Sunday 25 September 2022

तेरे मेरे सपने अब एक रंग है

कादंबरीवरून चित्रपट निर्मिती, हे तसे फार नाविन्यपूर्ण नाही. *गाईड* चित्रपटाच्या अधिक देखील अनेक कादंबऱ्यांवर प्रेरित होऊन, चित्रपट निघाले आहेत. काही चित्रपटांनी कादंबरीतील कथानकांना यथोचित न्याय दिला आहे, काही चित्रपटांनी तर कादंबरी आणि चित्रपट यामधील फरक दर्शवणारी रेषा अस्पष्ट केली आहे. अर्थात लिखित शब्दांना मानवी आवाजातून भावनिक स्पर्श देणे, काही वेळा असामान्य प्रकारे समोर येते तर बरेचवेळा कादंबऱ्यांच्या कथानकाला केवळ तोंडी लावणे ठेऊन, चित्रपट निर्माण केला जातो. वास्तविक दोन्ही माध्यमे संपूर्णतया भिन्न आहेत तरी चित्रपटक्षेत्राला लिखित शब्दांचे आकर्षण आजही वाटते, आणि ही वस्तुस्तिथी आहे. प्रश्न इतकाच उरतो, दृष्य माध्यमातून कादंबरीला कितपत न्याय दिला जातो? बव्हंशी चित्रपट फसलेला वाटतो. एक कारण असे संभवते, चित्रपटाचा आर्थिक डोलारा प्रचंड असतो आणि त्या आर्थिक गणितामागे प्रेक्षकशरण विचार प्रभावी ठरतो आणि कादंबरीला नावापुरते स्थान मिळते. *गाईड* चित्रपट असाच झाला आहे. *आर.के. नारायणन* यांची कादंबरी वाचल्यावर, या विधानाचा प्रत्यय येऊ शकतो. अर्थात असे असून देखील, चित्रपट त्याकाळी बराच गाजला होता, हे निश्चित. चित्रपट गाजण्यामागे अनेक कारणे असतात आणि त्याचा इथे उहापोह करण्याची गरज नाही परंतु या चित्रपटाचे खरे यश हे त्यातील असामान्य गाण्यांकडे जाते, हे नक्की म्हणता येईल. अशाच अप्रतिम गाण्यांपैकी, आज आपण *तेरे मेरे सपने अब एक रंग है* या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. चित्रपटात नेहमीच गाण्याची पार्श्वभूमी, या घटकाला नेहमीच महत्व द्यावे लागते, जेणेकरून कथानकाला पुष्टी मिळते तसेच पडद्यावरील पात्रांच्या भावना अधिक सखोलपणे दाखवता येतात. कवी शैलेंद्र यांच्या कवितेबाबत हा निकष नेमकेपणाने पूर्ण होतो, असे म्हणता येईल. या कवीला चित्रपट माध्यमाची नेमकी आणि अचूक जाण होती. चित्रपटात प्रतिभेचा फुलोरा दाखवायचा नसून, कथानकाची वृद्धी करायची असते आणि तशी करताना, पात्रांच्या मनोविष्काराला नेमके परिमाण द्यायचे असते. अर्थात असेकरताना, सपक, बटबटीत शब्दरचना करायची नसून, साध्या शब्दांतून आशयाची अभिवृद्धी करण्याची तारेवरील कसरत साधायची असते. याचा अर्थ असा नक्कीच नाही, चित्रपट गीतांत *प्रतिभेला* अजिबात स्थान नाही. आशयगर्भ शब्दरचना, संगीतकाराला स्वररचना करायला नेहमीच प्रेरित करतात. शैलेंद्र यांची शब्दरचना याच दृष्टिकोनातून बघायला हवी. प्रणयी थाटाच्या गाण्यात, काही कल्पना सातत्याने येणे, अपरिहार्य असते. *मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना,जैसे बहार आने पर, तय है फुल का खिलना* या ओळी वाचताना, माझ्या वरील विवेचनाचा प्रत्यय यावा. ओळी अत्यंत साध्या, स्पष्ट आहेत परंतु चित्रपटातील नायकाच्या मनातील भावना अचूकपणे स्पष्ट करणाऱ्या आहेत. हिंदी गाण्यात *चांद* शब्द वारंवार येतो, कधी सरधोपटपणे येतो तर कधी सापेक्षपणे येतो. *तेरे ये दो नैना, चांद और सुरज मेरे* ही ओळ म्हटले तर अगदी सपक म्हणता येईल परंतु आधीची ओळ *तेरे दुःख अब मेरे, मेरे सुख अब तेरे* या शब्दात आल्यावर मग त्याच शब्दातील सपकपणा नाहीसा होतो आणि आशय अधिक सुंदर रीतीने अधोरेखित होतो. गाण्याची स्वररचना ही प्रसिद्ध संगीतकार एस.डी.बर्मन यांची आहे. बर्मनदादा हे फार विचक्षण वृत्तीचे संगीतकार होते. चित्रपटाची जातकुळी नेमकी ओळखून, त्यांनी नेहमी गाणी तयार केली. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास, *गुरुदत्त* यांच्या चित्रपटातील गाणी, *बिमलदा* यांच्या चित्रपटातील गाणी आणि *देवआनंद* यांच्या चित्रपटातील गाणी, संपूर्णपणे भिन्न धाटणीची आहेत आणि तरीही चित्रपटांच्या कथानकाशी एकजीव झालेली आहेत. प्रत्येकाची शैली वेगळी आणि ती नेमकेपणाने ओळखून, त्यांनी स्वररचना केल्या आणि हाच भाग, या संगीतकाराला, चित्रपट माध्यम किती सखोलपणे आकळले होते, हे दाखवून देणारे आहे. *गाईड* चित्रपट हा तसा काळाच्या पुढे जाणारा चित्रपट आणि नायिका नृत्यांगना आहे, म्हणजे चित्रपटात संगीताला वाव देणारा आहे. अर्थात असे असून देखील बर्मनदादांनी *सांगीतिक कलाकुसर* न करता, आपल्या व्यासंगाची झलक दाखवून दिली आहे. गाण्याची चाल ही *राग गारा* या रागावर बांधलेली आहे. म्हटले तर हा राग तास अनवट जातीचा आहे. तशी फारच तुरळक गाणी या रागावर आधारलेली आढळतात. *शाड्व/संपूर्ण* अशी स्वरांची बांधणी आहे. दोन्ही *निषाद* स्वरांचा उपयोग केलेला आढळतो. अर्थात शास्त्रकारांनी रागाचा समय हा *उत्तर सांध्यसमय* असा दिलेला आहे. कदाचित हेच या रागाचे वैशिष्ट्य ध्यानात घेऊन, बर्मनदादांनी या रागाच्या सावलीत स्वररचना केली असावी.आता या गाण्याचे *स्वरलेखन* बघूया. *तेरे /मेरे /सपने / अब /एक / रंग /हैं* *नि(को)सा/ सा रे /नि सा नि(को) ध/ध नि(को)/म - रे /ग(को)ग(को)/रे* *हो /जहां/भी ले /जायें /राहें /हम /संग /हैं* *ग(को)सारे गम/ग म/रे ग(को)/सा सा/नि(को)ध/म रे/ग(को) रे/सा* वरील स्वरलेखनातून, मी सुरवातीला *निषाद(को)* या स्वराचे प्राबल्य दर्शवले होते, तेच नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, कुठल्याही गाण्याचे स्वरलेखन हा फक्त *आराखडा* असतो, त्यात प्राण भरण्याचे काम हे गायक/गायिकेचे असते. ज्यांना संगीताची ही भाषा कळते, तेच राग गारा आणि हे गाणे, यातील *नाते* जाणू शकतील. व्हायोलिनवर एक छोटी गत घेतली जाते आणि लगेच गाण्याला लगेच सुरवात होते. अत्यंत हळुवार स्वरांत गाणे सुरु होते आणि तोच स्वरांचा दरवळ, संपूर्ण गाण्यात पसरलेला आहे. गाण्यात कुठेही *गायकी* दिसत नाही. त्याची गरजच नाही. गाण्यात ३ अंतरे आहेत पण त्यांची बांधणी जवळपास सारखी आहे. असे असून देखील, गाण्यातील मुखडा आणि अंतरे यात किंचित फरक जाणवतो कानी त्याचे कारण मोहमद रफी यांची समर्थ गायकी होय. मोहमद रफी यांची गायकी, हा या गाण्याचा *अर्क* आहे. इतर ठिकाणी *नाट्यात्म* वाटणाऱ्या गायनशैलीला इथे संपूर्णपणे मुरड घातलेली आहे. अतिशय संयत भावाव्यक्ती आहे. काव्यातील ऋजू भावना, आपल्या गायनातून तितक्याच आर्तपणे, रफींनी मांडलेली आहे. अंतरे गाताना काही ठिकाणी स्वर वरच्या पट्टीत लागतो पण तिथेही स्वरांचे मृदुत्व कायम ठेवले आहे. अर्थात याचे श्रेय जितके गायकाचे तितकेच संगीतकाराचे, असे म्हणता येईल. अंतर संपवताना, *ओ मेरे जीवन साथी ......* ही ओळ गाताना, आपण आपल्या प्रेयसीला साद घालत आहोत, तसेच तिच्या मनाला मुग्धपणे मागणी घालत आहोत, हा विचार किती सुंदररीतीने मांडले आहे, हे मुळातून ऐकण्यासारखे आहे. मोहमद रफींची गायकी *सार्वभौम* अशी मानली जाते आणि ती गायकी तशी का मानली जाते, याचे समर्पक उत्तर या गीताच्या गायकीतून आपल्याला मिळते. असे गाणे आजही तितकेच लोकप्रिय का आहे? या प्रश्नाचे उत्तर, या गाण्याचे वारंवार श्रवण केल्यावरच आपल्याला समजून घेता येईल. तेरे मेरे सपने,अब एक रंग है जहां भी ले जाए राहें, हम संग हैं मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना जैसे बहार आने पर, तय है फुल का खिलना ओ मेरे जीवन साथी...... तेरे दुःख अब मेरे, मेरे सुख अब तेरे तेरे ये दो नैना, चांद और सुरज मेरे ओ मेरे जीवन साथी ...... लाख मना ले दुनिया, साथ न ये छुटेगा आ के मेरे हाथों में हाथ ना ये छुटेगा ओ मेरे जीवन साथी ...... Guide Tere Mere Sapne Ab Ek Rang Hai Mohd Rafi - YouTube

No comments:

Post a Comment