Wednesday 14 October 2020

स्वगत

सध्या माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्यावेळचा *सदुपयोग* कसा करायची याची भ्रांत पडलेली आहे. तशी आजूबाजूला भरपूर पुस्तके आहेत, काही पुस्तकांना तर अजूनही हात देखील लावलेला नाही तर काही पुस्तकांची पारायणे झाली आहेत पण कालौघात आपण बदलतो, आपली आवड बदलते आणि अचानक साक्षात्कार व्हावा तसे आपल्यातील घडून गेलेले बदल आपल्यालाच अचंबित करतात. हे बदल नेमक्या कुठल्या क्षणी घडले तो क्षण आपल्या हातून निसटून गेलेला असतो आणि जरी हुडकून काढला तरी त्या क्षणाची भावव्यक्ती आणि अभिव्यक्ती आपण विसरून गेलेलो असतो. नदीच्या संथ पाण्याचा प्रवाह अचानक बदलून वेगळ्या वळणावर यावा असे हे बदल घडलेले असतात. तद्नुषंगाने आपल्या प्रतिक्रिया होत असतात. आजही माझे कविता वाचन चाललेले असते. पूर्वी वाचलेल्या कविता वाचताना, त्याच कविता नव्या आशयाने मनात झळकतात आणि पूर्वी वाचताना अजिबात न जाणवलेले संदर्भ, नवीन आशय लक्षात येऊन आपण दिड:मूढ होत असतो. अशा वेळेस त्या कवींचे उपकार स्मरणे इतकेच आपल्या हाती असते. एकूणच आपल्या हाती तसे फारच कमी सापडलेले असते आणि जे सापडलेले असते, ते देखील, पारा चिमटीत पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न करावा तसे निसटून जात असते किंवा घरंगळते. गेलेला क्षण कधीही अनुभवता येत नसतो आणि येणाऱ्या क्षणाचा कधीही अदमास घेता येत नसतो!! वाईट इतकेच असते, वर्तमान देखील संपूर्णपणे आकलनात येत नसते!! आपण आलेला क्षण विनातक्रार घालवण्याच्या प्रयत्नात असतो आणि तितकेच आपण करू शकतो. त्यामुळे झालेला आनंद किंवा दु:ख हे कितीही चिरस्मरणीय वाटत असले तरी त्या भावनेला काळाचे बंधन हे असतेच असते. तरीही आपण कधीतरी त्या क्षणाबद्दल भावव्याकुळ होत असतो!! आता गंमत अशी आहे, गेलेला क्षण जर पुन्हा अनुभवता येत नसेल तर मग त्याबद्दल इतकी आस्था तरी का वाटते? त्या क्षणाची अनुभुती, तीव्रता ही त्या क्षणापुरतीच *जिवंत* असते. एक उदाहरण - आपल्या जिवलगांचा मृत्यू ही मन काळवंडणारी घटना असते पण तरीही मृत्यूचे त्या क्षणीचे भेसूर दर्शन पुढे कालानुरूप तितके भेसूर वाटत नाही. किंबहुना त्याची तीव्रता हळूहळू मृदू होत असते. म्हणजेच कालानुरूप आपण देखील बदलत असतोच की. आणि हे सगळे जिवलगांबाबत मग मी वर म्हटल्याप्रमाणे पुस्तकांबाबतची भावना बदलत गेली तर त्याचे नवल का वाटावे? मला एकुणातच पुस्तकांबद्दल फार ममत्व वाटते. अशी काही पुस्तके माझ्या वाचनात आली, ती वाचताना किंवा वाचून पूर्ण झाल्यावर, आपल्या भावना किती निरर्थक आहेत, हेच झगझगीतपणे जाणवले. आपले आनंद, आपले दु:ख हे आपल्या पुरतेच सीमित असते. पूर्वी परदेशी राहात असताना एक,दोन वेळा मनात आले - आपण असे एकटे इथे का राहतो? केवळ आर्थिक अभ्युदय की आणखी काही? मी थोडी थोडकी नव्हे सलग १९ वर्षे परदेशात काढली आणि एकट्याने काढली. यात आत्मप्रौढी अजिबात नाही कारण काही कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, काही कर्तव्ये होती पण या सगळ्यात, माझ्यावर कुणी जबरदस्ती केली नव्हती. परदेशी रहाण्याचा निर्णय हा माझा होता. सुरवातीला अप्रूप होते पण असे अप्रूप वळवाच्या थेंबाप्रमाणे अल्पजीवी असते. पुढे वास्तवात वावरताना असंख्य अडीअडचणी उभ्या राहतात आणि त्यातून फक्त एकट्यानेच मार्ग काढायचा असतो!! *असे असून देखील मी इतकी वर्षे काढली. लोकांना एक चेष्टेचा विषय देऊन.* इतकी वर्षे मी २ गोष्टींवरच काढली - १) सोबत नेलेली पुस्तके, २) संगीताच्या सीडीज. सतत पारायण होऊन कंटाळा येऊ नये म्हणून मी दर वर्षी सुटीत घरी आल्यावर नवीन पुस्तके विकत घ्यायची आणि जुनी घरी ठेवायची तसेच संगीताच्या सीडीज बद्दल धोरण ठेवले होते आणि आजही या दोघांप्रती माझ्या मनात कमालीची कृतज्ञता आहे. याचा वेगळा अर्थ असा होतो, माझ्या परीने वाचनाची आवड मी बदलत ठेऊन, छंद शिळीभूत होण्याची विसंगती टाळत होतो. तोच प्रकार संगीताबाबत घडत गेला. असे असूनही आणि माझी आवड बदलत असूनही काही पुस्तकांबद्दलची ओढ आजही कायम राहिली आणि काही पुस्तके आता हातात घ्यावी का? अशा प्रश्नावर येऊन थांबली. मराठी कवितेने मात्र माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. मुळात कवितेसारखा अत्यंत अल्पाक्षरी आविष्कार पहिल्या वाचनात पूर्णपणे आवाक्यात येईल असे सहसा घडत नाही त्यामुळे कवितेविषयी नेहमीच ओढ कायम राहिली. आता गेले काही महिने कोरोनाने थैमान घातले असल्याने, हाताशी बराच वेळ आहे. कविता संग्रह देखील हाताशी आहेत पण ती अनुभूती घेता येत नाही, वाचताना मन एकाग्र होत नाही. आपलेच तोकडेपण आपल्याला फार त्रस्त करते. असे देखील असू शकेल, आपले अपुरेपण दिसत आहे, याचाच मनाला त्रास होत असेल. तसे माझे लेखन अव्याहतपणे चालूच आहे, नवीन कल्पना सुचतात, नवी मांडणी सुचते पण तरी आताशा असेच वाटायला लागले आहे, इतके लिहून खरंच मला समाधान मिळत आहे का? की लेख लिहायची जबाबदारी स्वीकारल्याचे जोखड वाटायला लागले आहे? आता पर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त गाण्याचे रसग्रहण करून झाले आहे पण अजूनही *रसग्रहण* जमले आहे का? मी मलाच फसवत नाही ना? कालचा लेख मला आज शिळा वाटायला लागला आहे, त्यामुळे होणारे *कौतुक* निरर्थक वाटत आहे का? मुळात आपल्याकडे सणसणीत प्रतिक्रिया देण्याचे सगळेजण टाळतात - कारणे विचारली तर हजारो कारणे सांगतात. हल्ली तर मला कुणालाच काही विचारावेसे वाटत नाही कारण मत विचारणे म्हणजे *भीक* मागणे असेच वाटायला लागले आहे. याचाच परिणाम माझ्या वाचनावर आणि आवडीवर होत चालला आहे का? इथेच थांबतो कारण हे प्रश्न तर्काधिच संपणारे नाहीत आणि याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कायम निष्फळ ठरणारा आहे.

No comments:

Post a Comment