Tuesday 11 February 2020

जिथे सागरा धरणी मिळते

चित्रपट गीत आणि खाजगी भावगीत यात नेमका काय फरक आहे? चित्रपटातील गीत हे दृश्यभान जागवणारे असते, हे तर आहेच परंतु एक आविष्कार म्हणून विचार केला तर वस्तुतः त्यात काही फरक नसतो. चित्रपट असल्याने तिथे आर्थिक प्रश्न फारसा नसतो आणि त्यामुळे मोठा वाद्यमेळ वापरण्याची संधी प्राप्त होत असते. हे देखील अविष्कार म्हणून थोडे नगण्य कारण ठरते. कारण मोठा वाद्यमेळ हा नेहमीच स्वररचनेला पूरक असतो किंवा सर्जनशीलतेला नवे विस्तार परिमाण देणारा असतो. मूलभूत घटक तर तेच असतात, सादरीकरण तसेच असते म्हणजे मुखडा - पहिला अंतरा - दुसरा अंतरा अशीच मांडणी असते. पण तरीही आपल्याकडे दोन्ही आविष्कार भिन्न  असल्याचे अकारण मानले जाते. तेंव्हा आज आपण जे गाणे आस्वादणार आहोत ते या दोन्ही प्रकारांत सहज बसू शकेल असे आहे. "जिथे सागरा धरणी मिळते" हे गाणे प्रथमक्षणी ऐकले तर चित्रपटाला वाटतच नाही. अर्थात त्यामागे कारणे अनेक आहेत आणि त्या दृष्टीनेच आपण गाणे ऐकणार आहोत. 
पी.सावळाराम या लोकप्रिय कवीची शब्दरचना आहे. मराठी भावगीतात अग्रस्थानी असलेले नाव. या गाण्याचे संगीतकार वसंत प्रभू आणि पी.सावळाराम यांनी एक काळ प्रचंड गाजवला होता. असंख्य मराठी भावगीते लोकप्रयिय झाली होती. आता कवी म्हणून विचार करायला गेलो तर या कवितेत किंवा इतर बहुतांश कवितेत आशयदृष्ट्या फार काही नवीन मिळत नाही परंतु भावसंगीताची एक अट असते, हाताशी येणारी कविता गेयबद्ध असणे. या कवीच्या रचना जर का वाचायला घेतल्या तर त्यातील गेयता आणि लयबद्धता आपल्याला आकर्षून घेते. आता शब्दरचनेत सुद्धा फार काही हाताला मिळत नाही. प्रतिमा सगळ्या बहुतांशी ढोबळ अशाच आहेत, किंबहुन काहीशा बाळबोध अशाच प्रतिमा आहेत. उदाहरणार्थ "बघुनी नभीची चंद्रकोर ती, सागर हृदयी उर्मी उठती" या ओळींमधून खरतर काही वेगळा आशय मिळत नाही परंतु भावसंगीताची स्वतःची अशी मागणी असते, गाण्याच्या चालीच्या "मीटर"मध्ये शब्दरचना हवी जेणेकरून गाताना कुठेही फारसे अवघडलेपण येऊ नये आणि ती गरज ही शब्दकळा पूर्ण करते. कवितेतील दुसरा अंतरा वाचायला गेल्यास, दुसरी ओळ - "रम्य बाल्य ते जिथे खेळले" या  ओळीत "रम्य" आणि "बाल्य" अशी दोन जोडाक्षरे एकापाठोपाठ आहेत. गायन करताना अशा शब्दांचे गायन करणे कठीण होऊन बसते आणि त्यामुळे पुढे "तिथे" या शब्दावर अकारण जोर येतो कारण लयीचे बंधन पडते. परंतु एकूणच साधी, सरळ, सोपी अशी शब्दरचना आहे आणि मुख्य म्हणजे चित्रपटाला साजेशी आहे. 
गाण्याची चाल यमन रागावर आहे. गाण्याच्या सुरवातीला "हमिंग"आहे ते यमन रंगाची ओळख करून देते. "नि रे ग" हे स्वर म्हणजे ठळक यमन राग. आपली प्रत्येक चाल ही फक्त आणि फक्त मेलडीवरच आधारलेली असायला हवी, इतकी ठाम धारणा या संगीतकाराच्या स्वररचनेतून ऐकायला येते. भारतीय कलासंगीताचा असा वापर करणारे जे थोडेफार संगीतकार मराठीत होऊन गेले त्यात हे नाव नि:संशय वरच्या श्रेणीत यावे. चाली सोप्या असता पण बाळबोध नाही. सरळ सोपी वाटणारी लय एकदम कठीण होते. सगळे अंतरे मुखड्याशी समांतर बांधले आहेत.मुळात चालीचा गोडवा इतका विलक्षण आहे की ऐकणारे सुरवातीपासून गुंगून जातो. चालीचा एकंदरीत विचार केल्यास, स्निग्धता आणि प्रेमभावना याचे मिश्रण आढळते. तसेच सुरावट आणि लयबंध यांची थोडी गतिपुर्ण अशी चलने आहेत. वाद्यमेळात व्हायोलिन सारखे वाद्य प्रमुख आहे पण तरीही मेंडोलिन, गिटार इत्यादी वाद्यांचा अतिशय संयमित वापर आहे. खरतर वाद्यमेळ तसेच गायन,  दोहोंत नेहमीच संयमित सादरीकरण हेच या संगीतकाराचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. थोडक्यात भारतीय वाद्यांवर काहीसा अंतर्मुख ठेका चाललेला आहे पण याच वेळी पाश्चात्य वाद्यांवर बहिर्मुख लयबंध चाललेला आहे. या सूक्ष्म लयसंकरामुळे गीताच्या भावाशयास आवश्यक अशी स्थिरता प्राप्त होते. 
गायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गायकीचे संयत दर्शन घडवले आहे. आवाजाचा पल्ला विस्तृत आहे. प्रत्येक अंतऱ्याची शेवटची ओळ वरच्या सप्तकात घेतली आहे परंतु तिथे गायन विनासायास होते. दुसरा विशेष म्हणजे पारदर्शी आवाज. अत्यंत स्वच्छ, निकोप गळा आहे. त्यामुळे सूर बाहेर पडताना त्यात कुठेही कातरता आढळत नाही की अडखळणे आढळत नाही. त्यामुळे गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. या गाण्यात प्रणयाची कबुली दिली आहे पण देताना स्वर कुठेही उत्तेजित किंवा अकारण लज्जित होत नाही. त्यामुळे सगळे गाणे भावस्पर्शी होते. 

जिथे सागरा धरणी मिळते 
तिथे तुझी मी वाट पहाते 

डोंगर दरीचे  सोडून घर ते  
पल्लव - पाचूचे तोडून नाते 
हर्षाचा जल्लोष करूनी जेथे प्रीत नदीची एकरूपते 

वेचीत वाळूत शंख शिंपले 
रम्य बाल्य ते जिथे खेळले 
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते 

बघुनी नभीची चंद्रकोर ती 
सागर हृदयी उर्मी उठती 
सुखदु:खाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते 




No comments:

Post a Comment