Saturday 3 October 2020

आधा हैं चंद्रमा

हिंदी चित्रपट संगीत ज्या संदर्भात चित्रपटांत अवतरते त्याकडे फारसे लक्ष देऊन त्याविषयी फार विचार झाला आहे असे वाटत नाही. खरे म्हणजे भारतीय संगीत, भारतीय जनसंगीत आणि चित्रपटसंगीत या तिघांनी पुरवलेल्या परिप्रेक्षांमधून हिंदी चित्रसंगीताचा अर्थ लावला पाहिजे. तसे पाहता संबंधित संदर्भसाखळी पूर्णरूपाने आणि भारतीय नकाशावर मांडायची तर अर्थातच त्यात अधिक दुवे असतील. म्हणजे भारतीय संगीत -- भारतीय जनसंगीत -- भारतीय चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटगीत अशी ती साखळी असेल. या साखळीची रचना जरा ध्यानात घ्यायला लागेल. साखळीतील पुढील दुवा गाठला की सांगीत-सांस्कृतिक संदर्भ अधिक संकोचतो. संबंधित संगीत अधिक घट्ट बांधणीचे असते आणि आशयही नेमका होऊ लागतो. तेंव्हा ही घट्ट बांधणी नेमकी कशी असते याचा थोडा अदमास आणि गाण्याचा आस्वाद आपण आजच्या गाण्यातून घेणार आहोत. अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास, भरत व्यास हे काही प्रतिभावंत कवी नव्हेत. बरेच वेळा "र ला ट" जोडून कविता केल्याचे ध्यानात येते. चित्रपटगीतात चटपटीतपणा आवश्यक असतो तसेच प्रतिमांचा फुलोरा वगैरेची फारशी गरज नसते आणि याचा परिपाक या कवीच्या रचनेत वारंवार आढळतो. "अभि पलको में भी हैं बरसात आधी" सारखी सरधोपट वाक्ये इथे आढळतात. आता कवितेची पहिली ओळ "आधा हैं चंद्रमा, रात आधी" या ओळीतील यमक "आधी" शब्दाने नक्की केले आणि मग सगळी शब्दरचना याच शब्दाने संपवायची असा ध्यास घेतल्याचे लक्षात येते. "आधे छलके नयन, आधे ढलके नयन" आता या ओळीत निव्वळ शाब्दिक लय वगळता आशय म्हणून अगदीच विसविशीत ओळ आहे. आणखी बघायचे झाल्यास, दुसरा अंतरा बघितल्यास, "प्यासा प्यासा पवन, प्यासा प्यासा गगन" या ओळीत "प्यासा" शब्दाची इतकी पुनरुक्ती करण्याची काय गरज होती? एव्हड्याने काही कमी झाले म्हणून अंतरा संपवताना "प्यासे तारों की भी हैं बारात आधी" सारखी घिसीपिटी ओळ लिहून कवितेचा दर्जा आणखी खालावून टाकला . तेंव्हा या गाण्यातील कविता अगदीच सुमार आहे, हे मान्यच करायला हवे. संगीतकार सी. रामचंद्र यांनी मात्र सामान्य बकुबाची शब्दरचना खऱ्या अर्थाने फुलवली आहे. संगीतकाराला समजा असामान्य दर्जाची कविता लाभली तरच त्याला स्वररचना करायला आव्हान मिळते, असले काहीसे झिजवट नाणे, इथे या संगीतकाराने खोटे ठरवले आहे. मध्य लयीत गाण्याची सुरवात होते आणि हळूहळू द्रुत लयीत गाणे शिरते. "मालकंस" रागाशी जवळीक साधणारी स्वररचना आहे. मुखड्याच्या पहिल्याच ओळीत "षड्ज मध्यम" सूर या रागाची ओळख दर्शवतात पण त्यात किंचित "कोमल रिषभ"ऐकायला मिळतो जो मालकंस रागात वर्ज्य आहे. पुढे "रहे ना जाये" या ओळीत "कोमल धैवत" ऐकायला मिळतो. राग वापरताना नेहमी त्याच्या सुरांचा पुनर्भाव निर्माण करायचा, ही या संगीतकाराची खासियत त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर आढळते. गाण्याचा परिपोष महत्वाचा आणि मग त्यासाठी रागाच्या स्वरांची मोडतोड केली तरी काही हरकत नाही, या ब्रीदाला हा संगीतकार नेहमी जागला. आणखी थोडे वेगळे मांडायचे झाल्यास, संपूर्ण गाण्याचे स्वरलेखन केल्यास, वर्जित स्वरांना स्थान दिल्याचे दिसून येते परंतु गाण्याच्या गोडव्यात रेसभर देखील फरक पडत नाही. आणखी एक खासियत या गाण्याबाबत सांगता येईल. गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत बांधलेला आहे. कुशाग्र बुद्धिमतीचा एक निकष म्हणता येईल. अंतऱ्याची उठावण अगदी वेगळ्या पातळीवर करणे हे या संगीतकाराचे आणखी वैशिष्ट्य म्हणायला लागेल पण मग तो स्वरिक प्रवास पुन्हा मुखड्याशी येऊन कसा जुळवला जातो, याचा मागोवा घेणे नेहमीच मनोज्ञ असते. "पिया आधी है प्यार की भाषा" ही ओळ "षड्ज" स्वरावर सुरु होते म्हणजे मुखड्याच्या स्वरलेखनात कुठेही अशा ताकदीचा स्वर लागलेला नाही. हा स्वर आणि "कोमल धैवत" या स्वरांची पखरण आहे. हा सगळाच सांगीतिक प्रवास अवलोकणे हा बौद्धिक खेळ आहे. वास्तविक हे सगळे गाणे ऐकताना कधीही लक्षात येत नाही आणि अशी वैशिष्ट्ये दडवून गाणे सादर करणे हाच या संगीतकाराचा मुख्य उद्देश असल्याने, रंजकता हा गुण या गाण्यातून वारंवार दिसतो. गाणे रंजक असावे हे तर कुठल्याही गाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य असते परंतु तसे करताना अशी छुपी कलाकुसर करून आपल्या पांडित्याचे कसलेही प्रदर्शन न मांडता गाणे व्यामिश्र बनवणे, ही ती खरी खासियत आहे. या संगीतकाराच्या अशा प्रकारच्या रचनांनी अजूनही लोकमानसावर परिणाम का साधावा याची काही कारणे आहेत. पहिले असे की चालीची बांधणी इतके साधी आहे की हे गीत ऐकून आपणही गाऊ शकू असे कुणालाही वाटेल!! दुसरे असे या गाण्यात वापरलेला ताल ( इथे प्रचलित दादरा ताल आहे) आणि लयीपण सहज उचलण्यासारखे आहे. त्यांचे अनुकरण करणे आणि त्या दीर्घकाळ वापरणे जमते. याचे मुख्य कारण शरीराची हालचाल वा त्याचे हावभाव करताना झेपणारी गती यांत योजली आहे. शिवाय या नृत्यसदृश हालचाली वगैरेही अशा आहेत, की त्या पार पाडण्यासाठी खास पद्धतशीत पूर्वशिक्षणाची गरज नाही. गीत गुणगुणण्यासारख्या चालीची असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांतून वासनारहित मोकळेपणा खेळत आहे. गायक म्हणून महेंद्र कपूर यांनी चांगली साथ दिली आहे. गायक म्हणून विचार करता, काही मर्यादा जाणवतात. खरतर आवाजाचा पल्ला, भरीवपणा, सामान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा आणि सुरेलपणा ही वैशिष्ट्ये या गाण्याच्या गायनातून स्पष्टपणे दिसतात परंतु आवाजात लवचिकपणा बरेचवेळा कमी प्रमाणात आढळतो आणि ताठरता बरीच आढळते. परिणामी उत्कर्ष बिंदू गाठताना परिणाम काहीसा पातळ होतो. गायनावर बरेच वेळा मोहमद रफी यांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो विशेषतः लहान स्वरांशाचे सफाईदार द्रुतगती गायन करताना हे वैशिष्ट्य जाणवते. दुसरा अंतरा महेंद्र कपूर यांनी गायलेला आहे आणि तो गाताना, वर म्हटल्याप्रमाणे आवाजात काहीसा ताठरपणा जाणवतो, परिणामी आवाजातील गोलाई हे वैशिष्ट्य ऐकायला मिळत नाही. आशा भोसले यांनी सहगायन केलेले आहे. पहिला अंतरा गाताना त्यांची "शब्दभोगी" ही गायनशैली खासकरून ऐकायला मिळते. "पिया आधी हैं" शब्दांची उठावण घेताना "तार षड्ज आणि कोमल धैवत" स्वर ऐकण्यासारखे आहेत आणि ते ऐकताना "शब्दभोगी" गायकी का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर मिळते. तांत्रिक वैशिष्ट्य बाजूला ठेऊया परंतु निव्वळ शब्दोच्चार ऐकले तरी ही गायकी इतरांपेक्षा किती वेगळी आणि सार्थ आहे याची प्रचिती घेता येते. "आधे छलके नयन, आधे ढलके नयन" या ओळीतील "छलके" आणि "ढलके" हे शब्द ऐकावेत. संगीतकाराने योजलेल्या "दादरा" तालाने गायकीला भरीवपणा येतो परंतु ते एक परिमाण आहे. मूळ गायकी खरी महत्वाची. इतके सुंदर गाणे असल्यावर आज देखील या गाण्याची मोहिनी जरा देखील कमी होत नाही हे कुणालाही नवलाचे वाटू नये. आधा हैं चंद्रमा, रात आधी रह ना जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी पिया आधी हैं प्यार की भाषा आधी रहने दो मन की अभिलाषा आधे छलके नयन, आधे ढलके नयन अभि पलको में भी हैं बरसात आधी आस कब तक रहेगी अधुरी प्यास होगी नहीं क्या ये पुरी प्यासा प्यासा पवन, प्यासा प्यासा गगन प्यासे तारों की भी हैं बारात आधी सूर आधा ही शाम ने साधा रहा राधा का प्यार भी आधा नैन आधे खिले, होंठ आधे हिले रही मन में मिलन की वो बात आधी https://www.youtube.com/watch?v=aasw1WDNhgY

No comments:

Post a Comment