Thursday 11 July 2019

विसरशील खास मला

प्रत्येक संगीतकाराचा स्वतः:चा असा एक दृष्टिकोन असतो आणि त्यानुसार त्यांच्या बहुतांशी स्वररचना, निर्मिती स्वरूपात आपल्या समोर येतात. किंबहुना, हातात आलेली कविता वाचताना, कुठल्या शब्दावर "सम" घ्यायची, कुठल्या शब्दावर "वजन" घ्यायचे जेणेकरून आपली रचना अधिक सुंदर, अर्थवाही आणि लोकप्रिय होईल. त्यानुसार त्यांचे ठराविक आडाखे देखील असतात. अर्थात यातूनच त्या संगीतकाराची "शैली" तयार होते. शैलीच्या जोखडातून आजपावेतो कुठलाही संगीतकार सुटलेला नाही. अर्थात शैली हे जोखड मानावे की ओळख ठसवावी, हा आणखी वेगळं विचार समोर येतो. थोडे बारकाईने ऐकले तर असाही लक्षात येते, प्रत्येक संगीतकाराची गाणे बांधायची देखील स्वतंत्र अशी शैली असते आणि त्यातूनच मग लयीचे आवडते "वळण" ही सुद्धा त्या संगीतकाराची ओळख होऊन बसते. विशेषतः सतत गाणी बनवायची झाली म्हणजे मग हळूहळू त्याची शैली अधिक ठळकपणे आपल्या समोर येते. आजचे आपले गाणे "विसरशील खास मला" या संदर्भात विचारात घेताना हेच मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. 
आज हे गाणे तयार होऊन जवळपास ५० वर्षे तरी उलटली असतील पण जागृत रसिकांच्या नजरेत कायमचे स्थान मिळवून बसलेली रचना आहे. कवी ज.के.उपाध्ये हे नाव तर आता पूर्णपणे विस्मरणात गेलेले आहे खरतर ही अवस्था बऱ्याच मराठी भावगीतांबाबत म्हणता येईल. 
त्या कवींची ओळख ही त्या ठराविक गाण्यातूनच झाली तर होते. बरेचवेळा तर गाणे आवडते पण त्या गाण्याचा कवी कोण? हे विचारायची तोशीस देखील घेतली जात नाही. सूर्यकांत खांडेकर हे असेच चटकन आठवलेले नाव. त्यांनी लिहिलेली भावगीते अमाप लोकप्रिय झालेली आहेत पण बहुतांशी श्रेय हे गायक आणि संगीतकाराकडे जाते. आपल्याकडे आजही गाण्यातील कविता, हा दृष्टिकोन फारसा गंभीरपणे घेतला जात नाही. कवितेशिवाय ललित संगीत संभवत नाही परंतु कवितेकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे असेच बहुतांशी आढळते आणि यात काही चूक आहे, अशी साधी जाणीव देखील दाखवली जात नाही. सूर हे मनावर लगेच गारुड घालतात हे जरी पूर्णांशाने  मान्य केले तरी शब्द देखील तितकेच महत्वाचे असतात त्याशिवाय ललित संगीताची अभिव्यक्ती संभवतच नाही. 
कविता म्हणून ही शब्दरचना विचारात घेतली तर ललित संगीतात सरधोपटपणे आढळणारा आशय आहे. घाट देखील सर्वमान्य असाच आहे किंवा रचना कौशल्य, प्रतिमा या सहज, सोप्या अशाच आहेत. खरतर एक विचार नेहमीच मांडला जातो, ललित संगीतात "खरी भावकविता" कितपत गरजेची असते? इथेच कवी आणि संगीतकार यांचा पिंडधर्म ओळखता येतो. ललित संगीतातील कविता ही स्वरिक लयीच्या अंगाने जाणारी हवी आणि त्यानुसारच शब्दरचनेतील रचना आणि खटके असावेत. फार मोठ्या लांबीची शब्दरचना, स्वररचेनच्या दृष्टीने अवघडच असते अर्थात अपवाद म्हणून काही रचना दाखवता येतील. तेंव्हा ललित संगीताच्या दृष्टीने प्रस्तुत कविता ललित संगीताच्या सगळ्या "गरजा" भागवते, असे म्हणता येईल. 
संगीतकार यशवंत देव हे नेहमीच अर्थपूर्ण रचना करणारे म्हणून प्रसिद्ध होते. कविमनाच्या या संगीतकाराने असंख्य अर्थपूर्ण स्वररचना सादर करून, विशेषतः मराठी मनात अढळ स्थान मिळवले आहे. हाती आलेल्या कवितेतील आशय नेमकेपणाने जाणून घेऊन, त्यातील कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, जेणेकरून कवितेतील आशय अधिक निखरून येईल हा त्यांचा विशेष निश्चितच भावणारा होता. आता याच कवितेतील पहिल्या ओळीतील "विसरशील खास मला, दृष्टीआड होता" या ओळीतील "खास" शब्दाचे "खास" महत्व त्यांनी ओळखले आणि स्वररचना करताना त्या शब्दावर "आघात" घेतला आहे. वास्तविक, "विसरशील" किंवा "दृष्टीआड" हे शब्द देखील तितकेच महत्वाचे आहेत पण तरीही देवांना "खास" शब्द महत्वाचा वाटला. संगीतकाराची दृष्टी ही अशा प्रकारे पारखून घेता येते. संगीताच्या दृष्टीने पहिली ओळ "मालकंस" तर "वचनें ही गोड गोड देशी जरी आता" ही ओळ "चंद्रकंस" रागाशी नाते सांगणारी आहे. खरेतर गाणे सुरु व्हायच्या आधीचे सतारीचे सूर हे "मालकंस" रागच दर्शवतात. गमतीचा भाग असा आहे, पुढील अंतरे बांधताना संगीतकाराने "जोगकंस" रागाचे सूर हाताशी घेतले आहेत. खरतर ललित संगीतात रागाची ओळख खोलवर घेण्याच्या फंदात पडू नये हेच खरे. 
गायिका म्हणून आशा भोसल्यांच्या केवळ या गायनासाठी म्हणून स्वतंत्र लेख लिहावा लागेल, इतके अर्थपूर्ण गायन झाले आहे. "अंतरीची आग तुला जाणवू कशाने"  या ओळीतील मानसिक तडफड आणि होरपळ ज्या प्रकारे आशाबाईंनी दाखवली आहे, ते विशेष लक्षणीय ठरेल. संगीतकार चालीचा नकाशा गायिकेला देत असतो पण त्या नकाशातील मार्गक्रमणा ही गायक/गायिकेनेच करायची असते आणि इथे आशाबाई निव्वळ अजोड गातात. अशीच ओळ "वशही वशीकरण तुला सहज जादुगारा"  गाताना त्यांनी आपले गायन कौशल्य दाखवले आहे. "वश"ही  आणि लगेच "वशी"करण, गाताना दोन्ही शब्दांचा अर्थपूर्ण उच्चार असाच अप्रतिम, असेच म्हणायला लागेल. तेंव्हा असे गाणे जर लोकांच्या मनात इतकी वर्षे ठाण मांडून बसले असेल तर नवल ते काय!!

विसरशील खास मला, दृष्टीआड होता 
वचनें ही गोड गोड देशी जरी आता 

दृष्टीआड झाल्यावर सृष्टीही निराळी 
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली 
गुंतता तयात कुठे वाचन आठविता 

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरीची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दु:ख नेणे
याकरता दृष्टीआड होऊ नको नाथा 


No comments:

Post a Comment