Sunday 17 May 2020

प्रभू तेरो नाम

भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून आपण ६ संगीतकोटींच्या अस्तित्वाचा नेहमी निर्देश केला जातो. त्या म्हणजे "आदिम","लोक","धर्म","कला","संगम" आणि "जनप्रिय" संगीतकोटी.खरतर या संगीतकोटींसमवेत विचार व्हायला पाहिजे भक्तिसंगीतकोटींचा. भक्तिसंगीताचा निराळा विचार व्हायला हवा कारण खरे पहाता भक्तिसंगीताची तपासणी एका अधिक व्यापक अभ्यासाचा भाग ठरते. मानवी व्यक्तिमत्वाच्या आध्यात्मिक अंगांपैकी ३ गोष्टींचा संगीताशी संबंध वारंवार येत असतो : धर्मपरता, साक्षात्कारयुक्तता आणि भक्तिपरता. संगीत आणि अध्यात्म यांच्या परस्परसंबंधातील काही प्रमाणात एकमेकांत मिसळणाऱ्या आणि अधिकाधिक संकोच पावत जाणाऱ्या अवस्थांचे दर्शन या तिहींत होत असते. संगीत आणि धर्म यांची अपार विविधता आणि दीर्घ परंपरा भारतात आढळत असल्याकारणाने प्रस्तुत तपासणीस अपूर्व अशी संधी मिळते. याशिवाय भारतीय भाषांची विविधता आणू बहुसंख्याही ध्यानात घ्यावीच लागेल. या दृष्टीने असे ठाम विधान करता येईल, अध्यात्म आणि संगीत यांचे नाते तपासण्यास असे आव्हान इतरत्र क्वचितच मिळेल. 
भारतीय संगीत भक्तिपर आहे असे विधान वारंवार केले जाते परंतु भारतीय संगीतपरंपरा समग्रतेने विचारात घेता या स्तुतीपर विधानाने काहीशी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. याचे एक कारण असे, भक्तिपर संगीताची एक निराळी कोटी अस्तित्वात आहे याची स्वतंत्र जाणीव  होणे. दुसरे कारण असे की सादर होत असलेले एकंदर संगीत बरेचसे भक्तिपर म्हणणे हे हास्यास्पद ठरते. याचे महत्वाचे कारण संगीतकोटी सत्य स्वरूप धारण करतात. 
भक्तिसंगीताचे मंचीय सादरीकरण होत असते  त्या सादरीकरणावर अनेक संस्कार करावे लागतात आणि याच पार्श्वभूमीवर आपण आजचे गीत ऐकणार आहोत. 
प्रस्तुत गीताची शब्दकळा ही साहिर लुधियान्वी यांची आहे. एक बाब नक्की सांगता येते, भक्तिपर रचनेत काही ठराविक प्रतिमा या वारंवार डोकावतात आणि त्या प्रतिमांच्या आधारेच काव्य निर्माण होत असते. याचा वेगळा परिणाम असा होतो. काहीवेळा ही एक मर्यादा म्हणून कवीला काचू शकते. भक्तिपर रचनांत प्रामुख्याने देव आणि देवभक्ती प्रामुख्याने येत असली तरी त्याला अनुलक्षून तत्वज्ञान देखील अवतरते. अर्थात आजच्या कवितेत "देव" आणि त्याच्याकडे केलेली मागणी - याच आशयाभोवती कविता फिरते. देवाची स्तुती हाच प्रमुख विषय असल्याने, त्या संदर्भातील मानवी इच्छा इतकाच मर्यादित परीघ आहे. चित्रपट गीताला आवश्यक अशी गेयता या कवितेत आहे आणि वाचताना कुठेही (एक,दोन अपवाद वगळता) जोडाक्षरे नाहीत जेणेकरून संगीतातील "खटका" अलंकाराला मदत होईल. 
संगीतकार जयदेव यांची स्वररचना आहे. जयदेव यांची कारकीर्द बघता त्यांना ""हम दोनो" चित्रपटातील गाण्यांइतकी अफाट लोकप्रियता कधीही मिळाली नाही आणि या गाण्याच्या लोकप्रियतेचा त्यांना तसा फार फायदा झाला नाही. फक्त जयदेव यांचे नाव लोकांच्या ध्यानात राहिले. या चित्रपटातील सगळी गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. एक गंमत - या चित्रपटातील "अल्ला तेरो नाम" अतिशय लोकप्रिय भजन म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्या प्रसिद्धीच्या झाकोळात हे गाणे राहिले. वास्तविक स्वतंत्र गाणे म्हणून मुद्दामून दखल घ्यावी, या योग्यतेचे गाणे निश्चितच आहे. राग धानी मध्ये चाल बांधली आहे. सर्वत्र आढळणारा "केरवा" ताल आहे. "ग म नि प ग रे सा" या सुरावटीतून हा राग सिद्ध होतो आणि हे गाणे याच सुरावटीला अनुलक्षून बांधले आहे. राग तसा समोरून आपल्या समोर येतो. खरतर जयदेव यांच्या रचनांत राग शक्यतो आडमार्गाने आपल्यापर्यंत पोहोचतो. मी वर म्हटल्याप्रमाणे जरी कवितेत जोडाक्षरे नसली तरी चाल बांधताना आपल्याला अनेक जागी "खटके" ऐकायला मिळतात जेणेकरून काव्यातील भाव अधिक खोलवर ध्यानात यावा. इथे संगीतकाराचा कवितेबद्दलचा व्यासंग दिसून येतो. मुखड्यातील शेवटची ओळ - "जीवन धन मिल जाए" ही गाताना "जाए" शब्दावर बारीकसा खटका घेतला आहे ज्यामुळे सगळ्या ओळीचे महत्व अधोरेखित झाले. चाल तशी साधी आहे पण जयदेव यांची शैली काही लपत नाही. वाद्यमेळातील बासरी किंवा सतार असो, वाजताना आशय तर प्रकाशात येतोच पण शब्दांचे महत्व तितकेच प्रकाशात येते. 
गाण्यातील लय अभ्यासण्यासारखी आहे. व्यासंगी संगीतकार" हा नेहमीच सर्जनशीलतेच्या जागा शोधत असतो. गाताना निव्वळ शब्द नव्हेत तर अक्षराने चालीचे सौंदर्य खुलवता येते. सोप्या स्वरांनी सुरु होणारी चाल एकदम "जो ध्याये फल पाए" गाताना बारीकशी निमुळती होत जाणारी हरकत ऐकायला मिळते. "गायकी अंग" अशाच स्वराकृतीतून सिद्ध होत असते. गाण्यात दोनच अंतरे आहेत. पहिल्या अंतऱ्याची सुरवात मुखड्याच्या चालीशी समांतर अशी आहे परंतु पुढे मात्र अंतऱ्याच्या दुसऱ्या ओळीपासून संगीतकार जयदेव आपले अस्तित्व दाखवतात. "हर बिगडी बन जाए, जीवन धन मिल जाए" या ओळीतील उत्तरार्ध प्रथम एका सुरात घेतला आहे परंतु पुन्हा घेताना चाल मुखड्याशी नाते जुळवून घेते. स्वरज्ञान म्हणतात ते या स्वरवाक्यांशाला. लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे लय तशीच ठेवली आहे पण चालीत किंचित बदल केला आहे. हे सगळे व्यामिश्र बदल लताबाईंनी आपल्या गायकीतून सर्वांगाने खुलवले आहे. इथे संगीतकार आणि गायिका याचे अचूक तादात्म्य दिसते. संगीतकाराला काय अपेक्षित आहे याची नेमकी जाणीव ठेऊन आणि तरीही आपल्या गायकीचे स्वत्व कायम ठेऊन कलाकृती सादर करणे , आपण समजतो इतके सहज सोपे नाही. परकायाप्रवेश म्हणतात तो असा अचानक रसिकाला उमजतो. शेवटचा अंतरा मात्र पहिल्यापासून वरच्या सुरांत घेतलेला आहे परंतु वरच्या सुरांत जाणे म्हणजे गायकी दाखवणे नव्हे. कवितेतील सात्विक भाव तसाच कायम ठेवत गाण्यात रंगत आणली आहे. गाणे द्रुत लयीत आहे पण ताल कुठेही स्वरांवर कुरघोडी करीत नाही. द्रुत लयीत हा धोका कायम असतो. स्वरचना दुगणित जात असताना तालाच्या मात्र चौगणीत वाजवून "कलाकारी" प्रगट करायचा हव्यास भल्याभल्या कलाकारांना टाळता येत नाही परंतु आपण जी कलाकृती सादर करीत आहोत त्याचे प्रयोजन नेमकेपणाने समजून घेऊन त्याच्या संस्कृतीशी नाळ जुळवित कलाकृती अंतिम टप्प्यापर्यंत एक विशिष्ट दर्जा राखून सिद्ध करणे हे तर गायक/गायिकेचे मूळ कर्तव्य. अशावेळी गाण्याचे तिन्ही घटक एकजीव होतात आणि रसिकांना पराकोटीचा आनंद देतात. 


प्रभू तेरो नाम , जो ध्याये फल पाए 
सुख लाए तेरो नाम 
तेरी दया हो जाए तो दाता 
जीवन धन मिल जाए 

तू दानी तू अंतर्यामी 
तेरी कृपा हो जाए तो स्वामी 
हर बिगडी बन जाए, जीवन धन मिल जाए 

बस जाए मोरा सुना अंगना 
खिल जाए मुरझाए कंगना 
जीवन में रस आए, जीवन धन मिल जाए 



No comments:

Post a Comment