Saturday 16 April 2022

श्रवण साधना योग ........

आपण गाणं ऐकतो. ती एक सहजस्फूर्त घटना असते आणि त्यासाठी आपल्याला फार काही सायास करायला लागत नाहीत आणि याचे मूळ कारण आपल्यावरील झालेले संस्कार तसेच एक भारतीय म्हणून आपल्यातील जो रक्तगुण असतो, त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे आपली *श्रावण साधना* असे थोडक्यात मांडता येईल. फार पूर्वीपासून अनेकविध माध्यमांनी गाणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सोय करून ठेवली असल्याने, गाणे ऐकणे, या क्रियेसाठी आपल्याला फार प्रयास पडले नाहीत. अर्थात अर्वाचीन काळाची गोष्ट वेगळी कारण तेंव्हा तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने, गाणे ऐकण्याची वानवा असायची परंतु जसेजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतशी श्रवण क्रिया सुलभ व्हायला लागली. याचा माणसाला अमाप फायदा झाला, हे मान्यच करायला हवे. जरा खोलात गेलो तर असा विचार करू शकतो, आपण *गाणे* का ऐकतो? ते सहज आपल्या कानावर पडते म्हणून त्याची प्रतिक्षिप्त क्रिया आपल्याकडून घडते का? इथे गाणे म्हणजे सगळ्या प्रकारचे संगीत - म्हणजे रागदारी संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच ललित संगीत अभिप्रेत आहे. ही अत्यंत ढोबळ वर्गवारी आहे आणि त्यात अनेक सांगीतिक आविष्कार अंतर्भूत आहेत परंतु आपल्या इथे त्याबद्दल काहीच बोलायचे नसल्याने, मी ढोबळ वर्गवारी स्वीकारली आहे. अगदी मागील शतकाचा विचार केला तर मागील शतकाच्या सुरवातीला रागदारी आणि आणि उपशास्त्रीय संगीत, या २ प्रकारांचा प्रभाव आल्या तेंव्हा समाजावर गाढा हता आणि त्याविषयी दुमत होऊ नये.पुढे मग हेच संगीत अधिकाधिक जटील व्हायला लागले कारण बदलती जीवनप्रणाली!! पुढे वेगवान होत जाणाऱ्या जीवनशैलीपुढे तासंतास चालणारे रागसंगीत मागे पडायची शक्यता निर्माण झाली आणि मराठी रंगभूमीवर रागसंगीताचाच उपयोग करून, चटपटीत स्वररचनांचा प्रादुर्भाव वाढला आणि रंगभूमीवर *नाट्यगीत* हा आविष्कार समाजमान्य झाला. पुढे याचा विपर्यास झाला ती बाब वेगळी आणि मग त्यातूनच *सुगम संगीत* अवतरले आणि एकूणच संगीताचा ढाचाच बदलला. सुगम संगीत नुसते अवतरले नसून त्याने कालानुरूप *कात* टाकायला सुरवात केली आणि एकूणच समाजमनावर प्रचंड पगडा बसवला, हे मान्यच करावे लागेल. हे मन्वंतर झाले कारण ललित संगीत हे सुगम आहे, थोडक्यात संगीताशय आंनदाण्याची कुवत आहे तसेच सामान्य माणसाला देखील भुरळ घालणारे आहे. परिणामी ललित संगीत आपले स्वतंत्र आणि वेगळे वर्चस्व गाजवू लागले. आता मुद्दा असा पुढे येतो , या सगळ्या संगीतात, *श्रवण क्रिया* या घटनेला अतोनात महत्व आले मग तिथे कुठलाही संगीताविष्कार असू दे. मुळात ऐकणारे नसतील तर कुठलेही संगीत हे निष्प्रभ होणारे, हे ओघाने आलेच. यातूनच पुढे *प्रेक्षकशरणता* अतोनात वाढली. जिथे अतिरेक होतो तिथे मग त्याच्या मर्यादा स्पष्ट होतात. ऐकायला रसिक हवेत, ही जाणीव झाली आणि मग रसिकांना आपल्याकडे ओढण्याची जणू स्पर्धा निर्माण झाली, परिणामी सांगीतिक दर्जा खालावणे, क्रमप्राप्त झाले. यातूनच मग रसिकांची फुटकळ *वर्गवारी* झाली - ज्याची आजही काहीही जरुरी नाही परंतु रागदारी संगीत ऐकणारे अधिक *आढ्यताखोर* होणे आणि इतर संगीतप्रकारांकडे काहीशा तुच्छतेने बघणे, इत्यादी प्रकार बोकाळायला लागले. त्यामाने उपशास्त्रीय संगीताचे रसिक बरेच उदारमतवादी निघाले. काही उदाहरणे देतो. *तुच्छतावाद* तर आपल्याकडे पाचवीला पुजलेला आहे. मध्यंतरी लताबाईंचे निधन झाले आणि लगोलग नको तितका भावनिक पूर पसरला. लताबाईंचे वैश्विक स्थान बघता, अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्या परंतु काही ठिकाणी *तुच्छतावाद* प्रखरपणे दिसून आला. अगदी माझे त्याबाबत स्वानुभव आहेत. लताबाई झाल्या तरी त्या काही *अजेय* नव्हेत. त्यांची गायनाची एक अजोड शैली होती. अर्थात त्यांची जशी एक शैली होती ताशा इतर गायिकांच्या वेगळ्या प्रकारच्या शैली अस्तित्वात होत्या, हे कुणीही मान्य करेल. आता, जशी लताबाई गेल्याची बातमी आली तशी त्यांच्या गायनशैलीवर टीका व्हायला लागली. टीका झाली म्हणून फारसे बिघडत नाही कारण लताबाई म्हणजे कुणी *देवता* नव्हेत. त्या देखील मानवी योनीतुन जन्माला आलेल्या होत्या आणि तदनुषंगाने त्यांच्यात *माणूस* आणि *कलाकार* म्हणून काहीतरी *कमतरता ही असणारच परंतु टीका करताना इतकी खालची पातळी गाठली गेली की एकदा असेच मनात आले, लताबाईंपेक्षा बहुदा रेल्वे डब्यातील गाणारी भिकारीण देखील उत्तम गायिका म्हणावी लागेल का? टीका करावी पण टीका करायची म्हणून खालच्या पातळीवर उतरायची गरज नसते. परंतू दुर्दैवाने, तितके सजग भान दाखवले गेले नाही. संगीत हा विषयच इतका *व्यापक* आहे की इथे कुणीही *Champion* नाही. सगळे कलाकार देखील आयुष्यभर *विद्यार्थी* असतात तेंव्हा अशा परिस्थितीत तथाकथित रसिक देखील अपवाद कसे असतील? आपल्याकडे *गाणे* कसे ऐकावे, हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसते. हा प्रकार शास्त्रीय संगीताच्या मैफिलींबाबत वारंवार अनुभवायला मिळतो. कुणीही कलाकार राग सादर करायला लागला की लगोलग *कुजबुज* सुरु होते, कुठला राग सादर होत आहे? आणि ही कुजबुज इतरत्र ऐकायला येईल, इतपत मोठ्या आवाजात ऐकायला मिळत असते. खरंतर सादरीकरणातील *राग* ओळखता येणे, ही रसिकत्वाची अत्युच्च पातळी नव्हे. परंतु आपणं कुणीतरी *वेगळे* आणि *व्यासंगी* आहोत हे इतरांना दर्शवायची अतोनात वाईट खोड वारंवार बघायला मिळते. त्यातून दुसरी खोडसाळ सवय. मैफिल संपल्यावर दुसऱ्या दिवशी मित्रांच्या समवेत काळाच्या मैफिलीचे नको तितके रसभरीत वर्णन करायचे. समोरचा ऐकणारा समजा रागदारी संगीताविषयी *अनभिज्ञ* असेल तर सांगणाऱ्याच्या *अंगात* येतेआणि लगोलग *यमन*, *दरबारी* अशा रागांच्या नावाच्या *पुड्या* सोडायला सुरवात होते. ऐकणारा एकदम गार पडतो कारण त्याला तर हे सगळेच *अगम्य!* असे रसिक भयंकर तापदायक असतात. तसेच आणखी डोक्यात तिडीक जाणारा अनुभव असतो. कार्यक्रमाची वेळ माहीत असते तरीही मैफिलसुरु होऊन अर्धा, पाऊण तासांनी सभागृहात यायचे आणि इतर रसिकांची तंद्री भंग करायची!! हा तर प्रचंड *उद्दामपणा* म्हणायला हवा. तुम्हाला साधे Time Management सांभाळता येत नाही!! तसाच प्रकार चाललेली मैफिल ऐन रंगात आल्यावर मैफिल सोडून जाण्याची घाई करायची!! तुम्ही रागदारी संगीताची मैफिल ऐकायला आला आहात आणि ती किती वेळ चालणार आहे, याचे तुमच्या मनाशी आडाखे पक्के असतात. तेंव्हा असे असून देखील, पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेतील रसिक (ती बरेचवेळा जोडगोळी असते!!) संपूर्ण सभागृह ओलांडून बाहेर जाते. आता टॉयलेटला गेले तर समजण्यासारखे आहे पण काही नैमित्तिक कामे आठवतात आणि मग मैफिल सोडून जातात!! यात आपण कलाकाराचा *अपमान* करिताहोत याची किंचितही जाणीव नसते. याचाच पुढील भाग म्हणजे, दुसऱ्या दिवशी इतरांशी (जे मैफिलीला गेले नसतात त्यांच्या समोर) बोलताना, *काल भीमसेन ऐकला* किंवा *काल कुमार काय अफलातून गायला आहे!* अशा भाषेत *पुड्या* सोडायच्या!! जणू काही हे कलाकार यांचे कायमचे *शेजारी* आहेत किंवा, *माझ्या त्यांच्याशी किती जवळीक आहे* हे दर्शविण्याचा उद्दामपणा दिसून येतो. यात फक्त एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची बाब विसरली जाते - कालच्या मैफिलीतून तुम्ही नेमके काय शिकलात? कारण तुम्हाला काही *शिकायचे* नसते. तुम्ही *सर्वज्ञ* असता!! चित्रपट संगीताबाबत बघायला मिळते. आता तशी वेळ येत नाही कारण आता YouTube वर बव्हंशी बरीचशी गाणी उपलब्ध असतात पण एकेकाळी, विशेषतः लताबाईंची *दुर्मिळ गाणी* आपल्या संग्रही असणे, हा पराकोटीच्या अभिमानाचा विषय असायचा. एकेकाळीमी देखील याला *बळी* पडलो होतो. माझ्याकडे, इतरांकडे नसतील अशा दुर्मिळ गाण्यांचा संग्रह आहे, अशी वाक्ये अत्यंत ताठ्यात इतरांसमोर बोलायची फॅशन होती. त्यावेळी मला देखील त्यांचा *हेवा* वाटायचा. पुढे जसा माझा अभ्यास वाढायला लागला तेंव्हा ध्यानात यायला लागले जी गाणी *दुर्मिळ* आहेत, त्यातील काही गाणी खरोखरच *विस्मृतीत* जावी, अशा लायकीची होती!! सगळीच दुर्मिळ गाणी *अनमोल* नाहीत!! मुळात गाणे कसे ऐकावे, याचा पायाभूत शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करण्याची फार गरज आहे. आपण जे ऐकतो, त्यातील आपल्याला काय आणि किती समजले आहे? हा प्रश्नच आपल्याला विचारत नाही. आपण आपल्याला कधीही प्रश्न विचारत नाही त्यामुळे गाण्यातील *सत्व* काय आणि *फोलफट* काय, हे समजून घेण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. प्रत्येकवेळी *शास्त्राचा* आधार घ्यायला पाहिजे असे नाही पण ऐकताना, *सजग* वृत्ती दाखवणे जरुरीचे आहे, हेच कुणाला पटत नाही. हल्ली रागदारी संगीतात एक प्रकार नाले तितका बोकाळला आहे, रचना *द्रुत लयीत* आली की सतार/सरोद किंवा बांसरी वादक आणि साथीला असलेला तबला वादक यांच्या *तुंबळ* युद्ध सुरु होते आणि समोर बसलेले तथाकथित रसिक *अवाक* होऊन ऐकत बसतात!! यात एक बाब विसरली जाते, सतारीवरील सूर हे कधीही तबल्यावर आणता येत नसतात, होतो तो निव्वळ *आभास* असतो मग तबला वाजवणारा झाकीर हुसेन असला तरी आणि हे मी अत्यंत गंभीरपणे विधान करीत आहे. परंतु लोकं याचीच *वाट* बघत असतात आणि नको तितकी अविश्वसनीय दाद देतात!! किती मूर्खपणा आहे. तसेच *संपूर्ण सप्तकी तान* घेणे, हे असेच रसिकांना *अवाक करून जाते. ही *संगीत* नव्हे, दुर्घट तान हा एक सांगीतिक अलंकार आहे, संपूर्ण गायन नव्हे. मग, खुद्द कलाकार अशा *गिमिक्सच्या* आहारी जातात आणि हाती फक्त संगीताचे *कलेवर* उरते!

No comments:

Post a Comment