Saturday 16 May 2020

मनस्वी यमन

मराठी चित्रपट "कामापुरता मामा" मध्ये "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे यमन राग आनंदाने निथळत असतो, याची ग्वाही देणारे आहे. नुकताच प्रणयाचा स्वीकार  झालेला आहे आणि नव्या जीवनाची स्वप्ने नायिकेच्या मनात असतत. याचा पार्श्वभूमीवर हे गाणे आहे. संगीतकार यशवंत देवांची चाल आहे आणि गीत रचना देखील त्यांचीच आहे. रूढार्थाने यशवंत देव हे कवी नाहीत परंतु त्यांनी प्रसंगोत्पात रचना लिहिल्या आहेत. लिहिताना, आपण "कवी" नसून केवळ काही गाण्यांच्या बाबतीत रचना करीत आहोत,याचे भान नेहमी आढळते. परिणामी शब्दरचना सहज, सोपी आणि गेयता प्रमुख असते.  

"जीवनात ही घडी अशीच राहू दे,
प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे."


त्यांनीच एकेठिकाणी म्हटले आहे, "चाल ही शब्दातच दडलेली असते. संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो". अर्थात देवांनी काही प्रसंगी चालीवर देखील शब्दरचना केल्या आहेत पण तरीही तो केवळ अपवाद मानावा. गाणे अतिशय द्रुत लयीत आहे, पण तरीही शब्दोच्चार (अर्थात लताबाईंचे) आणि त्याची सुरांबरोबर घातलेली सांगड विलक्षण सुंदर आहे. एक गंमत आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, त्यातील व्हायोलीनचे सूर किंचित "पुरिया धनाश्री" रागाची छटा दाखवतात!! चाल यमन रागावर आणि त्यात पुरिया धनाश्री रागाची छटा!! काय बिघडले? गाण्याच्या चालीत तर कुठेही विक्षेप आलेला नाही. संगीतकार म्हणून यशवंत देवांची ही खुबी खरोखरच अप्रतिम आहे.  

मराठी माणसाच्या भावजीवनात माडगुळकरांच्या गीत रामायणाचे स्थान अढळ आहे. आज इतकी वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची मोहिनी काही उतरलेली नाही. गेयबद्ध रचना कशी करावी याचा आदीनमुना माडगूळकरांनी पेश केला आहे. अर्थात, अशा कवितांना तितकीच तोलामोलाची सुरांची साथ सधीर फडक्यांनी दिली असल्याने, यातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ""दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा" हे गाणे तर चिरंजीवित्व लाभलेले गाणे. यमन रागाचे सूर या गाण्यात ओतप्रोत भरलेले आहेत. मुळात, गाण्याची शब्दरचना(च) इतकी अप्रतिम आहे की अशा कवितेला चाल देखील तितकीच सुमधुर लागणार. आयुष्याचा "अर्क" म्हणून गणले जावे, अशा ताकदीची शब्दरचना आहे. 
"दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."


 गाणे लांबीला बरेच मोठे आहेत आणि हे ध्यानात घेऊन, सुधीर फडक्यांनी चाल बांधताना आणि गायन करताना, त्यात निरनिराळे "खटके" घेतले आहेत, प्रसंगी चाल तार स्वरांत नेउन ठेवली आहे. अर्थात तिथे देखील संगीतकाराने, शब्दांचे औचित्य सांभाळून गायन केले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, 
"दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, 
 एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ" 
अगदी सोप्या पद्धतीने आशय व्यक्त केला आहे पण, गायन जर का नीट ऐकले तर चालीतील फरक कळून घेता येतो. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, फडके गाताना, शब्दांबाबत फार विचक्षण दृष्टी ठेवतात. "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा", या ओळीतील "दोष" हा शब्द किती अचूक पद्धतीने उच्चारला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. सूर आणि लयीचा सगळा बिकट बोजा सांभाळून, शब्दांबाबत सजग भान ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नव्हे. 
सुप्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांची "दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती." ही कविता आजही, त्यांच्या लोकप्रियतेची निदर्शक अशी कविता आहे. आजही कवी बोरकर, बहुतांशी याच कवितेच्या संदर्भात ओळखले जातात. या कवितेचे गाण्यात रुपांतर केले आहे, संगीतकार वसंत प्रभू यांनी, "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटाच्या निमित्ताने. कविता अतिशय भावगर्भशील आहे जीवनाला यज्ञाची उपमा देण्याची कल्पकता आहे तसेच कवितेच्या शेवटी, "मध्यरात्री नभघुमटा खाली, शांतीशिरी तम चवऱ्या ढाळी; त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी, एकांती डोळे भरती" सारख्या अजरामर ओळींनी करून, ही कविता सामान्य माणसाच्या भावजीवनाचा भाग बनून गेली. 


तशी कविता सरळ, सोपी आहे आणि त्याच प्रकाराने, वसंत प्रभूंनी गाणे तयार करताना, चालीची निर्मिती केली आहे. कवितेतील काही ठराविक कडवी घेतली आहेत परंतु चित्रपटातील प्रसंग उठावदार करण्याच्या दृष्टीने सुयोग्य आहेत. सरळसोट यमन राग या गाण्यात दिसतो. चालीत कुठेही औचित्यभग होणार नाही आणि आशयाची अभिवृद्धी सतत होत राहील, याची काळजी घेतली आहे. अर्थात, आशा भोसले यांचे परिणामकारक गायन देखील तितकेच महत्वाचे आहे.  

पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी "भोळी भाबडी" चित्रपटात यमन रागावर आधारित सुंदर अभंग गायलेला आहे - "टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग". अभंग, माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे आणि त्याला तितकीच समर्पक चाल, संगीतकार राम कदम यांची आहे. संगीतकाराने, या दोन दिग्गज गायकांची गायकी समोर ठेऊन, चालीची निर्मिती केली आहे. स्वरांवर ताबा ठेवण्याची वसंतरावांची शैली तर घुमारेदार, गोलाईयुक्त गायनाची भीमसेन जोशीची शैली, दोन्ही प्रकारच्या गायकीचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला ऐकायला मिळते. यमन सारखा सर्वसमावेशक राग हाताशी असल्याने, चालीत "गायकी" अंग अंतर्भूत होणे क्रमप्राप्त(च) आहे.  
"टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग;
देवाजीच्या  दारी आज रंगला अभंग." 


भीमसेन जोशींचे अभंग गायनाशी कायमचे नाव निगडीत होण्यापूर्वीची ही रचना आहे परंतु गाणे ऐकताना पंडितजींच्या आवाक्याची आणि पुढील वाटचालीची कल्पना करता येते. तसे बघितले तर या गाण्यात वसंतरावांपेक्षा भीमसेनी गायनाचा प्रभाव अधिक आहे आणि त्यांना गायला बराच अवसर मिळालेला आहे. नवल असे वाटते, इतकी समृद्ध रचना काळाच्या ओघात मागे कशी पडली? 
कविवर्य भा.रा.तांब्यांनी आयुष्यात असंख्य गीतसदृश रचना केल्या. किंबहुना, त्यांच्या कविता वाचताना, आपल्या मनात आपोआप लयबद्ध चालीचा आराखडा तयार होतो. कवितेच्या प्रत्येक ओळीत गेयता सामावली गेली आहे. मुळात त्याकाळच्या इंदोरच्या सरंजामी राजवटीचा गाढा परिणाम त्यांच्या कवितेवर पडलेला दिसतो. 
"तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वाचन तुला;
आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला."


या कवितेत देखील याच वृत्तीचा प्रभाव दिसतो. काही ठिकाणी संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात परंतु त्यामुळे कविता अधिक "श्रीमंत" होते, ही बाब नाकारणे अवघड आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी, या कवितेतील "राजस" भाव ओळखून, नेमका यमन राग(च) निवडला. आपण मागील लेखात बघितले त्याप्रमाणे, यमन रागच समय, प्राचीन ग्रंथात "सांजसमय" दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर, या गाण्याच्या सुरवातीला संतूर वाद्यातून यमन रागाची धून छेडलेली आहे आणि पुढील रचनेची सूचना मिळते. चाल गायकी अंगाची आहे. 
किंबहुना हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतेक रचना या गायकी थाटाच्याच असतात आणि त्यामुळे गायला अवघड होतात. लताबाईंनी चालीतील अश्रुत गोडवा ओळखून गायनाची शैली ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे कमालीचे रमणीय होते. चालीचा तोंडावळा खरेतर रागदारी चीजेकडे वळतो पण तसे असून देखील रागातील "लालित्य" शोधून, संगीतकाराने चालीचे खरोखर सोने केले आहे.

No comments:

Post a Comment