Monday 15 July 2019

रूपास भाळलो मी

काही गाणीच अशी असतात, ऐकता क्षणीच प्रेमात पडावे. चाल  तशी साधी, लोभस असते. स्वररचना कवितेच्या आशयाशी सुसंगत असते आणि स्वरांतून कवितेतील आशय अधिक खोलवर 
मांडलेला असतो. अशी स्वररचना अभावानेच ऐकायला मिळते. आपला एक ठाम ग्रह असतो, स्वररचना गुंतागुंतीची झाली म्हणजे ती चाल बुद्धीवादी असते आणि चोखंदळ रसिक अशाच स्वररचनेच्या शोधात असतात आणि तशी सापडली की भुलतात. चाल गुंतागुंतीची असणे, हे संगीतकाराच्या प्रतिभेचे दर्शन होय पण तो एकमेव निकष नव्हे. साधी, सोपी, गोड चाल निर्माण करणे तितकेच अतिशय अवघड असते.  विशेषतः प्रणय गीत असेल तर कवितेतील ऋजुता स्वररचनेतून मांडणे हे एक आव्हान असते. मराठी भावगीत किंवा चित्रपट गीतांचा धांडोळा घेतला तर असे आढळेल, अशा प्रकारची गाणी अपवादात्मकच आढळतात जिथे शब्द, सूर आणि गायन यांना एकत्रितरीत्या सुविहितपणे बांधलेले आहे. यातील "सुविहितपणे" हा शब्द महत्वाचा. "अवघाची संसार" या चित्रपटातील "रूपास भाळलो मी" हे गाणे या पठडीत येते. स्वररचना अगदी सरळ, साधी आहे, कुठेही अनावश्यक गुंतागुंत नाही. मुखडा ज्या लयीत बांधला आहे, तीच लय कायम ठेवली आहे आणि तोच लडिवाळपणा सगळ्या रचनेत भरलेला आहे. 
शब्दरचना जरी "वसंत अवसरे" या नावाने लिहिलेली असली तरी मूळ नाव हे "शांता शेळके" यांचे आहे. त्यावेळी शांताबाई सरकारी कमिटीवर होत्या आणि त्या सरकारी कमिटीचा नियम होता, कुठेही व्यावसायिक संबंध ठेवायचे नाहीत. तेंव्हा शांताबाईंनी "टोपण नाव" घेऊन चित्रपट गीत आणि काही भावगीते लिहिली आणि गीतांना समृद्धता मिळवून दिली. शांताबाई या मुळातल्या कवियत्री परंतु आर्थिक अडचणी सोडविणे आणि काहीतरी नवीन आव्हान स्वीकारणे, या उमेदीने त्यांनी कविता लिहिल्या. अर्थात कितीही व्यावसायिक संबंध आले तरी मुळातली भाववृत्ती काही लपत नाही. आता कविता म्हटले की प्रतिमा, उपमा इत्यादी घटक अवतरणारच. शांताबाई याच कवितेत "हे गोड रूप ऐसे, निरखीन मी दुरून, पाण्या अशीच ठेवी, छाया उरी धरून" अशी सुरेख काव्यमय ओळ लिहून जातात. चित्रपट गीते लिहिताना, एक बंधन वारंवार पाळावेच लागते, किंबहुना ललित संगीतात हे बंधन पाळावेच लागते. संगीतकाराने चाल बांधताना, त्याच्या स्वरिक लयीचा एक ठराविक "मीटर" आखलेला असतो आणि त्यानुरुपच शब्दांची मांडणी करायची असते. काहीवेळा संगीतकार त्या मीटरला मुरड घालतात पण ते अपवादात्मक. मुखडा लिहिताना हे बंधन स्वीकारावे लागते. त्यामुळेच गीते लिहिताना त्यात किती "गूढार्थ" आणायचा, यावर मर्यादा पडते. हे चित्रपट गीत, युगुलगीत आहे तेंव्हा शांताबाईंनी प्रत्येक अंतरा वेगळ्या अंदाजाने लिहिला आहे. अर्थात त्यानुरुपच प्रतिमा लिहिल्या आहेत. "हा लाजरा शहारा, पाहील काय कोणी? करतील का चहाडी, हे लाल गाल दोन्ही ?" या ओळी वाचल्यावरच अंदाज करता येतो. इथे बघा, वाचताना कुठेही आशय आकळायला त्रास होत नाही परंतु नेमका आशय रसिकांसमोर आणला जातो आणि रचनेत कुठेही सपकपणा, सरधोपटपणा येत नाही. प्रणयाचीच भावना तरीही काहीतरी "नवीन" वाचल्याचे प्रत्यंतर येते. असे काही वाचल्यावर मनात येते, शांताबाईंनी आणखी चित्रपट गीते (जितकी लिहिली ते प्रमाण अत्यल्प आहे) लिहायला हवी होती. 
वसंत पवारांची संगीत रचना आहे. गाण्याची सुरवात तिलक कामोद रागाच्या साहाय्याने समोर येते पण त्यात देस रागाचा रंग अद्भुतपणे मिसळला आहे. सुरवातीला क्षणभर व्हायोलिनचे सूर ऐकायला येतात पण त्यातच सतारीचे सूर जोडले जातात आणि डोळ्यासमोर राग तिलक कामोद येतो. पुढील आलाप त्याचा सुरावटीचा विस्तार दर्शवतात. मुखडा देखील किती हलक्या सुरांनी आपल्यासमोर येतो ते ऐकण्यासारखे आहे. शांताबाईंनी शब्दांतून ऋजुता मांडली आहे,  त्याचे औचित्य कुठेही ढळलेले नाही. पुढील अंतरे हे देस/ तिलक कामोद रागाच्या सुरांशी पाठशिवणीचा खेळ खेळत आपल्या समोर येतात. रागधारीत चाल आहे पण त्यातील गोडवा नेमका टिपला आहे. हीच तर संगीतकाराची वैशिष्ट्ये म्हणता येतील. निव्वळ राग समोर न ठेवता, त्यातील "ललित" फ्रेजीस निवडून, कवीच्या शब्दांना त्यात गुंफायचे. इथेच संगीतकाराचा अभ्यास दिसून येतो. 
समृद्ध गायन, हा या गाण्याचा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. सुधीर फडके/आशा भोसले यांनी आपला आवाज पुरवला आहे. संगीतकाराच्या मनातील स्वराकृती आपल्या गळ्यातून मांडताना, निव्वळ आराखडाच न  मांडता,त्यात आपले गायन कौशल्य कसे मिसळायचे, याचा हे गायन हा सुरेख आदिनमुना आहे. गाण्यातील दुसरा अंतरा आशाबाईंनी गायला आहे. सुरवातीची ओळ "चाहूल मंद झाली" या शब्दांनी संपते. त्यातील "चाहूल" लागणे आणि त्यातील "मंद" असा हलकेपण असणे. स्वरांतून किती यथार्थपणे दाखवले आहे. खरतर या गाण्यातील प्रत्येक ओळ ही स्वतंत्रपणे आस्वादावी, या प्रतीची आहे. बहुदा याच आणि अशा आणखी अनेक गुणांमुळेच हे गाणे चिरस्मरणीय असे झाले आहे.   

रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला 
मज वेड लाविले, तू सांगू नको कुणाला 

एकांत पाहुनिया, जे तू मला म्हणाला 
ऐकून लाजले मी, सांगू नको कुणाला 

चंद्रा ढगांतुनी, तू हसलास का उगा रे 
वाकून खालती अन, का ऐकलेस सारे 
जे ऐकले तुवा, ते सांगू नको कुणाला 

वाऱ्या तुझी कशाने, चाहूल मंद झाली 
फुलत्या फुला कशाला, तू हासलास गाली 
जे पाहिले तुवा, ते सांगू नको कुणाला 

हे गोड रूप ऐसे, निरखीन मी दुरून 
पाण्या अशीच ठेवी, छाया उरी धरून 
धरलेस जे उरी, ते सांगू नको कुणाला 

हा लाजरा शहारा, पाहील काय कोणी ? 
करतील का चहाडी, हे लाल गाल दोन्ही ? 
गालांत रंगले जे, सांगू नको कुणाला 



No comments:

Post a Comment