Thursday 14 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग १

ललित साहित्यात वास्तवता असावी, असा विचार अधिक करून पाश्चात्य विचारवंतांनी मांडला आणि हळूहळू आपल्याकडे देखील वास्तवात हे एक महत्वाचे कलामूल्य आहे ही भूमिका मांडली गेली आणि गेल्या काही वर्षात त्याला बरीच प्रतिष्ठा मिळाली. काही जणांचे मत असे आहे, ललित साहित्य हा जीवनाचा आरसा आहे. त्यामुळे वास्तवतेचे चित्रण साहित्यात करणे, याच हेतूने साहित्याची निर्मिती होते, हा विचार देखील बराच बळावला गेला. "वास्तवता" हे एक साहित्यिक मूल्य म्हणून स्वीकारल्यानंतर त्या अनुषंगाने इतर विचार व्यक्त व्हायला लागले. त्यातूनच पुढे हरिभाऊ आपटे हे "सदाशिव पेठी" म्हणजेच समाजाच्या अत्यल्प वर्गाचे चित्रण करणारे म्हणून टीकेस पात्र झाले. समाजातील बहुसंख्य माणसे ज्या प्रकारचे जीवन जगतात त्यांचे चित्रण करणारे साहित्य, हेच श्रेष्ठ साहित्य अशा प्रकारचा विचार पुढे आला. त्याचप्रमाणे भूतकाळातील चित्रण करण्यापेक्षा वर्तमानकाळ साहित्यातू रेखाटणे अधिक चांगले, असे सुचवले जाऊ लागले. याच सुमारास, मराठीत मार्क्सवादाची धुळवड सुरु झाली आणि साहित्यिक मूल्याला एक नवीन परिमाण मिळाले. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वर्गकलह हाच वास्तव जीवनाचा अत्यंत महत्वाचा निकष म्हणून स्वीकारला गेला. मार्क्सवादी विचारवंत पुढे जाऊन म्हणायला लागले, वर्गकलहात शेवटी दलितांचा विजय होऊन समाजवादाची स्थापना होणे अनिवार्य ठरले. हीच भविष्यकालीन वास्तवता आहे. याचीच पुढील पायरी म्हणजे मार्क्सवाद्यांप्रमाणे गांधीवादी, समाजवादी, राष्ट्रवादी वगैरे विचारवंतांच्या सामाजिक वास्तवतेविषयी स्वतःच्या अशा ठाम कल्पना होत्या आणि आहेत. सामाजिक जीवनातील अमके प्रवाह महत्वाचे असे प्रत्येक पक्षाचे मत आहे आणि याच प्रवाहाचे चित्रण ज्या साहित्यात होते तेच अधिक खरे वास्तव, असे प्रत्येक पक्ष प्रतिपादन करीत असतो. अर्थात याधे निव्वळ वास्तवात हेच एकमेव साहित्यमूल्य मानणारे लोकं फारच थोडे, वास्तव जीवनाचे चित्रण करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, समाजाची जागृती करणे आणि सामाजिक प्रश्न सोडवायला उपयुक्त असा ध्येयवाद जनतेपुढे ठेवणे हेदेखील साहित्याचे कार्य आहे, अशी विचारधारा पुढे आली. मार्क्सवादी लोकं तर साहित्याला क्रांतीचे साधन म्हणतात. मुळात, साहित्य की एक कला आहे आणि कलाकृतीचे म्हणून काही गुणधर्म असतात.या मुद्द्याकडे बरेचवेळा तथाकथित वास्तववादाचे पुरस्कर्ते दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळेच साहित्यात वास्तव जीवनाचे चित्रण असते जे कलात्मकरीत्या केलेले असते, अशी एक विचारधारा पुढे येते. ह्याचाच वेगळा अर्थ कलेची म्हणून वेगळी मूल्ये असतात आणि त्या मूल्यांच्या आधारे एखादी कृती ही कलाकृती आहे की नाही, याचा निवाडा करतात. काही टीकाकारांच्या मते, कोठल्याही कलाकृतीचे मूल्यमापन हे कलेच्या(च) पातळीवर आणि कलामूल्यांच्या आधारे व्हायला हवे. कलाकृतीत वास्तवतेचे कसे आणि किती प्रमाणात चित्रण आहे, या गोष्टीला ते महत्व देत नाहीत. त्यांचे म्हणणे असे, कलाकृतीने अखेर वाचकांच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. (It must carry Conviction) वाचकाला ती खरी आहे, असे वाटले पाहिजे. या साठीच त्या कलाकृतीत चित्रित झालेल्या घटना वास्तव पाहिजेत. अर्थात इथे "वास्तव" या शब्दाचा अर्थ जरा वेगळा आहे. वास्तव म्हणजे जे प्रत्यक्ष घडते आगर जे सर्वसाधारणपणे घडते, ते नव्हे तर वास्तव म्हणजे शक्यतेच्या कोटीतले. वास्तवात हे साहित्यिक मूल्य आहे ही कल्पना अशा रीतीने निरनिराळ्या कारणाने दृढमूल झाली आहे. परंतु या कल्पनेचा आणि ती ज्या आधारावर आधारली आहे, त्या विधानांचा जर का अभ्यासपूर्ण परामर्श घेतला तर ती अत्यंत सदोष असल्याचे दिसून येईल. *क्रमश:*

No comments:

Post a Comment