांतून जाणवत असते. 
एखादा अनुभव हा कोणत्या तऱ्हेने घेतला गेला त्यावर त्याची सारी गुणवत्ता अवलंबून असते, आणि त्यामुळे या भाववृत्तीचे अनुभवाच्या क्षणाशी एक अभेद्य असे नाते असते. या सर्व ताण, अनुभवाचा क्षणासहित जर रसिकाच्या मनात जागृत झाला तर त्या क्षणाच्या जाणीवेतून मग कवीला जाणवलेल्या भाववृत्तीचा अनुभव रसिकाला देऊ शकतो. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट भाववृत्तीने भरलेल्या क्षणांच्या स्पंदनाचा "आभास" निर्माण करणे, हे भावकवितेचे खरे कार्य!! आणि हा जो आभास आहे, जी कविता जीतल्या चांगल्या रीतीने निर्माण करू शकेल तितक्या प्रमाणात तिची गुणवत्ता, असे म्हणता येईल. 
आरतीप्रभूंची कविता, वरील विवेचनाशी फार जवळचे नाते सांगते. 
सुरवातीला मी जे म्हटले होते, त्याप्रमाणे ही कविता, एका आत्ममग्न क्षणाचे आणि त्याचबरोबर आशय अभिवृद्ध करणाऱ्या अनुभूतीची सुंदर बंदिश आहे, कविता, मुक्तछंदात आहे, हे एका दृष्टीने योग्यच आहे. छंदोबद्ध कवितेत सगळे ताण अनुभवता येत नाहीत, असे म्हणायचे नाही परंतु ज्या कवितेची प्रकृती अति आत्ममग्न आहे, त्या वृत्तीला मुक्तछंदात आवश्यक तितके स्वातंत्र्य मिळते. त्यातच संवेदनाविश्व आणि भाववृत्ती यांच्या एकात्मतेचे सूत्र सापडते. शब्द, शब्दांची विशिष्ट प्रकारे केलेली गुंफण, यांच्यातून आणेल लय त्यांनी सादर केले आहेत. 
"या माझ्या अजाण कवितेचा अपमान 
कां करतां बाबांनो - कां? 
प्रेम हवय का या कवितेचं? 
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला? 
खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. "
इथे मी आपल्या सोयीसाठी खंड पाडून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका बाजूने अभंग असा आत्मविश्वास तसेच दुसऱ्या बाजूने थोडीशी दटावणी, अशा संवादी पातळीवर ही कविता सुरु होते. 
एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि तो स्थित होत आहे, असे वाटत असताना(च) त्याला किंचित धक्का देऊन, ही स्थिरता भाववृत्तीवर तोललेली आहे, असे दाखवायचे, हेच सूत्र इथे दिसते. 
"काय काय द्याल? 
आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला? 
पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा 
तुमच्याच तळहातावर 
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल, 
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला 
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील. 
कराल?"
हा रसिकांशी साधलेला संवाद खरा पण, त्याचबरोबर ती कविता समजून घेण्यासाठी, जो आत्मविश्वास आणि त्याच्या जोडीने आलेला थोडा मग्रूरपणा, याचे सादरीकरण आहे. परंतु त्याचबरोबर "स्वातीच्या थेंबाची" तरल कल्पना देखील उपयोगात आणली आहे. आरतीप्रभूंच्या कवितेचे हे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल, एका बाजूने कवितेची प्रकृती "अळुमाळू" ठेवायची पण दुसऱ्या बाजूने ती कविता स्वीकारण्यासाठीची मोजावी लागणारी किंमत देखील दाखवावी लागते. विशेषत: "नक्षत्रांचे देणे" या काव्यसंग्रहातील कविता वाचताना, ही जाणीव मनातून बाजूला सारणे सर्वथैव अशक्य!! 
एखादी अगदी मंद लयीतील प्रतिमा निर्माण करायची आणि त्याचबरोबर, तिच्यावर जाणीव हेलकावयाला लागली की,  तिच्यात अनपेक्षित द्रुत लय मिसळायची आणि या धक्क्यातून परिणाम साधायचा. भावकवितेचे हे देखील आगळे वैशिष्ट्य मानता येईल. 

"माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतो 
भीत भीत स्पर्श करतो तेंव्हा तिचे डोळे 
पाणावल्या सारखे चमकतात. 
डहळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम. 
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते. 
या कवितेच्या मुलायम केसांवरून 
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश. 
वाटत की ती आताच उभीच्या उभी 
निसटून जाणार आहे 
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात.
स्पर्श करतांना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही 
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा."

इथे देखील प्रतिमा कशा आशयाशी नाते सांगत आहेत. मनातील भावस्पंदने ही नेहमीच तात्कालिक असतात परंतु त्या तात्कालीकतेत देखील किती अर्थपूर्ण आशय मांडता येतो, हे आपल्याला किती अप्रतिमपणे बघायला मिळते. प्रतिमांची एकदम उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसरीने पुसुन टाकायचा. दोघींच्या अशा मिश्रणातून, तिसरीच प्रतिमा निर्माण करायची आणि या बदलत्या घटनांतून, भाववृत्तीचा क्षण साकार करायचा!! 
अशा विविध आणि संपन्न तऱ्हांनी घडविलेल्या सौंदर्यात्मक बंदिशीतून आरतीप्रभू संवेदनाविश्व आणि भाववृत्ती यांचा अनोखा संयोग साधतात. 

" या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका 
कारण ती ज्या वाटा चालते आहे 
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या. 
मोडून पडाल!!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर 
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे 
रुद्राक्षमणी ओवून 
जपमाळ करावी लागेल 
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्रचर्म. 
आहे तयारी?"
भाववृत्तीतील अनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना आत्मकेंद्रित करणारे जे एक सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन, या स्पंदनाचा लय म्हणजे त्या भाववृत्तीचा लय. हा लयच भावकवितेला भावकविता बनवतो. वरील ओळी जर थांबून, विश्रांती घेत वाचल्या तर आपल्या ध्यानात येईल, इथे अनेक प्रतिमा एकत्रित आल्या आहेत परंतु त्यामागे, एक सूत्र आहे - माझ्या कवितेची किंमत!! मग, त्यासाठी प्रतिमा म्हणून अर्वाचीन काळातील संदर्भ आणून, त्या शब्दांचा केलेला वापर आणि त्यातून साधलेला आशय आणि आशयाच्या घडणीसाठी निर्माण केलेली शब्दांचीच घट्ट वीण. कवितेच्या ओळी वाचताना, वाचकाचे लक्ष सतत केंद्रीभूत करण्याची फार मोठी गरज असते आणि त्यासाठी मग, प्रतिमांचा वापर करून, आशयाची अभिव्यक्ती अधिक संपन्न करायची, हा खेळ आरतीप्रभू फारच बहारीने करतात. 

"जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पहा तिच्याकडे डोकें वर उचलून. 
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्र वेदना 
तुम्हांला सोसायच्या नाहीत." 

कवितेची भाषा स्पष्ट, सरळ आणि समजायला सोपी आहे. मुळात भावकाव्य हे स्वभावत:च वैय्यक्तिक अनुभवांची विशिष्टता शोधत जाणारे काव्य असते. असे असले तरी आरतीप्रभूंची कविता वाचकाला, वैय्यक्तिक अनुभवाची अत्यंत निकाताची अशी प्रचीती देऊ शकते. इथे तशी वाच्यार्थाने आढळणारी दुर्बोधता चुकुनही आढळत नाही. एखादा अनुभव काव्यरूप घेतो, तेंव्हा तो कवीच्या जाणीवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वत:चे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वैय्यक्तिक जीवनाशी असलेली नाळ तोडणे गरजेचे असते आणि इथे त्याचाच अनुभव सतत येत आहे. 
"मी स्वत: पाहातोय स्वत:च्याच कवितेला 
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेऊन."

कुठल्याही कलाकृतीचा शेवट हा नेहमीच थोडा अनपेक्षित असला तर वाचकाला देखील विस्मय वाटून, त्या कलाकृतीबद्दल मनात आकर्षण निर्माण होते. सगळी कविता, कवितेच्याच अंगाने वाचत असताना, शेवट मात्र एकदम अंगावर येतो आणि वाचक स्तिमित होतो - खानोलकरांच्या अगोचर प्रतीमासृष्टीप्रमाणे!!  

विरही बागेश्री

रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात. 
रागाची मांडणी बघायला  गेल्यास, आरोहात पाच स्वर तर अवरोहात संपूर्ण सप्तक आहे - म्हणजेच औडव/संपूर्ण असा राग आहे. आरोहात "पंचम" आणि "रिषभ" वर्जित तरीही "कोमल निषाद","दोन्ही मध्यम" तसेच "कोमल गंधार" असल्याने रागाची प्रकृती नाजूक अशीच आहे. शास्त्रकारांनी या रागाचा समय मध्यरात्र असा दिलेला आहे. इथे बहुतेक कोमल स्वरांचा प्रभाव असल्याने, ठाय लयीत आणि मंद्र स्वरी सप्तकात. इतक्या प्रकारचे विभ्रम ऐकायला मिळतात की, प्रत्येक कलाकाराला या रागाची मांडणी वेगवेगळ्या प्रकाराने करायला अवसर देते. रात्रीच्या गूढ अंधारात हातातील हिऱ्यातून फाकणाऱ्या अननुभूत प्रकाश किरणाने आसमंत उजळून निघावा त्याप्रमाणे या रागाचे स्वर, कलाकाराच्या मगदुराप्रमाणे या रागाचे सौंदर्य दाखवतात. अर्थात "विरह" आणि "करुणा" हे या रागाचे खरे भाव आहेत, असे म्हणता येईल. या रागाची आणखी खासियत अशी सांगता येईल, या रागात तुम्ही आलापी कितीही वेळ रंगवून आळवायला भरपूर संधी आहे. बहुदा त्यामुळेच या रागात  "विरही" भाव अधिक सुंदर खुलतो. 

याच विवेचनाच्या आधारावर, आपण इथे कौशिकी चक्रवर्ती या गायिकेने मांडलेला बागेश्री ऐकुया. 


मुळात या गायिकेचा गळा इतका लवचिक, सुरेल आणि संपूर्ण सप्तकाला आवाक्यात सहज घेणारा असल्याने, गळ्यातून येणाऱ्या तानेला कुठेही "अटकाव" म्हणून नसतो. त्याचा परिणाम असा  होतो,गळ्यातून येणारी ताण, हरकत ही अतिशय स्वच्छ, सलग असते. बंदिशीच्या सुरवातीलाच, "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद" जोडीने आल्याने, आलापी अतिशय सुंदर खुलते. गंमतीचा भाग ऐकण्यासारखा असा आहे, वादी स्वर मध्यम आणि हे दोन्ही कोमल स्वर इतके बेमालूम मिसळलेले आहेत की बागेश्री पहिल्याच आलापित आपल्या समोर येतो. 
यात आणखी गंमत म्हणजे सरगमचा वैशिष्ट्यपूर्ण वापर. गाण्यात बरेचवेळा सरगम घेतली जाते, ती त्याच्या आधीच्या तानेच्या संदर्भात किंवा पुढे  येणारी जी तान आहे, त्याचे आरेखन मांडणारी असते. त्यामुळे सरगम म्हणजे "स्पेलिंग" असा काहीवेळा प्रकार होतो. ताण घेत असताना, ती सरगम बरोबर जोडून घेणे किंवा सरगम संपत असतना, तिला हरकतीच्या वेलबुट्टीची आरास चढविणे, ही खास ऐकण्यासारखे आहे. सरगम मधून परत मुख्य प्रवाहात येणे, ही देखील अप्रतिम कला आहे आणि ती इथे स्पष्टपणे ऐकायला मिळते. तसेच, बंदिश मध्यलयीत असताना, त्याच लयीत "तराणा" गायलेला आहे. फारच सुरेख गायन. आपल्याकडे "तराणा" हा शक्यतो द्रुत लयीत मांडला जातो आणि तालाशी त्याचे नाते जुळवले जाते. 
इथे बंदिशीच्या ओघात "तराणा" सुरु केला आहे आणि त्याचबरोबर सरगम जोडीने घेतली आहे. याचा फायदा असा होतो, सरगम ऐकताना, "कोमल" स्वर कुठले आणि "तीव्र" स्वर कुठले, याचे भान रसिकाला नेमकेपणाने समजून घेता येते. साधारणपणे तान ऐकताना, अशा स्वरांचा "अदमास" घेणे कधीकधी अवघड होऊन जाते.

संगीतकार सी. रामचंद्र आणि लताबाई. या जोडीने कितीतरी अजरामर गाणे दिली आहेत आणि रसिकांचे कान तृप्त केले आहेत. या संगीतकाराचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, यांनी बांधलेली गाणी अतिशय गोड, श्रवणीय तर असतात(च) पण, त्याचबरोबर आपणही गाऊ शकतो, असे आवाहन करणारी असतात. अर्थात, लताबाईंच्या हरकती घेणे मुश्किल असते तरीदेखील, गाण्याच्या चालीचा स्वत:चा असा अप्रतिम गोडवा असतो आणि तो गोडवा, रसिकांना गायला प्रवृत्त करीत असतो. प्रस्तुत गाणे अतिशय साधे, सरळ आहे पण तरीही अप्रतिम गोडवा त्या गाण्यात भरलेला आहे. 


गाण्यात नेहमी  वापरला जाणारा "दादरा" ताल आहे पण, तालाची योजना किती सुंदर आहे. सुगम संगीतात, कुठल्या शब्दावर समेची मात्रा ठेऊन, त्या गाण्याचे सौंदर्य कसे वाढवायचे, यावर संगीतकाराची, शब्दाची जाणकारी दिसून येते. गाण्याची चाल अतिशय सरळ आहे पण ठिसूळ नाही!! गाण्यात सुरवातीच्या सुरांपासून बागेश्री दिसत आहे पण तरीही हे गाणे आहे, याची जाणीव असल्याने. त्या रागाच्या सावलीतच गाण्याची चाल बांधली आहे. खरे तर बागेश्री राग, बहुदा या संगीतकाराचा खास आवडीचा राग असावा, असे वाटते, त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी इतर वेळी देखील, बागेश्री रागाचा अप्रतिम उपयोग करून घेतल्याचे आढळून येते. मी वरती, या रागाच्या भावदर्शनाबद्दल "विरही',"करुन" असे शब्द वापरले होते परंतु या भावनांचा परिपोष असून देखील, याच रागातून, अशी आनंदी, उत्फुल्ल तर्ज शोधून काढण्याचे कसब मात्र याच संगीतकाराचे. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असेल तर तुम्ही रागाच्या पलीकडे जाउन देखील रागाशी साम्य दाखणारी तर्ज निर्माण करू शकता, हे आणखी खास वैशिष्ट्य इथे सांगता येईल. 

हृदयनाथ मंगेशकरांनी या रागावर आधारित काही गाणी बांधली आहेत. मंगेशकरांच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांच्या गाण्यात कवितेचा दर्जा नेहमीच अतुलनीय असतो. किंबहुना, ज्या कवितेला चाल लावायची आहे, ती कविता आशयघन असणे, त्यांना जरुरीचे वाटते. मराठीतील अनेक कवी - खास करून असे कवी जे कधीही भावगीतकार म्हणून प्रसिद्ध नव्हते, अशा कवींच्या कविता हुडकून काढून, त्यांना चाल लावणे, मंगेशकरांना नेहमीच आव्हानात्मक वाटत आले आहे. त्यामुळे, गाणे म्हणून आस्वाद घेताना, कविता म्हणून देखील त्या गाण्याचा आस्वाद घेणे तितकेच आनंददायी असते. कवितेचा, कविता म्हणून एक आशय ध्वनित होत  असताना, सुरांच्या मदतीने त्याच कवितेचा वेगळाच आशय काहीवेळा अनुभवायला मिळतो आणि तीच कविता झळाळून उठते. आता सुगम संगीतात "कविता" असावी का नसावी, हा एक सनातन विषय आहे आणि अर्थातच त्याचा इथे उहापोह करण्यात काहीच हशील नाही. परंतु कविता दर्जेदार असेल तर संगीतकाराला, चाल बांधायला हुरूप मिळतो, असे कित्येक रचनाकारांनी मान्य केलेले आहे. 


"घनु वाजे घुणघुणा, वारा वाजे रुणझुणा" ही ज्ञानेश्वरीमधील अशीच अप्रतिम काव्यरचना. या रचनेतील पहिलाच आलाप बागेश्री रागाची खूण पटवतो. हा आलापच किती कठीण आहे आणि त्यावरून पुढील रचना कशी वळण घेईल, याचा थोडाफार अंदाज बांधता येतो. वास्तविक, या गाण्यात, "निर्मळ" बागेश्री सापडत नाही तरी एकंदरीत गाण्यावर याच रागाची सावली आहे. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, या गाण्याचा कविता म्हणून आस्वाद घेत येतो आणि तो तसा घेत यावा, म्हणून गाण्यात फार कमी वाद्ये वापरली आहेत, ज्यायोगे सुरांचे शब्दांवर आक्रमण होऊ नये. अर्थात, नेहमीप्रमाणे, "अनघड" चाल, हे या गाण्याचे लक्षण दिसून येते आणि त्यामुळे ऐकायला गोड वाटणारे गाणे, त्यातील हरकतीसहित गायचे म्हणजे परीक्षाच असते. 

गुलाम अली, हे असेच गझल गायकीमधील सुप्रतिष्ठित नाव. मेहदी हसन साहेबांनी रागावर आधारित गझलांच्या चाली बांधल्या तर गुलाम अलींनी, ठुमरीला हाताशी धरून, गझल गायनाला नवा रंग दिला. 


"मस्ताना पिये जा युंही, दिवाना पिये जा" हीच ती गझल. बागेश्री रागातील नखरेल रंग शोधून, उस्तादांनी अप्रतिम रंग दिला आहे. या सादरीकरणात, आपल्या नेहमीच्या शैलीला थोडी मुरड घालून, किंचित भावगीताच्या अंगाने गायन केले आहे. खानसाहेबांच्या गायकीवर काहीवेळा एक आक्षेप घेतला जातो - गझल गाताना, त्यात इतक्या वेळा तानांचा वर्षाव केला जातो की त्यात शायरी कुठल्याकुठे विसरली जाते आणि गायकीची कलाकुसर फक्त ध्यानात रहाते. पण, इथे मात्र अत्यंत लडिवाळपणे, स्वरांना गोंजारत अति आत्मीयतेने गायन केले आहे आणि त्यामुळे आपण शायरीची देखील मजा घेऊ शकतो.

आता आपण या रागावर आधारित अशीच काही वेगवेगळ्या रंगांची गाणे बघूया. 

१] हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया

२] जाग दर्द ऐ इश्क जाग  

३] तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे 

आर्जवी केदार

सर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात येते. या रागात, जोगिया, मारवा रागात आढळणारे पिळवटून टाकणारे दु:ख  नसते,यमन प्रमाणे सर्वस्व समर्पण करण्याची वृत्ती दिसत नाही, मालकंस प्रमाणे अचाट भव्यता आढळत नाही आणि दरबारीप्रमाणे स्वरांचे अलौकिक वैभव बघायला मिळत नाही. केदार ऐकताना, इतर रागांची आठवण येते पण तरीदेखील, स्वत:चे व्यक्तित्व जपून ठेवलेले असते. 
वास्तविक, या रागात मध्यम आणि पंचम स्वरांचा आढळ दिसतो पण तरीही मध्यम स्वराचे स्वामित्व इतके प्रखर असते की, बिचारा पंचम बाजूला वळचणीला पडलेला दिसतो. शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यम, या दोन्ही स्वरांने या रागाला बांधून ठेवले आहे. याचाच परिणाम असा झाला, या रागाच्या वादी-संवादी स्वरांत षडज स्वराबरोबर मध्यम स्वर येणे अगदी अपरिहार्य झाले. या रागाच्या स्वरयोजनेत, प्रत्येक ठिकाणी मध्यम येणे, जवळपास अनिवार्य ठरावे, इतके महत्व या स्वराला प्राप्त झाले. अर्थात, रागाचे स्वरूप "षाडव-संपूर्ण" असे असल्याने, स्वरविस्तार मात्र भरपूर आढळतो. इथे आपण, या रागाची खास ओळख दाखवणारी स्वरयोजना बघूया."म ग प म(तीव्र) प ग म ध" हे स्वर केवळ आणि केवळ केदार रागाचीच ओळख दाखवतात आणि मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, "मध्यम" स्वर या रागाला कसा व्यापून टाकणारा आहे, हेच इथे दिसून येईल. 
आता रागाचा "स्व" भाव बघायला गेल्यास, इथे बहुतेक सगळ्या भावनांना भरपूर वाव आहे. प्रणयी, राग, विरह, प्रार्थना इत्यादी अनेक भाव या रागातून यथार्थपणे ऐकायला मिळतात आणि त्यायोगे रागाचे वैविध्य!!
आता आपण, इथे उस्ताद राशीद खान यांची एक सुंदर रचना ऐकुया. मुळात केदार सारखा लडिवाळ राग आणि त्याला जोडून उस्तादांची तशीच लडिवाळ लय!! रचना खुलून आलेली आहे. "कान्हा रे, नंद नंदन" ही तीनतालातील बंदिश आहे. या बंदिशीत, गायकाने घेतलेल्या ताना, बोलताना आणि हरकती मुद्दामून ऐकण्यासारख्या आहेत. रागदारी संगीत म्हणजे केवळ तानांची भेंडोळी किंवा सरगमची बरसात असे नसून,  आधीच्या तानेशी तितकेच नाते सांगत आणि ते सांगत असताना, स्वरविस्तार कसा करायचा, याचा सुंदर वस्तुपाठ आहे.

https://www.youtube.com/watch?v=2UH4X11mVk0

चित्रपट संगीतात, संगीतकार नौशाद यांनी रागदारी संगीताचा मुबलक वापर केला आहे. सुदैवाने, ज्या चित्रपटात शास्त्रीय सांगितला प्राधान्य आहे, असे बरेच चित्रपट मिळाल्याने, नौशाद यांना, रागदारी संगीत वापरण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यांनी, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. प्रस्तुत गाणे, "मुगल-ए-आझम" चित्रपटातील आहे आणि केदार रागाची खरी ओळख करून देणारे आहे. हे गाणे , एक कविता म्हणून देखील नि:संशय वाखाणण्यासारखे आहे. अर्हत, याचे श्रेय, शकील बदायुनी, या शायरकडे जाते. 


"बेकस पे क्रम किजिये" हेच ते गाणे. अगदी, गाण्याचा सुरवातीच्या शब्दापासून जर नीट ऐकले तर, "नखशिखांत" केदार असेच म्हणता येईल, किंबहुना, केदार रागाचे लक्षण गीत म्हणून सहज ओळखले जाते. तुरुंगाचा भव्य सेट आणि चित्रपटातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगी योजलेले हे गाणे. अशा गाण्यात, लताबाईंची गायकी देखील कशी खुलून येते. गाण्यात जवळपास सगळे उर्दू भाषिक शब्द आहेत आणि उर्दू भाषेचा स्वत:चा म्हणून खास "लहेजा" असतो आणि तो नेमका जाणून घ्यावा लागतो, ज्यायोगे त्या भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. या दृष्टीने देखील हे गाणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
विरहाची गाणी गाणे, हे लताबाईंच्या गळ्याला जितके शोभून दिसते तितके इतर गळ्याला नाही. इथे हाताशी केदार रागाची तर्ज, शकील बदायुनीची अप्रतिम शायरी आल्यावर, गायिकेने चालीचे सोने केले तर त्यात नवल ते कुठले!! मुळातला नाजूक स्वभावाचा राग, त्यातील तानांची भेंडोळी बाजूला सारून, नेमक्या स्वरावलींनी खुलावलेली चाल, हा खऱ्या अर्थी श्रवणानंद आहे. 

आता आपण, एक सुंदर प्रणयी आविष्काराचे गाणे ऐकुया. 


"आप युंही अगर हमसे मिलते रहे" हेच ते गाणे. "एक मुसाफिर एक हसीना" चित्रपटातील अप्रतिम युगुल गीत. आशा भोसले यांच्या कारकिर्दीला खरा आकार मिळाला, तो याच गाण्याच्या संगीतकाराकडे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. ओ.पी. नैय्यर वास्तविक, संगीताचे शास्त्रशुध्द अभ्यास करून झालेले संगीतकार नव्हेत परंतु तरीही त्यांनी ज्या प्रकारे तालाचा वापर, त्यांच्या गाण्यांमधून केलेला आहे, तो नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. इथे देखील या गाण्यात केहरवा ताल आहे पण, त्याचे वजन इतके उठावदार आहे की त्या तालावर आपली मान डोलायलाच हवी. या गाण्यात बघा, सुरवातीच्या दोन ओळी झाल्यावर लगेच सतारीची किणकिण कानावर येते आणि ती किणकिण, हीच केदार रागाची खूण आहे. लेखाच्या सुरवातीला, मी एक स्वरसमूह दिला आहे, त्याचे तंतोतंत प्रत्यंतर या सतारीच्या सुरांतून आपल्याला मिळते. किंबहुना संपूर्ण गाण्यात, मधूनच आलापी आणि त्याच्या जोडीला सतारीचे स्वर, असा स्वरमेळ ऐकायला मिळतो आणि तो स्वरमेळ, केदार रागाकडेच निर्देशन करीत असतो. 

ही गाणे आणि याआधीचे गाणे, केदार राग किती मनोरंजक पद्धतीने मांडता येतो, याचे निर्देशक आहेत. वास्तविक या गाण्यात, केदार शुद्ध स्वरूपात, सारखा आढळत नाही परंतु सावलीबाहेर जाउन देखील, सावलीशी साहचर्य सतत राहते.  एक दोन ठिकाणी चक्क लोकसंगीताशी नाते जोडलेले दिसून येते पण ही तर संगीतकाराच्या व्यामिश्रतेची कमाल म्हणायला हवी.  

आता आपण, एका असामान्य गझल गायकाची रचना ऐकुया. 


मेहदी हसनची गायकी हा एक स्वतंत्र दीर्घ निबंधाचा विषय आहे. अत्यंत मुलायम तसेच रागदारी संगीतातील सगळ्या अलंकारांचा ठाशीव उपयोग करून घेणारा. साधारणपणे, मंद्र सप्तकात शक्यतो गायन करण्याची वृत्ती असल्याने, गझलेतील, शब्दांचे सौंदर्य कसोशीने सादर करण्याची सवय इत्यादी वैशिष्ट्यांमुळे मेहदी हसन, हे नाव अजरामर झाले. हा खऱ्याअर्थी गझल गायकीतील "उस्ताद"!! 
"भूली बिसरी चंद उम्मिदे" सारखी अप्रतिम गझल केवळ याच गळ्यातून यायला हवी, अशी अपरिहार्यता याच्या गायनाची आहे. इथे बघा, सुरवातच अगदी केदार रागाच्या सुरांची ओळख करून दिली आहे. पुढे केदार राग बाजूला राहतो पण तरीही या रागाचा "असर" सगळ्या रचनेवर निश्चित पडलेला आहे. सुरवात अगदी ठाय लयीत होऊन, पुढे हळूहळू द्रुत लयीत शिरण्याची लकब आणि ती देखील फारशी जाणीव करून न देता!! अंतरा संपत असताना, केहरवा ताल एकदम दुगणित जातो आणि लय थोडी द्रुत होते पण हा सगळा सांगीतिक खेळ, लयीचे सगळे "विभ्रम" भलतेच अप्रतिम आहेत. गंमत बघा, इथे पारंपारिक केहरवा ताल आहे तर या आधीच्या चित्रपट गाण्यात हाच ताल असून, तसा पटकन ध्यानात येत नाही. 

आता आपण, अशीच सुंदर प्रार्थना ऐकायला घेऊ. या गाण्याने, हिंदी चित्रपट संगीतात एका नवीन गायिकेची कारकीर्द एकदम लोकांच्या समोर आली. 


खरे बघितले तर संगीतकार वसंत देसाई यांची कारकीर्द प्रामुख्याने झळकली ती,राजकमलच्या चित्रपटांमधून परंतु त्याबाहेर देखील त्यांनी भरपूर काम केले आहे आणि त्याद्वारे, आपल्या प्रतिभेचे वेगवेगळे रंग दाखवून दिले आहेत. चालीतील वैविध्य तसेच रचनेत, अचानक नवीन लयबंध तयार करून, ऐकणाऱ्याला  चकित करून सोडायचे, ही त्यांच्या रचनेची खासियत होती. इथे देखील हेच आपल्या दृष्टीस पडेल. गाण्याच्या सुरवातीलाच जी मंद्र सप्तकातील लय आहे, तिचेच स्वर, केदार रागाचे सूचन करतात. शाळेतील प्रार्थना आहे, हे लक्षात घेऊन, गाण्यात फारशी "गायकी" न ठेवता, केवळ चालीतील गोडव्यातून, प्रार्थना उभी केली आहे परंतु आपले म्हणून खास वैशिष्ट्य असावे म्हणून की काय पण, गाण्याचा ताल बघण्यासारखा आहे. वारंवार वापरला जाणारा दादरा ताल आहे पण, ऐकायला येताना, तेच "बोल" फार अनोख्या पद्धतीने आले आहेत. केदार रागाचे जे "आर्जव" आहे, ते अशा रचनेतून फारच सुरेख व्यक्त होते. 

आता मी या रागावर आधारित काही गाण्याच्या लिंक्स देतो आणि हा लेख संपवतो. 

१] दर्शन दो घनश्याम नाथ मोरी

२] साजन बिना निंद ना आवे 

३] आज मी आळविते केदार 

दयार्द्र पिलू

आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी पण झोप दूर असावी, आसमंत निरव शांत असावा, आकाश निरभ्र असावे आणि कानावर "पिलू" रागाचे स्वर यावेत!! आपोआप डोळे मिटण्याची क्रिया सुरु होते. पिलू रागच असा आहे,, स्वर ऐकताना मनावर गुंगीचे साम्राज्य पसरते. "रिषभ" वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु "गंधार","मध्यम" आणि "निषाद" दोन्ही प्रकारे लागतात. "धैवत" स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग "औडव-संपूर्ण" असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या "धैवत" स्वराच्या स्पर्शाने!! "गंधार" आणि "निषाद" हे वादी-संवादी स्वर. अर्थात हा झाला रागाचा  तांत्रिक भाग. रागाचे स्वर आणि लिपी कितीही अर्थवाही असली तरी त्याला एक ठराविक मर्यादा असते. म्हणजे ज्यांना स्वरज्ञान आहे, त्यांनाच ही भाषा समजून घेता येते अन्यथा इतरांना ही भाषा अगम्य असते. खरतर पिलू रागाचे "टेक्श्चर" बघायला गेले तर इथे प्रणय, करुणा, भक्ती समर्पण इत्यादी सगळ्या भावनांचा कल्लोळ ऐकायला मिळतो. 
गमतीचा भाग असा आहे, हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही म्हणजे जसे यमन, भूप हे राग सलग तासभर आळवले जातात, तशा प्रकारचे सादरीकरण या रागाचे होत नाही, बहुतांशी, ठुमरी, दादरा, होरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारातून हा राग मांडला जातो. अर्थात, चित्रपट गीत आणि भावगीत, यांत मात्र अपरिमित पसरलेला आहे. 


बेगम परवीन सुलताना यांची एक रचना इथे ऐकता येईल. बेगम साहिबांचा आवाज म्हणजे तानेला कुठेही अटकाव म्हणून नाही. तरीही तार सप्तकात अधिक आनंद घेणारी गायकी. ज्या सहजतेने, ताना आणि त्याच्या जोडीने हरकती येतात, ते खास ऐकण्यासारखे आहे. एकतर तार स्वरात जाणे, हीच गळ्याची एक कसोटी मानली जाते पण इथे तर, तार स्वरात जाताना आणि तिथे ठेहराव घेताना, त्यालाच जोडून एखादी हरकत घेण्याची असामान्य करामत करण्याची क्षमता थक्क करते. या रागात आणखी एक मजा आढळून येते. मैफिलीत हा राग, फारसा गायला जात नाही, वादक मात्र वाजवताना आढळतात. 


इथे आपण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची या रागातील एक रचना ऐकुया. उस्तादांचा लडिवाळ स्वर तसेच सगळ्या सप्तकात सहज फिरणारा गळा, त्यामुळे ही रचना केवळ संस्मरणीय झाली आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढल्या क्षणी तार सप्तकात जाउन, परत समेवर ठेहराव घेण्याची पद्धत तर लाजवाब!! "सैय्या बोलो" ही रचना म्हणजे पिलू रागाची ओळख, इतकी प्रसिद्ध रचना झाली आहे, ती काही उगीच नव्हे. उस्तादांच्या गायकीची सगळी वैशिष्ट्ये या सादरीकरणात ऐकायला मिळतात. या रचनेतील, हरकती तर इतक्या विलोभनीय आहेत की प्रत्येक वेळेस, फार बारकाईने ऐकाव्या लागतात. तेंव्हाच स्वरांचा "डौल" समजून घेता येतो. "पतियाळा" घराण्याची सगळी सगळी "खासियत" या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते. 


आत्ता मी जे गाणे इथे टाकले  आहे,ते एकूणच "पिलू" रागाच्या स्वभावात बसणारे नाही. खरतर हेच खासियत, सुगम संगीताची आहे. रागातील एखादी हरकत,  एखादा स्वर, संगीतकाराला नेमका भावून जातो आणि गाण्याची "तर्ज" निर्माण होते. त्यामुळेच गाण्याची चाल आणि त्याचे "मूळ" शोधणे, बरेचवेळा आवाक्याबाहेरचा शोध होतो. मुळात, मन्ना डे यांचा अत्यंत सुरेल स्वर आणि त्याला मिळालेली कव्वालीबाजाची चाल. त्यामुळे हे गाणे फारच सुरेख जमून गेलेले आहे. गाण्याच्या पहिल्या हुंकारापासून हे गाणे सुंदरपणे "चढत" जाते. प्रत्येक स्वर खणखणीत, सुरेल आणि योग्य त्या शब्दावर अचूक वजन, त्यामुळे कव्वाली असली तरी अतिशय खेळकर रचना होऊन जाते. 


लगान चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचा बाज, लोकसंगीतावर आधारित आहे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, पिलू रागात, चैती, ठुमरी, होरी किंवा पुरबी सारख्या असंख्य रचना ऐकायला मिळतात. एका दृष्टीने बघितल्यास, चैती, पुरबी किंवा होरी, ह्या सगळ्या उत्तर भारतातील लोकसंगीतातून पुढे शास्त्रीय स्वरूपात, स्थानापन्न झालेल्या आहेत. त्यामुळे, पिलू रागात, या रचनांचा "मूलस्त्रोत" सापडणे साहजिक आहे. अर्थात, गाण्याची चाल रेहमानची आहे आणी अर्थात, त्याच्या प्रकृतीनुसार गाण्याची  बांधणी केली आहे. सुरवातच लोकसंगीताच्या आधारावर झाली आहे. गाण्यात, रेहमान, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन असे दिग्गज आवाज आहेत. गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यानंतर पिलू रागाची सावली ऐकायला मिळते. 
गाणे केरवा तालात आहे पण तालाचे वादन अगदी अनोखे आहे. वास्तविक आपण, भारतीय ताल म्हणजे पारंपारिक तबला नजरेसमोर ठेऊन अदमास घेत असतो परंतु संगीतकार , जर व्यासंगी, अभ्यासू असेल तर, गाण्यात वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि या गाण्यात रेहमानचे हेच वैशिष्ट्य ऐकायला मिळते. साधारणपणे समूह गीत म्हटले की वैय्यक्तिक गायकीला अवसर कमीच मिळतो पण इथे संगीतकाराने त्याची योग्य ती काळजी घेतली असल्याने गाणे श्रवणीय होते. 


पिलू रागातील हे आणखी असेच आनंददायी गाणे. चित्रपटातील प्रसंग ध्यानात घेऊन, त्यानुरूप गाण्याची रचना  करण्यात, जे फार थोडे संगीतकार आहेत, त्या यादीत एस. डी. बर्मन यांचा  क्रमांक लावावा लागेल. विशेषत: हाती असलेली चाल, फुलवायची कशी याचे असामान्य भान या संगीतकाराकडे होते त्या दृष्टीने, हा  संगीतकार,हाडाचा चित्रपट गीतांचा संगीतकार होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आता हेच गाणे बघूया. सुरवातीला किती लडिवाळ आलाप आहे आणि त्यातूनच पिलू रागाचे सूचन होते. पुढे चाल वेगळी सरते आणि स्वतंत्र जन्म घेते, हा भाग वेगळा. गाण्यातील सतारीची गत देखील फार वेधक आहे. गाणे तसे मध्य लयीत सुरु होते पण, पुढे चाल विस्तारित होताना, लय देखील जलद होते आणि पार्श्वभागी असणारा वाद्यमेळ देखील. अर्थात असे कितीही वेगवेगळे बदल झाले तरी समेवर येताना, जो सूर पकडून गाणे परतते, तो भाग विलक्षण सुंदर आहे. 

आता पर्यंत आपण या रागाची अनेक रूपे बघितली, काही रागाच्या स्वरावलीशी थोडे फटकून तरीही श्रवणीय रचना ऐकल्या. या लेखाच्या सुरवातीला, मी म्हटले होते, या रागाचे स्थूल स्वरूप हे शांत, रमणीय असे आहे. प्रणयी भावना या रागात फार खुलून येते. अशीच अतिशय शांत आणि केवळ अजोड रचना म्हणावी, असे एक गाणे ऐकणार आहोत. ही गाणे म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील अंगाईगीतातील "मानदंड" आहे आणि आज इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची खुमारी रतिभर देखील ओसरत नाही. गाण्यातील, लय, गोडवा इतका अश्रूत आहे की, आपणही या गाण्यात कधी गुंगून जातो, याचा पत्ताच लागत नाही. 


"धीरे से  आजा री अखियन मी निंदिया" हेच ते अजरामर गाणे. या गाण्याचा ठेका - दादरा आहे पण, तालाचे बोल आणि वापर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. अंगाईगीत आहे तेंव्हा गाण्याचा ताल देखील डोक्यावर हळुवार थोपटल्यासारखा आहे, जेणे करून झोपी जाणारी व्यक्ती विनासायास झोपेच्या आधीन होईल. गाण्याचे शब्द देखील सहज, सुंदर, कुणालाही कळण्यासारखे आहेत. "निंदिया" आणि "निन्दियन" या शब्दातील श्लेष बघण्यासारखा आहे. पिलू राग किती अप्रतिम आहे, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरेल. तसे पाहिले तर, पिलू रागाचे स्वर, चलन हे, या गाण्यापासून फारकत घेणारे आहे पण तरीही नाते जोडणारे आहे. चाल, गायन, वाद्यमेळ या सगळ्याच दृष्टीने हे गाणे अभ्यासनीय आहे. 
लेखाच्या सुरवातीला, मी झोपेच्याच अंगाने चार शब्द लिहिले आणि आता, अशाच असामान्य अंगाईगीताने, या लेखाचा समारोप करणे योग्य ठरेल. 
पिलू रागात आणखी काही सुंदर गाणे आहेत. त्याच्या लिंक्स खाली देत आहे. 

१] अब के बरस भेज 

२] चंदन का पलना 

३] मैने शायद तुम्हे पहले भी कभी 

निसर्गरम्य पहाडी!!

डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा "पहाडी" रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. किंबहुना लोकसंगीताशी इतके जवळचे नाते राखणारे जे थोडे फार राग आहेत, त्यात पहाडी राग, फार वरच्या क्रमांकावर आहे. हिरव्या जर्द झाडीतून स्त्रवणाऱ्या आणि त्याला मिळणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याच्या नादाशी नाते जुळवणाऱ्या सुरांशी या रागाचे फार जवळचे साहचर्य आहे. मुळात निसर्ग  काहीतरी सुचवित असतो आणि अशावेळी जर का आपण निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याची इच्छा दाखवली तर निसर्गच जणू, आपल्याला पहाडी रागाचे सूर पुरवित असतो. इतके या रागाचे निसर्गाशी अतूट नाते आहे. 
थोडे तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, "भूप" रागातील "मध्यम" स्वराला "षडज" मानून पुढे सगळी स्वरावली निर्माण होते. या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागत असले तरी बरेचवेळा "कोमल धैवत" वापरून, या रागात गंमत आणि वैविध्य निर्माण केले जाते. या रागाचे चलन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. हा राग मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात अधिक खुलतो. अर्थात, लोकसंगीतात बरेचवेळा स्वरांच्या आकृतीबंधाबाबत जसे स्वातंत्र्य घेतले आज्ते तसाच प्रकार या रागाबाबत घडतो. याचा परिणाम असा झाला, चित्रपट गाणी किंवा एकूणच सुगम संगीतात, या रागावर आधारित गाणी भरपूर आढळतात. काही नकलाकार यात "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद"  वापर करतात आणी या रागाचे सौंदर्य अधिक खुलवून मांडतात. 
इथे आणखी एक मत मांडावेसे वाटते. तसा पहाडी राग "अटकर" बांध्याचा आहे. यमन, मालकंस प्रमाणे याचा विस्तार अफाट पसरलेला नसल्याने, बरेचवेळा हा राग "धून" स्वरूपात ऐकायला मिळतो. याच मुद्द्याला धरून आपण इथे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी सादर केलेली पहाडी ठुमरी ऐकुया. 


भारतीय संगीतातील जी प्राचीन वाद्ये आहेत, त्यात बासरीचा समावेश होतो. मुळातले हे सुषिर वाद्य, भारतीय रागदारी संगीतात स्थिरावले, ते पंडित पन्नालाल घोष यांनी पण त्याचा जागतिक विस्तार केला तो मात्र पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी. पंडितजींची वाद्यावरील पकड इतकी असामान्य आहे की, ऐकताना माणसाला चक्क गुंगी येते!! इथे त्यांनी जी ठुमरी सादर केली आहे, त्यात, ठुमरीचा नखरा तर आहेच पण त्याचबरोबर सूरांतील हळवेपण देखील लगेच दृग्गोचर होते.सुरवातीची जी आलापी आहे, ती बारकाईने ऐकले तर ध्यानात यावे. पुढे जेंव्हा गत सुरु होते तेंव्हा मात्र एका असामान्य गायकाच्या ठुमरीची आठवण येते. अर्थात, त्या ठुमरीच्या अंगाने जरी वादन झाले असले तरी देखील, त्यात स्वत:चा असा खास विचार दिसतो. सुरवातीच्या समेवरील आलापीनंतर, एकदम "कोमल गंधार" जो लागतो, तो विलक्षण आहे. 

आता, मघाशी मी ज्या असामान्य गायकाची आठवण करून दिली, त्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या "तोरे तिरछी नजरिया के पार" या ठुमरीचा आस्वाद घेऊया. 


पतियाळा घराण्याचे अध्वर्यू म्हणून या गायकाचे वर्णन करता येईल. आवाजात थोडासा खर्ज पण तरी वरच्या सप्तकात सहज विहार करणारा गळा!! ठुमरी या गायनाला मैफिलीचा दर्जा देण्यात या गायकाचा महत्वाचा वाटा. खरे तर तीनही सप्तकात या गायकाला लीलया गाता येत असे आणि याचा परिणाम, परिणामकारक ठुमरी गायन. जरा बारकाईने ऐकले तर या गायकाने, ग्वाल्हेर, जयपुर गायकी देखील आत्मसात केल्याचे समजून घेता येईल. 
प्रस्तुत ठुमरी गायनात देखील याच वैशिष्ट्यांचा आढळ सापडेल. गळ्याची लवचिकता, हे खास वैशिष्ट्य सांगता येईल. याचा फायदा असा झाला, गायकीत "अनपेक्षितता" नेहमीच कायम राहिली आणि त्यामुळे गाणे अतिशय रंगतदार झाले. आणखी वेगळेपण सांगायचे झाल्यास, आपल्या शास्त्रात "प्रसादगुण" हे खास वैशिष्ट्य मानले आहे आणि उस्तादांच्या गायकीत याचे ओतप्रोत दर्शन घडते तसेच सरगम, बहुतेक गायकांच्या बाबतीत, तानेचा तांत्रिक आविष्कार अशा स्वरुपाची असते परंतु या ठुमरीत सरगम हही इतकी ओघवती आहे की कुठे ताण संपते आणि परत सुरु होते, याचा सत्कृत्त्दर्शनी पत्ता लागत नाही

हिंदी चित्रपट गीतांत, खैय्यामने जितका या रागाचा उपयोग करून घेतला आहे, तितका इतर कुणी केल्याचे आठवत नाही. पहाडी रागात ज्या कुठल्या भावनांचा आढळ होईल, त्या सगळ्या भावनांचा, त्याने आपल्या गाण्याच्या "तर्ज" बांधण्यासाठी उपयोग केला आहे. प्रणय, विरह, व्याकुळता, आनंदविभोर अवस्था, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या चालीत गुंफलेल्या आढळतील."जाने क्या धुंढती रहती है ये आंखे  मुझ मे" ही गाणे आपण इथे ऐकू. खरतर हे गाणे म्हणजे अनन्यसाधारण कुवतीची कविता म्हणून देखील आस्वाद घेता येईल. कैफ़े आझमी काय प्रतिभेचा कवी होता, याचे ही कविता, उत्तम निर्देश करता येईल. पहाडी रागात विरहाची अशी भावना देखील दाखवता येते, हे खैय्यामने फार सुंदररीत्या दाखवून दिले आहे.  


गाण्याचे सुरवातीचे शब्दच बघा किती प्रत्ययकारी आहेत. 
"जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे, राख के ढेर मे शोला है ना चिंगारी है"
खरतर सगळी कविता हाच वाचिक अनुभव आहे आणि अशा कवितेला खैय्यामने जो स्वरसाज चढवला आहे, त्याने या कवितेचा आशय अधिक अंतर्मुख होतो. रफीच्या गायकीचा अनोखा आविष्कार आपल्याला ऐकायला मिळतो. गाण्यात कुठेही तालवाद्य नसून, गाण्यात गिटार आणि इतर "धून" वाद्यांनी ताल पुरवलेला आहे त्यामुळे, झाले असे, कवितेवर कुठेही स्वरांचे आक्रमण झाल्याचे दिसत नाही पण तरीही स्वरांनी आपली "जादू" दाखवून दिली आहे. अर्थात, ही किमया सगळी संगीतकार म्हणून खैय्याम यांचीच यांचीच.  

असेच एक गाणे, कविता म्हणून फार अर्थपूर्ण आहे. जावेद अख्तरची ही कविता आहे. खरतर हे गाणे वाचताना, चित्रपटासाठी हे गाणे लिहिले आहे, हे वाटतच नाही. साधारणपणे, गाण्यातली शब्दरचना, ठराविक "मीटर" मध्ये लिहिलेली असतात, ज्यायोगे संगीतकारांना चाल बांधण्यास अवघड होऊ नये. 


सिलसिला चित्रपटातील हे गाणे अतिशय श्रवणीय आहे. "नीला आसमान सो गया" संगीतकार शिव-हरी या जोडगोळीने फारसे चित्रपट केले नाही पण, तरीही ह्या गाण्यासारखे चिरस्मरणीय गाणे मात्र दखल घेणारे निर्माण केले. 

याच रागात अशीच एक चिरस्मरणीय रचना ऐकायला मिळते. मुळात मेहदी हसन यांचे गायन, हाच श्रवणानंद असतो. उर्दू शायरी जरी गेयातापूर्ण असली तरी प्रत्येक शायरीबद्दल हेच म्हणता येणार नाही पण, या गायकाचे खास विशिष्ट्या असे, गाताना, समजा कवितेत असा शब्द आला, तर तिथे गायकी " मुडपून"घेण्याची तयारी दाखवत आणि शब्दांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत असत. 


मेहदी हसन साहेबांची खासियत अशी आहे, ऐकताना सहज, सोपे वाटणारी गायकी, कधी अवघड वळणाकडे जाते, त्याचा लगेच पत्ता लागत नाही. "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे" हीच ती रचना आहे. पहाडी रागात आहे पण, रागातील अवघड हरकतींना पूर्ण फाटा  देऊन,अर्ध्या ताना घेणे, किंवा एखादी हरकत इतकी जीवघेणी घेतात की, ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो. अत्यंत मुलायम आवाज, साधारणपणे मंद्र सप्तक किंवा शुद्ध स्वारी सप्तकात गायकी ठेवायची आणि लिहिलेल्या शायरीला पूर्ण न्याय द्यायचा, हीच त्यांची नेहमी भूमिका राहिली. पहाडी रागाचे इतके विलोभनीय रूप इतर गाण्यांत फार तुरळक आढळेल. 
आता मी इथे, आणखी काही गाण्यांच्या लिनक्स देत आहे, ज्यायोगे या रागाच्या आणखी छटा आपल्याला समजून घेता येतील. 

१] परबतो के पेडो पार शाम का बसेरा है 

२] जो वाद किया वो निभाना पडेगा 

३] सहज सख्या एकटाच येई सांजवेळी 

४] फुलले रे क्षण माझे फुलले रे 

संयत वेदनेचा मारवा

"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे ". ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा "स्वभाव" मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो. 
वास्तविक भारतीय संगीतात "षडज" स्वराचे महत्व अपरिमित आहे, किंबहुना बहुतेक सगळे राग याच स्वराने सुरु होतात किंवा या स्वराचा आधार घेतात. असे फार थोडे राग आहेत, ज्यात या स्वराला तितके महत्व नाही आणि त्या रागांच्या नामावळीत, मारवा राग अग्रभागी आहे. या रागात "सा" लागतो पण, त्याचे अस्पष्ट असणे, इतपतच त्याची खूण. (कोमल) रिषभ आणि धैवत हेच सूर, या रागाची ओळख आहे. खरतर, "ध नि (को) रे नि ध" हा स्वरसमूह आणि यातच या रागाचे "चलन" आहे. षडज जवळपास नसल्यातच जमा आणि पंचम स्वराला स्थान नाही!! गंधार स्वर आहे पण तरीही कोमल रिषभ आणि धैवत, यांच्यासमोर "स्वत्व" हरवलेला!! 
या मुळेच हा राग गायला किंवा वाजवायला घेणे, ही कलाकाराची परीक्षाच असते. अत्यंत मर्यादित स्वर हाताशी आहेत पण, जे स्वर आहेत. त्याच स्वरांतून वेदनेचा संपूर्ण अवकाश उभा करायचा, हे तर शिवधनुष्य हाताळण्यासारखे आहे. याचे वादी-संवादी स्वर बघितले तरी आपल्याला समजून घेता येईल. (को) रिषभ आणि (शुद्ध) धैवत, या दोन स्वरांच्या संगतीने, राग मांडावा लागतो. संध्याकाळ संपत असताना परंतु रात्रीचा प्रभाव पडण्याआधीचा जो समय आहे, ती वेळ शास्त्रकारांनी या रागासाठी योजलेला आहे. 
प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा असा खास आवडीचा राग असतो आणि तो सादर करताना, त्याची तन्मयता अनुभवण्यासारखी असते. उस्ताद अमीर खानसाहेबांचा मारवा ऐकताना, अशी आपली एकतानता होते. 


रागाच्या पहिल्या सुरापासून "पिया मोरे आनत देस" ही चीज अत्यंत ठाय लयीत चाललेली आहे आणि प्रत्येक सूर कसा स्वच्छ, सुरेल लागलेला आहे. कुठेही तानांचे आडंबर नाही, उगीच कुठे मूर्च्छना नाही. प्रत्येक सुराचा "मझा" घेता येतो आणि त्यायोगे लयीची मोहकता!! माझे तर नेहमीच म्हणणे असते, रागदारी संगीताची खरी मजा आणि ओळख ही नेहमीच ठाय लयीत घेता येते. तिथे प्रत्येक स्वर अवलोकता येतो, "ऐकून" कानात साठवता येतो. या सादरीकरणात, नेमका हाच आनंद घेता येतो. साथीला तबला आहे पण, तो देखील अगदी खालच्या सुरात लावलेला आहे आणि त्यामुळे गायनाला एक वेगळेच परिमाण मिळते. चिरदाह वेदनेचा असामान्य अनुअभव या गाण्यातून आपल्याला मिळतो. रागदारी संगीतात कायमचे स्थान मिळवणारी रचना आणि मानदंड म्हणून प्रस्थापित झाली. 

आता आपण, एक खासगी रचना ऐकुया. लताबाईंचा आवाज देखील किती सुंदर लागला आहे, बघा. 


के. महावीर या संगीतकाराची चाल आहे. संगीताच्या क्षेत्रातील हे एक अगम्य कोडे आहे. अंगात प्रतिभा आहे, नवनवीन चाली निर्माण करण्याची क्षमता आहे, प्रयोगक्षम बहुश्रुतता आहे पण तरीही म्हणावी तशी लोकमान्यता नाही, कौतुकाचा वर्षाव नाही. अर्थात, ज्यांना संगीताची जाण आहे, त्या लोकांच्यात मात्र, मान्यता आहे. "सांज भयी, घर आजा रे पिया". "सांज: शब्द बघा उच्चारला आहे, किंचित स्वरांत थरथर निर्माण करून, गाण्याची सुरवात केली आहे आणि ओळ संपवताना, "पिया" शब्दातून जी व्याकुळता निर्माण झाली आहे, ती तर केवळ लाजवाब!! गाण्यात पुढे, "सांज" याच शब्दावर आणखी वेगवेगळ्या हरकती घेऊन, त्याच शब्दाचे सौदर्य वाढवले आहे.  

मराठीत जर का अजरामर गाणी शोधायची झाल्यास, एकूणच तसे अवघड जाईल पण, तरीही काही गाणी घ्यावीच लागतील. अशा काही गाण्यांपैकी. "मावळत्या दिनकरा" हे गाणे आहे. कवी भा.रा. तांब्यांची कविता वाचणे, हा नेहमीच राजस अनुभव असतो. इंदूरच्या त्यावेळच्या सरंजामशाहीचा परिणाम त्यांच्या कवितेवर ठळकपणे दिसून येतो तसेच संस्कृत साहित्याचा. असे असून देखील, त्यांच्या कवितेतील लय, ही नेहमीच "गीतधर्मी" असते. सहज चाली लावण्यास, योग्य अशा त्यांच्या कविता आहेत आणि मराठी संगीतकारांनी या वैशिष्ठ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हृदयनाथ मंगेशकर, चाल बांधताना, त्यातील "काव्य" नेहमीच सकस, दर्जेदार असावे, म्हणून आग्रही असतात आणि अशा वेळेस, त्यांना तांब्यांची कविता मोहवून गेली, यात नवल ते काय!! 


सतारीच्या पहिल्याच सुरांतून, मारवा रागाची ओळख निर्माण करून, चालीचे वळण, कसे असेल, याचे निर्देशन होते. कवितेचा आशय बघितला तर आपल्याला सहज समजून घेता येईल, सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन आणि  सतार व बासरीच्या सुरांची अप्रतिम जोड आहे. मी मघाशी, तांब्यांच्या कवितेत संस्कृत साहित्याच्या प्रभावाविषयी लिहिले आहे, त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे, "अर्घ्य तुज जोडोनी दोन्ही करा" ही ओळ. सूर्याला अर्घ्यदान ही आपल्या संस्कृतीमधील असामान्य कल्पना आहे, ज्यात समर्पणाची कल्पना सामावलेली आहे आणि तोच संदर्भ या कवितेत नेमकेपणी  वाचायला मिळतो. कविता आणि चाल, याचा अप्रतिम संगम या गाण्यात झालेला दिसून येतो. 
हा राग सादर करायला अतिशय अवघड आहे, बहुदा असे असेल म्हणून या रागावर आधारित तशी फारशी गाणी बांधायचे धाडस फारसे कुणी करीत नाही. रागाचे चलन(च) तसे सहज गुणगुणावे इतके सरळ, सोपे नाही आणि याचे कारण असे आहे, मारवा सादर करताना, जरा सूर इकडे, तिकडे हलला तर त्याच सावलीत, "श्री","सोहनी" किंवा "पुरिया" रागात शिरण्याचा धोका असतो. 


वरील लिंक ही "पायलीया बावरी बाजे" या गाण्याची आहे. खरतर, या गाण्यात मारवा रागाची झलक आहे पण तरीही गाणे म्हणून अतिशय सुश्राव्य आहे. 
असेच आणखी एक मराठी गाणे आठवले. शंकर वैद्यांची "स्वरगंगेच्या काठावरती". अरुण दात्यांनी अजरामर केलेली कविता. 


परत एकदा हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेले असेच अप्रतिम गाणे. वास्तविक, शंकर वैद्य, ही कुणी भावगीते वगैरे लिहिणारे कवी नव्हेत परंतु एखाद्या कवितेत, गाणे होण्याची असोशी असते आणि ती नेमकेपणी संगीतकाराला ओळखता येणे महत्वाचे. 

अशीच एक असामान्य लिंक आपल्याला आवडेल. वसंतराव देशपांड्यांनी गायलेला मारवा. ही लिंक जवळपास ४६ मिनिटांची आहे म्हणजे इथे संपूर्ण मारवा आपल्याला  ऐकायला मिळतो. मारवा राग, ही वसंतरावांची मर्मबंधातली ठेव होती. मी स्वत: ३,४ मैफिलीत वसंतरावांकडून हा राग ऐकलेला आहे आणि  त्यांच्या अचाट कल्पनाशक्तीपुढे मान तुकवली आहे. 


आपल्या आयुष्यात तसे बघितले तर दु:खाचा अंश बराच असतो आणि त्याला टाळून तर पुढे जाणे, सर्वथैव अशक्य.  तुकारामांनी एके ठिकाणी म्हटले आहे  त्याप्रमाणे,"सुख जवाएवढे, दु:ख पर्वताएवढे" त्याप्रमाणे आपले आयुष्य असते. याच दु:खाचा अंश या रागात आपल्याला गोठवून ठेवला आहे!!