Friday 16 September 2022

तुम गगन के चंद्रमा हो

कई चांद थे सर-ए-आसमान की चमक,चमक के पलट गयी ना लहू मिरे ही जिगर में था ना तुम्हारी झुल्फ सियाही थी सुप्रसिद्ध शायर अहमद मुश्ताक यांच्या कवितेतील या ओळी आहेत. खरतर उर्दू भाषेत चंद्र आणि नवयुवती, या संबंधावर असंख्य शब्दरचना आढळतात आणि प्रत्येकाचा आशय आपल्याला अधिकाधिक श्रीमंत करून जातो. चंद्राला तर उर्दू साहित्यात जरा जास्तच लाडावून ठेवले आहे आणि जरी आता प्रत्यक्ष चंद्राचे वास्तव रूप, शास्त्राने पुढे आणले असले तरी शायर आणि मराठी कवींनी त्याच आकर्षणातून रचना केल्याचे आढळून येते. हीच कल्पना अत्यंत ढोबळ मानाने, आपल्याला आजच्या गीतात वाचायला मिळेल. कवी भरत व्यास यांची शब्दरचना आहे, संपूर्णपणे हिंदी भाषेचा सढळ वापर केलेला आढळून येतो. हिंदी भाषेत कविता करणे वस्तुतः काहीही गैर नाही आणि जर का चित्रपट विषय हिंदी संस्कृतीचा असेल तर आवश्यक देखील ठरते. याचे सर्वोत्तम उदाहरण, चित्रलेखा चित्रपटातील साहिर यांच्या कविता म्हणून सांगता येईल. तेंव्हा आता आपण कविता म्हणून या शब्दरचनेचा आस्वाद घेऊ. तुम गगन के चंद्रमा हो,मैं धरा की धूल हुं तुम प्रणय की देवता हो, मैं समर्पित फुल हुं तुम हो पूजा,मैं पुजारी, तुम सुधा मैं प्यास हुं आता या ओळी, कविता म्हणून वाचायला गेल्यास, रचना वाचतानाच शाब्दिक लय सापडते आणि गीतलेखनाची पहिली कसोटी पूर्ण होते. ललित संगीतात,कवितेत जर अंगभूत लय असेल तर संगीतकाराचे अर्धे काम पूर्ण होते, असे म्हणता येईल. परंतु कविता ही निव्वळ लयीच्याच अंगाने बघायची का? स्त्रीला चंद्राची उपमा देणे आणि पुरुषाला धुळीचे फुल म्हणणे, हे अतिशय सांकेतिक आणि पारंपरिक झाले आहे. पुढे देखील याच उपमांचा विस्तार तशाच धर्तीवरील उपमांनी केलेला दिसतो, जसे 'प्रणय की देवता' किंवा 'समर्पित फुल' अशाच उपमांनी आशय सजवला आहे. आता ढोबळपणे दुसऱ्या ओळीत ज्या उपमा मांडल्या आहेत, त्यालाच धरून तिसरी ओळ येणे क्रमप्राप्तच ठरते. प्रश्न इतकाच पडतो, इतके सांकेतिक लेखन कितपत योग्य आहे? कवितेत एकमेकांशी सतत उपमा भाषेत बोलायचे!! सरळ,साधी अभिव्यक्ती अशक्य आहे का? असे ऐकायला मिळाले आहे, या कवीने "आयुष्यभर मी शब्दरचनेत एकही उर्दू शब्द वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा केली होती आणि त्याचे त्यांनी पालन केले. तुम्ही कुठल्या भाषेचा आधार घेता याला, आशयाच्या दृष्टीने काडीमात्र महत्व नसते. भाषेच्या आधाराने जेंव्हा कवी व्यक्त होतो, तेंव्हा आशय कशाप्रमाणात व्यक्त केला आहे, हेच कुठल्याही कवितेचे प्रमुख बलस्थान असते. निव्वळ हिंदी भाषेचा आधार घेऊन, कविता लिहिणे, हा अट्टाग्रह दिसतोआणि त्या आग्रहापोटीच अशी सांकेतिक रचना वाचायला मिळते. अर्थात या गाण्याचे खरे यश हे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि लताबाई/मन्ना डे यांच्या गायकीचे आहे आणि आपण थोड्या विस्ताराने या दोन्ही घटकांचा परामर्श घेऊ. गाण्याची चाल ही स्पष्टपणे "यमन कल्याण" रागावर आधारित आहे. आता यमन कल्याण हाच राग का? यमन रंगाचे स्वर देखील जवळपास तसेच आहेत. इथे "जवळपास" हा शब्द महत्वाचा आणि तिथे रागाचे वेगळे स्थान प्रस्थापित होते. आता स्वरलिपीच्याच भाषेत मांडायचे झाल्यास, "तुम गगन के चंद्रमा हो" ही ओळ "सा ग प म रे' आणि पुढे "निरे निरे मी ग रे रे) अशा यमन रागाशीच साधर्म्य दाखवतात परंतु पुढे, "मैं धरा की धूल हुं" ही ओळ गाताना, प्रथम "तीव्र मध्यम" लागतो आणि "धूल हुं " गाताना "शुद्ध मध्यम" लावला आहे आणि इथे यमन आणि यमन कल्याण रागाची फारकत होते. फरक सूक्ष्म आहे, पण तसा तो आहे. भारतीय संगीत हे स्वरप्रधान संगीत असे सर्वमान्य आहे आणि ते खरेच आहे परंतु या विधानातील पोटभाग असा आहे, या स्वरांच्यामध्ये असंख्य "स्वरकण" दडलेले असतात ज्यांना "श्रुती" म्हणून संबोधले जाते, आणि त्यामुळे हेच संगीत अधिक विलोभनीय तसेच गुंतागुंतीचे होते. इथे निव्वळ शुद्ध मध्यमा समवेत तीव्र मध्यम जोडला गेल्याने, चालीचे स्वरूपच पालटले जाते आणि इथे संगीतकाराचे बुद्धिकौशल्य दिसून येते. आता,याच ओळीचा गंध पुढील गाण्यातून सतत दरवळत आहे. गाणे प्रणयी थाटाचे आहे आणि मुख्य म्हणजे संयत प्रणयी भावाचे आहे. त्यामुळे चालीतून कुठेही शब्दांना धक्का पोहोचलेला नाही. एक शांत, प्रणयोत्सुक भाव संबंध रचनेत पसरलेला आहे. कडव्यांच्या मधील स्वररचना देखील मध्य सप्तकातील वाद्यांनी - व्हायोलिन आणि बासरी, सजवलेला आहे. मुखडा कुठेही विशोभित न होता, एका संथ गतीने वाद्ये वाजत आहेत. अंतऱ्यांची बांधणी मात्र सारखीच केलेली आढळते. "तुम महासागर की सीमा, मैं किनारे की लहर" घेताना, सुरवातीला चाल किंचित वरच्या पट्टीत जाते, ती बहुदा "महासागर" या शब्दाला अनुरोधून असणार पण पुन्हा "लहर" या शेवटच्या शब्दापर्यंत येताना, लय विसर्जित होते. एक वर्तुळ पूर्ण होते. असाच स्वरिक खेळ संपूर्ण रचनेत ऐकायला मिळतो आणि ही स्वररचना अधिकाधिक श्रीमंत होत जाते. गायिका लताबाई आणि गायक मन्ना डे, यांचे यश थोडे उजवे म्हणावे इतक्या प्रतीचे आहे. युगुलगीत कसे गायला हवे, याचे आदर्श उदाहरण म्हणजे हे गाणे, असे विधान सहज करता येईल. कुठेही चढाओढ नाही, कुठेही स्वर खेचला, किंवा खटका घेतला, असे दिसत नाही . खटके आहेत पण ते मुलायम, तलम स्वरांवर घासून येतात, परिणामी "खटका" यातील वजन नाहीसे होते. अगदी पहिल्या ओळीपासून याचा अनुभव येतो. मुखड्यातच "मैं धरा की धूल हुं" गाताना लताबाईंच्या स्वरांत आर्जवी समर्पण भाव येतो. भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य, समर्पणभाव, याची इथे प्रचिती येते. पुढे मन्ना डे यांनी देखील "तुम सुधा मैं प्यास हुं" गाताना हाच शरणभाव दाखवला आहे. परिणामी कुठेही, "मी खाल्ला" सारखी ढोबळ गायकी दिसत नाही. स्वरिक औचित्याचा सुंदर अनुभव ऐकायला मिळतो. आणखी एक साम्यतेचे उदाहरण देता येईल. "धूल" गायलेलं शब्द आणि "प्यास" गायलेलं शब्द, यात दिसते ती फक्त आंतरिक ओढ. स्वर कसे गळ्यातून काढावेत, जेणेकरून आशयाची अभिवृद्धी होईल, याचा अप्रतिम नमुना आहे. अंतरे लताबाई आणि मन्ना डे यांनी स्वतंत्रपणे गायले आहेत. चालीचे स्वरूप जवळपास सारखेच आहे परंतु आपल्या अंगभूत सक्षम गायकीने त्यात विलक्षण रंग भरले आहेत.जो संयत भाव मुखड्यात ठेवलेला आहे, त्याचाच सुगंध त्यांनी अंतरे गाताना पसरवला आहे. "महासागर" शब्द आहे म्हणून उगीच त्याचे वेगळे भावदर्शन दाखवायचे, असला बटबटीतपणा दाखवलेला नाही. लयीच्याच अंगाने, प्रत्येक शब्द गायला गेला आहे. कुठेही शब्दांची मोडतोड नाही की अनावश्यक हरकती नाहीत. अंतऱ्यांच्या मध्ये लताबाईंनी "आलाप" घेतला आहे आणि तो थोडा "गायकी" अंगाकडे वळतो पण काही क्षण असा भाव निर्माण होतो. त्या आलापीत अवघड असे काही नाही पण अवघड नाही, हेच एकूण गीत गाताना अवघड बनून जाते. हे वैशिष्ट्य जितके संगीतकाराचे तितकेच गायकांचे, असे म्हणायलाच लागेल. तुम गगन के चंद्रमा हो, मैं धरा की धूल हुं, तुम प्रणय की देवता हो, मैं समर्पित फुल हुं तुम हो पूजा,मैं पुजारी, तुम सुधा मैं प्यास हुं तुम महासागर की सीमा, मैं किनारे की लहर तुम महासंगीत के स्वर, मैं अधुरी सांस भर तुम हो काया, मैं हुं छाया, तुम क्षमा मैं भूल हुं तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो मेरे प्राणो की है गुंजन, मेरे मन की मयूर हो तुम हो पूजा, मैं पुजारी, तुम सुधा मैं प्यास हुं

No comments:

Post a Comment