Thursday 21 May 2020

दिल चीज क्या है

"तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ,
आलीस मिरवीत चालीमधुनी नागिणीचा डौल;
करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले 
जळता गंधक पाच उकळती यांही रंगलेले". 
प्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांच्या "जपानी रमलाची रात्र" या सुप्रसिद्ध कवितेतील काही ओळी. मराठी कवितेच्या इतिहासातील एक अतिशय लोकप्रिय अशी कविता. कवी बोरकरांवर त्यावेळच्या पोर्तुगीज गोव्याच्या संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मुळात मराठीत "स्त्री"चे अस्तित्व बहुतांशी सोवळे, पडद्याआड असे केलेले आत्ता आत्तापर्यंत सर्वमान्य होते. कवितेत स्त्री असायची पण त्याजोडीने सोज्वळता, शालीनता असायची. स्त्री देहाबद्दल आसक्ती  दाखवणारे बोरकर हे पहिले कवी निश्चितच नव्हेत परंतु बोरकरांच्या व्यक्तिमत्वावर असलेला पोर्तुगीज आणि एकूणच युरोपियन संस्कृती आणि साहित्याचा प्रभाव बघता अशा प्रकारची कविता लिहिणे साहजिकच होते. उर्दू गझलमध्ये जसा "भोगवादाचा मनोज्ञ" आविष्कार दिसतो त्याचेच काहीसे संयत प्रतिबिंब बोरकरांच्या कवितेतून आढळते. अर्थात रूढार्थाने बोरकरांनी "गझल" वृत्तात कधी कविता केल्याचे निदान माझ्यातरी वाचनात आलेले नाही. आजचे आपले गाणे - दिल चीज क्या है, हे गाणे याच ओळींची प्रचिती देणारे आहे. कविता म्हणून बघायला गेल्यास गझल "वृत्त" आहे परंतु स्वररचना म्हणून बघायला गेल्यास, चालीची "वृत्ती" लखनवी ढंगाच्या ठुमरीकडे झुकणारी आहे. अर्थात ठुमरी अंगाने गझल गाता येते हे आपण पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या गायकीतून ऐकू शकतो. 
"शहरयार" या उर्दूतील नामांकित शायरने हे गाणे लिहिले आहे. हिंदी चित्रपटासाठी, जे शक्यतो चित्रपटासाठी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध नाहीत अशा कवींनी नाममात्र का होईना शब्दरचना केल्या आहेत आणि त्यात या शायरचे नाव घ्यावेच लागेल. कविता म्हणून वाचायला गेल्यास अप्रतिम गझल वृत्तातील रचना आहे, हे सहज समजून घेता येते. चित्रपटात खऱ्याअर्थी गझल वृत्त राबवता येत नाही कारण चित्रपटातील गाणी ही नेहमी प्रसंगोत्पात असतात आणि त्यात मुखड्याला जी भावना असते, त्याला अनुलक्षून पुढील अंतरे लिहावे लागतात आणि त्यामुळे चित्रपटात "नझ्म" वृत्त भरपूर आढळते. आता या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास, इथे प्रत्येक कडवे ही एक सार्वभौम कविता आहे (गझलचा एक आवश्यकनिकष) तसेच प्रत्येक कडवे २ ओळींचे आहे. प्रत्येक काढावयाचा समारोप हा पहिल्या ओळीला समांतर पण तरी काहीशी  आश्चर्यचकित करणारी अभिव्यक्ती आहे. ही सगळी चांगल्या गझल वृत्ताची लक्षणे आहेत. थोडक्यात, सुदृढ गझल वृत्त वाचण्याचा आनंद आपल्याला मिळतो. पहिल्या ओळींतून प्रणय भावना दृग्गोचर होते. आता कोठीवरील गाणे म्हटल्यावर प्रणय, त्याचे लाघवी आवाहन वगैरे रंग बघायला मिळणे क्रमप्राप्तच ठरते. गीताचा समय अर्धरात्रीच्या आधीचा आहे. कोठीवर आलेल्या रसिकाला आवाहन करायचे पण तसे करताना आपला तोल कुठेही ढळू द्यायचा नाही,किंबहुना प्रणयाची आदबशीर मांडणी करायची, असाच भावाविष्कार दिसतो. कवितेची भाषा तशी सोपी उर्दू भाषा आहे. त्यामुळे कविता म्हणून वाचताना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. भाषेचे सौष्ठव - "दिवार-ओ-दर को गौर से पहचान लिजीये" सारखी ओळ अशा पद्धतीने लिहिली आहे की एकूण आशय लगेच ध्यानात येतो.  
संगीतकार खैय्याम यांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास तसेच पहिल्यापासून उर्दू शायरीचा गाढा व्यासंग असल्याने, असा उर्दू संस्कृतीवर आधारित चित्रपट मिळाल्यावर त्यांची शैली खुलून आली. एक काळ असा होताहोता , खैय्याम हे चित्रपट क्षेत्राच्या बाहेर होते, हातात कुठलेही चित्रपट नव्हते आणि त्यांना "उमराव जान" सारखा चित्रपट मिळाला आणि या संधीचे त्यांनी सोने केले. गाण्याची चाल बिहाग रागावर आधारित आहे पण अधिकतर रागाचा तिरोभाव अधिक दिसतो. अर्थात हे तर सगळ्याच ललित संगीताच्या रचनाकारांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पाहा असे अजिबात गर्जून न सांगता हे गीत आपला भावपरिणाम सिद्ध करतात. खरंतर खैय्याम याच्या संगीताचे हे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. मानसिक अथवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, ही गझलची मागणी असते. बिहाग रागातील "तीव्र मध्यम" आणि "शुद्ध मध्यम" यांचे प्रभुत्व गाण्याच्या पहिल्याच ओळीतून दिसून येते. गाण्याच्या वाद्यमेळात छेडण्याचा आणि गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे आणि तो तसा वापर केल्यानेच स्वररचनेची खुमारी वाढते. त्यांच्या संगीतात नेहमीच एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. त्यांनी शक्यतो मोठा वाद्यवृंद वापरण्याकडे कल दाखवला नाही तसेच वाद्यांचा उपयोग हात राखून केल्याचे दृष्टोत्पत्तीस पडते. त्यामुळे गीतांतील संगीत आणि शब्द आपल्या मनात झिरपत जातात. वास्तविक ही रचना एक नृत्यरचना आहे पण तरीही संयमित भावदर्शन आपल्याला सतत दिसते. खैय्याम यांच्यावर एक आरोप नेहमी केला जातो - पहाडी रागाचा अतोनात वापर. सत्कृतदर्शनी हा आरोप नाकारणे अशक्य परंतु जरा बारकाईने ऐकल्यावर त्या रागातील अनेक दडलेल्या छटा शोधून काढून त्यांनी गाण्यांना अर्पिल्या आहेत, हे लक्षात येईल. तेंव्हा हा आरोप थोडा एकांगी आहे असे म्हणता येईल. 
आशाबाईंनी या चित्रपटाची गाणी गाऊन मुजरा धर्तीच्या गायनाचा एक मानदंड तयार केला. वास्तविक तिन्ही सप्तकात सहज फिरणारा गळा. परिणामी कुठलेही गाणे गळ्याला वर्ज्य नाही आणि ललित संगीताच्या दृष्टीने हे वैशिष्ट्य अधिक भावणारे. इथे तर कोठीवरील गाणे म्हणजे उद्दीपित करणे हे  प्राथमिक उद्दिष्ट. परंतु गायनात, मी वर लिहिल्या प्रमाणे "आदबशीर" आणि "संयत" हे भावगुण इथे आढळतात. कुणालाही हेवा वाटावा असा आवाज आशाबाईंना लाभला आहे. तो चैतन्यपूर्ण, कंपविहीन, न घसरता द्रुत लयीत फिरणारा आणि भरीव असूनही जनानी सौंदर्याने आणि लालित्याने युक्त असा आहे आणि या सगळ्या अलंकारांचा प्रत्यय या गाण्यात येतो. गाण्याच्या पहिल्या ओळीपासून याचे प्रत्यंतर येते. गायनातील प्रत्येक खटका, प्रत्येक हरकत ही काव्यातील आशयाला अधिक खोल मांडणारी आहे. खरंतर प्रत्येक अंतऱ्याची  वेगळी बांधलेली आहे पण तरीही कुठल्या शब्दावर "वजन" द्यायचे आणि कुठला शब्द "हलक्या" स्वरांत घ्यायचा, यामागे आशाबाईंचा स्वतःचा विचार दिसतो. त्यामुळे उठवळपणा नावाला देखील नाही. ठुमरी प्रमाणे रचना बांधली आहे पण आपल्याला ठुमरी गायची नसून चित्रपट गीत गायचे आहे तेंव्हा त्यादृष्टीनेच हरकतींचे स्वरूप ठेवणे गरजेचे आहे. आशाबाईंची प्रतिभा यादृष्टीने "निखरली" आहे. कोठीवरील गाणे फारच वरच्या स्तरावर गेले.  

दिल चीज क्या है ,आप मेरी जान लिजिये 
बस एक बार मेरा कहा मान लिजीये 

इस अंजुमन में आप को आना है बार बार 
दिवार-ओ-दर को गौर से पहचान लिजीये 

माना के दोस्तो को नहीं,दोस्ती का नाझ 
लेकिन ये क्या के गैर का एहसान लिजीये 

कहिये तो आसमान को जमीं पर उतर लाइये 
मुश्किल नहीं है कुछ भी अगर थान लिजीये 


No comments:

Post a Comment