Tuesday 27 October 2020

ये रे घना ये रे घना

मुळात ही शब्दरचना कविता म्हणून प्रसिद्ध झाली (बहुदा सत्यकथेच्या अंकात असावी) आणि पुढे ही कविता संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांच्या वाचनात आली. या कवितेत त्यांना *गाणे* दडलेले आढळले आणि एका सुंदर भावगीताचा जन्म झाला. कवितेत गाणे आढळणे, हे सहज जमण्यासारखे नसते. त्यासाठी संगीतकाराचा काव्याचा अभ्यास असणे आवश्यक असते. कविता सतत वाचून त्यातील गेयतेचा आणि गेयतेमधील लयीचा अदमास घेता येणे गरजेचे असते आणि हृदयनाथ मंगेशकर वेगळे ठरतात. असो, हा विषय आजच्या लेखाचा विषय नाही. कविता कशी समजावून घ्यावी, या विषयी कवी विं.दा.करंदीकरांनी एक *आदिम* मार्ग सांगितलेला आहे. आपल्याला तो मार्ग चोखाळायचा नाही परंतु त्या व्यतिरिक्त देखील कविता समजून घेता येते. मुळात कविता आपल्यासमोर येते ती शब्द माध्यमाद्वारे. त्यानंतर शब्दांच्या जडणघडणीतून आपण आशयाचे वेगवेगळे पदर सुटे करून कविता आत्मसात करत असतो. कविता वाचताना सर्वात प्रथम प्रभाव पडतो तो, शब्द आणि त्या शब्दांतून व्यक्त झालेल्या प्रतिमा दर्शनाचा. बरेचवेळा कविता इथे *जटिल* होते, ते असो. भावगीतात कवितेतील काही कडवी स्वररचनेसाठी घेतली आहेत परंतु त्यापलीकडे ही कविता जाऊन पोहोचते. आपण *ध्रुवपद* आणि प्रत्येक *कडवे* अशा क्रमाने कविता समजून घेण्याचा प्रयत्न करू. खरंतर *दिवेलागण* या कवितासंग्रहात छापलेली कविता फारच अल्पाक्षरी आणि छोटी आहे. पुढे भावगीत करायचे ठरवल्यावर कवी खानोलकरांनी आणखी २ कडवी नव्याने लिहिली. आरतीप्रभुंची कविता कधीही *एकरेषीय* नसते. प्रत्येक वाचनात त्याला अर्थाचे नवनवीन घुमारे फुटत असतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे शब्द आणि शब्दांमधील *मोकळी जागा* होय!! आरतीप्रभूंच्या कवितेतील अनुभव काहीवेळा विस्कळीत वाटतो याचे कारण, कवी बरेचवेळा एखाद्या सूत्राला धरून काहीतर, असे वाटत नाही. सुरवातीला एक सूत्र असते पण पुढे त्यात अनेक वेगवेगळ्या प्रतिमा अवतरतात आणि बरेचवेळा  वाचक काहीसा चक्रावून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुष्कळदा जागृत मनाच्या राजरस्त्याने पुढे न सरकत संज्ञाप्रवाहाच्या भूमिगत प्रवाहाबरोबर ते पुढे सरकतात आणि मध्येच कवितेतील मूळ संकल्पना नजरेस आणून, वाचकांना बिचकवतात. पण हे सगळे करताना, अनुभवांच्या रचनेच्या मूळ तत्वांना ते डावलत नाहीत. कवितेतील सगळेच अनुभव बांधेसूद असतात. ते डावलतात ते अनुभवांच्या रचनेविषयीच्या संकेतांना. त्यामुळे, त्यांच्या अनुभवांची रचना जराशी अस्वाभाविक वाटली तरी तरी ती, त्या प्रत्यक्ष अनुभवांपुरती अधिक स्वाभाविक असते, असे आपल्याला म्हणता येईल.  *ये रे घना* *ये रे घना* *न्हाऊ घाल* *माझ्या मना* *फुले माझी* *अळुमाळू* *वारा बघे* *चुरगळू* *नको नको* *म्हणताना* *गंध गेला* *रानावना*  *ये रे घना* *ये रे घना*  *न्हाऊ घाल* *माझ्या मना* मूळ कविता ही इतकीच आहे. आता इथे सगळ्यात आधी प्रश्न पडतो, तो * ये रे घना* अशी जी आर्त साद घातली आहे ती निव्वळ निसर्गाला अनुलक्षून आहे का? पुढील प्रतिमा वाचताना, या विधानात काहीएक तथ्य आहे असे जाणवते परंतु मग प्रश्न उद्भवतो, त्यांना निसर्गाला अशा प्रकारे साद घालावीशी का वाटली? आरतीप्रभुंची शब्दकळा ही या कवितेतील शब्द वापरायचा झाल्यास *अळुमाळू* अशीच अलवार तलम असते. तिला अर्थाचा ठाम निकष लावला तर कदाचित ही कविता आपले अंग आकसून बसेल की काय? असा प्रश्न पडतो. ही कविता म्हणजे एक निसर्गचित्र तर नक्कीच आहे पण आरतीप्रभूंना निव्वळ निसर्ग उभा करायचा नाही. *नको नको म्हणताना,गंध गेला रानावना* ही अभिव्यक्ती आपल्याला वेगळेच सुचवते. इथे कुण्या एका व्यक्तीची अभिव्यक्ती व्यक्त होते. गंमत अशी आहे, जरी ही व्यक्ती म्हणजे तरुणी असे धरले तर मग लगेच एका प्रणयी थाटाची कविता, असा गर्भितार्थ समोर येऊ शकतो. खरंच तसे आहे का? ही एका तरुणीची निसर्गाला केलेली विनवणी आहे? पावसाला  आमंत्रण देऊन आपल्या मनाची तृषार्तता शमवून घेणे हेच या कवितेचे प्राक्तन आहे का? पुढे भावगीत करताना त्यांनी २ विस्तारित ओळी लिहिल्या आहेत.  *टाकुनिया घरदार* *नाचणार नाचणार* *नको नको म्हणताना* *मनमोर भरराना*  *नको नको किती म्हणू* *वाजणार दूर वेणू* *बोलावतो सोसाट्याचा* *वारा मला रसपाना*  ही ती २ कडवी आरतीप्रभूंनी काही काळाने लिहिली. मघाशी मी तरुणीचा उल्लेख केला तो याच ओळींच्या संदर्भात आहे. "टाकुनिया घरदार" ही अभिव्यक्ती केवळ प्रणयी तरुणीच्या भावविश्वात साकारणारी आहे आणि पुढील ओळ - "नाचणार, नाचणार"हे शब्द त्याच भावनांचे विस्तारित स्वरूप आहे. मग याचा अर्थ असा होऊ शकतो, "ये रे घना" ही सुरवातीची *आळवणी* जरी थोडी वेगळ्या अभिव्यक्तीची वाटली तरी त्याची पूर्ती या ओळींशी होते. "नको नको म्हणताना, "मनमोर भरराना" या ओळीची सांगड  मग मुग्ध प्रणय भावना आणि संयत अभिव्यक्ती अशी जोड लागते. "मनमोर" हा खास आरतीप्रभूंचा आवडीचा शब्द आहे. शेवटच्या कडव्यातील "बोलावतो सोसाट्याचा" ही ओळ "मनमोर भरराना"या ओळीबरोबर एकत्र घेतली की सगळे वर्तुळ पूर्ण होते. मनाची संत्रस्त अवस्था परंतु हवीहवीशी वाटणारी आतुरता अशी विरोधाभासातून अवतरलेली ही प्रणयी भावना आहे. इथे एक गफलत होऊ शकते. शेवटच्या कडव्यात "वाजणार दूर वेणू" या ओळीचा संबंध राधा-कृष्ण नात्याशी सहज जोडला जाऊ शकतो आणि मग सगळीच कविता गूढ, आध्यात्मिक वगैरे होऊ शकते पण मला अजूनही असेच वाटते, आरतीप्रभूंच्या मनात दुरान्वये देखील असा विचार आला नसावा. ही कविता म्हणजे एका तरुणीचा आत्ममग्न संवाद आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. मला वाटते, ही कविता याच विधानाचे पद्यरूप आहे, 

No comments:

Post a Comment